Skip to main content

फ्लेक्स - एक उदयोन्मुख सशक्त बहुजातविधा (भाग १)

(सर्वप्रथम, वाचकांनी नोंद घ्यावी की वरील लेख भाग १ म्हणून लिहिलेला आहे, पण याचा अर्थ असा नाही की भाग २ येईलच. कारण तत्वतः एकच भाग असलेली लेखमालादेखील असू शकते.)

आजचा आपला आसमंत कसा आहे, तर तो गदारोळाचा आहे असं ऐसीअक्षरेच्या संपादकांनीच कुठेशीक लिहून ठेवले आहेे. त्या वाक्यानंतर लेखात मध्ये बरेच काहीसं अगम्य (कोण रे तो म्हणतोय 'आता लक्षात आलं गदारोळ म्हणजे काय ते'? त्यांना अरुणजोशींचे प्रतिसाद वाचायला द्या पाहू.) लिहून झाल्यावर ते म्हणतात, की या गदारोळावर तुमच्यासाठी उत्तर तुम्ही शोधायचे आहे. आणि त्यात जे काय सापडेल...

तो तुम्ही शोधलेला खजिना असेल, म्हणून तो तुमच्यासाठी खरा असेल. असा तुमचा खजिना तुम्हांला सापडो ही 'ऐसी अक्षरे'तर्फे सदिच्छा.

ऐसीच्या दिवाळी अंकाबद्दल माहित नाही, पण गेले काही दिवस ऐसीवर आम्हाला गदारोळच आढळून आला. त्यामुळे आम्ही आमचे लक्ष इतस्तत: वळवले असता अल्लाउद्दीनच्या गुहेप्रमाणे मोठ्ठा खजिना सापडला. ('न'वी बाजू यांना - अहो, आम्हांस माहित आहे, की ती गुहा अलिबाबाची होती आणि अल्लाउद्दीनकडे जादूचा दिवा होता. मात्र तुमचे हात कळफलकाकडे जाण्यास उद्युक्त करणे एवढाच हेतू होता. तो सफळ झाला. इतरही कोणाचे जर हात शिवशिवले असतील तर तुमच्यातही एक 'न'वा अंश आहे हे लक्षात घ्या) आणि त्यास खजिना म्हणण्याचे कारण असे की ते एक मौल्यवान रत्न किंवा एखाददुसरा दागिना नसून ते एक महाप्रचंड भांडार आहे. म्हणून त्यास विधा (पक्षी: विधा उर्फ genre) असे म्हणणे आम्ही पसंद करतो. तर आम्हांस अशी एक उदयोन्मुख विधा सापडली आहे, ती म्हणजे फ्लेक्स. होय होय फ्लेक्स.

कितीही टाळले तरी दररोज जागोजाग दृष्टोत्पत्तीस पडणाऱ्या या अमंगळ, बटबटीत चित्र-शब्दतुकड्यांना कोणी कलाप्रकार म्हणू धजतो हे पाहून कलासमीक्षकांच्या झुंडीच्या झुंडी आमच्यावर तुटून पडतील याची आम्हांस खात्री आहे. (त्यातले किमान निम्मे तरी 'आपल्याला हा साक्षात्कार आधी का झाला नाही!' असा जळफळाट करणारे असतील याचीही आम्हांस तितकीच खात्री आहे.) पण आम्हांस असे क्रांतीकारी विचार करण्याची व त्यापायी तमाम उच्चभ्रूंचा विरोध पत्करण्याची सवय आहे. (कारण हे लोक भुवया डब्बल उंच करून नाक उडवण्यापलिकडे काही करत नाहीत. खळ्ळ फट्याक वगैरे तर नाहीच नाही.) हेलनचे नृत्य पाहूनही आम्हाला अर्थसंपृक्त रूपकवस्त्रांची एक नव्हे दोन अनावरणे करण्याची इच्छा होते. पण अशा प्रकारे वरवर बाजारू वाटणाऱ्या कलाकृतींमध्ये किती गहन अर्थ दडलेला असतो हे सांगायला गेले की उच्चभ्रू कलासमीक्षक खवळतात. (तीच दोन कारणे, एक म्हणजे आपल्या सवत्यासुभ्यावर कोणीतरी सांगितलेला अधिकार आवडत नाही, आणि दुसरे म्हणजे 'आपल्याला हा साक्षात्कार आधी का झाला नाही!' असा जळफळाट) असो.

एका विशिष्ट फ्लेक्सवर (फ्लेक्सचे एकवचन फ्लेक होत नाही.) नजर केंद्रित करण्याऐवजी या लेखात एका नवीन विधेची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे हे सांगितलेच आहे. फ्लेक्सची सोपी व्याख्या म्हणजे एका कोणाचे तरी कशाबद्दलतरी अभिनंदन करणारा किंवा त्यांना वावा म्हणणारा भर चौकात लावलेला रंगीबेरंगी बोर्ड. कालांतराने व्याख्येतल्या 'भर चौकात' ची अट थोडी ढिली होत गेली - एक म्हणजे फ्लेक्स वाढले तसे चौक कमी पडायला लागले. चौक संपल्यावर लोकांनी वेगवेगळ्या भिंती व्यापल्या. आणि खऱ्या दगडमातीच्या भिंती संपल्या तशा फेसबुकावरच्या भिंतींवर त्यांनी जागा घेतली. झकरबर्गच्या कृपेने अजून तरी ती जागा कमी पडलेली नाही. फ्लेक्सची व्यवच्छेदक लक्षणं उकलून सांगायची झाली तर,

- अभिनंदनीय व्यक्तीचा मोठासा फोटो आणि अभिनंदकांच्या फोटोंची वा नावांची मोठी गर्दी असते.
- अगदी थोडक्यात पण भारदस्त शब्दांत अभिनंदनीय व्यक्तीचे कशाबद्दल अभिनंदन केलेले आहे याचे वर्णन असते.
- त्याच्या आसपास उत्तेजनार्थ टिप्पणी असतात, यांसाठी बऱ्याच वेळा स्वतंत्र चित्रे वापरली जातात.

फ्लेक्स या कलाविष्काराची मुळे अनेकविध परिसरांत पसरलेली आहेत. त्यात प्रथम जाणवते ती म्हणजे दृश्य आणि दृश्येतर कला यांची सांगड (अमुक यांनी दिलेल्या या विषयावर 'फ्लेक्स चालतील' असे स्पष्ट लिहिले असते तर त्यांना खचितच अधिक प्रतिसाद मिळाला असता. पण ते एक असो.) चित्रे, छायाचित्रे, आधुनिक कारटुने, शब्द, काव्य आणि राजकीय घोषणा यांच्या संगमातून हा आविष्कार घडतो. यामध्ये येणाऱ्या संदेशांना व त्यांच्या व्युत्पत्तीला राजकीय, सामाजिक, भाषिक आणि वैद्यकीय पदर आहेत. (एखादी कला शहाण्णवकुळी आहे हे सिद्ध करायचे असेल तर असे पदर तपासणे महत्त्वाचे असते.) हे पदर प्राप्त होतात ते वेगवेगळ्या संदर्भात झालेल्या घोषणांमधून 'देवीचा रोगी कळवा, हजार रुपये मिळवा', 'पाणी गाळा नारू टाळा','गप्पी मासे पाळा हिवताप टाळा' 'ताई माई अक्का, विचार करा पक्का, हातावर मारा शिक्का' यासारख्या अनेक घोषणांनी सत्तर ते शून्यची दशके दुमदुमून गेली होती. या त्रोटक पण अत्यंत परिणामकारक लघुघोषणा सामाजिक मानसात घुमल्या, रुजल्या, फोफावल्या. त्यांपासून तयार झालेल्या नवीन बीजांचीच जणू उधळण होऊन सर्व फ्लेक्सवर, एखाद्या दुर्लक्षित लॉनमध्ये जागोजाग तण उगवावेत त्याप्रमाणे वाक्यं उगवलेली दिसतात. 'पुढं हो मर्दा, हाण जर्दा' किंवा 'बघतोस काय रागानं, कॅमेरा घेतलाय वाघानं' अशा वाक्यांतून या सर्वाची गंगोत्री कुठे आहे हेे लक्षात येतं.

फ्लेक्सचे दुसरे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यात वापरलेली अस्सल भारतीय रंगसंगती. खरेतर रंगसंगती हा शब्द फारच सपक झाला, त्यासाठी पॅलेट हाच शब्द समीक्षकमान्य आहे. तर या पॅलेटमधून पिवळा, झगझगीत निळा, लाल, केशरी, निऑन जांभळा, निऑन हिरवा अशा रंगांची त्यांत मुक्तहस्ताने उधळण केलेली दिसून येते. रांगोळ्यांच्या रंगांचे ढिगारे एकाशेजारी एक मांडून ठेवल्यावर अस्सल भारतीय नजरेला जो एक अस्सल भारतीय अनुभव येतो त्याचे तादात्मीकरण फ्लेक्स बोर्डांवर दिसून येते.

तिसरे लक्षण (दरवेळी व्यवच्छेदक, व्यवच्छेदक कुठे म्हणत राहायचं?) म्हणजे शहरी भाषेपासून फारकत घेऊन वापरलेली गावरान रांगडी भाषा. पन्नास वर्षांपूर्वी साडेतीन टक्क्यांचे राज्य असल्याने जो तुपकट लोणकढी वास येत होता तो जाऊन त्याऐवजी बोलाईच्या मटणाचा, खमंग रश्श्याचा तिखटजाळ झणका नाकात भरतो. भाषाच नव्हे, तर त्यामागची भावना ही रासवट आहे. स्वतःला वाघ, बेरड, मर्द म्हणणारी आहे. कट्यार काळजात घुसली या नाटकात खान साहेब राजगायकाच्या वाड्यात राहायला आल्यावर 'मवाळ हळवे सूर जाऊद्यात, आज येथूनि दूर' असे म्हणतात. नेमके असेच विधान बहुजनसमाज आज फ्लेक्स या कलाप्रकाराद्वारे करत आहे.

श्री. शं. का. मोत्यावाणी यांनी या विषयावर अधिकारवाणीने लिहिलेेले आहे. ते अर्थातच सर्वच विषयांवर प्रचंड अधिकारवाणीने लिहितात. मग तो आइन्स्टाइचा सापेक्षतावाद असो ('सापेक्ष याचा खरा अर्थ म्हणजे व्यक्तिनिरपेक्ष परिप्रेक्ष्य') की कांटचं तत्त्वज्ञान असो ('कांटची भूमिका इतकी नकारात्मक का होती हे त्याच्या नावावरूनच समजून घेता येते'). ते म्हणतात की 'फ्लेक्स कलाप्रकाराची मुळे राजकारणाच्या आणि आत्मप्रसिद्धीच्या चिखलात बरबटलेली आहेत. सत्तर-ऐशीच्या दशकात मोठ्या नेत्यांतेच पन्नास साठ फुटी कटाउट्स असत... उदारीकरणाची सूज चढल्यानंतर प्रत्येकालाच प्रसिद्धीची हाव चढली. रस्तोरस्ती फ्लेक्स बोकाळले. या लोकप्रियतेचं लोकशाहीकरण असे म्हणता येईल खरे, पण अभिजात कलाप्रकारांना कवटाळून राहणारे स्वयंघोषित उच्चभ्रू याला सवंगीकरण म्हणून नाके मुरडणे अधिक पसंत करतात.'

