Skip to main content

झेराव्हना – जे गाव जाणतं माझं नाव -- मुक्ता


आमच्या गटातल्या बहुतेक सर्व असंभवनीय साहसांप्रमाणे याचीही सुरुवात झाली ती महेशच्या एका कल्पनेनं. त्यानं ‘सुल्तान्स ट्रेल’बद्दल वाचलं होतं – व्हिएन्नापासून इस्तंबूलपर्यंत पसरलेला इतिहासाचा तो एक बारीकसा, अखंड धागा. जुन्या ऑट्टोमन मार्गावरून जाणारा, शेतांतून, जंगलांतून, नद्यांतून आणि विसरल्या गेलेल्या गावांतून जाणारा. तो म्हणाला, "आपण या वाटेचा काही भाग चालायला हवा. पूर्ण नाही, पण आपल्या त्वचेखाली तो अनुभव रुजेल इतपत."

झेराव्हना

आम्ही त्या वेळी 'कॅफे फितूर’मध्ये बसलो होतो. तिथे भाजलेल्या कॉफीच्या बियांचा आणि डेडलाईन्सचा वास दरवळत होता. आम्ही तिघं – महेश, जो दुर्मीळ नाणी गोळा करतात तसा कल्पना गोळा करायचा; सुनील, जो प्रवासापेक्षा सोबत महत्त्वाची म्हणत यायचा; आणि मी, जी शेवटी काहीतरी योजना आखून गोष्टी जुळवून आणायचे. 

मी गाईड शोधला. सुनील आणि महेश यांनी मार्ग, हवामान, व्हिसा, स्थानिक वाहतूक यांवर संशोधन केलं. स्वप्न महेशचं होतं, जे आमच्या सगळ्यांच्या थोड्या नियोजनाच्या आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्यक्षात आलं.

 

जेव्हा आम्ही बल्गेरियाला पोहोचलो, तेव्हा नेमकी शरद ऋतूची सुरुवात झाली होती – ज्याला स्वतःला काय हवंय, हे अजून ठरत नव्हतं. सकाळ गार आणि फिकट असायची, पण दुपार अजूनही उन्हाळ्याची आठवण घेऊन यायची; उरलीसुरली ऊब जमिनीवर पसरलेली असायची. सुलतानाचा तो मार्ग या सगळ्यातून एखाद्या अर्धवट विसरलेल्या सुरावटीसारखा वळणं घेत होता – सोफियातून, नंतर पूर्वेकडे बाल्कन टेकड्यांमध्ये, जिथे गावं युगानुयुगे जगाकडे पाहत असल्यासारखी उतारांखाली शांतपणे पडून होती.

आमचा गाईड एमिल हा एक उंच माणूस होता आणि त्याच्या सहृदयतेला भाषेचा अडसर नव्हता. नकाशावर बोट दाखवत तो म्हणाला, "उद्या आपण कोटलहून झेराव्हनापर्यंत चालू. ते खूप जुनं गाव आहे. काही लाकडी घरं आहेत, दगडी रस्ते, शांत... अतिशय शांत. अर्थात, गावाच्या सीमेवर एक तलावही आहे, जिथून दूरवर असलेलं शहर दिसतं." तो अतिशयोक्ती करत नव्हता.

आम्ही झेराव्हनाला दुपारी तीनच्या सुमाराला पोहोचलो. तिथे पोहोचणं म्हणजे एखाद्या स्वप्नाच्या काठावर येऊन थांबल्यासारखं वाटलं. 

हवा अगदी स्तब्ध होती. एकही माणूस दृष्टीस पडत नव्हता. लाकडी घरं किंचित पुढे झुकलेली होती, जणू काहीतरी घडून गेलेलं आहे, ते ऐकत असल्यासारखी. पलीकडच्या टेकडीवरून कुठेतरी एका कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला, आणि मग दुसऱ्यानं त्याला उत्तर दिलं, पण तो आवाज आणखी दूरचा होता – अनुपस्थितीत चालू असलेला संवाद. 

आम्ही त्या अरुंद रस्त्याच्या मध्यभागी उभे होतो, आमच्या लांब आणि साशंक सावल्या घेऊन.

