Skip to main content

आधार नको

आधार नको

कवी - स्नेहदर्शन

सदैव उघडे मज दुःखाचे दार नको
फक्त वेदना आयुष्याचे सार नको

कोण खेळला कैसा येथे पाहून घे,
मला कुणाची जीत नको वा हार नको!

का विसरावी प्रीत माणसा मनातली
जगात कोणी इतकाही लाचार नको

मला झेलता यावे इतके पदरी दे,
मला पाहिजे तेही काही फार नको

माझा व्हावा मीच दिलासा कायमचा,
कोणाचाही खांदा वा आधार नको

विशेषांक प्रकार

सहज Wed, 30/10/2013 - 09:37

माझा व्हावा मीच दिलासा कायमचा,
कोणाचाही खांदा वा आधार नको.

म्हणजे शेवटी मला स्वावलंबी व्हायचे पण अमुक अमुक वरील शर्ती आहेत तेवढ्या आधी पुर्‍या करा असे?

मन Wed, 30/10/2013 - 15:43

मस्त.
आवडले. कविता ह्या प्रांताकडे जरा बिचकूनच बघत असओत.\
पण हे चक्क आवडले.
बादवे, ह्या तुमच्या कवितेत(का गझलेत का गाण्यात का जे काय असेल त्यात) एक विशिष्ट लय, ठेका आहे. गेयता आहे.
तो संदिप खरेच्या "नामंजूर" ह्या मराठी कव्वालीच्या लयीत फिट्ट बसतो.
इतका फिट्ट बसतो, की त्याच्या शेवटच्या कडव्यानंतर तुमचं लिखाण नुसतं पेष्ट केलं तरी समजणार नाही की हे वेगळं अन् ते वेगळं.
.
हे इथे त्याचं गाण्म देतोय. मला लै आवडतं.
नामंजूर
नामंजूर! नामंजूर! नामंजूर!
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर!

माझ्याहाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवे-फ़ुगवे,भांडणतंटे लाख कळा
आपला- तुपला हिशोब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे - नामंजूर!

मी मनस्वीतेला शाप मानले नाही
अन् उपभोगाला पाप मानले नाही
ढग काळा ज्यातुन एक ही फिरला नाही
नभ असले मी अद्याप पाहिले नाही

नीती, तत्वे... फ़सवी गणिते! दूर बरी!
रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वहाणे - नामंजूर!
.
.
बादवे, खरे सायबाची कविता इथं देणं त्या कॉपीराइअटात बस्तं काय? नसल तर प्रतिसाद काडहवा लागल काय?
जर रायल्टी द्यायची झाली तर किती द्यावी लागति म्हणे?

मिलिंद Wed, 30/10/2013 - 15:35

शेवटचा शेर आवडला.दुसराही छान.

मला झेलता यावे इतके पदरी दे,
मला पाहिजे ते ही काही फार नको

ह्यावरून
"सोसे तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दु:ख, ईश्वरा, रंक करी वा राजा"

हे आठवले.

प्रकाश घाटपांडे Wed, 30/10/2013 - 18:32

>>>माझा व्हावा मीच दिलासा कायमचा,
कोणाचाही खांदा वा आधार नको.
या तुमच्या ओळींवरुन मला ही कविता आठवली. तरि बरं आम्हाला कवितेतल गम्य नाही.

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा