Skip to main content

‘जें शाश्वत त्याचा देंठ तुटे’ : 'द व्हॉइस ऑफ हिंद रजब’

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात, तणाव दूर सारून घटकाभर विरंगुळा मिळवण्यासाठी सिनेमा बघितला जातो. पण मोठं बजेट, कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि भव्य स्पेशल इफेक्ट्सच्या (CGI/VFX) मदतीने तयार केलेलं चक्रावून टाकणारं विश्व चमकदार पल्लेदार संवाद आणि बरा अभिनय हे सगळं जरी असलं तरी या सिनेमातून माणसाचं खरं दुःख कुठेतरी हरवून जातं असं वाटतं. पडद्यावर आकाशगंगांच्या पातळीवरचं युद्ध, विनाश आणि मृत्यू दिसतात, पण त्यातील मानवी वेदना मात्र जाणवत नाही. केवळ एका अम्युझमेन्ट पार्कात फिरून आल्याचा तो अनुभव असतो. प्रेक्षक म्हणून आपणही समोरच्या दृश्यांना इतके सरावून जातो की रक्त, आक्रोश आणि उद्ध्वस्त होत जाणारे अख्खे ग्रहच्या ग्रह हे केवळ पडद्यावरच्या प्रतिमा म्हणून उरतात. वास्तवाशी, माणसांच्या अस्सल कथांशी जोडून घेतल्यामुळे त्यातून समष्टीचा विश्वरूप अनुभव देणारा, त्यापुढेही दशांगुळे उरणारा कलानुभव हरवतो आणि अशा प्रकारचा सिनेमा हे केवळ संवेदनांना सुखावणारं वेळ घालवण्याचं साधन बनून राहतो. 

अशा वेळी ट्युनिशियन दिग्दर्शिका काओथर बेन हानिया यांचा ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ सारखा एखादा चित्रपट समोर येतो आणि सिनेमा काय असू शकतो याची नव्याने जाणीव करून देतो. हा चित्रपट नेहमीच्या मनोरंजक चित्रपटांसारखा नाही. तो तुम्हाला मन शांतवणारा विरंगुळा देत नाही, तुमचे दुःख विसरायला लावणारी समाधी मिळवून देत नाही आणि कोणतीही खोटी आशा दाखवत नाही. 

The Voice of Hind Rajab poster

हा चित्रपट तुम्हाला अशा भीषण वास्तवाचा सामना करायला लावतो, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करूच शकत नाही. पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी केवळ काल्पनिक नसून, त्यामागे खऱ्या, जिवंत हाडामांसाच्या लोकांचा, त्यांच्या रक्ताचा, त्यांच्या मृत्यूचा संदर्भ सतत अस्वस्थ करून सोडतो. एका निष्पाप मुलीचा अखेरपर्यंत जगण्यासाठी चाललेला आर्त संघर्ष तुमच्या मनावर कायमचे चरे, खडी, व्रण उमटवतो. गाझामधील पाच वर्षांच्या चिमुकल्या हिंद रजबच्या मृत्यूची केवळ एक घटना म्हणून नोंद न करता तिचा आर्त आवाज थेट प्रेक्षकांच्या अंतःकरणात उमटवून त्यांना हादरवून सोडणारा हा सिनेमा त्यामुळेच निराळा आहे. 

जानेवारी २०२४ ची ती काळरात्र...पाच वर्षांची चिमुकली निष्पाप हिंद रजब तिच्या काका, काकू आणि पाच चुलत भावंडांसह कारमधून गाझा शहरातून पळून सुरक्षित ठिकाणी जात होती. तेल अल-हवा भागात असताना अचानक त्यांच्या कारवर इस्रायली सैन्याच्या 'मर्कावा' टँकमधून जोरदार गोळीबार करण्यात आला. या पहिल्याच जबरदस्त हल्ल्यात कारमधील ६ जण जागीच ठार झाले. केवळ हिंद रजब आणि तिची १५ वर्षांची चुलत बहीण 'लायन हमदा' जिवंत उरल्या होत्या. लायन हमदा जेव्हा फोनवरून रेड क्रेसेंट सोसायटीशी बोलत मदतीची याचना करत होती, तेव्हाच टँकमधून पुन्हा गोळीबार झाला. फॉरेन्सिक तपासानुसार, अवघ्या ६ सेकंदांत ६४ गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यात लायनचा आवाजही कायमचा बंद झाला. 

