पुस्तकांविषयीचे ब्लॉग्ज साहित्यसृष्टीला हानिकारक आहेत का? (भाग २)

'पुस्तकांविषयीचे ब्लॉग्ज साहित्यसृष्टीला हानिकारक आहेत का?' या धाग्यावरच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या माझ्या प्रयत्नांत काय निष्पन्न झालं ते इथे मांडलं आहे. प्रतिसाद मोठा झाल्यामुळे स्वतंत्र धागा काढला आहे.

समकालीन मराठी साहित्याविषयी मराठी ब्लॉग्जवर कितपत लिहिलं जातं हे पाहण्यासाठी मी सध्या चर्चेत असलेल्या काही साहित्यिकांची मासल्यादाखल (सॅंपल म्हणून) यादी तयार केली. त्यात मी ही नावं घेतली :
आसाराम लोमटे, कृष्णात खोत, प्रशांत बागड, प्रवीण बांदेकर
(ही यादी परिपूर्ण नव्हे, पण मासल्यादाखल प्रातिनिधिक म्हणता यावी. गेल्या काही वर्षांत हे लेखक मराठीतले नव्या दमाचे म्हणून छापील माध्यमांत गाजत आहेत. त्यांना काही महत्त्वाचे पुरस्कारदेखील मिळाले आहेत. त्यांच्या साहित्याची परीक्षणं लिहून आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या बातम्या देऊन पारंपरिक छापील प्रसारमाध्यमांनी यांची दखल घेतलेली आहे. म्हणून त्यांची निवड केली.)

शोध घेण्यासाठी मी दोन ठिकाणं निवडली - त्यांपैकी एक हे काही हजार मराठी ब्लॉग्जचं संकलन (सिंडिकेशन) असलेलं एक संकेतस्थळ होतं आणि दुसरं म्हणजे बरीच वर्षं कार्यरत असणारं, गांभीर्यानं चालवलं जाणारं एक लोकप्रिय संवादस्थळ होतं. सदस्यसंख्या, साहित्यविषयक लेखनाची संख्या यांवर ही निवड आधारित होती.

आसाराम लोमटे यांचा 'इडा पिडा टळो' हा २००७ सालचा कथासंग्रह छापील माध्यमांत गाजला होता. मराठी ब्लॉग्जवर शोधलं असता मला त्याविषयी एक लेख सापडला. तो ब्लॉग फक्त साहित्याला वाहिलेला नव्हता, पण आसाराम लोमटेंबरोबर आनंद विंगकर यांच्या 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' या आणखी एका गाजलेल्या नव्या पुस्तकाविषयीचा एक लेखही मला तिथे सापडला. (विंगकरांविषयीही मराठी ब्लॉग्जवर हा एवढा एकच लेख सापडला.) गोष्ट सांगून, किंचित रसग्रहण करून पुस्तक खूप आवडलं असं सांगणं हे या लेखांचं स्वरूप होतं. संवादस्थळावर शोधलं असता एका लेखात लोमटे परिचित असल्याचा एक उल्लेख सापडला, पण पुस्तकाविषयी काहीही नाही.

कृष्णात खोत यांची 'रौंदाळा' ही कादंबरी २००८ साली गाजली होती. तिला दमाणी पुरस्कार मिळाला होता. ब्लॉग्ज किंवा संवादस्थळ यांपैकी कुठेच खोतांबद्दल किंवा त्यांच्या पुस्तकांबद्दल काही मजकूर सापडला नाही. प्रशांत बागड यांचा 'विवादे विषादे प्रमादे प्रवासे' हा कथासंग्रह गेल्या वर्षी गाजला होता. त्यांना त्यासाठी 'शब्द' पुरस्कार मिळाला होता. ब्लॉग्ज किंवा संवादस्थळ यांपैकी कुठेच त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या पुस्तकांबद्दल काही मजकूर सापडला नाही.

प्रवीण बांदेकर यांची 'चाळेगत' ही कादंबरी २०१० साली गाजली होती. त्यांना दमाणी पुरस्कार आणि 'शब्द' पुरस्कार मिळाला होता. संवादस्थळावर त्याविषयी 'हे कुणी वाचलं आहे का?' अशी एक पृच्छा आणि 'चांगलं आहे' असं एक विधान एवढंच सापडलं. ब्लॉग्जवर काहीही सापडलं नाही.

२००७पासून आजपर्यंत वेळोवेळी चर्चेत आलेले असे हे साहित्यिक आंतरजालावर जवळपास दुर्लक्षित आहेत असं यावरून म्हणता यावं.

मग मी असा विचार केला की कदाचित आपलं सॅंपल चुकलं असेल आणि इतर काही नव्या साहित्यिकांची नोंद घेतली गेली असेल. मग मी संवादस्थळावरचं गेल्या वर्षभरामध्ये अद्ययावत किंवा प्रकाशित झालेलं पुस्तकविषयक लिखाण पाहिलं. (एकूण धागे : ७३)
त्यापैकी एका पुस्तकाचा किंवा लेखकाचा दीर्घ परिचय असे धागे मी पाहिले, कारण फक्त एखाद्या परिच्छेदापुरते किंवा आवडलं/नावडलं/वाचायचं आहे/वाचलं का?/कुठे मिळेल? एवढेच उल्लेख मला नको होते. असे एकूण धागे : ४०
त्यांपैकी फिक्शनवरचे धागे : १७
त्यांपैकी २००७ किंवा नंतर प्रकाशित झालेल्या मराठी फिक्शनवरचे धागे : १

हा एकमेव धागा कथा किंवा कादंबरीविषयी नसून एका चित्रपटाच्या पटकथेच्या प्रकाशित पुस्तकाविषयी होता. एका वर्षाचा नियम काटेकोरपणे न पाळता आणखी एक धागा मी माझ्या सॅंपलमध्ये घेतला असता, तर ही संख्या एकऐवजी दोन झाली असती. संवादस्थळावरचं एकूण लिखाण आणि पुस्तकांविषयीच्या एकूण धाग्यांची संख्या पाहता हा आकडा कमीच वाटतो. नव्या वाटा चोखाळणारं साहित्य लोकांसमोर येण्यात मराठी आंतरजालाची मदत होत नाही; त्यासाठी साहित्यविषयक छापील लिखाणाला पर्याय नाही असा निष्कर्ष मला यावरून काढावा लागला.

'सम आर मोअर इक्वल' आणि मतांचा गलबला : अधिकाधिक माणसं लिहितीबोलती व्हावी आणि विविध माध्यमांतून व्यक्त व्हावी हा माध्यमांच्या लोकशाहीकरणाचा मुद्दा मला मान्यच आहे, पण इतरांहून अधिक सक्षम लोक कोणत्याही क्षेत्रात असतात तसेच काही जण साहित्याविषयीच्या लिखाणाच्या क्षेत्रातदेखील असणार, हेसुध्दा मला अगदी साहजिक वाटतं. कोण लोक अधिक सक्षम आहेत याविषयी मतभेद होऊ शकतात; ते सापेक्ष असतं असाही युक्तिवाद करता येईल; पण म्हणून कुणाच्याही मताला सारखंच मूल्य असावं असं म्हणता येईल असं मला वाटत नाही. या बाबतीत कुणाला स्टॉटहार्ड यांच्या गुणवत्तेविषयी शंका व्यक्त करता यावी, पण म्हणून 'टाईम्स लिटररी सप्लिमेंट'चा दर्जा कमी होत नाही आणि मराठी आंतरजालावरच्या लिखाणाचा दर्जा वाढतही नाही. मराठीतलं साहित्यविषयक छापील लिखाणसुध्दा 'टी.एल.एस.'शी गुणवत्तेत स्पर्धा करू शकणार नाही; पण आजमितीला तरी मला असं म्हणणं भाग आहे की मराठी साहित्यात नवं काय घडतंय याच्याशी संपर्क ठेवायचा असेल, तर छापील लिखाणाला पर्याय नाही. 'महाराष्ट्र टाईम्स'च्या पोरकट स्वरूपाला शिव्या देण्याची एक प्रवृत्ती मला आंतरजालावर दिसते; पण मी निवडलेल्या लेखकांविषयीचं परीक्षणात्मक लेखन तिथेदेखील मला सापडलं हे जाताजाता नोंदवतो.

जे चाललं आहे ते उत्तम आहे, आणि स्टॉटहार्ड यांच्यासारखी जुनी खोडं आपल्या असुरक्षिततेपोटी किंवा येनकेन प्रकारेन प्रसिध्दी लाटण्यासाठी अशी विधानं करत आहेत, असं म्हणून आंतरजालावरच्या साहित्यप्रेमींनी सद्य परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं की स्वत:ला अधिक सक्षम करण्यासाठी कष्ट घ्यायचे हा निर्णय मी त्यांच्यावर सोपवेन.

(माझ्या पध्दतीत चुका असतील. त्यामुळे मला गवसलं तेच अंतिम सत्य असा माझा दावा नाही. इतरांना याहून वेगळा आणि अधिक दर्जेदार मजकूर मराठी आंतरजालावर सापडला तर मी त्याचं स्वागतच करेन आणि मला त्याचा आनंदच होईल.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

तर मग स्टॉटहार्ड यांचा निष्कर्ष निदान मराठी साहित्यापुरता तरी, जालावर लेखनच होत नसल्याने, लागू होत नाही, असे म्हणता येईल.
छापील माध्यमाबाबतच्या निष्कर्षाशी सहमत. आजची स्थिती तीच आहे. अर्थात, त्यातून गरज पूर्ण भागते, असे मात्र म्हणता येणार नाही हे नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"साहित्यविषयक छापील लिखाणाला पर्याय नाही असा निष्कर्ष मला यावरून काढावा लागला."

