Skip to main content

अविचारांची सरशी (पूर्वार्ध)

(अ)विचारांचे पाठबळ

प्रत्येकाकडे इतरांना सांगण्यासाठी काही ना काही अनुभव वा गोष्टी असतात. खरे पाहता या गोष्टीत स्वतः भर घातलेला भाग बराच असतो. मुळात कुठलीही गोष्ट फुगवून सांगण्याची हौस प्रत्येकात थोड्या-फार प्रमाणात असते. ऐकणार्‍यावर प्रभाव पाडण्यासाठी आपण गोष्टी फुगवून सांगत आहोतयाची कल्पनासुद्धा आपल्याला नसते. आपल्या मेंदूची ती फेकाफेकी असते व कळत न कळत आपण त्यात गुरफटून जातो. काल्पनिक असूनसुद्धा ते पूर्ण खरे आहेअशीच आपली समजूत असते व हा स्वैरपणा नेहमीच आपल्याला फसवणारा असतो.

1925 च्या सुमारास माणसांच्या विचारप्रक्रियेसंबंधी भाष्य करत असताना बर्ट्रांड रसेल यांनी आपल्या पूर्वग्रहांना धक्का न लावणार्‍या विचारांकडेच आपला कल असतो. आपल्या मतांच्या विरोधातील किंवा आपल्या विचारांना छेद देणारे विचार आपल्याला स्वीकारार्ह होणार नाहीत. तसले विचार आपल्या दृष्टीने अविचारी असतात,’  असे मत व्यक्त केले होते. हे  विधान वाचत असताना आपण अजूनही बदललेलो नाहीयाची खात्री वाटू लागते. कारण अजूनही अविचारीपणाचीच सरशी आहे हे पदोपदी लक्षात येते. फेक बातम्याषड्यंत्र सिद्धांत (conspiracy theory)कॉमन सेन्स इत्यादींच्या साधक-बाधकतेविषयी कितीही गप्पा मारत असलो तरीही आपली मानसिकता मात्र अजूनही thinking ape च्या पातळीवरच आहे. 

हे असे का होत असावेखरे पाहता इतर लोक जे नेहमी करत आले आहेततेच आपण करत असतो. आपले आई-बाबा जे करत आले आहेततेच आम्ही करतो. आमचे आई-बाबासुद्धा त्यांचे आई-बाबा जे करत होते तेच करत होते. असे पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या रूढी-परंपरा (कुठल्याही शंका-कुशंका न काढता) आपण पाळत आलो आहोत. लकिरोंके फकीर होण्यात आपल्याला कधीच कमीपणा वाटला नाही. या कृतीमागे अविचार असू शकतातअसेही कधी वाटले नाही.  कदाचित तगून राहण्यासाठी याच (अ)विचारांचे पाठबळ आपल्याला मिळत गेले असेल. त्यामुळे वेगळे काही विचार करण्याची वेळच आली नाही. लाखो-करोडो वर्षांच्या उत्क्रांतीतून तावूनसुलाखून विकसित झालेला व तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता असलेला आपला मेंदू अनेक वेळा बधिरावस्थेत असल्यासारखा वाटतो. तर्कशुद्ध विचार करणे म्हणजे जिवावर येतेअशीच धारणा बहुतेकांची असावी. म्हणूनच वेगळे काहीही विचार न करता वर्षानुवर्षे चालत आलेल्या गोष्टींना चिकटून राहणे या शॉर्टकटमुळे आपले जीवन सुखकर होऊ शकतेयावर बहुतेकांचे एकमत असावे. गंमत म्हणजे अशा प्रकारच्या पठडीतल्या विचारांसाठी मेंदूवर अजिबात ताण पडत नाही. मुळात विचार करणे हा नेहमीच वेळखाऊ व ऊर्जेचा अपव्यय करणारा आहेअशी पूर्वी कधीतरी खात्री झाल्यामुळे आपल्या पूर्वजांनी काही शॉर्टकट्स शोधून काढले होते. या शॉर्टकटमुळे निसर्गाच्या प्रकोपातून आपली सुटका होत गेली व आपण आपले अस्तित्व टिकवू शकलो.  परंतु आधुनिक जग फारच वेगळे असल्यामुळे यापूर्वीचे ठोकताळे वा विनासायास मिळालेले विचार व कल्पना आपल्याला कितपत उपयोगी पडतीलयाबद्दल शंका आहे. एवढेच नव्हे तर ही मानसिकता आपल्याला काही वेळा गोत्यातही आणू शकते. त्यामुळे आपल्याला या गोत्यातून सहीसलामत बाहेर पडण्याची व विचारातील उतरंडीवर मात करण्याची गरज भासत आहे. 

शून्य बेरीज (Zero Sum

लहान मुलं खेळत असताना स्वतःसाठी जास्तीत जास्त घेण्याच्या प्रयत्नात असतात. खेळातील मोक्याची जागा त्यांना हवी असते. खाता-पितानासुद्धा आपल्या वाट्याला जास्त हवे यावर कटाक्ष असतो. केकचा मोठा तुकडा त्यांना हवा असतो. मोठेपणीसुद्धा थोड्या-फार फरकाने ही वृत्ती तशीच राहते. न्याय्यवाटपाबद्दल आपण नेहमी संवेदनशील असतो. फक्त हे न्यायवाटप आपल्या तोंडचा घास हिसकावून तर घेत नाही ना याबद्दल आपण नेहमीच जागरूक असतो. आपल्या जवळच्या शाळेत वा नावाजलेल्या एखाद्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असताना 25 टक्के जागा दारिद्य्र रेषेखालील पालकांच्या मुलांसाठी राखीव ठेवल्या आहेतही बातमी येऊन थडकल्यावर आपला जीव वरखाली होऊ लागतो. आपण कितीही उदार असलो तरी (वा उदारतेचे सोंग वठवत असलो तरी!) हे काही बरोबर नाही असेच राखीव जागांच्या बाबतीत वाटण्याची शक्यता आहे. बारावीला चांगले गुण मिळवून पास झालेल्या आपल्या (लाडक्या!) पाल्याला हवे असलेल्या कॉलेजमध्ये आरक्षणामुळे प्रवेश न मिळाल्यास आपल्यातील उदारवृत्ती नष्ट पावते. खरे पाहता त्या कॉलेजमध्ये विनाआरक्षण असलेल्या काहींना नक्कीच प्रवेश मिळाला असेल. परंतु आपल्या पाल्यास खुल्या गटाच्या कट ऑफपेक्षा एक-दोन गुण कमी मिळाले म्हणून प्रवेश मिळाला नाहीआमच्यावर अन्याय झाला.’  म्हणून आपल्याला नक्कीच राग आला असेल आणि तो राग आपण आरक्षणाच्या धोरणाला लाखोली वाहत व्यक्त करतो. मुळात अभ्यास करण्यासाठी सर्व सोई-सुविधा असूनसुद्धा व पिढ्या न पिढ्याची शिक्षणाची परंपरा असूनसुद्धा आपल्या पाल्याने खुल्या प्रवेशातील इतरांच्या बरोबर स्पर्धेत उतरून त्यांच्यापेक्षा जास्त गुण मिळवून दाखवायला हवे होतेपरंतु ते त्याला सोयीस्कर न ठरल्यामुळे राखीव जागेविषयी अनुद्गार काढून  राग व्यक्त करत असतो. आपल्या पाल्याजवळ हिंमत असल्यास खुल्या गटातील इतरांच्यापेक्षा जास्त गुण मिळवून प्रवेशपात्र व्हायला हवे होते. परंतु अविचारच करायचा असे ठरवल्यास आरक्षणाला दोष देत राहणेहा शॉर्टकट आपल्या कामी येतो.  शासकीय नोकर्‍यांच्या बाबतीतही अनेक तरुण-तरुणींना आरक्षणाच्या धोरणावर ताशेरे ओढलेले आपण नेहमीच  ऐकत असतो. 

या आगपाखडीच्या प्रकाराला शून्य बेरीज (Zero Sum) परिस्थिती असे म्हटले जाते. जेव्हा स्रोतांची कमतरता असतेतेव्हा एखाद्याचा फायदा हा दुसर्‍याचे नुकसान करणारा ठरतो. आपल्या जीवनातील अनेक प्रसंगात अशी स्थिती अनुभवावी लागते. परंतु काही वेळा अशी स्थिती नसते सुद्धा! प्रत्येक वेळी स्पर्धेशी वा स्रोतांच्या कमतरतेशी तोंड द्यायलाच हवे असे काही नसते. काही वर्षापूर्वी इंजिनिअरिंग वा एमबीएच्या प्रवेशासाठी विद्यार्थी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतपरंतु आज ती स्थिती नाही. कारण हे विषय शिकवणारी कॉलेजेस ओस पडली आहेत. परंतु आपण मात्र आपल्या अप्पलपोटेपणामुळे आधीचीच स्थिती आहे म्हणून मनाची समजूत करून घेत स्पर्धेच्या तयारीत राहतो. स्पर्धा नसली तरी संधीच्या विचाराने आंधळे झालेलो असतो. त्यातून वैताग वाढत जातो. 

शून्य बेरीज हा उत्क्रांतीतील जुळवून घेण्याच्या कालखंडातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्या काळी माणसं टोळी करून शिकारीवर वा रानावनातील गोळा केलेल्या खाद्यपदार्थांवर जीवन जगत होते. त्या काळी मुळातच अनेक गोष्टींची कमतरता जाणवत होती. एखाद्याने पोटभर खाल्ल्यामुळे दुसरा उपाशी अशी स्थिती होतीपरंतु आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. 

 जगभरातील उदारीकरणाच्या धोरणामुळे अनेक राष्ट्रं एकमेकांशी उद्योग-व्यापार करण्यासाठी वाणिज्य करार करत असतात. या प्रकारच्या उत्पादनांच्या आदानप्रदानच्या व्यवहारात दोन्ही बाजूंना काही ना काही मिळत असल्यामुळे दोन्ही राष्ट्रं समाधान व्यक्त करत असतात. एका प्रकारे ही एक विन विन’ (win - win) स्थिती असते. तुलनेने फायदा हे सूत्र येथे कामी येते. एखाद्या  राष्ट्रात उत्पादनाची कमतरता असल्यास ती भरून काढण्यासाठी वाणिज्य करार केलेली इतर राष्ट्रं पुढाकार घेऊन निर्यात करून परिस्थिती काबूत ठेवतात. काही तज्ज्ञांच्या मते मुक्त व्यापाराचा हा प्रकार शून्य बेरजेचीच सुधारलेली आवृत्ती आहे. या देवाण-घेवाणीत देशाचा जीडीपी वाढत असलातरी त्या देशातील सामान्यांना त्याचा फार मोठा फायदा होत नाही. काही वेळा काही मूठभर लोकांना रोजगाराची संधी मिळू शकतेपरंतु बहुतेकांना नाही. असाच काहीसा प्रकार देशांतर केलेल्या विस्थापितांच्या बाबतीतही होतो. सार्वजनिक दवाखानेशाळास्वस्त घरं इत्यादी सोयी-सुविधांचा अगोदरच तुटवडा असल्यासविस्थापितांना मुक्त प्रवेश दिल्यास हा तुटवडा आणखी तीव्र होतो. त्यामुळे विस्थापितांवर  स्थानिक लोक राग काढतात. 

परंतु कुठला व्यवहार शून्य बेरजेचा आहे व कुठला नाहीहे सहजपणे कळत नाही. त्यातूनही अमुक व्यवहार हा शून्य बेरजेचा नाहीहे सामान्यांना समजावून सांगणे व अविचारी निर्णयापासून  त्यांना परावृत्त करणे हे सुद्धा फार जिकिरीचे ठरते.  अनेक वेळा तुम्ही काय देऊ शकता त्यात व तुम्हाला काय मिळणार आहेहे नीटपणे कळतसुद्धा नाही.  त्यामुळे काही गोष्टी नॉन झिरो सम’ असू शकतात हे पटवून देणे कठीण जाते. 

अमेरिकेत ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड ही नॉन झिरो समची फलश्रुती असे म्हणता येईल. इंग्लंडचे ब्रेक्सिट’ मतचाचणीसुद्धा अशाच प्रकारचे नॉन झिरो समचे उदाहरण. लोकांना आपण काय करत आहोतआपण कशाचे समर्थन देत आहोतहेच मुळात कळत नसते. कुणाची तरी पोपटपंची ऐकून भावनोद्वेगाच्या स्थितीत आपण अतिमहत्त्वाचे निर्णय घेत असतो. वर्णभेदवंशभेद अशा एखाद्या जुजबी कारणाची ढाल पुढे करून आपले अज्ञान झाकण्याचा प्रयत्न करत असतो. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर गोर्‍या नागरिकांनी त्यांच्या विरोधात आघाडीच उघडली होती. कारण त्यांना मिळत असलेल्या सोयी-सुविधांवर या कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षामुळे गदा येणार की कायअशी भीती त्यांच्या मनात होती. मुळात सर्व privileges गोर्‍यांना मिळत असूनसुद्धा ओबामांवर शिंतोडे उडवले जात होते. ओबामा कृष्णवर्णीयांसाठी जास्त काही तरी तरतूद करून गौरवर्णीयांच्या सोयी-सुविधा कमी करतीलया भीतीमुळे त्यांच्यावर बेछूट आरोप केले जात होते. अविचारांचा जोर वाढला की भीतीमुळे माणसं कुठल्या थराला जाऊ शकतीलयाचे हे एक मासलेवाईक उदाहरण आहे. 

बालबुद्धी

लहान मुलं म्हणजे एका दृष्टीने वैज्ञानिकच असतातअसे अनेकांचे मत आहे. कारण मुलं जेव्हा खेळत असताततेव्हा  त्यांचा तो खेळ हा एक वैज्ञानिक प्रयोगच असतो. त्यात त्यांची involvement असतेनिरीक्षण असते व निष्कर्षही असतो. परंतु  जेव्हा ही मुलं शाळेला जाऊ लागताततेव्हा मात्र हे जग कसे आहेजगाचे व्यवहार कसे चालतातइत्यादीसंबंधीच्या दंतकथा वा भन्नाट व चुकीच्या कल्पनांनी त्यांचे डोके भरले जाते. खर्‍या शिक्षणाचे काम - त्यातल्या त्यात विज्ञान शिक्षणाचे काम - या दंतकथांचा कचरा साफ करून पुराव्यानिशी सिद्ध झालेल्या गोष्टी वा सिद्धांत त्याच्या डोक्यात भरणे हे असेल. काहींच्या बाबतीत ही एक अत्यंत अवघड अशी गोष्ट ठरू शकेल आणि हीच मंडळी मोठमोठे वैज्ञानिक म्हणून मिरवत असतात. काही प्रमाणात शिक्षण डोक्यातला भुस्सा बाहेर काढण्यात यशस्वी होऊ शकतेपरंतु नेहमी नाही. म्हणूनच जग हे एक अज्ञानाची कोठडी झाली असे म्हणता येईल. दंतकथापुराणकथामिथकं इत्यादी परंपरागत ज्ञानाचा पगडा विज्ञानातील सर्व क्षेत्रात सर्रासपणे आढळतो. तावातावाने त्याचे समर्थनही केले जात असते. विश्वाची उत्पत्ती कशी झालीमाणूस कसा जन्माला आलाप्राणिमात्रांचा पर्यावरणरक्षणात कसा उपयोग होतो इत्यादी जीवशास्त्रीय घटनाक्रमाबद्दल काही साचेबंद उत्तरं जगभरातील पारंपरिक ज्ञानात सापडतील. सूर्यचंद्रतारेधुमकेतूज्वालामुखीभूकंप इत्यादीबद्दल वैचित्र्यपूर्ण तथाकथित वैज्ञानिक’ माहितीची यादी जगभरातील सर्व पुरातन संस्कृतीत सापडतील. एवढेच नव्हेतर आकाशातील पक्षी उडण्यासाठीच जन्म घेतातडोंगरावरील मोठमोठे दगड प्राण्याची पाठ खाजवण्यासाठी असतातफुलांना पाकळ्या उघडता याव्यात म्हणून पाऊस पडतोउष्णता ही एक वस्तू असून ती एका जागेतून दुसर्‍या जागेकडे सरकत असतेसूर्य आकाशात पूर्वेकडून पश्चिमेकडे रोज प्रवास करत असतो इत्यादी गोष्टी अगदी लहानपणापासूनच आपल्या मनावर ठसवलेल्या असतात. रोजच्या व्यवहारात यांच्याविरोधात चकार शब्दही काढता येत नाहीपरंतु त्या तद्दन खोट्यादिशाभूल करणार्‍या व विज्ञानविसंगत असतात. 

