Skip to main content

मराठी साहित्यातली चविष्ट वर्णने

हा चर्चाविषय मराठी साहित्यातल्या खाद्यपदार्थांच्या चविष्ट वर्णनांबद्दल आहे. या धाग्यात मराठी साहित्यातील 'वेगळी' चविष्ट वर्णने असल्याच्या अपेक्षेने आलेल्या वाचकांचा हिरमोड झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करते, त्यांनी या धाग्यावर जावे.

तर त्याचं असं आहे की साहित्यात खाद्यपदार्थांची चविष्ट वर्णने आली की आमचे चित्त विचलित होते आणि मूळ विषय एका बाजूला राहून मन दुसरीकडेच धावते. सुनिताबाईंची जिएंना लिहिलेली पत्रे वाचताना त्यातील वेगवेगळ्या माशांच्या जातींची वर्णने वाचून उत्सुकता चाळवली जाते. त्यांच्याच 'सोयरे सकळ' मधे जे.पी. नाईकांच्या हातचे मटण, चहात बोंबील बुडवून खाणारे वसंतराव देशपांडे यांचे उल्लेख येतात ते माझ्या अगदी पक्के लक्षात रहातात.

स्मृतिचित्रे वाचताना जिवंत फोडणी आणि पाणबुड्या भाताचे उल्लेख वाचून मन भरकटते आणि डोके दुसरीकडेच चालायला लागते; ते इतके की उत्तम स्वयंपाक करता येतो या एकमेव निकषावर त्या दुष्ट म्हाताऱ्या सासऱ्याला मनातल्या मनात माफ करून टाकावेसे वाटते. अगदी हिंदू वाचतानाही भाकरी आणि वांग्याचे भरीत म्हटले की जीभ चाळवतेच.

जुन्या मराठी साहित्यात ब्राम्हणेतर आणि त्यातही बायकांनी अधिकाधिक लिहिले असते तर त्याकाळच्या ब्राम्हणेतर पाकसंस्कृतीबद्दल काही रोचक माहिती मिळाली असती असे वाटते. 'खमंग' पुस्तकाच्या प्रस्तावनेत दुर्गाबाई भागवत लिहितात, "पाकक्रियेच्या बाबतीत मी जातीभेद अवश्य मानते व तो सुसंस्कृतपणाचा भाग आहे, असंही मानते. प्रत्येक घरात स्वयंपाकाची वेगवेगळी पद्धत असते. ही रुचीभिन्नता या देशाचं वैभव आहे. जातीयता ही मारक नसून सुगरणपणाला तारक ठरणारी आहे." हे वाचलं आणि बरंचसं पटलं.

त्या निमित्ताने हेही जाणवलं की कोणत्याही काळाच्या पाकसंस्कृतीचा त्या काळच्या चालीरीती परंपरा, हवामान, अर्थकारण या सर्वांशी घट्ट संबंध असतो. पाककृतींच्या पुस्तकातून केवळ पदार्थांची माहिती कळते पण त्याच्या आजूबाजूचे रोचक संदर्भ कळायला साहित्यातल्या नोंदी उपयुक्त ठरतात.

तर प्रस्ताव असा आहे की, मराठी साहित्यातल्या तुम्हाला आठवणाऱ्या चविष्ट वर्णनांबद्दल इथे लिहायचे. हे उल्लेख पाककृतींचे असले पाहिजेत असे नाही, वेगवेगळ्या पदार्थांबद्दल, जिन्न्सांबद्दल, खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल, आवडीनिवडींबद्दल असे कोणतेही उल्लेख चालतील.

कापूसकोन्ड्या Fri, 13/03/2015 - 20:08

बाबा कदम यांच्या कांदबरीत मटण आणि खास कोल्हापूरी खाण्याचा हमखास उल्लेख असायचा.

अतिशहाणा Fri, 13/03/2015 - 20:47

विसोबा खेचर व मांडे ह्या ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रसंगाचा मराठी साहित्यातील खाद्यवर्णनात उल्लेख करावासा वाटतो.
संत रामदास व खीर (आणि उलट्या) हाही एक प्रसंग ;)

अतिशहाणा Fri, 13/03/2015 - 21:15

In reply to by वृन्दा

रामदासांना खीर अत्यंत आवडत असे. त्यामुळे खिरीविषयी आपल्या मनात मोह निर्माण झाला आहे हे लक्षात येऊन त्यांनी तुफान खीर प्यायली आणि नंतर खिरीने मळमळू लागल्यावर उलट्या झाल्या.

