अमरत्वाचे स्वप्न
अलीकडेच वाट्सअॅपमधील हा फॉर्वर्ड वाचण्यात आलाः
ब्रायन जॉन्सन हा अमेरिकेतील एक उद्योजक. त्याला मरायचं नाही. हो, तुम्ही बरोबर वाचलंय: त्याला अमर व्हायचंय. सध्या त्याचं वय 48.
आपला सर्व दिवस तो वैज्ञानिक पध्दतीने जगायचा प्रयत्न करतो. सर्व काही काटेकोर. आठ तास 34 मिनीटे झोपतो. उशीवर डोकं ठेवलं की दोन ते तीन मिनिटांत तो निद्राधीन होतो.त्याचे झोपेवर 94 टक्के प्रभुत्व आहे. म्हणजे मध्येच जाग आली असे त्याचे रात्रीत क्वचित एकदाच होते पण तो लगेच झोपू शकतो. उठल्यावर कानाच्या अंतर्गत भागाचे तापमान घेतो. केसाना आणि कवटीला एक सिरम लावतो. केस वाढीसाठी सिलीकॉन स्क्रॅबरने डोके घासतो. शॉवर घेऊन एक तास व्यायाम करतो. लाल प्रकाशाची थेरपी घेतो. मग हायपरबॅरीक ऑक्सिजन थेरपी. नंतर दिवसाच्या कामाला तयार. रोज ब्लड टेस्ट , युरीन टेस्ट, सीटी स्कॅन, निरनिराळ्या गोळ्या. मधूनमधून एम आर आय हे तर चालूच असतं.
दुपारी बारा वाजता तो जेवतो ते दिवसातले शेवटचे. झोपताना भुकेले झोपायची सवय झाली आहे त्याला. रात्री पचनसंस्थेवर ताण नको हे कारण असावे. त्याला विचारले हे सगळे घड्याळाच्या ताब्यात जगणे त्याला कसे आवडते ?
तो म्हणाला : "दिवसातील बारीकसारीक निर्णय घेण्यात आपली शक्ती वाया कशाला घालवायची? जर ते स्वयंचलित करता येतात ? ती मेंदूची वाचलेली उर्जा मी "मानवजातीच्या भवितव्य काय" यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांना देईन ."
पुढे तो म्हणतो : " कुणाला खाण्याचे व्यसन असते, कुणाला टिव्हीचे. कुणाला सोशल मिडीयाचे तर कुणाला कामाचे. मेंदूची रचनाच अशी आहे की व्यसन हे टाळताच येत नाही. मला दिर्घायुष्याचे व्यसन आहे. माझे आतापर्यंतचे सगळे अनुभव, संवाद, विचार मी माझ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेल्या ब्रायन प्रतिकृतीमध्ये अपडेट करत असतो."
त्यांचे इन्स्टाग्रामवर वीस लाख फालोअर्स आहेत. “अजून दोनशे वर्ष मला मरण नाही.” असा त्याचा दावा आहे.
कदाचित अशा प्रकारचे दीर्घायुष्याचे /अमरत्वाचे वेड असलेले जगभरात हजारो-लाखो लोक असतील. काही जण उघडपणे तर काही जण मनातल्या मनात.
मानवी प्राण्याला अत्यंत प्राचीन काळापासून अमर व्हावेसे वाटत आले आहे. आपल्या हिंदू धर्माच्या पुराण कथेत अश्वत्थामा, बली, व्यासऋषी, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम (व मार्कंडेय ऋषी) या अमरत्व मिळविलेल्या पुराणपुरुषांचे नित्यनेमाने स्मरण केल्यास मृत्युमुक्त होत नसलो तरी आपण रोगमुक्त होऊ शकतो अशी गॅरंटी दिलेली आहे. मृत्युच्या गूढतेबद्दल नेहमीच उत्सुकता असते. कठोपनिषदातील नचिकेत व यमराज यांच्यातील संवाद या कथेत मृत्यु का होतो? मृत्युमुळे कुणाला त्रास होत नाही? इत्यादी प्रश्नांच्या उत्तरांचा उल्लेख आहे. ख्रिश्चन धर्मग्रंथामध्येसुद्धा अमरत्वासाठीच्या अमृताऐवजी होली ग्रिल वा तसलेच कुठले तरी पेय पिऊन अमरत्व साध्य करून घेतल्याचे उल्लेख सापडतील. प्राचीन काळात कदाचित अरण्यात तपस्या करणारे अमरत्वासाठी जडी-बूटी शोधत असावेत. परंतु त्याच्या शोधात ते यशस्वी न झाल्यामुळे हे अमरत्व अजूनही मृगजळ ठरलेले असून कुणाच्याही हाती लागले नसावे.
माणसाचे आयुष्य वाढलेले आहे यावरून भगवान शंकरानी मृत्यु देवता, यमराजाची काही कारणास्तव हकालपट्टी केल्यामुळे या पृथ्वीवरील मृत्युचे प्रमाण कमी होत आहे की काय अशी पुसटशी शंका मनात येईल. महाभारतातील यक्ष-युधिष्ठिर यांच्या संवादात यक्ष “जगात सर्वात मोठी आश्चर्यजनक गोष्ट कोणती असेल?” असे धर्मराजाला विचारतो. “दररोज किती तरी प्राणी यमसदनी जातात. हे माहित असून देखील तरीही जे जिवंत असतात ते मात्र दररोज जगण्याची इच्छा ठेवतात. यापेक्षा दुसरे आश्चर्य काय असेल?” असे धर्म उत्तर देतो.
२१व्या शतकातील जनुकशास्त्र, नॅनो तंत्रज्ञान, रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादींच्या प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे व मृत्युबद्दलचे गूढ उकलले असे वाटत असल्यामुळे अमरत्वाच्या संशोधनासाठी (पुन्हा) एकदा प्रयत्न केले जात आहेत. अपघाती मृत्यु व निसर्ग संकटातून होणारी जीवितहानी यांचा अपवाद वगळता गंभीर आजार व वृद्धत्वामुळे होणाऱ्या मृत्युवर मात करणे शक्य आहे असे या विषयातील अभ्यासकांना वाटत आहे. शरीरातील पेशींना पुनर्जिवीत केल्यास व जनुकांची पुनर्रचना करणे शक्य झाल्यास मृत्युवर मात करता येईल असे अभ्यासकांचे मत आहे. आजारपणामुळे आपल्या शरीरातील कुठल्याही अवयवाला इजा झाल्यास वा वय वाढत गेल्यामुळे अवयव निकामी होत असल्यास त्याची आपोआप दुरुस्ती करण्याची यंत्रणा शरीरात असल्यास आपण जास्तीत जास्त काळ आरोग्यमय जीवन जगत मृत्युला टाळू शकतो, असेही अभ्यासकांना वाटत आहे. गूगल कंपनीचे इंजिनियर व फ्युचरालॉजीचे अभ्यासक, रे कुर्झवेल यानी तर पुढील सात-आठ वर्षात आपण मृत्युवर मात करू शकू अशी भविष्यवाणी वर्तविली आहे. मृत्युवर मात करण्यासाठीच्या संशोधनाला आर्थिक बळ पुरविणाऱ्यात अमेझॉनच्या सर्वेसर्वा जेफ बेझोज, गूगलचे सहव्यवस्थापक, सेर्जाइ ब्रिन, पेपालचे पीटर थीअल व रशियातील अनेक अनामधेय नवश्रीमंत आहेत. आणि या संशोधनात चीनही मागे नाही.
काही अभ्यासकांच्या मते अमरत्व हे एकाच वेळी वरदानही आहे व शापही आहे. मृत्यु नसल्यास एवढ्या तोंडांना खायला अन्न कुठून आणायचे? माणसाबरोबरच इतर प्राणीवर्गही अमर राहील का? पुढील काही दशकात प्रत्येक घराघरात आजोबा, पणजोबा, आजी, आजीची आजीसकट सर्व गोतावळा एकाच (वा वेगवेगळ्या) ठिकाणी राहू लागल्यास रहायला जागा आणायचे कुठून? उपलब्ध संसाधनासाठी भविष्यातील तरुण पिढीबरोबर वृद्ध स्पर्धा करत राहतील का? खायला अन्नाचा तुटवडा पडल्यास भुकेने व्याकूळ झालेल्या माणसांना मृत्युही येत नसल्यामुळे त्यांनी नेमके काय करावे? (कदाचित विज्ञान-तंत्रज्ञान माणसासाठी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया शोधू शकेल.)
हे अमरत्व नैतिकता व कायदा-सुव्यवस्था यांच्यावर काय परिणाम करू शकेल? जर मृत्युचीच जीवनातून हकालपट्टी झाल्यास जीवन निरर्थक ठरणार नाही का? आधुनिक जीवन पद्धती इतक्या वेगाने पळत आहे की प्रत्येक जण काही ना काही तरी करत असतो परंतु त्यातून काही निष्पन्न होत नाही. जर आपल्या आयुष्यात वेळच वेळ असल्यास त्या वेळेचे करायचे काय? मोबाइलवरील रील्स बघत वा वाट्सअॅप विद्यापीठातील बाष्कळ मेसेजेस वाचत आपण आयुष्य काढणार आहोत का? आपल्याला माहित असलेल्यांचे व माहित नसलेल्यांचे मेसेजेस फॉर्वर्ड करण्यातच आयुष्य ढकलणार आहोत का?
याच प्रमाणे या पृथ्वीवरील संघटित धर्म-व्यवहाराचे काय होणार? मुळात प्रत्येक धर्म मृत्युनंतरच्या ऐष-आरामी जीवनाचे गाजर दाखवत तगून आहेत. त्यातून मृत्युलाच वजा केल्यास देव-प्रेषित-धर्म-पाप-पुण्य-स्वर्ग-नरक-आत्मा-अध्यात्म इत्यादींचे काय होणार? खरे पाहता या पृथ्वीतलावरील माणसाचा वावर हजारो वर्षापूर्वीचा आहे. त्या तुलनेने धर्माचा उदय फार फार तर हजार-दोन हजार वर्षापूर्वी झाला आहे. त्यामुळे जर विज्ञान-तंत्रज्ञानामुळे माणसाला अमरत्व मिळाल्यास आता असलेल्या धर्माची हकालपट्टी होऊन एखाद्या नवीन धर्माचा उदय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमरत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मृत्यूच्या बरोबरच्या झोंबाझोंबीत अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. उलट हा लढा माणसाला गोत्यात आणतो की काय असे वाटत आहे. त्यामुळे अजून तरी अमरत्व हे दुःस्वप्नच ठरत आहे. तरीसुद्धा भविष्यात कधी तरी माणूस मुत्युवर मात करू शकेल, हेही आपल्याला नाकारता येत नाही.
पुतिन, शी आणि किम
पुतिन, शी आणि किम यांच्यात नुकत्याच झालेल्या अमरत्वाबाबतच्या वार्तालापाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे -
https://edition.cnn.com/2025/09/03/world/video/putin-xi-hot-mic-immorta…