 "सगळे कुठे आहेत?" महेशनं सहज हळूच विचारलं.

"कदाचित सिएस्ताची वेळ असेल," सुनीलनं सुचवलं.

पण ते गाव झोपलेलं दिसत नव्हतं. ते थोडा वेळ बाहेर पडलंय आणि परत यायला विसरलंय, असं दिसत होतं. मला स्वच्छतागृहाची गरज होती. त्या एका लहानशा, मानवी निकडीनं त्या क्षणाला छेद दिला.

एमिलनं एका दुकानासारख्या दिसणाऱ्या इमारतीकडे बोट दाखवलं – जीर्ण झालेलं, वेलींनी अर्धवट झाकलेलं आणि रंग उडालेलं छोटेखानी बांधकाम. "तिकडे जाऊन बघ," तो म्हणाला. मी जवळ गेल्यावर, मला एक वृद्ध स्त्री व्हीलचेअरमध्ये बाहेर बसलेली दिसली. ती विणकाम करत होती – संथ, नेटकी हालचाल; लोकरीचा प्रत्येक फास पुढच्या फासात शिरत होता, हृदयाच्या ठोक्यांसारखा नियमित. तिचे केस रूपेरी होते, त्वचा मऊ कागदासारखी. तिच्यामागे अंगण गरीब पण नीटनेटकं दिसत होतं. पत्र्याच्या डब्यांत काही जिरेनियमची रोपं, अर्धवट फुटलेल्या खिडकीत एक फिकुटलेला पडदा फडफडत होता.

मी तिला ‘हाय’ केलं. तिला इंग्लिश येत असेल का ते माहीत नसताना. तिनं पहाटेच्या धुक्याच्या रंगाच्या डोळ्यांनी हसून, घराच्या बाजूच्या एका लहान दरवाजाकडे बोट दाखवलं. मी बाहेर आल्यावरही ती विणकाम करतच होती. 

तिच्या अस्तित्वात काहीतरी खास होतं – शांतता, संयम – ज्यामुळे मी तिच्याकडे ओढले गेले.

रिकाम्या रस्त्याकडे बोट दाखवून, मी कुतूहलाच्या सुरात विचारलं, "सगळे कुठे आहेत?"

तिनं वर पाहिलं, पुन्हा हसली आणि संथ, तिच्या बल्गेरियन ॲक्सेंटयुक्त इंग्रजीत म्हणाली. "काम." आणि थोडा विराम घेऊन म्हणाली, "शहरात. दिवसा सगळे जातात. पुरुष, स्त्रिया. रात्री परत." 

कशाचंही स्पष्टीकरण देण्याची गरज संपलेल्या लोकांचा शांत आत्मविश्वास तिच्या आवाजात होता. 

मी पुन्हा आजूबाजूला पाहिलं. संपूर्ण गाव रिकामं होतं – प्रत्येकाची स्वतःची शांतता, आणि स्वतःचा वाट पाहणारा कुत्रा असलेल्या घरांच्या रांगा – सगळं काही रिकामं. जणू काही दिवसभरात जीवन दुसरीकडे स्थलांतरित झालं होतं, मागे फक्त हे लाकडी सांगाडे सोडले होते – आठवणींचे मुखवटे घातलेली घरं. मी तिच्या बाजूला बसले आणि तिनं मला बसायला एक स्टूल दिलं. विणकामाच्या सुया चालूच होत्या, क्लिक, क्लिक, क्लिक – त्यांची स्वतःची एक भाषा होती. 

"मुलं?" मी विचारलं.

तिनं सावकाश मान डोलावली. "सोफियात. काम करतात. सगळेच काम करतात. इथे आता कोणी नाही. फक्त मी आणि हे कुत्रे."

तिचे शब्द हवेत अडकलेल्या धाग्यांसारखे आमच्यात लोंबकळत राहिले. 