~ आणि मी तर असेच मानेन की मग या निष्कर्षाला चुकीचे म्हणणे योग्यही नाही. मराठी आंतरजालाचे आयुष्य ते किती, नखभराचे ! या माध्यमाचा आपल्या साहित्यिक लिखाणासाठी उपयोग करून घेणारे म्हणजे कुणी कालिदास शूद्रक चार्वाक वा शेक्सपीअर टेनिसन डिकन्स तरी नाहीत. आहे एक "इझिली अव्हेलेबेल मिडिया..." त्यातही कार्यालयातील नेटचा चकटफू उपयोग करून तेथून आपली लिखाणाची खुमखुमी जिरविणारेच अत्रेफडकेमाडखोलकर सांप्रत महाराष्ट्र देशी असल्याने त्यांच्या लिखाणाला एक अस्सलपणा, एक जातिवंतपणा कधी लाभणेही शक्य नाही. त्यामुळे आतंरजालीय साहित्यिक घडामोडीचा आणि वाङ्मयीन अभिरुचीच्या समृद्धीचा एकमेकाशी 'निकाह' लावणेही योग्य नव्हे.

बरे...छापील माध्यमाद्वारे [केवळ रविवारच्या पुरवण्या नव्हे तर साहित्यिक विषयक घडामोडीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणारी 'ललित' सारखी नियतकालिकेही] वाचकासमोर प्रकट होणारी मते ज्यानी लिहिलेली असतात त्याना मुळातच वाचकाच्या मनात एक स्थान असतेच असते. अशा नियतकालिकातून नित्यनेमाने प्रसिद्ध होणार्‍या आगामी पुस्तकांच्या जाहिरातीही वाचकाला त्या पुस्तकाच्या खरेदीपर्यंत खेचून नेण्यात सक्षम असतात. आंतरजालीय ब्लॉग्ज तसेच संवादस्थळामार्फत अशा संदर्भात होणार्‍या देवाणघेवाणीला 'वैचारिक'च म्हणता येते असेही नेहमी घडत नाही. आंतरजाल केवळ साहित्यिक चळवळीशी कधीच निगडित असत नाही हे तर मान्य व्हावेच. त्याच्या अनेक कंगोर्‍यापैकी 'पुस्तके' हा एक. आज 'ऐसी अक्षरे' सम अनेक संवादस्थळे वाचकासाठी उपलब्ध आहेत पण यातील प्रत्येक संस्थळावर 'साहित्य' हा एकमेव विषय कधीच असत नाही....असूही शकत नाही.

सर पीटर स्टॉटहार्ड सारख्या ज्येष्ठाच्या 'ब्लॉग्ज संस्कृती' वरील मतांना 'कचर्‍यात फेकून देणारी' मतेही जालावर कमी आढळत नाही, याला कारणही इथे बोकाळलेली 'चीप संस्कृती'. स्टॉटहार्डसारखी व्यक्तीचे मत म्हणजे त्या मागे अभिजात साहित्यवाचनासंदर्भातच एखादी कळकळ असेल वा त्यांचे या संदर्भातील मत हे कोणत्यातरी अभ्यासाचा परिपाक असू शकेल ही बाबच विचारात न घेता आपल्या मताचा पतंग सर्रदिशी वर चढवायचा आणि एका वाक्यात त्या अनुभवसिद्ध व्यक्तीला मोडीत काढायचे हा ब्लॉग संस्कृतीने जोपासलेला एक "इझी" मार्ग होय.

त्यामुळे पुस्तकांविषयीचे ब्लॉग्ज साहित्य संस्कृतीला हानीकारक असोत वा नसोत, पण वृद्धीसाठी छापील माध्यमांचा जितका उपयोग होऊ शकतो तितका आंतरजालीय ब्लॉग्जचा होईलच असे मात्र म्हणता येईल अशी [आजची] स्थिती नाही हे सत्य समोर येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>तर मग स्टॉटहार्ड यांचा निष्कर्ष निदान मराठी साहित्यापुरता तरी, जालावर लेखनच होत नसल्याने, लागू होत नाही, असे म्हणता येईल.<

"आमच्या मुलानं परीक्षेचा पेपर कोरा दिला. त्यामुळे त्यानं चुकीची उत्तरं दिली नाहीत. तद्वत त्याला पास करा." असं म्हणताय होय? Smile

>> आतंरजालीय साहित्यिक घडामोडीचा आणि वाङ्मयीन अभिरुचीच्या समृद्धीचा एकमेकाशी 'निकाह' लावणेही योग्य नव्हे. <<

