केम छो गुजरात?
माझ्या प्रवासपत्रिकेतले राहू, केतू, शनी वगैरे वक्री असताना गुजरातला जायचं ठरलं असावं. माझ्या कुठल्याही सहलीत बहुदा नाट्यमय घटना असतात, पण इतके राडेरोडे असलेली सहल कधीच झाली नव्हती. भावजयीच्या ऑनलाईन क्लासमेट मैतरणीने गेलं वर्षभर आग्रह धरल्याने, गुजरातला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बघून, तिथं नर्मदा टेंट सिटीमध्ये राहायचं आमंत्रण आम्ही विचारांती स्वीकारलं. भावजय आणि मी हॉटेलमध्ये राहून तिच्या सखीसोबत गायडेड सहली करायचं ठरवत असताना सखीनं तिच्याच घरी राहायचा आग्रह धरला. माझ्या आवडत्या, हास्यविनोदप्रिय, समंजसपणाचा महामेरू असूनही अलिप्ततेची अद्भुत किनार असलेल्या भावजयीनं विचारलं, "काय गं, तुला चालेल का?" मी म्हणाले, "हॉस्टेलमध्ये राहिले असल्याने कुणाकडे राहायला मला ऑकवर्ड वगैरे वाटत नाही, चलो गुजरात!" त्यामुळे दोन मराठी बायका, एका सिंधी पण आता पक्की गुजराती झालेल्या सखीकडे दाखल झाल्या. आपल्या आईला प्रत्यक्ष कधीही न भेटलेली ऑनलाईन सिंधडी मैत्रीण तिला किडनॅप करेल की काय अशी भीती माझ्या भाचीला वाटत होती. पण आम्ही दोघी तिला पुरून उरलो असतो!
ऐन दिवाळीत घर आणि घरच्यांना वाऱ्यावर सोडून जाण्याऱ्या माझ्यासारख्या धर्मभ्रष्ट कलंकिनीला थांबवण्याचा प्रयत्न सारी कायनात करायला लागली. नर्मदा टेंट सिटी आणि विमानाची बुकिंग्स झाली. दिवाळीच्या आधी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बघायचा आणि शानदार टेंट सिटीत राहायचं ठरलं. जायच्या ४ दिवस आधी सिंधडीचा फोन आला की, "एक पंगा हो गया है!" टेंट सिटीवाल्यांनी आमचं बुकिंग कॅन्सल केल्याचं फोनवर सांगून पहिला धक्का दिला. सिंधडी बाणेदारपणाचा कडेलोट असल्यानं तिनं बरीच हुज्जत घातली. कोणत्या सिक्रेट कारणानं रिफंड देऊन बुकिंग्स रद्द करताहेत ते कळू देत नसल्यानं, तिनं 'अजित डोभाल येणारे का', असंही चिडून विचारले. तुम्ही फर्न नामक हॉटेलात बुकिंग करून राहा, असं सांगण्यात आलं. सिंधडीनं 'आम्ही बुकिंग्स कॅन्सल करणार नाही, जे काय असेल ते लिखित स्वरूपात इमेल करा; मग मी बघतेच काय करायचं ते', असं ठणकावलं. त्यावेळी तिने माझ्या नावानं पहिला फतवा काढला की, तू हे ट्विटरवर व्हायरल करून टाक!! मोदीजींच्या गुजरातबद्दल वाईटसाईट काहीही लिहायची हुक्की येऊ नये म्हणून म्या पामराने ट्विटर अकाऊंटच उघडलं नव्हतं, याची तिनं कल्पनाच केली नसावी. नंतर तिथून काहीच संपर्क नसल्यानं आम्ही, 'नो इमेल इज गुड न्यूज' असं ठरवून टाकलं. जायची तयारी सुरू झाली.
