Skip to main content

तोच थंडगार भात

( चालः तोच चन्द्रमा नभात )

तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी
एकांती मजसमीप तीच भीति का मनीं !

खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे
पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे
भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी !

सारे जरि ते तसेच संधि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तीहि, दुसरी मेस ती कुठे ?
ती कपात ना दरात अश्रु दोन लोचनी !

त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा
डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा
नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी !

(पूर्व प्रसिद्धी- शब्दगाssरवा २०११)

राजेश घासकडवी Wed, 28/12/2011 - 00:08

होस्टेलवर राहिलेल्या अगणित लोकांच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत. जुने दिवस आले आणि पोटात ढवळून आलं.

अज्ञात Wed, 28/12/2011 - 06:52

होस्टेलच्या बाबतीत आम्ही नेहमीच सुखी राहीलो. पण बाकी मैत्रिणी व मित्रांच्या याबद्दलच्या व्यथा जाणून आहोत.
विं दां च्या 'तेच ते आणि तेच ते ' ची आठवण झाली.....