मला शहरांची आठवण झाली – कशी ती दिवसा माणसांना गिळंकृत करतात आणि रात्री परत बाहेर थुंकून टाकतात. आम्ही उपजीविकेच्या मागे इतक्या त्वेषानं धावतो की जगायलाच विसरतो की काय असं मला अचानक वाटलं. अचानक मला माझ्या स्वतःच्या आई-वडिलांची, इंदूरची, मी जिथे लहानाची मोठी झाले त्या घराची आठवण झाली. ते आता जुन्या फोटोसारखं फिकं पडत आहे. तिथल्या जिन्यात एकेकाळी हसणं, स्वयंपाकाचे वास आणि माझ्या वडिलांचा रेडिओ घुमायचा. आता जेव्हा जेव्हा मी तिथे जाते, तेव्हा असं वाटतं की खुद्द काळ हळूच खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून आतल्या भुतांना जाग येणार नाही.

त्या बाईनं माझं नाव विचारलं. मी सांगितलं. तिनं जणू त्याची चव घेत असल्यासारखी मान डोलावली. "मुक्ता," ती तिच्या मऊ ॲक्सेंटमध्ये म्हणाली. "मुक्त. छान नाव." "हो," मी म्हणाले. "पण स्वातंत्र्य... एक खूप काँप्लेक्स गोष्ट आहे."

तिनं उत्तर दिलं नाही, फक्त हसली. कदाचित तिला समजलं असेल. कदाचित तिला समजण्याची गरजही नसेल.

त्या रात्री मी आमच्या छोट्या गेस्टहाऊसमध्ये जागी होते, पुन्हा कुत्र्यांचं भुंकणं ऐकत. ते थांबायचं, मग पुन्हा सुरू व्हायचं. दूरवरच्या वाऱ्यात, जंगलात आणि काळात तो आवाज मिसळून जात होता. 

तिनं जे सांगितलं होतं, त्याचा विचार मी करत होते – लोक रोज सकाळी कमाईसाठी दुसरीकडे निघून जातात, फक्त झोपायला परत येतात. आणि मला प्रश्न पडला : घर म्हणजे काय? जिथे आपण जागे झाल्यानंतरचा काळ घालवतो, ती जागा घर असते ना? जेव्हा घर फक्त रात्रीपुरता निवारा देणारी जागा राहते, तेव्हा ते घर राहतं का? 

कदाचित आधुनिक प्रगतीमुळे हे होतं – आपण जिथे राहतो आणि जिथे अस्तित्वात असतो, त्यामधलं अंतर प्रगतीमुळे ताणलं जातं. ती आपल्या वेळाचं वर्गीकरण करते : उत्पादक आणि वैयक्तिक, श्रम आणि विश्रांती, शहर आणि गाव, उपजीविका आणि जीवन.

आपण एकेकाळी आपल्या ठिकाणांचे असायचो. आता आपली ठिकाणं आपल्या अनुपस्थितीच्या जागा झाल्या आहेत. 

दुसऱ्या दिवशी झेराव्हनातून बाहेर पडताना मी मागे वळून पाहिलं. सूर्यप्रकाश बदलला होता – लाकडी घरं उनपिवळ्या रंगात चमकत होती; कुत्री दारात डुलक्या घेत पडली होती. मला प्रश्न पडला : संध्याकाळी, जेव्हा लोक शहरातून परत येतील, तेव्हा गाव पुन्हा श्वास घेईल का? जणू काही घडलंच नाही. कदाचित ती वृद्ध स्त्री अजूनही विणकाम करत असेल, टाके घालत वेळ मोजत असेल. कोणी थांबावं यासाठी वाट पाहणं कदाचित तिनं कधीच सोडून दिलं असेल.

महेश माझ्यापर्यंत आला. "तू कुठे हरवलीयेस?" तो म्हणाला. "मी विचार करतेय" मी उत्तर दिलं. "कशाचा?" "शांतता किती दाट असू शकते ना," मी म्हणाले. तो हसला, पण मंद.

बल्गेरियानंतर, मी इंदूरमधील माझ्या बालपणीच्या घरी गेले. 

