फटका हुकला नसता तर?

एखादा सामना जेव्हा तुल्यबळांचा असतो, तेव्हा त्यावर मल्लीनाथी करणाऱ्या मंडळींचे सरळसरळ दोन तट पडतात. प्रत्येक तट आपल्याच पक्षाची भलावण करतो. सामना बहुशः अटीतटीचा होतो. सामन्याचा निकाल कुठल्या तरी एका बाजूच्या अपेक्षेविरुद्ध असला तरी अशा सामन्याची सामना संपल्यावरही बराच काळ पुन्हा पुन्हा आणि चौफेर चर्चा होतच रहाते. या उलट जेव्हा एक कमकुवत पक्ष नामुष्की टाळण्यासाठी आता केव्हाही बलदंड पक्षाला सपशेल शरण जाणार अशीच सगळ्याच तज्ज्ञ मंडळींची अपेक्षा असताना देखील तो चिवटपणे प्रतिपक्षाशी झगडतच रहातो, तेव्हा मात्र अशा सामन्यावर चर्चा करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींची (आणि तोंडाशी आलेले यश पदरात न पडलेल्या मातब्बर पक्षाची) जरा गैरसोयच होते. कमकुवत पक्षाला असे वाचवणाऱ्या सगळ्यांनाच अनुल्लेखाने काळाच्या पडद्याआड ढकलता आले तर (यश हुकलेल्या) मातब्बर पक्षाला आपला आब, निदान काही काळ, राखता येतो.
आतापर्यंतच्या नमनावरून मी एखाद्या चषकासाठी झालेल्या जागतिक क्रिकेट सामन्याबद्दल लिहिणार आहे, असे जर आपल्याला वाटत असेल तर मात्र इथेच मला सांगायला हवे – मी जे काही लिहिणार आहे त्याचा आपल्या माहितीच्या कुठल्याच खेळाशी काहीही संबंध नाही. हा लेख औरंगजेबाने बराच काळ केलेल्या हिंदवी स्वराज्याला आपल्या पायाखाली चिरडून भरडून टाकण्याच्या अयशस्वी प्रयत्नांबद्दल आणि त्याच्या बरोबर मराठ्यांनी आणि विशेषतः छत्रपती राजाराम महाराजांनी (१६७० – १७००) प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या सामन्याबद्दल आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीतच औरंगजेबाने महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले होते. औरंगजेबाच्या वतीने मिर्झा राजे जयसिंग यांनी इ. स. १६६५ आणि इ. स. १६६६मध्ये हिसकावलेला हिंदवी स्वराज्याचा मोठा भाग त्यानंतर प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी परत देखील मिळवला. पण औरंगजेबाने इ. स. १६८९मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर काही काळ तरी त्याला केव्हाही हिंदवी स्वराज्य पूर्णतः संपवता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
छत्रपती संभाजी राजांच्या मागे त्यांची पत्नी येसूबाई (बरोबर ७ वर्षांचे पुत्र शाहू महाराज) आणि धाकटा भाऊ राजाराम (सुमारे १९ वर्षांचा अनुनभवी तरुण) यांच्यावर स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी आली. औरंगजेबाचा सरदार झुल्फिकार खान याने जेव्हा मार्च इ. स. १६८९मध्ये मोठी फौज घेऊन स्वराज्याची राजधानी रायगडाला वेढा घालण्यास सुरुवात केली त्या वेळी राजाराम महाराज (ज्यांना नुकतेच मंचारोहण समारंभानंतर छत्रपती घोषित केलेले होते) आणि महाराणी येसूबाई राजधानी रायगडावरच होते.
आधीच एका जोरदार फटक्याने औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांचा बळी घेतला होता आणि स्वराज्याचे पुढील सूत्रचालक राजाराम महाराज आणि महाराणी येसूबाई रायगडावर त्याच्या पुढच्या फटक्याच्या टप्प्यातच सापडले होते. फटका जर बरोबर मर्मावर बसला तर हिंदवी स्वराज्य पूर्णपणे संपले असते.
