पेपरफुटीवर कायमचा उतारा: 'ओपन क्वेश्चन बँक' संकल्पना
पार्कात संध्याकाळच्या फेरफटक्यादरम्यान अचानक 'पेपरफुटी'चा विषय निघाला. सध्या NEET ची परीक्षा असो वा सरकारी भरतीचा पेपर, कुठे ना कुठे हे गैरप्रकार घडताना दिसतातच. या समस्येची मूळ कारणे शोधताना आणि त्यावर काही अनोखे, तंत्रज्ञानप्रणीत उपाय विचारताना मांडलेले हे विचार खालीलप्रमाणे आहेत:
सत्ता, संपत्ती आणि लालसेपोटी माणूस नैतिकतेच्या कोणत्याही खालच्या पातळीवर घसरू शकतो, हीच मानवी स्वभावाची एक काळी बाजू आहे. प्रामाणिकपणे पैसा कमवण्यासाठी अपार मेहनत, संयम आणि वेळ द्यावा लागतो. याउलट, अनैतिक आणि चुकीच्या मार्गाने कमी वेळेत, विनासायास अफाट संपत्ती मिळवता येते. याच मोहातून गुन्हेगारी जन्माला येते. अगदी मृत्युदंडाची शिक्षा ठाऊक असूनही लोक काही लाखांच्या सुपारीसाठी कोणाचाही जीव घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत.
मग पेपरफुटीचे क्षेत्र तरी याला अपवाद कसे ठरेल? इथे तर कोचिंग माफिया कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करायला तयार असतात आणि काही उत्सुक उमेदवारही काही लाख रुपये फेकायला सहज तयार होतात. जिथे लाखोंची आणि कोटींची उलाढाल असते, तिथे सुरक्षेच्या कितीही कडक यंत्रणा उभारल्या, तरी माणसाच्या हव्यासामुळे पेपर फुटणे थांबवणे जवळपास अशक्य होऊन बसते.
एक नाविन्यपूर्ण उपाय: प्रश्नांचा उघडा संच (Open Question Bank) : यावर पार्कातील चर्चेदरम्यान एक अत्यंत व्यावहारिक आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेला एक अनोखा उपाय सुचला. "पेपर फुटूच नये असे वाटत असेल, तर संभाव्य प्रश्न आधीच सर्वांना जाहीर करून टाका!"आजच्या डिजिटल युगात हे ऑनलाइन पद्धतीने सहज शक्य आहे. संकल्पना खालीलप्रमाणे असू शकते:
मोठा खुला प्रश्नसंच (Open Question Bank): परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांच्या प्रमाणात आधीच एक मोठा प्रश्नसंच सर्व उमेदवारांसाठी सार्वजनिक (Open) केला जावा. उदाहरणार्थ, जर प्रत्यक्ष परीक्षेत १०० प्रश्न विचारले जाणार असतील, तर १० ते १५ हजार प्रश्नांचा संच खुला केला जाऊ शकतो; आणि जर ५० प्रश्न येणार असतील, तर ५ ते १० हजार प्रश्नांचा संच सार्वजनिक करता येईल. प्रश्नांची एकूण संख्या लक्षात घेऊन ही प्रमाणबद्धता ठरवण्याचे स्वातंत्र्य परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडे असावे.
पारदर्शक आणि यादृच्छिक (Randomized) प्रणाली: परीक्षा ऑनलाइन घेतली जावी. उमेदवारासमोर प्रत्येक प्रश्नासाठी 10-100 असे पर्याय स्क्रीनवर असतील. पर्याय किती हे परीक्षा घेणारी संस्था ठरवेल. त्याने कोणत्याही क्रमांकाचे बटन दाबले की त्या १०,००० प्रश्नांच्या संचातील एक प्रश्न त्याच्या स्क्रीनवर येईल. अशा प्रकारे तो पूर्ण शंभर प्रश्न सोडवेल. यामुळे प्रत्येक उमेदवाराची प्रश्नपत्रिका पूर्णपणे वेगळी आणि यूनिक बनेल.
‘Pass' बटनाची सोय: सामान्यतः परीक्षार्थी कठीण प्रश्न शेवटी सोडवतात. यासाठी प्रत्येक प्रश्नाच्या चार उत्तरांच्या पर्यायांसोबत 'Pass' हे पाचवे बटन असावे. जेणेकरून तो प्रश्न नंतर पुन्हा स्क्रीन वर येईल आणि परिक्षार्थी सोडवू शकेल.
