Skip to main content

मृत्यू - भाग १

भाग १ - विषयाची ओळख - मरण

सुधीर भिडे

No one wants to die. Even people who want to go to heaven don’t want to die to go there – Unknown

विषयाची मांडणी
मनोगत
मरणाबद्दल बोला कशाला?
मृत्यूचे शास्त्र
मन आणि शरीर
आयुर्मान आणि मृत्यू
संतांच्या दृष्टीतून
– – –

मनोगत
हे लिखाण मी का केले? पंधरा वर्षांपूवी निवृत्तीनंतर मी पुण्यात आलो. त्यापूर्वी पुण्याबाहेर माझे सामाजिक बंध सीमित होते. सामाजिक संबंधांत तरुण माणसे होती. पुण्यात आल्यावर हळूहळू म्हातारपण आणि मरण यांच्याशी ओळख होऊ लागली. म्हातारी माणसे आणि त्यांचे मरण पहात असताना एक गोष्ट लक्षात आली की त्यापैकी पुष्कळांनी जीवनाच्या या शेवटच्या टप्प्याची तयारी केली नव्हती. आता मी स्वत:च त्या टप्प्यावर आल्याने मी स्वत:ला प्रश्न करू लागलो – आपण तयारी केली आहे? काय तयारी केली पाहिजे याचे उत्तर शोधू लागलो. त्यातून झालेले हे लिखाण.

ही माहिती केवळ वृद्धांनाच उपयोगी आहे का? मला वाटते की तरुणांसाठीही या माहितीचे महत्त्व आहे. तरुण असो की वृद्ध, मरणाच्या अपरिहार्यतेची आपण दखल घेत नाही. एकदा मरणाची कल्पना मान्य केली की आपल्याला असलेला वेळ मर्यादित आहे हे लक्षात येते. मग त्या वेळात आपल्या क्षमतेला जमेल अशी सर्व कामे योजनाबद्ध रीतीने करावेसे वाटते. याशिवाय या वेळात दुसर्‍याला दुखवू नये, दुसर्‍याच्या मताचा आदर करावा आणि सर्वांशी आनंदाने रहावे याची जाणीव होते. मग आपल्याकडे दहा महिने आहेत किंवा दहा वर्षे आहेत याला महत्त्व नाही.

एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी – काही वृद्ध अचानक किंवा अल्पशा आजाराने मृत्यू पावतात. असे सुदैवी वृद्ध फारच थोडे असतात. त्यांना खालील लिखाणातील काही मजकूर लागू होत नाही, जसे की परावलंबित्व, पारतंत्र्य आणि डेथ झोन. परंतु तयारी सगळ्यांनाच करायला हवी. कारण आपली मृत्यूकडे वाटचाल कशी असेल हे कोणालाच सांगता येत नाही.

Death

मरणाबद्दल बोला कशाला?
जीवनात मृत्यू या घटनेचे महत्त्वाचे काम असते. एकदा आपल्याला ही जाणीव झाली की या जगातील आपले आयुष्य सीमित कालापर्यंतच आहे तर त्या काळाचा सुयोग्य वापर कसा करावा याचा आपण विचार करतो. आपल्याला अनेक गोष्टी कराव्याशा वाटत असतात. मग त्याचा प्राधान्यक्रम आपण ठरवू शकतो. मृत्यू ही कल्पना काढून बघा तर! आयुष्य दिशाहीन पोकळी बनेल. आजचे काम उद्या आणि उद्याचे परवा हा प्रकार सुरू होईल.
‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये २३ जानेवारी २०२३ला मंगला नारळीकर यांचा एक लेख प्रसिद्ध झाला. त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्या लिहितात –

आपल्याला लवकरच मृत्यू येऊ शकतो, याची पहिल्या ऑपरेशननंतर जाणीव झाली. त्यानंतर माझ्या विचारांत आणि विविध गोष्टींचा अग्रक्रम लावण्यात फरक झाला. लोक काय म्हणतील, यापेक्षा मीच विचार करून काय अधिक महत्त्वाचे, अधिक चांगले ते ठरवू लागले. [...] स्वत: बुद्धिवादी असले, तरी अनेक प्रेमाच्या माणसांच्या अंधश्रद्धांकडे जास्त सहानुभूतीने पाहू लागले. [...] लहानशा गोष्टींचा फार बाऊ करू नये, असे वाटू लागले.

एका तरुण डॉक्टरला कॅन्सरने ग्रस्त केले. उपचारातून बरे झाल्यावर ते लिहितात – तुमच्या आयुष्यात ‘अ’ दिवस उरले आहेत. ‘अ’ हा आकडा कितीही लहान किंवा मोठा असू शकतो. तुमच्या समोर दोन पर्याय आहेत. – उरलेले दिवस उदासीनतेत घालवा अथवा जीवन आनंदाने जगा. कालच्या पेक्षा आज आपण मृत्यूच्या एक दिवस जवळ गेलेलो असतो. आपण किती जगलो यापेक्षा जीवनाची गुणवत्ता काय होती ते महत्त्वाचे आहे.
(Quoted from Death, The final stage of growth by Elizabeth Kubler Ross, M.D.)

एका पाहणीनुसार ५०% लोकांना मृत्यूविषयी काही बोलायचे नसते, तर ३०% लोक मृत्यूविषयी बोलताना अस्वस्थ होतात. मृत्यू हा विषय एक टाबू – निषिद्ध विषय असतो. मृत्यूविषयी का बोलावे? मृत्यूच्या कल्पनेविषयी एक अनामिक भीती असते. बोलून, विचार करून ही भीती जाऊ शकते. आणि ते महत्त्वाचे आहे. इंग्लंडमध्ये ज्या परिचारिका वृद्धाश्रमात काम करतात त्यांना वृद्धांशी मृत्यूविषयी कसे बोलावे याचे शिक्षण दिले जाते. बाळ सामंत यांच्या म्हणण्याप्रमाणे – ‘मृत्यूचा विचार करणे ही विकृती नव्हे, मृत्यूचा विचार न करणे ही विकृती आहे’ – बाळ सामंत, मरणात खरोखर जग जगते

थॅनॅटोलॉजी – मृत्यूचा वैज्ञानिक अभ्यास
मरणाचे पण शास्त्र आहे, त्याचे नाव थॅनॅटोलॉजी. ग्रीक शब्द thanatos म्हणजे मृत्यू. मृत्यूचे शास्त्र मृत्युकल्पनेचा सर्व बाजूंनी विचार करते. पारंपरिक वैद्यकात मृत्यूचा विचार होत नाही. रोग्याला कसेही करून जगवावे कसे हा विचार असतो. हिपोक्रॅटसच्या शपथेमध्ये एक वाक्य असते – I will never give a deadly drug to anybody, even if asked for, nor I will make suggestion to that effect. (माझ्याकडे आलेल्या रोग्यास, त्याने सांगितले तरी, मी असे औषध देणार नाही ज्यामुळे रोग्याचे मरण ओढवू शकते.)

आता व्यक्तीच्या मृत्यूचा विचार करणे हे जरूर आहे हे लक्षात आले आहे. थॅनॅटोलॉजी या शास्त्रात मृत्यूचा अभ्यास होत आहे. आता काही विश्वविद्यालये मृत्यूच्या शास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण देत आहेत.

मृत्यूच्या शास्त्राचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची आता हॉस्पिसमध्ये नेमणूक केली जाते. भारतात हॉस्पिस ही कल्पना एवढी रुजलेली नाही. पण पाश्चिमात्य देशांत हॉस्पिस हे पुष्कळच सामान्य झाले आहे. हॉस्पिसमध्ये दाखल झालेल्या रोग्यास त्याचे मरण कसे कमी त्रासदायक करता येईल याची काळजी घेतली जाते. थॅनॅटोलॉजिस्ट हे काम करतात.

जैविक थॅनॅटोलॉजिस्ट (biological thanatologist) फॉरेन्सिक डॉक्टर्स म्हणून काम करतात. याशिवाय इच्छामरण ज्या देशांत कायदेशीर आहे, त्या देशांतून अशा संस्थांतून थॅनॅटोलॉजिस्ट काम करतात.

तत्त्वज्ञान आणि ब्रह्मविद्या
मृत्यू या विषयावर तत्त्वज्ञान आणि ब्रह्मविद्या या सदरात मोडणारे बरेच लिखाण झाले आहे. हिंदू धर्मामध्ये अशा विचारांची परंपरा फार जुनी आहे. आपले एक उपनिषद – कठोपनिषद – या विषयाला वाहिलेले आहे. एक तरुण – नचिकेत आणि यम यांतील संवादरूपात उपनिषदकारांनी मृत्यू कल्पना विषद केली आहे. ज्यांना अशा गहन विषयात रस असेल त्यांनी Stanford Encyclopedia of Philosophy मधील Death हा इंटरनेटवर उपलब्ध असलेला लेख जरूर वाचावा. प्रस्तुत लिखाण अशा स्वरुपाच्या गहन विषयांवर लिहिलेले नाही. एका सामान्य माणसाने मृत्यू या घटनेकडे, तत्त्वज्ञानात न शिरता, व्यावहारिकदृष्ट्या कसे पाहण्याची गरज आहे यासंबंधीचे थोडे विवेचन.