औरंगजेबाने रायगडावर नेम बरोबर धरला होता, आपली बरीच मोठी शक्ती एकवटून तोपर्यंत नावाजलेल्या झुल्फिकार खानाच्या हाती सोपवलेली होती, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर फारसा वेळ ना दवडल्याने प्रतिपक्ष प्रतिकाराला अजून पुरेसा सज्ज नव्हता. एकच फटका मर्मस्थानी आणि सामना संपला – पूर्ण दख्खन काबीज करण्याचा मार्ग औरंगजेबाला मोकळा ! पण...
पण इथे जर आणि तर या मधील अंतर औरंगजेबाच्या अपेक्षेपेक्षा बरेच मोठे निघाले.
ज्या अर्थी हा सामना नंतरही चालूच राहिला त्या अर्थी औरंगजेबाचा काही गोष्टींचा अंदाज सपशेल चुकला असावा; स्वराज्याचे सल्लागार, राजाराम महाराज आणि महाराणी येसूबाई यांचे संयोजन कौशल्य आणि वेढ्यात सापडलेले असतानासुद्धा सर्वत्र संधान बांधण्याची आधीच्या पिढ्यांपासूनची सक्षम व्यवस्था या सगळ्यांचे महत्त्व कदाचित औरंगजेबाने लक्षात घेतले नसावे. शिवाय राजाराम महाराज आणि महाराणी येसूबाई यांना असणारा Homeground Advantage!!
हे काय आणि कसे झाले त्याचाच हा लेखाजोखा.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीत झुल्फिकार खानाशी लढण्यातल्या डावपेचांचा महत्त्वाचा भाग महाराणी येसूबाई आणि राजाराम महाराज यांनी एकमताने आणि आपसांत फूट पडू न देता औरंगजेबाविरुद्धचा सामना पुढे चालू ठेवणे हा असावा. राजाराम महाराजांचे छत्रपती म्हणून मंचारोहण आणि औरंगजेबाच्या समोर रायगडापासून दूर झालेले राजाराम महाराज आणि रायगडस्थित महाराणी येसूबाई अशी दोन वेगळी लक्ष्ये तयार केल्याने औरंगजेबाची बलाढ्य शक्ती विभागेल आणि त्यामुळे त्याचा फटका मर्मभेदी होणार नाही असाही विचार झाला असावा.
असे दिसते की सल्लामसलत होऊन राजाराम महाराज रायगड सोडून प्रथम प्रतापगडावर गेले. रायगडाला वेढा पडलेला असताना सुद्धा राजाराम महाराज रायगडावरून निघून जाऊ शकले यावरून झुल्फिकार खानाने रायगडाच्या अवघड परिसरात घातलेला वेढा कसा होता याची कल्पना येऊ शकते. राजाराम महाराजांचे रायगडावरून झालेले प्रयाण (काही दिवसांनी) झुल्फिकार खानाच्या लक्षात आल्यावर त्याने फतेजंग खान याला राजाराम महाराजांचा मागोवा घेऊन पाठलाग करण्यास पाठवले आणि स्वतः रायगडाचा वेढा चालूच ठेवला.
आणि इथून पुढील राजाराम महाराजांचा प्रवास हा समस्त स्वराज्य सेवकांच्या शक्ती-युक्ती-स्वामीभक्तीचा उत्तम दाखला होता.
औरंगजेबाला हुलकावणी देण्याचा (आणि स्वतःला वाचवण्याचा) असाच आधी झालेला एक – यशस्वी आणि अशाच अति महत्वाच्या वळणावरचा – प्रयत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. त्याबद्दल देखील तुटपुंजीच माहिती उपलब्ध असली तरी आग्रा ते रायगड या अतिगुप्ततेत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवासात "जीवावर बेतले पण थोडक्यात निभावले" असे फारसे झाले नसावे. औरंगजेबाला हुलकावणी देत रायगडाहून निघालेल्या राजाराम महाराजाना मात्र अनेक वेळा जीवघेण्या संकटांना तोंड देत पुढे जावे लागले.