मोत्यावाणींचे इतर विचार पटत नसले तरी हे म्हणणे मान्य करावे लागते. (आमचा पाठिंबा मिळतो आहे हे वाचून कदाचित तेच आपले मत बदलतील की काय अशी भीती वाटते.) कुठचाही कलाप्रकार एखाद्या देवीला वाहिलेल्या यल्लम्मेसारखा असतो. तिचा जन्म अपघाताने होतो, पण त्यामागे आसक्ती नसते असे म्हणता येत नाही. तिची वाढ अशीच कशीतरी होते, कोणातरी वैयक्तिक हौसेपोटी. वयात आल्यावर तिला राजाश्रय मिळतो. आणि मग काही काळाने तिला पुरेसा जनाश्रय मिळाला की राजाश्रयाची गरज सुटते. मग जनतेच्या प्रेमामुळे कलेसाठी कला म्हणून सुखाने नांदते. फेसबुकाच्या आणि आंतरजालाच्या कृपेने फ्लेक्स हा कलाप्रकार राजाश्रय सोडून जनतेच्या प्रबळ अनुनयावर खंबीरपणे उभा राहिला आहे. आज ना उद्या उच्चभ्रू कलासमीक्षेला या बहुजातविधेची दखल घ्यावीच लागेल.

(क्रमशः? अं... कदाचित.)

............सा… Thu, 05/12/2013 - 01:36

'फ्लेक्स कलाप्रकाराची मुळे राजकारणाच्या आणि आत्मप्रसिद्धीच्या चिखलात बरबटलेली आहेत. ...... स्वयंघोषित उच्चभ्रू याला सवंगीकरण म्हणून नाके मुरडणे अधिक पसंत करतात.'

या तामसी कलाविष्काराचा उत्तम आढावा घेणारा लेख :)

नगरीनिरंजन Thu, 05/12/2013 - 09:10

फ्लेक्सकलेचा आढावा घेणार्‍या लेखाचा ले-आऊट व फिनिशिंग आवडले.

प्रकाश घाटपांडे Thu, 05/12/2013 - 09:14

ते काही म्हना पण पुर्वीच्या चुन्याच्या फक्कीवर लिहिलेली विटकरी रंगाची अक्षरे जी हृदयावर कोरली आहेत त्याची मजा या फ्लेक्समदी नाय! नवसाक्षरांसाठी तो ग्रुहपाठ होता तसेच रोजगार ही. एका उमेदवाराची खूण झोळी होती. विटकरी रंगात रंगवणार्‍या कलाकाराचा झोळी शब्द लिहिताना इ व झ मधे इतका गोंधळ झाला होता कि त्याने उरलेले सगळे मतदारांवर सोपवून दिले.

प्रकाश घाटपांडे Thu, 05/12/2013 - 09:36

फ्लेक्स - एक उदयोन्मुख सशक्त बहुजातविधा याला आमी 'फ्लेक्सविधा' असा प्रतिशब्द सुचवतो. त्या जैविक विविधतेला नाही का जिविधा शब्द दिल्या गेल्या आहे?

राजेश घासकडवी Thu, 05/12/2013 - 09:45

In reply to by प्रकाश घाटपांडे

म्हणजे एक भारदस्त दणदणीत वाक्यप्रयोग सोडून सुटसुटीत शब्द वापरायचे? अहो, उच्चभ्रू समीक्षक आधीच आमच्यावर खार खाऊन आहेत. त्यात हे असले नसते पायंडे पाडण्याचा प्रयत्न करून अजून रोष ओढवून घ्यायचा नाही.

बॅटमॅन Thu, 05/12/2013 - 12:37

In reply to by मी

सगळे झाकले तरी कळ्ळे हो गोल्डमॅन कोण आहे ते ;)

बाकी लेख उत्तमच. "इथे ओशाळल्या संज्ञा" हे वर्णन चपखल बसावे लेखाला.

आदूबाळ Thu, 05/12/2013 - 13:05

In reply to by बॅटमॅन

हे गोल्डम्यान आमचे फेवरिट्ट आहेत! दोनएक वर्षांपूर्वी सादलबाबा दर्गा रस्त्यावर यांचं समशेर करी धरलेलं चित्र आणि खाली "गप्प बसलो म्हणून गांडूची अवलाद समजू नका!" ऐसे कडक बोल लिहिलेला फ्लेक्स लावला होता.