किती महिने झाले होते. घर अधिक जुनं, अधिक शांत वाटत होतं. रंग आणखी थोडा फिका पडला होता. बाहेरचं कडुनिंबाचं झाड अधिक वठल्यासारखं झालं होतं. माझ्या आईची साडी बाल्कनीच्या कठड्यावर गतयुगाच्या ध्वजासारखी फडकत होती. साठवलेल्या, आधीच्या उन्हाळ्यांचा वास आतमध्ये येत होता. प्रत्येक वेळी मी इथे परतल्यावर, एक क्षण असा येतो जेव्हा घर सजीव झाल्यासारखं वाटतं – जणू त्यानं मला ओळखलं आहे. मग ते पुन्हा आपल्या संथ श्वासोच्छ्वासात स्थिर होतं, जणू त्याला माहीत असतं की मी फक्त थोडे दिवस भेटायला आले आहे.

जुन्या खोल्यांमधून फिरताना मला जुन्या दुपारींचे प्रतिध्वनी ऐकू येत होते – माझ्या वडिलांच्या पावलांचा आवाज, प्रेशर कुकरची फुसफुस, शेजाऱ्यांच्या ट्रान्झिस्टरवरून येणारी लता मंगेशकर. ते सर्व अजूनही इथे आहेत, एका प्रकारच्या तलम धूसरतेत तरंगत. मी माझ्या गावातल्या कृषी महाविद्यालयात सकाळची फिरायला गेले. भूतकाळातल्या एका जागेबद्दल मला एक तीव्र भावनिक ओढ जाणवली. माझ्या आई-वडिलांची तिथली ऑफिसं आणि जवळपासची त्यांची निवासस्थानं हा परिसर तसाच दिसत होता – जुनाट इमारती, लोक त्यांच्या कुत्र्यांना घेऊन फिरत होते, काही परिचित वनस्पतीशास्त्रीय नावं नामफलकांवर होती, वसतिगृहं आणि व्हीआयपींसाठीचं गेस्ट हाऊस, काही वृद्ध जोडपी गप्पा मारताना किंवा मेडिटेशन करताना त्यांच्या दीर्घ श्वासांचं घुमणं, पानांचा आणि गवताचा वास, प्रयोगांसाठीची झाडं लावलेले जमिनीचे काही तुकडे, जमिनीच्या अशाच किती तरी तुकड्यांकडे जाणारे फाटे फुटलेले काही छोटे कच्चे रस्ते. माझ्याकडे यांचे फोटो नाहीत, पण मला वाटतं की ते फोटो मी माझ्या डोळ्यांच्या रंगात आणि माझ्या प्रत्येक नात्यात सोबत नेत आहे. हा नक्कीच नॉस्टॅल्जिया आहे – खरं तर तो खूप चांगला काळ होता असं पण नाही, पण ते एक गर्भाशयासारखं ठिकाण होतं, जी तुमच्यासाठी तुमची स्पेस होती, जेव्हा तुम्ही हे मोठं विशाल जग पाहिलेलं नव्हतं. आपल्यातला एक छोटा भाग अजूनही तिथे एका छोट्या घरात वस्ती करून असतो, त्याच्या खेळकरपणात रमतो, तिथल्या आरामात आणि गोडव्यात – आणि त्याच्या सार्थतेत – स्वतःला शोधतो.

मला माझ्या डायरीत लिहिलेलं काहीतरी आठवलं : तुम्हाला तुमचं स्वतःचं एक छोटं गाव हवं आहे, जरी ते सोडून जाण्याच्या आनंदासाठी असलं तरी. एक जागा, जिचा अर्थ असा की तुम्ही एकटे नाही आहात. जिथली कुत्री, झाडं आणि जिथली माती तुम्हाला ओळखतात. जिथे हवेत काहीतरी असं आहे जे तुमचं आहे. आणि तुम्ही नसताना ते तुमची वाट पाहतं.

माझ्यासाठी ते इंदूर आहे. कदाचित तिच्यासाठी ते झेराव्हना असेल.

कदाचित प्रत्येक व्यक्तीला अशा एका लहान, श्वास घेता येणाऱ्या जागेची गरज असते – जरी ती तिथून दूर राहत असली, तरी परत येण्याचा हक्क मिळवण्यासाठी तिला ही जागा नक्कीच हवी असते.