पहिल्या भागावर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या पाहता असं म्हणण्याला अनेकांची हरकत दिसते. मी त्या भागात म्हटल्याप्रमाणे 'सध्या काय वाचताय?' सारख्या धाग्याची लोकप्रियता, इतर ठिकाणच्या साहित्यविषयक लेखन स्पर्धा वगैरेंना मिळणारा मोठा प्रतिसाद वगैरे पाहता मला असं जाणवतं की स्वतःला साहित्यप्रेमी म्हणवणारे असे पुष्कळ लोक आंतरजालावर वावरतात. कोणतं पुस्तक विकत घेतलं, कसं वाटलं याबाबत ते एकमेकांशी संवाद साधतात आणि त्यातून स्वतःला समृध्द करतात असं ते स्वतःच म्हणतात. (तुलना करायची तर दृश्यकलांबाबत असं म्हणता येत नाही. आवडत्या चित्रकाराबद्दल किंवा चित्राबद्दल रसग्रहणात्मक लिखाण मराठी आंतरजालावर फारसं सापडत नाही.) मग जर असं असेल तर त्यांच्या अभिरुचीबद्दल त्यांना उत्तरदायी का ठरवू नये असा माझा प्रश्न आहे.

>>छापील माध्यमाद्वारे [केवळ रविवारच्या पुरवण्या नव्हे तर साहित्यिक विषयक घडामोडीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणारी 'ललित' सारखी नियतकालिकेही] वाचकासमोर प्रकट होणारी मते ज्यानी लिहिलेली असतात त्याना मुळातच वाचकाच्या मनात एक स्थान असतेच असते.<<

म्हणून तर मला प्रश्न पडतो की हे आंतरजालावरचे साहित्यप्रेमी छापील माध्यमांत साहित्याबद्दल काय लिहून येतं ते वाचत नाहीत का? कारण त्यांच्या बोलण्यात नव्या लेखकांचे उल्लेखच येत नाहीत. म्हणजे मग हा छापील माध्यमांबाबतचा त्यांचा तुच्छतावाद समजायचा का? की आणखी काही?

>>आंतरजाल केवळ साहित्यिक चळवळीशी कधीच निगडित असत नाही हे तर मान्य व्हावेच. त्याच्या अनेक कंगोर्‍यापैकी 'पुस्तके' हा एक. आज 'ऐसी अक्षरे' सम अनेक संवादस्थळे वाचकासाठी उपलब्ध आहेत पण यातील प्रत्येक संस्थळावर 'साहित्य' हा एकमेव विषय कधीच असत नाही....असूही शकत नाही.<<

पण हाच मुद्दा छापील माध्यमांबाबतसुध्दा मांडता येईल - म्हणजे तिथेदेखील इतर अनेक विषयांबरोबर याही विषयावर लिखाण प्रकाशित होतं. पण म्हणून नव्या लेखकांना अनुल्लेखानं मारलं जात नाही. मी उलट म्हणेन - की ज्याला साहित्यात खरा रस असेल तो कुठे काय लिहिलं जातं याकडे नजर ठेवून कुठे आपल्याला अधिक समृध्द करणारं लिखाण सापडतं याची पारख करेल. ही अपेक्षा अवाजवी वाटते का?

>>स्टॉटहार्डसारखी व्यक्तीचे मत म्हणजे त्या मागे अभिजात साहित्यवाचनासंदर्भातच एखादी कळकळ असेल वा त्यांचे या संदर्भातील मत हे कोणत्यातरी अभ्यासाचा परिपाक असू शकेल ही बाबच विचारात न घेता आपल्या मताचा पतंग सर्रदिशी वर चढवायचा आणि एका वाक्यात त्या अनुभवसिद्ध व्यक्तीला मोडीत काढायचे हा ब्लॉग संस्कृतीने जोपासलेला एक "इझी" मार्ग होय.<<

पण मग ही वृत्ती साहित्याला आणि एकंदर संस्कृतीलाच हानिकारक नाही का? याउलट आपल्या जालीय वावरातून इथे लोकप्रिय झालेल्या साहित्यप्रेमींनी अधिक जबाबदारीनं वागायला हवं; नाहीतर आपण केवळ हिणकस लोकप्रियतेसाठी वाटेल ते लिहितो आणि या नव्या माध्यमाला लोक ज्यामुळे पोरकट ठरवतील असं वागून काहीतरी हानी करतो ही बाब स्वीकारायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तर मग स्टॉटहार्ड यांचा निष्कर्ष निदान मराठी साहित्यापुरता तरी, जालावर लेखनच होत नसल्याने, लागू होत नाही, असे म्हणता येईल.

"आमच्या मुलानं परीक्षेचा पेपर कोरा दिला. त्यामुळे त्यानं चुकीची उत्तरं दिली नाहीत. तद्वत त्याला पास करा." असं म्हणताय होय?

घ्या... आम्ही जे बोललोच नाही ते तुम्हाला कुठून ऐकू येतं कळत नाही राव... आमच्या मुलानं परीक्षाच दिली नाही, असे आमचे म्हणणे आहे. पास करण्याचा प्रश्नच नाही. तो अनुपस्थित आहे परीक्षेला इतकाच त्याचा अर्थ. छ्या... खोड्या काढायच्या त्या किती? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला आहे पण आंतरजालावरचे दुवे म्हणजे म्हणजे जणू सापळेच असतात, एक वाचायला गेले की त्यातुन हजार दुवे मिळत जातात. असो. पीटर स्टॉटहार्ड यांच्या मुलाखतीत, ब्लॉग्जच्या माध्यमातून वाढलेल्या मतांच्या गलबटांत, पुरेशी सशक्त समीक्षा निर्माण होत नसल्याचा मुद्दा अधोरेखित आहे असे वाटते. या माध्यमांमुळे साहित्यविश्वातही पॉप्युलर कल्चर  अधिक पाय रोवत आहे आणि त्यामुळे साहित्याच्या दर्जावर त्याचा विपरीत परीणाम होतो आहे, ही त्यांची भिती आणि असुरक्षितता अनाठायी आहे असेही वाटत नाही. त्यांच्या मुलाखतीत Not everyone's opinion is worth the same हे जे शब्द आहेत ते प्रसारमाध्यमांना रोखून आहेत असे वाटते. ़जे लोकप्रिय आहे, सर्वमान्य आहे तेच लोकांसमोर ठेवण्याने साहित्याची हानी होते आणि माहिती क्रांतीच्या जमान्यातले हे वातावरण निकोप समिक्षेसाठी पोषक नाही इतकाच त्यांचा मुद्दा वाटला. त्याला पर्याय म्हणून इतरांच्या मतस्वातंत्र्याला ते आव्हान देत आहेत असे मलातरी वाटले नाही.
मौज अशी आहे की त्यांना विरोध करणारी जी बहुसंख्य मंडळी आहेत ती या ब्लॉगसंस्कृतीचा अविभाज्य भागच आहेत, स्वतः ब्लॉगलेखक तरी आहेत किंवा त्यातून फायदा मिळालेले लेखक तरी आहेत. त्यामुळे स्टॉटहार्ड यांची टीका त्यांच्या फार जिव्हारी लागली आहे असे वाटले. (मागे 'वाचावे नेटके' च्या निमित्ताने उठलेला गदारोळ आठवला.)
प्रस्थापित माध्यमांमधे दिसणारी प्रस्थापित लेखक, प्रकाशक आणि समीक्षक यांच्यातली सलगी खटकणारयांना आंतरजालावर अधिक मोकळी, खुली आणि नवोदिक पण दर्जेदार पुस्तकांना व्यासपीठ मिळवून देणारी समीक्षा होईल अशी अपेक्षा वाटणे सहाजिक आहे. प्रत्यक्षात मात्र 'तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो अशी ब्लॉगलेखकांची साखळीच जास्त दिसते (इथे सन्मानयीय अपवाद वगळता असे लिहिणे फार गरजेचे आहे) , त्यातून वाचकांना नवीन खरंच काही मिळतं की नवीन प्रस्थापितांना नवीन माध्यम हा कळीचा मुद्दा आहे.

अवांतरः मला स्टॉटहार्ड यांच्या मुलाखतीतल्या इतरच काही गोष्टी खटकल्या, उदा. त्यांनी आख्ख्या आयुष्यात केवळ सहा चित्रपट पाहिले आहेत किंवा एखादा सामना त्यांनी केंव्हा पाहिला ते त्यांना आठवत नाही इत्यादी. मला असा प्रश्न पडला की जी व्यक्ती समाजाच्या इतर क्षेत्रांपासून इतकी अनभिज्ञ किंवा isolated (मराठी?) रहाते, तिचा जीवनविषयक दृष्टीकोन संकुचित किंवा मर्यादित होण्याची भिती नाही का? आणि जर अशी शक्यता असेल तर त्याचा परीणाम त्यांच्या समीक्षेवर  होणार नाही का? पुस्तके ही अशीच असावीत, साहित्य हे असेच असावे किंवा अभिव्यक्ती ही अशीच सर्वोत्तम अशा धारणा जोपासल्या गेल्या तर त्याने मात्र साहित्याची हानीच होईल असे वाटते. वानगीदाखल, जॉईसने युलिसीस लिहिण्याआधी 'फिनिगन्स वेक' लिहिले असते तर त्याला एकातरी प्रस्थापित समिक्षकाने गांभिर्याने वाचले असते का असा प्रश्न पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुची यांच्या प्रतिसादातील "मला असा प्रश्न पडला की जी व्यक्ती समाजाच्या इतर क्षेत्रांपासून इतकी अनभिज्ञ किंवा isolated (मराठी?) रहाते, तिचा जीवनविषयक दृष्टीकोन संकुचित किंवा मर्यादित होण्याची भिती नाही का?..." या प्रश्नाविषयी लिहितो....अर्थात हे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नसून त्यानिमित्ताने केलेले एक निरिक्षण आहे, हेही नोंदवितो.

~ सर पीटर यानी तशी कबुली त्या मुलाखतीत दिली आहे म्हणून तुम्हाआम्हाला त्यांचे ते अंग समजले अन्यथा साहित्यातील त्यांच्या स्थानाविषयी दुमताची शक्यता नव्हती. दुसरे असे की, एखाद्याने खूप चित्रपट पाहिले म्हणून तो चित्रपटसमीक्षा करण्यास सर्वार्थाने लायक असेल असेही नाही. आपल्याकडील जी.ए.कुलकर्णी यानी त्यांच्या आयुष्यात केवळ ३ हिंदी चित्रपट पाहिले असल्याचे ते सांगत....इंग्रजी अगणित पाहिले होते. तरीही त्या तीनच्या शिदोरीवरून त्यानी हिंदी चित्रपटसृष्टीविषयी जे मत [अर्थात प्रतिकूल] बनविले होते ते टाकावू म्हणता येत नाही. जीवनाविषयीची त्यांचा दृष्टीकोन कधीच संकुचित राहिल्याचे त्यांच्या परिचितांना जाणवलेले नाही. किंबहुना माधव आचवलांसारखे त्यांचे निकटचे मित्र म्हणत असत की, एकाच जागी बसून जगाची सफर करणारी ती आगळी व्यक्ती आहे. म्हणजेच त्याना उपलब्ध असलेल्या माहितीस्त्रोताच्या आधारे जी.एं.यानी आपल्या आयुष्याला मर्यादित करून ठेवले नव्हते असेच म्हणावे लागेल.

चित्रपट पाहाणे वा न पाहाणे, सामन्यासाठी हजेरी लावणे वा ना लावणे याचा साहित्यसमीक्षेशी काही संबंध येत असेल असे वाटत नाही. साहित्यसमीक्षा हे क्षेत्र पूर्णतः अ‍ॅकेडेमिक असल्याने एंटरटेनमेन्ट हे घटक कधी त्यात अडथळा आणत नसावे.

[अवांतर Isolated चे मराठी रुप 'अलिप्त' असे होऊ शकते]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्टॉटहार्डचा मुद्दा योग्यच आहे.

पण ब्लॉगविश्व हे इतर रंजक माध्यमांप्रमाणेच(दूरदर्शन, रेडीओ वगैरे) एक आहे असे मानल्यास त्यांचे विधान थोडे सरसकट वाटते, ही सगळीचे माध्यमे दर्शकांवर परिणाम करत वाटचाल करत असतात, त्यात जे जास्त रंजक असते ते कुरघोडी करते, ब्लॉगविश्व साधारणपणे वैयक्तिक उपक्रमाचा भाग आहे, त्यामधे ब्लॉगकर्त्याला साध्यवेळेत लिहाव्यावाटणार्‍या समिक्षा असतात, परंतू छापीलमाध्यमात आवडीव्यतिरिक्त पोटापाण्याचा व्यवसाय म्हणूनदेखिल समिक्षा लिहाव्या लागतात व त्यादेखिल साहित्याबद्दल मतच(चांगले/वाईट) तयार करतात.

गिरिश कुबेर, प्रशांत दिक्षित, अच्युत गोडबोलेंसारखी माणसे आवडीने पण पोच(रीच) असलेल्या छापील माध्यमातूनच समिक्षा लिहितात, पण ते देखिल नविन स्थानिक चांगल्या लेखनाबद्दल सहसा लिहित नाहीच, स्थानिक लेखनाबद्दल छापील माध्यमात नियमित अढळणार्‍या समिक्षा पुस्तकाबद्दल उत्सुकता वाढवतात असे वाटत नाही. ब्लॉग्सवर आज उपलब्ध समिक्षा लेखन कदाचित उच्च दर्जाचं नसेलही पण ते आवडीने केलेलं असल्यामुळे ते प्रगल्भ होत जाणार असं वाटतं, तसेच, ब्लॉग किंवा चर्चा स्थळांवर अढळणार्‍या मतांवर साहित्यसृष्टीचं चांगलं/वाईट अवलंबून असेल तर साहित्यसृष्टीला त्यावर टिका करण्यापेक्षा त्या माध्यमाचा उचितवापर करणे शिकले पाहिजे, स्टॉटहार्डचा मुद्दा योग्य असला तरी तो साहित्यसृष्टीला कृतीशील पर्यायाकडे नेणारा वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीतलं साहित्यविषयक छापील लिखाणसुध्दा 'टी.एल.एस.'शी गुणवत्तेत स्पर्धा करू शकणार नाही

निष्कर्ष फारसा समजला नाही. फारतर हे सापेक्ष मत म्हणून मान्य आहेच!

