हरिहरेश्वरची छोटीशी सहल
गेल्या आठवड्यात दोघी मैत्रिणी हरिहरेश्वरला गेलो होतो, एका बीच रिसाॅर्टवर राहिलो तीन दिवस. लाकडी केबिन होत्या स्वतंत्र. समुद्राला लागून. भरपूर झाडं, रंगबिरंगी फुलं. वेगवेगळे खेळ. स्वच्छ परिसर, हसतमुख मदतीला तयार कर्मचारीवर्ग. आवडलेल्या दोनतीन गोष्टी म्हणजे न्हाणीघरात लादी कोरडी करायला माॅप होता. कपडे वाळत घालायला मोठा स्टॅंड होता, आणि तो उन्हात नेऊन ठेवता येत होता. आणि समुद्रावरून आल्यावर वाळूचे हातपाय धुवायला सार्वजनिक ठिकाणी आणि प्रत्येक केबिनच्या बाहेर नळाची सोय होती. वोडाफोनचं नेटवर्क शून्यात जमा हा मोठा फायदा.
नाश्ता चांगला होता पण जेवण नाही फारसं आवडलं. अर्थात त्याने फरक पडला नाही कारण आम्हाला अशोकवन नावाचं अफलातून जेवण मिळणारं ठिकाण सापडलं होतं जवळच. वृषाली आणि रवींद्र नगरकर यांनी त्यांच्या घरात चालवलेलं हे हाॅटेल. हाॅटेल शब्द चुकीचा वाटतोय खरं तर. वृषाली यांचं हे माहेरचं घर. लग्नानंतर पुण्यात त्या केटरिंगचा व्यवसाय करत होत्या, रवींद्र यांचा स्वतंत्र व्यवसाय होता. या घरी घरगुती जेवणाची सोय होत असे, परंतु आईवडील व काका वारल्यानंतर हे दोघे पुण्यातून इथे आले. रवींद्र मूळचे पुण्यातलेच, कोकणाशी तसा संबंध नाही. परंतु गेल्या आठदहा वर्षांत त्यांनी चांगलाच जम बसवला आहे. जेवण अतिशय उत्तम असतं. गरमागरम, चविष्ट, भरपूर. रोजचा बेत वेगळा. मोदक सगळ्यात लोकप्रिय. आम्ही दोनदा खाल्ले चक्क.
या परिसरात गेल्या वर्षी जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता, अजून अनेक ठिकाणी जमीनदोस्त झालेले माड दिसतात. विजेचे खांबही कोसळलेले तसेच आहेत. दोन माणसांच्या हाताच्या कवेत मावणारी नाहीत इतक्या रुंद बुंध्याचेही अनेक वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. आता पर्यटनावर बऱ्यापैकी अवलंबून आहेत, हळूहळू पर्यटक येतायत, पण तितका ओघ नाही.
दिवेआगरला फिरलो थोडं, प्रेमात पडले त्या गावाच्या. रूपनारायण आणि सुंदर नारायण अशी दोन देवळं जुनी पाडून नवी बांधलीत ती मात्र एकूण परिसराला न शोभणारी वाटली. जुनी देवळं कौलारू होती, आता वेगळ्याच शैलीत बांधलीत, तीही पाचसहा वर्षांपासून अपूर्णच आहेत. इथला सुवर्णगणेश फार प्रसिद्ध होता, पण त्या सोन्याच्या मूर्तीची चोरी झाल्याने पर्यटकांचा ओघ आटला आहे असं कळलं.
हरिहरेश्वराचं देऊळ फार विशेष नाही, पण त्याची प्रदक्षिणा अद्भुत आहे. पाय निघत नाही तिथून.
जवळपास वर्षभराने मुंबईच्या बाहेर पडले, वेगळी माणसं दिसली, वेगळा परिसर हिंडायला मिळाला आणि आयतं जेवायला मिळालं. सुख.
मंदिर आणि रूपनारायणाच्या मूर्तीचे फोटो या लिंकवर आहेत.
https://photos.app.goo.gl/vM9C8FgPiD8by81c7
https://photos.app.goo.gl/5g7q6C3giJPnzMSY9
फुड/ रेस्टॉरंटस वगैरे
ज्यांचं कुलदैवत आहे ते भाविक येतात इकडे. पण पर्यटक म्हणून आलेल्यांचं स्वागत, आहार वगैरेसाठी तयार नसावेत. हे देवळाच्या आसपासच्या व्यवस्थेबद्दल.
बाकी मासेबिसे मिळत असावेत गेटजवळच्याच मोठ्या रेस्टॉरंटात. फलकावर चित्रं दिसत होती. पण या पदार्थांसाठी (गोव्याशिवाय पर्याय) कारवार,मंगलोर असे कर्नाटक किनाऱ्यावरील ठिकाणं आहेत. (( युट्युब - Delhi Food Walks channel पाहता येईल.))
श्रीवर्धनला विचारे यांचे 'स्वाद' प्रसिद्ध आहे. शाकाहारी, मासाहारी थाळी दोन्ही. "रात्री आठला जेवण मिळेल का?" कारण बऱ्याच गावांत उशिरा जेवण मिळत नाही. " हो, साडेआठपासून गर्दी सुरू होते ती साडेबारापर्यंत."
कोस्टल रोड
मी मार्च २०२० मध्ये जवळपास हीच सहल किनारी रस्त्याने करून आले.
मुंबई - वडखळ - अलिबाग - काशीद - आगरदांडा दिघी (बोटीवर चारचाकी चढवून) - दिवे आगरला मुक्काम केला. दिघी ते वेळास रस्त्याचे काम सुरू असल्याने तो अगदीच वाईट होता, पण बाकी अगदी गुळगुळीत नसला तरी रस्त्यामुळे इतक्या सुंदर प्रदेशात ड्राईव्ह करण्याची संधी सोडण्याइतका वाईटही नव्हता.
पुढे हरिहरेश्वर पर्यंत रस्ता अगदी किनार्याने जात नाही, पण निसर्गसुंदर मात्र आहे.
धन्यवाद.
धन्यवाद. मी काढलेला फोटो उजव्या देवळातला आहे, त्यावर रूपनारायण असं लिहिलेलं आहे. डाव्या देवळात गेलो नव्हतो आत कारण कडी घातलेली होती, आणि अंधार होता. देवळांवरच्या पाट्या चुकल्यात की काय? की त्या देवळात कोण आहे हे या देवळात जाणाऱ्यांना कळावं हा हेतू आहे?
आहे छान हरिहरेश्वर श्रीवर्धन दिवेआगर परिसर.
तीन वेळा जाणं झालं आहे. प्रदक्षिणा मार्ग डोंगरावरून मागे समुद्राकडून आहे तो भरतीमुळे दोनदा हुकला होता. तिसऱ्या वेळी पाहिला.
पूर्वी तासाला श्रीवर्धनहून ( २० किमी) यष्टी असे. आता फक्त सकाळी आठला असते. सिक्स सीटर शेअर ओटोंंचा पर्याय आहे.
--
दिवेआगरच्या पुढे/जवळच जी फेरी( कारसह जाता येते) आहे त्याने मुरुडला ( जंजिराला जातो ते) येता आलं. फेरी साधारण दीड तासाने असते. तिथल्या रूपनारायण मंदिराचा पालट पाहिला. बहुतेक गणपतीपुळे आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासारखी इमारत बांधण्याचा विचार असावा. इथल्या बापटांची खानावळ मोदकांमुळे पुण्याकडच्या भाविक आणि पर्यटकांत प्रसिद्ध आहे.
समुद्रावर डुंबून आल्यावर मंदिराचा उपयोग कपडे बदलण्यासाठी होत होता. रूपनारायण साक्षी आहे.
--------------
मागच्या वर्षीच्या वादळाने या संपूर्ण परिसरातली खूप झाडं पडली आणि नुकसान झालं.