नंतर खीर प्यावीशी वाटल्यावर त्यांना ती उलटी समोर दिसत असे. अशा रीतीने खिरीच्या मोहापासून त्यांनी स्वतःची सुटका करुन घेतली.

असे वाचले/ऐकले आहे.

राजन बापट Fri, 13/03/2015 - 20:50

खाण्यापिण्यावरून केलेल्या विनोदी लिखाणात राम गणेश गडकरींच्या ह्या लेखाइतका दुसरा विनोदी लेख सापडणे प्रायः अशक्य आहे.

अमुक Fri, 13/03/2015 - 21:05

लहानपणी भोंडल्यात म्हणत असू ते हे एक गाणे - :)

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली

त्यातलं उरलं थोडं पीठं, त्याचं केलं थालीपीठं
नेऊनी वाढलं पानातं, जिलबी बिघडली

त्यातला उरला थोडा पाकं, त्याचा केला साखरभातं
नेऊनी वाढला पानातं, जिलबी बिघडली

त्यातलं उरलं थोडं दही, त्याचं केलं श्रीखंड बाई
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली

त्यातलं उरलं थोडं तूप, त्याच्या केल्या पुर्‍या छानं
नेऊनी वाढल्या पानातं, जिलबी बिघडली..
-----

राजन बापट Fri, 13/03/2015 - 21:10

In reply to by अमुक

हे भारी आहे. हे वाचताना "नवरी नटली , आणि बाई सुपारी फुटली" अशा चालीचं असावं असा भास झाला :-)

रोचना Mon, 16/03/2015 - 14:41

In reply to by अमुक

आम्ही "पानात" ऐवजी "पंगतीत", आणि "थोडंसं" म्हणायचो.
आणि "पुर्‍या खूपं".

अजून एकः
ता.क.: (खाली वृन्दा ने हेच गाणं दिलंय...)

ऋषिकेश Mon, 16/03/2015 - 14:58

In reply to by रोचना

आमच्याकडेही "थोडस्सं" म्हणताना ऐकलं आहे, मात्र "पानात"च म्हणतान ऐकलंय
आमच्याकडे उरलेल्या तुपात लाडू होतात ;)
==

माझ्या मुलीसाठी ही भोंडल्याची गाणी नी मंगळागौरीतली काही गाणी (आणि काही भक्तीगीतेसुद्धा!) अंगाई गीते आहेत ;) (जसे की एक टिपरी घे, आज गोकूळात रंग, राधा रुसली सुंदरी, एक लिंबु झेलु बाई)

==

वृन्दा Fri, 13/03/2015 - 21:10

भोंडल्यात -

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याला कालि येऊ दे गं सुने येऊ दे गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला कार्ली आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याइची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
आपलं उष्ट काढ गं सुने काढ गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
आपलं उष्ट काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेल्या राणी माहेरा माहेरा

वृन्दा Fri, 13/03/2015 - 21:18

काही म्हणी -
(१) दोघांचे चांगले मेतकूट जमणे
(२) वड्याचं तेल वांग्यावर काढणे
(३) तेल गेलं, तूपही गेलं, हाती राहीलं धुपाटणं
(४) अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
(५) सुंठीवाचून खोकला गेला

वृन्दा Fri, 13/03/2015 - 22:14

अरेच्च्या आपण ते "श्रीकांता कमलकांता" गाणे कसे विसरलो. हे तर गाणं लहानपणी आवडायचं अन खिदळायचं गाणं. तेव्हा कुठे सासू-दीर-नवरा वगैरे गाण्यातल्या भाव-भावनांची इतकी जाण होती?-

श्रीकांता कमलकांता असे कसे झाले
असे कसे झाले माझ्या नशिबी आले
.
वेड्याच्या बायकोने केले होते लाडू
तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
श्रीकांता कमलकांता ...
.
वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले
चक्र चक्र म्हणून त्याने खेळायला घेतले
श्रीकांता कमलकांता ...
.
वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या ,
तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले
चंद्र चंद्र म्हणुन त्याने ...... (आठवत नाही)
श्रीकांता कमलकांता ...
.
वेड्याची बायको एकदा झोपली होती
तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले
मेली मेली म्हणुन त्याने जाळुन टाकली"
श्रीकांता कमलकांता ...