बाकी वरील वाक्य जाऊ द्या पण एकूण लेखाचा सुर पाहता, काहि (यशस्वी) पुस्तकांची परिक्षणे नाहीत म्हणून आंतरजालीय समीक्षणाला डावे ठरवणे जरा घाईचे वाटते. दर्जा 'किती व कोणत्या' पुस्तकांची परिक्षणे आहेत यावरच कसा ठरतो हेही समजले नाही. याउलट (या तथ्यांबरोबरच) तुलना करण्यासाठी छापिल आणि आंतरजालावर दोन्हीकडे प्रकाशित झालेल्या पुस्तकांतील समीक्षांच्या दर्जाविषयी मुक्तचिंतन/अभ्यास असे काहि आले असते तर अधिक आवडले असते + मांडलेल्या मुद्यांसाठी पुरक ठरले असते (थोडक्यात, लेखनातील अनुमानाला फारसा विरोध नाहीये पण ते जो विदा वापरून काढले आहे तो पुरेसा नाही असे वाटते)

पण आजमितीला तरी मला असं म्हणणं भाग आहे की मराठी साहित्यात नवं काय घडतंय याच्याशी संपर्क ठेवायचा असेल, तर छापील लिखाणाला पर्याय नाही

(दुर्दैवाने) या उत्तरार्धाशी अर्थातच मी सहमत आहे - आणि लेखात मांडलेला विदा पाहता हा (इतपत) निष्कर्ष योग्य वाटतो (परंतु यामुळे जे गैरछापिल माध्यमात येतंय त्याचा दर्जा फारच कमी आहे असे मात्र दिसून येत नाही)

दुसरे असे की मुळ स्टॉटहार्ड यांच्या लेखातील ब्लॉग्सबद्दलचा सूर (मलातरी) कुत्सित वाटला. जरी त्यांना ब्लॉग लेखनाला डावे ठरवायचे आहे तर त्यांनी त्यासाठी योग्य तो विदा द्यायला हवा होता. केवळ स्टॉटहार्ड यांना वाटते म्हणून ते योग्यच असले पाहिजे असे त्यांना वाटते असे काहिसे वाटले. अश्या प्रकारचे घाऊक स्टेटमेन्ट मला सार्वजनिक जीवनात गैरजरूरी आणि काहिसे बेजबाबदार वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>मला स्टॉटहार्ड यांच्या मुलाखतीतल्या इतरच काही गोष्टी खटकल्या, उदा. त्यांनी आख्ख्या आयुष्यात केवळ सहा चित्रपट पाहिले आहेत किंवा एखादा सामना त्यांनी केंव्हा पाहिला ते त्यांना आठवत नाही इत्यादी. मला असा प्रश्न पडला की जी व्यक्ती समाजाच्या इतर क्षेत्रांपासून इतकी अनभिज्ञ किंवा isolated (मराठी?) रहाते, तिचा जीवनविषयक दृष्टीकोन संकुचित किंवा मर्यादित होण्याची भिती नाही का? आणि जर अशी शक्यता असेल तर त्याचा परीणाम त्यांच्या समीक्षेवर होणार नाही का?<<

उत्तम निरीक्षण आणि रास्त मुद्दा. एकेकाळी मलाही हा प्रश्न पडत असे. पण हळूहळू एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती थोडक्यात अशी -
ब्रिटिश संस्कृतीत शब्दांना अधिक प्रतिष्ठा आणि त्या मानानं इतर माध्यमांना कमी प्रतिष्ठा आहे (यात दृश्यकला, संगीत वगैरे येतात.) कदाचित त्यांच्या संस्कृतीत शेक्सपिअर, मिल्टन, चॉसर झाले तसे इतर क्षेत्रातले दिग्गज झाले नाहीत हे त्यामागचं कारण असेल किंवा कार्यकारणभाव उलट असेल (म्हणजे प्रतिष्ठा कमी म्हणून दिग्गज झाले नाहीत); पण असं झालं खरं. आणि खेळामध्येदेखील सामान्य ब्रिटिश फुटबॉल खेळतो, पण वरच्या वर्गातला क्रिकेट खेळतो अशी विभागणी आहे. आपलं कमनशीब असं की हे ब्रिटिश आपले राज्यकर्ते झाल्यामुळे आपणही आपली दृश्यसंस्कृतीची प्रतिष्ठा हरवून बसलो. इतर युरोपात दृश्यसंस्कृतीविषयी इतका तुच्छभाव दिसत नाही.

अवांतर - isolatedसाठी मराठी प्रतिशब्द - विलग किंवा एकाकी.

बाकी मुद्द्यांना जमेल तसे प्रतिसाद देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>काहि (यशस्वी) पुस्तकांची परिक्षणे नाहीत म्हणून आंतरजालीय समीक्षणाला डावे ठरवणे जरा घाईचे वाटते. दर्जा 'किती व कोणत्या' पुस्तकांची परिक्षणे आहेत यावरच कसा ठरतो हेही समजले नाही.<<

काही पुस्तकांची परीक्षणं नाहीत हा मुद्दाच नाही. मुद्दा असा आहे की नव्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं व्यक्तिशः एखाद्या साहित्यप्रेमीला परवडेल, पण आंतरजालावर होत असलेल्या एकंदर अभिव्यक्तीला ही पोकळी परवडत नाही. नव्या लेखनाची समीक्षा करून त्याला वाईट ठरवा हवं तर, पण गेल्या पाच वर्षांत मराठी साहित्यात काय होतं आहे ह्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष ही फार मोठी पोकळी आहे. त्यामुळे मग गुणवत्तेबद्दल शंका निर्माण होते.

>> यामुळे जे गैरछापिल माध्यमात येतंय त्याचा दर्जा फारच कमी आहे असे मात्र दिसून येत नाही<<

असा मुद्दा नाही. उदाहरणार्थ, कदाचित जी.एंबद्दल किंवा मर्ढेकरांबद्दल चांगली समीक्षा आंतरजालावर आली असेल. ती आली नाहीच असं मी म्हणत नाही आहे. वर रुची यांनी स्टॉटहार्ड यांच्याबद्दल असा मुद्दा मांडला होता -

जी व्यक्ती समाजाच्या इतर क्षेत्रांपासून इतकी अनभिज्ञ किंवा isolated (मराठी?) रहाते, तिचा जीवनविषयक दृष्टीकोन संकुचित किंवा मर्यादित होण्याची भिती नाही का? आणि जर अशी शक्यता असेल तर त्याचा परीणाम त्यांच्या समीक्षेवर होणार नाही का?

साहित्येतर क्षेत्रं सोडूनच द्या. साहित्यात सध्या काय चालू आहे याबद्दल इतकं औदासीन्य स्वतःला साहित्यप्रेमी म्हणवून घेणार्‍यांना कसं परवडतं?

मराठीतलं साहित्यविषयक छापील लिखाणसुध्दा 'टी.एल.एस.'शी गुणवत्तेत स्पर्धा करू शकणार नाही

>>निष्कर्ष फारसा समजला नाही. फारतर हे सापेक्ष मत म्हणून मान्य आहेच!<<

ताज्या टी.एल.एस.ची अनुक्रमणिका इथे उपलब्ध असते. त्याकडे नजर टाकली तरी मी काय म्हणतोय हे लक्षात येईल. त्यात ज्या विषयांवरच्या पुस्तकांची परीक्षणं आहेत त्यांचा एक मासला दाखवणारी ही यादी -
समाजशास्त्र -
The War of the Sexes – How conflict and cooperation have shaped men and women from prehistory to the present
Beyond Human Nature – How culture and experience make us who we are

चरित्र्/आत्मचरित्र -
Robespierre – A revolutionary life

क्लासिक्स -
Networks in the ancient Mediterranean.
War, Democracy and Culture in Classical Athens.
Democracy Beyond Athens – Popular government in the Greek classical age.
From Villain to Hero – Odysseus in ancient thought

फिक्शन -
नवीन पुस्तकांची परीक्षणं (तीन इंग्रजी आणि एक फ्रेंचमधून भाषांतरित)

पुस्तकांविषयीची पुस्तकं -
Books Without Borders in Enlightenment Europe – French cosmopolitanism and German literary markets

इतिहास - The Black Hole of Empire – History of a global practice of power

ही दीर्घ परीक्षणं झाली. याशिवाय छोट्या, एक दोन परिच्छेदांच्या परीक्षणांत बोळवण केलेली पुस्तकं -
The Biographical Dictionary of Popular Music
The Philosophy of Food
Radical Shakespeare – Politics and stagecraft in the early career

पुस्तकांव्यतिरिक्त -
रॉयल अ‍ॅकॅडमीमधल्या 'ब्राँझ' ह्या भव्य प्रदर्शनाचं परीक्षण
चेखॉवच्या 'थ्री सिस्टर्स'च्या सध्या चालू असलेल्या एका प्रयोगाचं परीक्षण

ज्याचा आवाका इतका आहे असं साहित्यविषयक छापील मराठी नियतकालिक सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||