Skip to main content

जे न देखे रवि

प्रतिभेची प्रत्यंचा चढवून
शास्त्रांच्या शिव-धनुवरती
व्योमी सोडिला उपग्रह त्याच्या
नशिबी कक्षेतच फिरती

तुटती उल्का म्हणे उपग्रहा,
"वेग, दीप्ती माझी सरते-
-क्षणार्धात,पण त्याचवेळी मी
दिशा तमोमय उजळविते

नशिबी जरी कक्षेतच फिरणे
असे तुझ्या, पण दुःख नको,
कक्षेची बंधने बरी पण
विनाशकारी मुक्ती नको"

फिरता फिरता उपग्रह वदला,
"पूर्वसुरी (#) माझा एक
सूर्यमालिके पल्याड गेला
प्रकाशदिन (§) लांघुनी एक

जरी क्षुद्र अन् अनाम येथे
भ्रमणबद्ध मी कक्षेत
पूर्वज (#) माझा विमुक्त, करितो
गुरुत्व पाशांवर मात"

~~~~~~~~~~~~~
(#): Voyager - 1

(§): 1 Light-day ≃ 26 billion km

'न'वी बाजू Fri, 27/11/2026 - 04:13

व्योमी सोडिला उपग्रह त्याच्या
नशिबी कक्षेतच फिरती

तुटती उल्का म्हणे उपग्रहा,
"वेग, दीप्ती माझी सरते-
-क्षणार्धात,पण त्याचवेळी मी
दिशा तमोमय उजळविते

काय राव, १९७०चे दशक इतक्यातच विसरलात काय? त्या दशकात सोडलेल्या एका “उपग्रहा”च्या नशिबीसुद्धा अशीच दीर्घकाळ कक्षेत फिरती अपेक्षित होती. परंतु, सरतेशेवटी, त्याच “तुटत्या” स्कायलॅबने “दिशा तमोमय” उजळविताना काय तारे दाखविले होते, ते विसरलात?

कायकाय छापून यायचे त्या वेळेस पेपरांतून! कोसळत्या स्कायलॅबच्या जळत्या अवशेषांकडे नागड्या डोळ्यांनी पाहाल, तर रंगांधळेपण येईल, नि काय काय. शिवाय, जळती स्कायलॅब टाळक्यावर येऊन आदळेल, ही भीती तर कायम! (शेवटी ऑस्ट्रेलियाच्या एका तुलनेने निर्मनुष्य भागात कोसळली, म्हणतात. चालायचेच.)