रायगडाहून निघून गेलेले राजाराम महाराज प्रतापगडावर असतांना पायथ्याशी मोगल सैन्य गडावर हल्ला करण्यास जमत असल्याचा सुगावा लागला. त्यामुळे थोड्या चकमकीनंतर राजाराम महाराज प्रतापगडावरून निघाले. त्यानंतर वासोटा किल्ला आणि पुढे सज्जनगड या ठिकाणी काही दिवस थांबून ऑगस्ट १६८९मध्ये पन्हाळा किल्ल्यावर पोचले. मराठयांचे सैन्य पूर्ण स्वराज्यात पांगलेले असल्यामुळे राजाराम महाराजांच्या बरोबर आगेमागे असे जेमतेम ४००-५०० सैनिक असत. याच काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे दोन मराठा सेनानी मोजक्या फौजेनिशी, जमेल तसे आणि जमेल तेथे महाराष्ट्रात पसरलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मोगल फौजांच्या पिछाडीवर किंवा बगलेवर हल्ले करीत, त्यांना सतावत, त्यांचे शक्य तेवढे नुकसान करत त्यांना कुठेच मोठेसे यश मिळू देत नव्हते.
आणि तरीही औरंगजेब महाराष्ट्रातून हलण्याचे नावही घेत नव्हता.
छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मिळवलेल्या वरचढ परिस्थितीचा फायदा घेत, सगळेच हिंदवी स्वराज्य मिळवण्याचे औरंगजेबाचे प्रयत्न चालूच होते. रायगडचा वेढा (ज्यात महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू अडकलेले होते) चालूच होता. रायगडच नव्हे, महाराष्ट्रातल्या कुठल्याही किल्ल्यात राजाराम महाराज सुरक्षित नव्हते.
महाराष्ट्रापासून सुमारे १,००० किलोमीटर दूर असलेला आणि त्यामुळे औरंगजेबाच्या प्रभावक्षेत्रात सहजी सापडण्यासारखा नसलेला जिंजीचा किल्ला अशा परिस्थितीत एक सुरक्षित ठिकाण म्हणून राजाराम महाराजांच्या होऱ्यात आला असावा. हिंदवी स्वराज्याच्या हितचिंतकांच्या सहाय्याने राजाराम महाराजांनी (त्यांच्याबरोबरच्या कारभारी मंडळ आणि फौजफाट्यासह ) मजल दरमजल करत जिंजीला पोहोचण्याची योजना त्यामुळे प्रतापगड सोडल्यावर तयार झाली असावी.
जिंजीचा किल्ला (सध्याच्या तामिळनाडूमध्ये असलेला) एका अर्थी हिंदवी स्वराज्यातच होता कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या हयातीत त्यांनी कर्नाटकाच्या मोहिमेवर पाठवलेल्या हरजीराजे महाडिक यांनी हिंदवी स्वराज्यासाठी मिळवलेल्या कर्नाटकातील प्रदेशाचा तो भाग होता. जवळचे तंजावरचे राज्य स्थापणारे राजे व्यंकोजी (उर्फ एकोजी) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते. जिंजीचा किल्ला हा तीन जवळ-जवळच्या टेकाडांवरच्या कृष्णगिरी, राजगिरी आणि चंद्रायनदुर्ग या तीन दुर्गांनी झालेला त्रिकोण, तट आणि बुरुजांच्या सहाय्याने सांधून बनवलेला एक भरभक्कम त्रिकोणी किल्ला होता. त्यामुळे जरूर पडल्यास प्रत्येक किल्ला वेगवेगळादेखील लढवता येत असे. १३ किलोमीटर (८ मैल ) तटाची लांबी आणि ११ वर्ग किलोमीटर (४. २ वर्ग मैल) क्षेत्रफळ असलेला हा किल्ला वेढा घालून जिंकणे कठीणच होते. तेव्हा सर्वानुमते राजाराम महाराजांना आपल्या कारभारी मंडळी आणि (जे काही थोडे बहुत जमवता येईल त्या) सैन्यासह औरंगजेबाचे वर्चस्व असलेल्या प्रदेशातून बाहेर पडून जिंजीच्या किल्ल्यात पोचल्यावर औरंगजेबापासून जास्त काळ सुरक्षित राहणे साध्य होणार होते.
सप्टेंबर इ. स. १६८९मध्ये फिरस्ते व्यापारी असल्याच्या अवतारात (पोशाख, सामानसुमान, बरोबरचे लोक, बोलण्याच्या पद्धती, इत्यादी) राजाराम महाराज बरोबरच्या लवाजम्यासह पन्हाळ्याहून निघाले. दक्षिणेकडे जात असल्याचा संशय शक्य तेवढा टाळण्यासाठी त्यांचा सुरुवातीचा मार्ग पूर्वेकडे जाणारा होता. नृसिंहवाडी, गोकाक, सौंदत्ती, नवलगुंद, अण्णिगेरी, लक्ष्मेश्वर, हावेरी, हिरेकेरूर असे थांबे घेत (कधी पूर्वेकडे तर कधी दक्षिणेकडे आणि शेवटी पश्चिमेकडे रोख ठेवत) काहीश्या लांबच्या आणि वरकरणी निरुद्देश वाटणाऱ्या रस्त्याने हा काफिला १०-१२ दिवसांच्या प्रवासानंतर सध्याच्या शिवमोग्गा (काही काळ पूर्वीपर्यंतचे शिमोगा) जवळील केळदीला पोचला. तोपर्यंत औरंगजेबाला राजाराम महाराजांच्या 'नाहीसे होण्या'चा सुगावा लागलेलाच होता. सगळीकडे अशा लोकांना थारा न देण्याची, त्यांचा काही माग लागल्यास त्याची माहिती कळविण्याची आणि शक्यतो त्यांना पकडण्याची फर्माने पाठवली गेली होती. अनेक हेर, खबरे आणि संधीसाधूदेखील या मंडळींचा मागोवा घेत होते.
या थोड्या प्रवासातदेखील वाटेत औरंगजेबाच्या काही सरदारांच्या तुकड्यांशी झालेल्या चकमकीत बरोबरच्या सैनिकांमुळे राजाराम महाराजांना पकडले न जाता पुढे निघून जाता आले होते. त्यामुळेच जिंजीपर्यंतच्या पुढील प्रवासातील प्रत्येक टप्प्यासाठी अत्यंत विश्वासू मदतनीसांची आणि गुप्ततेची राजाराम महाराजांना आणखीनच गरज होती.
केळदीची (बेदनूर) राणी चन्नम्मा अशी विश्वासू असण्याची राजाराम महाराजांना खात्री असावी कारण तिला पूर्वी तिचे वारसा हक्क मिळवून देण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मदत केली होती आणि त्यामुळे, ती औरंगजेबाच्या अंमलाखाली असतानाही तिला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर होता.
केळदीच्या राणी चन्नम्माने औरंगजेबाचा रोष होण्याचा धोका पत्करून, काही दिवसांकरता राजाराम महाराजांना आसरा दिला, त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करून दिली. "तुम्ही यांना पाहिले का? मदत तर केली नाहीत ना?" अशा तऱ्हेचा औरंगजेबाचा खलिता मिळेपर्यंत राजाराम महाराजांचा काफिला पुढे निघूनही गेल्याने राणीने साळसूदपणे औरंगजेबाला "आम्हाला आपला आदेश कळेपर्यंत असे कुणीतरी इथून निघून गेल्याने आम्हाला खात्रीशीर काही माहिती देता येत नाही आणि काही करताही आले नाही", असे संदिग्ध उत्तर दिले. राणीच्या फौजेची तयारी देखील चांगली असल्यामुळे (आणि राजाराम महाराज तसेही केळदीत सापडणार नसल्याने) कदाचित औरंगजेबाने आणखी काही मोठा बखेडा करण्याचे टाळले असावे.
