Skip to main content

सिंधुआज्जी आणि अ.म.न. उत्पादक महासंघ

अ.म.न. उत्पादक महासंघाचे पदाधिकारी व्यथित होते. उत्पादनाला ग्राहकांचा प्रतिसाद लाभत नव्हता, आणि शेतकऱ्यांचाही. या पेचातून तोडगा कसा काढावा, हे त्यांना सुचत नव्हते. या नैराश्यातून महासंघाच्या सचिवांनी राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर महासंघाची बैठक चालू होती.

नवनिर्वाचित प्रभारी सचिव म्हणाल्या, "आपल्या अनेकविध प्रयत्नांना अद्याप यश आलं नाही. आता मूलभूत उपाय केला पाहिजे."

"म्हणजे नेमकं काय?" जुन्याजाणत्या अध्यक्षांनी विचारलं.

"महासंघाने ब्रॅन्ड कनसलटनट नेमून उत्पादनाचं सुयोग्य पोझिशनिन्ग केलं पाहिजे."

"अनुमोदन! साधु!साधु!" असा गजर सदस्यांनी केला.

"साधु नव्हे. सिंधु. सिंधुआज्जी याच हे शिवधनुष्य उचलू शकतात." नवनिर्वाचित प्रभारी सचिव म्हणाल्या.

महासंघाच्या पत्रडोक्यावर सिंधुआज्जींना टेलेक्स धाडण्यात आला. सिंधुआज्जींनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली.

पुढील काही दिवस जाॅर्ज वाॅशिन्ग्टन कार्व्हरच्या कार्याचा सखोल अभ्यास करून आणि इन्स्टन्ट मार्केट सर्व्हेक्षण करून सिंधुआज्जींनी आपला अहवाल महासंघाला पाठवून दिला.

महासंघाचे पदाधिकारी हर्षोन्मादित झाले. अहवालातील प्रत्येक सूचनेची त्यांनी तात्काळ अंमलबजावणी केली. आणि एका प्रसन्न सकाळी महासंघाच्या नव्याकोऱ्या कॅफेंबाहेरील नव्याकोऱ्या फीती नव्याकोऱ्या कात्र्यांनी कापण्यात आल्या.

याआधी काही दिवस "When our brand is so awesome, why would we need an ambassador?" या टॅगलाईनने मोठ्या प्रमाणावर अॅड कॅम्पेन करण्यात आले होते. टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रे, सोशल मिडिया या सर्वांत या अॅड कॅम्पेनने एकच जाळ आणि धूर उडवला होता. सबब, महासंघाच्या नव्याकोऱ्या कॅफेंबाहेरील नव्याकोऱ्या फीती नव्याकोऱ्या कात्र्यांनी कापण्यात आल्या तेव्हा प्रत्येक कॅफेबाहेर ग्राहकांची झुंबड उडाली होती.

मेनू पाहिल्यावर ग्राहकांना हर्षोन्मादित होण्याची संधी मिळाली. नवलकोल ग्रीन अॅपल सलाड, नवलकोल कोरिअॅन्डर सूप, नवलकोल मलई मटार, नवलकोल पराठे, नवलकोल पास्ता इन ग्रीन नवलकोल साॅस, नवलकोल आईसक्रीम अशा रूचकर डिशेसचा ग्राहकांनी आस्वाद घेतला. तदनंतर नवलकोल फ्रॅग्रन्सचे साबण, डिओडरन्ट, नवलकोलच्या आकाराचे पेपरवेट अशा गोष्टींचीही मनसोक्त खरेदी केली.

दुसऱ्या हरितक्रांतीची सुरूवात झाली होती. आणि अखिल महाराष्ट्र नवलकोल उत्पादक महासंघाच्या या यशाला कारणीभूत होत्या - सिंधुआज्जी!

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/12/2020 - 02:01

पत्रडोक्या :ड

अस्वल, हा तुझ्यावर आणि इनसपेक्टर राण्यांवर व्यक्तिगत हल्ला आहे! मी नसतं हो हे खपवून घेतलं.

अस्वल Tue, 08/12/2020 - 10:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नवलकोलाची झाहिरात थांबवाsssss
राणे जोपर्यंत स्वयंपाक शिकत नाहीत तोपर्यंत ती भयाकारी भीषण भाजी त्यांना खावीच लागेल.
जगात कुठल्या रेस्टॉरंटात नवलकोल मिळतो?
सांगा???

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 10/12/2020 - 00:36

In reply to by अस्वल

सिंधुआज्जींचं रेस्टॉरंट उघडू दे, म्हणजे तुला बरोबर उत्तर मिळेल; आणि राण्यांनाही!

'न'वी बाजू Sat, 05/12/2020 - 05:32

लेटरहेडवर टेलेक्स कसा धाडतात?

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 02:39

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)