काही आठवड्यांनंतर, पुन्हा कामाच्या गडबडीकडे आणि विमानतळांच्या वर्दळीत परत आल्यावर, मला अजूनही त्या बल्गेरियन दुपारची आठवण येत असे – रिकामे रस्ते, दूरचे कुत्रे, कुणीच नसण्याभोवती लोकरीचे धागे गुंफणारे त्या वृद्ध स्त्रीचे हात. कधीकधी, मीटिंग्जदरम्यान किंवा महेश, सुनील, माझे इतर मित्र किंवा माझ्या सध्याच्या आयुष्यातल्या इतर कोणाकडून आलेल्या निरोपांमधून स्क्रोल करताना, मला ती पुन्हा माझ्या मनात दिसायची, तिच्या व्हीलचेअरमध्ये शांतपणे बसलेली. मला आता आश्चर्य वाटतं की, जे लोक रोज सकाळी निघून जातात, त्यांची तिला ईर्ष्या वाटली असेल की दया? कदाचित दोन्हीही नाही. कदाचित तिला समजलं असेल की जीवन म्हणजे फक्त पुढे जाणे नाही, तर जगाचा प्रतिकार न करता त्याला आपल्यामधून वाहून जाऊ देणं आहे.

‘सुल्तान्स ट्रेल’ ही स्वतः एक तीर्थयात्रा किंवा ट्रेक नाही; ती इतिहासाशी एक लांब असा संवाद आहे. ती आपले पूजास्थान किंवा गंतव्यस्थान करायची मागणी करत नाही. ती फक्त तुम्हाला चालायला सांगते – निघून जाणे आणि पोहोचणे या दरम्यान उपस्थित असायला सांगते. कदाचित घरदेखील हेच तर आहे : सोडून जाणे आणि परत येणे यामधली जागा. 

आणि म्हणूनच त्या स्त्रीचं नाव सतत माझ्यासोबत राहतं – जरी मी ते कधी विचारलं नाही. तिच्यात एक अशी ओळख होती की ती पूर्णपणे एका जागेची आणि पूर्णपणे स्वतःची अशी आहे. बल्गेरियातल्या आमच्या शेवटच्या रात्री, आम्ही ट्रेलच्या जवळ एक लहान शेकोटी करून त्या धगीभोवती बसलो होतो. एमिलनं पोचे गेलेल्या किटलीमध्ये कडक कॉफी तयार केली, धुरामध्ये पाईन आणि संयमाचा सुगंध मिसळला होता.

महेशनं त्याला विचारलं, "तुझ्या देशात आलेल्या अनोळखी लोकांना मार्गदर्शन करण्याचा तुला कधी कंटाळा येतो का?" एमिल हसला. "कधी कधी," तो म्हणाला. "पण ज्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही, त्याकडे लोक कसे पाहतात, हे बघायला मला आवडतं. डोंगर. शांतता. गावं. आमच्याकडे काय आहे ह्याची आठवण तुम्ही आम्हांला करून देता."

मला पुन्हा त्या वृद्ध स्त्रीची आठवण झाली. कदाचित तीही तेच करत असेल – आपल्या गावाला शांतपणे आठवण करून देत असेल की, त्याचं अस्तित्व त्या अनुपस्थितीतही आहे. वरचे तारे अनोळखी होते, पण शांतता तीच होती, जी आमच्यासोबत नेहमी होती – रिकाम्या रस्त्यांपासून ते खोल जंगलांपर्यंत आणि या मोकळ्या जागेपर्यंत.

आम्ही त्या रात्री फार बोललो नाही. कदाचित आम्ही सगळेच शब्दांनी थोडे थकलो होतो.

कुत्री पुन्हा भुंकली, कुठेतरी त्या टेकडीपलीकडे.

त्यांचे आवाज त्या अंधारातून धाग्यांसारखे विणले गेले होते, आपुलकीचं आणि अंतराचं, बोलावण्याचं आणि उत्तर देण्याचं एक गाणं.

मी विचार केला : कदाचित जीवन हेच आहे – जे आपण मागे सोडतो आणि जे आपल्या परत येण्याची वाट पाहतं, यामधला एक अंतहीन प्रतिध्वनी.

'न'वी बाजू Sat, 25/10/2025 - 07:31

“जे गाव जाणतं माझं नाव”??????

पण… पण… पण… लेखिकेने तर गावातल्या फक्त एका वृद्ध स्त्रीला तिचे नाव सांगितले. मग “आख्खे गाव जाणते” या म्हणण्याला आधार काय?

मान्य, ज्या क्षणी सांगितले, त्या क्षणी गावात केवळ ती वृद्ध स्त्री उपस्थित होती. म्हणजे, त्या क्षणी उपस्थित असलेल्या आख्ख्या गावाला ठाऊक झाले. परंतु, म्हणून “आख्खे गाव जाणते”??????

उरलेले गाव काम संपल्यावर संध्याकाळी घरी परतणार आहे ना? की, शहरात कामासाठी गेलेले सगळे (कधीही न परतण्याकरिता) परस्पर परागंदा झाले (किंवा टपाटप मरून पडले, किंवा अन्य कारणांमुळे कधी परत आलेच नाहीत), अशी काही खात्रीलायक (आतल्या गोटातली) बातमी त्यानंतर लेखिकेला कळली? (म्हातारीने तार केली काय?)

की, म्हातारीच्या तोंडात तीळ भिजत नाही, नि संध्याकाळी जेव्हा गाववाले कामावरून परत येतील, तेव्हा म्हातारी ब्रॉडकास्ट बँडमध्ये जाऊन सगळ्या गावाला आपले नाव जाहीर करेल, याची लेखिकेला खात्री आहे? (“अहो, कळलं काय? सकाळी ना, इथे एक इंडियन मुलगी मुतायला आली होती. तिचं नाव काय, ठाउकाय? मुक्ता. मुक्ता! म्हणा: मुक् ता!!!!!! काय तरी नाव आहे, बाई! या इंडियन लोकांची नावं कैच्याकैच असतात, नै?”)

उगाच काहीतरी अतिशयोक्त दावे करायचे ते!

(चालायचेच.)

'न'वी बाजू Sat, 25/10/2025 - 20:05

बल्गेरियन भाषेत ‘मुक्ता’चा अर्थ काही वेडावाकडा होत नाही, याची खात्री करून घेतली आहेत काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 03/11/2025 - 05:27

'न'बा, मनाला आवर घाला! सातत्यानं अनोळखी स्त्रियांच्या लेखनावर अवांतर कॉमेंटी करून सातत्य-गाढव वगैरे तुम्हीच वापरता त्या वाक्‌प्रयोगाची कितीदा आठवण करून देणार आहात? कधी तरी ओळखीच्या पुरुषांच्या लेखनाची चिकित्सा करत चला!

'न'वी बाजू Mon, 03/11/2025 - 17:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे? भिकार लेखनाची चिकित्सा ही केवळ (१) लिहिणारी स्त्री आहे (कशावरून?), आणि (२) मी तिला ओळखीत नाही, या कारणांस्तव करायची नाही??????

अन्याय आहे हा!

सातत्य-गाढव

सातत्य-गाढव आहे खरे. म्हणजे, भिकार लिहिणाऱ्या या सातत्याने (१) स्त्रिया असतात, आणि (२) मी त्यांना ओळखीत नसतो, हा मी आजवर निव्वळ योगायोग समजत होतो. मात्र, There is indeed a method in the madness, अशी शंका (आता तुम्ही म्हणताय, तर) येत आहे. सातत्याने भिकार लिहिण्याच्या अनोळखी स्त्रियांच्या गाढवगुणास माझा प्रणाम!

कधी तरी ओळखीच्या पुरुषांच्या लेखनाची चिकित्सा करत चला!

ठीक आहे. पुढच्या वेळेस तुमच्या लिखाणाची चिकित्सा अवश्य करेन. लक्षात ठेवेन.

(याद रखूँगा। तुझे, याद रखूँगा।)

असो चालायचेच.