कारमध्ये आता फक्त ५ वर्षांची हिंद जिवंत होती. तिच्या अवतीभवती तिच्याच कुटुंबातील जिवलगांचे रक्ताळलेले मृतदेह होते. ती प्रचंड घाबरली होती आणि फोनवरून सतत विनवत होती, "मला भीती वाटतेय, प्लीज मला वाचवा, टँक माझ्या अगदी जवळ आला आहे." त्यानंतर घडलेला दुर्दैवी घटनापट दिग्दर्शिकेने सिनेमात प्रभावीपणे मांडला आहे. ही घटना केवळ जागतिक युद्धविषयक बातम्यांतली एक बातमी बनून राहू शकली असती; पण दिग्दर्शिका 'काओथर बेन हानिया' यांनी आपल्या कॅमेऱ्यातून तिला केवळ एक कोरडी बातमी न ठेवता, इतिहासाचा एक जिवंत आणि कधीही न पुसता येणारा दस्तऐवज बनवले आहे. 

चित्रपटाची सर्वात धक्कादायक आणि वादग्रस्त गोष्ट म्हणजे हिंदचा खरा आवाज वापरण्याचा निर्णय. चित्रपटातील डिस्पॅच सेंटर, स्वयंसेवक आणि घटनाक्रम कलाकारांनी साकारले आहेत; पण फोनवर ऐकू येणारा थरथरता, घाबरलेला आवाज खऱ्या हिंद रजबचाच आहे. “माझं सगळं कुटुंब मेलंय”, “अंधार होईल, मला भीती वाटते” तिच्या या वाक्यांमुळे प्रेक्षक आणि पडद्यामधलं अंतर संपतं. मृत्यूच्या सावलीत अडकलेल्या त्या मुलीची भीती, असहायता, तिच्या बाल मनातील गोंधळ, तिचं एकटेपण आणि मदतीसाठी पुन्हा पुन्हा केलेली विनवणी हे सगळं अंगावर येतं. 

आता आपण चित्रपट पाहणारे तटस्थ प्रेक्षक उरत नाही, तर जणू त्या फोनच्या दुसऱ्या टोकाला उभे आहोत अशी भावना निर्माण होते. हिंदचा तो आवाज केवळ एक आवाज उरत नाही; तो मानवी असहाय्यता, युद्धाचा क्रूरपणा आणि जगाच्या सोयीस्कर मौनाचा पुरावा बनतो. 'The Voice of Hind Rajab' हा फक्त एक सिनेमा बघितल्यावर मनाला डागणी बसते. एक कधीही न विसरता येणारी भयाण आठवण तयार होते. आपण कुठल्या काळात जगलो आणि त्या जगात काय भयानक होत होते याची अस्वस्थ जाणीव कायम सोबत करते. 

या चित्रपटाचे संपूर्ण कथानक 'पॅलेस्टाईन रेड क्रेसेंट'च्या डिस्पॅच कार्यालयात घडते. पडद्यावर कुठलीही उघड हिंसा नाही. तिथे आहेत फक्त सतत वाजणारे फोन, नकाशे, कागदी परवानग्या आणि एक अस्वस्थ करणारी प्रतीक्षा. एका निष्पाप मुलीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेला अवघ्या काही मिनिटांचा रस्ता पार करायचा असतो; पण 'सुरक्षित मार्ग' आणि 'प्रशासकीय समन्वयाच्या' नावाखाली तासनतास वाया घालवले जातात. चित्रपट इथे युद्धाइतक्याच क्रूर असणाऱ्या 'प्रशासकीय हिंसेचा' क्रूर काळा चेहरा दाखवून देतो. कधीकधी नियमांच्या आड लपून चाललेली दप्तरदिरंगाई ही शस्त्रांइतकीच थंड धारदार कशी असते याचे दर्शन घडते. 

या चित्रपटाचा राजकीय सूर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक आहे. हा चित्रपट सध्याच्या हिंसेची मुळे पॅलेस्टाईनच्या इस्रायली कब्जामध्ये (Occupation) शोधतो. ७ ऑक्टोबर २०२३ नंतर सुरू झालेल्या हिंसक संघर्षाच्या पलीकडे जाऊन, दशकानुदशकांच्या पारतंत्र्याने पॅलेस्टिनी जनतेचे रोजचे जगणे कसे गुदमरवून टाकले आहे, याचे दाहक वास्तव यात दिसते. 