केळदी पुढच्या प्रवासात राजाराम महाराजांनी आपल्या पथकाचे वेगवेगळे भाग केले आणि व्यापारी म्हणून घोड्यावरून एकसंध जत्था असा प्रवास करण्याऐवजी वेळोवेळी भटके, फकीर, भिकारी अशी सोंगे घेत पायी पुढे जाताना बरोबरचे लोक तसेच सैनिक वेगवेगळ्या टप्प्यात त्यांच्या बरोबर सामील होतील किंवा वेगळे होतील अशी योजना केली. या बदलामुळे त्यांचा संशय येणे, पाठलाग होणे, पकडले जाणे अशा संकटांचा धोका कमी होईल अशी त्यांची अटकळ असावी.
आणि तरीही काही अशी संकटे समोर आली होती की पुन्हा औरंगजेबाच्या बाजूने या सामन्याचा कौल लागू शकला असता.
केळदीनंतरच्या प्रवासात सय्यद अब्दुल खान या औरंगजेबाच्या एका सुभेदाराशी झालेल्या चकमकीत रुपाजी भोसले यांनी आपल्या पथकासह मोगल सैन्याला थोपवल्यामुळे बहिर्जी घोरपडे यांच्या मदतीने राजाराम महाराजांना निसटता आले. सय्यद अब्दुल खानने रुपाजी भोसले आणि त्यांच्या पथकाला हरवून ताब्यात घेतले पण राजाराम महाराज नक्की कुठे निघून गेले हे न कळल्यामुळे पकडलेल्याना कैदेत टाकणे यापलीकडे तो काही करू शकला नाही.
बंगळुरुमधल्या मुक्कामात, ज्या तऱ्हेने काही सेवक राजाराम महाराजांशी अदबीने वागत होते त्यावरून जवळपासच्या औरंगजेबाच्या खबऱ्यांना या पथकात कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती असल्याचा संशय आला. त्यातून सुरू झालेल्या आजूबाजूच्या हालचाली राजाराम महाराज आणि त्यांचे मदतनीस खंडो बल्लाळ यांच्या वेळीच लक्षात आल्या. राजाराम महाराज तेथून त्वरेने मोजक्या लोकांसह पुढे निघून गेले पण खंडो बल्लाळसकट त्यांच्या पथकाचा मोठा भाग, मुद्दामच (सगळेच एकदम निघून गेले तर सावज निसटल्याचे तात्काळ लक्षात येऊन लगेचच पाठलाग सुरू होऊ नये या हेतूने) मागे रेंगाळत सोडण्यात आला. औरंगजेबाच्या माणसांनी मागे राहिलेल्या सगळ्यांचा अतोनात छळ केला तरी आपला काही संबंध नाही, आपल्याला काही माहीत नाही या त्यांच्या बतावणीचा उपयोग होऊन बऱ्याच काळाने त्या सगळ्यांची सुटका झाली.
बंगळुरूहून निघाल्यावर सरळ जिंजीला न जाता राजाराम महाराज चाचपणीकरता प्रथम अंबूर आणि नंतर वेल्लोर या वाटेतील दोन मराठी ताब्यातील ठाण्यांवर थांबले. दरम्यानच्या काळात हरजी राजे महाडिकांचा मृत्यू झाल्याने जिंजीचा किल्ला आता त्यांची विधवा पत्नी अंबिकाबाई (छत्रपती शिवाजीमहाराजांची मुलगी म्हणजे राजाराम महाराजांची सावत्र बहीण) यांच्या ताब्यात होता आणि राजाराम महाराजांना अंबिकाबाईंच्या मनाचा कल नक्की कुठल्या बाजूला आहे याची खात्री नव्हती. तोपर्यंत त्या भागातल्या सगळ्याच मराठा सरदारानी आणि सैन्याने राजाराम महाराजांना पाठिंबा दर्शवल्यामुळे असेल पण अंबिकाबाईंच्या बाजूने काही मोठासा विरोध न होता नोव्हेंबर १६८९मध्ये राजाराम महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यात प्रवेश केला.
