Skip to main content

इंडिया अगेन्स्ट करेक्शन : २०१४ च्या निवडणुकीसाठी २५ कलमी जाहीरनामा

मी नानांचा फॅन आहे. मी त्यांना अगदी मनसे काका मानतो ते मला पुतण्या मानतात कि नाही कुणास ठाऊक ! पण मी त्यांचा हनुमान आणि ते माझे नाना आहेत. नानांनी विविध प्रश्नांवर मतं मांडून शांत बसण्याच्या प्रवृत्तीवर वस्तरा चालवल्याने माझं मन छिन्नविछिन्न झालं आहे. बास झालं आता !!

नानांनी गेल्या वर्षी उपोषण केलं त्या वेळी नाना बिछान्यात आणि मी टीव्हीवर असायचो. टीव्हीवर सातत्याने बोलायचं असल्याने उर्जेच्या पुरवठ्यासाठी नानांची रसोई उपोषणस्थळाच्या मागेच सुरू केली होती. बाकि नानांनी कसा देश हलवून सोडला हे जसं देशाने टिव्हीवरून पाहीलं तसंच मी ही रसोईत बसून मुर्गमुसल्लम चापताना पाहीलं. पण पुढं काय ? पुढं काहीच झालं नाही.

मध्यंतरी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. नाना आमच्यावर नाराज झाले. आता पहिल्यासारखे लोक जमत नाहीत. २४ तास मेडीया कव्हरेज मिळूनही पुढच्या आंदोलनाचा फज्जा उडाला. सरकार मधे (नानांसारखेच) बेरकी लोक असतील तर चर्चेला कुणाला पाठवणारच नाहीत. उपोषण कितीही दिवस चालू द्या.. दोन महीने जरी उपोषण चाललं तरी प्रॉब्लेम नाही... पण लोकांना संशय येईल ही भीती वाटते. म्हणून उपोषणाला बसणं बिसणं आता मान्य होत नाही. !!

आता कृती हवी. नुसते लिहून काही होणार नाही. ब-याच गोष्टी बदलायच्या आहेत. काही तरी केलं पाहीजे या विचाराने झोप उडाली. सगळा साधकबाधक विचार केल्यावर आपलंही पोट भरलं पाहीजे आणि लोकांचे प्रश्नही मार्गी लागले पाहीजेत असा एकच मार्ग समोर आला तो म्हणजे निवडणुकीचा...!

अनेक वर्षं माबोवर काढल्याने सामाजिक प्रश्नांची सखोल जाणीव आहेच.

सिस्टीम बदलायची असेल तर सिस्टीमचा भाग व्हा असं कुठल्यातरी मॅनेजमेंट गुरूने फेकलेलं दिलखेचक वाक्यं मनापासून पटलं. सिस्टीमचा भाग व्हायचं तर पवार ताब्यात हवेत.. माफ करा.. पॉवर ताब्यात घ्यायला हवी. म्हणूनच निवडणुकीला उभं रहायचं ठरवलं.

पण मनात हा विचार येतो न येतो तोच नानांनी राडेगण बुद्धी तून फतवा काढला कि माझा फोटु, नाव वापरायचं नाही. माझ्याच नावाची टोपी मलाच घालायची नाही. पण नानांची दुखरी नस ठाऊक असल्याने नाना नाराज झाले कि मी दोन कोटीचं आश्वासन दिलं. पुन्हा एक डाव माफ करा.. दोन खोटीच आश्वासनं दिली. नानांची नाराजी लगेच दूर पळाली आणि ते म्हणले तू टिब्बल च्या विरोधात लढ, मी पाठीशी आहे !

मग नानांच्या साक्षीने हळूच एक कागद बाहेर काढला. नाना म्हणलं " काय आहे हे? "
मी म्हणलं "जाहीरनामा !"
नाना म्हणले , "कसला ?"
मी म्हणलं " लोकसभेच्या निवडणुकीचा "
नाना चमकलं, म्हणलं " सरकार पडलं ?"
मी म्हणलं " तुमाला नसतं का कळलं ? अहो नाना, २०१४ च्या निवडणुकीचा जाहीरनामा आहे हा. "
नाना बोळक्याने हसले. आशिर्वाद दिला आणि टीव्हीच्या लोकांकडे निघून गेले. नानांमधे टीव्हीवाले टाईमपास करू लागल्याचं पाहून मी निमिष सौसौदिया कडं पाहीलं निमिषनं लगेच दोन चार फोन केले कि मेडीयाचे लोक नानांना वा-यावर सोडून माझ्याकडं आले.

२०१४ च्या माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्याबद्दल सौसौदियाने चांगलीच हवा केली होती. तरुण टीव्ही पत्रकारांना दम निघत नव्हता. मग आमच्यातर्फे जनरल बी के सिंग यांनी जाहीरनामा जाहीर केला. उद्या पेप्रात छापून येईलच पण मित्रहो, अक्षरेकरांना विसरून कसं चालेल ? नाहीच विसरणार ! आमचा हा जाहीरनामा गेल्या वर्षीच तयार झालाय. ऐसीअक्षरेसाठी खास इथेही जाहीर करीत आहोत. आपल्या बहुमोल सल्ल्यांची आतुरतेने वाट पाहत आहे.

जाहीरनामा : ऐसी अक्षरेच्या प्रिय वाचकांसाठी !

१. निवडून आल्यानंतर पहिल्या तासातच जनलोकपाल मंजूर करणार. रामलीला मैदानावर लोकपाल कार्यालय थाटणार.
२. जनलोकपालवर लक्ष ठेवण्यासाठी गणलोकपाल आणणार (नानांना उपोषणाची संधी देणार नाही)
३. गणलोकपालवर लक्ष ठेवण्यासाठी (कि)रणलोकपाल (बेदींची) आणणार
४. किरणलोकपालवर लक्ष ठेवण्यासाठी (भू)षण लोकपाल आणणार ..
५. संसद बरखास्त करून भारत देश विश्वस्त संस्थेकडे सोपवणार. ही विश्वस्त संस्था "चांगल्या" लोकांची असेल. उदा इंडिया अगेन्स्ट करेक्शन. विश्वस्तांवर विश्वास असल्याने राज्यघटनेची गरज राहणार नाही. विश्वस्त ही कायमस्वरुपी संस्था असेल आणि तिचे अध्यक्ष तहहयात या पदावर असतील. विश्वस्तांचे नाव अथवा आडनाव क वरून सुरू व्हावे ही महत्वाची अट असेल.
६. लोकपालामधेच बिनीचे मोहरे अडकल्याने विश्वस्त संस्थेतर्फे सरकार चालवायला देणार. सरकार चालवण्यासाठी दर पाच वर्षांनी जागतिक निविदा काढणार. यामुळे निवडणुकीवरचा खर्च बंद होऊन उलटपक्षी महसूल मिळेल.
७. पेट्रोलचे भाव दोन रुपये लिटर करणार
८. जीवनावश्यक वस्तू महिन्याला ३८ रुपयात देणार
९. श्रीमंतांची संपत्ती जप्त करून तिचं देशप्रेमी नागरिकांमधे (उदा. यमक गांधी ) समान वाटप करणार.
१०. प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी देणार. यासाठी ज्या कुटुंबात एका पेक्षा जास्त सदस्य नोकरीत आहेत त्यांची सेवा बरखास्त करणार.
११. भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येची कामे त्वरीत व्हावीत यासाठी चिरीमिरी कायदेशीर करणार.
१२. पोलीस खात्यामुळे भ्रष्टाचार वाढत असल्याने हे खाते बंद करण्यात येईल. संपत्तीचे समान वाटप केल्याने या खात्याची गरज राहणारच नाही.
१३. म. नाना पगारेंचा (उपोषणकालीन) स्टीलच्या ग्लासातून पाणी पितानाचा फोटो नवे राष्ट्रपिता म्हणून नोटांवर छापण्यात येईल.
१४. सांस्कृतिक कार्यक्रम राबवणार. ओढणीनृत्यास चालना देण्यात येणार.
१६. शासनातर्फे स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाईल. त्यासाठी घर तिथे असीम आनंद शौचालयाची योजना राबवली जाईल.
१७. ग्रामसभा /खापपंचायतीं/नाना/लोकपाल आदींचे आदेश सर्वोच्च करणार. न्यायपालिका बरखास्त करणार.
१८. राष्ट्रपती भवन राडेगण बुद्धीला हलवणार. मंत्र्यांना मोठी घरे देण्यात येणार नाहीत. आमचे देशप्रेमी वास्तुविशारद नसीम त्रिवेदी यांच्या गाजलेल्या रचनेप्रमाणे आकार असणारी घरे मंत्र्यांना राहण्यासाठी देणार.
१९. प्रत्येक गावात मंदिर बांधणार. काचेच्या ग्लासातून दारु पिऊन येणा-यास मंदिराच्या खांबाला बांधून हाणणार.
२०. लांडगे आणि भटकी कुत्री यांसारख्या महत्वाच्या प्राण्यांची राष्ट्रीय स्तरावर विशेष देखभाल करण्यात येईल. त्यासाठीच नाना पगारेंच्या विरुद्ध बाजूला लांडग्यांचा वॉटरमार्क छापण्यात येईल. दिल्लीतल्या एका विशेष वास्तूत देशभरातली भ.कु. आणून ठेवण्यात येतील. नसीमजींच्या इच्छेप्रमाणे याच वास्तूत मध्यभागी नानांचा छोटासा पुतळा बसवण्यात येईल.
२१. नामदेव बाबा यांना राष्ट्रसंत म्हणून घोषीत करणार.
२२. मेडीकल कॉलेजेस बंद करणार. अ‍ॅलोपॅथीवर बंदी आणणार. संत्रांजली योगपीठातर्फे गाव तेथे योगविद्या या उपक्रमास आर्थिक मदत करणार.
२३. भारतरत्नाऐवजी मेगॅसेसे पुरस्कारास सर्वोच्च पुरस्कार म्हणून मान्यता देण्यात येणार. महत्वाच्या ठिकाणी नेमणुकीसाठी मेगॅसेसे अनिवार्य करणार.
२४. दुस-या स्वातंत्र्ययुद्धाचे धडे इतिहासाच्या पुस्तकात घालणार.
२५. रामलीला संग्रामावर आधारीत "नाना बाबा आणि चाळीत मोर" या माहीतीपटाची निर्मिती करणार.

----------------------------------------------------------------------------------------------------------------
फॉण्टसाईज>६
*** लोकांनी खरंच निवडून दिल्यास परिणामांना आम्ही जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. मागाहून तक्रारी चालणार नाहीत.

- Kiran..

नितिन थत्ते Thu, 10/10/2013 - 10:49

छान सटायर आहे. पण दोन वर्षं लेट आलंय का?

तिरशिंगराव Thu, 10/10/2013 - 11:12

त्यांचे विचार,मार्ग वगैरे चुकीचे असतील, त्यावर टीका करता येईल. पण ते अप्रामाणिक आहेत आणि उपोषणाच्या वेळी गुपचुप खात होते हा आरोप अगदी मजेत सुद्धा सहन होणार नाही इतका पातळी सोडून आहे.

अनिल सोनवणे Thu, 10/10/2013 - 11:33

In reply to by तिरशिंगराव

मौजमज्जा म्हणून सोडून द्यायचं. सीरीयस नाही व्हायचं. बाकि पातळी सोडून असीम त्रिवेदीने केलेले विनोद आवडले होतेच कि सर्वांना. देशाच्या प्रधानमंत्र्यावर होणारे विनोद पातळीस धरून आहेत कि काय ? विनोदाचा भाग हाच कि काल अण्णांच्या आंदोलनात केजरीवालांच्या पाठीशी असनारे सोशल मीडियात असणारे सगळेच आज मोदींच्या मागे आहेत. त्यामुळं वेगळं विनोदी लिखाण करण्याची गरजच नाही. आम्ही केला तर तो विनोद आणि आमच्यावर केला तर श्रद्धास्थानास ठेच अशांची गंमत बघणे हाच एक टीपी आहे मस्त.

सुनील Thu, 10/10/2013 - 14:08

In reply to by अनिल सोनवणे

देशाच्या प्रधानमंत्र्यावर होणारे विनोद पातळीस धरून आहेत कि काय ?

असं नाही हो!

गेल्या ६५ वर्षांत पातळी थोडी उंचावलेलीच असं वाट्टं!!

;)

'न'वी बाजू Thu, 10/10/2013 - 15:49

In reply to by सुनील

गेल्या ६५ वर्षांत पातळी थोडी उंचावलेलीच असं वाट्टं!!

पासष्ट वर्षे म्हणजे, अठ्ठेचाळीसपासून काय हो? (नाही म्हणजे, हिशेब बरोबर जुळतो, म्हणून विचारले.)

("तीस-एक मार"खान"राम"? ;))

पूर्ण विजार Thu, 10/10/2013 - 16:06

In reply to by 'न'वी बाजू

बाजारात तुरी खेळताय का ? कुठाय हो तो पातळी (कि पातळ) सोडलेला आरोप ? कदाचित नाना आणि वाकड्या तोंडाचे गांधी यात कन्फ्युज झालेले दिसतात मान्यवर !

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 10/10/2013 - 17:51

मस्त. आपली सामाजिक प्रश्नांची जाणीव खरोखरच तारीफे-काबील (का काबीले-तारीफ) आहे. कबील्यात, आपलं, कंपूत स्वागत.

पूर्ण विजार Thu, 10/10/2013 - 22:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आयला ! सामाजिक प्रश्नांची जाणीव = मौजमजा ! मज्जाच येणार मग इथं !! आलोच. स्वागतासाठी धन्यवाद ;)

तिरशिंगराव Thu, 10/10/2013 - 18:57

कदाचित नाना आणि वाकड्या तोंडाचे गांधी यात कन्फ्युज झालेले दिसतात मान्यवर !

धन्यवाद. खरा आयडी दाखवल्याबद्दल.

पूर्ण विजार Thu, 10/10/2013 - 20:03

In reply to by तिरशिंगराव

हॅ हॅ हॅ ! कसचं कसचं. कशाला आमाले क्रेडीट देऊन राह्यलाय. आमच्यासारख्या कमी शिकलेल्यांना तुमच्यासारख्या मोठ्या माणसांकडूनच शिकाय भेटतं. असंच तुमच्यावानी कोनतरी मोट्ठं मानूस म्नहलं व्हतं बगा तसं. आमाला काय सुचनार वं असलं बोलाय, आमी काय तुमी बोलला तरी टाळ्या वाजवनार, त्ये बोललं तरी टाळ्या वाजवनार. पन तेच आमी बोललो कि लैच गहजब काहुन होउन राहीलाय ?