राही Fri, 13/03/2015 - 22:55

आवळा देऊन कोहळा काढणे.
गाढवाला गुळाची चव काय?
बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी.
हातावर तुरी देणे.
ताकास तूर लागू न देणे हे बहुधा तागास तूर न लावणे असे आहे. तागाच्या पिकात तुरीची लागवड केली तर तागाचे पीक चांगले येत नाही असा उगम वाचला आहे, पण त्यातून सध्याचा 'काम बिनबोभाट उरकणे' हा अर्थ निघत नाही.
दुधाची तहान ताकावर.
दुधाने तोंड भाजले की ताकही फुंकून पिणे.
सुप्रसिद्ध आणि (जालावर)नेहमीच पॉप्यूलर : ताकाला जाऊन भांडे लपवणे.
शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड.
भरल्या भटाला/ पोटाला दही कडकडीत/ करकरीत.
***ला पावट्याचे निमित्त.

वृन्दा Fri, 13/03/2015 - 22:58

In reply to by राही

बाजारात तुरी, भट भटणीला मारी = छाछ छागोळे, भैस भागोळे घरमा धमाधम (गुजराथी मध्ये )

छाछ = ताक
छागोळे = घुसळणे
भैस =म्हैस
भागोळे = रानात, वेशीबाहेर
म्हैस अजून रानातच आहे अन ताक कोण घुसळणार यावरुन घरात रणधूमाळी.

राही Fri, 13/03/2015 - 23:17

In reply to by वृन्दा

कागडो दहींतृं लई गयो. म्हणजे कावळ्याला पक्वान्न मिळालं. एखाद्याच्या लायकीपेक्षा खूप चांगला जोडीदार मिळाला की असे म्हणतात.

चार्वी Fri, 13/03/2015 - 23:22

'चहा'वरच्या दोन भन्नाट कविता: अत्र्यांच्या झेंडूच्या फुलांतील कषायपेयपात्रपतमक्षिकेप्रत ही कविता आणि 'ढढ्ढाशास्त्री परान्ने यांचे वैकुंठाहून मृत्युलोकी पुनरागमन' या कादंबरीतील सात कडव्यांचे चहिकादेवीचे स्तोत्र - 'नमस्ते नम्र भावेन आर्ये चायनावासिनी, कृष्णरंगे मधुगंधे निद्राभंगे मनोजये....'इ.

वृन्दा Fri, 13/03/2015 - 23:29

In reply to by रुची

हेच लिहायला आले होते. ते स्तोत्र फार मजेशीर वाटतय.

चार्वी Sat, 14/03/2015 - 00:03

In reply to by रुची

नमस्ते नम्र भावेन आर्ये चायनावासिनी
कृष्णरंगे मधुगंधे निद्राभंगे मनोजये १
उष्णबाष्पध्वजधरे कपसासरभूषिते
चहादेवि नमस्तुभ्यं जगत्प्रिये नमोस्तुते २
सदाप्रिये सदाशिवे मोहिनी वरवर्णिनी
बिस्कुटप्रिये अद्वैते स्पर्शास्पर्शविनाशिनी ३
दुग्धशर्करामिश्रिते उदकरूपधारिणी
महापुण्ये बहुमान्ये नमस्तेस्तु स्पूनासने ४
भक्तिभयदुर्गेषु भक्तानां पालनेषु च
नित्यं वससि जिव्हाग्रे वादे बोधे तथैव च ५
त्वं शांतिरथी तेर्माया श्रीर्धी: सुजनता तथा
किंतु मह्यां जीवितं च तव दर्शनमय यद् ६
तुष्टि: पुष्टिर्धृतिर्दीप्तिस्तथा बुद्धिविवर्धिनी
जयो भवतु मे नित्यं त्वत्प्रसादान्न्मस्तु ७

बॅटमॅन Fri, 13/03/2015 - 23:44

खाण्यापिण्याचीच वर्णने चाललीयेत तर यानिमित्ताने एक धमाल तेलुगु गाणे पहावयास हरकत नाही.

https://www.youtube.com/watch?v=0TSOVO2YkYM

पाच मिनिटांचा वेळ अवश्य काढून बघावासं आहे. काय ते वर्णन आणि काय ते गाणं अन काय ते दृश्य व काय ते खाणं! आहाहाहा मजा आ गया.