त्याच काळात महाराणी येसूबाईंना, फितुरीमुळे किल्ले रायगड औरंगजेबाच्या हवाली करून शरणागती (आणि युवराज शाहूंसह कैद) पत्करावी लागली आणि लगेचच राजाराम महाराजांनी जिंजीचा किल्ला ही हिंदवी स्वराज्याची नवी राजधानी ठरवली. त्यानंतर जरी झुल्फिकार खान पुन्हा जिंजीवर देखील मोठ्या फौजेसह चालून आला तरी राजाराम महाराजांना जिंजीचा किल्ला शिबंदी तुटपुंजी असतानाही पुढे ८ वर्षे लढवता आला. नाईलाजाने जेव्हा त्यांना जिंजीचा किल्ला सोडून देण्याची पाळी आली, तेव्हा अनेक हिकमतींनी त्यांना प्रथम विशाळगड आणि नंतर सातारा गाठता आले. मात्र या काळात कारभारी मंडळ, एकनिष्ठ सरदार आणि त्यांचा फौजफाटा यांची जमेल ती मदत घेऊन हिंदवी स्वराज्याचा कारभार आणि औरंगजेबाबरोबरचा लढा चालूच होता.
राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात अडकलेले असताना आणि त्यानंतरही संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी आपल्या सैन्यासह औरंगजेबाबरोबरच्या सेनेला सतावत राहण्याचे चालूच ठेवले होते. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या सैन्याचा औरंगजेबाच्या सेनेने इतका धसका घेतला होता की त्यांच्या घोड्यांना पाणी पाजतानादेखील त्यांना त्या पाण्यात धनाजी आणि संताजी यांची प्रतिबिंबे असल्याचा भास होत असल्याने सदैव भीती वाटत असल्याच्या आख्यायिका आहेत.
राजाराम महाराज इ.स. १७०० साली स्वर्गवासी झाल्यावर देखील, त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी स्वराज्याच्या कारभारासह संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव (आणि इतरही सरदार दरकदार) यांच्या नेतृत्वाखालील सैन्यासह औरंगजेबाबरोबरचा संग्राम त्याच्या मृत्यूपर्यंत चालूच ठेवला.
औरंगजेबाने रायगडावर साधलेला नेम बरोबर मर्मावर लागून एकाच फटक्यात महाराणी येसूबाई, युवराज शाहू आणि राजाराम महाराज जर औरंगजेबाच्या हाती लागले असते तर छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर अल्पावधीतच हिंदवी स्वराज्याची सांगता झाली असती. पण औरंगजेबाचा फटका चुकला आणि त्याच्या कवेत आलेला सामना त्याच्या हातून कायमचा निसटला. इतकेच नव्हे तर इ. स. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळेपर्यंत या प्रदीर्घ चालू राहिलेल्या युद्धामुळे औरंगजेबाचा खजिना रिकामा होत गेला आणि सैन्याचे मनोबल खच्ची झाल्याने पुन्हा कधीच मोगल हिंदवी स्वराज्याला धोक्यात आणू शकले नाहीत. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल सत्तेलाच उतरती कळा लागली. एवंच, औरंगजेबाचा एक हुकलेला फटका मोगल सत्तेला बराच महाग पडला.
जाता जाता : या धामधुमीच्या काळातल्या संताजी घोरपडे यांनी आपल्या मोजक्या सैन्यासह औरंगजेबाच्या छावणीवर घातलेल्या एका धाडसी छाप्यात औरंगजेबाचा शामियाना उध्वस्त केला. त्यावेळी स्वतः औरंगजेब त्याच छावणीतल्या त्याच्या मुलीच्या तंबूत असल्यामुळे संताजी घोरपडे यांच्या हाती लागला नाही. हा देखील एक दुर्दैवाने हुकलेला इतिहास पालटू शकणारा फटका.
नोंद
नजरचुकीनं सदर लेख बघायचा राहून गेल्यामुळे उशिरा दिवाळी अंकात समाविष्ट केला जात आहे. श्री. शेखर मोघे यांची मनःपूर्वक माफी.