द्वाही :)
anant_yaatree
"वाचूनही कविता नच कळली
असे न माझे व्हावे
कोश कोणते यास्तव घरी मी
आणुनी ठेवावे?"
विचारले ऐसे मी कविला -
हसुनी खिन्न तो वदला,
"कविता माझी आजवरी का
कळली कोणाला?"
"शब्दांची आतशबाजी अन्
मोडजोड मी करितो -
जरा रेटुनी अर्थ त्यातूनी
शोधावा तो मिळतो.
जे जे अमूर्त, जटिल, अकल्पित
ते ते मजला गमते
दुर्बोधाच्या गर्द सावलीत
कविता माझी रमते.
शब्द बुडबुडे केवळ असती
अर्थही अवघा भास
सत्य चिरंतन ऐस जाणुनी
शिणवू नको मेंदूस.
अर्थ जसा गवसेल तसा तो
ठोकुनी दे ना तूही
शक्य तिथे मम श्रेष्ठत्वाची
फिरवशील ना द्वाही?"
वाहवा!
अतिशय प्रामाणिक कविता. आदाब!