वेळेचे अचूक नियोजन: प्रत्येक प्रश्न उमेदवाराला वाचण्यासाठी १० सेकंद आणि उत्तर देण्यासाठी ३० सेकंद (सध्या बहुतेक येवढाच वेळ दिला जातो). यामुळे संपूर्ण १०० प्रश्नांची परीक्षा नियोजित वेळेत अतिशय सुरळीत पार पडेल.
त्वरित पारदर्शकता आणि ईमेल कॉपी: परीक्षा संपताच उमेदवाराने दिलेली उत्तरे आणि संबंधित प्रश्नांसह संपूर्ण उत्तरपत्रिका त्याला स्क्रीनवर पाहता येईल. मात्र, कोणते उत्तर बरोबर किंवा चूक आहे, हे त्या वेळी दाखवले जाणार नाही आणि मिळालेले गुणही प्रदर्शित केले जाणार नाहीत. परीक्षेतील पारदर्शकता आणि नोंद सुरक्षित ठेवण्यासाठी, उमेदवाराने सोडवलेली ही संपूर्ण उत्तरपत्रिका त्याच्या नोंदणीकृत ई-मेलवर त्याच वेळी आपोआप पाठवली जाईल.
लाखो विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी हजारो संगणकांचा (Computers) बंदोबस्त करणे प्रशासकीयदृष्ट्या कठीण असते. परंतु, या मध्यवर्ती डिजिटल प्रणालीमुळे ही परीक्षा एकाच दिवसाऐवजी महिनाभर टप्प्याटप्प्याने चालवता येऊ शकते. प्रश्न आधीच सार्वजनिक असल्यामुळे "पेपर लीक झाला" या संकल्पनेलाच पूर्णपणे पूर्णविराम मिळेल. परिणामी, कोचिंग माफियांचे रॅकेट उद्ध्वस्त होईल आणि कोणत्याही प्रकारची हेराफेरी किंवा भ्रष्टाचार करणे पूर्णपणे अशक्य होऊन जाईल.
अगदी योग्य उपाय आहे
ही पद्धत अगदी योग्य ठरेलं. ह्याचे दोन फायदे आहेत एक तर प्रश्नपत्रिका फोडून विकणे हा उद्योग पूर्ण बंद होईल.
कोणते प्रश्न येणार आहेत हे अगदी स्पष्ट झाल्या मुळे pvt classes ची मकत्तेदारी संपून जाईल.
प्रत्येक क समोर एका वेळेस एक च प्रश्न तो सोडवला की दुसरा, आणि प्रत्येक ला प्रश्न वेगळे, पुढचा प्रश्न कोणता असेल हे ai ठरवेल अगदी ऑटोमॅटिक.
पण ही पद्धत स्वीकारली जाणार नाही. कारण.
पैसा. लॉबी.
याहीपेक्षा आणखी चांगली पद्धत सुचवतो.
१.एक/दोन/पाच/ दहा गुणांचे हजारो प्रश्न शिक्षकांकडून मिळवा.
२.विद्यार्थ्याने खोलीत प्रवेश करण्याअगोदर एका संगणकातून यांतून ठरावीक निवडायचे ( त्यांची बेरीज शंभर होईल तसेच दहाचा एक, पाचाचे चार, दोनाचे वीस, एकाचे तीस वगैरे). निवडतांना तिथे फक्त क्रमांक दिसतील. ओके केल्यावर निवडलेल्या क्रमांकाचे प्रश्न छापून प्रश्नपत्रिका मिळेल ती घेऊन आत वर्गात बसून उत्तरे लिहायची.
३. प्रत्येकाला वेगळे प्रश्न मिळतील.
४. त्या हजारो प्रश्नांचा स्टॉक जरी फुटला तरी इतक्या प्रश्नांची उत्तरे तयार करणे सामान्यांना अशक्य आहे.
संकल्पना चांगली आहे
एआय चा वापर करून परिक्षा पद्धती मध्ये सुधारणा केली पाहिजे हे खरे. ओपन क्वेश्चन बॅंक ही उत्तम संकल्पना आहे. प्रोफेशनल सर्टिफिकेशन च्या एक्झाम होतात त्यातही अशा डमी क्वेश्चन बॅंक वर मॉक टेस्ट होतात, शिवाय पासिंग पर्सेंटेज जास्त असल्याने सरसकट सगळेच सर्टिफिकेशनच्या नादी लागत नाहीत. गरज असेल त्यानुसार लोक सर्टिफिकेट मिळवतात.
मूळ दोष हा केंद्रीय परिक्षा प्रणालीत आहे. ठरावीक कडबोळं लाखो विद्यार्थ्यांची चाळण परिक्षा घेणे ह्यात आहे. एनटीए मॉडेल उत्कृष्ट आहे पण इम्प्लीमेंटेशन गंडलेले आहे. अर्थात शिक्षण माफिया लॉबी. ह्यांना सरकार कोणाचेही असो काहीही फरक पडत नाही. आपली दुकानदारी बिनबोभाट चालू राहील याची तजवीज केलेली असते कायमस्वरूपी. त्यामुळे सत्तेत कोणीही आले तरी काय घंटा होणार नाही हा विश्वास असतो. याउलट त्या त्या संस्था शाळा कॉलेजात त्यांच्या त्यांनी स्वतंत्र चाळण परीक्षा घेतल्या तरी त्यांची मक्तेदारी वाढलेली असते. विशेषतः मेडिकल कॉलेजमध्ये ही लॉबी मजबूत आहे. इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या वाढवून शिक्षणक्षेत्राचे मातेरे केले आहे.
गेल्या दहा बारा वर्षांत मेडिकलच्या सीट्स वाढवल्याने खाजगी क्लासेस वाल्यांना, दहीवीनंतर कौन्सिलिंग करणाऱ्या तथाकथित तज्ञांना आणि भुरट्या संस्था चालकांना मोठा बाजार मिळाला आहे. त्यानंतर गेल्या दोन अडीच दशकांपासून शिक्षणासाठी वाट्टेल तेवढे पैसे खर्च करण्याची ऐपत असणारे मजबूरी का नाम गांधी म्हणत पैसा उभा करून आपापल्या पाल्यांचे भवितव्य घडवण्यासाठी धडपडणारे आयते सावज तयार झाले आहेत. अशी दुभती गाय असेल तर कोण सोडेल? सत्तेत असलेल्या आणि नसलेल्या लोकांना हीच दूभती गाय पाहिजे आहे. फक्त लाभार्थी आम्ही पाहीजे हा अट्टाहास.
तसेच मेडिकल असो वा इंजिनिअरिंग कॉलेजेस, शाळा आणि विद्यापीठे ही कत्तलखाना झालेली आहेत विद्यार्थी आणि पालक ही गुरेढोरे! केंद्रीकरण करून समस्या सुटली नाही की विकेंद्रीकरण करून सुटलेली नव्हती.
यावर मला तरी एकच उपाय सुचतो तो म्हणजे कसल्याच चाळण परिक्षा ठेवू नका. कोणाला काय शिकायचेय ते शिका डिग्री मिळवायची असेल तर एक परिक्षा पास व्हा आणि डिग्री मिळवा. उदाहरणार्थ गेट ची परिक्षा पास झाली तरच इंजिनिअरिंग पूर्ण झाले असे गृहीत धरले जाईल आणि डिग्री प्रदान केली जाईल. बाकीच्या परीक्षा नेट सेट सीएसआयआर नेट आहेत आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स वाल्यांना. बाहेरून मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षण घेऊन भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कोणतीतरी मेडिकल परीक्षा घेतली जाते तशीच परिक्षा डॉक्टर पदवी मिळवण्यासाठी घेतली जावी त्या त्या ब्रॅंच मध्ये. परिक्षा पास तर पदवी प्रदान.
याचा एक फायदा म्हणजे शिक्षण घेताना चार पाच वर्ष घालवल्यावर जे खरेखुरे इच्छुक आहेत डिग्री मिळवण्यासाठी तेच परिक्षा गंभीरपणे देतील ज्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी कमी प्रमाणात येतील. एन्ट्रन्स एक्झामला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखात गेली की घोटाळेबाज लॉबी ॲक्टीव्हेट होते. जेवढी संख्या जास्त तेवढी बाजारपेठेत उलाढाल त्यामुळेच पैसा ओतला जातो नंर वसूल केला जातो व्यवस्थेला जेरीस आणून.
आधी विद्यार्थ्यांना ज्ञान घेऊन द्या नंतर डिग्री साठी मनात असेल तरच परीक्षार्थी होतील गंभीरपणे. एन्ट्री कंट्रोल्ड ॲप्रोच पेक्षा एक्झिट कंट्रोल ॲप्रोच महत्वाचा. उदाहरणार्थ प्रोफेशनल डिग्री सीए ची परिक्षा. ना कसले आरक्षण ना कसा घोटाळा. एकच संस्था कैकदशके आळून पिळून गाळून सीए तयार करत आहेत क्वालीटी मध्ये.
सध्या कॉलेज मध्ये एकदा का विद्यार्थी रूपी बकरा मिळाला की काहीही करून त्याला डिग्री मिळेल असा पद्धतशीर पॅटर्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळा कॉलेजच्या प्रतिष्ठेसाठी पोरं नापास झाली नाही पाहिजे डायरेक्ट डॉक्टर इंजिनिअर बनून बाहेर पडली पाहिजे हा बनावट कारखाना बंद होईल. शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या पण तयार आहेत कारण आताच्या परिस्थितीत डिग्री धारक लोकांवर बराच ट्रेनिंग वर खर्च केला जातो. डिग्री घेऊन पण प्रोफेशनल शिक्षण घेतलं जातं मग शिक्षणाची गरज फक्त मजूर बाजारत हमाली बिल्ला मिळवण्यासाठी आहे.
या जंजाळात खरी सुखी पिढी म्हणजे पस्तीस चाळीस पन्नास टक्के मिळवणारी. ना इंजिनिअरिंग ना मेडिकल डायरेक्ट आयटीआय मध्ये स्कील बेस्ड एज्युकेशन घेऊन वीशी बावीशीत औद्योगिकीकरणाला चालना देणारी पिढी. कॉर्पोरेटीकरण सुरू झाले आणि इंजिनिअरिंग चे गाढवं तयार करणारे उद्योग वाढले.
बाकी चाय पे चर्चा परिक्षा पे चर्चा चालू राहतील निरंतर! इव्हेंट छाप संस्कृती आहे आपली. राहीला प्रश्न आंदोलन मोर्चे आणि निषेधार्थ उपोषण वगैरेंचा. त्याने समस्या प्रश्न सूटत नाहीत की सोल्यूशन रिझोल्यूशन मिळत नाहीत. यातून नवीन दुकानदारी नवीन गिऱ्हाइकं तयार होतात.
विकसित भारत लवकरच सचिरायू होवो!
मूळ दोष हा केंद्रीय परिक्षा…
मूळ दोष हा केंद्रीय परिक्षा प्रणालीत आहे.
असहमत.
मूळ दोष अत्यंत रटाळ अशा शिक्षण प्रणालीत आहे. याचे उत्तम उदा० एखाद्या विषयावरील युट्यूब वरील शैक्षणिक व्हीडीओ पहा. परदेशातील शिक्षक अत्यंत कल्पक रितीने, वेगवेगळी साधने वापरून ॲनिमेशन, व्हिज्युअलायझेशन तंत्राचा वापर करून शैक्षणिक साहित्य निर्माण करतात. अगदी आय० आय० टी० मधले प्राध्यापक पण अत्यंत रटाळपणे व्याख्याने देतात किंवा लिहून आणलेल्या नोट्स वाचून दाखवतात. प्रत्येक विज्ञार्थ्याची ज्ञानसंपादन करण्याची पद्धत एकच नसते, याचे भान भारतीय शिक्षण पद्धतीत ठेवले जात नाही.
तसेच सध्याची भारतीय शिक्षणपद्धती विज्ञार्थ्याला सतत ताणाखाली ठेवण्यावर भर देते, ज्यामुळे मुलांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेचा पुरता चुत्थडा होतो.
एनटीए मॉडेल उत्कृष्ट आहे पण इम्प्लीमेंटेशन गंडलेले आहे.
रटाळपणा हा स्थायीभाव आहे
मी पण एनपीटीइएल वरचे रटाळ आय आय टी चे लेक्चर ऐकलेत पाहिलेत
पण नंतर नंतर स्लो टेम्पो आळसावणे वाटतो
काही लेक्चर्स खूपच मोनोटोनस आहेत
युट्यूबवर पुष्कळ उत्तम माहिती देणारे संकल्पना समजून सांगणारे व्हिडिओ लेक्चर आहेत. एनिमेशन, व्हिज्युलायझेन टूल्स आणि एआय चा वापर करून बरीच मंडळी प्रोफेशनल कंटेट तयार करतात. अस्सल आणि उत्कृष्ट दर्जाचा कंटेट. स्लोप किंवा कचरा नाही.
बरीचशी प्रोफेशनल मंडळी एज्युकेशनल इस्ट्रक्टर डिझाईनर हायर करतात आणि पेड कोर्सेस चालवतात. अशा ठिकाणी पैसा मोजून जे शिकता येते ते खरेच “पैसा वसूल” गटात मोडते. नाहीतर बरेचदा अक्कल खाती जमा म्हणून सोडायला लागते.
या प्रश्नमंजुषेचे सतत…
या प्रश्नमंजुषेचे सतत नूतनीकरण केले तर या कल्पनेत तथ्य आहे.