जायच्या आदल्या दिवशी सकाळी प्रभातफेरी दरम्यान, एटीएममधून पैसे काढायला गेले असताना, एका हॉटेलजवळून अचानक ५-६ कुत्री भुंकत आली. मला कुत्र्यांची भीती वाटत नसल्यानं मी दुर्लक्ष करून पुढे जात असताना एका काळ्या कुत्र्यानं माझा पाय कचकन धरला. मला रक्तरंजित जखम झाली आणि ट्रॅकपँट घोट्याजवळ फाटली. लोकांनी कुत्र्यांना हाकललं. आता इंजेक्शन घ्यावं लागेल येवढाच विचार तेव्हा आला. पैसे काढून घरी जाताना भावजय भेटली; तिनं घाबरून जवळच्या २४ तास इमर्जन्सी सेवावाल्या दवाखान्यात नेलं. तिथल्या डॉक्टरनं 'भटकं कुत्रं चावलंय का?' असा प्रश्न अत्यंत तुच्छ कटाक्ष टाकत विचारला. जखम स्वच्छ करून बँडेज बांधण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. त्याचं म्हणणं पडलं, "तुम्ही बाहेर जा, डेटॉल किंवा लाईफबॉय साबण विकत घ्या, वाहत्या पाण्याखाली जखम धुवा आणि आमची फार्मसी उघडली की इंजेक्शन घ्या."
अबे टोणग्या! प्रथमोपचाराचं ज्ञान घ्यायला मी आले नाहीये. मी घरी जाऊन जखम धुतली. डॉक्टर भावाला फोन केला; तो म्हणाला, "इंजेक्शन विकत घेऊन ये. मी बँडेज करून इंजेक्शन देतो." पण रक्त थांबतच नव्हतं, मग लेकाला घरी बोलावलं. भावानं लगेच आम्हांला प्लास्टिक सर्जनकडे पाठवलं, तिथे एका जखमेला टाके घातले. टिटॅनस आणि अँटीरेबीज इंजेक्शन टोचवून घरी आले. डॉक्टरांनी, जर गुजरातमध्ये ताप आला तर दवाखान्यात जावं लागेल, फोनवरून इलाज करायचा नाही, अशी ताकीद दिली. लेकानं घरातल्या रक्तरंगीत फरशा पुसून क्राईम सीनचा मेकअप केला. टाके घातलेला पाय वर ठेवायची डॉक्टरची सूचना आठवून द्यायची एकही संधी त्यानं नंतर सोडली नाही.
एकूण पाच इंजेक्शनांपैकी गुजरात वास्तव्यात दोन इंजेक्शनं आणि एकदा बँडेज करावं लागणार होतं. सिंधडी दा सेवण दाला फोन केला. ती ट्यूशन क्लासवाली असल्यानं तिच्याकडे स्टुडंट डॉक्टरांची फौज असल्याचं तिनं जाहीर केलं. माझ्या आईवडिलांनी मला जाण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला पण माझा उत्साह ओसंडून वाहत होता. चालायला फारसा त्रास होत नव्हता. पाच दिवस अँटिबायोटिक आणि पेनकिलर घ्यायचे होते. नागपूर -पुणे-अहमदाबाद विमानानं आम्ही संध्याकाळी पोहोचलो. शहरात पीएम मोदी आणि इतर रग्गड व्हीआयपी बागडत होते. शंभराहून अधिक देशांचे प्रतिनिधी डिफेन्स एक्स्पोसाठी आले होते. व्हीआयपी चक्रव्यूह भेदून सिंधडी हसतमुखानं आम्हांला घ्यायला विमानतळावर आली होती.
विमानतळावरून आम्ही गांधीनगरला जायला निघालो. भरपूर ट्रॅफिक असूनही सहा लेन रस्त्यामुळे जाणवत नव्हता. एका वळणावर, 'रॉंगसाईड राजू' या गाजलेल्या गुजराथी सिनेमातला हिरोटाईप एक राजू सिंधडीच्या गाडीला धडकून खाली पडला. दोन्ही गाड्यांना ओरखडाही आला नाही. राजूला किरकोळ खरचटलं. गाडीत वृद्ध स्त्रीचालक बघून राजू भयंकर वाद घालायला लागला. एफआयआर करेन वगैरे धमक्या देऊ लागला. सिंधडी आधीच बाणेदार आणि त्यात तिची काहीच चूक नसल्यानं कडाडून प्रतिवाद करत होती. राजू बऱ्याच ठिकाणी फोन करायला लागला; गाडी अडवून जाऊ देईना झाला. एकदोनदा त्यानं तिला ढकलायचा प्रयत्नही केला. मग मी पण रणभूमीवर उतरले. "खबरदार तिला हात लावशील तर, तुझा व्हिडीओ केला आहे. तुझं हेल्मेट कुठे आहे?" असं विचारल्यावर तो जरासा नरमला. यथावकाश पोलीस आले. त्यांनी दोन्ही गाड्यांचा मुआयना केला. मोबाईलवर फोटो काढले. केसमध्ये फार काही दम नाही असं लक्षात आल्यानं ज्युनिअर पोलीस आम्हां मराठी पाहुण्यांना म्हणे, "तुमच्या होष्टला सांगून पाचशे रुपये राजूला औषधोपचारासाठी देऊन मांडवली करून टाका." रॉंगसाईड राजू आता फसला होता. पोलीस त्याला म्हणे, "१०८ला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावून, सिव्हिल हॉस्पिटलला दाखल हो आणि मग एफआयआर कर." खरचटण्यासाठी त्याला ॲम्ब्युलन्स मिळण्याची शक्यता नव्हती. सिंधडीने तिच्या जुगाडू भावाला घटनास्थळी बोलावून घेतलं. तो पोलीस आणि आरटीओ मंडळींना गुंडाळण्यात प्रवीण होता. त्यानंतरच आमची क्राईम सीनमधून मुक्तता झाली.
दुसऱ्या दिवशी आम्ही गांधीनगरमध्ये भटकंती आणि खरेदी वगैरे करत असताना होष्टनं टेंट सिटीत फोन करून आमच्या सगळ्या फॉर्मालिटीज झाल्यात काय याची चौकशी केली असता, तुमचं बुकिंग कॅन्सल झालं आहे असा बॉम्बस्फोट झाला. लिखित स्वरूपात कळवणं त्यांच्यासाठी अडचणीचं ठरणार होतं. होष्टनं कडाकडा वितंडून आमच्या तारखा टेंटसाठी रिशेड्युल करून घेतल्या. हुश्श्श करत नाही तोच आठवलं की स्टॅच्यूची तिकिटंपण रिशेड्युल करावी लागतील. तशी इमेल केली. त्याला काही उत्तर आलं नाही. पुन्हा वाद घातल्यावर तिकडून टोलवाटोलवी झाली. तारीख निघून गेल्यावर तिकीट कॅन्सल करा अशी बॅकडेटेड इमेल मिळाली. ते पैसे नर्मदेत बुडाले. पुढच्या तारखेची तिकीट काढावी लागली. सिंधडीने या बुकिंग प्रकरणाची तक्रार, गुजरात टुरिझमची नाचक्की, सिनियर सिटिझनचा मानसिक छळ आणि आर्थिक नुकसान असं नोंदवत, थेट पीएम कार्यालयात केली आहे. कर्तबगार, बाणेदार सिंधडी वागणुकीच्या शाळेत मात्र दुसरी ढमध्ये मुक्काम ठोकून बसली आहे. अहंकार विषयात १०० पैकी २०० मार्कं, फेकाफेकीमध्ये १०० पैकी १०० आणि मोदीभक्तीमध्ये जगात सर्वाधिक गुण! अगदी ऑरगॅस्मिक लेव्हल भक्ती! मोदींबद्दल काहीही बोललं की रुसणं आणि वाद घालणं यांत तिची बरीच शक्ती खर्च होत असे. मला एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे वागणूक द्यायची एकही संधी तिनं सोडली नाही. सैतानी वचने लिहिली नसूनही माझ्या नावे सलमान रश्दीसारखे दैनिक फतवे निघत होते. मनोरंजनाचा सुकाळू झाला होता.
पुढे एकदा तिने पिंक ऑटोवाल्या रिक्षाचालकाचे हक्काचे पैसे भांडून, घासाघीस करून अर्धेच दिल्यानं, तिचा फेमिनिष्ठ बुरखा टराटरा फाटला. आम्ही नागपुरात आल्यावर त्या रिक्षावालीला फोनपेवरून पैसे देऊ करून पापात वाटेकरी व्हायचं नाकारलं.