मन आणि शरीर
आपल्या जीवनात बहुतेक निर्णय आपले मन करते. मनाला जे करावेसे वाटेल ती गोष्ट मन शरीराकडून करून घेते. मनाला वाटले की घरात असलेले पुस्तक वाचावे तर शरीर पलंगावर बसून पुस्तक उघडून वाचायला सुरुवात करते. मनाला वाटले की आता कंटाळा आला तर शरीर पुस्तक बंद करून पलंगावर पाय पसरते.
ज्या व्यक्ती आत्महत्या करायला उद्युक्त होतात त्यांच्या शरीराकडून मन ते कर्म करून घेते.

परंतु बहुतेक व्यक्तींच्या बाबतीत मृत्यूचा निर्णय शरीर घेते. कोणत्याच मनाची केव्हाच मरण्याची इच्छा नसते. (आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती सोडून) मरणाचा निर्णय शरीर घेते आणि मनाची पर्वा न करता त्या दिशेने पावले टाकायला सुरवात करते. जे शरीराला कळते ते मनाला कळत नाही .

असा प्रश्न उद्भवतो की मन आणि शरीर हे निरनिराळे असतात का? मनाचे घर मेंदू असते, जो शरीराचा भाग आहे. आपल्या समाधानासाठी असे म्हणू की जे इतर शरीराला कळते ते मेंदूला रुचत नाही.

आयुर्मान आणि मृत्यू
१८०० साली भारतात सरासरी आयुर्मान २५ वर्षे होते. (Life expectancy in India 1800-2020, Statista, Aaron O'Neill, Apr 8, 2020). आता सरासरी आयुर्मान सत्तरच्या वर गेले आहे आणि २०२५ पर्यंत ७५च्या आसपास राहील. याचा अर्थ असा होतो की काम करण्याचे वय संपल्यानंतर बरीच वर्षे माणसे जगत आहेत. याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय होतात याचा शेवटच्या भागात विचार करू. एवढेच म्हणता येईल की साधारणपणे माणसे ज्या वयात मरतात ती घटना आता धक्कादायक राहिली नाही. सधन घरातून बरीच माणसे मृत्यूची वाट पहात असतात.

सधन देशांत काय स्थिती आहे? WHOच्या अहवालाप्रमाणे हृदयविकार, पक्षाघात, कर्करोग, मूत्रपिंडे काम न करणे, मधुमेह, अल्झायमर (स्मृतिभ्रंश) ही मृत्यूची महत्त्वाची कारणे आहेत. हे सर्व आजार degenerationने होणारे आजार आहेत. संसर्गाच्या आजाराने – इन्फेक्शनने – मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. माणसे फार म्हातारपणापर्यंत जगत आहेत आणि म्हातारपणाच्या आजाराने मरत आहेत.

लेखमाला चार भागांची आहे. येणार्‍या भागांतून आपण खालील पैलूंचा विचार करू –

  • स्वत:ची तयारी
  • मृत्युपूर्व प्रक्रिया
  • मृत्यूची घटना
  • धर्म, समाज आणि मृत्युकल्पना

प्रत्येक भागाच्या शेवटी संतांच्या आणि कवींच्या दृष्टीतून मरणकल्पना विषद केली आहे.
– – –

संतांच्या दृष्टीतून

तुकाराम महाराजांचा अभंग मृत्यूकडे योग्य रीतीने पाहण्याची शिकवण देतो –

आम्ही जातो आपुल्या गावा, अमुचा रामराम घ्यावा,
तुमची अमुची हेची भेटी , येथुनिया जन्म तुटी II
सकळही माझी बोळवण करा, परतोनि घरा जावे तुम्ही I
कर्म धर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशिर्वाद II
वाढविता लोभ होईल उसीर, अवघीच स्थिर करा ठायी I
तुका म्हणे आता जाहली हेची भेटी, उरल्या त्या गोष्टी करावया II
याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा II
तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चार खेळी मेळी II

तुकारामांच्या अभंगातील ‘आता दिवस चार खेळीमेळी ‘ ही ओळ महत्त्वाची आहे. महाराज सांगतात ‘उरलेले दिवस रडत कढत काढू नका, खेळीमेळीत घालावा’.

रामदासांनी मनाच्या श्लोकात मृत्यूविषयी लिहिले आहे -

जिवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला I
महाथोर ते मृत्यू पंथेची गेले , किती एक ते जन्मले आणि मेले II
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलतो सर्वही जीव मी मी I
चिरंजीव हे सर्वही मानिताती, अकस्मात सोडूनिया सर्व जाती II
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे I
पुरेना जनी लोभ ते क्षोभ त्याते, म्हणोंनी जगी मागुता जन्म घेते. II

अनुप जलोटा यांनी गायलेले नारायणस्वामी यांचे भजन -

सुधी होवे नाही तनकी, तैयारी हो गमनकी
लकडी हो ब्रजके वनकी, जब प्राण तनसे निकले
होटोपे कुछ हँसी हो, जब प्राण तनसे निकले
इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे निकले

मृत्यूपूर्वी काही महिने साने गुरुजींनी या विषयावर लिखाण केले. त्यातील काही भाग -

रात्रंदिवस वडवानलाप्रमाणे अशांती मला जाळीत असते. या जगात मला अपरंपार प्रेम आणि सहानुभूती मिळाली आहे. असे असूनही या जगाचा मला कंटाळा का येतो? ते प्रेमच मला ‘मर’ सांगते. कोणीकडूनही पहा, उत्तर एकच – मरण ! ये काळे सावळे मरण माई. थकलेल्या मुलास मागून येऊन आई हळूच उचलते त्याप्रमाणे हे मृत्युमाते थकलेल्या जीवांना तू जवळ घेतेस. माते लोकांना तुझी भीती वाटते. वेडे आहेत ते!

मृत्यू म्हणजे काही फार भयंकर गोष्ट नव्हे. जीवनाला मरणाचे फळ येते आणि मरणाला जीवनाचे कोंब फुटतात. मृत्यू म्हणजेही जीवनच आहे. उपनिषदांनी ‘मृत्यूसुध्दा प्राणच आहे’ असे लिहिले आहे. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ.

महाप्रयाणाच्या दिवशी गुरुजींनी आंघोळ केली, नवीन खादीचे कपडे घातले, खिशात तीस रुपये आणि एक चिठ्ठी ठेवली होती – अंत्यविधीसाठी वापरा, अंगावरच्या कपड्यातच न्या. त्यानंतर ते झोपले ते उठलेच नाहीत. विनोबांनी लिहिले – अमृतस्य पुत्र:
---
(क्रमशः)

Rajesh188 Thu, 08/06/2023 - 19:11

माणसाचे आयुर्मान वाढले हे अमके तमके आता माणसाचे आयुर्मान आहे.

हे साफ चुकीचे वाटते.
समजा 75 वर्ष आयुर्मान आहे असे आपण बोलतो तेव्हा आज चे साल हा काळ वापरणे चूक आहे.
75 वर्ष जगले आहेत त्यांचा जन्म काळ त्या साठी प्रमाण मानावा.
ना आज च
अगदी दहा वीस वर्ष पूर्वी जन्म घेतलेल्या लोकांचे आयुर्मान 50 पण असणार नाही.
आणि आज जन्म घेणाऱ्या माणसाचे आयुर्मान 40 जरी असेल तरी खूप झाले.
कमी वयात असंख्य जीव घेणे रोग तरुणांत बघायला मिळत आहेत

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/06/2023 - 04:31

In reply to by Rajesh188

आयुर्मान कसं मोजतात?

ठरावीक वर्षात मेलेल्या सगळ्या माणसांचं वय घेऊन त्याची सरासरी काढतात. ही जगभरात वापरली जाणारी पद्धत आहे.

मला ही पद्धत योग्य वाटते. याचं मुख्य कारण असं-

उदाहरणार्थ २०२०-२२ या काळात अनेक लोक कोव्हिडमुळे गेले. त्यातही लस येईस्तोवर मृत्युचं प्रमाण अधिक होतं. जसं लशीकरणाचं प्रमाण वाढलं तसं कोव्हिडमुळे मृत्युचं प्रमाण घटलं. हे घडलं २०२१-२२ या काळात.

मनुष्यांचं आयुर्मान वाढतं ते योग्य आहार, विहार आणि औषधोपचार यांमुळे. यातला औषधोपचाराच्या भागाचं उदाहरणं हे कोव्हिडचं.

चांगला आहार लोकांना परवडतो तो आर्थिक उन्नतीमुळे. व्यक्ती आणि समाज दोन्हींची आर्थिक उन्नती याला कारणीभूत असते. यातला उपमुद्दा असा, आर्थिक उन्नती झाल्यावर लहान मुलं मरण्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं. त्यामुळे १० मुलं होऊ द्यावीत, म्हणजे त्यांतली २-३तरी जगतील असा विचार करायची गरज राहिली नाही. यंत्रांमुळे हातानं करायची कामं कमी होत जात आहेत; त्यामुळे जास्त मुलं म्हणजे जास्त पैसा असा विचार करायचीही आवश्यकता राहिली नाही. कमी मुलं जन्माला घातल्यामुळे स्त्रियांचं आरोग्य आणि सरासरी आयुर्मान खूपच वाढलं.

ह्यांतल्या बहुतेक गोष्टी मनुष्य जन्माला येताना घडत नाहीत; तर पूर्ण आयुष्यभर घडत राहतात. त्याची दखल आयुर्मानात घेणं गरजेचं वाटतं. त्यामुळे ठरावीक वर्षी मेलेल्या लोकांचं सरासरी वय बघणं, ही पद्धत मला योग्य वाटते.

Rajesh188 Fri, 09/06/2023 - 20:12

तुमचे मत योग्य आहे .जागतिक मान्यता आहे.
पण ह्या मधून तुम्ही जी कारणे दिली आहेत आणि पूर्ण जगातील मीडिया पण देते.

औषध, आहार ची उपलब्ध ता ,जीवन मान उंचावले ह्या मुळे माणसाचे आयुर्मान वाढले असे त्यांना सिद्ध करायचे असते.
पण माणसाचे आयुर्मान फक्त ह्याच घटकावर अवलंबून आहे का?
१) आहाराच्या वाईट सवयी.
जंक फूड च प्रसार.
२) रासायनिक औषध, खत,ह्या मुळे हानिकारक रासायनिक घटक शरीरात जातात.
हा पॉइंट पूर्ण नाकारला जातो.
३) लाईफ स्टाईल
व्यायामाचा अभाव हा पण घटक नाकारला जातो.
४) प्रचंड वाढलेली स्पर्धा त्या मुळे आलेला अस्थिर पना .
उद्या काय घडेल ह्या विषयी अस्थिरता ह्या मुळे वाढलेला स्ट्रेस हा घटक दुर्लक्षित केला जातो.
पुढे पण आहे
अस्थिर कुटुंब, इत्यादी इत्यादी खूप आहे.
पण ह्या सर्वांचा माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो.
१९४० सालि जन्म घेतलेला व्यक्ती मी जे पॉइंट मांडले आहेत त्याचा शिकार नसतो
म्हणून तो ७०-८० वर्ष जगतो.
फक्त आधुनिक आरोग्य सुविधा मुळे माणसाचे वय वाढले आहे हे साफ चुकीचे आहे
ही जाहिरात आहे .
बघा पटत आहे का तुम्हाला
२०२३ sali माणसाचे आयुर्मान ७५. ,,वर्ष होते असे सांगणे जग मान्य असेल तरी साफ चूक आहे.
१९४८ सली ज्यांचा जन्म झाला ते सरासरी ७५ वर्ष जगले हा वाक्य प्रयोग च योग्य आहे.
माणसाचे आयुर्मान फक आणि फक्त वैधकिय क्रांती मुळे वाढले नाही.
बाकी घटक पण त्या मध्ये कारणीभूत आहेत
तुम्ही आहाराची उपलब्धता ,हा पॉइंट मांडला आहे.
पण आयुर्मान वाढले कारण आरोग्य सुविधा वाढल्या हा खट्याळ प्रचार सर्रास केला जातो.
बाकी घटक त्या पेक्षा महत्वाचे आहेत त्या कडे मात्र दुर्लक्ष

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/06/2023 - 01:31

In reply to by Rajesh188

काही मुद्दे -

सरासरी आयुर्मान - भारताचं सरासरी आयुर्मान १९६० पासून कसं वाढत गेलं याचा उत्तम आलेख जागतिक बँकेच्या संस्थळावर आहे (दुवा). १९६४ साली फक्त सरासरी आयुर्मान घटलं; आणि १९६७ सालात ते पुन्हा जिथे असणं अपेक्षित होतं तिथे आल्याचं दिसतं.

२०१९पर्यंत भारताचं सरासरी आयुर्मान वाढत होतं. ते २०२० आणि २०२१मध्ये कमी झाल्याचं दिसत आहे. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे - कोव्हिड. मला थोडं आश्चर्य वाटलं की २०२०मध्ये आयुर्मान एका वर्षानंच कमी झालं; २०१९मध्ये ७१ होतं, २०२०मध्ये ७० झालं; पण २०२१मध्ये ६७ झालं. ज्या वर्षात लस आली त्या वर्षी ते खूपच कमी झालं. तो इथला मुद्दा नाही. २०२२चे आकडे आले की चित्र आणखी स्पष्ट होईल.

