एस्केपिंग महत्त्वाकांक्षा
एस्केपिंग महत्त्वाकांक्षा
लेखक - उत्पल
'जी कायम जागी असते ती राजकीय महत्त्वाकांक्षा आणि जी कधीच जागेवर नसते ती राजकीय इच्छाशक्ती' या दोन व्याख्या आम्ही बालपणापासून ऐकत आलो आहोत. बालपणीचा राजकीय काळ विशेष होता. आज पंचविशीत-तिशीत असलेल्या जवळजवळ प्रत्येकाची बालपणाची एक रम्य आठवण म्हणजे भाड्याची सायकल घेऊन चकरा मारणे. या चकरांच्या दरम्यान आम्ही रा. स्व. संघाची शाखा दुरून बघत असू. दुरून बघत असू, याचं एक कारण म्हणजे वडील. आमचे वडील मजबूत बांधणीचे सर्वोदयी! घरात गांधी-विनोबा-जेपी ही त्रिमूर्ती विराजमान होती. अजूनही आहे. आमच्या वडिलांना सायकलच्या पेंडिंग डिमांडची आठवण करून द्यायला 'बाबा, सायकल?' असं म्हटलं, की सायकलच्या डिमांडवर भाष्य करता करता ते हा मुद्दा या त्रिमूर्तीशी जोडू शकत होते. अजूनही जोडू शकतील. फक्त आता अर्थातच वडिलांकडे कुठलीच पेंडिंग डिमांड नाही. सर्व्हरचा शोध लागायच्या आधीपासून आपल्या विनंत्यांच्या बाबतीत 'नॉट रिस्पाँडिंग' मोडमध्ये जायची कला ’वडील कॅटॅगरी’ला अवगत होती; याच्याशी बहुतेक सर्वोदयी वा बिगर-सर्वोदयी घरातीलही, मुलं सहमत होतील. तर ही कला आणि वडिलांचा कल आम्ही सुज्ञपणे लक्षात घेतला आणि विनोबा-जेपींच्या अचाट सावलीतील सर्वोदयी मंडळी त्यांचा मार्ग चालत असली तर त्यांना चालूच देत; पण आपलं अतिमध्यमवर्गीय जगणं आपल्यालाच सावरायला हवं, हे नीट कळल्याने 'गीताई' न विसरताही आईच्या पावलावर पाऊल ठेवून बँकेचं पासबुक महिन्याकाठी किमान एका क्रेडिट एंट्रीने अपडेट करण्यावर आम्ही अंमळ अधिक लक्ष दिलं. तर हे एक कारण आणि दुसरं म्हणजे त्या वेळच्या आमच्या सामाजिक-राजकीय विचारसरणीचा प्रमुख भाग काही मुली होत्या आणि त्यांपैकी कुणीच शाखेत दिसत नसे. आता सायकल एकाच तासासाठी हातात असल्याने 'शायनिंग मॅक्सिमाइज' करण्याकडे प्रत्येकाचाच कल होता. त्यामुळे शाखेचा संबंध दुरून बघण्यापुरताच आला. शाखेचं आणि हिंदुत्ववादाचं अंधुकसं दर्शन, सर्वोदयाचं संपूर्ण दर्शन, काँग्रेसचं काहीसं हेलकावणारं दर्शन, समाजवाद-साम्यवाद-मार्क्सवाद यातलं काहीही न कळणं (ती जागृती नंतरची होती) यांतून आमचं राजकीय बालपण आकाराला आलं.
पुढे मग वय वाढू लागलं तसं महत्त्वाकांक्षा आणि शरद पवार हे अद्वैत लक्षात आलं आणि महत्त्वाकांक्षेचा चेहरा शरद पवारांसारखा असतो, हे समजलं. (नंतर पुष्कळ वर्षांनी त्या जागी मोदींचा चेहरा आला!) शरद पवारांची राजकीय महत्त्वाकांक्षा हा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याच्या कानगोष्टी चालतात, असा विषय. नरेंद्र मोदींनी ज्या अनेकांच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लावला त्यात पवारसाहेबही होतेच. आम्हाला ज्यांच्याविषयी अतिशय आस्था होती आणि आहे, ते सध्या अदृश्य असलेले दिल्लीवासी आंदोलनधुरंधर अरविंद केजरीवाल असोत किंवा 'पण मी नक्की काय करायचं आहे?' हा भाव चेहऱ्यावर सतत असलेले राहुल गांधी असोत - मोदींनी त्यांचं काय केलं, ते सर्वश्रुत आहेच. आता महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हीदेखील युती होऊ शकते, हा भाग सोडा. कुणालाच स्पष्ट बहुमत नसताना निवडणूक निकालानंतर होणार्या घडामोडी हा राजकीय विश्लेषक, राजकीय भाकितं वर्तवणारे राजकीय ज्योतिषी या सगळ्यांना नापास करणारा प्रकार असतो.
तर महत्त्वाकांक्षा. महत्त्वाकांक्षा ही एक जालीम चीज आहे यात काहीच शंका नाही. (एरवी नारायण राणे महसूलमंत्री कसे होऊ शकतात?). महत्त्वाकांक्षेची इंटेंसिटी वेगवेगळी असू शकेल, पण महत्त्वाकांक्षा असतेच. आता देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवलेच घ्या. दोघेही आखाड्यात आहेत. एकाच बाजूने आहेत. पण शेवटी आठवलेंना आपलं स्थान माहीत आहे. त्यामुळे 'डिफरंस ऑफ अँबिशन' असतोच.
ही झाली महत्त्वाकांक्षेची पार्श्वभूमी. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आमचं दुःख वेगळंच आहे. ते हे की आम्हाला कुठलीच महत्त्वाकांक्षा म्हणून नाही; आणि ‘आमचं असं का?’ हा प्रश्न आम्हाला फार हैराण करतो. पवार-मोदी वगैरे सोडाच, पण आसपासच्या सगळ्यांनाच काही ना काही महत्त्वाकांक्षा असते. प्रत्येकाचा पर्सनल अजेंडा असतो. काही नाही तर लोक फेसबुकवर ग्रुप काढून त्याचे अॅडमिन व्हायची महत्त्वाकांक्षा बाळगून असतात. वर्तमानपत्रात एखाद्या कोपऱ्यात का असेना, पण आपलं नाव यावं अशी लोकांची कामना असते. ('सकाळ मुक्तपीठ'ने या कामनेची पोर्नोग्राफी केली!). कुणाला नगरसेवक व्हायचं असतं, कुणाला फार्महाऊस बांधायचं असतं, कुणाला एकदा तरी नायगारा बघायचा असतो. काही ना काही असतंच प्रत्येकाचं. अलीकडचाच किस्सा सांगतो. सकाळी पर्वतीवर धापा टाकत असताना आम्हाला एकदम एक खणखणीत 'गुड मॉर्निंग' ऐकू आलं आणि ’हे कोण बोललं’ म्हणून वळून पाहिलं; तर ओळखीतले एक 'अगं आणि अहो' होते. हातातल्या पिशवीतून काहीतरी बाहेर काढत ’अगं’ म्हणाल्या, "बरं झालं भेटलास ते. हे घे. अन्वयाच्या कथासंग्रहाचं प्रकाशन आहे." अन्वयाचा कथासंग्रह? अन्वया, वय वर्षे बावीस-तेवीस. झी मराठी आणि संबंधित वाहिन्यांनी सिरीयलच्या छापखान्यातून जे नवीन चेहरे समोर आणले त्यांपैकी एक अन्वयाही आहे. अत्यंत लाडिकपणे वागणं, सतत छान दिसणं आणि छान दिसत असताना ’हिला चारचा तरी पाढा नीट येतो का?” अशी शंका प्रेक्षकांना येईल याची खबरदारी घेत राहणं; ही कामं या सिरियल्समधली स्त्रीपात्रं इमाने इतबारे करत असतात. अन्वयाही ते करत होती. पण कथासंग्रह वगैरे? निमंत्रणपत्रिका पाहिली तर शीर्षक जबरा होतं - 'निःश्वासांच्या तळघरात'. बाप रे! "अन्वयाला फार वाटत होतं आपला कथासंग्रह यावा म्हणून…", ’अहो’ सांगू लागले, “तिचा पहिलाच संग्रह आहे.…नक्की ये हं कार्यक्रमाला." आग्रह करून ’अगं’ आणि ’अहो’ मार्गस्थ झाले आणि आमच्या मनात मात्र अपार खिन्नता दाटून आली.
अन्वयेने बाविसाव्या वर्षापर्यंत इतक्या कथा लिहिल्या? आणि त्या छापण्यायोग्य आहेत असंही कुणालातरी वाटलं? आणि हे सगळं अभिनय वगैरे सांभाळून? अभिनेत्री म्हणून काम करत असतानाही कथासंग्रह यावा ही महत्त्वाकांक्षा तिच्यात कुठून पैदा झाली असेल? आम्हाला एकदम आध्यात्मिक पातळीवरचं वाईट वाटू लागलं. मनुष्यजन्म हा एकदाच मिळतो आणि जे काही बरं-वाईट व्हायचं आहे, ते याच जन्मात होणार आहे अशी आमची साधारणपणे खात्रीच आहे. पण मग याच कारणामुळे चमकदार काही करून दाखवावं असं जे लोकांना वाटत असतं, ते आपल्याला का वाटत नाही? आपण सॉरी आहोत. आम्हाला चांगलीच टोचणी लागली. आता इथे फिरायला आलेले लोकच पाहा. प्रत्येकाला काही ना काही महत्त्वाकांक्षा असणार, प्रत्येकाचा काहीतरी अजेंडा असणार. आपण आपलं काम वगैरे करतो, पण आपल्यात ते 'फायर इन द बेली' म्हणतात ते नाही. नुसतीच ’बेली’ आहे. आपण समोर काही आलं, तर(च) घेतो. धावपळ नाही. पर्वतीच्या पायऱ्यांवरून बागडणारी लहान मुलंदेखील आमच्याकडे बघून तोंड वेंगाडून 'पण तुम्हाला महत्त्वाकांक्षा कुठाय?' असं विचारत आहेत, असा आम्हाला भास होऊ लागला. टोचणी फारच वाढली. ’रविवार म.टा.’मध्ये लेख छापून यावा म्हणून आपण काहीही धडपड करत नाही. नुसतं आपलं ’साहित्य साहित्य’ करतो, पण आपण आजवर एकही चमकदार विधान केलेलं नाही की एकच एक आग्रह लावून धरत वाद निर्माण केलेला नाही. साधी ’म.सा.प.’ची मेंबरशिप नाही घेतली आपण अजून! अशानं कसं होणार तुझं? आमच्या आतल्या आवाजाचे डेसिबल्स वाढू लागले. ’म.सा.प.’च्या पटवर्धन सभागृहात ओळीने लावलेले फोटो पाहिलेस ना? कृष्णशास्त्री चिपळूणकरांपासून बा. भ. बोरकरांपर्यंत? असाच राहिलास तर मसाप सोडाच, 'प्रकाशनविश्वा'तदेखील नाव-पत्ता येणार नाही. आणि अन्वयाचा येईल एके दिवशी...
आम्ही दचकलो! छे, छे! हे काही खरं नाही. आपण महत्त्वाकांक्षेला गांभीर्याने का बरं घेत नाही? आणि महत्त्वाकांक्षा म्हणजे सिकंदरचीच, सिकंदराएवढीच असावी असं कुठे आहे? 'प्रिय संपादक, कविता प्रसिद्ध करावी ही विनंती' असं पत्र, 'पुढच्या वर्षी असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंटची पोस्ट माझी असेल सांगतो तुला' असं म्हणणारा आपला शाळेपासूनचा मित्र किंवा 'मी म्हणणार आहे आता याला, कोथरूडला घेऊच आता फ्लॅट' असं तिच्या नवऱ्याला म्हणणारी आमची एक मैत्रीण, 'बंट्याला पुढच्या वर्षी सिंबायोसिस इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालणार' हा तिच्या नवऱ्याचा निर्धार… ही सारी तिचीच तर लहान-मोठी रूपं! असे सगळे अपवर्डली मोबाइल विचार आपल्या आजूबाजूच्या आसमंतात विहरत असताना आपला 'स्टेटस को' फारच दयनीय आहे, असं आम्हाला वाटू लागलं. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची पीछेहाट का झाली ते कळलंच एकदम आम्हाला. तृष्णेपासून सुटका वगैरे झूठ आहे. माणसाला महत्त्वाकांक्षा पाहिजे! महत्त्वाकांक्षेशिवाय माणूस म्हणजे मोबाइल फोनविना माणूस! महत्त्वाकांक्षेशिवाय माणूस म्हणजे नरेंद्र मोदींविषयी काहीच मतप्रदर्शन न करणारा माणूस! माणसाला महत्त्वाकांक्षा पाहिजे! बस!
आम्ही पर्वतीहून निघालो ते कमालीचे प्रेरित होऊन. तडक ’म.सा.प.’ गाठलं. मेंबरशिप घेतली. तिथून निघालो आणि 'प्रकाशन विश्वा'ची नवी-कोरी प्रत विकत घेतली. घरी आलो आणि चार-पाच मराठी मासिकांच्या वर्गणीची पाकिटं तयार केली. पोस्टात टाकली. मग फेसबुक उघडलं. तिथल्या गर्दीतून लेखक, कवी, समीक्षक शोधून काढले (अजिबात वेळ लागला नाही!) आणि सगळ्यांना मेसेजसह फ्रेंड रिक्वेस्टा पाठवल्या. त्यांची स्टेटसे आवडून घेणं सुरू केलं. साहित्यिक, सामाजिक, राजकीय चर्चांमधून भाग घेणं, मत नोंदवणं सुरू केलं. साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान, स्त्रीवाद, मार्क्सवाद, चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यशास्त्र, चित्रपट यांपैकी प्रत्येकाचं पोस्टमॉडर्निस्ट स्वरूप काय आहे, असा एक घनघोर अभ्यास सुरू केला. फुको, देरिदा प्रभृतींशी वैचारिक झटापट सुरू केली. 'आधुनिक स्कॉटिश कविता आपल्या अस्तित्वलक्ष्यी सांधेजोडणीतून उत्तरआधुनिकतेपुढे एक आव्हान उभे करू पाहत आहे आणि मराठी समीक्षकांचे तिकडे लक्षही नसावे, ही फार खेदाची गोष्ट आहे' असं एक स्टेटस हिंमत करून टाकलं. आणि काय आश्चर्य? त्यावर घमासान चर्चा सुरू झाली! मग तिला भाषाशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय, चिन्हमीमांसात्मक व इतर वळणं लागली. एका वळणादरम्यान एका तरुण कविमित्राने 'सोस्यूर सोस्यूर किती दिवस करणार आपण?' असं विधान केलं, तेव्हा आम्ही लगोलग 'हा बघा हो कसं करतोय…' असं म्हणून हरिश्चंद्र थोरातांना टॅग केलं. मर्ढेकरांचं 'सौंदर्य आणि साहित्य', रा. भा. पाटणकरांचं 'सौदर्यशास्त्र', कॉलिंगवुडचं 'कलेची मूलतत्त्वे', बाख्तीनचं दोस्तोव्हस्कीवरचं विवेचन असं सगळं वाचन सुरू केलं. पटवर्धन सभागृहातला एकही कार्यक्रम चुकवायचा नाही, असा निश्चय केला. शिवाय प्रमुख वक्त्यांच्या भाषणानंतर त्यांना भेटून 'तुमचं भाषण आवडलं…' अशी सुरुवात करून, 'पण मला काय वाटतं…' हे म्हणणं चालू केलं. वाङ्मयीन मासिकं वाचून (छे! अवघड आहे आमचं! ’वाङ्मयीन मासिकांचं परिशीलन करून' म्हणावं की नाही? पण जित्याची खोड - कुठल्याच नळकांड्यात घातली तरी सरळ होत नाही! (दोन म्हणी एकत्र झाल्या आहेत हे आम्हाला माहीत आहे. आम्ही सध्या भाषासमृद्धीसाठी हा एक नवीन प्रयोग करून बघत आहोत)) नियमित प्रतिसाद पाठवणं, ’प्रकाशन विश्वा’त पत्ते शोधून लेखकांना, समीक्षकांना पत्र पाठवणं सुरू केलं. विलास सारंगांचा पत्ता मिळवून 'तुमचा 'लेखकराव नेमाडे' हा लेख फारच आवडला. नेमाडेंच्या बाबतीत असं सडेतोड लिखाण कुणीतरी करायलाच हवं होतं' असं लिहिलं आणि नेमाडेंचा पत्ता मिळवून त्यांना 'तुमच्या साहित्याने आमच्यावर जो कालातीत प्रभाव टाकला आहे, त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न विलास सारंगांसारखे लेखक/समीक्षक करत आहेत; हे पाहून फार वाईट वाटतं' असं लिहिलं. मेघना पेठेंना पत्र लिहून 'नातिचरामी'बद्दल एकदा तुमच्याशी बोलायचं आहे' असं सांगितलं. मिलिंद बोकीलांना 'श्रीकांत उमरीकर आणि मंडळी काही म्हणोत, 'गवत्या' ही तुमची एक श्रेष्ठ कादंबरी आहे' अशी मेल केली. मीना प्रभूंच्या व्याख्यानाला हजेरी लावून 'प्रवासवर्णन म्हणजे साहित्य नव्हे, असं म्हणणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. पुलंच्या लंडनची ती 'अपूर्वाई', मग तुमच्या प्रवासवर्णनालाच का आक्षेप? ते काही नाही, मुंबईहून पनवेलला गेलात तरी प्रवासवर्णन लिहाच. आम्ही तुमच्या लेखनाचे चाहते आहोत. वाटल्यास स्त्रीवादाचा आधार घ्या, पण साहित्यिक शरणागती पत्करू नका.' अशी एक अनामिक चिठ्ठी संयोजकांकरवी पाठवली. अनिल अवचटांना फोन करून 'तुमची ओरिगामी बघायला यायची इच्छा आहे. त्यावर लेख लिहायचा विचार आहे. कधी सवड होईल?' असं विचारलं. ग्रामीण पार्श्वभूमीचं लेखन करणाऱ्या जुन्या आणि नव्या लेखक-कवींना पत्र लिहून 'मध्यमवर्गीय शहरी लेखकांमुळे अस्सल मराठी साहित्याची जी पीछेहाट झाली आहे, त्याला फक्त तुम्हीच उत्तर देऊ शकाल' असं कळवलं आणि एकीकडे 'महानगरी संवेदनेतून प्रकट होणारी असहायता ही ग्रामीण साहित्यातून प्रकटणाऱ्या असहायतेहून कनिष्ठ दर्जाची आहे असं म्हणणं, म्हणजे मानवी संवेदनेमध्येच भेद करणं आहे' असंही विधान केलं. मुक्तछंदवाल्या कवींना गझलेच्या आणि मराठी गझलेच्या मर्यादा दाखवल्या आणि गझलेचा कार्यक्रम ऐकून आल्यावर 'मुक्तछंद म्हणजे आत्मा हरवलेली कविता' अशी सुरुवात करून परीक्षण लिहिलं.
आम्ही चौफेर धडाका लावला होता. आमच्या डोळ्यासमोर व्यासंग (आणि नेटवर्क) वाढवताना अच्युत गोडबोलेंचा आदर्श होता, नाना पाटेकरांची भावुकता होती, सचिन पिळगावकरांची उमेद होती, रामदास आठवलेंची जिद्द होती! मनात आणलं तर रसायनशास्त्रातलं सौंदर्यशास्त्रसुद्धा उलगडून दाखवू, असा विश्वास आमच्या ठायी निर्माण होत होता. आमचं पर्वतीवरील नैराश्य कुठच्या कुठे पळून गेलं होतं. आम्ही आता 'लिटररी मोबाइल' झालो होतो. महत्त्वाकांक्षा निर्माण करायची आमची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली होती.
पण तुम्हाला सांगतो, आयुष्याची गती गूढ आहे. जग फिरल्याने, अनुभवाने आयुष्य समृद्ध होतं म्हणावं, तर जी.ए.कुलकर्णी यांनी धारवाडसारख्या ठिकाणी वर्षानुवर्षं राहून, कुठेही न फिरता इतकं अजोड साहित्य कसं निर्माण केलं? किंवा जग फिरूनही जीएंच्या तोडीचं लिहिता येत नाही, ते का? अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. अनेक उत्तरं बदलतात. त्यामुळे आपल्याला आज जे वाटतंय ते अंतिम आहे, अशा भ्रमात कुणीही राहू नये. आमचा महत्त्वाकांक्षेचा वारू उधळला असताना त्याला एके दिवशी अचानक लगाम बसला, आणि तोही एका सामान्य वाचकाकडूनच.
एका पुस्तकदालनात (जिंकलं! दुकान म्हणणार होतो, पण 'दालन' वेळेवर आठवलं!) संदर्भग्रंथ धुंडाळत असताना कानावर एक संवाद पडला. काही अंतरावर दोन मित्र पुस्तकं बघत होते. दोघे मध्यमवयीन होते. पेहरावावरून ग्रामीण भागातले वाटत होते. एकाच्या हातात दोन पुस्तकं होती. ती दुसऱ्याला दाखवत तो विचारत होता, "सांग की, कुठलं घेऊ?" दुसरा म्हणाला, "मी नाही रे बाबा वाचलेली ही दोन्ही." पहिला म्हणाला, "पण बघ तर-" आणि त्याने एक पुस्तक दुसऱ्याच्या हातात दिलं. दुसरा म्हणाला, "हे मार्क्सवादाबद्दलचं संशोधनात्मक पुस्तक आहे". मग पहिल्याने दुसरं पुस्तक मित्राच्या हातात दिलं. "हां, ही मार्क्सवादी लेखकाची कादंबरी आहे", दुसरा म्हणाला. "अच्छा, म्हणजे एकतर्फी आहे."
हे ऐकलं आणि आमच्या हातातलं पुस्तकच गळून पडलं. आपण बोधिवृक्षाखाली तर नाही ना, असा आम्हाला दोन क्षण भास झाला. 'बाबा रे कोण आहेस तू? दिसतोस तर अगदी साधासुधा. मग हे ज्ञान कुठून आलं तुला? '.धाडदिशी 'एकतर्फी' म्हणून त्याने मुद्दाच निकालात काढल्यानं आणि त्यात आमच्या वाङ्मयीन महत्त्वाकांक्षेला छेद देणारा जर्म उपस्थित असल्यानं, आम्ही अवाक झालो होतो. म्हणजे मार्क्सवादी संशोधन आणि मार्क्सवादी कादंबरी हे झालं उदाहरण. पण मग देशीवादी विचार आणि देशीवादी कादंबरी, अस्तित्ववादी विचार आणि अस्तित्ववादी कादंबरी, स्त्रीवादी विचार आणि स्त्रीवादी कादंबरी या सगळ्यातच संशोधन आणि कलाकृती, वस्तुनिष्ठपणा आणि एकारलेपण हा फरक आहे? म्हणजे लेखक प्रतिभावंत असला तरी अखेरीस तोही एकतर्फीच असतो? तो मनुष्य एका कादंबरीच्या बाबतीत हे म्हणाला. पण कथा, कविता, कुठलाही कलाप्रकार, आपण केलेली समीक्षा, आपले आग्रह ….आपण 'निर्माण' केलेलं काहीही एकतर्फीच का? मग ते भले ग्रँड असेल, पण एकतर्फी असतं? हो. आम्हाला 'हो'च म्हणावंसं वाटत होतं. कारण अखेरीस ते 'आपलं म्हणणं' असतं. लेखकही परस्परविरोधी पात्रं उभी करतो हे खरं, तो त्यांच्यात वादही घडवतो; पण शेवटी लेखकच 'बोलत' असतो. आणि कुठला लेखक 'बाजू'पासून मुक्त असतो?
उपेक्षित जगण्याचं दर्शन घडवणारी एखादी कलाकृतीदेखील एकतर्फी असू शकते. आणि एकतर्फी असणं काही नेहमीच वाईट असतं, असंही नाही. कधीकधी मुद्दा पटवण्यासाठी ते आवश्यकही असतं. 'एकतर्फी' शब्दातला नकारात्मक अर्थ बाजूला ठेवला, तर त्यातून 'लेखकाला प्रतीत होतंय ते' हा अर्थ दिसतो. एक मर्यादा या अर्थी. म्हणजे कलाकृतीचा उदो उदो करत असताना ही मर्यादा लक्षात ठेवली पाहिजे. पण मग सगळं जर एकतर्फी आहे, तर कुठलाही हट्ट धरून काही करणं निकालातच निघतं! आणि उरतं फक्त एकच - योग्य काय आणि अयोग्य काय, हा शोध!
हो ना? पण मग ते करणाऱ्या सच्च्या लेखकाचं काय? पाब्लो नेरुदासारख्या कवीवर विषप्रयोगाची शक्यता वर्तवली जाते किंवा कुठल्याही सच्च्या कलावंताची मुस्कटदाबी होते, तेव्हा तो 'एकतर्फी' विचार करत होता असं म्हणायचं? आणि मुळात संशोधनसुद्धा एकतर्फी नसतंच असं कुठे आहे? नाही म्हणजे नसावं ही अपेक्षा आहेच, पण खरंच तसं होतं का? विचारसरणी एकतर्फी नसते असं कुठं आहे? मग मार्क्सवादी लेखकच एकतर्फी का?
आता आम्हाला समोरची पुस्तकं दिसेनात; कसलेही साहित्यिक वाद-प्रतिवाद दिसेनात. कलावंताचं/लेखकाचं 'एकतर्फी' असणं पटू लागलेलं असतानाच आयडिऑलॉजीशी प्रामाणिक राहून सच्चेपणानं लेखन करणारे लेखकही दिसू लागले. पण या संघर्षात एक चांगलं झालं होतं. आमच्या महत्त्वाकांक्षेचे पंख मिटले गेले होते आणि लेखनातील सच्चेपणाचा शोध हा मुद्दा वर आला होता. आम्ही शांतपणे पुस्तक मिटून बाहेर आलो. समोर रस्ता वाहत होता. रस्त्याबरोबर माणसं वाहत होती, आणि आमच्या डोक्यात 'महत्त्वाकांक्षा वि. सच्चेपणा' हा नवा क्रायसिस निर्माण झाला होता!
आमच्या महत्त्वाकांक्षेचा आता अंत झालेला आहे, हे नोंदवायला हरकत नसावी. आम्हाला आता पूर्वीसारखं महत्त्वाकांक्षाविरहित, साधं-सरळ वाटू लागलं आहे; आणि असं वाटणं कसंही असलं, तरी ते एकतर्फी नसतं याचं आम्हाला समाधान वाटतं आहे!
(आता या वाटण्याला काय म्हणणार? प्लीज 'एकतर्फी' म्हणू नका कुणी…)
विशेषांक प्रकार
योगायोगाने कालच उत्पलचा
योगायोगाने कालच उत्पलचा गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकातला लेख वाचला. आणि आज हा लेख.
चेहर्यावरून भोट दिसणारा, पण अंतर्यामी महाबेरकी असणारा मनुष्यविशेष मित्रांच्या मैफिलीत शांत-निर्विकार चेहर्यानं पोतडीतून एकेक पिलू बाहेर सोडत आहे (वर म्हणी मिसळण्याबद्दल वाचले बॉ काहीतरी..) आणि मित्रमंडळ सैरावैरा हसून भुईसपाट झाले आहे, असे चित्र डोळ्यांसमोर आले. (बाकी अमुकाचे कौतुक फारच झाले आहे यंदा (नाही म्हटले तरी पोटात दुखतेच). पण या दोन लेखांच्या लेखकाचे एक फर्मास चित्र अमुकरावांनी रेखाटले, तर ते 'ऐसी'चे खरे रेखाटनकार. एरवी कौतुक काय आम्ही गेल्या साली घासूगुर्जींचेही केले होते, त्याला काय लागते?)
बाकी लेखाबद्दल काय लिहिणे? दिवाळी टू दिवाळी का होईना, आमच्यावर आपली कृपा राहू द्या, ही विनंती.
"साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान,
"साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान, स्त्रीवाद, मार्क्सवाद, चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यशास्त्र, चित्रपट यांपैकी प्रत्येकाचं पोस्टमॉडर्निस्ट स्वरूप काय आहे, असा एक घनघोर अभ्यास सुरू केला. फुको, देरिदा प्रभृतींशी वैचारिक झटापट सुरू केली. 'आधुनिक स्कॉटिश कविता आपल्या अस्तित्वलक्ष्यी सांधेजोडणीतून उत्तरआधुनिकतेपुढे एक आव्हान उभे करू पाहत आहे आणि मराठी समीक्षकांचे तिकडे लक्षही नसावे, ही फार खेदाची गोष्ट आहे' असं एक स्टेटस हिंमत करून टाकलं. आणि काय आश्चर्य? त्यावर घमासान चर्चा सुरू झाली! मग तिला भाषाशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय, चिन्हमीमांसात्मक व इतर वळणं लागली. एका वळणादरम्यान एका तरुण कविमित्राने 'सोस्यूर सोस्यूर किती दिवस करणार आपण?' असं विधान केलं, तेव्हा आम्ही लगोलग 'हा बघा हो कसं करतोय…' असं म्हणून हरिश्चंद्र थोरातांना टॅग केलं. मर्ढेकरांचं 'सौंदर्य आणि साहित्य', रा. भा. पाटणकरांचं 'सौदर्यशास्त्र', कॉलिंगवुडचं 'कलेची मूलतत्त्वे', बाख्तीनचं दोस्तोव्हस्कीवरचं विवेचन असं सगळं वाचन सुरू केलं. पटवर्धन सभागृहातला एकही कार्यक्रम चुकवायचा नाही, असा निश्चय केला"
दंडवत!!!!!!
_/|\_
खास उत्पल लेख!
लेख म्हणजे खवचटपणाची हद्द आहे!
जित्याची खोड - कुठल्याच नळकांड्यात घातली तरी सरळ होत नाही!
महत्त्वाकांक्षेचा चेहरा शरद पवारांसारखा असतो, हे समजलं.
महत्त्वाकांक्षेशिवाय माणूस म्हणजे मोबाइल फोनविना माणूस!
अशी मौक्तिके असलेला लेख तुम्ही सोडून दुसरं कोण लिहिणार! महान आहात, दंडवत स्विकारावा.
पुढील वर्षी अंक काढताना, अंकात उत्पल यांचा आतिशबाजी करणारा लेख नसेल तर मजा येत नाही याची संपादकांनी नोंद घ्यावी.
अतिशय आवडला
मध्येच मला "खाजगी पुणेकरातून सार्वजनिक पुणेकर" होताय की काय वाटू लागले होते नी आता तुमच्या जाहिर सत्काराचं भाषण ऐकायला उत्सुक होतो, पण छ्या! आता महत्त्वाकांक्षाच सोडलीत म्हटल्यावर अनेक उत्साही "पुणेरी" भाषणप्रेमींचा विरस झाला असणार!
लेख अतिशय खवचट्ट आहे (म्हणूनच अतिशय आवडला)
मस्त जमला आहे लेख!