उपलब्ध दोन दिवसांत अक्षरधाम मंदिर, अहमदाबाद इथे नातलगांना भेटणं आणि एक सिनेमा बघणं झालं. मला मोढेराचं सूर्यमंदिर आणि पाटणची राणी की वाव बघायच्या होत्या. आमच्या कट्टर मोदीभक्त, फेक्युलर होष्टनं दोन्ही बघितले नव्हते. त्यामुळे आमची पत आपोआप वाढली होती. एक दिवसाची टूर करणाऱ्या कंपनीचा कार्यक्रम पाहून एका ठिकाणी आम्ही फोन करून बघितला; तर फोन न उचलता तो मनुष्य व्हाट्सअपवर थातुरमातुर उत्तरं द्यायला लागला. पाचशे रुपये भरून बुकिंग कन्फर्म करा म्हणजे उद्या टॅक्सी येईल म्हणे. मी चिकाटीनं तीन वेगवेगळ्या नंबरांवरून फोन केल्यावर त्यानं एकदा चुकून उचलला. "तू फोन उचलत नाहीस, तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? आगाऊ पैसे भरून तू येशील याची काय ग्यारंटी आहे", असं विचारल्यावर त्यानं फोन ठेवून दिला. आणि आम्ही एका संभाव्य फसवणुकीतून वाचलो. होष्टच्या ओळखीच्या टॅक्सीचालकाला बुक केले.तो २२ वर्षांचा गामडा (गावठी) तरुण, मुस्लिम मुलगा होता. पत्ता शोधावा लागला की त्याचा आवडता डायलॉग 'गामडे मे गुगल नही चलता' होता. तो पुढे आमच्याशी जास्तच फ्रेंडली वागत असल्याचं पाहून कंट्रोलफ्रीक होष्टनं त्याला गुज्जू दमात घेतला. तिसऱ्या सहलीत तो बापडा आमच्याशी बोलेनासा झाला.
सहलीला जाताना वाटेत डायनॉसोर पार्क आणि म्युझियम दिसताच माझ्या सोबतिणी हुरळून गेल्या. घरातल्या पालींचा किळसवाणा वावर टाळता येत नसताना तिकीट काढून, त्यांच्या नामशेष झालेल्या अजस्र ,ओंगळ प्रजातीचं दर्शन घ्यायची माझी मुळीच इच्छा नव्हती. ज्युरासिक पार्क हा टुक्कार सिनेमा पाहून जन्मभराचं ऑडिओ व्हिजुअल दुःख भोगत असताना पुन्हा तो अत्याचार का सहन करायचा! जे गुजरातचं वैशिष्ट्य आहे ते बघावं, डायनोसॉर काय मेल्या अमेरिकेतही जिकडे तिकडे बोकाळून ठेवलेत. हुडूत!!
युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश असलेली 'राणी की वाव' ही शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली सात मजली विहीर पाटण इथे आहे. आता लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या प्रवाहाजवळ या देखण्या विहिरीचं बांधकाम करण्यात आलं होतं. शंभर रुपयांच्या नवीन जांभळ्या नोटेवर या विहिरीचं चित्र आहे. भारतीय नागरिकांना ४० रुपये आणि विदेशी नागरिकांना ६०० रुपये प्रवेश तिकीट आकारलं आहे. तिथल्या सिक्युरिटी गार्डनं आमचे नावीन्यपूर्ण फोटोज काढून झकास मनोरंजन केलं. या विहिरीऐवजी गांधीनगरजवळची खिडमी विहीर दाखवायचा सिंधडीचा डाव हाणून पाडला त्याच सार्थक झालं होतं.
मोढेरा सूर्यमंदिर पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं. हिरव्यागार, रमणीय, शांत परिसरात, पक्ष्यांचा मंजुळ कलरव ऐकत एका वेगळ्याच विश्वाचा आपण भाग होतो. विविध, सुरेख शिल्पांनी सुशोभित देखणं रामकुंड, त्यात प्रतिबिंबित होणाऱ्या निळ्या आकाशासह हिरवी वनराई आणि सभोवतालची स्वतःला न्याहाळणारी शिल्पं पाहून मन मोहून जातं. संध्याकाळच्या सावल्या गडद व्हायला लागताच कल्पक रोषणाईनं मंदिर उजळतं. सात वाजता तिथे होणारा साउंड अँड लाईट शो मी बघितलेल्या शोजमधला सर्वोत्कृष्ट आहे. जगभरातली सूर्यमंदिरं, आराधना पद्धती, सोलर एनर्जी यांची माहिती देणारा शो मंत्रमुग्ध करतो.
केवडीया हा सहलीचा शेवटचा टप्पा, तिथले मुख्य आकर्षण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघणं होतं. नर्मदा डॅम जवळच्या परिसरात दोन टेंट सिटी वसवल्या आहेत. आखीवरेखीव परिसर, एसी, टीव्ही युक्त टेंट, अत्यंत रुचकर, वैविध्यपूर्ण शाकाहारी पदार्थांची रेलचेल असणारा भव्य डायनिंग हॉल. रात्रीच्या भोजनासोबत लाईव्ह संगीत आणि रात्री खुल्या रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रम अशी मज्जाणु लाईफ सोय आहे. तिथे उत्तम स्विमिंग पूल बघून मी हुरळून गेले पण पायाचे बँडेज आठवून हिरमोड झाला. सगळे स्पॉट तिथून ५ ते १५ किमी अंतरावर आहेत. तिथे जायला बसेस आहेत. पिंक ऑटो नामक १०० इरिक्षा स्त्रियांना चालवायला दिलेत हे अतिशय कौतुकास्पद आहे. चार तासांसाठी किंवा ड्रॉपिंग करण्यासाठी इरिक्षा ठरवून जाण्याची सोय चांगली आहे. तिथले टुरिस्ट स्पॉट वेगवेगळ्या लोकांना आकर्षित करण्यासाठी आहेत. ते काही फारसे आवडले नाहीत.
सरदार पटेलांची भव्य मूर्ती थक्क करणारी आहे. लिफ्टनं मूर्तीच्या आत जाऊन लोहपुरूषाच्या छातीतून नर्मदा नदीचा मनोरम परिसर दिसतो. संध्याकाळी तिथे साउंड अँड लाईट शो आहे, जो मूर्तीच्या अंगावर प्रसारित केला जातो हे विचित्रच वाटलं. हा शो सरदार पटेलांचा परिचय होईपर्यंत कसाबसा सहन केला. मग त्या पुतळ्यावर विमानं उडतात, मोदीजी किंचाळून भाषण देतात आणि असह्य वैताग झाला. शेवटी पुतळ्यावरच व्हिज्युअल फटाके फोडले आणि शुभदिपावली असा संदेश येऊन आचरटपणाचा कहर झाला. तिथे स्टारबक्सचं मोठ्ठे हॉटेल पाहून तर डोकंच फिरलं. त्याची व्यवस्था बाहेरच्या बाजूला करता आली असती. लोकं खादाडी करून तिथेच घाण करत होते. आमच्या रांगेतून एक कुत्राही फिरत होता. मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही; त्यामुळे पाचव्या इंजेक्शनपर्यंत मी कुत्र्याला घाबरणार नव्हते.
गुजरात स्पेशल वाटल्या डाळीचा ढोकळा, तांदूळ ढोकळा, पात्रा, कढी-फाफडा, खाकरा, हांडवी, खिचडी, मेथी गोटे, जिलबी, मोहनथाळ असे गुज्जू पदार्थ चाखायला मजा आली. गांधीनगरला २-३ मजली इमारती बांधायचा नियम आहे. तिथे पक्ष्यांना राहायला बहुमजली, सुंदर, चिमुकली घरं बांधली आहेत.
गांधीनगर, अहमदाबाद शहरांत रस्ते उत्तम आहेत. राँगसाईड राजूची सतत आठवण यावी इतकी तमाम मंडळी २-३ कि. मी. खुशाल उलट्या बाजूने गाड्या चालवतात. गुजरात बायकांसाठी खूप सुरक्षित आहे हे समजल्यानं फार आनंद झाला. लक्ष्मीपूजनानंतर पंचमीपर्यंत सगळं मार्केट बंद असतं. हॉटेलं, मिठाई दुकानं फक्त सुरू असतात. घरकाम करणारी मदतनीस मंडळी सुट्टीवर जातात; त्यामुळे बहुतांशी गुज्जुज पर्यटनाला जातात. गुजरातचे पीएम अशी चेष्टा होणारे मोदीजी सतत तिथे दौरे करत असल्यानं टुरिष्टांची कधीही गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे. गांधीनगरात प्रभातफेरी करताना एका घराबाहेर दिवाळीनिमित्त लक्ष्मीचा मोठ्ठा फ्लेक्स लावला होता. मी कुतूहलानं विचारलं की, घराबाहेर फ्लेक्स का लावला आहे ब्वा? निवासी जागेत कार्यालयं थाटण्याची परवानगी नसल्यानं ते भाजपचं अनाम पण छुपं कार्यालय होतं म्हणे! मोदीजी तिथे गुप्त खलबतं करतात काय, असं विचारल्यावर होष्ट रुसली. निवडणुका जवळ आल्यानं मोदीजी गुजरातमध्येच पडीक असणार याची जाणीव फेक्युलर, कट्टर भक्त होष्टला असूनही, तिची हुशारी सहलीच्या तारखा निवडताना पेंड खायला गेल्याचं आढळलं.
तिच्या घरी राहायला जाण्यापूर्वीच भावजयीनं, सिंधडीच्या मोदीभक्तीमुळे बेजार होण्याचा धोका आहे. ही सावधगिरीची सूचना दिली होती. त्यानं माझं मनोरंजनच होणार असल्यानं माझी काहीच हरकत नव्हती. मोदीभक्तीची परमोच्च पातळी तिच्या रूपात प्रत्यक्ष अनुभवता आली, याबद्दल मी मोदींजींच्या आणि भावजयीच्या कायम ऋणात राहणार आहे. परत येताना वडोदऱ्याला आमच्या नातलगांच्या मराठी घरी यथेच्छ मोदीनिंदा करून, तिच्यावर माफक सूड उगवून, मनोमन विकट हास्य केलं.
ओ लाल मेरी पत रखियों बला झुले लालण
सिंधडी दा सेहवन दा सखी शाहबाझ कलंदर
दमा दम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर
हे माझं आवडतं सुफियाना गीत आहे.
मज्जाणु लाईफ!!
तुम्हाला लेख आवडला यासाठी धन्यवाद.
न. बा.
भटके कुत्रे मजेत आहे.सुशेगाद उन्हात पहुडलेले दिसते.अदिती म्हणतेय आता त्याचं तुझ्याशी रक्ताचं नातं जुळलंय.
पालींचं गुणवर्णन करणारा एक गोग्गोड लेख तुम्ही लिहावा अशी विनंती आहे.
सिंधडी हा शब्द सुफियाना असून मी रेसिस्ट नाही याची नोंद घ्यावी.लाडिक संबोधनात डि /डी चा सुकाळू असतो जसे गधडी ,बछडी , छबुकडी ,भटुरडी इत्यादी .
लेख आवडल्याची दोनदा पावती दिल्याने दिल गार्डन गार्डन झालंय.
.
चिमणा आणि कावळी एका फांदीवर बसून गप्पा मारताहेत.
--
कावळी: मला किनै साजुक तूप घातलेला बासमतीचा पिंड आवडतो.
चिमणा: मला बुवा तांदळाचे दाणे कच्चेच आवडतात.
कावळी: पण उन्हाळ्यात बै इतका भात खाणं नको वाटतं. मग मी कलिंगड खाते.
चिमणा: उन्हाळ्यात मला आपली कोवळी काकडी आवडते.
कावळी: चहाटळ मेल्या! क्रीपी आणि रेसिष्ट आहेस! (उडून जाते.)
चिमणा: अगं, मी तुला नव्हतो म्हणत! —
----
पालींची बाजु
पालींची बाजु मी इथेच मांडली होती. वाचायची राहिली असेल तर वाचा.
https://aisiakshare.com/node/1735
…
सिंधडी हा शब्द सुफियाना असून…
त्या संदर्भातील ‘सिंधडी’ हा सिंधी लोकांच्या संदर्भात नसून, बहुधा (सिंध प्रांतातील) ‘सिंधडी’ गावाच्या (किंवा कदाचित सिंध प्रांताच्यासुद्धा; चूभूद्याघ्या.) संदर्भात असावा, अशी माझी अटकळ आहे.
(सिंधडी, सेवण वगैरे ही सिंध प्रांतातील गावे आहेत. पैकी, सेवणचा अली शाहबाज कलंदरशी संबंध समजू शकतो; सिंधडी गावाचा संबंध समजत नाही. कदाचित सिंध प्रांत अशा अर्थाने असू शकेल, अशी अटकळ ती म्हणूनच.)
