परसूंकीच बात है...
"क्यों मियां, कब देते टीवी? भोत दिनां हो गये ना..."
"परसूं आजाव साब, तबतलक पक्का रेडी करके रैता."
"ऐसा घुमाव नक्को मियां, ये तुम्हारे परसूं का एक कौनसातोबी तारीख बताव"
"पक्का परसूं, साब. परेशान नै हुनाजी"
-किंवा -
"ये परसूंकीच बात है, हिंया सामनेईच ठैरा था जॉर्ज बुश!"
"कुछ तो बी बोलते क्या? उन्हें आके भोत सालां हो गये ना"
"हौला है क्या रे? परसूं बोलेतो अपना हैदराबाद का परसूं रे. नया आया क्यारे हैदराबादमें?"
जुन्या हैदराबादेत 'परसूं' या शब्दाला फार्फार महत्त्व आहे.
परसों म्हणजे परवा. कालच्या काल किंवा उद्याच्या उद्या.
कोणी तुम्हाला परसूंचा वायदा केला तर समजा की अजून दिल्ली भौत दूर है.
कोणी तुम्हाला परसूं घडलेली घटना सांगितली तर समजा की ती आदिकालापासून ते खर्या कालच्या कालपर्यंत साचलेल्या भूतकाळात कुठेतरी जमा झालेली 'गोष्ट' आहे.
आणि तुम्ही स्वतः जर तो शब्द वापरत नसाल तर तुम्ही 'जुने' हैदराबादी नाहीच.
असे का? अगदी परवापर्यंत (म्हणजे हैदराबादी परसूंपर्यंत) हे 'शहर' म्हणजे एक अवाढव्य खेडे होते. माझ्या डोळ्यांदेखत इथं लोक घरासमोरच्या कट्ट्यावर बसून येणार्या-
जाणार्याला 'खैरियत?' असे विचारत असत. कधीकधी तोही कट्ट्यावर बसून हवापाण्याच्या-नातेवाईकांच्या चौकशा करत असे. वाळ्याचे पडदे लावलेल्या डेझर्ट कुलरमधून येणारी थंड हवा खात, जाड भिंतीच्या घरात बसून तासंतास गप्पा मारत असत. दोन मिनिटांसाठी 'ऐसेईच' आलेला माणूस दोन-तीन दिवस राहून जात असे. उन्हाळ्यातल्या रविवारी रस्त्यावर क्रिकेट खेळण्याइतका शुकशुकाट असे. तब्बेतीने शिजणारे पदार्थ तितक्याच निवांतपणे संपवले जात. कोपर्यावरील इराणी हॉटेलात एकदा शिरले की दोन-तीन तास हळूहळू निघून जात. वेळ आपोआप जात नसे, तो घालवण्याचे अनेक उत्तमोत्तम मार्ग हैदराबादने शोधून काढले होते.
अशा वातावरणाची सवय झालेल्या हैदराबादला कोणतीही गोष्ट या क्षणी, आत्ता, आता, आज अशा वर्तमानकालात किंवा उद्यापर्यंतच्या भविष्यात घडेल याची खात्री नव्हती. आणि भूतकाळात झालेली कोणतीही गोष्ट तारीख-वाराने लक्षात ठेवण्याची गरज नव्हती आणि इच्छाही! म्हणूनच हा 'परसूं' - अनंत कालप्रवाहातील अनिश्चित बिंदू .
हे सारे आठवायचे कारण म्हणजे 'परवा' पेपरमध्ये आलेलं एक स्फुट. गंमत वाटली. एकीकडे हैदराबाद भराभर बदलत आहे, आपली जुनी कात टाकून नव्या वेगानं सळसळत आहे तर दुसरीकडे काही शहरे प्रत्यक्षात त्या निवांतपणाचा अंगिकार करत आहेत. अशाच एखाद्या गावात जाऊन सावकाशीनं जगावे असे मनात येते.
कार स्टेरिओवर लागलेले 'दिल ढुंढता है फिर वही फुर्सत के रात दिन' हे गाणे ऐकून नॉस्टाल्जिक झाल्यावर ग्रीन सिग्नल लागला तरी फर्स्ट गियर लगेच पडत नाही. लगेच मागून हॉर्नचा गोंगाट ऐकू येतो, मुलगी म्हणते,"बाबा, चल नाही तर ट्रॅफिक जाम होईल". मी तिला म्हणतो - "अगं, खरंतर परवापर्यंत इथं सिग्नलच नव्हता. अं... परवा म्हणजे तुझा जन्म व्हायच्या आधी!" - ती जुन्या हैदराबादची नाही, नव्या हैदराबादची आहे.
