Skip to main content

गझल

जुळवूनी अक्षरांना - लिहावी म्हणले गझल |
हिशोब मात्रांचा चुकला - रचता रचता गझल ||

लघु-गुरु, अंत्य यमकांना - बसविले मी क्रमात |
अक्षरांच्या ओळी झाल्या - पण हरविली ती गझल ||

उनाड कल्पनांना - काबूत आणताना |
हरले , दमले मी अन् फसली ती गझल ||

रद्दीफ कोणता घेउ ? अर्थ साधणारा ...|
ठरविता न आले .. म्हणून - लिहिलीच नाही गझल ||

बाराखडी गझलेची - वाचता पुन्हा पुन्हा |
समजले असे की मजला .. जमणार नाही गझल ||

काव्य हे असले - उच्च खानदानी |
लिहिणे नकोच आता .. नुसतीच ऐकू गझल ||

राजेश घासकडवी Tue, 27/12/2011 - 22:27

आयुष्यातलं ध्येय प्राप्त करण्याला गझल रचण्याची उपमा देण्याचा प्रयत्न आवडला. या कवितेत वृत्तापासून घेतलेली फारकत मात्र खटकली. मतल्यात हिशोब मात्रांचा चुकला म्हटलं आहे खरं, पण पुढच्या शेरात अक्षरांच्या ओळी झाल्या - पण हरविली ती गझल म्हटलं आहे, त्यातला - मी सर्व काही नियमांप्रमाणे केलं, ते करता करताच आयुष्य हरवून गेलं - हा अर्थ येण्यासाठी रचना छंदबद्ध असायला हवी होती असं वाटतं.

मनीषा Wed, 28/12/2011 - 06:55

In reply to by राजेश घासकडवी

"आयुष्यातलं ध्येय प्राप्त करण्याला गझल रचण्याची उपमा देण्याचा प्रयत्न ..."
हा माझ्या कवितेचा अर्थ आवडला (पण मला सुचत असलेले शब्द - गझल च्या फॉरमॅट मधे बसवता न आल्याच्या वैफल्यातून लिहिलेली ही कविता आहे :))

>रचना छंदबद्ध असायला हवी होती असं वाटतं.

सहमत ..ती तशी नाहीये हे अगदी मान्य .

धन्यवाद!

ऋषिकेश Wed, 28/12/2011 - 17:28

एक रचना म्हणून चांगलीये.. मात्र ही गझल नाही! :)