मेघना भुस्कुटे Sat, 14/03/2015 - 11:47

वासंती मुजुमदारांच्या 'नदीकाठी'ची आठवण लगेचच झाली होती. त्यातलं गाव मला वाटतं कृष्णेकाठचं. नक्की नावाचा स्पष्ट उल्लेख कुठेच येत नाही. कोकणातल्या गोष्टींची सवय असलेल्या मला त्यातली खाद्यसंस्कृती वेगळीच आकर्षक वाटे, वाटते. त्यात त्यांच्या आत्याच्या घरच्या गिरणीचा - डंकाचा - उल्लेख आहे. आत्याच्या यजमानांनी मुद्दामहून गोल साळीचे केलेले, बुंदासारखे दिसणारे चुरमुरे, दोन वेगवेगळ्या डंकातून एकाच साळीपासून होणारे चुरमुरे (कुंदाच्या उमललेल्या कळ्यांसारखे दिसणारे!) आणि पोहे, देवळाच्या आवारातल्या कढीलिंबाचा पाला आणि मिरच्या कुटताना साळीबरोबर डंकावर घालून केलेले हिरव्या रंगाचे पोहे, ताजे पोहे फोडणीला घालून वांगी, ढोबळी-मिरची घालून केलेले तर्‍हेतर्‍हेचे पोहे, दहीपोहे आणि त्यावर तळलेली भरली मिरची, ताज्या लसणीच्या चटणीसोबत कांदा घालून खायचे चुरमुरे (आत्याच्या तोंडी: चिरमुरे!)... अशी अनेक वर्णनं त्यात येतात. बापूंच्या - आत्याच्या यजमानांच्या - पानाच्या डब्याची वर्णनं येतात. चांदीचा जाळीदार डबा. ओलसर वासाची ताजी, हिरवीकंच पानं, कप्प्याकप्प्याच्या खणांतून कातरलेली सुपारी (या सुपारीच्या रंगाचा नि नक्षीचा फ्रॉक मिळाला तर किती मजा येईल, असं त्यांनी पुढे म्हटलं आहे!), कात, लवंग, चुना, वेलची, खोबरं... बापूराव पान खाऊन, लवंग खोचून कुणासाठी तरी एक विडा करून ठेवत. मग आत्या विडा खाऊन वरून काताचा बारीकसा खडा तोंडात टाके नि प्रसन्न हसे, इत्यादी. त्यांच्या आईवरच्या - माईवरच्या - लेखात तिच्या वाळवणीच्या-साठवणीच्या पदार्थांचे उल्लेख येतात. वर्षाच्या डाळी, पापड, कुरड्या, पापड्या, भातवड्या, सांडगे, लोणची... केळीच्या काल्याच्या रसात भिजवायचं पापडाचं पीठ (त्या रसाचे डाग पडले कपड्यांवर, तर ते जात नसत नि विटाळाच्या डागांसारखे दिसत म्हणे), त्याची थोडी तुरट-कडवट चव, नि त्याचे 'निर्लेप' पापड, त्या पिठाच्या 'खजुरी' दोर्‍यानं केलेल्या'बोट्या' (मला तोवर फक्त 'लाट्या' हा शब्द माहीत होता), काही बोट्या बाजूला ठेवून केलेले त्यांचे ओले पापड, त्यावर उमटणारी पापडखाराची लाही, जोंधळ्याच्या भातवड्या (त्यासाठी जे भिजत घालतात, त्याला 'बेकटं' म्हणतात म्हणे. मला तांदळाच्या फेण्यांसाठी भिजत पडणारे तांदूळ ठाऊक.) त्याचा वास, साखरपार्‍याच्या वड्या, फडताळातली चार निखारे घालून केलेली 'उचलशेगडी', त्यावर दूध मंद आचेवर तापवून येणारी भाकरीसारखी जाड साय, वैलचूल 'घालायचं' तंत्र, भाकरी थापताना तीत रुपया ठेवून करायची खुळखुळ्याची भाकरी... वासंतीबाईंना दही कसं विरजायचं ते ठाऊक नव्हतं. माई कुठे बाहेरगावी गेल्यावर त्यांनी फक्त 'सायीवर साय' टाकून ते प्रकरण कसं नासवलं त्याचं वर्णन येतं. त्यातच 'अडीच वेढ्याच्या खमंग चकली'चा उल्लेख प्रथम वाचला नि 'किती वेढे असले, तरी त्यानं काय होतं? चकलीचा खमंगपणा भाजणीवर' अशी बायकांची खुसखुसत केलेली चावट कमेंटही त्यातच वाचली. हे पुस्तक वाचलं नसतं, तर एक निराळीच खाद्यसंस्कृती अनोळखी राहिली असती.

मेघना भुस्कुटे Sat, 14/03/2015 - 11:59

जालावरही खाण्यापिण्यावर फार मस्त लिखाण आहे. चौकस आणि संजोपरावांचा उल्लेख वर आहेच.

'मायबोली'वरच्या दिनेशदा यांचं खाण्यापिण्यावरचं लेखन मी मुद्दामहून जाऊन वाचते. रसाळ आणि माहितीपूर्ण, थोडं पूर्वग्रहांनी रंगलेलं - भाविक प्रकारचं, पण विलक्षण रंजक, संदर्भसंपृक्त लेखन.

चिनूक्सची 'अन्नं वै प्राणा:' तर प्रसिद्धच आहे.

ट्युलिपच्या ब्लॉगवर चहा आणि पन्हं या दोन गोष्टींवर विलक्षण सुंदर लेख होते, ते तिला आलेल्या विरक्तीच्या झटक्यात अप्रकाशित झाले, हा दंडनीय अपराध आहे. त्यात तिनं प्यायलेले देशोदेशींचे चहा, चहासोबत नि चहाच्या निमित्तानं भेटणारी तरुण 'पात्रं', वेगवेगळ्या चहाच्या वेगवेगळ्या सुरेख चवी आणि त्याला लागून येणारे सांस्कृतिक लागेबांधे होते. पन्ह्यावरच्या लेखात तर पन्ह्याची इतकी चित्रदर्शी वर्णनं होती... कैरीच्या 'मजेशीर' गुठळ्या असलेलं पन्हं, कुणाचं केशर घातलेलं-चांदीच्या फुलपात्रातलं श्रीमंती पन्हं, कुणाचं मिक्सरवर वाटलेल्या कैरीचं शहरी गुळगुळीत पन्हं, गुळाचं खमंग पन्हं, साखरेचं पचपचीत चवीचं पन्हं, कच्च्या कैरीचं पन्हं... अहाहा! हे लिखाण ट्युलिपनं पुन्हा उपलब्ध करून द्यावं म्हणून खरी तर इमेल्सची मोहीम उघडली पाहिजे.

***

हा विषय किती जिव्हाळ्याचा आहे, हे रुचीच्या या धाग्यामुळे नीटच लक्षात आलं. तिचे मानावे तितके आभार कमीच आहेत.

ऋषिकेश Sat, 14/03/2015 - 14:18

In reply to by मेघना भुस्कुटे

आत जालीय लेखनाबद्दल लिहिलंच आहे तर कोणी मेघना भुस्कुटे आहेत ज्यांनी सुगरणीचे सल्ले दिलेले त्रिलोकात प्रसिद्ध आहेत. :प

मेघना भुस्कुटे Sat, 14/03/2015 - 12:12

आणि तरी उर्मिला पवारांचे 'चतुरंग'मधले काही लेख (गरीब घरांतून एक विशिष्ट वाटण दाट व्हावं म्हणून हरभर्‍याची डाळ वाटून वाटणाला लावण्याची एक युक्ती वापरली जाई, ती एका लेखात होती.), अवचटांच्या पुस्तकांतले काही रसाळ उल्लेख (चिवडा विकणार्‍या एका गाडीवाल्याचा 'आप्त'मधला उल्लेख, त्यांचे स्वतःचे स्वैपाकाचे नि चिराचिरीचे प्रयोग, ओतूरच्या घरातली खाद्यसंस्कृती - गॉड, ही सुभाष अवचटांच्या 'स्टुडिओ'मध्ये अधिक सुरेख दिसते) , पेंडशांच्या पुस्तकांतून आश्चर्यकारकरीत्या जवळजवळ अदृश्य असलेली खाद्यसंस्कृती (आंबील, बरके फणस, पडीचे आंबे, खारावलेले कोकम, अळूची भाजी (फदफदं नव्हे!), अंगठ्याएवढी जिलबी, थालीपीठ, दडपे पोहे, भजी, बटाटेवडे, आंबोळ्या. खल्लास!), आनंद यादवांच्या 'झोंबी','नांगरणी','घरभिंती' या त्रयीतले विशिष्ट उल्लेख (भात हे जवळजवळ पक्वान्न असणं, कुणब्याचं घर-दारिद्र्य-अडाणीपणा-स्वैपाकाशी गुरासारखी बांधली गेलेली बाई).... हे सगळं आहेच. झालंच तरी 'रुचिरा' प्रकारातली पुस्तकं. असो. असो.