मस्त जमला आहे लेख! "आम्ही पर्वतीहून निघालो ते कमालीचे ...................अशी सुरुवात करून परीक्षण लिहिलं." या भागाला परत एकदा दाद!
बाय द वे, तुझ्या ब्लॉगवर कुठेतरी तू ".......एके काळी पुलंचं लिखाण खूप वाचायचो. पण I have moved past that station now......" अशा अर्थाचं लिहिलं होतंस. हा लेख वाचून "खरंच का?" विचारावंस वाटतंय. ;) का "संपादक क्षमा करा" आणि "माझी कै (हाय!) पुस्तके" नुकतंच परत एकदा वाचलंस आणि या लेखनाची स्फुर्ती मिळाली? !! बुकमार्क करून ठेवलाय लेख...
आभार!
अदिती, मेघना, प्रकाश घाटपांडे, आदूबाळ, राजे, रुची, ऋषिकेश, टिंकू, रूपाली जगदाळे, ओ नाम्या, मिसळपाव, अनूप ढेरे, राजेश घासकडवी, मंदार जोगळेकर - प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार!
मिसळपाव - हो…पुलंचं स्टेशन सोडलं असं मी लिहिलं आहे त्या लेखात. ते वाचनाच्या बाबतीत आहे. विनोदी लेखनाच्या बाबतीत विचारशील तर गाडी अजून तिथेच आहे हे मी अगदीच मान्य करतो. मला विनोदी 'सुचतं' तेच पुलंच्या शैलीत…आणि त्यामुळे मी काहीसा हताशही होत असतो. वाचकांनाही पुलंचा प्रभाव जाणवत असणारच. त्या प्रभावापासून मुक्त होऊन लिहिलं पाहिजे हे मला सतत जाणवतं, पण अजून तरी म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. ते लवकर मिळावं ही माझी इच्छा आहे.'ऐसी अक्षरे' वरील माझ्या या व इतर लेखांवर पुलंचा प्रभाव कसा-कितपत जाणवतो याबाबत वाचक-लेखक सभासदांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल…
उत्पल
कोपरखळ्या आवडल्या.
गतवर्षीप्रमाणेच या वर्षीच्या कोपरखळ्या आवडल्या.
पण...
आयडिऑलॉजीशी प्रामाणिक राहून सच्चेपणानं लेखन करणार्यांच्या उदाहरणांमुळे तुमच्यातल्या महत्त्वाकांक्षेचा लोप होतोय ? छया: .. फारच महत्त्वाकांक्षी ब्वॉ तुम्ही ! :)
---
अवांतर :
एकीकडे हा लेख आणि दुसरीकडे 'क्रमांक एकचा प्रयत्न मराठी माणसाने केला नाही.' असा लेख एकाच अंकात छापून 'ऐसी..'ने आपण कुणीकडचेच नाही, असा एकतर्फी ष्ट्यांड घेतला काय ? ;)
स्वाभाविकरीत्या
स्वाभाविकरीत्या जर प्रभाव येत असेल तर काय हरकत आहे? ओढूनताणून प्रयत्न केलेला सहसा कळतो व हा लेख नक्कीच तसा वाटत नाही.
हे म्हणजे सेहवाग ने सचिन सारखा सुंदर स्ट्रेट ड्राइव्ह मारून फोर घेतल्यावर सगळे प्रशंसा करत असताना त्याने स्वतः 'अरे पण फारच सचिन सारखा बसला शॉट' असे म्हंटल्यासारखे होईल :)
(लेख खूप आवडलेला आहे हे पुन्हा एकदा सांगतो. कारण प्रतिक्रिया विनोदात भरकटल्या की कधीकधी मूळ मत काय आहे कळत नाही)
शैली तर आहेच न्युनगंड देखील अगदि पु,ल. चा सेम टु सेम उचललाय !
ज्या काळात (थोड पुढे मागे )विलास सारंग सिसीफस आणि बेलाक्वा सारखी अप्रतिम पुस्तके ( त्यातील लेख जे सत्यकथा आदि त एकेक करुन प्रसिध्द झाले त्या काळात) लिहीत होते. जागतिक साहित्याचा खास करुन अस्तित्ववाद आदि साहित्याचा समर्थपणे गंभीर वेध घेत होते. त्याच काळात( थोड पुढे मागे) असेल पु.ल. देशपांडे खुर्च्या आदि भिकार विनोदी लेख आयनेस्को सारख्या दिग्गजांची टिंगल उडवणारे लिहीत होते.
आणि सारंग अचुक म्हणतात तस हेमिंग्वे च्या अफाट म्हातारयाला एका कोळीयाने लिहुन छान घरगुती माणसाळवुन मराठी करुन घेत होते.
पु.ल. नी लखु रीसबुड हे स्वत:च आत्मचरीत्र च लिहीलय अशी दाट शंका राहुन राहुन येते.
तसाच अॅप्रोच तुमच्या लिखाणात हि दिसला.
तोच न्युनगंड तेच स्वतःच्या कमतरतांना उणीवांना हसता हसता विनोदातुन कुरवाळुन घेण. त्याच कौतुक करुन घेण.
किंवा कधी नव्हे ती मराठीत एके काळी सौंदर्य शास्त्रावर अभुतपुर्व ओरिजीनल असे नवे विचार मांडणार महामंथन सुरु होत मर्ढेकर रा.भा. पाटणकर आदि महान मराठी साहित्यीक त्यात आपल योगदान देत होते तेव्हा कॉन्ट्रीब्युट करण्याची क्षमता नसलेले ट्रोलर पु.ल. तेव्हा कुठला तो एक भिकार विनोदी लेख एक सौंदर्यवाचक विधान का काय नावाच लिहुन स्वतःला कुरवाळत होते.
हु इज ट्रोलिंग?
सारंग पुलंबद्दल काय म्हणतात हे पुर्वीच माहित असलेले विधान आणि तुमची थोडीशी चिडचिड ह्यापलिकडे तुम्ही पुलंबद्दल काही समिक्षा म्हणावे असे काही लिहिलेले दिसले नाही, 'भिकार, ट्रोलिंग' वगैरे शब्दातून तुमची पुलंबद्दल असलेली सल व्यक्त झाली पण त्या 'खुर्च्या' लेखाबद्दल किंवा इतर काही लिखाणाबद्दल काही समिक्षा तुमच्याकडून वाचायला मिळेल काय?
खुर्च्या
मारवा, खुर्च्या चा ओरिजिनल लेख मी वाचलेला नाही, पण खुर्च्या हा लेख त्या मूळ लेखाची टिंगल उडवणारा मला कधीच वाटला नाही. इतर भाषेतील कलाकृतीचा अनुवाद करताना मठ्ठपणे तो करणे (याची उदाहरणे आत्ता सुद्धा अनेक दिसतात. चेतन भगतच्या पुस्तकांचे अनुवाद वाचले तेव्हा तसेच वाटले होते. हॉरिझॉण्टल ला "आडवे" च्या ऐवजी "क्षितीजसमांतर पातळीत" वगैरे :)), "कलात्मक" नाटक वाली मंडळी व स्वतःला जाणकार समजणारे काही प्रेक्षक यांचा आपण काहीतरी इतरांपेक्षा वरच्या लेव्हलचे, इतरांना न समजणारे करत आहोत असा आविर्भाव इ ची खिल्ली उडवणारा असाच वाटतो. ते ही कोणावर वैयक्तिक टीका न करता.
(मला स्वतःला खुर्च्या हा पुलंच्या मला सर्वात आवडणार्या लेखांपैकी एक वाटतो. त्यातील तो लंबाचौडा भाषांतरित संवाद जो आहे "...मुक्तिदिनाच्या दिवशी करावा लागेल" असे काहीतरी असलेला, तो वाचताना प्रत्येक वेळी हसून लोळल्याशिवाय राहात नाही)
मारवा, खुर्च्या चा ओरिजिनल
मारवा, खुर्च्या चा ओरिजिनल लेख मी वाचलेला नाही, पण खुर्च्या हा लेख त्या मूळ लेखाची टिंगल उडवणारा मला कधीच वाटला नाही
माझ्या अल्प माहीती प्रमाणे तुम्ही काय म्हणताय ते मला कळत नाही. खुर्च्या ह त्या मुळ लेखाची टींगल उडवणारा वाटला नाही
???
http://en.wikipedia.org/wiki/The_Chairs
ते माझ्या माहीतीप्रमाणे वरील मुळ नाटकाची खिल्ली उडव्णारा आहे.
शेरतुकडे कुटुंबातीलच एखादा
शेरतुकडे कुटुंबातीलच एखादा तुकडा असावा. ;)
अवांतरः ऐसीवरच मध्ये पुलंवर टीका केली होती तेव्हा सगळे पिसाळले होते. पण काही वैचारिक लेख पाहिले तर 'सदाशिवपेठी आड्यन्सला रडवायला बरं आहे' इतपतच वाटले होते. ते एक असोच.
आपला आड्यन्स नेहमी डंब अॅज़ फक आहे असे पुलंना कायम वाटायचे की काय कोण जाणे. वपु अन दवण्यांचे बाप वाटतील अशी वाक्ये पुलंनीही चिकार प्रसवली आहेत. पण त्यांच्या तुफान विनोदबुद्धीमुळे अन कमालीच्या प्रभावी निरीक्षणशक्तीमुळे त्यांनी पहिल्या दर्जाचे जे वाङ्मय लिहिले त्याच्या प्रभावाखाली हे झाकोळून जाते - अँड राईटलि सो.
फारएण्ड : आभार!तुम्हाला लेख
फारएण्ड : आभार!तुम्हाला लेख आवडला याचा आनंद झाला...या दिवाळी अंकातली तुमची मुलाखत अजून वाचायची आहे. सगळाच अंक खरं तर नीट वाचायचा आहे अजून...
मारवा : प्रतिसादाबद्द्ल आभार...तुम्ही म्हणताय ते आक्षेप अनेकांकडून पुलंच्या बाबतीत घेतले गेले आहेत. आणि त्यात तथ्य आहे. विलास सारंगांनी पुलंच्या 'एका कोळीयाने'ची केलेली समीक्षा मला आवडली होती. ('अक्षरांचा श्रम केला'मध्ये तो लेख आहे.) विनोदाकडे बघायच्या दृष्टीबाबत मतभिन्नता असू शकते आणि ती मान्य केली पाहिजे. पुलंमुळे इतर महत्त्वाच्या लेखकांच्या साहित्याकडे मराठी मध्यमवर्गाचं दुर्लक्ष झालं हे खरं आहे. पुलंवर मी लिहिलेल्या लेखाची ब्लॉग लिंक इथे देत आहे. माझे इतर काही लेखही या ब्लॉगवर आहेत. त्यावरील तुमची प्रतिक्रिया ऐकायला मला आवडेल. माझा मेल आयडी - utpalvb@gmail.com
http://mindwithoutmeasure.blogspot.in/2013/06/blog-post.html
'सायलेंट मोडमधल्या कविता' हा माझा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.
धन्यवाद
उत्पल
"पुलप्रभावाचं काय करायचं यावर विचार करतो आहे..."
पुलप्रभावाचं काय करायचं यावर विचार करतो आहे...
का? फारएण्ड आणि मेघनाची री ओढून विचारतो, का? (अरविंदराव, हे वाचत असला तर - 'री ओढणं' कुठनं आलं हो?). फारएण्डने चपखल शब्दात मांडलंय - "हे म्हणजे सेहवागने....". आणि त्याने म्हंटल्याप्रमाणे ते ओढून-ताणूनहि वाटत नाहिये. अरे निव्वळ दहा वेळा एखाद्याचं साहित्य वाचून शैली आत्मसात करता आली असती तर काय, एखादि कॉलेज कन्यका क्लोझेट मधले दोनशे ड्रेसेस निरखत "आज कुठला बरं घालू?" विचार करते तशी माझी अवस्था झाली असती - "कोणाच्या बरं शैलीत हा प्रतिसाद लिहू?" ;-) :-)
हां आता तुझं पुलंबद्दलचं मत 'मारवा' सारखं टोकाचं असलं (बाय द वे, त्याची प्रतिक्रिया वाचून "जाने दो भाय, पियेला है बेचारा" म्हणावसं वाटलं !!) तर ठिकाय. पण तसंहि काहि वाटंत नाहिये.
तस्मात वत्सा, लिहित रहा, लिहित रहा...
आणि खरं अजून एक - "
पुलंमुळे इतर महत्त्वाच्या लेखकांच्या साहित्याकडे मराठी मध्यमवर्गाचं दुर्लक्ष झालं हे खरं आहे.
" हंSSSSS. नाहि बरोबर आहे. चुकलंच त्यांचं. इतकं चतुरस्त्र लिखाण सातत्याने करतात म्हणजे काय? लता, सचिन वगैरे सगळ्याना धारेवरच धरायला हवंय एकदा. छ्या, अप्रतिम कामगिरी करून किती जणांचं नुकसान केलंय ना त्यानी......
उच्च दर्जाचा विनोद आणि
उच्च दर्जाचा विनोद आणि त्याचबरोबर प्रवचनी न होता सहजगत्या दिलेला संदेश हे एकत्र आणणं कठीण असतं. शाब्दिक आणि वाक्याच्या पातळीवर अनेकांना या लेखनात पुलंची झाक जाणवली. पण आख्ख्या निबंधाची मांडणी आणि त्यातून एका प्रवृत्तीची खिल्ली उडवणं हे अनेक उत्कृष्ट विनोदी लेखक करताना दिसतात. किंबहुना मी म्हणेन अनेक उत्कृष्ट लेखक करतात, त्यातले काही विनोदाचा वापर करतात.
मला हा लेख वाचताना विलियम गोल्डिंगच्या एका लेखाची आठवण आली. शैली म्हणून नव्हे, पण जातकुळी म्हणून त्यांत मला साम्य वाटलं.
मेघना, राजेश - प्रतिसादाबद्दल
मेघना, राजेश - प्रतिसादाबद्दल आभार….
'खुर्च्या' बाबत अस्वल, मेघना, फारएण्ड - अतिशय सहमत. काहीच्या काही अफाट लेख आहे तो…
मेघना - स्वतःचं म्हणण्यासारखं असं आहेच. ते इतर फॉर्म्समधून (कविता, ललित लेख) मांडलंही गेलं आहे. फक्त विनोदी लेखनात जी सुरसुरी येते तिच्या मुळाशी पुलंची शैली असते आणि मुख्य म्हणजे ती सहजगत्या उपस्थित असते. मी मागे म्हटलं तसं, मला 'सुचतं'च त्या शैलीत…'जाताना ते थोडंफार देऊन जातात' हे मात्र एकदम पटलं!
मिसळपाव - प्रतिसादाबद्दल आभार….आणि प्रोत्साहनाबद्दलही….
पुलंमुळे मध्यमवर्गाचं इतर लेखकांकडे दुर्लक्ष झालं असं म्हणताना खरं तर माझ्या डोळ्यांपुढे टीनएजमधला, पंचविशीच्या आतला मीच होतो. (ब्लॉगवरील लेखात मी ते सविस्तर मांडलं आहे). 'तुझ्याकडे पुलंचं अमुक एक पुस्तक आहे का?' हा प्रश्न मला अपमानास्पद वाटे. वाचकांवर विलक्षण प्रभाव टाकेल असं लेखन करणं हा पुलंचा दोष नव्हताच, पण 'तुझे आहे तुजपाशी' जवळजवळ रोज वाचणारा मी पुढे एकदा माझ्याहून वडील असणाऱ्या एका ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ता मित्रांच्या त्या नाटकावरील प्रतिक्रियेमुळे विचारात पडलो होतो. सुधीर बेडेकरांशी बोलताना देखील त्यांनी 'तुझे आहे तुजपाशी'वर सौम्य नकारात्मक टिप्पणी केली होती. मध्यमवर्गात किंवा एकूणच लोकांमध्ये चळवळ, समाजपरिवर्तन याबाबत प्रत्यक्ष कार्य करण्याइतपत आस्था नसते. चळवळीला सहानुभूती नक्कीच असते. 'कुठलाही अपराधीभाव न बाळगता आयुष्याचा बिनधास्त आस्वाद घ्या' हे सांगत या नाटकातून पुलंनी चळवळीवर नकारात्मक परिणाम केला असं त्यांचं मत होतं.
आता या मतावरही वाद होऊ शकतो. कलाकृती ही कलाकृती आहे आणि तिचा आस्वाद घेताना वाचक-प्रेक्षकांकडून सुजाणतेची अपेक्षा आहे असं म्हणता येतंच. मी स्वतः सर्वोदयी घरात वाढलो. पुलंनी विनोबांवर एक चांगला ('गणगोत'मध्ये आहे) आणि एक त्यांच्या शैलीत, आणीबाणीच्या काळात विनोबांचा समाचार घेणारा ('खिल्ली'मध्ये आहे) असे दोन लेख लिहिले. पण त्यामुळे मी विनोबांना अजिबात कमी लेखलं नाही. मराठीत त्यांचं वैचारिक योगदान महत्त्वाचं आहे हे मला वाटतंच. पुलंनी बाबा आमटेंविषयी भरभरून लिहिलं आहे. पण माझ्या वडिलांनी बाबा आमटेंनी गावकऱ्यांची जमीन बळकावल्याविरुद्ध सत्याग्रह केला होता आणि 'आनंदवना'त सर्वत्र 'आनंदीआनंद' नाही हे पुढे इतरही वाचनातून, लोकांशी बोलण्यातून लक्षात आलं होतं. वर्ध्याला गेलो असताना एका कार्यकर्त्याने 'बाबा आमटेंबद्दल पुण्या-मुंबईकडे फार प्रेम आहे. पुलंनी त्याला खूप हातभार लावला आहे. पण इथे तसं नाही. कारण इथे आम्हाला आतल्या गोष्टीही कळत असतात.' असं सांगितलं होतं.
त्यामुळे प्रश्न उरतो तो लोकांवरील प्रभावाचा. सर्वच वाचक 'न्यूट्रल' राहून वाचन करू शकतात का? वाचकाचा 'भक्त' होणं फार वाईट. विरोधी मत खरंच पटलं नाही म्हणून मान्य नसणं हे ठीकच, पण त्याकडे लक्ष मात्र द्यावं असं मला वाटतं.
पुलंचं लिखाण चतुरस्त्र आहे असं तू म्हणतो आहेस ते अगदी बरोबर आहे. शिवाय भंकस करावी ती पुलंनीच! त्याबाबतीत ते माझ्यासह अनेकांचे गुरू होते हे आपण सगळेच मान्य करू. पण साहित्याचा विचार करताना तो सर्वलक्ष्यी झाला की आपल्याला इतर काही कंगोरे दिसू लागतात. सचिन उत्तम क्रिकेटर आहे यात शंकाच नाही, पण जेव्हा तो 'देव' वगैरे होऊ लागतो तेव्हा एक मूलभूत गडबड होते. लताबाई बेस्ट गातातच (की गायच्या?), पण त्यांच्यापेक्षा चांगलं कुणीच नाही असं म्हटलं की एक मूलभूत गडबड होते. व्यक्तीपूजेचा धोका आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. तो प्रत्येक क्षेत्रात असतो तसाच साहित्यातही आहे.
आता पुढचा मुद्दा हा की हा दोष त्या कलाकाराचा की लोकांचा? सचिन कधीच म्हणाला नाही की मला देवत्व बहाल करा म्हणून. लताबाईंनी फक्त गाणी म्हटली. त्यांना सर्वोच्च पद लोकांनी दिलं. इथे आता मला काही म्हणावसं वाटतं. भाबडेपणा वाटेल, पण तरी म्हणतोच. कलाकाराला जेव्हा हे समजतं की आपण अफाट लोकप्रिय होत आहोत, प्रसंगी लोक वेडेपणाच्या पातळीवर जाऊन आपल्यावर प्रेम करत आहेत, तेव्हा त्याने काही भूमिका घ्यावी की नाही? आपल्या कलेच्या, कौशल्याच्या बळावर जेव्हा आपण एका उंच जागी पोचतो तेव्हा आपली जबाबदारी वाढते की नाही? यावर माझं उत्तर 'हो' असं आहे. सचिनने असं वेळोवेळी केलं असेल आणि देवत्वापासून मुक्त व्हायचा प्रयत्न केला असेल तर ते मला आश्वासक वाटतं. लताबाईंनी इतरांच्या गाण्याचं कौतुक केलं असेल (इतर म्हणजे समकालीन, सारेगमप लिटल चँप्स नव्हेत) तर ती चांगली गोष्ट आहे.
पुलंच्या बाबतीत मात्र हे घडलेलं आहे. त्यांनी अनेकांच्या साहित्याची ओळख करून दिली. त्यांचा 'कोसला'वरचा लेख वाचून मी कोसला वाचली. आणि पुढे मग नेमाडे, भाऊ पाध्ये, दिलीप चित्रे, रंगनाथ पठारे अशा इतर लेखकांकडे वळलो. नेमाडे पुलंचा राग करीत, पण कोसलाची मुक्त प्रशंसा करताना पुलंनी तो अडसर येऊ दिला नाही. भाऊ पाध्येंचा मात्र त्यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला आहे. ('अघळपघळ'मधील एक लेख). अलीकडे पुलंचं 'गाठोडं' नावाचं पुस्तक आलं. पुलंचं पुस्तक माझ्या घरी नाही असं होत नाही, पण एका पुस्तक प्रदर्शनात 'गाठोडं' चाळून मी ठेवून दिलं आणि भाऊ पाध्यांची 'राडा' विकत घेतली तेव्हा मला मौज वाटली माझीच.
पुलंबाबत माझं मत अर्थातच टोकाचं नाही. पुलं आणि नेमाडे असे दोन परस्परविरोधी प्रभाव माझ्यावर आहेत. पण हे म्हणताना, 'त्यांचा प्रभाव आहे - भक्तीभाव नाही' हे मुद्दाम सांगावसं वाटतं. दोघांचीही बलस्थानं आहेत, तशीच कमकुवत स्थानंही आहेत. आणि मुळात साहित्य हे 'उत्पादन' नव्हे आणि असलंच तर ते एकाच 'क्वालिटी कंट्रोल मेथड'ने न मोजता येणारं सांस्कृतिक उत्पादन आहे. त्यामुळे विविध प्रकारचं लेखन यावं, त्यावर कुणाला मत मांडावंसं वाटेल तर त्यांनी मांडावं. विचारही मांडले जावेत. पण लेखकांनी आपापसात आणि वाचकांनी आपापसात संवादाच्या जागा कायम मोकळ्या ठेवाव्यात.
उत्पल
महत्त्वाचे
त्यामुळे प्रश्न उरतो तो लोकांवरील प्रभावाचा. सर्वच वाचक 'न्यूट्रल' राहून वाचन करू शकतात का? वाचकाचा 'भक्त' होणं फार वाईट. विरोधी मत खरंच पटलं नाही म्हणून मान्य नसणं हे ठीकच, पण त्याकडे लक्ष मात्र द्यावं असं मला वाटतं.
हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. पुलंच्या पलिकडे बहुतांश मराठी वाचकाचा व्यासंग नाही, पुलंनी कोसलाची प्रस्तावना/लेख लिहिला आणि तुमच्याप्रमाणेच बहुतांशांनी निदान कोसला वाचली, म्हणजे मराठी वाचकांना इतर चांगल्या लेखनाची ओळख करुन देण्याची शक्यता पुलंकडे इतरांपेक्षा अधिक होती पण ते फारसे न घडता त्यांनी नर्मविनोदी शैलीत इतरांची जी खिल्ली उडवली त्याचा नकारात्मक परिणांम वाचकांवर झाला, अर्थात ह्यासगळ्यासाठी पुलंना जबाबदार धरणे मला वैयक्तिकरित्या योग्य वाटते.
उदाहरणे
म्हणजे मराठी वाचकांना इतर चांगल्या लेखनाची ओळख करुन देण्याची शक्यता पुलंकडे इतरांपेक्षा अधिक होती पण ते फारसे न घडता त्यांनी नर्मविनोदी शैलीत इतरांची जी खिल्ली उडवली त्याचा नकारात्मक परिणांम वाचकांवर झाला, अर्थात ह्यासगळ्यासाठी पुलंना जबाबदार धरणे मला वैयक्तिकरित्या योग्य वाटते. कोणती उदाहरणे तुमच्या डोक्यात आहेत? पुलंनी सहसा खिल्ली लोकांच्या वागण्याची उडवलेली आहे. लेखकांची वा कलाकृतींची नाही. एखाद दुसरा अपवाद असेल, पण तो अपवादच. साहित्य, कला विश्वात काही परिणाम करण्याएवढं त्यात काही नव्हतं. गोदू, खुर्च्यां बद्दल तर त्याच्या अनेक वाचकांना मूळ लेखक कोण आहेत ते ही दुसर्या दिवशी लक्षात नसेल.
पुलंच्या पलिकडे बहुतांश मराठी वाचकाचा व्यासंग नाही, >> हे ही तितकेसे बरोबर नाही. मी लहानपणा पासून लायब्रर्यांमधे किती लोक पुस्तके घेउन जात ते बघितलेले आहे. लोक भरपूर कादंबर्या, किंवा 'लाइट रीडिंग मटेरियल' वाचत असत. वपु वाचणारे भरपूर होते, मतकरी, सुशि, रमेश मंत्री यांचेही वाचक भरपूर होते. आता त्या पलिकडे सर्वसामान्य मराठी लोक गेले नाहीत याच्याशी पुलंचा काय संबंध? तो दोष एकतर वाचकांचा असेल ("वैचारिक आळशीपणा"), किंवा त्या हाय लेव्हलचे समजले गेलेल्या लेखकांचा (दुर्बोधता).
संबंध
एका कोळियाने वाचलेले तसे कमी असावेत, पण विलास सारंगांनी टिका केल्यावर एका कोळीयाने आणि ओल्ड मॅन अन्ड दि सि वाचणारे अनेक असावेत, हा प्रभाव लेखकाचा असतो. हेच कोसलाबाबत सिद्ध होते.
आता त्या पलिकडे सर्वसामान्य मराठी लोक गेले नाहीत याच्याशी पुलंचा काय संबंध?
लेखकाचा संबंध मी स्पष्ट केला आहे.
तो दोष एकतर वाचकांचा असेल ("वैचारिक आळशीपणा"), किंवा त्या हाय लेव्हलचे समजले गेलेल्या लेखकांचा (दुर्बोधता).
अर्थात आळशीपणा आहेच, पण दुर्बोधता असेलच असे नाही, उत्तम साहित्याची माहिती नसणे हि प्रस्थापित वाचकवर्तुळाची(त्यात लेखकही आलेच) मर्यादा मानता यावी. दोष पुलंना द्यावा हे माझे वैयक्तिक मत आहे.
एक उदाहरण म्हणजे, उत्पल ह्यांनी लिहिल्याप्रमाणे 'तुज आहे तुजपाशी' वाचुन विनोबांच्या(तत्सम) लेखनाची टर उडवणे सोपे होते, अर्थात ते विनोबांना(तत्सम) उद्देशुन आहे हे अनेकांना कळत नाही हेही खरेच.
बरोबर आहे
हा प्रभाव लेखकाचा असतो. हेच कोसलाबाबत सिद्ध होते. >>> बरोबर आहे. माझे म्हणणे एवढेच आहे की तो प्रभाव लोकांना कुतूहल निर्माण करण्याएवढाच असतो. एखाद्याने तारीफ केली किंवा टीका केली म्हणून दुसर्या लेखकाची पुस्तकेच कोणी वाचत नसेल असे वाटत नाही.
दोष पुलंना द्यावा हे माझे वैयक्तिक मत आहे. समजले. आणि त्याचा आदर आहेच.
उत्पल जी
नवकवी, नवचित्रकार यांची पुलंनी बरेचदा चेष्टा केली आहे. पण त्यांचा रोख व्यक्तीकडे नसायचा. 'नवकविते'कडे किंवा 'नवचित्रा'कडे असायचा. ते 'ओल्ड स्कूल'चे होते. इंटेन्स होते. सिनिक नव्हते. प्रतीकात्मकता, दुर्बोध मांडणी याचा धसका घेणारे होते. पण म्हणून ते कलाकृतीचा समाचार घ्यायचे. कलाकाराचा नाही. 'थिएटर ऑफ द अॅब्सर्ड' या प्रवाहातील एक प्रमुख नाटककार युजीन आयनेस्को याच्या 'द चेअर्स' या नाटकाचं 'खुर्च्या : भाड्याने आणलेल्या' हे विडंबन किंवा बेकेटच्या 'वेटिंग फॉर गोदो'चं 'गोदूची वाट' हे विडंबन अफाट आहे. मूळ नाटके मी पाहिलेली किंवा वाचलेली नाहीत हे इथे आवर्जून नोंदवतो. कदाचित पाहिली तर ती आवडतीलही, पण पुलंच्या टीकात्मक विडंबनाने जी मजा आली तिला तोड नाही. आता 'मजा आली' म्हटल्याने कदाचित काही भुवया उंचावतील,
उत्पल जी सर्वप्रथम तुम्हाला दिलेला प्रतिसाद तीक्ष्ण होता व त्याने तुम्ही नकळत दुखावला असाल असे वाटते त्यासाठी अगोदर माफी मागतो. मात्र तो असा व्यक्तीगत हेतुने ठरवुन दिला नव्हता हे ही नमुद करतो.
तुमचा ब्लॉग बघितला त्यातील पुल वरचा केवळ एक च लेख वाचला. ( बाकी ब्लॉग अजुन वाचुन काढायचाय ) त्यातील वरील वाक्याने भुवया नक्कीच उंचावल्या थोड्या विरळ आहेत मात्र काही केस तरी ताठ झालेत. मराठी वाचकांच्या सुदैवाने जरी पुल गोदुच्या वाटे वर गेले तरी काही तेंडुलकर-सारंग आदि वाटाडे पण होते. एक लेख आहे ( आता मराठी चा संदर्भ इंग्रजी सारखा पटकन लिंक काढुन नाही दाखव्ता येत) सॅम्युअल बेकेट च्या त्याच वेटींग फॉर गोदो वर एक अप्रतिम लेख अतिशय नेमक्या शब्दात तेंडुलकरांनी लिहीलेला होता. तो ही त्यांच्या वर्तमान पत्राच्या कॉलममध्ये रामपहाट का काही नावाने त्याच संकलन आहे (चुकभुल देणे घेणे) तो तुम्ही जरुर वाचा. मला एक वाटत तो
१- पु.ल नी टवाळी उडवलेला लेख
२- विजय तेंडुलकरांचा तो कॉलम मधला गोदो वरील लेख
३- विलास सारंगा चा गोदो वरील लेख
असे तीन जवळ जवळ ठेवावे व कुठल्याही क्रमाने वाचावे व मग त्यानंतर चर्चा करावी विलायती लोकांना आपण नंतर आणु.
पण असे मराठी च्या बाबतीत फार कठीण होते साहेब फटाफट लि़का देता येत नाहीत. कारण नेट वर बहुतेक नसतात व मार्केट मध्ये ही मराठी पुस्त क जुनी खासकरुन नसतात. तर अस करायला खुप आवडेल.
दुसर कुठल्याही बाबतीत समीक्षा करायला वा साध बोलु जरी म्हटल तरी एक किमान गरज अशी असते की उदा. कमीत कमी एकदा तरी मुळ नाटक वा त्याचा अनुवाद एक व दुसरीकडे पु.ल, चा लेख दोन्ही अगदी कमीत कमी जरी म्हटल तरी वाचण आवश्यक नाही का ?
पण तुम्ही वर म्हटल्या प्रमाणे किमान म्हणता तरी मी वाचलेल नाही मुळ अस. खाली फारएन्ड जे स्वतः एक चांगले माझे अतिशय आवडते समीक्षक आहेत त्यांना खुर्च्या हि एका नाटकाची पु.ल. नी उडवलेली टिंगल आहे हे ही माहीत नाही ( ते मुळ लेख वाचला नाही म्हणतात ) कीमान मुळ जे आहे ते नाटक आहे की लेख आहे की कादंबरी आहे ते माहीत नाही मात्र ते ठामपणे खाली प्रतिसादात मत मांडतात, एक समीक्षक असुन हि कीमान गरज त्यांना पुर्ण करावीशी नाही वाटत ? तुम्ही किमान प्रांजलपणे नाही वाचलय अस तरी म्हणतात.
आपल्याच महाराष्ट्रात महान समीक्षक नरहर कुरुंदकर होते ते म्हणायचे बादरायणा च ब्रम्हसुत्र वाचण्यासाठी शंकराचार्या च्या गाइड ची काय गरज आहे ? शंकराचार्य गाइड ???
दुसर बघा पु.ल. मुळे नेमाडे वाचण किंवा अजुन कोणा च वाचण हे थोड हरिवंशराय किनई फार मोठे साहीत्यिक आहेत का ? कारण अमिताभ चे पप्पा आहेत व ऐश्वर्या चे आज्जे सासरे आहेत म्हणुन ? आणि त्यांच काही वाचलय का छे अमिताभ गाउन दाखवतो की बाबुजी ने ऐसा कहॉ वैसा कहॉ.
मग निशा निमंत्रण वाचायच का ? नाही नाही अमिताभ फक्त मधुशाला वरच बोलतो. निशा निमंत्रण नसेल मग त्याच्या बाबुजींच. त्यांनी बोट धरुन दाखवल तर वाचा नाहीतर आपण कशाला ताप घ्या खाली आयनेस्को च्या नावा संदर्भात जो तुछतापुर्ण उल्लेख आहे तो पु. ल. गौरवातुन आलेली प्रतिक्रीया आहे. एक गंमत वाटते जर पु.ल. नी गोदो ची स्तुती केली असती तर गोदो वाचला असता का भक्तांनी ? नक्कीच मग ग्रेट म्हटले असते हो बेकेट चा आत्मा धन्य झाला असता मग. तुम्ही जर पु.ल. नी टीका केली म्हणुन नेमाडे वाचले नसते तर खर सांगा नुकसान कोणाच झाल असत म्हणजे तुमच च झाल नसत का ?
जी.ए. कुलकर्णींचा पत्र संग्रह बघा त्यांच उपलब्ध लिखाण वाचा हा माणुस उर्दु पोएट्री विषयी पुर्णपणे ब्लँक होता प्रचंड टीका ते करायचे अगदी दोनचार फालतु कोणी उर्दु कवि वाचुन बनव्लेले ते मत होते ( गालिब आदि वाचल च नव्हत अन्यथा हे मत बनल नसत असो ) आणि तेच त्यांचे सक्खे मित्र कवि ग्रेस उर्दु लिटरेचर कोळुन प्यायलेले होते. अनेक सुंदर भाष्य ग्रेस च उर्दु कविते वर केलेल आहे. पण जी.ए. पर्यंत ते पोचलच नाही यांनी का कधी पोहोचवल नाही घे हा कलाम वाच मुकाट्याने ग्रेस ने मित्रत्वाच्या नात्याने तरी म्हणायला हरकत नव्हती. आता जी.ए. ग्रेट वाचक महाव्यासंगी पण हा उर्दु च्या बाबतीत अडाणी म्हणाव आणि प्रचंड बिनडोक टीका त्यांनी केली. याने त्यांना एक दालन जे अनुभवायला मिळु शकल असत ते मिळाल नाही. ही गुरुंची अवस्था मग चेल्यांच काय विचारता राव ए अग ते तिथ बलुत आहे ते घे अग छान आहे परवाच पु.ल रडले वाचता वाचता चल आपण ही रडु या तो बेकेट हा हा ते गोदुची वाट वाला काय खेचली अग त्याची पु.ल. नी. अहो एकदा मुळ तर वाचुन बघा ना , छे त्याची काय गरज ?
पु.ल. चा दोष नाही म्हणत मोठा मात्र इतका मोठा भक्त परीवार आपल्या मागे चालतो आपल्या गायडन्स ने तर किमान कोणाच नुकसान न करता न्युट्रल तरी राहण नैतिक ( फारच बोजड शब्द नाही का ) अपेक्षा करायला काय हरकत आहे ? खाली एक म्हणतो असेल केली विजयाबाइंनी कंम्प्लेंट पु.ल. मुळे झालेल्या नुकसानीची आम्हाला काय त्याच?
विनोद हत्यार आहे काय वादच नाही मग हत्यार आहे तर वापरणारयाची जबाबदारी वाढते की कमी होते ?
हत्यार चालवताय अरे बाबा बंदुक आहे तुझ्या हातात सांभाळुन ट्रीगर दाब. हत्यार चांगल ही वापरता येत की मिलन कुंदेरा प्रचंड विनोदी लिहीतो पण कम्युनिझम च्या काळ्या बाजुला प्रचंड ताकदीने विनोदाच्या च वस्तरयाने सोलुन काढतो, मार्क्वेझ ही विनोदी च आहे की शस्त्र छान सकारात्मक रीत्या वापरतात ना ?
असो सर तुमच्याशी चर्चा करायला आवडेल तुमचा ब्लॉग वाचायचाय शांतपणे नाहीतर एक करतो पु.ल ना फोन लावुन मत घेउन घेतो एकदा माणुस कसा आहे मग ब्लॉग वाचायचेही कष्ट वाचतील
डायरेक्ट रेडीमेड मत तय्यार
सो इझी !
दादा माफ करा, मध्येच घुसतो
दादा माफ करा, मध्येच घुसतो आहे त्याबद्दल.
मला नक्की समजलेलं नाही तुमचा आक्षेप कशाला आहे.
(अ) पुलंनी/जीएंनी बेकेटवर/उर्दू काव्यावर टीका करायला
(ब) त्यांच्या चहात्यांनी ती टीका प्रमाणवाक्य धरून मूळ साहित्याबद्दल पूर्वग्रह बनवायला
(अ) असेल तर मला क्षमा करा. आणि चालू द्या. (पण तसं नसावं, म्हणून टंकतो आहे.)
(ब) असेल, तर तुम्ही त्या टीकाकाराला (पुलंना / जीएंना) मुजरिम के कटघरे में का उभं करताहात? ही चूक त्या चहात्यांची नव्हे का?
बर्याचदा असं दिसतं, की (ब) मुळे तुमच्यासारखा कोणी अस्वस्थ होऊन त्या विषयाला नवा आयाम देतो.
उदा. (१) ना सं इनामदारांना त्रिंबकजी डेंगळ्याबाबतचे पूर्वग्रह असह्य होऊन त्यांनी "झेप" लिहिली
(२) इंग्रजी साधनांतल्या कान्होजी आंग्र्यांना लुटारू/चाचा ठरवलेलं आहे. ते बदलण्यासाठी मनोहर माळगांवकरांनी कान्होजींवर सुंदर पुस्तक लिहिलं आहे.
(३) मराठीतल्या ऐतिहासिक कादंबर्यांच्या भाषेची/टोनची खिल्ली उडवायला नंदा खर्यांनी "अंताजीची बखर" लिहिली.
circle of competency
पु ल फक्त विनोदीच लेखक आहे असे जर का लोकांचे मत असेल तर कठीण आहे. हरहुन्नरी कलावंत होता तो माणूस. आणि त्याच्या पलीकडे जावून प्रत्येक वाक्यातून आणि पुस्तकान काहीतरी महान संदेश दिलाच पाहिजेल असा काही नियम आहे काय? मुळात पु ल इतके प्रसिद्ध झाले ते लोकांना ४ घटिका करमणूक होती म्हणून असे माझे तरी मत आहे. चुकीचेही असू शकेल. तसेही पु ल स्वतःला मोठे समाजसुधारक वगैरे काही म्हणवून घेताना दिसत नाहीत. ते स्वतःला परफॉरमरच म्हणून घेत. मग हे आक्षेप का? आक्षेप असायलाच हवा तर लोकांच्या आवडी बद्दल आणि त्यांच्या जाणीवांबद्दल. शास्त्रीय संगीताची आवड मला तरी पुल मुळेच लागली. अजूनही १० वी नंतर त्यांच्या कुठल्याश्या पुस्तकात केसरबाई कारेकर ह्यांच्या वरचा लेख आठवतो. तिथून मग कुमार गंधर्व आणि मल्लिकार्जुन मन्सूर हि नावे कळली. माझ्या घरात तर रेडीओ आईकायला पण बंदी होती. किशोर कुमार वगैरे लोक फार नंतर कळली. अश्या वातावरणात मला जी काही थोडी संगीताची ओळख पहिल्यांदा झाली त्याचे एकमेव कारण तो केसरबाई कारेकरांचा लेख. पुढे मग रॉय किणीकर पण वाचून झाले. असली नावे तेंव्हा माहिती पण नव्हती. थोडक्यात आपल्याला काय आवडते आणि आपल्याला कुठून ती माहिती मिळते ते महत्वाचे. पुल नसतेच इतके प्रसिद्ध तर मग? तसेही जीएं खूप लोकांना भावात नाहीत. मला पण उगाचच रडक्या गोष्टी आवडत नाहीत म्हणून जीएं टुकार होते असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. एखाद्याला जे आवडले जे कळले त्याने त्याचा प्रसार केला. पण त्याने सगळ्याच विषयांवर लिहिले बोलले पाहिजेल हा अट्टाहस पचनी पडत नाही. ज्याचे त्याचे क्षेत्र आणि कक्षा असतात. त्यापलीकडे जावून त्याने सगळीकडे भाष्य केले पाहिजेल असा नियम थोडाच आहे. जसे लिबरल म्हटला कि त्याने ज्या ज्या गोष्टी नाकारता येतील तितक्या नाकारल्या पाहिजेल असा अट्टाहास लोक करतात तसा हा प्रकार वाटतो. मुळातच सगळ्यांची काही ना काही लंगडी बाजू असतेच पण प्रसिद्ध लोकांची लंगडी बाजू असूच नये असे काहीसे मारावांच्या प्रतिसादातून ध्वनित होते.
आक्षेप
वाचणं जड गेलं.. कदाचित विरामचिन्हे नसल्यामुळे असेल>
"पुल किंवा कोणीही-जर एखाद्या गोष्टीला चांगलं/उत्तम्/छान्/सुंदर म्हणाले किंवा भिकार्/टुकार म्हणाले तर वाचकही तेच म्हणतील -आणि म्हणूनच पुलंनी /जीएंनी आपली टीका जपून केली पाहिजे" हा मला आक्षेपाचा सारांश वाटला.
तुम्ही वाचकांना फारच बाळबोध समजता आहात, असं वाटतंय. पुलंनी स्तुती केली म्हणून कोसला 'वाचण्यात' आलं. कोसला आवडणं/नावडणं हे सर्वस्वी वाचकावर अवलंबून आहे-कोसलाची क्वालिटी वाचक खुद्द बघतीलच की. त्यात पुल फॅक्टर कुठे आला? गोदोचंही तेच. दोन्ही कृती उत्तम आहेत असं म्हणा की. पुलंनी विडंबन केलंय म्हणजे पुलंच्या वाचकांनी त्या नाटकाला भिकार म्हटलंय-हा तर्क अजिबात झेपला नाही. इथे आक्षेप वाचकांवर/भक्तांवर आहे असं वाटतं. त्याला पुल किंवा कुणीही काय करेल? असो.
अहो
पण तुम्ही वर म्हटल्या प्रमाणे किमान म्हणता तरी मी वाचलेल नाही मुळ अस. खाली फारएन्ड जे स्वतः एक चांगले माझे अतिशय आवडते समीक्षक आहेत त्यांना खुर्च्या हि एका नाटकाची पु.ल. नी उडवलेली टिंगल आहे हे ही माहीत नाही ( ते मुळ लेख वाचला नाही म्हणतात ) कीमान मुळ जे आहे ते नाटक आहे की लेख आहे की कादंबरी आहे ते माहीत नाही मात्र ते ठामपणे खाली प्रतिसादात मत मांडतात, एक समीक्षक असुन हि कीमान गरज त्यांना पुर्ण करावीशी नाही वाटत ? तुम्ही किमान प्रांजलपणे नाही वाचलय अस तरी म्हणतात. >>>>
अहो मीही म्हंटलंच आहे की मी मूळ नाटक वाचलेले नाही :). आणि पुलंचा लेख त्या मूळ नाटकाची टिंगल नव्हे हे कळायला तो लेख, नाटक तसेच्या तसे वाचायला हवे असे अजिबात नाही. 'खुर्च्या' बद्दल मला जेवढी माहिती मिळाली त्यावरून माझे मत अजूनही ठाम आहे. आणि ते नाटक आहे की लेख की कादंबरी हे मला माहीत नाही हा निष्कर्ष तुम्ही कोठून काढलात? मी माझ्या पोस्ट मधे 'लेख' म्हंटलो म्हणजे ऑब्व्हियसली ते काय आहे मला माहीत नाही, असे होते का?
आणि ठामपणे प्रतिसादात मत मी त्या नाटकाबद्दल मांडत नाहीये. पण तुम्ही ज्याला टिंगल म्हणून अकारण टीका करत आहात ती टिंगल आयनेस्को च्या नाटकाची नाही हे कळायला मूळ नाटक आख्खे वाचायची गरज नाही. पुलंचा रोख कशावर आहे हे कळायला पुलंचा लेख वाचला तरी पुरे आहे. मला वाटते जास्त नेमकेपणे बोलायचे झाले तर "'खुर्च्या - भाड्याने आणलेल्या' ही त्या अनुवादाची व त्याच्या सादरीकरणाच्या वेळच्या अनुभवाची खिल्ली आहे"
आणि पुलंचा कोणता मोठा "दोष" आहे या बाबतीत? त्यांना जे लेख आवडले त्याची त्यांनी प्रशंसा केली, जे नाही आवडले त्यावर टीका केली. काहींची खिल्ली उडवली. यातील अनेक लेख हे ६०-७० च्या दशकातील आहेत. पुलंबद्दलची माध्यमातील "फ्रेन्झी" ("महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व" वगैरे) साधारण ८०-८५ नंतर जास्त चालू झाली, त्यांच्या कॅसेट्स सहजपणे उपलब्ध झाल्यावर. त्यांचे 'गाळीव इतिहास' सोडला तर शेवटचे ओरिजिनल पुस्तक 'खिल्ली' हे १९८३(+/-) सालचे.
आणि लोक काय एवढे मठ्ठ आहेत का की - पुलंनी खुर्च्यांमधे धमाल उडवली. त्याचा मूळ लेखक आयनेस्को. म्हणे तो लेखक वाचनीय नसणार, म्हणजे आपण त्याची पुस्तके वाचू नयेत एवढा लाँग शॉट मारायला?
कोणाला पुलंच्या स्टाईलचा विनोद आवडत नसेल हे अगदी शक्य आहे. पण त्यांनी मराठी वाचकांवर काहीतरी विपरित परिणाम केला हे मला अजिबात मान्य नाही. नेमाड्यांपासून ते इतर कोणाहीपर्यंत लेखक जे लोकप्रिय झाले/नाही झाले ते त्यांच्या स्वतःच्या कौशल्यावर व लोकांपर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेवर, ज्यात प्रकाशकांशी संबंध पण आले, आणि लोकांना गोडी लागेल असे लिहीणेही आले. पुलंचा त्यातील काही लेखकांची आपल्याला ओळ्ख करून देण्यापलिकडे काहीही संबंध नाही.
अप्रतिम लेख. विनोदाचा आधार
अप्रतिम लेख. विनोदाचा आधार घेत (पण लेख 'विनोदी' न होऊ देता) खूप महत्त्वाचं काही मांडलं आहे. टिपिकल उत्पल. या धाग्यावरील उत्पलच्या सर्व प्रतिक्रियाही आवडल्याच. बाकी पुलंचा प्रभाव आहे की नाही वगैरे जाऊ दे, पण तो असलाच तर तो जावा याकरता उत्पलने मुद्दाम डोकं खपवावं असं वाटत नाही. उत्पलची वाढ होत जाईल तसा तो जाईलही, किंवा गडदही होईल. ती नैसर्गिक प्रक्रिया व्हावी. 'हा प्रभाव मला पुसून टाकायचा आहे' असं म्हणत काढण्याचा प्रयत्न नको. :)
अमिताभ
@मारवा-
दुसर बघा पु.ल. मुळे नेमाडे वाचण किंवा अजुन कोणा च वाचण हे थोड हरिवंशराय किनई फार मोठे साहीत्यिक आहेत का ? कारण अमिताभ चे पप्पा आहेत व ऐश्वर्या चे आज्जे सासरे आहेत म्हणुन ? आणि त्यांच काही वाचलय का छे अमिताभ गाउन दाखवतो की बाबुजी ने ऐसा कहॉ वैसा कहॉ.
अमिताभमुळे असंख्य लोकांनी मधुशाला निदान वाचले हे सत्य नाकारता आहात का तुम्हाला ते सत्य आवडत नाही? हरिवंशराय थोर असले तरी ते सर्वज्ञात असावेत हे कसे शक्य आहे? ते ज्ञात करुन देण्यात अमिताभची मदत झाल्यास त्याला नावे ठेवणार की कौतुक करणार? अर्थात मर्यादीत ओळख करुन दिल्याबद्दल अमिताभला दोष देता येईलच.
वैयक्तिक मत
च्यामारी... बहुतांश लोक (त्यात मी पण आलो) पुस्तकं वगैरे वाचतात ते करमणुकीसाठी, स्वतःचा माईंडफक व्हावा म्हणून नव्हे. अगदी संवेदनशील लिखाणसुद्धा स्वतःच्या मध्यमवर्गीय संस्कारांना आंजारेल-गोंजारेल इतपतच अशा लोकांना पचतं. म्हणून त्यांना पुलं, मिरासदार, वपु, दवणे वगैरे आवडतात (नावं प्रातिनिधिक आहेत हो!! नायतर पब्लिक उगाच चढायचं आपल्यावर). आता उगाच दुर्बोध जड प्रतीकात्मक असं लिहिलेलं काही वाचून स्वतःच्या डोक्याची मंडई करायला कोण जाईल? भले ते जागतिक कीर्तीच्या रशियन नायतर झुलू साहित्यिकाने का लिहिलेलं असेना, आधीच काय डोक्याला ताप कमी आहेत का? आणि मग असे मराठीत आणले गेलेले (अनुवादांतून किंवा त्यांच्या इथल्या लेखकांवरील प्रभावांतून)लेखक पब्लिकने वाचले नाहीत की दोष एतद्देशीय पुलंप्रभृती लेखकांचा?
पुलंचा 'दोष'?
पुलंनंतर आलेल्या कोणत्याही लेखकाचा शाब्दिक विनोद, कोटी, उपहास, खवचटपणा कधीच आवडला नाही बॉ! यात पुलंपेक्षा नव्या अतिशय टुक्कारविनोद निर्मितीचा भयकारी प्रयत्न करणार्या कित्येक तथाकथित विनोदी लेखकांचा, आणि त्यातून कोणी थोर्थोर लिहितच असेल त्यांच्याहून भारी विनोदी तर वाचनकक्षेच्या मर्यादेमुळे वाचकांचा (इथे माझा) "दोष" कितीतरी अधिक आहे!
असो. आंबा न आवडणार्या लोकांना त्यांच्या आनंदात मोकळा सोडून मी रजा घेतो.
लेख या वाक्यापर्यंत वाचला
लेख या वाक्यापर्यंत वाचला -
('सकाळ मुक्तपीठ'ने या कामनेची पोर्नोग्राफी केली!).
तेव्हा प्रतिक्रिया देण्याआधी पुढचा लेख वाचणं हा फौजदारी गुन्हा वाटला. त्यामुळे आधी ती प्रतिक्रिया - मी या माणसाला सभ्य समजत होते.
पूर्ण लेख वाचल्यावर - आपण अतिशय हलकट आहात. शि.सा.न.