मुद्दा असा की जंक फूड खाण्याचा, रासायनिक खतांचा, जीवनपद्धतीचा, काळजी वाढण्याचा तुम्हाला जेवढा वाटतो तेवढा दुष्परिणाम अजूनही संपूर्ण देशाच्या लोकसंख्येवर झालेला दिसत नाही. त्याचा परिणाम होतच नाही असं मी म्हणत नाहीये. त्याचा विपरीत परिणाम ज्या लोकांवर होतो त्यांचं प्रमाण कदाचित मर्यादित असेल. अगदी मर्यादित प्रमाणात असणाऱ्या नोकरदार वर्गावर त्याचा दुष्परिणाम होत असेल; ज्यांचं सरासरी आयुर्मान देशाच्या सरासरीपेक्षा बरंच जास्त होतं त्यांच्यावर होत असेल; किंवा त्यांची क्रयशक्ती (हातात असणारा पैसा) जास्त असल्यामुळे औषधं खाऊन का होईना हे लोक जास्तच जगत असतील.

आणखी एक उदाहरण - साधारण पन्नाशीच्या आतल्या स्त्रियांना हृदयरोग झाल्याचं, त्यातून मृत्यू झाल्याचं खूपच कमी वेळा कानांवर येतं; त्या हिशोबात तरुण पुरुषांत हृदयविकाराचं प्रमाण खूप जास्त आहे. याचं कारण - तरुण स्त्रियांच्या शरीरांत इस्ट्रोजेनचं प्रमाण पुरुषांपेक्षा खूप जास्त असतं. पण स्त्रियांमधल्या हृदयविकाराचं प्रमाण मेनोपॉजनंतर पुरुषांच्या बरोबरीनं असतं. त्यामुळे हृदयविकाराचा समाजव्यापी अभ्यास करताना तरुण स्त्रियांचा गट निराळा काढून मग सांख्यिकी अभ्यास करावा लागतो.

जिथे लोकांना दोन वेळेचं पुरेसं जेवण मिळत नाही तिथे स्वस्तातल्या कॅलऱ्या उर्फ जंक फूडचा परिणाम निराळा होतो आणि दिवसभर एसीत बसून काम करणाऱ्या लोकांवर जंक फूडचा परिणाम निराळा होतो. हे दोन्ही समाजगट एकत्र मोजून कसं चालणार?

आरोग्यसुविधांमुळे आयुर्मान वाढलं हे तुम्हाला पटत नाही. अजूनही भारतात, खेडोपाडी लोक साप चावून मरतात. भारताची लोकसंख्या एवढी जास्त असूनही कोव्हिडमुळे सरासरी आयुर्मान ४ वर्षं खाली आलं; तरीही आरोग्यसुविधांमुळे आयुर्मान वाढलं हे तुम्हाला पटत नाही!

२०२३ sali माणसाचे आयुर्मान ७५. ,,वर्ष होते असे सांगणे जग मान्य असेल तरी साफ चूक आहे.

ह्या अशा छापाची विधानं तुम्ही करता, पण त्याचं काहीही स्पष्टीकरण देत नाही. त्यामुळे तुमचं म्हणणं मनावर घ्यावं तरी कसं?

बाकी घटक त्या पेक्षा महत्वाचे आहेत त्या कडे मात्र दुर्लक्ष

त्याच जोडीला तुम्ही हेही म्हणता, पण इतर घटक कुठले, ते का महत्त्वाचे आहेत हे सांगण्याकडे साफ दुर्लक्ष. त्यामुळे तुमचं म्हणणं मनावर घ्यावं तरी कसं?