मी गाडी थांबवून पोटभर हसून घेतलं. दोनच दिवसांत फ्लेक्स उतरवला गेला. बहुदा ज्याने त्यांना गांडूची अवलाद समजलं होतं त्याला उपरती झाली असावी.

अजो१२३ Thu, 05/12/2013 - 17:40

In reply to by आदूबाळ

मोठ्ठं नशीब तुमचं!

नाहीतर आम्ही "लिफ्टची अनसर्विसेबल आहे, वापरू नका" अशा फालतू फलकांवर हसतो.

'आला आला फेकू आला' हे मी याची डोळा पाहिलेले उच्चतम फ्लेक्स वा अँटीफ्लेक्स आहे.

विसुनाना Thu, 05/12/2013 - 13:01

सगळे समीक्षक असलेच रुक्ष! इतका महत्त्वाचा आणि रसाळ (कोल्लापुरी मटनाच्या रस्स्यासारखा झणझणीत) कलाप्रकार आणि त्याची मिमांसा मात्र सप्पकढ्याण!

श्री. शं. का. मोत्यावाणी यांनी या विषयावर अधिकारवाणीने जे काही लिहिले आहे ते असो पण श्री. सावधान खुप्ते यांनीही त्याहीपेक्षा अधिकारवाणीने,मुद्देसूद आणि उदाहरणे देऊन 'फ्लेक्सकला' हा बोर्डकलेचा आधुनिकोत्तर आविष्कार आहे असे सिद्ध केलेले आहे याकडे प्रस्तुत समीक्षकाचे लक्ष वेधतो.

पुढच्या भागात लेखक महाशयांनी सोदाहरण स्पष्टीकरण द्यावे अन्यथा लेख लिहू नये. :प

नगरीनिरंजन Thu, 05/12/2013 - 17:18

In reply to by विसुनाना

ह्यावरुन आठवलं; मिल्येनियमोत्तरीच्या दशकातले थोर समीक्षक श्री. मु.वि.थिएटरवाला यांनी मूकचित्रपटाच्या काळापासून चित्रपटांच्या फ्लेक्सांतून फ्लेकसकलेचा कसा उगम व पुढे विकास झाला त्यावर अतिशय रंजक "फ्लेक्स फ्लेक्स होता है" नावाचा ग्रंथ लिहिला होता. विशेषतः सिनेमाच्या फ्लेक्सवर मधुबालादि अप्सरांच्या बरोबरीने रंगवले जाणारे प्रदीपकुमार, भारतभूषणादि (न)नायकांचे चेहरे व काळाप्रमाणे त्याच तोलामोलाच्या आकारात के.एन.सिंग, प्राण, प्रेमचोप्रादि खलनायकांचे मुखडे पाहून आपलेही चेहरे फ्लेक्सांवर पाहिजेत असे वाटणारे ठाकरे, पवार, मुंडे, देशमुखादि नेते आणि त्यांची तोंडं फ्लेक्सावर पाहून त्यापासून प्रेरणा घेऊन आणि फ्लेक्सावर मुखडा मिरवण्याइतका आत्मविश्वास मिळून सामान्य जनांनी फ्लेक्सकलेचा केलेला अंगिकार हा सगळाच प्रवास रोमांचक आहे.
या लेखात त्याचा उल्लेखही नसल्याचे पाहून आत्यंतिक खेद वाटला.

बॅटमॅन Thu, 05/12/2013 - 20:44

In reply to by 'न'वी बाजू

हो, पण "ढ्याण" हा शब्दप्रयोग तिथे चुकीचा वाटतो. कारण तिखटजाळ, कडूजहर, गोडमिट्ट हे शब्दप्रयोग त्या त्या चवीचे आधिक्य सुचवितात, त्यांतील प्रत्येक प्रत्यय हा अन्य चवींना लागू न पडण्याइतपत स्पेसिफिक आहे-लेट अलोन चवीच्या अभावाला लागू पडणे. त्यामुळे सपक म्हणजे रुचिवैशिष्ट्याचा अभाव सूचित करावयाचा असेल तर ढ्याण हा प्रत्यय लागू पडणार नै असे वाटते.