(याव्यतिरिक्त, ‘सिंधडी’ अशी (सिंधडी गावातच पिकणारी) आंब्याची एक जातसुद्धा असते, परंतु तुमच्या म्हणण्याचा तो रोख बहुधा नसावा. (चूभूद्याघ्या.))
मी रेसिस्ट नाही याची नोंद घ्यावी
आपण रेसिस्ट नसालही. तसा आरोप आपल्यावर केलेलाही नाही. मात्र, तो शब्दप्रयोग (बहुधा अनवधानाने, परंतु तरीही) रेसिस्ट आहे, एवढेच सुचवायचा प्रयत्न.
(पुन्हा, सिंध्यांबद्दलचे प्रेम माझ्या ठायी कोठल्याही प्रकारे उतू चाललेले नाही, परंतु तरीही.)
लाडिक संबोधनात डि /डी चा सुकाळू असतो
कुत्सित संबोधनांतसुद्धा असतो.
जसे गधडी ,बछडी , छबुकडी ,भटुरडी इत्यादी .
‘भटुरडी’ हे नेहमीच लाडिक असते, असे नाही. (किंबहुना, बहुतकरून नसतेच, असे निरीक्षण आहे. असो.)
(‘गधडी’बद्दल ज्यूरी अद्याप बाहेर आहे.)
बाकी चालू द्या.
लेख अंजन घालणारा आहे. डोळ्यांत आणि विचारांत.
पण तुम्हाला आलेला अनुभव केवळ गुजरातचा नसून तो टुअरकंपन्याच्यासाठीचा इतर राज्यातलाही आहे. आपल्याच देशांत आपण आयोजित पर्यटनास का जावे? स्वतः सार्वजनिक वाहनांनी जावे, कोणतीच अडचण येत नाही. काळं कुत्रं ही प्रेमाने शेपूट हलवत जवळ येतं. आपली लायकी आणि खिसा तो ओळखून असतो.
बाकी विस्मरणात गेलेल्या नेत्याचा पुतळा ( चिनी कंपनीने बांधून दिलेला)पाहण्यास पंधरा हजार रु घालवणे मला संयुक्तीक वाटत नाही.
कन्याकुमारीला (म्हणजे भारताच्या दक्षिण टोकाला असलेला ) तिरुवल्लुवर'चा पुतळा पाहायला वीस रु लागतात. तेही केरळ ट्रिप मध्येच सहज होते.
पर्यटन कसे करावे हा सल्ला उगाच दिला आहे पण माझेही चार विचार ऐकवण्याची संधी गमावू इच्छित नाही. बाकी पर्यटनाला गेल्यावर कोणत्याही नातेवाईक/ओळखीच्या माणसांकडे जायचे नाही हा नियम मी ठरवलेला आहे. आपण मुक्त राहतो.
ठासून भरलेल्या बंदुकीसारखा लेख आवडला.
2019 डिसेंबर मध्ये 15 दिवस
2019 डिसेंबर मध्ये 15 दिवस कार ने गुजरात भटकलो होतो. राजकोट पोरबंदर द्वारका, सोमनाथ, दमन, गिर जुनागढ अहमदाबाद आणि नर्मदा टेंट सिटी. अहमदाबाद, सोमनाथ, द्वारका, नर्मदा टेंट सिटी इथले बूकिंग गुजरात टुरिजम च्या दिल्ली येथील कार्यालयातून केले होते. त्यांनी आनंदाने टूर प्रोग्राम आखण्यास मदत केली, बिना कुठलेही शुल्क घेतात. चहा पानी ही दिले होते. शिवाय प्रवासात दिल्लीहून विचारपूस आणि मार्गदर्शन ही करत होते. (महाराष्ट्रचे टुरिजम ऑफिस टुरिस्ट यावे यासाठी मेहनत घेणार नाही). गुजरात टुरिजमचे हॉटेल्स स्वस्त आणि उत्तम होते. गिर मध्ये मध्ये क्लब महेंद्रा आणि राजकोट मध्ये गांधीजी जिथे शिकले होते त्या शाळेच्या समोर एका हॉटेलात. ते ही स्वस्त आणि मस्त होते.
सरदार सरोवर तलावात नौकायन केले. आरोग्य वनात स्थानीय वनवासी महिला चालवत असलेल्या खानावळीत जेवण केले. तिथे कार्य करत असणार्या स्त्रियांची तासभर चर्चा ही केली. इथल्या सर्व प्रोजेक्टस मध्ये स्थानिकांना रोजगार दिला गेला आहे. शिवाय शेतीत ही फायदेची झाली. आज सर्व वनवासी मेधा पाटकर सहित अंदोलंजिवींना शिव्या देतात. नर्मदा बचओ आंदोलनकारी आज त्यांच्या दृष्टीने खलनायक आहेत.
विवेक पटाईत
तुम्ही प्रशासकीय क्षेत्रात होतात.
प्रकल्प ग्रस्त आणि प्रकल्पाचे लाभार्थी असे दोन भाग असतात.
आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्या प्रकल्प लाभार्थी शी तुमची भेट झाली असेल प्रकल्प ग्रस्त लोकांची भेट घेतली तर ते मोदी ना शिव्या घालत असतील.
आणि मेधा पाटकर चे आभार मानत असतील.
मला असे वाटत नाही. मेधा
मला असे वाटत नाही. मेधा पाटकरांचे ॲनालिसिस चुकलेच आहे/होते. तीव्र विरोध करताना भविष्याचा विचार न केल्याने हे आंदोलन भुसभुशीत झाले. नर्मदेचे पाणी कच्छला पोचले त्याला जमाना झाला. प्रकल्पग्रस्त सुद्धा पाच एकर जमीन आणि पैशाच्या स्वरूपातला मोबदला घेऊन गप्प बसले आहेत. पाटकरांना हवे होते तसे हा प्रोजेक्ट फेल गेला नाही. काँग्रेसनेदेखिल शहाणपणा दाखवत नर्मदा सरोवर प्रकल्पाची पाठराखणच केली हे योग्यच होते.
https://energy.economictimes.indiatimes.com/news/power/modi-never-met-m…
पण या निमित्ताने मोदी आणि चमच्यांनी प्रसिद्धीची, कांगाव्याची हौस फिटवून घेतली. सोकॉल्ड समाजवाद्यांनीसुद्धा कारण नसताना मेधा पाटकरांना डोक्यावर घेतले.
https://swaminomics.org/medha-patkar-was-wrong-on-narmada-project/
वरचा लेख चांगला आहे यासंदर्भातला.
?!
त्या भटक्या कुत्र्याचे काय झाले मग पुढे?
——————————
असो. लेख एकंदरीत आवडला. फक्त, तेवढे ते पालींबद्दल काढलेले अपशब्द मात्र हृदयाला घरे करून गेले. ज्यांच्या संगतीत आम्ही लहानाचे मोठे झालो, आणि तसे होत असताना ज्यांनी आमची साथ कधीही सोडली नाही, अशा त्या आमच्या जिवाभावाच्या सख्या-सहचारिणींच्या प्रजातीबद्दल काढलेले अनुद्गार आम्हांस कदापिही सहन होणार नाहीत! पालींची बदनामी थांबवा!!!!!! जय हिंद, जय अमेरिका.
——————————
(त्याव्यतिरिक्त… सिंधी लोकांबद्दल, अॅज़ अ रेस, मला यत्किंचितही प्रेम नाही, परंतु… तथा, मोदीभक्तांबद्दलही, अॅज़ अ क्लास, मला यत्किंचितही आस्था नाही, परंतु… (आणि त्यामुळेच, आधीच सिंधी तशातहि मोदिभक्त झाली-कॅटेगरीबद्दलही मला यत्किंचितही जिव्हाळा असण्याचे काहीही कारण नाही, परंतु तरीही…) त्या सिंधी बाईबद्दलचे (कितीही मोदीभक्त असली, तरीही!) ‘सिंधडी’ हे (काहीसे रेसिस्ट तथा निश्चितसे द्वेषमूलक) नामाभिधान खटकले, एवढेच सुचवून खाली बसतो.)
(ज्या काही शिव्या घालायच्यात, त्या पार्लमेंटरी/सार्वजनिक मंचास साजेश्या भाषेत घाला ना! उगाच पेटी रेसिस्टगिरीची भाषा वापरून स्वतःचाच कळफलक का विटाळवता? लेख एरवी चांगला आहे हो!)