चित्रपटातील एक स्वयंसेवक हताश होऊन, संतापून विचारतो, “ज्यांनी त्यांना मारलं, त्यांच्याशीच समन्वय कसा साधायचा?” त्यावर दुसरा पॅलेस्टिनी कर्मचारी अत्यंत शांतपणे पण तितक्याच दुःखाने उत्तर देतो, “हेच आपलं वास्तव आहे.” हा हतबल संवाद ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. एका बाजूला निष्पाप लहान मुलांचा जीव घेणारी क्रूर शस्त्रास्त्रे आणि दुसऱ्या बाजूला केवळ कागदी परवानग्यांच्या आशेवर बसलेली हतबल माणसे; या दोन टोकांमधील दरी हा संवाद दाखवून देतो. इथे पीडिताला आपल्या मारेकऱ्याकडे जीवनदानाची भीक मागावी लागते. गेल्या अनेक दशकांपासून इस्रायली दडपशाहीखाली गुदमरणाऱ्या संपूर्ण पॅलेस्टिनी जनतेची अगतिकता आणि वेदना एका झटक्यात समोर येते. प्रेक्षकालाही या व्यवस्थेच्या क्रूरतेचा साक्षीदार बनवून अस्वस्थ करून सोडते. 

चित्रपटाभोवती काही नैतिक प्रश्नही उभे राहतात. खऱ्या मुलीचा मृत्यूपूर्वीचा आवाज वापरणं योग्य आहे का? दुःखाचं सिनेमॅटिक रूपांतर करणं योग्य आहे का ? वगैरे. फ्रेंच समीक्षक जॅक रिव्हेट यांनी एकदा विचारलं होतं की सिनेमा जेव्हा मानवी शोकांतिकेला ‘सुंदर’ बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो नैतिक सीमारेषा ओलांडतो का? ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ हा प्रश्न पुन्हा समोर आणतो. 

पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट आवश्यक वाटतो. आजच्या जगात युद्ध, मृत्यू आणि विध्वंस हे जणू केवळ कोरडे आकडे बनून गेले आहेत. बातम्यांतून सतत दिसणाऱ्या रक्तपातामुळे संवेदना बोथट झाल्या आहेत. अशा वेळी हिंदचा आवाज आपल्याला या कोलाहलात जरा थांबायला, विचार करायला भाग पाडतो. आपण फक्त प्रेक्षक आहोत का? की या वास्तवाशी आपला काही नैतिक संबंध आहे? माणूस म्हणून, या अफाट मानवी संस्कृतीचा एक भाग म्हणून काही देणे घेणे आहे? हिंदच्या जागी माझी मुलगी असती तर? हिंदच्या मायभूमीऐवजी माझी भूमी असती तर? 

'द व्हॉईस ऑफ हिंद रजब’ हा केवळ एक सिनेमा नाही, तर मानवतेच्या अंगावरची एक भळभळती जखम आहे. हा चित्रपट तुम्हाला कोणतीही तयार उत्तरं देत नाही. उलट तुमच्या मनात कधीही स्वस्थ न बसू देणारे प्रश्न सोडून जातो. आणि कदाचित एका महान कलाकृतीची खूण हीच असते. ती तुम्हाला आतून पूर्णपणे बदलून टाकते, मग तुम्ही त्यासाठी तयार असा किंवा नसा. 

चित्रपटाचा ट्रेलर : 

 

सई केसकर Fri, 05/06/2026 - 05:42

कालच हा सिनेमा आता भारतात मोठ्या पडद्यावर येणार आहे असं पेपरमध्ये वाचलं. त्यामुळे नक्की बघणार.
बाकी या युद्धावर Don't look Left नावाचं एक पुस्तक वाचनात आलं. आतेफ अबू सैफ या पत्रकार आणि एकेकाळी पालिस्तिनियन मंत्रिमंडळात असलेल्या लेखकाने ते लिहिलं आहे.
युद्ध काय असतं आणि ते हळूहळू एखाद्या देशाचा किंवा संस्कृतीचा गळा कसा आवळत जातं त्याचं फार भीषण वर्णन या पुस्तकात आहे. पाव संपतील म्हणून घरातल्या २-३ मुलांना वेगवेगळ्या दुकानांच्या रांगेत उभं करून आपणही एका रांगेत उभं राहायचं. आणि मग लक्षात येतं की आपलं मूल ज्या रांगेत उभं होतं त्यावर बॉम्ब पडला आहे.
एखाद्या राष्ट्रात जन्माला येणं हेच मृत्यूचं कारण असावं हे किती दुर्दैवी आहे.

हारुन शेख Sun, 07/06/2026 - 19:04

In reply to by सई केसकर

खरंय. युद्ध म्हणजे फक्त बॉम्बस्फोट, गोळ्या किंवा सीमारेषांवरचे संघर्ष असं वाटतं अनेकांना. युद्ध म्हणजे रोजच्या जगण्याच्या प्रत्येक क्षणात खोलवर शिरलेली भीती.
तुम्ही दिलेलं उदाहरण अंगावर काटा आणणारं आहे. आपलं सामान्य आयुष्य हीच सर्वात मोठी चैनीची गोष्ट आहे असं वाटतं 😢

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 07/06/2026 - 05:47

अनेक प्रश्नांची उत्तरं सरळसोट नसतात. सिनेमा प्रश्नांची उत्तरं देत नाही, तसंच मानवी शोकांतिकेला ‘सुंदर’ बनवण्याचा प्रयत्न नैतिक सीमारेषा ओलांडतो का, याचंही उत्तर सरळसोट नाही. म्हणून ते प्रश्न वारंवार विचारावे लागतात. म्हणूनही समीक्षा आवडली.

'न'वी बाजू Sun, 07/06/2026 - 06:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(समीक्षण उत्तम आहे, परंतु…)

तसंच मानवी शोकांतिकेला ‘सुंदर’ बनवण्याचा प्रयत्न नैतिक सीमारेषा ओलांडतो का

ही भानगड काही समजली नाही.

नैतिक सीमारेषेचे (बोलायचेच झाले, तर) नंतर बोलू. परंतु, मुळात मानवी शोकांतिकेला ‘सुंदर’ कसे बनविता येईल? (Sanitize करता येईल, फार फार तर. किंवा, दुसऱ्या टोकास, ती (पक्षी: मानवी शोकांतिका.) किती हिडीस आहे, ते अत्यंत प्रभावीपणे दर्शविता येईल. किंवा, तिसरी शक्यता, whitewash करता येईल. परंतु, ‘सुंदर’ कशी बनविता येईल बुवा?)

सई केसकर Sun, 07/06/2026 - 07:44

In reply to by 'न'वी बाजू

मी अजून सिनेमा बघितला नाही. पण सुंदर या शब्दाचा माझा अंदाज असा की एरव्ही या मुलीची गोष्ट एखाद्या वर्तमानपत्रात एखादी ओळ म्हणून छापून आली असती. कारण अशा किती मुली आणि त्यांची भावंडं तिथे मरत आहेत त्याला काही गणतीच उरली नाहीये. कदाचित बातम्यांमध्ये हा मृत्यू आलाही नसता. पण तो प्रसंग घेऊन त्यावर एक कलाकृती तयार करणं हे त्याला "सुंदर" करणं असावं.
यातून अनेक प्रश्न निर्माण होतात:
एखाद्या मृत व्यक्तीच्या शेवटच्या धडपडीचे असे रूपांतर करावे का? त्यासाठी त्या मुलीची परवानगी घ्यायला हवी होती का? विचार करून परवानगी देण्याच्या स्थितीत आणि वयात ती होती का?
तिचा खरा आवाज वापरणं योग्य आहे का? आणि शेवटी ही फिल्म लोक तिकीट काढून बघणार.. मग हे कुणी रस्त्यावर एखादा अपघात झाल्यावर त्याचा व्हिडिओ काढून युट्यूबवर टाकतं तसं काहीसं नाही का? किंवा त्याहूनही वाईट, ते सगळं लोक पैसे देऊन बघतात.
पण याच्या विरोधात जो मुद्दा मांडला आहे - धुरंदरसारखे हिंसेचे गौरवीकरण करणारे सिनेमे - जिथे हिंसा बघून लोक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात, त्या पार्श्वभूमीवर अशाच हिंसेत सापडलेल्या एखाद्या लहान मुलीची तडफड, (आपली मुलं आनंदाने शाळेत जात असताना, ३ वेळा व्यवस्थित जेवत असताना) बघणं, हे हिंसेची जी एकच महत्वाची बाजू आहे, ती म्हणजे 'निरपराध लोकांचे बळी' जगाला दाखवता आल्यामुळे योग्य आहे असं मलाही वाटतं.

चिंतातुर जंतू Sun, 07/06/2026 - 09:13

In reply to by 'न'वी बाजू

मुळात मानवी शोकांतिकेला ‘सुंदर’ कसे बनविता येईल?

मी चित्रपट पाहिलेला आहे. तो एखाद्या थ्रिलरसारखा सफाईदार, चकचकीत, आणि खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. त्यातले रेड क्रिसेंटसाठी काम करणाऱ्या लोकांच्या भूमिकेतले अभिनेते अतिशय प्रभावी आहेत. आणि लेखात म्हटल्याप्रमाणे मूळ मुलीचा आवाज वापरल्याने त्याला एक जिवंतपणा येतो. ऐकताना ही मुलगी आता जिवंत नाही ही जाणीव होत राहते. त्याऐवजी अभिनेत्रीचा आवाज वापरल्यामुळे ही जाणीव झाली नसती. आणि हा एकच चित्रपट नाही, तर गाझामधली किंवा वेस्ट बँकमधली पॅलेस्तिनी लोकांची परिस्थिती दाखवणारे अनेक फिक्शन-नॉनफिक्शन सध्या बनताहेत आणि त्यांना पुरस्कारही मिळताहेत. म्हणजे हे 'पॉव्हर्टी पॉर्न'सारखं आहे का? असा मुद्दा असावा.

'न'वी बाजू Sun, 07/06/2026 - 18:55

In reply to by चिंतातुर जंतू

(मी चित्रपट पाहिलेला नाही; पाहणारही नाही. परंतु…)

तो एखाद्या थ्रिलरसारखा सफाईदार, चकचकीत, आणि खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे.

थोडक्यात, मांडणी प्रभावी आहे.

आणि लेखात म्हटल्याप्रमाणे मूळ मुलीचा आवाज वापरल्याने त्याला एक जिवंतपणा येतो. ऐकताना ही मुलगी आता जिवंत नाही ही जाणीव होत राहते. त्याऐवजी अभिनेत्रीचा आवाज वापरल्यामुळे ही जाणीव झाली नसती.

पुन्हा, थोडक्यात: म्हणजे, मांडणी अतिशय प्रभावी आहे.

आणि हा एकच चित्रपट नाही, तर गाझामधली किंवा वेस्ट बँकमधली पॅलेस्तिनी लोकांची परिस्थिती दाखवणारे अनेक फिक्शन-नॉनफिक्शन सध्या बनताहेत आणि त्यांना पुरस्कारही मिळताहेत. म्हणजे हे 'पॉव्हर्टी पॉर्न'सारखं आहे का?

तो एक वेगळा मुद्दा होऊ शकतो. (आणि, कदाचित वैधही असू शकतो.) माझा प्रश्न तो नाही.

माझा प्रश्न असा आहे, की एखाद्या (मूलतः हिडीस) घटनेचे सादरीकरण करणारी कलाकृती ही अतिशय प्रभावी (आणि अनुभूतिदायक) असू शकते, आणि, त्या अनुषंगाने, त्या सादरीकरणाचे, त्या कलाकृतीचे वर्णन (कोठल्याशा निकषाने) कदाचित ‘सुंदर’ असे करता येऊ शकेल, इथवर मान्य करायला मी एक वेळ  (going out on a limb) तयार होऊ शकेन. परंतु, त्यामुळे मूळ घटना ही ‘सुंदर’ कशी होईल (किंवा केली जाईल)? ती हिडीस ती हिडीसच राहणार, नाही काय? (किंबहुना, ती (पक्षी: मूळ घटना) हिडीस आहे, म्हणूनच तिचे सादरीकरण/तिच्यावर बेतलेली कलाकृती ‘सुंदर’ होऊ शकते, नव्हे काय?)

(समांतर उदाहरण घ्यायचे, तर, ताजमहालाचे घेऊ या. मुमताजमहलच्या मृत्यूबद्दल शाहजहानास झालेले दुःख कदाचित genuine असू शकेल — I am willing to grant him that much. त्या निमित्ताने, तिचे स्मारक म्हणून त्याने बांधवून घेतलेला ताजमहाल — हे त्याच्या प्रेमाचे प्रतीक होते, की giant-sized egoचे, याबद्दल कदाचित दुमत असू शकेलही (त्यामुळे प्रस्तुत मुद्द्याच्या दृष्टीने काहीही फरक पडत नाही.), परंतु — सुंदर आहे, हे बहुधा कोणीही अमान्य करणार नाही. (झालेच तर, मुदलातली मुमताजमहलदेखील सुंदर असण्यास प्रत्यवाय नसावा. (त्यानेही प्रस्तुत मुद्द्याच्या दृष्टीने काहीच फरक पडत नाही, म्हणा!)) मात्र, त्यामुळे मुमताजमहलचा मृत्यू हा ‘सुंदर’ कसा काय होऊ शकेल? ‘शाहजहानने ताजमहाल बांधून मुमताजमहलच्या मृत्यूस ‘सुंदर’ बनविले’, या दाव्यास कितपत अर्थ आहे?)

I hope you get my drift… असो चालायचेच.


तळटीपा:

प्रामाणिकपणे, झेलण्याची (माझी) ताकद नाही. शिवाय, जे घडत असल्याबद्दल (मला) अगोदरच कल्पना आहे (आणि, ज्याबद्दल मी काहीही करू शकत नाही), त्याचे सादरीकरण (भले ते कितीही प्रभावी असले, तरीही) (मोठ्या किंवा छोट्या) पडद्यावर जाऊन पाहण्यात (मला) स्वारस्य नाही. वांझोट्या आत्मक्लेशापलीकडे१अ त्यातून (माझ्यापुरते) काही साध्य होते, असे मला वाटत नाही.

१अ (पुन्हा, माझ्यापुरतेच बोलायचे, तर) कदाचित, सादरीकरण पाहून, ‘किती छान! किती प्रभावी!’ वगैरे त्याचे कौतुक१अ१ करून, कदाचित त्या (कौतुका)मार्गे माझीच पाठ थोपटून घेण्याचा added bonus मला मिळविता येईलही.१अ२ परंतु, प्राप्त परिस्थितीत यत्किंचितही बदल अथवा सुधार घडण्याच्या दृष्टीने त्याचा तिळमात्र उपयोग असण्याबद्दल मी साशंक आहे.१अ३

१अ१ हे कौतुक, by itself, यथार्थ (आणि, प्रामाणिक!) असण्यास प्रत्यवाय नाही, परंतु…

१अ२ हे विधान केवळ माझ्यापुरते आहे. चित्रपट पाहणाऱ्या (नि appreciate करणाऱ्या) प्रत्येक प्रेक्षकास ते लागू होईलच, असा माझा दावा अर्थातच नाही. (झालेच तर, असे चित्रपट निर्माण करण्याच्या कलाकारांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात मी खचितच नाही.) 

१अ३ माझ्यासारखी विचारसरणी असणाऱ्या नमुन्यांव्यतिरिक्त, पॅलेस्टिनींबद्दल (कदाचित, ते बहुतकरून ‘मुस्सलमान’१अ३अ (आणि/किंवा ‘एऽरब१अ३ब) असतात, म्हणून. किंवा, कदाचित, उगाच.) आकस असणारी दुसरी एक constituency असते. या गटातील लोक एक तर चित्रपट पाहायला कडमडणार नाहीत, किंवा, चुकून कडमडलेच, तर त्यामुळे त्यांचा आकस तिळमात्र कमी होण्याची शक्यता नाही. (उलट, वाढला तर कदाचित वाढूही शकेल.१अ३क) राहता राहिली गोष्ट परिस्थितीबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या utterly clueless मंडळींची. ही मंडळीसुद्धा चित्रपट पाहतीलच, असे नाही, परंतु, यदाकदाचित चुकून पाहिलाच, आणि जर का त्यातून त्यांचे काही प्रबोधन झालेच, तर ते होवो बापडे! (परंतु, तो या चित्रपटाचा उद्देश असावा, असे वाटत नाही. ही काही डॉक्युमेंटरी नव्हे.)