अवांतरः घरी ढ्याण ऐकला नै कधी. ढाण असा ऐकला आहे.

फारएण्ड Thu, 05/12/2013 - 15:50

आपल्याकडून भावी फ्लेक्सकर्त्यांनी एखादा "कोट" घेऊन तो स्वतःच्या फ्लेक्सवर लावावा. म्हणजे नवीन पुस्तकाच्या मागे जसे एखाद्या नावाजलेल्या लेखकाचा 'कोट' असतो तसा.

आपण एक फ्लेक्स-कन्सल्टंसी काढावी अशी नम्र सूचना करतो आहे. म्हणजे एकाच चौकात दहा-बारा फ्लेक्स असतील आणि त्यावरचे सगळेच वाघ, मर्द ई असतील तर आपल्या फ्लेक्स कडे लोकांचे लक्ष जावे याकरिता काय उपाययोजना करावी वगैरे सल्ले देता येतील. उदा: मासिकांवर असतो तसा एखाद्या हीरॉइन चा फोटो फ्लेक्स वर एका साईडला (किंवा मधेही) असायला हरकत नाही.

आम्ही कलासमीक्षक नसलो, आमच्या मागे झुंड नसली, तरी हे आम्हाला का सुचले नाही याची खंत होतेच. सुमारे एक दीड वर्षांपूर्वी पुण्यात काही काळ सगळे फ्लेक्स उतरवले होते. तेव्हा असे काहीतरी लिहून जनजागृती करायला हवी होती. पण आम्ही पडलो कमर्शियल, त्यामुळे हे असले काहीतरी लिहीले होते :)
http://www.maayboli.com/node/36190

(ब्याक टू नॉर्मल)
मस्त लेख आहे. जबरी आवडला

अजो१२३ Thu, 05/12/2013 - 16:29

बहुजातविधा म्हंजे काय? कस्ला औघड लेख लिहिलाय? तसा आपल्या नावाने जालीय फ्लेक्स असलेला मराठीआंतरजालकर मी एकटाच आहे म्हणून मला कळू नये असं काहीबाही लिहिलंय आपण. असो. बरेच फ्लेक्स बनवले असते पण तांत्रिक कौशल्याने मी कमी पडतो.
...पण फ्लेक्सीय विधान -
हिशोब उरलाय लक्षात ठेवा.

राजेश घासकडवी Fri, 06/12/2013 - 02:19

In reply to by अजो१२३

अभिजात म्हणजे क्लासिक. तसाच बहुजात हा शब्द आहे. त्याचे दोन पैलू आहेत. एक म्हणजे बहुजनसमाजाची. अभिजात कलांवर तशी उच्चभ्रूंची मक्तेदारी असते. फ्लेक्सच्या बाबतीत तसं नाही. दुसरी म्हणजे अपौरुषेय. या कलेची जोपासना करणारे बहुतेक वेळा बोर्डावर स्वतःचं नाव पण लिहीत नाहीत. हजारो कलाकारांनी ही संपन्न करायला मदत केली आहे.

कस्ला औघड लेख लिहिलाय?

समीक्षा ही अवघडच असते. ती सोपी करून लिहिली तर इतर समीक्षक तुम्ही धंद्याशी बेईमानी केल्याबद्दल तुम्हाला वाळीत टाकतात. अनिल सोनवणेंनी लिहिलं होतं की कोणी स्वस्तातला रिक्षावाला गाठला तर इतर रिक्षावाले त्याला धंदा करू देत नाहीत, तसंच. मी जर कलात्मक संकल्पना स्वस्त केल्या तर माझ्यावरही तीच गत येईल. आधीच ते लोक खार खाऊन आहेत...