राही Sat, 14/03/2015 - 14:54

In reply to by मेघना भुस्कुटे

उर्मिला पवार आणि पेंडसे आठवले होतेच. अलीकडे जालावरही काय काय सापडते. विशेषतः मायबोलीवर. अलीकडे एक सुक्या मासळीची वेगळीच पा.कृ. वाचली. नावही वेगळं. 'बरटं.' http://www.maayboli.com/node/52971
शिवाय कोंकणस्थी वरण हाही धागा हिट्ट आहे. जालकृपेने नेहेमीच्याच पदार्थांची वेगवेगळी नावे ठाऊक झाली. खिच्चे, ढेसे, ढेमसे, सुसला, चकोल्या,(हे तसं ऐकलं होतं,) भुजणं, वेसवार, वगैरे.
शिवाय खरा खरवस, खोटा खरवस वगैरेही कळले.
थ्री इडियट्स मध्ये करीना रँचोच्या छाजेड या आडनावाची आणि ढोकला, खाखरा, फाफडा अशा एकूणच गुजराती खाद्य पदार्थांची धास्ती घेते. पण या बाबतीत आपणही काही कमी नाही आहोत. धपाटे, धिरडी, खोट्टें, घावनघाटले हे पदार्थ आणि धोंड, धोपटे, थोपटे, खोटे, घाग, भडकमकर ही नावे पोटात धडकी भरवण्यास पुरेशी आहेत.
बरंच काही आहे, ते टप्प्याटप्प्याने.

ऋषिकेश Sat, 14/03/2015 - 15:41

In reply to by राही

खिच्चे, ढेसे, ढेमसे, सुसला, चकोल्या,(हे तसं ऐकलं होतं,) भुजणं, वेसवार, वगैरे.

यातलं चकोल्या म्हणजे वरणफळं ना?
बाकीचे कायेत?

मनीषा Sun, 15/03/2015 - 11:21

वाचते आहे .
मला माहित असलेल्या काही पुस्तकांचा उल्लेख वर आला आहे.
ते वाचताना प्रकर्षाने जाणवले... ही पुस्तके वाचून बरीच वर्षे झाली आहेत. परत एकदा वाचायला हवीत.

राही, मेघना - तुम्ही ग्रेट आहात . वाचन तर आहेच पण वाचलेल्या पुस्तकांचा नुसता नामोल्लेख नाही तर अचूक तपशील देणे ... खासच

मला दोन मराठी गाणी आठवतात....
१) पिंजरा मधलं
----- इथं वरन भाताची गोडी रं
नको फुक्कट्टं छेडाछेडी रं
सोंगा ढोंगाचा बाजार इथला
साळ्सूद घालतोय अळिमिळी
सार वरपती, रसा भुरकती
घरात पोळी अन् बाहेर नळी ....
आणि
२) काकडीचा बांधा तुझा
मिरचीचा तोरा
मुळ्यावानी कडु जरी
रंग गोरा गोरा ...

आणि एक किस्सा वाचलेला ...(खरा की खोटा माहित नाही)
हिमालयात कडाक्या च्या थंडीत ... सीमेवर काही सैनीक उबेसाठी शेकोटी करत होते . त्यात जळाणा साठी कागद जाळताना एक दिवाळी अंक सैनिकाच्या हाती येतो . त्यात पु.लं चा 'माझे खाद्यंजीवन' लेख असतो. तो वाचताना सैनिकाला शत्र्रु ची भिती , असह्य थंडी , अपुरी साधनं सुविधा.. सार्‍याचा विसर पडतो. लेख पूर्णं वाचून झाल्यावर त्याच्या मनात विचार येतो , हे सगळे खाण्यासाठी तरी मला जगायलाच पाहिजे ..

रोचना Mon, 16/03/2015 - 22:45

वर रामदासांचा उल्लेख झाला आहे. समर्थ शिष्य गिरिधरस्वामी यांच्या (१८व्या शतकाच्या पूर्वार्धात रचलेल्या) "समर्थप्रताप" चरित्रात खाद्यपदार्थ आणि पंगतींचे तपशीलवार वर्णन आहे. समर्थ संप्रदायातले शिष्य स्वयपाकात गुंततात, आणि खुद्द श्रीराम आणि सीतेने समर्थांना नैवेद्य दाखवल्यावर त्रिलोकातली मंडळी जेवायला बसतात. पंगतीच्या रूपकाने गिरिधरस्वामी निराळ्या पंथांची, संतकवींची यादीच तयार करतात - शंकराचार्य आणि मध्वाचार्यांपासून ते मुकुंदराज, ज्ञानेश्वर, गोरा कुंभार, तुकाराम, हुसेन लतीफ, शेख महंमद, सगळेच्या सगळे एकामागून एक समर्थांकडे जेऊन जातात.