बाल्यावस्थेत मुलं अशा प्रकारच्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत मोठी होतात. हा विश्वास श्रद्धेत व श्रद्धा अंधश्रद्धेत बदललेला असतोहे लक्षातच येत नाही. जेव्हा एखादी समस्या वा जटिल संकल्पना मांडली जातेतेव्हा तर आणखीच जास्त प्रमाणात जुन्या गोष्टीकडे कवटाळून बसतात. अगदी मोठेपणी सांगूनसवरूनसुद्धा आपण कुठेतरी चुकत आहोतहेच  लक्षात घेतले जात नाही. अजूनही कित्येकांना डार्विनचा उत्क्रांतीवाद’ हा बकवास वाटतो. माणूस हा माकडापासून कसा काय उत्क्रांत होऊ शकतोयाबद्दल अनेकांच्या मनात संभ्रमावस्था आहे. कारण माणूसप्राणी परमेश्वराचा अत्यंत लाडका प्राणी असून त्यांनेच माणसांना पृथ्वीवर पाठवले आहेयाबद्दल अशा लोकांच्या मनात अजिबात शंका नाही. विचार करण्याची शक्ती कुंठित होत जाते व अविचाराचा पगडा आणखी घट्ट बसतो. 

विज्ञानातील काही मूलभूत सिद्धांतांच्या शिक्षणातून अविचारांची पीछेहाट होऊ शकेलअसे शिक्षणतज्ज्ञांना वाटत होते. त्यामुळे पारंपरिक ज्ञानाचे जोखड उतरवणार्‍या अभ्यासक्रमावर भर दिला गेला. अल्प प्रमाणात याचा फायदा झालाहे आपण नाकारू शकत नाहीपरंतु कितीही प्रयत्न केले तरी पारंपरिक ज्ञानाचा पगडा निघून जात नाही. फार-फार तर वैज्ञानिक शिक्षण काही काळ त्याला थोपवून धरू शकतेपरंतु ते पूर्णपणे कधीच जात नाहीत.  आपण करत असलेल्या बहुतेक कृतीमागे विचारापेक्षा अंतःप्रेरणेवर भर दिलेला असतो. अंतःप्रेरणेतून सुचलेल्या गोष्टीवर दुसर्‍या कुठल्यातरी गोष्टीने वरचढ होता येईलहीपरंतु ती पूर्णपणे पुसता येणार नाही. अंतःप्रेरणेचा इतका मोठा प्रभाव असतो कीभल्याभल्या अनुभवी वैज्ञानिकांनासुद्धा स्वतःच्या प्रयोगातील निष्कर्षावर विश्वास ठेवणे जड जात असते. यांच्या मेंदूचे ब्रेन स्कॅन’ केल्यास वैज्ञानिक सत्याला नाकारले जात आहेहेच दर्शवते. एक हलका व दुसरा जड अशा दोन वस्तूंना उंचावरून फेकल्यानंतर त्या दोन्ही एकाच वेळी जमिनीवर येतात हे (वैज्ञानिक) सत्य अजूनही आपल्या पचनी पडलेले नाही. त्याचा व्हिडिओ बघताना ब्रेन स्कॅन’ केल्यास मेंदूत गोंधळ उडाला आहेहे स्पष्टपणे जाणवेल. 

वैज्ञानिकरित्या तर्कशुद्ध विचार करणे हे नेहमीच कठीण असते व तसले विचार शेवटपर्यंत टिकतीलयाचा कुठलाही भरवसा नाही. त्यामुळे हवामान बदलसजीवांची उत्क्रांतीलसीकरणलोकसंख्या नियंत्रण इत्यादी गोष्टी पटवून घेण्यासाठी फार बौद्धिक श्रम लागतात. 

साचेबंदठराविक विचार 

आपण नेहमीच एखाद्याच्या चेहर्‍याकडे बघून माणूस कसा आहेयाचा अंदाज करतो. कदाचित हे आमच्या मेंदूत हार्ड वायरिंग’ झालेले असावे. नुकतेच जन्माला आलेले बाळसुद्धा इतर अवयवापेक्षा चेहर्‍याकडे निरखून पाहत असतं. एका वर्षाचे झाल्यांनतर ओळखीच्या चेहर्‍याकडे रांगत-रांगत जातं. अनोळखी चेहर्‍याकडे लक्ष देत नाही. वयाने मोठे झाल्यानंतर आपले अंदाज पक्के होत जातात. काही क्षणासाठी चेहरा बघून त्याचे सामाजिकआर्थिक व नैतिक स्थानमानाचे ठोकताळे बांधण्याचा प्रयत्न करतो. लहान बाळासारखा निरागस चेहरा वाटत असल्यास तो विश्वासार्ह माणूस आहेथोडासा उभट व चौकोनी चेहरा असल्यास तो डामरट असावा म्हणून इतर कुठलाही विचार न करताचौकशी न करता  आपण निष्कर्ष काढतो. 

अशा प्रकारे त्या व्यक्तीबद्दल शिक्का मारणे अन्यायकारक आहे हे मान्य. परंतु उत्क्रांत काळातील अस्तित्वासाठी अशा प्रकारच्या ठोकताळ्यांचा नक्कीच उपयोग झाला असेल. टोळी करून राहिलेल्या समाजात मित्र कोण व शत्रू कोण हे चेहरेपट्टीवरूनच अंदाजाने कळत असावे. आपला अंदाज चुकल्यास त्याला अपवाद समजले जात असावेपरंतु अंदाज करण्यात चूक नाहीहे मात्र पक्के. अनोळखी माणूस आपल्याला मदत करणारा ठरेल की त्रासदायकयासाठी हे फेस रीडिंग’ नक्कीच आपल्या मदतीला धावून आले असेलपरंतु आताच्या मानसतज्ज्ञांच्या मते हे फस्ट इम्प्रेशन’ नेहमीच चुकीचे असते. याचे स्पष्टीकरण देता येत नसलेतरी या पूर्वीच्या समाजापेक्षा आताचा समाज फार मोठ्या प्रमाणात अनोळखींच्या संपर्कात येत असावात्यामुळे आपले अंदाज चुकण्याची शक्यता जास्त आहे.

गंमत म्हणजे आपला हा साचेबंद अंदाज एकेक चेहरा निरखून बघत ठरवला जात नाही. आपण सर्वांना एका गटात ढकलून त्यातील प्रत्येकाबद्दल बरे-वाईट ठरवून भेदभाव करत असतो. गटाच्या बद्दलचा साचेबद्धपणासुद्धा तो गट मदतीचा हात देणारा की तुमच्या विरोधात स्पर्धेत उतरणारायाचा निर्णय घेत असतो. गटातील प्रत्येकाची खालील प्रकारे चार विभागात मांडणी करता येते. गटातील काहीजण उच्च दर्जाचे स्पर्धक असणारे वा काही जण कमी दर्जाचे स्पर्धक असणारेकाहीजण उच्च दर्जाचे स्पर्धक नसणारे व काहीजण कमी दर्जाचे स्पर्धक नसणारे असे हे प्रकार आहेत. उच्च दर्जाचे स्पर्धक डॉक्टरवकीलउद्योजक आदी श्रीमंत प्रोफेशनल्स असू शकतात व त्यांच्याबद्दल आपल्या मनात अढी असतेअसूया असते. कमी दर्जाचे स्पर्धक नेहमीच वंचितविस्थापित वा निराश्रित असतात. त्यांना पाहिले की आपल्याला तिटकारा वाटतो. उच्च-दर्जाचा स्पर्धक नसलेल्याबद्दल अभिमान वाटतो व यातील  कमी दर्जांच्या बद्दल - अपंगवृद्धतिरस्कृत महिला - कणव वाटते. 

लांगूलचालन

टीव्हीवरील बातम्यांच्या वेळी राजकारणातील पुढार्‍यांच्या सभा-परिषदांबद्दलच्या  बातम्या दाखवत असताना काही जण पुढे येऊन पायाला हात लावून व/वा नमस्कार/मुजरा करत (पाठ न दाखवता) परत गेलेले आपण नेहमीच पाहत असतो व त्यात काही वावगे नाहीअसेच आपल्याला वाटते. जरी तो नेता 25-30 वर्षे वयाचा असला तरी पन्नाशीचे पुढचेसुद्धा तितक्याच नम्रतेने वाकून नमस्कार करत असतात. खरे पाहता या नेत्याला आपणच निवडून दिलेले असतेआपल्यामुळेच तो स्टेजवर उत्सवमूर्ती म्हणून मिरवत असतो. तरीसुद्धा आपल्यातील लाचारी त्याला मान-पान देण्यास भाग पाडते. तो आपल्यासाठी त्याच्या खिशातून एकही पैसा देणार नाहीयाची आपल्याला शंभर टक्के खात्री असते. तरीसुद्धा आपण त्याला महत्त्व देत असतो. कारण सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या या व्यक्तीबद्दल आपल्या मनात भीतियुक्त आदराची भावना असते. आपण चारचौघांसमोर त्याचा योग्य मान न राखल्यास तो आपला काहीतरी वाकडा करेल ही भीती मनात असते. म्हणूनच त्याच्या भोवती पिंगा घालणार्‍यांची संख्याही जास्त असते. 

अशा प्रकारे नेत्यांच्या पुढे-पुढे करणे अगदी अनादि काळापासून चालत आलेली प्रथा आहे. इतिहास काळात राजा-महाराजांनात्यापूर्वी टोळीच्या प्रमुखांना त्या-त्या काळचा समाजसमूह मानमरातब देत होता. जनसामाऩ्यांच्या या वागणुकीमुळे हे राजे-महाराजे वा टोळीप्रमुख सुखावत असावेत. म्हणून तर ही पद्धत जगभर शेकडो वर्षे पाळली जात आहे. लोकशाहीत नेत्यांनासुद्धा हा मान मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या मागे असलेली प्रतिष्ठा! आपण सर्व त्या प्रतिष्ठेला बळी पडतो व लांगूलचालन करत असतो. 

छोट्या-छोट्या टोळ्या करून अस्तित्वासाठी झगडत असलेल्या समाजातसुद्धा अशा प्रकारची हांजी-हांजी करण्याची वृत्ती होती. सर्व माणसं समान असली तरी काहींच्यातील विशेष गुणामुळे ती इतरांपेक्षा वेगळी वाटत होती. मुळात माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजाच्या रीति-नीतीचे पालन करणे हे त्याचे कर्तव्य ठरते व त्यासाठी सर्वांत सोपा मार्ग म्हणजे अनुकरण करणे. हे असे का हा प्रश्न न विचारता डिट्टो कॉपी करत राहिल्यास सर्व प्रश्न सुटतातअशी एक समजूत आपल्या मनात घर करून बसलेली आहे. ज्यांना कॉपी करणे जमते ते चांगले शिकारी होऊ शकलेकुशलता प्राप्त करू शकले व तेही कुठल्याही प्रकारचे धोके न पत्करता! अशांची आरती करात्यांना खूश ठेवात्यांची वाहवा करात्यांच्या मागे-पुढे करीत राहा व काही सामाजिक बंधनातून त्यांना मुक्त ठेवा. तुमचे काम फत्ते! आपलाही  फायदा व त्यांचाही!  आपल्या ज्या पूर्वजांनी ही रणनीती पाळलीते तग धरू शकले. त्यांची भरभराट झाली. म्हणूनच उत्क्रांती अशा भाटांची पदर धरते. 

परंतु आधुनिक युगात अशा प्रकारामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आताच्या काळात आपण आपल्याला भेटलेल्या व्यक्तीचे मूल्यमापन तिच्या तथाकथित प्रतिष्ठेवरून ठरवत नाही. तरीसुद्धा समाजात राहायचे असल्यास नाईलाजाने इतरांचे अनुकरण करूननको त्या व्यक्तीचा उदो-उदो करत असतोहेही तितकेच खरे! एखाद्याच्या भोवती फार जण गर्दी करून उभे असल्यास आपणही त्या गर्दीचा भाग होऊन जे काही मानमरातब द्यावेसे वाटतेते देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेले राजकीय नेतेसाहित्यिकनट-नट्या इत्यादींना आणखी प्रसिद्धी मिळत जाते.

प्रतिष्ठा एखाद्या चुंबकासारखी पिढ्या न पिढ्या आकर्षित करत असते व या प्रतिष्ठेला मान देणे आपण टाळू शकत नाही. अनेक वेळा आपण आपल्या स्वतःला फसवतोयाची कल्पना असूनसुद्धा चारचौघांबरोबर राहण्याच्या अट्टहासामुळे अशा लोकांचे भाव वधारलेले दिसतात. कर्तृत्वयश व प्रतिष्ठा यांच्यापुढे मान तुकवणारेसुद्धा काही प्रमाणात लाभधारी ठरतात. म्हणूनच पुढे-पुढे करण्यासाठी आटापिटा करत असतातहे नाकारता येत नाही. अविचारापुढे मान तुकवणे तर नेहमीच आढळणारी गोष्ट ठरत आहे. 

 

अपूर्ण

विवेक पटाईत Sat, 24/05/2025 - 09:58

ज्या समुदायला आरक्षण आहे, त्याचे आरक्षण मुळे सर्वात जास्त नुकसान होते. सरकारी नौकरी फक्त 5 टक्के लोकांना मिळणार. पण आरक्षण मुळे 90 टक्के तरुण त्यामागे लागतात आणि वयाच्या 30 पर्यन्त परीक्षा देत राहतात आणि नंतर नैराश्य येते. इतर मेहनतीचे व्यवसाय 30 नंतर शिकणे ही कठीण जाते. ब्राम्हण समुदायला आरक्षण नाही. 35 ते 40 वर्षांपूर्वी दिल्लीत सरकारी नौकरीसाठी आलेल्या बहुतेक सर्वांचे मुले आज सरकारी नौकरीत नाही आणि एकाचेही पॅकेज सुरवातीलाच 10 लाख पेक्षा कमी नसेल. काही तर उत्तम पैकी इतर व्यवसाय ही करू लागले आहेत.