आवडला
भाषेची नजाकत सांगता सांगता हैदराबादी लोकांची प्रवृत्ती रेखाटली आणि अचानक लेख कधी संपलेल्या 'काल' विषयी बोलायला लागतो. बारकाव्यापासून सुरूवात करून व्यापक होत होत सर्वांनाच स्पर्श करतो. आणि हे सगळं वीस-पंचवीस ओळींत.
फुरसत के रातदिन जातात खरे कुठेतरी. परवा म्हणजे कदाचित कित्येक महिने असं ढगळ कालमापन करणारी संस्कृती मागे पडते आणि घड्याळाच्या काट्यावर रेखलेली ९:२७ ची लोकल वगैरे येतात. अधूनमधून वाटतंही की खुल्या चांदण्यात नदीत मनसोक्त डुंबावं... हा स्वप्नाळू विचार निदान गणपत वाण्याच्या विडीप्रमाणे सुखावून जातो. आणि ती तशीच जमिनीत गाडून टाकताना आपल्या हतबलपणाची जाणीव होते.
परवाचीच गोष्ट
परवाचीच गोष्ट आठवली. माझ्या मावसबहिणीचं लग्न होतं.आदल्या दिवशी नातेवाइक मंडळी कर्यालयात गप्पा मारत होती. कोणीसं म्हणालं, '....परवा अमक्यांच्याकडे केळवण होतं...'. माझी मामी,(मूळची भोपाळची, हिंदी मध्यमात शिकलेली अन लग्नानंतर पुण्यात आलेली),खर्याखुर्या आश्चर्याने म्हणाली, 'परवा कुठे हो? अहो त्याला तर दोन आठवडे होऊन गेले', आणि सर्व वर्हाडणींमध्ये खसखस पिकली. अगदी परवाचीच गोष्ट.
* त्या मावसबहिणीच्या मुलीचे यंदा लग्न आहे *
लेख आवडला.
http://www.loksatta.com/lokprabha/20111111/dasta-e-deccan.htm
लेख आवडला.
त्यावरून हैद्राबादवर अगदि अशाच शैलीत लिहिलेले http://www.loksatta.com/lokprabha/20111111/dasta-e-deccan.htm हे लिखाण आठवले.
विसुनाना, लेखन आवडलं. अगदी
विसुनाना, लेखन आवडलं. अगदी जुनं, शांत हैद्राबाद दिसलं. शांतपणे वाचण्यासाठी म्हणून आधी लेख उघडलाही नव्हता त्याचा आनंद झाला.
अलिकडच्या काळात दीडेक वर्ष नव्या हैद्राबादशी येऊन जाऊन संपर्क आला. मला मुद्दाम बसनेच फिरायचं असायचं कारण ही दखनी भाषा कानावर यायची त्याची मला मजा वाटायची.
दखनी भाषेचा उल्लेख दिसल्याने
दखनी भाषेचा उल्लेख दिसल्याने धागा वर काहाडत हाये. मुल्ला की नूर असे नाव असलेला कोणी नुसरती म्हणून कवी विजापूर दरबारी होता, शिवछत्रपतींचा समकालीनच मोस्टलि. त्याने दखनी भाषेत महाराजांवर काही कविता केल्यात. त्या कविता गोनीदांच्या कादंब्रीमय शिवकालात एके ठिकाणी उद्धृत केल्या गेल्या आहेत.
"अपन गयो मिल चोरट्यांमे मुखंड |
रच्यो यकसो यक फौज दूजी अखंड ||
दिसेना वो जल्दीसे अपने आप |
बिरादर हे सावांके चोरोंके बाप ||
हर एक गोयां उनकी मादवां परी |
दिखावै चंदरको अपस दिलबरी ||"
अशी थोडी कडवी आठवताहेत, एखाददुसर्या ठिकाणी गडबड असेलही. चूभूदेघे.
वा...
विसुनाना लिहू लागले हे 'ऐसीअक्षरे'चं यश!!!