पूर्ण ग्रन्थ इथे उपलब्ध आहे. चवीला काही भाग इथे देते:

तुलसीदासासी श्रीरामरसमिठाई
नृसिंह महंतासी श्रीकृष्णरसमिठाई.... (१६:३५)

धनाजाठासी भक्ति जिलिबी वाढिली ठाई
सूरदासासी नादब्रह्मरस पाहीं ताटीं वाढिला.... (३६)

बाजीव पठाण ताजे ब्रह्मरोटगे सेविती
हुसेन लतीफ राम रहीम खिचडी जेविती
शेख महंमद भक्तिरस घोटिती, ब्रह्मानंदे स्वानंदे....(४०)

कबीरभाई रामरसोईमाजी तृप्त....
बलखशाह अलेख पुलाव सेवी.. (४१)
....

विठल रंगमूर्तीसी स्वानुभव दुग्धभात वाढिले
कृष्ण्दास जयरामासी आत्मानुभव दधिभात प्रसादिले
केशवराजासी ब्रह्मानुभव केवळ तूपभात वोगरिले
शेष तक्रें वागरिली समस्त संतांसी ||१७:१०||

तुकोबासी गुळमिर्‍याचे मुर्डिव कानवले केले
वामनासी उदंड चुर्मा लाडु वळोनि वाढिले
रमावल्ल्भदासासी स्वरूपखोबर्‍याचे गिलगचे तळिले
निरंजनें पूर्ण मोदक आरोगिले सिद्ध लाडु ||११||
....
देवराज वर्षती पावन जेऊनि ढेंकर देताती ||१३||

(पृ १२६-१२९)

.शुचि. Thu, 28/01/2016 - 03:12

काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती,
धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले,
आले लोणचे बहु मुरलेले, लिंबू कागदी रसरसलेले
.
किसून आवळे मधुर केले, कृष्णाकाठचे वांगे आणले,
खमंग त्याचे भरीत केले, निरनिराळे चटके सजले,
चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरीले,
.
मिर्ची खोबरे तीसह ओले तीळ भाजुनी त्यात वाटले,
कवठ-गुळाचे मीलन झले, पंचामृत त्या जवळी आले,
वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले!
.
केळी कापूनी चकत्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या,
एकरुप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या अळू-घोसाळी,
रानकारली वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी,
.
चुकाचाकवत मेथी कवळी, चंदनबटवा भेंडी कवळी,
फणस कोवळा, हिरवी केळी, काजुगरांची गोडी निराळी,
दुधीभोपळा आणि रताळी, किती प्रकारे वेगवेगळी,
.
फेण्या, पापड्या आणि सांडगे, कुणी आणुनी वाढे वेगे,
गव्हल्या, नकुल्या, धवल मालत्या,खिरी तयांच्या शोभत होत्या,
शेवयाच्या खिरी वाटल्या,आमट्यांनी मग वाट्या भरल्या,
.
सार गोडसे रातंब्याचे, भरले प्याले मधुर कढीचे,
कणीदार बहु तूप सुगंधी, भात वाढण्या थोडा अवधी .....

मारवा Thu, 28/01/2016 - 10:34

ऎसे खारट अपाडे, राजसा तया आवडे, उन्हाचेनि मिषे तोंडे, आगीचि गिळी । वाफ़ेचिया सिगे, वातीही लाविल्या लागे, तैसे उन्ह मागे, राजसु तो । वावदळ पाडुनि ठाये, साबळु डाहारला आहे, तैसे तीख तो खाये, जें घायेवीण रुपे । आणि राखेहुनि कोरडे, आंत बाहेरी येकें पाडे, तो जिव्हादंशु आवडे, बहु तया.। परस्परें दांता, आदळु होय खातां, तो गा तोंडी घेता, तोषो लागे। आधीच द्रव्ये चुरमुरी, वरि परिवडिजती मोहरी, जिये घेतां होती धुवारी, नाकें तोंडे। हे असो उगे आगीते, म्हणे तैसे राइते, पढिये प्राणापरौते, राजसासि गा.। ऎसा न पुरोनि तोंडा, जिभा केला वेडा, अन्नमिषें अग्नि भडभडां, पोटीं भरी। तैसाचि लवंघा सुंटे, मग भुई ना सेजे सांटे, पाणियाचे न सुटे, तोंडोनि पात्र । (अ-१७ ओ-१४१ ते १४९)
अपाडे- अतिशय, साबळु- पहार, परिवडिजती- उपयोग करीतात, पढिये- आवडते ( पढियंता -आवडता कृष्ण अर्जुनाला हे संबोधन वापरतो ) अन्नमिषे- अन्नाच्या निमीत्ताने,