तसा आपल्या नावाने जालीय फ्लेक्स असलेला मराठीआंतरजालकर मी एकटाच आहे म्हणून मला कळू नये असं काहीबाही लिहिलंय आपण.

छे हो. हा ऐसीवरचा पहिला फ्लेक्स. इतरत्र पहा, हजारो नमुने दिसून येतील.

हिशोब उरलाय लक्षात ठेवा.

भाऊंच्या यादीत तुमचं नाव, आता म्हणा देवा मला पाव!

बॅटमॅन Fri, 06/12/2013 - 16:31

In reply to by राजेश घासकडवी

आधीच ते लोक खार खाऊन आहेत...

खारीसारख्या चपळ आणि ओह-सो-क्यूट-अँड-गरीब-बिचार्‍या जीवाला खाणार्‍या मंडळींपासून जपून असलेलेच बरे. अगदी सहमत आहे.

नंदन Fri, 06/12/2013 - 20:47

In reply to by बॅटमॅन

एवढं पार्लेइंग पाहून डोळ्यांसमोर अंधेरी आली - अशी हांडे-esque पूर्ती अजून कोणी कशी केली नाही बरे?

अमुक Fri, 06/12/2013 - 21:14

In reply to by बॅटमॅन

हे म्हणजे - आधीच 'उल्हास' त्यात फाल्गुन मास - झाले की !
.
(गरजूंसाठी म्हणीचा अर्थ - http://books.google.co.in/books?id=_gM4AAAAYAAJ&printsec=frontcover&sou…)

अरविंद कोल्हटकर Fri, 06/12/2013 - 22:44

In reply to by शहराजाद

राघांचा पहिला प्रतिसाद आणि त्याला माझा हा प्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिप्रतिसाद =प्रति१०साद

............सा… Fri, 06/12/2013 - 23:14

In reply to by अरविंद कोल्हटकर

इस बात्पे, चाहीये तो सब ऐसीवासीयोंका "कल कट्टा" हो जाय

बॅटमॅन Sat, 07/12/2013 - 00:19

In reply to by ............सा…

लाईक केल्या गेले आहे!!!

शिवाय बाकी बुडती तिथे एखादा धूर्त कोल्हा पुरात तरतो हेही लक्षात घेणेचे करावे ;)

बॅटमॅन Sat, 07/12/2013 - 00:27

In reply to by ............सा…

ओह अच्छा, हे माहिती नव्हते. रोचक!

बाकी दक्षिणेत लोक लुंगी घालत असल्याने तिथे चेन नै असे म्हणतात बॉ.

शहराजाद Sat, 07/12/2013 - 00:41

In reply to by शहराजाद

तेही नसेल तर दिव्याच्या खंबाला धरून वर चढावे. विजेचा धक्का बसू नये म्हणून तर महालक्ष्मी, गावदेवी, काळबादेवी, भुलेश्वर अशा कोणाचा तरी धावा करावा.

शहराजाद Sat, 07/12/2013 - 00:49

In reply to by शहराजाद

बाकी एवढे पाणीच पाणी चहूकडे झाले तर धुणे धुवायला धोबी तलाव गाठणे सोडून देतील.
मात्र असल्या पाण्यात धुवून धुवून कपड्यातले कॉटन ग्रीन होण्याची भीती आहे.

बॅटमॅन Sat, 07/12/2013 - 00:59

In reply to by शहराजाद

अगदी अगदी. अगोदर कसे तलाव पाळीने वापरायचे ते आता शक्य नाही. हे सर्व बंड गार्डनपर्यंतही पोचेल असं दिसतंय.

सर्किट Sat, 07/12/2013 - 19:48

घासकडवींचे लैच वेळा आभार..

आणखी एक मुद्दा: फ्लेक्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांना लीलया जोडणारे एक हुकुमाचे पान आपल्याला मिळाले आहे.
(उच्चभ्रूंच्या भाषेत: मणौ वज्रसमुत्कीर्णे सूत्रस्येवास्ति मे गति: ॥ रघु. १. ४)

मासल्यादाखल हा फ्लेक्स पहा: