Skip to main content

स्मरणगाथा - गोनीदांचा विलक्षण जीवनप्रवास!

स्मरणगाथा - गोनीदांचा विलक्षण जीवनप्रवास!

एखाद महिन्यापूर्वी इकडील (अमेरिकेतील) एका वाचनालयात, तेथील परदेशी भाषा विभागात डोकावले. तर मराठी विभागात 50-100 पुस्तक दिसली. त्यातील “स्मरणगाथा” मी घरी येऊन आले. या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 1973 मध्ये निघाली होती. पुस्तकामध्ये 1920 नंतरचा काळ दाखवला आहे.
ही स्मरणगाथा म्हणजे गोनिदांचे (गोपाळ नीलकंठ दांडेकर) आत्मचरित्र. ही गाथा त्यांच्या वयाच्या 13 व्या वर्षी म्हणजे साधारणता 1929 मध्ये सुरू होत. जेव्हा ते स्वातंत्र्यसंग्रमात सहभाग घेण्यासाठी घरातून पळाले तिथपासून ते पुढची सलग सतरा वर्षे - हा १७ वर्षांचा प्रवास ५०० पानांत वाचायला मिळतो.

मूळचे दापोलीचे असणारे दांडेकर कुटुंबीय, सुरुवातीला अमरावतीस परतवाडा येथे राहत. त्यांचे वडील नवीनच आलेल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना मराठी आणि हिंदी शिकविण्याचे काम करत. घरची परिस्थिती साधारण बेताची होती. लहानपणी ते त्यांच्या मोठ्या बहिणीच्या, माईच्या अधिक जवळ होते. घरातील वातावरण शिक्षण, श्लोक, पाठांतरे, तसेच संगीत नाटके ह्या सगळ्यांकरता पोषक होते. पुढे काही वर्षांनी कुटुंबियांनी नागपूरला स्थलांतर केल्यावर, त्या संस्कारक्षम वयात गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीचा, स्वातंत्र्य संग्रामाचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला. एक दिवस, वयाच्या तेराव्या वर्षी, भावनेच्या भरात सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते घरातून पळून मुंबईला गेले. तेथूनच त्यांच्या खडतर जीवनप्रवासाला सुरुवात झाली.

आंदोलनातील वास्तव हे आपल्या कल्पनेच्या आणि समजुतीच्या पलीकडील आहे हे लक्षात आल्यावर, तसेच तोपर्यंत आंदोलन आटोपते घेतल्यामुळे यापुढील वाट आपली आपल्यालाच शोधायची आहे ही जाणीव झाली. त्यातूनच मग मुंबई - पुणे - नाशिक - अकोले असे मार्गक्रमण करत असता त्यांची संत गाडगे महाराजांशी गाठभेट झाली. तो त्यांच्या या प्रवासातील महत्वाचा टप्पा ठरला.
गाडगेबाबांच्या सहवासात, मार्गदर्शनाखाली काही काळ व्यतीत करताना त्यांनी कीर्तनकला जोपासली. कीर्तनानिमित्ताने त्यांना महाराष्ट्राचा प्रवास घडला. त्यादरम्यानच त्यांना ओढ लागली ती तुकाराम महाराजांच्या अभंगांची आणि ज्ञानेश्वरीची. मग देहू जवळील भंडारा डोंगरात एका गुहेत एखाद्या ऋषी-मुनींप्रमाणे एकभुक्त राहून त्यांनी साधना केली. तुकारामांची गाथा - त्यात अदमासे साडेचारहजार अभंग आहेत- ते त्यांनी मुखोद्गत केले. पुढे आळंदीला मारुतीबुवा गुरव यांजकडून ज्ञानेश्वरीचे पाठ घेतले. काही वर्षे ज्ञानेश्वरीचे अध्ययन आणि पारायणे केली.
पुढे धुळ्याला पाठकशास्त्री यांच्याकडे शंकरवेदान्त अभ्यासण्यासाठी गेले असता, गुरूंची नर्मदा परिक्रमा अर्धी राहिली होती ते कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या शिष्याने उचलली. त्यातूनच घडलेली ती नर्मदापरिक्रमा आणि पुढे लिहिले गेलेले “कुणा एकाची भ्रमणगाथा“. स्मरणगाथा वाचताना कितीतरी ठिकाणी भ्रमणगाथेमध्ये घडलेल्या प्रसंगांचे, पात्रांचे मूळ आढळते.
नर्मदेपरिक्रमेअखेर त्यांचा मुक्काम मंडलेश्वर - इंदोर- उज्जैन असा होत गेला. ह्या काळादरम्यान त्यांनी हेडगेवारांच्या संघात प्रवेश करून ते तेथील शाखेचे काम करू लागले. तशातच एके दिवशी कित्येक वर्षांच्या उपेक्षेने व्यथित झालेल्या शरीराने बंड पुकारले आणि नाईलाजाने त्यांना १७ वर्षांचा तो अनवट संघर्षमय जीवन प्रवास खंडित करून अखेर घराची वाट धारावी लागली.

मी वर ढोबळ्मानानाने लिहिलेले मुख्य टप्पे त्या जीवनप्रवासाचा फक्त आराखडा सांगतात. परंतु त्यात अनेक कंगोरे आहेत, अनेक स्तरांवर ही स्मरणगाथा आपल्याला घेऊन जाते.
त्या वेळचं १९२० -१९४६ ह्या स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजजीवन- इंग्रजांचे अत्याचार, जातिव्यवस्थेतून होणारे अन्याय, निजामशाहीत पोळणारा महाराष्ट्रातील भूभाग; सांस्कृतिक जीवन - संगीत नाटकं , नाट्यपेमी समाज, कीर्तन -प्रवर्चनाची परंपरा यांची एक झलक बघायला मिळते.
संत गाडगे महाराज- ज्यांच्याविषयी (दुसरीच्या पुस्तकात ?) एका धड्यातून जुजबी माहिती मिळाली होती- पण स्मरणगाथे मधून त्यांच्या कार्याची व्याप्ती, त्यांना लाभलेली लोकप्रियता, त्यांचा लोक संग्रह, त्यांचा कनवाळूपणा, त्यांची निःसंगवृत्ती, साधेपणा बघून थक्क व्हायला झालं.
तुकारामांचे अभंग कधी पुस्तकांतून किंवा गाण्यांमधून आपण ऐकतो पण तुकारामांच्या गाथेचा उत्तुंगपणा - जीत साडेचार हजार अभंग आहेत - जाणवून, आपल्याला माहित असलेले अभंग किंवात्यांच्याविषयीची माहिती हे, हिमनगसारखे आपल्याला दिसणारे फक्त टोक आहे, ह्याची पक्की जाणीव झाली.
ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी, त्यावेळच्या सामान्य जनतेला कळावी म्हणून सुबोध भाषेत लिहलेली ज्ञानेश्वरी, आपल्याला ह्या काळात आपल्या साठाव्या वर्षी (सगळ्यांना नाही पण वाटतं त्यांना ) समजून घ्यावी वाटते. परंतु गोनीदांना त्यांच्या विशीतच ती समजून घ्यायची आस लागली.
एकंदरच स्मरणगाथा वाचताना तुकाराममहाराज, ज्ञानेश्वरमाऊली, शंकरवेदान्तासारखे अनेक प्राचीन ग्रंथ, वारकरी परंपरा, कीर्तन परंपरा या सगळ्याच्या अफाट आणि अगाध विस्ताराच्या अस्तित्वाची जाणीव होते.

एक तेरा-चौदा वर्षांचा मुलगा राष्ट्रपेमापायी घरदार सोडून बाहेर पडतो. त्यानंतर त्याच्या वाट्याला आलेले कष्ट, झेललेले अनन्वित अत्याचार, अपमान, हलाखीची परिस्थिती, झालेली उपासमार,उपसलेले अपरंपार कष्ट, समोर आलेल्या किशोर/ तरुणमनाला चाळवणाऱ्या निसरड्या वाटा, हे असे अनेक काटे, निखारे वाटेत विखुरलेले होते. पण असं असतानाही त्यांनी दाखवलेली असामान्य समज, धैर्य, चिकाटी, स्वाभिमान, त्यांच्या ठायी असलेली तीक्ष्ण स्मरणशक्ती, प्रखर बुद्धिमत्ता, सुस्पष्ट उच्चारण आणि बालपणीच मिळालेली संस्कारांची शिदोरी ह्यांच्या जोरावर गोनीदा, भट्टीतून बाहेर आल्यावर सोनं जसं झळाळून लखलखतं, तसंच काहीसं मला गोनीदांच्या बाबतीत स्मरणगाथा वाचताना जाणवलं.

भाषेविषयी म्हणायचं तर जुनी मराठी भाषा, अनेक संस्कृत, प्राकृत श्लोकांनी नटलेली आहे. लिखाणाची शैली ओघवती आहे. भाषेवरील प्रभुत्व ह्याविषयी मी काही बोलणे म्हणजे काजव्याने सूर्याविषयी बोलण्यासारखे आहे :).
परंतु सध्याच्या / किंवा मी वाचलेल्या बाकी पुस्तकांपेक्षा अतिशय वेगळेपण जे मला जाणवत ते म्हणजे फक्त कथानक किंवा सांगायचे मुद्दे (ज्याला आपण अलीकडे कन्टेन्ट म्हणतो ) ह्यावरच फक्त लक्ष केंद्रित करून तो प्रवाह पुढे नेण्याकडे जो भर असतो ते इथे आढळत नाही किंवा तशी अजिबात घाई नाही तर तो फुलवण्याकडे, छान समजावून देऊन त्यासाठी मराठी भाषेतील अलंकारांचा, शब्दरत्नांचा वापर करून लिखाण सजविण्यावरही तेव्हढाच जोर दिलेला आहे. अर्थात त्यात कुठलाही मुद्दा / कथा वाहूनही जात नाही.

अशाच एका ग्रुपवर कुणा एकाने डकवलेली “कुणा एकाची भ्रमणगाथा” ह्या श्राव्यपुस्तकाची (ऑडिओ बुक ) ची लिंक मिळाली. त्यातील कथानक, उपकथा, पात्रे, मांडणी, मुख्य म्हणजे भाषा, शैली सगळंच इतकं आवडलं की संधी मिळताच गोनीदांचं “स्मरणगाथा” वाचलं.
मशालीने मशाल पेटवावी तसेच एका वाचनात पुढील वाचनाची दिशा मिळते असे काहीसं आजकाल मला वाटायला लागलं आहे. त्यातूनच पुढे जमेल तस तुकाराम, ज्ञानेशावर, गाडगे महाराज ह्यांच्या विषयी जाणून घ्यायला त्यांच्या साहित्याचा कोळून अर्क प्यायलेल्या, त्यांचे अनुयायी असलेल्या गोनीदा यांची पुस्तके पुढील दिशा दाखवतील असं आत्तातरी वाटतंय.

मिसळपाव Mon, 14/07/2025 - 04:16

कुठल्या वाचनालयात ही पुस्तकं मिळाली? "पडघवली" आणि "पवनाकाठचा धोंडी" मिळाली तर जरूर वाचा. मिळवून वाचा म्हणणं जास्त योग्य होईल. आणिक बरीच आहेत.

kulpre Tue, 15/07/2025 - 11:45

In reply to by मिसळपाव

सुचविल्याबद्दल धन्यवाद!
पावनाकाठाचा धोंडी नुकताच ऐकलं. आवडलं.

बे एरियातील काही वाचनालयांत आहेत मराठी पुस्तके.

मनीषा Sat, 19/07/2025 - 15:40

गोनिदांची काही पुस्तके वाचली आहेत. स्मरणगाथा अजून संपूर्ण नाही वाचले ..पण वाचीन.
पडघवली, तांबडफुटी, पवनाकाठचा धोंडी किती तरी आहेत. त्यांच्या लेखनात कथेच्या अनुषंगाने येणारे त्या काळातले, त्या प्रदेशातील जीवनमानाचे वर्णन फारच सुरेख आहे. त्यांची भाषा, शब्दप्रयोग सुद्धा --- साधे, सोप्पे पण नेमके ---
"मोगरा फुलला" हे संत ज्ञानदेवांच्या जीवनावर आधारित पुस्तक पण सुंदर आहे...