Rajesh188 Tue, 13/06/2023 - 21:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१) स्थिर सरकार आली.
जनतेला सुविधा पुरवणे हे सरकारचे काम असते हे तत्व रुजले.
विचार करा छत्रपती शिवाजी महाराज नी त्यांच्या ५० वर्षाच्या आयुष्यात किती लढाया लढल्या.
आणि आपण ७५ वर्षात फक्त चार च लढाया लढल्या.
म्हणजे स्थिर स्थिती निर्माण झाली त्याचा परिणाम लोकांच्या आयुष्य वाढन्यावर नक्कीच झाला.
२) धरण,कालवे,वीज,रस्ते ह्या सुविधा निर्माण झाल्या त्या मुळे शास्वत शेती,पिण्याच्या पाण्याची सुविधा ह्या निर्माण झाल्या पहिल्या राजा महाराजांना हे आपले काम आहे हे माहीत च नव्हते.रोज लढाया करण्यात च ते गुंतलेले होते.
अन्न ची उपलब्धता,शुध्द पिण्याचे पाणी,स्थिर आयुष्य.
आयुष्य वाढणार च .
३) रोजगार वाढले,नोकरी ची हमी होतीच,त्या मुळे मानसिक ताण नाही.
४) व्यासणाना समाज मान्यता नव्हती .
त्या मुळे, दारू,सिगारेट, ह्या सारखी व्यसन खुले आम् करायची तरुणांत तरी हिम्मत नव्हती.
त्या मुळे व्यसनाचे प्रमाण कमी,मानसिक ताण कमी,शस्वत शेती,रोजगार ची हमी.
वीज,पाणी,अन्न ,स्थिर सरकार ह्या गोष्टीचा संबंध माणसाचे आयुष्य वाढण्यास नक्कीच आहे.
आता आरोग्य सुविधा वर.
पहिले लोक मारायची ती जिवाणू,विषाणू जन्य रोगांमुळे, .
त्या वर औषध निघाली आणि मृत्यू चे प्रमाण कमी झाले .
पण आरोग्य सुविधा निर्माण होण्यास जो निवांत पना हवा असतो तो वरील गोष्टी मुळेच मिळाला आणि ते शास्त्र develop झाले.
आता फक्त फक्त आरोग्य सुविधेच्या भरवशावर माणसाचे का आयुष्य वाढणार नाही.
१), व्यसन नाना समाज मान्यता मिळाली आहे .
त्या मुळे लहान वयात च मुल मुली व्यसनाच्या आहारी जात आहेत.
२) आहार पद्धती बदलली आहे.
खूप वेळा प्रोसेस केले ले अन्न लोक खात आहेत.
ते आरोग्यास हानिकारक आहे हे सिद्ध झालेले आहे.
प्रचंड स्पर्धा वाढली आहे त्या मुळे उद्याचा भरवसा नाही.
वाढलेल्या सुविधा मुळे शारिरीक व्यायाम च अभाव.
अस्थिर कुटुंब व्यवस्था,एकत्रित कुटुंब पद्धतीचा नाश.
त्या मुळे लहान मूल आणि वयस्कर वृध्द ह्यांची मानसिक गरज एकत्र कुटुंब व्यवस्थेत भागत होती
ती आता भागत नाही..
वयस्कर लोक आणि लहान मूल ह्यांना एकटे पणाची जाणीव होते त्याचा परिणाम आरोग्यावर होतोच होतो.
चुकीच्या आहार विहार ह्या मुळे आणि व्यसन नान मुळे ..
शरीरात बिघाड होवून जे आजार निर्माण होतात त्याचे प्रमाण वाढले आहे.
कोणताही डॉक्टर हे कबूल करेल.
हल्ली लहान वयात च .
मधुमेह कॅन्सर पासून शरीरातील बिघाड मुळे होणारे आजार वाढले आहेत.
आणि हे सहज बरे होत नाहीत.
जीव घेणे असतात..त्या मुळे येथून पुढे माणसाचे आयुष्य वाढण्याची शक्यता कमीच आहे.
सर्व कळत असून ,परिणाम काय होईल ह्याची पूर्ण जाणीव असून फक्त काही लोकांच्या स्वार्थ साठी .
लोकांची उत्तम आहार पद्धती बदलल्या गेल्या.
आणि फास्ट food ची सवय लावली.
अनिर्बंध शहरी करणं करणे ही पण माणसाची ठरवून केलेली दुसरी चूक आहे
त्या मुळे अनेक समस्या वाढल्या,प्रदूषण वाढले.
लोकांचा राहण्याचा दर्जा घसरला.
तोच समतोल विकास केला असतात तर लोक एकाच ठिकाणी जमली नसती.
राहण्याचा दर्जा घसरला नसता.
इतके सर्व शोध लागले होते,आरोग्य सुविधा मध्ये उत्तम सुधारणा झाली होती पण त्याची गोड फळं माणसाला न मिळण्या मागे वरील कारण आहेत..
स्वार्थ सोडला असता तर आज माणसाचे आयुष्य ७० वर्ष काय घेवून बसलात सर्वोच्च १५० वर्ष पर्यंत वाढले असते

Rajesh188 Fri, 09/06/2023 - 21:34

हगवण,मलेरिया, नुमोनिया ह्या आजारावर हेच आजार पहिले जास्त जीव घेत होते.
ते सहज नष्ट झाले..
कॅन्सर,heart attacks, मधुमेह, किडनी फेल,लिव्हर फेल हे आजार पूर्वी बिलकुल नव्हते..
हे आज चे आजार आहेत आणि नाईलाज आहेत ह्या मुळे माणसाचे आयुर्मान परत कमी होत आहे.
आणि त्या वर ठोस उपाय नाही.
जसा ठोस उपाय .
मलेरिया,हगवण ह्या वर होता