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 02/02/2016 - 20:12

व्हॉट्सअॅपवरून (म्हणे) गदिमांची ही कविता आलेली आहे. आमचं काम इकडचं तिकडे करण्याचं.

काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती
धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले
आले लोणचे बहु मुरलेले, आणि लिंबू रसरसलेले

किसून आवळे मधुर केले, कृष्णाकाठचे वांगे आणले
खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले
चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले

मिरची खोबरे ती सह ओले, तीळ भाजूनी त्यात वाटले
कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले
वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले!

भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या
काही वाटुन सुरेख तळल्या, कोशिंबिरीच्या ओळी जमल्या
शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या

केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या
एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी
रान कारली वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी

चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी
फणस कोवळा हिरवी केळी, काजुगरांची गोडी निराळी
दुधी भोपळा आणि रताळी, किती प्रकारे वेगवेगळी

फेण्या, पापड्या आणि सांडगे, कुणी आणुनी वाढी वेगे
गव्हल्या नकुल्या धवल मालत्या, खिरी तयांच्या शोभत होत्या
शेवयांच्या खिरी वाटल्या, आमट्यांनी मग वाट्या भरल्या

सार गोडसे रातंब्याचे, भरले प्याले मधुर कढीचे
कणीदार बहू तूप सुगंधी, भात वाढण्या थोडा अवधी

.शुचि. Sun, 26/06/2016 - 05:29

ही आरती सापडली -

श्री शाकंभरीची आरती
दैत्यें सुरजन गांजित पडला दुष्काळ ।
देखुनि दानव वधिसी सक्रोधें प्रबळ ।
शाखा वटुनि पाळिसी विश्र्वप्रिय सकळ ।
भक्ता संकटी पावसी जननी तात्काळ ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय शाकंभरी ।
श्री वनशंकरी माये आदि विश्र्वंभरी ॥ धृ. ॥
सद्भक्ति देवी तू सुर सर्वेश्र्वरी ।
साठी शाखा तुज प्रिय षड्विध सांभारी ।
तिळवे तंबिट कर्मठ द्वादश कोशिंबीरीं ।
पापड सांडगे वाढिती हलवा परोपरी ॥ २ ॥
जय देवी जय देवी जय शाकंभरी ।
श्री वनशंकरी माये आदि विश्र्वंभरी ॥ धृ. ॥
अंबे कर्दळि द्राक्षे नाना फळे जाण ।
दधि घृत पय शर्करा लोणची नववर्ण ।
कथिका चाकवत चुक्का मधुपूर्ण ।
वाढिती पंचामृत, आले लिंबू लवण ॥ ३ ॥
जय देवी जय देवी जय शाकंभरी ।
श्री वनशंकरी माये आदि विश्र्वंभरी ॥ धृ. ॥
बर्बूरे कडी वडे वडिया वरान्न ।
सुगंध केशरी अन्न विचित्र चित्रान्न ।
भक्ष्यभोज्य प्रियकर नाना पक्वान्न ।
सुरार रायति वाढिती षड्रस परमान्न ॥ ४ ॥
जय देवी जय देवी जय शाकंभरी ।
श्री वनशंकरी माये आदि विश्र्वंभरी ॥ धृ. ॥
पोळी सुगरे भरीत आणि वांगीभात ।
पात्रीं वाढिती सर्वही अपूप नवनीत ।
जीवन घेता भोजनी प्रसन्न भक्तातें ।
प्रार्थुनि तांबूल देऊनि वंदी गुरुभक्त
॥ ४ ॥
जय देवी जय देवी जय शाकंभरी ।
श्री वनशंकरी माये आदि विश्र्वंभरी ॥ धृ. ॥