१अ३अ वास्तविक, हे तितकेसे खरे नाही. (गाझापट्टीत नसतीलही फारसे, कदाचित, परंतु) पॅलेस्टिनी लोकांत (विशेषेकरून वेस्ट बँकच्या बाजूस) ख्रिस्तीही अनेक आहेत. (कितीही म्हटले, तरी येशूची जन्मभूमी ती.) किंबहुना, पॅलेस्टिनी लढ्याच्या सुरुवातीच्या काळात जी विमानअपहरणे होत, त्यांत ख्रिस्ती अपहरणकर्तेही अनेक असत, असे आठवते. (थोडक्यात, मुळात हा धार्मिक लढा कधीही नव्हता. परंतु, तो वेगळा मुद्दा झाला.)

१अ३ब आफ्टर ऑल, ‘एऽरब’-कॅटेगरीतील मंडळी ही एकसमयावच्छेदेकरून ‘decent family man’ अथवा ‘citizen’ असू शकत नाहीत, असे मॅकेनसाहेबांनी त्या व्हिडियोतून (अप्रत्यक्षपणे) सुचविलेलेच आहे…

१अ३क ‘त्या साल्यांना अस्सेच पाहिजे!’ या प्रकारास काय म्हणता येईल? Confirmation bias? (बहुधा नाही; कदाचित काही वेगळी संज्ञा असू शकेल.)

हारुन शेख Sun, 07/06/2026 - 18:59

In reply to by चिंतातुर जंतू

हो. ‘ट्रॉमा पॉर्न’. जागतिक प्रेक्षक, विशेषतः पाश्चात्त्य फिल्म फेस्टिव्हल्समधले प्रेक्षक युद्धग्रस्त किंवा दडपलेल्या समाजांच्या दुःखाकडे अनेकदा एका विशिष्ट सौंदर्यदृष्टीतून पाहतात. दुःख, उद्ध्वस्त चेहरे,दारिद्र्य, मुलांचे आक्रोश, बॉम्बफेक हे सर्व ‘मानवी वेदनेचा अनुभव’ म्हणून विकले जाते. स्लमडॅाग मिलयनेर आठवतो याठिकाणी.
पॅलेस्टीनी लोकांच्या दुःखाला पुरस्कार मिळतात, टाळ्या मिळतात, पण त्याच वेळी वास्तवात राजकीय पातळीवर शून्य फरक पडतो. हे विक्रीस मांडणे, commodify करणे, पॅकेजिंग असा सुंदर चा अर्थ अपेक्षित.

हारुन शेख Sun, 07/06/2026 - 19:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्रपट समीक्षा वगैरे अधिकार मला आहे असं वाटत नाही पण यावर लिहावसं वाटलं खरं.

'न'वी बाजू Sun, 07/06/2026 - 19:19

In reply to by हारुन शेख

जे काही लिहिले आहेत, ते चांगले लिहिले आहेत खरे. (मग त्याला ‘समीक्षण’ म्हणा, वा अन्य काही. (किंवा, काहीही म्हणू नका, वाटले तर.)) असो.

विवेक पटाईत Sun, 07/06/2026 - 19:38

ईशान उपनिषद सांगते की, आपल्या वाट्याला आलेल्या वस्तूंचा कृतज्ञतेने उपभोग घेत, दुसर्‍याच्या वाट्याची इच्छा न धरता, प्रत्येक जीवाला इथे त्याच्या संपूर्ण आयुष्य (मानवाचे 10 0वर्ष) जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. दुसर्‍या शब्दांत तरच जगू शकेल. जर तुमची विचारधारा दुसर्‍याच्या जगण्याचा समर्थन करत नसेल तर , तुम्ही ही शंभर वर्ष जगू शकणार नाही. जो पर्यन्त फिलिस्तिनी लोक हे सत्य आत्मसात करत नाही त्यांची पीडा संपणार नाही. बाकी युद्धात दोन्ही बाजूने निर्दोष लोकच मारले जातात मग ते इजाराईलचे असो किंवा गाजा मध्ये.

विवेक पटाईत Mon, 08/06/2026 - 08:21

In reply to by 'न'वी बाजू

जे सत्य आहे ते तुम्हाला रुचले नाही. धार्मिक ग्रंथ काफीरांना जगण्याचा हक्क स्वीकार करत नाही.यहुदींचा तर मुळीच नाही. इराणी धार्मिक नेत्यांचे या युद्धाच्या वेळचे भाषणे ऐकून घ्या. ( धार्मिक ग्रंथ ही वाचून पहा). प्रत्येक समुदाय दुसऱ्याला काफिर घोषित करून त्यांच्या विरोधात लढत राहणार. हे या गेल्या वर्षापासून १५०० वर्षांपासून जगात सुरू आहे. जोपर्यंत शाश्वत सत्य करून स्वतःचे आत्मनिरीक्षण करणार नाही तोपर्यंत निर्दोष लोकांचा बळी या विचारधारेमुळे जाईल. इराणी नेत्यांनी आतंकी संगठन हिजबुललाचे समर्थन केले नसते आणि आर्थिक मदत केली नसती. तर गाजचा विनाश ही झाला नसता. इराणी नेत्यांनी फिलिस्तीनि लोकांचा वापर इस्राएल विरुद्ध युद्धात केला. इराणचा उद्देश्य संपूर्ण अरब देशांवर अधिपत्य स्थापित करायचा आहे. भविष्यात इराण त्यांच्याकडून कर वसूल करणार ही संभावना जास्त आहे.

अमित.कुलकर्णी Mon, 08/06/2026 - 09:09

In reply to by विवेक पटाईत

प्रत्यक्ष काही करायची जरूर नाही, फक्त "मंशा" आहे असे पुण्यवान लोकांना वाटणेही पुरेसे आहे.
(हा मुद्दा राहिला होता)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/06/2026 - 20:53

In reply to by 'न'वी बाजू

पटाईत काका या प्रश्नाच्या गुंतागुंतीपासून, आणि सामान्य लोकांच्या दुःखापासून इतके दुरावले आहेत आणि सर्वसामान्य मनुष्याला उपलब्ध असणाऱ्या करुणा, सहानुभूती या भावना त्यांना उपलब्ध नाहीत, हे त्यांच्या पहिल्या प्रतिसादामधूनच दिसतंय. त्यावरून त्यांना आणखी हिणवून काय मिळणार?

त्यांना समजत नाही, हे अपेक्षितच आहे. यू टू ब्रूट!

'न'वी बाजू Tue, 09/06/2026 - 01:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे जे तुम्ही लिहिताय, ते त्यांच्या प्रामाणिकपणावरील अतीव विश्वासापोटी, की, Never attribute to malice that which is adequately explained by stupidity (or ignorance) या तत्त्वाच्या अतीव प्रेमापोटी?

(अतिअवांतर: ती banality of evil भानगड काय होती, म्हणे?)

सुधीर Sun, 07/06/2026 - 21:41

माझं चित्रपट पाहणं कमी आहे, त्यामुळे चित्रपट पाहीनच असे नाही. 

एक विरोधाभास मात्र स्पष्टपणे जाणवतो.युके आणि इयु मधल्या तरुण पिढीमध्ये इस्रायलची लष्करी धोरणे आणि विस्तारवादी भूमिका अत्यंत नापसंत आहेत. (YouGov आणि Pew Research सारख्या संस्थांच्या आकडेवारीवरून हे दिसून येते.) ही तरुण पिढी जुन्या पिढीच्या तुलनेत इस्रायलला होणाऱ्या शस्त्रविक्रीला तीव्र विरोध करते, स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याचे समर्थन करते आणि आपल्या सरकारांना जाब विचारते आहे. आणि हा बदलता सांस्कृतिक प्रवाह आजच्या समकालीन साहित्यातही स्पष्टपणे उमटताना दिसतो आहे. सॅली रुनीच्या नॉर्मल पीपल या कादंबरीवर इथे एक धागा होता; नॉर्मल पीपल मध्ये याचा हलकासा उल्लेख असल्याचं मला आठवतंय. इतरही काही साहित्यिक आहेत पण मी त्यांच्या कादंबऱ्या वाचलेल्या नाहीत. नेटवर सर्च केल्यावर त्यांच्याबद्दल माहिती मिळते. त्यांच्या कादंबऱ्या पॅलेस्टाईनवरील ताबा आणि लष्करी कारवायांवर उघडपणे टीका करतात, विस्थापित मुलांच्या वेदनांना वाचा फोडतात.

या वाढत्या पब्लिक ओपिनिअनमुळे एकिकडे स्पेन आणि इटलीसारख्या युरोपीय देशांनी नेतन्याहू आपल्या देशात आल्यास त्यांना अटक करण्यास आपण कायदेशीररीत्या बांधील आहोत, अशी घोषणा केलेली आहे. तर दुसरीकडे याच्या अगदी उलट परिस्थिती भारतात आहे, आणि त्यामागची कारणं वेगळ्याने सांगण्याची गरज नाही.