सुधीर Fri, 09/06/2023 - 21:38

रामचंद्र गुहांच्या डेमोक्रॅट्स अ‍ॅण्ड डिसेन्टर्स मध्ये डी. डी. कोसंबी या विद्वानावर एक लेख आहे. या माणसाने बुद्ध धर्माचा / विचारांचा अभ्यास करण्यासाठी कठोर साधना केली. बुद्धाचे विचार मराठीत आणले. गांधीजींच्या या अनुयायाने जैन धर्मीयांप्रमाणे अन्न-पाणी त्याग करून मृत्यू स्विकारला (सल्लेखना). गांधींनी त्यांना प्रथम तसे न करण्यास विनंती केली होती. पण त्यांचा विचार पक्का होता. वर्ध्याला येवून त्यांनी प्राण सोडले. असो, मृत्यू या विषयावर वाचायला नक्की आवडेल.

मृत्यूचा विचार करताना दोन गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे म्हणजे अवयव (खास करून अकाली मृत्यू असेल तर) वा पूर्ण शरीर दान दुसरी म्हणजे आपल्या पश्चात आपल्या संपतीच्या हस्तांतरणाची केलेली तजवीज. पहिली गोष्ट कदाचित धार्मिक लोकांना रुचणार नाही. पण दुसर्‍या गोष्टी बद्धल योग्य ती पावले हयातीत न उचलल्याने एकतर व्यक्तीच्या पाश्चात वारसांमध्ये भांडणे होतात वा आहे तीच संपत्ती वारसांच्या नावावर हस्तांतर करण्यात अनेक अडथळे पार करावे लागतात.

अजून एक की, होमो डेअस मध्ये वाचल्या प्रमाणे आज अशा कंपन्या अस्तित्वात आहेत की ज्यांच्यासाठी मृत्यू ही फक्त एक "तांत्रिक अडचण" आहे. पेशी मरतात. सजीव मरतात. "अमरत्व" हा त्यांचा "स्टेटेड ऑब्जेक्टीव्ह" आहे. मिलिअन्स डॉलर्सचे भांडवल या आरएण्डडी मध्ये खर्च होत आहेत. एकवीसाव्या शतकात (वा त्या नंतर) यात काही ब्रेकथ्रू शोध लागले तर या मृत्यूच्या विचार करणे ही "सक्ती" वा "गरज" होवून जाईल.

Rajesh188 Tue, 13/06/2023 - 19:31

काही जवळचे नाते वाइक बघितले मृत्यु च्या जवळ जाताना.
अर्थात वय झाल्या मुळे.
जसा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा माणसाच्या भयाच्या संवेदना नष्ट होत असाव्यात.
कारण त्यांचे चेहरे बिलकुल दुखी दिसत नाहीत
मृत्यु च भय शेवटचा क्षण आला की निघून जाते
नैसर्गिक मृत्यू विषयी हे लिहीत आहे.

आता काहीच वर्षात मेंदू मधील पूर्ण डेटा चिप्स मध्ये ट्रान्स्फर करणे शक्य होईल.
ती चिप्स त्या माणसाच्या सर्व प्रसंग,आठवणी,ह्यांनी सज्ज असेल.
नवीन शरीरात ती इंस्टॉल पण करता येईल.
हा प्रश्न सुटेल
मी कोण ?
हे शरीर ठरवत नाही .
शरीर बदलेले तरी मी मात्र टिकू शकतो.
मी हा शरीरावर अवलंबून च नाही,
हात, पाय,किडन्या, डोळे,लिव्हर बदललं तरी मी तोच असतो.
खरी समस्या आहे भावनेचं,स्वभाव च, हे रेकॉर्डिंग होत नाही.
तिथे च घोड आडले असावे
माणसाच्या स्वभाव निर्माण होण्यासाठी,माणसाच्या खुबी निर्माण होण्यासाठी.
जन्म झाल्या पासूनच डेटा मेंदूत साठवून ठेवला जातो.
रोज किती gb त्या साठी लागत असेल.
७० वर्ष वया पर्यंत किती Gb लागत असतील.
आताच्या आधुनिक काळात पण इतक्या विशाल प्रमाणात मेमरी साठवून ठेवण्याची क्षमता १ kg वजनाच्या कोणत्याच यंत्रात नसेल
कसे विश्व विशाल तसे मेंदू ची क्षमता पण अती विशाल.
मला पाचवीला कोणते शिक्षक होते ते कसे दिसत असत ते आज पण माझ्या मेंदूत save आहे.
आणि अतिशय कमी वेळात ती माहिती मला आठवते.
खूप मोठी क्षमता आहे मानवी मेंदू ची