'पुणे ५२' - अस्वस्थ वर्तमानावरचं टोकदार भाष्य
डिटेक्टिव्हकथा ही साहित्यविधा म्हणून मराठीत नवी नाही. बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर अशा अनेक लेखकांनी मराठीत हा प्रकार लोकप्रिय केला. त्यांच्या लिखाणामागची परदेशी मुळं ही स्पष्ट होती. मात्र परदेशी डिटेक्टिव्हकथांशी तुलना केली, तर त्यांचे मराठी अवतार खुजे वाटत राहतात. अमेरिकेत डॅशिएल हॅमेटनं मंदीच्या काळातल्या आपल्या लिखाणात चांगल्या-वाइटाच्या रुढ कल्पनांना धक्के दिले. रेमंड चॅन्डलरनं आपल्या कथांत सामाजिक वास्तवाचं चित्रण केलं. यापूर्वीची डिटेक्टिव्हकथा ही मुख्यत: दोन गोष्टींवर भर देत असे - एक म्हणजे केलेला गुन्हा पचवता येत नाही, आणि दुसरं म्हणजे अखेरच्या रहस्यभेदानं निर्दोष व्यक्तीला न्याय मिळतो. शेरलॉक होम्स किंवा अगाथा ख्रिस्तीच्या प्वारोपेक्षा चॅन्डलरचे डिटेक्टिव्ह मातीच्या पायांचे होते. त्यांनी जुने फॉर्म्युले उलटेपालटे केले. फ्रान्समध्ये जॉर्ज सिमेनोंसारख्यांनी हे धडे गिरवत चक्क मानवी अस्तित्वविषयक प्रश्नांना ह्या लोकप्रिय विधेतून हात घातला. 'ल मोंद'सारख्या उच्चभ्रू फ्रेंच वृत्तपत्राच्या विसाव्या शतकातल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीमध्ये चॅन्डलर, सिमेनों किंवा जेम्स हॅडली चेससारख्या लेखकांच्या पुस्तकांचा समावेश होतो, ह्यावरून जागतिक स्तरावर ह्या विधेचं साहित्यिक योगदान लक्षात यावं. मराठी डिटेक्टिव्हकथांत मात्र पाश्चात्य साहित्यातल्यासारखी नैतिक गुंतागुंत, सामाजिक-राजकीय वास्तवाचं चित्रण किंवा अस्तित्वविषयक प्रश्नांना हात घालणं आढळत नाही.
पाश्चात्य डिटेक्टिव्हकथांनी चित्रपटांनाही पुष्कळ खाद्य पुरवलं. बिली वाइल्डरचा 'डबल इन्डेम्निटी' सुप्रसिद्ध आहे. हम्फ्रे बोगार्टनं साकारलेले 'बिग स्लीप' किंवा 'मॉल्टीज फाल्कन'मधले डिटेक्टिव्ह अजरामर आहेत. अनैतिक वाटणारे पण प्रेक्षकाची सहानुभूती खेचणारे नायक, धोकादायक वाटणारी पण नायकाची आणि प्रेक्षकाची अनुकंपा मिळवणारी व्हॅम्प आणि कथानकातल्या नैतिक तिढ्याला गडद करणारं काळं वातावरण असलेले 'न्वार' चित्रपट अशी एक वेगळी विधाच ह्या प्रकारच्या चित्रपटांनी निर्माण झाली. फ्रान्समध्ये क्लूझो, क्लोद शाब्रोल अशा अनेक दिग्दर्शकांनी ह्या प्रकारच्या कथानकांवर केलेले चित्रपट आज अभिजात गणले जातात. हिंदी चित्रपटांत राज खोसला (सी.आय.डी.) शक्ति सामंत (हावडा ब्रिज), गुरु दत्त (बाझी) यांच्या काही चित्रपटांत ही न्वार चित्रपटांची वैशिष्ट्यं दिसतात. मराठीत मात्र डिटेक्टिव्हकथांवर आधारित आणि अशी गुणवैशिष्ट्यं असणाऱ्या चित्रपटांची परंपरा निर्माण झालेली दिसत नाही. ह्या पार्श्वभूमीवर निखिल महाजन दिग्दर्शित 'पुणे ५२' ह्या ताज्या चित्रपटानं मराठीत काहीतरी अनोखं करून दाखवलं आहे असं म्हणता येईल.
(चित्रपटाचं कथासूत्र अनेक परीक्षणांमध्ये आलेलं आहे. त्यामुळे इथं ते वेगळं दिलेलं नाही, तर मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं गरजेपुरता त्याचा उल्लेख केला आहे.)
९०च्या दशकात पी.व्ही. नरसिंह रावांच्या सरकारनं अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवले. त्याची फळं आजचा मध्यमवर्ग चाखतो आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातला हा एक महत्त्वाचा कालखंड होता. अनेक गोष्टी ह्या काळात बदलू लागल्या. मध्यमवर्गाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीतही त्या काळानं मोठे बदल घडवले. हे सगळं आपल्याला परिचित आहे. पण त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न 'पुणे ५२' करतो.
अमर आपटे (गिरिश कुलकर्णी) हा खाजगी डिटेक्टिव्ह आपल्या कामात वाकबगार आहे, पण लौकिक आयुष्यात अयशस्वी आहे. त्याच्या बायकोनं (सोनाली कुलकर्णी) घरच्यांचा रोष पत्करून त्याच्याशी लग्न केलेलं आहे. बिलं थकवून थकवून ती कसाबसा संसार रेटते आहे. नवरा आपल्यावर प्रेम करतो; तो आपल्याशी प्रामाणिक आहे ह्याचा तिला रास्त अभिमान अाहे. पण 'तुला सुखात ठेवता येत नसेल तर ह्या त्याच्या गुणांना काय चाटायचंय?' ह्या अापल्या आईच्या (भारती आचरेकर) व्यवहारी प्रश्नानं तीही निरुत्तर होते. नवरा-बायकोत पैशावरून सतत चिडचिड होते. पैशासाठीची तिची भूणभूण अमरला वैताग आणते. अशा परिस्थितीत पैसे मिळवण्यासाठी तो एक काम हातात घेतो आणि आपल्या अशीलात (सई ताम्हणकर) गुरफटत जातो. अापलं नक्की काय होतंय, हे कळायच्या आत तो अनेक पातळ्यांवर अनैतिक होत जातो. मात्र त्याची ही नैतिक अधोगतीच त्याच्या आर्थिक उन्नतीची वाट ठरते.
हा गुंता प्रेक्षकाला अनेक पातळ्यांवर भंजाळून टाकणारा आहे. सई ताम्हणकरची व्यक्तिरेखा वरवर जे दाखवते आहे तशी वस्तुस्थिती नाही, हे प्रेक्षकाला आणि अमरलाही हळूहळू लक्षात येतं. तरीही अमर तिला जाब विचारत नाही; उलट तिच्यात गुंतत जातो. घरच्या कटकटी पाहता त्याचं हे वागणं स्वाभाविक वाटतं. पण त्यामुळे मराठी चित्रपटातल्या नायकाच्या रुढ प्रतिमेला अमर आपटेचं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व छेद देतं. आणि तरीही, म्हणजे बायकोशी प्रतारणा करत असूनही अमर प्रेक्षकाच्या नजरेतून उतरत नाही हे कथानकाचं सामर्थ्य म्हणता येईल. कोणत्याही मोहाच्या प्रसंगी नाही म्हणणं त्याला शक्य असतं, पण तो मोहाच्या गर्तेत अडकत जातो. आणि इथे कुठेतरी कथानकातलं सामाजिक भाष्य हळूहळू लक्षात येऊ लागतं.
घरात पैसा खेळू लागतो तशी बायको आणि सासूची वागणूक बदलत जाते. आर्थिक परिस्थितीत फरक पडतो तशी अमरला सामाजिक प्रतिष्ठाही मिळू लागते. पण हे सगळं कमावण्यासाठी त्याला आपल्यातल्या सत्वाशीच तडजोडी करायला लागलेल्या असतात. परस्त्रीबरोबर झोपून केलेल्या प्रतारणेपेक्षासुद्धा ही प्रतारणा जीवघेणी असते. आपल्या नैतिक अध:पतनाची जाणीव असूनही घरचे आपल्याला माफ करताहेत याचं कारण म्हणजे निव्वळ आपण घरात आणतो तो पैसा आहे; इतकंच नव्हे, तर नैतिक अधिष्ठान टिकवून परिस्थिती जैसे थे ठेवण्यात त्यांना रस नाही, ह्याची जाणीव अमरला हादरून टाकणारी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्ट व्यवहार करून ज्या मध्यमवर्गानं आपल्या पोळीवर तूप वाढून घेतलं त्यांच्यापुढे अमर आपटेचा नैतिक तिढा एक आरसा ठेवतो. कथानकातलं रहस्य हे एकाच वेळी उत्कंठा वाढवत नेतं आणि हा तिढा हळूहळू अधोरेखित करत जातं. ह्या प्रकारची गुंतागुंतीची पटकथा ही अर्थात नैतिक उपदेशाचे धडे देणाऱ्या सरधोपट मराठी चित्रपटांपेक्षा वेगळी आहे आणि म्हणूनच विशेष दखलपात्र आहे. कथानकात पुढे काय घडेल याविषयीची उत्सुकता इथे प्रेक्षकाला खिळवून ठेवते आणि त्याच वेळी त्यामागच्या सामाजिक टीकेमध्ये त्याला अंतर्मुख करण्याची ताकद आहे. अनैतिक वागल्यामुळे इथे शिक्षा होत नाही, तर बक्षीस मिळतं. पण मनाची कुरतड काही थांबत नाही. पारंपरिक नैतिक मूल्यं आणि भौतिक समृद्धीचं आमिष यांच्यातला हा टोकदार आणि जीवघेणा संघर्ष चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.
खेदाची गोष्ट म्हणजे अनेक परीक्षणं वाचता हे लक्षात येतं की लोकांना चित्रपट नीटसा कळलेलाच नाही. उदाहरणार्थ, 'लोकसत्ता'तल्या परीक्षणात असं म्हटलं आहे की अमरवर नेमकं कोण पाळत ठेवत असतं आणि कशासाठी, हे शेवटपर्यंत कळलेलं नाही. 'अमर आपटेला ट्रॅप करणाऱ्या यंत्रणेचे संदर्भ उत्तरार्धात सापडत नाहीत' असं 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये म्हटलेलं आहे. खरं तर कथानकाच्या रहस्यभेदातून ह्या गोष्टीचा खुलासा होतो, पण ते ह्या परीक्षणकर्त्यांना समजलेलं नाही असं दिसतं. (रहस्यभेद उघड करून रसभंग होईल म्हणून प्रत्यक्ष खुलासा देणं इथं टाळलं आहे, पण कुणाला हवं असलं तर व्यक्तिगत संवादात ते सांगता येईल)
मायबोलीच्या परीक्षणकर्त्याला दळवीकाकांच्या पात्राचं प्रयोजन समजलेलं नाही. खरं तर ही पटकथेतली एक अत्यंत महत्त्वाची आणि अनोखी व्यक्तिरेखा आहे.बदलत चाललेल्या जगाविषयी अमर आपटेला सजग करण्याचं काम हे पात्र करतं. अमरची व्यक्तिरेखा सभोवारच्या ह्या बदलणाऱ्या परिस्थितीची आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी सांगड घालू शकत नाही ही अमरची खरी शोकांतिका आहे. दळवीकाका त्याला जे सांगत असतात त्यामुळे हे अधोरेखित होत जातं आणि शोकांतिका अधिक गहिरी होत जाते. शिवाय, दळवीकाकांनी रात्री चॅन्डलर वाचण्यासाठी घराबाहेर दिवा लावून घेणं हे ह्या पटकथेच्या पूर्वसुरींचा उल्लेख म्हणून येतं. त्यात एक गंमत आहे. चित्रपटाचा काळपट 'लुक'देखील चॅन्डलरच्या कथानकांवर आधारित न्वार चित्रपटांना साजेसा आणि कथानकातलं गांभीर्य गडद करणारा आहे.
'पटकथाकाराने पटकथेला नेमकं टोक दिलं नसल्यानं चित्रपट अर्धवट संपल्यासारखा वाटतो' असंही 'लोकसत्ता'त म्हटलेलं आहे. मायबोलीवर कथेला ओपन-एंडेड म्हटलेलं आहे. खरं तर आपल्या सर्व कृष्णकृत्यांची जाणीव करून दिल्यानंतरही बायकोला त्याचं काही विशेष वाटत नाही आहे, हे जेव्हा अमरच्या लक्षात येतं तेव्हा आपला सगळा जीवनसंघर्षच संपल्याचं त्याला जाणवतं. ज्या डोलाऱ्यावर आपलं चिमुकलं घरटं आपण उभारलं होतं, तोच किती पोकळ होता त्याची ही जाणीव आहे. ती खरं तर पाहणाऱ्याला आतूनबाहेरून हलवणारी आहे. प्रेक्षकाला सुन्न करण्याची ताकद त्यात आहे. वरवर पाहता चकचकीत समृद्धी पण खोलवर पाहता गडद ऱ्हास अशा एका भकास भविष्यातल्या प्रकाशाकडे नायक-नायिकेचा प्रवास सुरू झालेला आपल्याला दिसतो. गडद अंधारात काम करणाऱ्या अमरविषयी आपल्याला ज्या कारणानं अनुकंपा वाटते तेच नाहीसं झालेलं आहे. आता त्याचा प्रवास प्रकाशाकडे आहे, पण हा प्रकाश उबदार नाही तर रखरखीत आहे. अशा एका टोकावर नायकाला आणून चित्रपट संपतो. पण हा आशयच परीक्षणकर्त्यांपर्यंत पोहोचलेला नाही हे अशा प्रतिक्रियांवरून दिसून येतं.
चित्रपट चालू असताना आणि संपल्यावर प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येत होत्या, त्यादेखील हताश करणाऱ्या होत्या. खुल्या आर्थिक धोरणांचे फायदे ज्या वर्गानं करून घेतले आणि ते करताना कमालीच्या नैतिक तडजोडीही ज्यांनी केल्या असा मध्यमवर्ग कोथरुडातल्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला आला होता. लोक गंभीर प्रसंगांना हसत होते. सिनेमागृहातून बाहेर पडता पडता मोबाईलवरून फेसबुकवर सिनेमा पाहिल्याचं स्टेटस कसं टाकलं हे आपल्यासोबत आलेल्या दोस्तांना सांगत होते. अशा प्रतिक्रियांवरून हे लक्षात आलं, की चंगळवादाचे फायदे उपसता उपसता हा मध्यमवर्ग आता इतका सुजीर आणि कोडगा झालाय, की चित्रपटात आपल्याचविषयी काहीतरी सखोल आणि गंभीर म्हटलं आहे, आणि आपल्याला अंतर्मुख करणं हा चित्रपटाचा हेतू आहे हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. चित्रपटाचा विदीर्ण करणारा आशय ह्यामुळे अधिकच महत्त्वाचा वाटू लागतो. अनेक सरधोपट मराठी चित्रपटांची तोंडभरून स्तुती करणारा, पण सघन चित्रपटांपर्यंत पोहोचूच न शकणारा प्रेक्षक कधी तरी थोडं आत्मपरीक्षण करेल का, असा प्रश्न मात्र मनात शिल्लक राहतो.
इतर परीक्षणांचे संदर्भ -
http://www.maayboli.com/node/40365
http://www.loksatta.com/manoranja-news/pune-52one-abstract-painting-449…
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18082403.cms
कोडगेपणाचं व्यवच्छेदक लक्षण
अभ्यासपूर्ण, व्यासंगाची चुणूक दाखवणारं परीक्षण आहे.
पण त्यापलिकडे जाऊन चित्रपटाच्या परीक्षणाच्या निमित्ताने खालावत गेलेल्या आणि कदाचित रसातळाला पोचलेल्या आम्हा प्रेक्षकांच्या जाणीवांवर केलेले भाष्य जाणवले. एके काळी 'मारुती कांबळेचं काय झालं?' हा साधा प्रश्नही चित्रपटाच्या खलनायकाला काट्यासारखा टोकरत असे. आता खलप्रवृत्तीही प्रेक्षकांची सहानुभूती मिळवू शकतात.
अहो, पण जिथे वर्तमानपत्रात लिहिणार्या परीक्षकांना कथेच्या गाभ्यापर्यंत पोचता येत नाही तिथे आमच्यासारख्या सामान्यांकडून काय अपेक्षा ठेवणार?
अशा प्रतिक्रियांवरून हे लक्षात आलं, की चंगळवादाचे फायदे उपसता उपसता हा मध्यमवर्ग आता इतका सुजीर आणि कोडगा झालाय, की चित्रपटात आपल्याचविषयी काहीतरी सखोल आणि गंभीर म्हटलं आहे, आणि आपल्याला अंतर्मुख करणं हा चित्रपटाचा हेतू आहे हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे.
- आपण कोडगे आहोत हे ज्यांना समजते तेही हसण्यावारीच नेतील. कोडगेपणाचं व्यवच्छेदक लक्षणच नव्हे का ते? अंतर्मुख व्हायचे ते कशासाठी आणि कुणासाठी?
भारी परीक्षण! देअर इज मोअर टू
भारी परीक्षण! देअर इज मोअर टू इट दॅन मीट्स द आय असं वाटलंच होतं. आता नक्की पाहीन.
बाकी ज्याला कळूनही ढिम्म परिणाम होत नाही त्याला कोडगा म्हणणे योग्य आहे, ज्यांना कळतच नाही त्यांना निर्बुद्ध म्हणावे लागेल.
अशा "विशिष्ट निर्बुद्धपणाचाच (Selective Stupidity)" जमाना आहे.
मटरु की बिजली का मंडोला पाहून बाहेर येताना अशाच प्रतिक्रिया ऐकून करमणूक झाली होती. त्यात तर लोकांना कळावं म्हणून पुष्कळच बटबटीत केलंय.
छान परीक्षण
फारच छान परीक्षण. आता चित्रपट पाहावासा वाटू लागला आहे.
अवांतरः एका परीक्षणात1 व त्या अनुषंगाने आलेल्या प्रतिसादांत सई ताम्हणकरच्या गरमागरम दृश्यांची बरीच चविष्ट चर्चा वाचली. त्याबाबत तुम्ही काहीच लिहिले नाही. ;)
1. प्रतिसादातील परीक्षणाचा संदर्भ-
http://www.misalpav.com/node/23713
ह्म्म्म्म
विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, तुमचं परीक्षण वाचल्यावर मी पाहिलेला 'पुणे ५२' आणि तुम्ही पाहिलेला 'पुणे ५२' नक्की एकच होता ना, असा प्रश्न माझ्या मनात आला. आर्थिक परिस्थितीतील बदल, नैतिक अधःपतन हे या चित्रपटाचे मुख्य विषय असावेत अशी एक शंका चित्रपट पाहताना अधूनमधून येत होती, पण तसे ठाम विधान करता येण्याइतपत माझी खात्री पटलेली नाही. अनेक पटकथालेखकांनी आपापसात ठरवून एक 'जपमाळपटकथा' लिहून हा चित्रपट बनवला असावा असे मला चित्रपट पाहून झाल्यावर वाटले. मला स्वतःला हा चित्रपट भरकटलेला वाटला. दिग्दर्शकाला नेमके काय म्हणायचे होते हे शेवटपर्यंत समजले नाहीच, वर त्याला खरेच काही म्हणायचे होते का असाही प्रश्न पडला.
असो. माझ्याकडून एक चित्रपटप्रेक्षक म्हणून चित्रपटाला योग्य तो न्याय मिळावा, मला काही गोष्टी जाणवल्या, कळल्या नसतील, तर त्या जाणवाव्यात आणि कळाव्यात असे प्रामाणिकपणे वाटते. त्यामुळे या चित्रपटावर अधिक चर्चा करण्यास नक्की आवडेल.
राधिका
ही एक तुझ्याशी सहमती
ही एक तुझ्याशी सहमती दर्शवणारी प्रतिक्रिया.
मी अजून सिनेमा पाहिला नाहीय.
रोचक
उत्तम परीक्षण. परीक्षणावरून रोचक वाटतो आहे. जरूर पाहणार.
अवांतर : परीक्षणाच्या शेवटी काही अॅनेक्डोटल निरीक्षणांवरून निष्कर्षांप्रत पोचणं शंकास्पद वाटलं. ज्यांनी फेसबुकावर अपडेट केलं त्यांना चित्रपट कळलाच नसेल असं म्हणता येणार नाही. बाकी गंभीर प्रसंगांना हसणं हा भाग नवा नाही. "पुरुष" नाटकात बलात्कारी पुढार्याच्या स्त्रीविषयक हिंस्त्र संवांदांना प्रेक्षकांची दाद मिळत असे. नाना पाटेकर नाटकाच्या आरंभी "कृपया त्याला हसू नका" अशा भावाचं आवाहन करीत असत.
ज्यांनी फेसबुकावर अपडेट केलं
ज्यांनी फेसबुकावर अपडेट केलं त्यांना चित्रपट कळलाच नसेल असं म्हणता येणार नाही.
लेखक-दिग्दर्शकाला काय सांगायचंय ते बहुतेकांना कळतं पण ते आपल्याला उद्देशून आहे हे न कळण्याची व्यवस्था आधीच तयार असते.
जोपर्यंत मला झळ लागत नाही तोपर्यंत आजूबाजूच्या घटना किंवा विचारप्रवर्तक कलाकृती अलिप्तपणे मी पाहतो आणि त्यावर टिप्पणी करतानाही मी स्वतःला त्यापासून वेगळा काढतो. काहीही झालं तरी घर ते ऑफिस ते मॉल ते घर हे चक्र चालूच राहिले पाहिजे हे माझ्या डोक्यात घट्ट आहे. म्हणजेच मी विशिष्ट निर्बुद्ध आहे. डेरिक जेन्सन याला 'Imbeciles with high IQ' म्हणतो.
मान्य पण....
हे १००% मान्य आहे. पण मग तह्ताकथित प्रगतीचे फळ चाखणार्यांनी आत्मताडन तरी का आणि किती करुन घ्यावं. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आमचे स्वतःपुरते "डोळे उघडले" होतय ते थांबवता येत नाही आणि त्रास तर भयानक होतोय अशी अवस्था येते. त्यापेक्षा सुखाची अफू घेउन समाधानाच्या भ्रमात राहिलेलं काय वाईट?
.
कुणी कितीही संवेदनशील असला तरी स्वतः उपाशी राहून अन्यायग्रस्तास/have's not/left behind गटाला आपला(खरे तर त्याच्याच तोंडून हिसकावलेला) घास भरवण्याइतकाही संवेदनशील नक्कीच नसतो.
आय मीन, मी तरी नाही. त्यापेक्षा "दृष्टीआड सृष्टी" हा सरळ सोपा अल्गोरिदम आम्ही वापरतो.
.
फार दिवसापासून ह्या ऑस्ट्रिच अल्गोरिदम बद्दल एखादा धागा काढून चिंतेची/थोड्याफार कणवेची गरळ बाहेर ओकायचा विचार आहे.
तुझ्यामाझ्यासारखे बहुतेकजण
तुझ्यामाझ्यासारखे बहुतेकजण ऑस्ट्रिच अल्गॉरिदम वापरतो आहोत. पण जसजसे वय वाढते तसतसा बालीश आणि लुटूपुटीच्या वागण्याचा कंटाळा यायला लागतो, रोजच्या धावपळीचे आणि आणखी कमाई करण्याचे प्रयोजन शोधावेसे वाटते. यात दुसर्याबद्दलच्या कणवेचा भाग असेलच असे नाही, निव्वळ भविष्याबद्दलची काळजी किंवा शिकलेली स्वप्ने खोटी ठरण्याची भीतीही असू शकते.
अगदीच काही नाही तर, वाळूत तोंड खुपसून जबाबदारी टाळली तरी, जबाबदारी टाळण्याच्या परिणामांची जबाबदारी टाळता येणार नाही ही खात्री मन कुरतडतेच.
आवडले.
मी हा चित्रपट बघीतला तेव्हाही प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया काही विशेष वेगळ्या नव्हत्या.
पण चित्रपटाचा आशय मला तेव्हा नीटसा समजला नाही, हेही तेवढेच खरे. त्यामुळे खास धन्यवाद. :)
अवांतर:
बाकी परिक्षण वाचून प्रतिसाद द्यावासा वाटला, पण खातेच नव्हते इथे.. म्हणून त्यासाठी खास खाते बनवले.
परिक्षण किती आवडले हे सांगण्यासाठी हे पुरेसे असावे!
राघव
काही मुद्द्यांना प्रतिसाद
>> चित्रपट थेटरात न जमल्यास डाऊनलोडवून नक्की पाहिन
पटकथेविषयीच लोकांच्या मनात इतके गोंधळ आहेत म्हणून लेखात आणि प्रतिसादात फक्त त्यावर लक्ष केंद्रित करतो आहे. पण चित्रपटाचं छायालेखन चांगलं आहे. समीपदृश्यांचा वापर प्रभावी आहे. अनेक बारकावे छोट्या पडद्यावर कितपत लक्षात येतील ते सांगता येत नाही. उदाहरणार्थ, दळवीकाकांच्या हातातली कादंबरी चॅन्डलरची आहे, हे छोट्या पडद्यावर कळेल का ते माहीत नाही. एका दृश्यात पॅन्टची चेन खेचल्याचा बारीक आवाज आहे. तो घरच्या साउंड सिस्टिमवर ऐकू येईल का ते माहीत नाही. अशा अनेक कारणांकरता चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहावा अशी शिफारस करेन.
>> अनेक पटकथालेखकांनी आपापसात ठरवून एक 'जपमाळपटकथा' लिहून हा चित्रपट बनवला असावा असे मला चित्रपट पाहून झाल्यावर वाटले. मला स्वतःला हा चित्रपट भरकटलेला वाटला. दिग्दर्शकाला नेमके काय म्हणायचे होते हे शेवटपर्यंत समजले नाहीच, वर त्याला खरेच काही म्हणायचे होते का असाही प्रश्न पडला.
माझं स्पष्ट मत सांगायचं तर ते असं आहे की मराठी (आणि एकंदर भारतीय) सिनेमानं अतिशय सरधोपट वाटा चोखाळत प्रेक्षकांचं फार मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे अनेक स्तरांवर काही म्हणू पाहणारी 'पुणे ५२'सारखी पटकथा ही प्रेक्षकांना गोंधळून टाकते. मला स्वत:ला पटकथा चांगलीच बांधीव वाटली. ते कसं ते किंचित विस्तारानं पाहू -
चित्रपट सुरू होतो तेव्हा आपल्याला प्रमुख पात्रं (अमर आपटे आणि पत्नी) ही एका समस्येत अडकलेली दिसतात – ती समस्या कोणती? तर जगायला लागतो तेवढा पैसा कुठून आणायचा. चित्रपटाच्या अखेरीला ही समस्या सुटलेली आहे. ती नक्की कशी सुटते ह्याचा संबंध आर्थिक उदारीकरणाशी आहे. नव्वदच्या दशकाआधी जे अनेक सरकारी निर्बंध होते ते उठवले गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वाढले. छोटे उद्योजक वाढले. त्याबरोबर खाजगी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात पैसा खेळू लागला आणि पैसे कमावण्याचे नवनवे कायदेशीर-बेकायदेशीर मार्ग उपलब्ध झाले. आतापर्यंत साधी राहणी उच्च विचारसरणी वगैरे मूल्यं पाळण्याचा दावा करणारा मध्यमवर्ग ह्या नव्या प्रलोभनांना कसा सामोरा गेला ह्यावरनं त्याची ही मूल्यं किती सखोल होती आणि किती प्रमाणात केवळ संधीच्या अभावामुळे पत्करलेली होती हे लक्षात आलं.
अमर आपटे, पत्नी आणि सासू ही पात्रं ह्या तिढ्याला दृग्गोचर करतात. हे अगदी छोट्याछोट्या प्रसंगांतून जाणवतं. 'तुला खायला हवं का?' ह्याचं उत्तर 'नको' देणारी, पण उत्तर देतादेताच बिस्किटं चापणारी सासू काही केवळ नर्मविनोद पखरवण्यासाठी योजलेली नाही. तिचं वागणंबोलणं आणि तिचं बेडौल शरीर तिची वखवख दाखवतं. नेहाचं आणि अमरचं बोलणं ती चोरून ऐकते तेव्हा ती अमरच्या बायकोकडे चुगल्या करत नाही; पण त्याच्या नाकर्तेपणाविषयी सतत घालूनपाडून बोलत राहते. ह्यावरून तिची जीवनदृष्टी दिसते. ह्याउलट ओढगस्तीत संसार रेटताना मेटाकुटीला आलेली बायको वखवखलेली नाही; पण संसारात थोडं सुख लाभावं ह्यासाठी केल्या थोड्या तडजोडी तर बिघडतं कुठं असा, एक प्रकारचा सर्वसामान्यांना मान्य होणारा दृष्टिकोन ती मांडते. अडचण ही अर्थात मनस्वी जगणाऱ्या अमरसारख्यांची होते.
ह्या पार्श्वभूमीवर नेहाची (सई ताम्हणकर) व्यक्तिरेखा ही समृद्धीत जगणारी असली, तरीही सुखी नाही. त्यामुळे ती मध्यमवर्गाला एक प्रकारे आपलं भविष्यच दाखवते आहे. आपल्या स्वभावात न बसणाऱ्या भलत्या नैतिक तडजोडी कराल, तर तुमचीही गत माझ्यासारखी होईल हे ती दाखवते आहे; तरीही तिनं अजून पूर्णत: स्वत्व गमावलेलं नाही. म्हणून अमरसारखा माणूस तिच्यातल्या ह्या मनस्वीपणात गुंतत जातो. एवढाच तिढा असता तर अमरला आपण बायकोशी प्रतारणा करतो आहोत ह्या जाणिवेतून येणारं अपराधीपण एवढीच समस्या राहिली असती. पण अडचण तिथे नाहीच.
मग कथानकातली खरी समस्या काय आहे? तर ती अशी, की कळतनकळत अमरसारखा माणूस आपलं स्वातंत्र्यच गमावून बसतो. तो एका कळसूत्री बाहुल्यासारखा होतो. ही व्यवस्थाच अशी जीवघेणी आहे, की ती तुम्हाला मनस्वी जगूच देत नाही. तुम्ही संपता तरी, किंवा तुम्ही जगण्यासाठी 'स्व'शी इतक्या तडजोडी करता की तुम्ही तुमचे राहतच नाहीत. आसुसून प्रेम करता काय? मग ह्या व्यवस्थेपुढे तुम्ही कमजोर ठरालच, आणि मग तुम्ही संपलातच म्हणून समजा.
ही जाणीव अमरला चित्रपटाच्या अखेरीला होते. पण पटकथेतली गंमत अशी आहे की प्रेक्षकाला सुरुवातीपासूनच ह्याचा सुगावा लागत जावा. अमरच्या पाळतीवर सतत कुणीतरी असणं हा डिटेक्टिव्हकथेला साजेसा गूढ प्रकार आणि त्याचा होणारा रहस्यभेद हा कथेचा एक स्तर झाला. पण त्यातून हळूहळू हेदेखील स्पष्ट होत जातं की ह्या व्यवस्थेत माणूस स्वत:ला जितका स्वतंत्र समजत असतो तितका तो नसतोच. तो आपोआप त्या व्यवस्थेचा गुलाम कधी होत जातो, ते त्याचं त्यालाच कळत नाही. जेव्हा कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. हीच त्याची, म्हणजे स्वत्व सांभाळू पाहणाऱ्या मनस्वी माणसाची शोकांतिका आहे. आणि पटकथेनं तो आलेख चांगल्या प्रकारे मांडला आहे. नक्की कशाला 'नाही' म्हणता तर अमर वाचता हे आपल्याला सांगणंच कठीण होऊन बसतं इतकी ती पटकथा नीट आणि हेतुपुरस्सर बांधलेली आहे. म्हणूनच त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांत प्रेक्षक स्वत:ला पाहू शकतात आणि अंतर्मुख होऊ शकतात.
बाकी मुद्द्यांना सावकाश प्रतिसाद देईन.
उत्तम प्रतिसाद
उत्तम प्रतिसाद. चँडलरच्या पुस्तकासारखे बारकावे लक्षात येण्यासाठी मोठा पडदा हवा हे मान्यच. (लाईफ ऑफ पाय मध्येही कथानायक लहान वयातच वाचत असलेले डोस्त्योव्हस्की भुवया उंचावून जातं.. तसं काहिसं)
बघु प्रश्न वेळेच्या अनुपलब्धतेचा आहे. बाकी मनोबाशी सहमत. वरील प्रतिसाद मुळ लेखात असावा इतका जमून आलाय
आतापर्यंत साधी राहणी उच्च
आतापर्यंत साधी राहणी उच्च विचारसरणी वगैरे मूल्यं पाळण्याचा दावा करणारा मध्यमवर्ग ह्या नव्या प्रलोभनांना कसा सामोरा गेला ह्यावरनं त्याची ही मूल्यं किती सखोल होती आणि किती प्रमाणात केवळ संधीच्या अभावामुळे पत्करलेली होती हे लक्षात आलं. >>>
हे अतिशय पटले. संधी असतानाचे माणसाचे वागणे त्याची खरी मुल्यपरिक्षा आहे
आयात केलेली(रेडीमेड) आस्वादकता
पहायचा आहे, बर्याच लोकांना असले चित्रपट समजत नाहीत हे खरं असलं तरी*, असे चित्रपटच (मराठी) फार नसल्याने काय काय पहायचं/समजायचं असतं हे लोकांना समजायला थोडा वेळ लागणारच, तुम्ही किंवा तुमच्यासारखे आस्वादक परदेशी(इतर भाषीय) सिनेमे पाहून/शिकून बाकीचे कसे माठ आहेत हे सांगणं म्हणजे त्याच पुणे-५२चा एक अविभाज्य भाग आहे.
तसंच, जर पुणे-५२ वर हे कोरडे असतील, तर त्याच पुणे-५२ मधे बहूसंख्य लोकांना हे सिनेमे समजतील ही अपेक्षा विरोधाभासाचं उदाहरण आहे.
अर्थात, असे लेख लिहून त्या माठ लोकांना तुम्ही थोडंफार समजायला मदत करता आहात हे मी नक्कीच मान्य करतो, ह्या लेखासाठी धन्यवाद.
*. देऊळ मधले अनेक प्रसंग इतके सटल होते की "बर्याच" लोकांना सांगूनही त्याचं गणित समजलं नाही, पण ती प्रेक्षकाची किंवा दिग्दर्शकाची चूक नाही, सध्या तरी अपेक्षा थोडी अवास्तव आहे असं वाटतं.
होय, ते नाटक पाहिल्याचे
होय, ते नाटक पाहिल्याचे आठवते. भौतिक सुखसोयींवरचे वाढत चाललेले अवलंबित्व आणि जास्त-जास्त मिळवण्यासाठी (आणि ते चुकीचे आहे हे कळूनही) केलेल्या नैतिक तडजोडी असाच विषय होता त्यात.
त्यासाठी नायिकेला ज्या थराला जावे लागताना दाखवले होते ते कै च्या कै वाटले होते हे ही आठवते.
प्रश्न
मूळ लेख आणि प्रतिसादाच्या अनुषंगाने आलेलं विवेचन हे चित्रपटाच्या गाभ्याची यथार्थ ओळख पटवणारं आहे यात कसलीही शंका नाही.
प्रश्न : चित्रपटाचा काळ १९९२ आहे असं वाचलं. हे खरं असेल तर असं १९९२ च्या कालखंडातलं काय आहे की जे २०१३ ला लागू होणार नाही ? चित्रपटाचं कथानक आणि मुख्य म्हणजे उपरीनिर्दिष्ट "गाभ्या"चा भाग हा आजही घडू शकतोच की. असं काय १९९२ मधे होतं जे आज नाही - किंवा आज आहे जे या चित्रपटात लागू होत नाही ?
चित्रपटाची जाहिरात पाहून आणि
चित्रपटाची जाहिरात पाहून आणि वेगवेगळे परिक्षणं वाचून चित्रपट पहायची उस्तुकता अजूनच वाढलीय. पण एकंदर लक्षात घेता हा चित्रपट माझ्यासारख्या सामान्य/मठ्ठं प्रेक्षकासाठी असेल असे दिसत नाही. तुम्ही जेवढ्या बारकाईने हा चित्रपट बघितला तेवढ्या बारकाईने चित्रपट बघणारी जनता अगदी बोटावर मोजण्याएवढी असावी. उदाहरणासाठी - एकतर दळवीकाका कोणतं पुस्तंक वाचताहेत त्याकडेच माझं लक्ष जाईल का नाही हेच माहीत नाही, आणि गेलंच तर ते पुस्तक चँडलरचं आहे, आणि त्याच्या चित्रपटाशी काहीएक संबंध आहे एवढ्या खोलातला विचार करणं हा त्याच्या पुढचा भाग. मुळात हा विचार मनात येण्याकरता हा चँडलर कोण हेच आधी माहीत असायला हवे ना? पण ते असो, चित्रपट पाहणार नक्की. कळेल की नाही, आवडेल की नाही ते चित्रपट पाहिल्यावरच समजेल.
परिक्षण व प्रतिसाद
मुळ लेख व प्रतिसाद दोन्ही वाचनीय.
सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. पण इतके काही धागालेखक सांगून गेले आहेत की बर्यापैकी बघीतला असे वाटते आहे :-) म्हणजे आता त्यात नक्की काय शोधायचे, दिग्दर्शकाला नेमके अजुन काय सांगायचे आहे. पुणे ५२ व १९९२ वरुन सिनेमा मध्यमवर्गाला उद्देशुन आहे हे तर दिसतेच आहे. पण भौतीक उन्नती हवी असेल तर मुल्यांशी तडजोड अत्यावश्यक असते असा सरधोपट संदेश नसावा अशी अपेक्षा. चाहूल नाटक पाहीले नाही पण जर त्यात प्रमोशन व 'इंडीसेंट प्रपोजल' असेल तर तसेच एक नाटक मी दूरदर्शन तेही कृष्णधवलच्या जमान्यात पाहील्याचे आठवते. नाव व हिरो आठवत नाहीत पण दिग्दर्शक व एक छोटी भूमीका दिलीप कोल्हटकर व हिरॉइन भारती आचरेकर व हिरो बहुदा विनय आपटे / दिलीप कुलकर्णी अथवा विक्रम गोखले यापैकी एक असावा.
बाकी सिनेमा पाहील्यावर.
एक निरीक्षण
तुम्ही पाहिलेलं नाटक, चाहूल आणि हा चित्रपट तिन्ही मध्ये नैतिक घसरण दाखवताना अवैध शरीरसंबंधांच्याच बाबतीतली दाखवली आहे. अनैतिक म्हटलं की तेच कळतं बहुतेक. :-)
राजस्थानसारख्या ठिकाणी कोकाकोलाचा प्लँट उभारणारा कंट्री हेड, "There is no bad food, only bad diet" असं म्हणणारा मॅक्डोनल्डचा पब्लिक रिलेशन मॅनेजर,
परदेशी कंपन्यांच्या प्रयोगासाठी अडाणी पेशंट्सना कंपन्यांनी सांगितलेली औषधे देणारा डॉक्टर, दोन-तीन कंपन्यांच्या ऑफर्स स्वीकारून एक सोडून बाकीच्यांना ऐनवेळी टांग मारणारा आयटी इंजिनिअर वगैरे प्रकार किरकोळ आहेत.
आता त्याचा प्रवास प्रकाशाकडे
आता त्याचा प्रवास प्रकाशाकडे आहे, पण हा प्रकाश उबदार नाही तर रखरखीत आहे.
... खुल्या आर्थिक धोरणांचे फायदे ज्या वर्गानं करून घेतले आणि ते करताना कमालीच्या नैतिक तडजोडीही ज्यांनी केल्या असा मध्यमवर्ग कोथरुडातल्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला आला होता. लोक गंभीर प्रसंगांना हसत होते.
....चंगळवादाचे फायदे उपसता उपसता हा मध्यमवर्ग आता इतका सुजीर आणि कोडगा झालाय, की चित्रपटात आपल्याचविषयी काहीतरी सखोल आणि गंभीर म्हटलं आहे, आणि आपल्याला अंतर्मुख करणं हा चित्रपटाचा हेतू आहे हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे.
चित्रपट पाहिलेला नाही, पण यावरून सध्याच्या जीवनपद्धतीवर काही खोल टिप्पणी करण्याचा प्रयत्न आहे हे जाणवलं. त्याचबरोबर, इतरांना ते न जाणवणं यावरही या लेखात एक निराशा व्यक्त झाली आहे. चित्रपटांतर्गत संदेश आणि त्या चित्रपटाचा त्याच समाजावरचा परिणाम (किंवा त्याचा अभाव) हे काहीसे हातात हात घालून जातात असंही वाटून गेलं.
मला एका जुन्या मराठी चित्रपटाची आठवण झाली. नाव आठवत नाही, पण कथा साधारण अशी आहे. गरीब हिरो श्रीमंत हिरॉइनचं प्रेम असतं, लग्न करायचं म्हणतात. सगळ्यांना ते पसंत असतं, पण एक अडचण असते. हिरॉइनच्या घरच्या ज्योतिषाने सांगितलेलं असतं की लग्न झाल्यानंतर हिचा सासरा तीन महिन्यात मरणार. तिचा बाप लालूच म्हणून एक लाख रुपये देतो. (साठच्या दशकातले सालचे एक लाख रुपये) मग सौदा असा तुटतो की मुलाच्या बापाला (शरद तळवलकर) त्यातले पंचवीस हजार रुपये त्या तीन महिन्यात जिवाची चैन करण्यासठी म्हणून ऑफर केले जातात. तो ते नाईलाजाने स्वीकारतो. लग्न होतं. त्या तीन महिन्यात तो त्याच्या परीने मजा करतो. तीन महिन्यांनी मरत मात्र नाही, कारण चुकून त्या मुलीच्या आईची पत्रिका दाखवलेली असते. (ज्योतिष्याचं खोटं ठरत नाही कधी... त्या आईचा सासरा खरोखरच तीन महिन्यात मेलेला असतो). मात्र तो जेव्हा जिवंत घरी परत येतो, तेव्हा त्याच्या घरच्यांचं आयुष्य त्या श्रीमंतीने बदलून गेलेलं असतं. त्याची साधीसुधी बायको महिला समाजात जात असते, फॅशनेबल झालेली असते...
या दोन चित्रपटांच्या कथांत खूप समांतर सूत्रं दिसतात.
मी चित्रपट पाहिला नाही. कथा
मी चित्रपट पाहिला नाही. कथा माहित असून बघितल्यावर आवडेलच अशी खात्री नाही, कथा चांगली पण रटाळ किंवा असंबद्ध पणे चित्रित असा असेल, तर नाही आवडणार . पण
"खुल्या आर्थिक धोरणांचे फायदे ज्या वर्गानं करून घेतले आणि ते करताना कमालीच्या नैतिक तडजोडीही ज्यांनी केल्या असा मध्यमवर्ग कोथरुडातल्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला आला होत"
या बद्दल नक्की बोलायचंय.
खुल्या आर्थिक धोरणांचे फायदे मिळालेल्या पिढीतील मी एक आहे. पण अगदी सखोल विचार करून सुद्धा मी किंवा माझ्या ओळखीतील कोणी कुठल्या नैतिक तडजोडी केल्याचे मला आठवत नाही. नैतिक तडजोडीची व्याख्या काय?
एक साधारण "तुम्ही खुल्या आर्थिक धोरणांचे फायदे मिळालेल्या पिढीतील आहात पण तुम्हाला हा चित्रपट कंटाळवाणा वाटतोय, त्यातला संदेश कळत नाहीये म्हणजे तुम्ही चंगळवादाचे फायदे उपसता उपसता सुजीर आणि कोडगे झाले आहात" या समजाबद्दल मला आक्षेप आहे!
हे चुकिचे भाष्य आहे
खुल्या आर्थिक धोरणांचे फायदे ज्या वर्गानं करून घेतले आणि ते करताना कमालीच्या नैतिक तडजोडीही ज्यांनी केल्या असा मध्यमवर्ग कोथरुडातल्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला आला होत">>
@सविता - तुमचे बरोबर आहे, हे चुकिचे भाष्य आहे. मी किंवा माझ्या माहितीत ल्या कोणी सुद्धा गेल्या वीस वर्षात काही नैतिक तडजोडी केल्या नाहित. जर का काही केल्या असतिल तर त्याचा खुल्या आर्थिक धोरणांशी काहीही संबंध नाही.
चिंतातुर जंतुंचे अभिनंदन
प्रत्यक्ष दिग्दर्शकाला (श्री. निखिल महाजन यांना) आपल्या चित्रपटातून जे पोचवायचे होते ते सुजाण प्रेक्षकांपर्यंत पोचले आहे याची पावती त्याला चिंतातुर जंतुंच्या या परीक्षणातून मिळाली (असे फेसबुक अपडेटवरून कळते.)-
" निखिल म्हणतो : I don't need to write a blog anymore. Pune 52 - all the doubts answered. " कविता महाजनांतर्फे आलेली पोस्ट.
(कविता महाजन या दिग्दर्शकाच्या भगिनी आहेत.)
- चिंजंचे अभिनंदन.
मध्यमवर्ग
>> प्रश्न : चित्रपटाचा काळ १९९२ आहे असं वाचलं. हे खरं असेल तर असं १९९२ च्या कालखंडातलं काय आहे की जे २०१३ ला लागू होणार नाही ? चित्रपटाचं कथानक आणि मुख्य म्हणजे उपरीनिर्दिष्ट "गाभ्या"चा भाग हा आजही घडू शकतोच की. असं काय १९९२ मधे होतं जे आज नाही - किंवा आज आहे जे या चित्रपटात लागू होत नाही ?
चित्रपटातला काळ हा संक्रमणाचा आहे. अमर आपटेसमोर जग बदलतंय आणि त्याला त्यात भंजाळायला होतंय. आता हे संक्रमण होऊन गेलेलं आहे. हा ह्या दोन कालखंडांतला फरक आहे.
मध्यमवर्गानं खुल्या आर्थिक धोरणांचे फायदे मिळवले आणि नैतिक तडजोडी केल्या हे काहींना पटत नाही असं दिसतंय. खरं तर अनेक प्रकारे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत हे दिसू शकेल. एकेकाळी मराठी मध्यमवर्ग म्हणजे नोकरदार असे; १० ते ५ नोकरी करावी आणि मिळेल त्या पगारात सुखी रहावं अशी त्याची अल्पसंतुष्ट वृत्ती होती. खुल्या आर्थिक धोरणांनंतर ते बदललं. हर्षद मेहताच्या शेअर घोटाळ्यात (१९९२) मुंबई-पुण्यातल्या मध्यमवर्गाचेही हात पोळले, कारण एकेकाळी शेअर बाजाराकडे ढुंकून न पाहणारा हा वर्ग आपला पैसा आता हळूहळू त्यात घालू लागला होता. जमीन खरेदी-विक्रीसंबंधात जे काही बेकायदेशीर व्यवहार होत त्यांच्यात हा वर्ग पूर्वी फारसा नसायचा, कारण आयुष्यभराची कमाई घालून जमलं तर निवृत्त होइस्तोवर एक ओनरशिपचा फ्लॅट घेणं आणि त्यात राहणं एवढीच त्याच्या आकांक्षेची मजल होती. जुन्या चाळी, भाड्याच्या जागा ह्या काळात हां हां म्हणता अस्तंगत होऊ लागल्या. बिल्डर-पोलीस-राजकारणी यांच्यातल्या सहकार्यानं जमिनींची आरक्षणं बदलू लागली. अनधिकृत बांधकामं फोफाट्यानं पसरली. थोडा काळा पैसा हातात खेळत असेल अशांकडून कमी दरांत कर्ज वगैरे घेऊन लोक जागा घेऊ लागले. ह्या सगळ्या व्यवहारांत सुशिक्षितांसाठी नोकऱ्यासुद्धा निर्माण झाल्या. बेनामी कंपन्यांमध्ये भांडवल कसं दाखवायचं, कर कसा चुकवायचा, तोटा कसा दाखवायचा, अशा सगळ्या पळवाटा काढून उद्योजकवर्गाला मदत करणारा सुशिक्षित माणूस कुठून आला? तो पूर्वी बँकेत नोकरी करणारा अकाउंटंट किंवा कारकून असायचा. शिक्षणसम्राटांनी आपली सत्ता आणि पैसा वाढवण्यासाठी ज्या संस्था उभ्या केल्या, त्यात सुशिक्षित स्टाफ कुठून आला? आणि भरपूर फी आणि बिनापावतीच्या देणग्या देऊन त्यात आपली मुलं कुणी शिकवली? पूर्वी सरकारी इंजिनियरिंग आणि मेडिकल महाविद्यालयात जागा मिळाली नाही, की मध्यमवर्ग आपल्या मुलांना बी.एस.सी वगैरेला पाठवत असे. पण ह्या काळात कितीही पैसे टाकून मुलाला डॉक्टर-इंजिनियरच बनवू म्हणणारे लोक अचानक कसे वाढले? अगदी छोट्या पातळीवरसुद्धा पाहिलं तर पुष्कळ काही दिसतं - सार्वजनिक पार्किंगची किंवा फूटपाथची जागा व्यापून आपल्या हॉटेलातली बसायची जागा वाढवणारे डेक्कनवरचे हॉटेलचालक हे ह्या मध्यमवर्गाच्या ओसंडून वाहणाऱ्या खादाड गर्दीलाच तर जागा करून देत होते. मग तिथे खाणारे आपण स्वच्छ कसे? पोलिसाला हप्ता देऊन अनधिकृत जागेवर ज्या चौपाट्या उभ्या राहिल्या त्यात तुम्हीआम्हीच तर खात होतो. आणि ड्रायव्हिंग लायसेन्ससारख्या गोष्टीसाठी आर.टी.ओ. एजंटला पैसे देत होतो. सिग्नल नसताना गाड्या दामटत होतो... असं बरंच काही सांगता येईल. असो.
सार्वजनिक पार्किंगची किंवा
सार्वजनिक पार्किंगची किंवा फूटपाथची जागा व्यापून आपल्या हॉटेलातली बसायची जागा वाढवणारे डेक्कनवरचे हॉटेलचालक हे ह्या मध्यमवर्गाच्या ओसंडून वाहणाऱ्या खादाड गर्दीलाच तर जागा करून देत होते. मग तिथे खाणारे आपण स्वच्छ कसे? पोलिसाला हप्ता देऊन अनधिकृत जागेवर ज्या चौपाट्या उभ्या राहिल्या त्यात तुम्हीआम्हीच तर खात होतो.
आणि ड्रायव्हिंग लायसेन्ससारख्या गोष्टीसाठी आर.टी.ओ. एजंटला पैसे देत होतो. सिग्नल नसताना गाड्या दामटत होतो... असं बरंच काही सांगता येईल. असो.
याला "नैतिक तडजोड" म्हणत असाल तर... जाऊ दे..
पण याचा १९९० मध्ये आलेल्या खुल्या आर्थिक धोरणाशी काय संबंध? लाच देणे आणि आपल्याला सोयीस्कर पळवाटा काढणे... हे ब्रिटिशांच्या काळात होत नव्हते? आणिबाणी च्या काळात होत नव्हते? त्या आधीच्या राजेरजवाड्यांच्या काळात नव्हते?
बाळसं वाढवायचं की सूज हे प्रत्येकच्या अकलेचा भाग असतो.
कमालीच्या
"खुल्या आर्थिक धोरणांचे फायदे ज्या वर्गानं करून घेतले आणि ते करताना कमालीच्या नैतिक तडजोडीही ज्यांनी केल्या असा मध्यमवर्ग कोथरुडातल्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला आला होत"
मला वाटते 'कमालीच्या नैतिक तडजोडी' ही शब्दयोजना अतिरेक दाखवत असल्याने टोचत असावी. 'थोड्याफार नैतिक तडजोडी' म्हटले की आमच्या मध्यमवर्गीय मनाला जरा बरे वाटते.
आपण सारेच अर्जुन उर्फ कन्फ्युज
सार्वजनिक पार्किंगची किंवा फूटपाथची जागा व्यापून आपल्या हॉटेलातली बसायची जागा वाढवणारे डेक्कनवरचे हॉटेलचालक हे ह्या मध्यमवर्गाच्या ओसंडून वाहणाऱ्या खादाड गर्दीलाच तर जागा करून देत होते. मग तिथे खाणारे आपण स्वच्छ कसे?
:-) उद्या जर एखाद्या संख्याशास्त्रीने चार कडव्यात असा अहवाल दिला की अमुक कालावधीत, डेक्कन परिसरातली लोकसंख्या, कार्यालये, संस्था व तेथे येणारी जनता अमुक प्रमाणात वाढली. त्यात तात्कालीक प्रवासी, एकटे रहाणारे नोकरदार, विद्यार्थी (जे स्वयपाक करु शकत नाहीत)अमुक प्रमाणात, त्या भागात अमुकच खाद्यपदार्थांची सोय. त्यामुळे तिथे अन्न खाणे बहुतांशी अपरिहार्य. तर त्या संख्याशास्त्राला "उद्योजकवर्गाला पळवाटा काढून देणारा सुशिक्षीत म्हणायचे" की मध्यमवर्गाला दोषमुक्त करुन देणारा "काला कन्हैय्या!"
जर स्वखुशीने काय धोका / फायदा आहे याचे गणीत बघुन स्वताच्या देहाचा सौदा करणारे हे पैशाला वखवखलेले, सभ्य सामाजीक मुल्यांपासुन ढळलेले म्हणायचे की योनिशुचितेच्या, लैंगीकतेच्या तुमच्या व्याख्या घाला तुमच्याच **, आता मुकाट व्यक्तीस्वातंत्र्य परमोच्च मानुन यापुढे दुसर्याच्या भानगडीत नाक खुपसणारे मागास होउ नका व आता मोठे व्हा म्हणायचे?
काय कळत नाही गुर्जी तुम्हीच सांगा :-)
काही शंका...
निव्वळ ह्या प्रतिसादाबद्दल बोलायचं तरी चर्चेचा कॅनव्हास प्रचंड मोठा आहे हे जाणवतं.
ह्यावेळी काही न पटलेल्या गोष्तींबद्दल प्रथम बोलू इच्छितो.आणि स्वतःच्या अकलेचे प्रदर्शन मांडतोय.
.
ह्या प्रतिसादातील कित्येक गोष्टी करणारे माझ्यासरखे लोक हे परिस्थितीशरणता म्हणा किंवा एका मर्यादेनंतर येणारी हतबलता म्हणा किंवा आत्यंतिक sidelineझाल्याचा कडवट अनुभव घेतल्याने म्हणा बदललेले आहेत. "प्रवाहाविरुद्ध पोहणे" ही romantic fantasy म्हणून ठीक आहे. प्रत्यक्षात खरोखर कल्पना करा तुम्ही एका अतिप्रचंड धबधब्यात पडलेले आहात. आणि कितीही निष्णात तरणपटू असाल तरी धबधब्यात खालून वर जाताच येत नाही ही वस्तुस्थिती आहे. "विजिगीषु वृत्ती", "जिद्द" हे शब्दांचे बुडबुडे ठरतात.
शिवाय कित्येक वाईट कामं "अस्तित्वासाठी " करावी लागतात. दुसरं हे की लोभापायी केले; आंधळे होउन केले असे करणारे सारेच नसतात. कित्येकजण अगैत्कतेने करतात.
.
शिवाय आजही कितीही नाही म्हटलं तरी सर्वाधिक करदाते ह्याच वर्गातून आहेत हे सत्य.(मुळात मध्यमवर्गाची स्पष्ट अशी काही व्याख्याच नाहीये, हे मान्य.)
.
आणि आजकाल सतत कित्येकदा विचारवंत्,थिंकटँक सतत मध्यमवर्गीयानं काहीही केलं तरी शिव्याच घालायच्या असे करताना दिसतो. हा सरळ सरळ मध्यमवर्गास guilt द्यायचा उद्योग आहे. गैरकृत्य थांबवण्याचं काम प्रशासन करीत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी ते करावं ही माझी अपेक्षा आहे. मला समोर पोह्याचा ठेला दिसला नि मी योग्य ते दाम मोजून बशीभर पोहे घेतले तर त्यात काहीही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. जीवनाच्या रगाड्यात इतका भरडला जात असताना प्रत्येक पोहेवाल्यानं टॅक्स भरलाय का? त्यानं किती जागेची चोरी केलिये? हे मी पाहणं जरुरीचं आहे असं मला वाटत नाही.
ज्यांनी ते पहायला हवं ते तिकडे डोळेझाक करुन गलेलठ्ठ झालेत, नोटांच्या ढिगार्यावर बसलेत ही फॅक्ट आहे. मी अशा कितीजणांची कामे करु? हे आवाक्याबहेरचे आहे.
बाकीचे फुरसतीत.
.
ता क :- बाकी गैरप्रकार, गैरकृत्य म्हणाल तर गरिब, उच्चमध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अतिश्रीमंत ह्या सर्वांपएक्षा ह्या वर्गाचा गुन्ह्यातील सहभाग कमीच आहे.(मजकडे विदा नाही.ही माझी समजूत आहे.)रोजचे खून्,बलात्कार असे थेट शारिरिक इजा करणारे गुन्हे टाक्केवारीनुसार आर्थिक दृष्तीने खालच्या स्तरात होतात. श्रीमंत (burocrats and corporates) अतिप्रचंड आर्थिक गुन्हे करतात. पुन्हा होतं काय, की पैशाच्या ताक्तीवर श्रीमंतांच्या लॉब्या तयार. धोरणे कायम ह्यांना अवास्तव सोय करुन देणारी. दुसरीकडे गरिब संख्यबळाने कित्येक गोष्टी/entitlements हे "हक्क" म्हणून मागतात. फुक्टात मिळवतात. ही रक्कम येते कुठून? मध्यमव्र्गानं भरलेल्या टॅ़समधून. "तुम्हीच निवडून दिले ना, आता बघा कसे करताहेत ते. ते तुमेहेच आहात." असे म्हणत सतत सत्ताधारी आम पब्लिकला वेड्यात काढतात. वस्तुस्थिती ही आहे की मताचा हा अधिकार मुळातच फसवा आहे.नंतर सांगतो.
.
हायपोथेटिकल उदाहरणः-
दिवसाडह्वळ्या एक खून होताना शेकडो लोकांनी पाहिलेलय. त्यापैकी साक्ष देण्यासाठी केवळ दोघे तयार आहेत.कारण गुन्हेगार हा जबरदस्त सामर्थ्यशाली व्यकती आहे. (राजकिय वजन + आर्थिक ताकद असं डेडली कॉम्बिनेशन).
गुन्हेगार त्यांना बरीच आर्थिक लालूच दाखवतो. पण दोघेही बधत नाहित. शेवटी इतर आमिषांनाही(अगदि स्त्रीपासून ते इतर हितसंबंध सांभाळण्यापर्यंत) ते ठाम नकार देतात. शेवटी त्यापैकी एका साक्षीदाराला गुन्हेगार पुन्हा दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार करतो.(किंवा उंच इमारतीवरून ढकलून "अपघात" घडल्याचं भासवतो.) आणि मग उरलेला साक्षीदार गपगुमान आपली साक्ष परत घेतो.
हायपोथेटिकल म्हटलं तरी ही घटना भारतात सर्रास होउ शकते ह्यावर दुमत नसावे. आता मस्त बंद दारात दूरवर बसून साक्ष परत घेतलेल्यास "भोसडिचा नैतिक गुन्हेगार" असं लेबल लावणं सहज शक्य आहे. पण तात्विक दृष्ट्या योग्य असलेल्या गोष्टी व्यवहारात तशाच असतात का? सुरक्षेची ग्यारंटी वय्वस्था देत नसेल तर साक्ष फिरवणं अपरिहार्य नाही का? इतकं करुन तो उरलेला व्यक्तीच नीच, पापी आहे का?
.
दुर्दैवाने भारतात "शोष्क/गुन्हेगार तेच, वकील , तपासाधिकारी(पोलिसांस्पासून सीबीआयपर्यंत) आणि निकाल देणारेही तेच" अशी स्थिती झालेली आहे. ह्या साम्र्थ्याला मी आव्हान का द्यावं? दुसर्याच्या घरात उजेड पडावा म्हणून मी माझं घर जाळून का घ्यावं?
.
थोडक्यात सांगायचं तर तुम्ही उल्लेख केलेले कित्येक गुन्हे/अनैतिक धंदे हे अपरिहार्यतेतून करावे लागताहेत करणार्यांस. व्यवस्था तित्चे काम चोख करत नसेल तर व्यवस्थेने माझ्याकडून mr perfect होण्याची आस का धरावी?
.
इतके करुनही निदान "जे चाललय ते सारच बरोबर नाही" ही जाणीव असणारेही टाक्केवारीनुसार मध्यमवर्गातच अधिक आहेत.पण ते हतबल आहेत.(श्रीमंतांना चिअनीतून वेळ नाही. गरिबाचा वेगलाच झगडा सुरु आहे. पण हो, पुन्हा एकदा मजकडे विदा नाहिच.)
अजूनही बरेच. फुरसतीत टंकेन.
प्रातिनिधिक उदाहरणे:-
मी स्वतःची उदाहरणे देतो. २०१० च्या आसपास सुदैवानं हाताशी थोडी रक्कम आली होती. पगार ठिक्ठाक होता.राहण्यास घर घ्यावे असा विचार होता.औरंगाबादेस बंगल्यासाठी जमीन पाहण्यास गेलो. आख्खे औरंगाबाद पालथे घातले. पण एकूण व्यवहारापैकी फक्त ३०% रक्कम चेकने द्यावयाची होती. बाकीची सर्व कॅश मध्ये.
मला हे ब हयंकर चूक वाटले. हा प्राणी येडाझवा/हरामखोर असावा असे वाटून भरपूर फिरलो. पण जमिनीच्या सर्वच व्यवहारात तिथे हीच परिस्थिती होती. फ्लॅटासाठीही ७०% नसली तरी बरीच रक्कम कॅश ने मागितली जात होती.
माझ्या मध्यमवर्गीय पापभिरु मनास हे काही पटेना.
.
वैतागलो. पुण्यात परतून एक फ्लॅट बुक केला. १००% रक्कम चेकने देउन फ्लॅट घेतला. मला स्वतःला फ्लॅटापेक्षा बंगल्यात राहण्यात तेव्हा अधिक स्वारस्य होते हे सत्य आहे. आता असे समजा मझ्याऐवजी "क्ष" हा व्यक्ती आहे. आणि त्याने हा प्रकार केलाय. जन्मभर त्यास राहून राहून हेच वाटण्याची शक्यता आहे "शिंचा घातली असती रक्कम बोकांडी त्याच्या तर परवडलं असतं.".
.
आता ह्या प्रकरणात मुळात राजरोस कॅश मागणार्यांची जर कॅश मागायची हिम्मत होत असेल तर व्यवस्था महाभयानक बरबटली आहे हे वास्तव आहे. त्यास अटकाव करणे, पर्याय शोधणे मला एकट्यास दरवेळी जमेलच असे नाही. असे प्रकार थांबवायची ज्यांची जिम्मेदारी आहे ते काहीही करत नाहियेत. कुंपणच शेत खाते आहे असे चित्र आहे.
.
आता वैयक्तिक अनुभव हा प्रकार मला फारस चर्चा करण्यास आवडत नाही हे खरे. कारण जो तो मग आपले अनुभव मांडू पाहतो. एकजण दुसर्याच्या परिस्थितीत नसल्याने दुरून अगदि सहज सल्ले देतो. "त्याग" करायच्या सूचना दुसर्यास देतो. पण ही घटना मला प्रातिनिधिक वाटली म्हणून इथे मांडतोय.
.
मिपाच्या दुव्यावर एक कथा सापडली, तीच इथे देत आहे:-
www.misalpav.com/node/22848
नेहमीप्रमाणे, एक राजा असतो आणि त्याचा एक प्रधान असतो. ऑफ कोर्स तो प्रधान अगदी विश्वासू, मित्रवत इ.इ. असतो. दोघे एकदा असेच गप्पा मारत असतात. तेवढ्यात राजवाड्यासमोरून एक साधू चाललेला असतो. राजा त्याला आत बोलावतो आणि त्याचा आदर सत्कार करतो. साधू खुश. तो राजाला म्हणतो,
"हे राजन! तू माझा इतका आदर केलास तर मी आता तुला काही देणं लागतो. तर ऐक, आजपासून बरोब्बर १५ दिवसांनी या गावात एक वादळ येणार आहे. ते जादूचं वादळ असणार आहे. त्याचं वारं ज्याच्या कोणाच्या कानात जाईल त्याला वेड लागेल." एवढं बोलून साधू निघून गेला. राजा आणि प्रधानाची जाम फाटली. आता काय करायचं? दोघांना काही सुचेना. शेवटी रिवाजाप्रमाणे प्रधानाला एक युक्ति सुचली.
"सरकार, आपण एक काम करू. आपण एक एकदम एअरटाइट खोली बांधू आणि आपल्या कुटुंबियांसमवेत त्यात वादळ यायच्या आधीच जाऊन बसू. वादळ थांबलं की बाहेर निघू. शिंपल!"
राजा खुशच खुश. खोली वगैरे बांधून झाली. ठरल्याप्रमाणे वादळ आलं. वादळाची चाहूल लागताच हे दोघे आपापल्या फ्यामिलीसकट खोलीत गेले आणि दार घट्ट लावून घेतलं. थोड्यावेळाने वादळ शमलं. सगळं काही स्थिरस्थावर झाल्याची खात्री करूनच राजा आणि प्रधान खोलीबाहेर पडले. बघतात तर काय, बाहेर राज्यातले बाकीचे सगळेच लोक वेडे झाले होते. नुसता धिंगाणा चालू होता. कुणी नाचत होतं, कुणी गात होतं, कुणी रडत होतं, कुणी कपडे फाडत होतं. हे दोघेही बघतच राहिले. खोलीत जाताना हे असं होईल हे लक्षातच आलं नव्हतं त्यांच्या. हताशपणे दोघेही बाकीच्या पब्लिककडे बघत बसले. एक दोघांना त्यांनी समजवायचाही प्रयत्न केला. काही फरक पडला नाही. उलट हे दोघे आपल्यासारखे वागत नाही म्हणून लोकच त्यांच्या अंगावर धावून आले. हे दोघे घाबरले आणि त्यांनी परत खोलीत धाव घेतली. दार आतून लावून घेतलं आणि विचार करू लागले. ऑफ कोर्स, आयडिया प्रधानालाच सुचली.
"हुजुर, आता एकच उपाय दिसतो आहे. सगळे जसं वागतायेत ना, आपणही तसंच वागायचं."
"म्हणजे! आपणही वेडं व्हायचं? काय बोलताय काय तुम्ही प्रधानजी? कळतंय का तुमचं तुम्हाला तरी?" राजा ओरडला.
"अगदी बरोबर, अगदी हेच म्हणतोय मी. आणि महाराज, शहाणपण म्हणजे तरी काय? चारचौघे जसे वागतात तसं वागणं म्हणजे शहाणपण. आज शहाणपणाची व्याख्याच बदलली आहे. आपण निमूटपणे ते नवीन शहाणपण मान्य करायचं आणि कातडी बचावायची."
"अहो पण..."
"आता पण नाही नी बिण नाही... जीव वाचवायचा असेल तर एकच मार्ग... एऽऽऽ नाचोऽऽऽ धत्तड तत्तड धत्तड तत्तड"
.
मध्यमवर्गात गुन्हे होतच नाहित असे मी म्हणत नाही. पण मध्यमवर्गावर सरसकट नैतिक अधःपतनाचे आरोप होत असतील तर त्यास अगतिकतेची झालर हे सरसकट स्पष्टीकरण मी देउ इच्छितो.
.
शिवाय ह्या संपूर्ण युक्तिवादावर दिवार मधील अमिताभ म्हणतो तसा "जाओ पहले उन लोगों के दस्तखत लाओ जिन्होने मेरे हाथ पर यह लिखा था" ह्या चुकीच्या दृष्टीकोनाची छाप आहे ह्याचीही कल्पना आहे. अगतिकता!!
टॅक्स चुकवणे प्रत्येकवेळी अनैतिक नसते
टॅक्स चुकवणे हे अनैतिक असते असे नाही. हे समाज / देशा च्या सद्यस्थितीवर ठरेल.
सध्या तरी भारतात टॅक्स चुकवणे अजीबात अनैतिक नाही. मी कष्ट करुन पैसे मिळवायचे आणि टॅक्स द्यायचा. त्यातले ८५% पैसे भ्रष्ट लोकांच्या खिषात जाणार. मग मी का टॅक्स द्यावा? आणि टॅक्स चुकवणे अनैतिक कसे?
८५% पैसे जर बरोबर वापरले जाणार असतील तर टॅक्स चुकवणे अनैतिक.
खरे तर एखादी गोष्ट करताना आपण
खरे तर एखादी गोष्ट करताना आपण ती खरच करीत आहोत का इतराना दाखवण्यासाठी करीत आहोत हो बघायला हवे... म्हणजे ते खरेच आवश्यक आहे का ते कळते... आणि समाजातील ८०-९० टक्के लोक एखादी गोष्ट करतात म्हणून आपण हि ती गोष्ट करणे हे गरजेचे नसते... odd man out पेक्षा change your group हे जमले तर कधीही उत्तम. जमल्यास ज्ञान प्रबोधिनी, अभय बंग, वनवासी कल्याण आश्रम, रामदेव बाबा.... ह्यांच्या उपक्रमात सहभागी होता आले कि बरोबर अगतिकता कमी होते म्हणजे आपोआप आपल्याला चांगली माणसे मिळत जातात आणि काम गोष्टी स्वच्छ होत जातात...
प्रत्येक गोष्ट हि टक्यात असते आपण एक एक टक्का जरी वाढविला तरी चालते... जसे ज्ञान प्रबोधिनी मध्ये १००% उत्तम आहे असे असू शकत नाही पण इतरांपेक्षा तिथे नक्कीच उत्तमाचे प्रमाण खूप अधिक आहे काही तृटी असणारच...
अवांतर...
सदर प्रतिसाद अवांतर वाटला. तरीही त्यास उपप्रतिसाद देत आहे.
ए पुष्क्या, जिथं तिथं तो समाजसेवेचा नि "हट के " वाला अजेंडा रेटित जाउ नकोस.
इथे मी काय कुणाला दाखवण्यासाठी करत नाहिये. पण सरळसाधं काम ; जे कायदेशीर आहे; तेही करण्यासाठी टाचा घासाव्या लागतात तेव्हा वैताग येतो.
मला मनाजोगतं घर कायदेशीर पद्धतीनं घेउ न देणं हे व्यवस्थेनं मला अगतिक करणं आहे.
.
जमल्यास ज्ञान प्रबोधिनी, अभय बंग, वनवासी कल्याण आश्रम, रामदेव बाबा.... ह्यांच्या उपक्रमात सहभागी होता आले
नाही व्हायचय मला अजिबात असल्या उद्योगांत सहभागी. ना सामाजिक कार्य , ना विधायक राजकारण. सुखासुखी जगू द्यात की जरा mediocre माणसासारखं.
किंबहुना, "अमुक गोष्त करायचीय ना, जा त्या ढमक्या ढमक्या ग्रुप मध्ये सामील हो" हे मला व्यवस्थेनं अगतिक करणंच आहे.
"ढमके ढम्के लोक चांगलं कार्य करताहेत." करु देत की. आहेत आमच्या शुभेच्छा. फक्त मला सध्याला आणखीन काही मागू नका म्हणजे झालं. वेळ तर मुळीच मागू नका. एक वेळ यथाशक्ती सत्पात्री दान देइन.
असो. अतिच अवांतर होतय. उरलेला त्रागा इतरत्र कुठेतरी करेन.
कायदेशीर व्यवस्था आणि
कायदेशीर व्यवस्था आणि प्रत्यक्षातील व्यवस्था ह्यात नेहनीच अंतर असते ... http://sleepwalkertales.blogspot.in/2012/08/chandan-pav-bhaji-and-gover…
आणि मी समाज सेवा करा आहे कुठे म्हणालोय मी म्हणतोय जो प्रश्न आहे त्याचे उत्तर शोधा किवा मांडा .. जसे अर्थक्रांती जर कोणीही काही केलेच नाही तर कसे चालेल तुम्ही as a career green peace मध्ये जाऊ शकता कि कोण म्हणताय कि जगण्यासाठी ८० % लोकांचीच वाट धरावी तो वैयक्तिक निर्णय स्वताहून घ्यावा (समाजाच्या दबावाखाली नाही) असे म्हणतोय बाकी काय ... ह्या २० % लोकांबद्दल बोलतोय .. ते पण जगातच आहेत ना ?
https://www.facebook.com/groups/263418453764780/329262067180418/?ref=no…
Jnana Prabodhini,
Jnana Prabodhini, Ambajogai
ज्ञान प्रबोधिनी “५०” एक अनुभव नवनीत .....अनेक शाळांमध्ये एक अजून शाळेची भर पडावी म्हणून काही आ.आप्पासाहेब पेंडसेंनी ज्ञान प्रबोधिनीची स्थापना ५० वर्षांपूर्वी केली नव्हती.आपल्या या देशाचे रूप पालटले पाहिजे ही आस मनात घेऊन प्रबोधिनी वाढत गेली.
शासन ही एक व्यवस्था आहे व व्यवस्था ही निर्जीव असते. समाज मात्र जीवंत असतो. त्यामुळे आपल्या देशाचे रूप पालटायचे असेल तर जीवंत समाजच हे परिवर्तन करू शकेल. शासनांतही समाजाचे प्रतिनिधी आहेत पण ते सीमित, समाजाच्या संख्येच्या मानाने खूप कमी आहेत. त्यामुळे आपले रूप पालटले पाहिजे हे पहिल्यांदा समाजाला वाटले पाहिजे. समाजाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे रूप व देशाचे रूप पालटण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. देश विकासाबरोबर जसे व्यक्ती विकसन व्हावयास हवे तसेच सध्याच्या काळात अजून एक विचार रुजला पाहिजे व त्यानुरूप कृती व्हावयास हवी.
विवेकबुद्धी, आणि संवादकौशल्याने काम करणारी व्यक्तीच विकासात हातभार लावू शकते. भविष्यवेधी कृती करण्यासाठी प्रत्येकामध्ये लढण्याची जिद्द व आत्मविश्वा स असायला हवा.यातून योग्य नेतृत्व विकसन होईल.
फक्त नेतृत्व विकसन होऊन चालणार नाही तर त्या नेतृत्वाला गटबांधणी करता आली पाहिजे म्हणजेच गटात काम करता आले पाहिजे. ते नाही करता आले तर ते नेतृत्व हुकुमशाही बनते. गटबांधनी करत नेतृत्व करणाऱ्यांची संघटना व्हावयास हवी. अशा किमान २५ संघटना देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना मदत करत प्रयत्न करतील तर देशाचे रूप पालटेल.प्रबोधिनीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने देशसेवेचा वसा घेतला असून, कर्तृत्व शक्तीच्या जोरावर बदल घडवण्याची ताकद प्रत्येकात आहे. देशाची प्रगती साधण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने देशसेवेचा वसा घ्यायलाच हवा................
अगदी सखोल विचार करून सुद्धा
अगदी सखोल विचार करून सुद्धा मी किंवा माझ्या ओळखीतील कोणी कुठल्या नैतिक तडजोडी केल्याचे मला आठवत नाही.
मोठ्या आकाराच्या sample बद्दल विचार करताना काही प्रमाणात अपवाद असतील याबद्दल शंका नाही. पण या अपवादांनी आपल्याप्रमाणेच सगळं जग असतं असं मानण्यात हशील नसतो. इंटरनेटवर स्त्रियांची संख्या कमी का आहे, याचा विचार करताना मी, मी स्त्री असूनही इंटरनेटवर आहे, म्हणजे सगळं आलबेल आहे असा विचार करण्यात मतलब नाही.
बाकी कोडगेपणाचं म्हणाल, तर तो आलेला आहे हे दिसतंच. मग दिवसाची पाच-दहा मिनीटं वाचवण्यासाठी फेरीवाल्यांकडून भाजी घेणं आणि त्याचं समर्थन हा ताजा मुद्दा आठवला. आपण अनैतिक, बेकायदेशीर गोष्टी करतो आणि/किंवा त्यांना पाठबळ देतो हे मान्य केलं तर निदान कोडगेपणाचा आरोप तरी होऊ नये.
याला "नैतिक तडजोड" म्हणत असाल तर... जाऊ दे..
>>पण याचा १९९० मध्ये आलेल्या खुल्या आर्थिक धोरणाशी काय संबंध? लाच देणे आणि आपल्याला सोयीस्कर पळवाटा काढणे... हे ब्रिटिशांच्या काळात होत नव्हते? आणिबाणी च्या काळात होत नव्हते? त्या आधीच्या राजेरजवाड्यांच्या काळात नव्हते?
आधी हे घडत नव्हतं असं कुणीच म्हणत नाही. मुद्दा हा मध्यमवर्गाचा आहे. ह्या काळापर्यंत मध्यमवर्गाचा ह्यातला सहभाग तुलनेनं किरकोळ होता. मी वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे -
आतापर्यंत साधी राहणी उच्च विचारसरणी वगैरे मूल्यं पाळण्याचा दावा करणारा मध्यमवर्ग ह्या नव्या प्रलोभनांना कसा सामोरा गेला ह्यावरनं त्याची ही मूल्यं किती सखोल होती आणि किती प्रमाणात केवळ संधीच्या अभावामुळे पत्करलेली होती हे लक्षात आलं.
ज्या उदाहरणांवरून तुम्ही 'याला "नैतिक तडजोड" म्हणत असाल तर... जाऊ दे.. ' असं म्हणताय त्या गोष्टी छोट्या पातळीवरच्या आहेत हे मुळात मीच वर म्हटलेलं आहे. तरीही त्या जरा नीट तपासू -
ड्रायव्हिंग लायसेन्स - मुळात घरटी एक स्वयंचलित दुचाकी यायच्या आधीच्या काळात एजंटाची गरजच पडत नव्हती. माझ्या ओळखीतले लोक गाड्या कशा घेत? तर पुष्कळ वर्षं बजाजकडे नंबर लावल्यानंतर तो लागे. लायसेन्ससाठी सरळ आर.टी.ओ.मध्ये जायचं, परीक्षा द्यायची आणि लायसेन्स मिळवायचं. मग आर्थिक उदारीकरणाचा संबंध काय? सकाळी नोकरीवर जाणं; संध्याकाळी घरी येणं; रविवारी बायकोबरोबर फेरफटका, एवढाच जोवर दिनक्रम होता तेव्हा वेळ पुष्कळ असे. मग एक दुपार गेली आर.टी.ओ.त तर कुणाला त्याचं काही विशेष नसे. जेव्हा हे बदललं, तेव्हा वेळ वाया घालवणं म्हणजे आर्थिक नुकसान करून घेणं असं झालं. मग वेळ वाचवायला एजंट आला. प्रत्येक गोष्ट पैशात मोजणं आणि सतत पैसा कमवत राहणं यातून हे सर्रास चालू झालं.
हॉटेलिंगबद्दल – पूर्वीच्या पुण्यातला मध्यमवर्ग मुळात हॉटेलात खाणंच अनैतिक समजत असे. हळूहळू ही मानसिकता बदलत इतक्या टोकाला गेली, की हॉटेलाचा मालक गुंड आहे आणि तो पोलिसाला हप्ते देऊन सार्वजनिक मालकीच्या जागेवर आपल्याला बसवतो, हे कळूनही त्यातली अनैतिकता वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी झटकता येऊ लागली. हे का झालं? तर तो जे करतो ते त्याच्या फायद्यासाठी, आणि आपण आपल्या फायद्यासाठी ज्या अनेक गोष्टी करतो त्यापेक्षा ते फार वेगळं नाही याची मनोमन झालेली जाणीव त्याच्या मागे होती. सिग्नल तोडताना पोलिसानं पकडल्यावर जर आपण पावती फाडायच्याऐवजी कमी पैशात मिटवून टाकतो, तर मग हॉटेलमालकाला बोलायचा नैतिक अधिकार आपल्याला राहतो का?
गंमत अशी आहे, की अगदी हेच 'पुणे ५२'मध्ये होतं. घरी आलेले पोलीस घालवायला बायको लाच देते. 'तसले फोटो मी काढत नाही' म्हणता म्हणता अमर ते काढतो. हळूहळू माणसं रुतत जातात. आणि मग तेच अंगवळणी पडतं. इतकं की ते अनैतिक आहे असं वाटणंच थांबतं. हाच तर मुद्दा आहे.
वाल्या कोळ्याची बायको
हळूहळू ही मानसिकता बदलत इतक्या टोकाला गेली, की हॉटेलाचा मालक गुंड आहे आणि तो पोलिसाला हप्ते देऊन सार्वजनिक मालकीच्या जागेवर आपल्याला बसवतो, हे कळूनही त्यातली अनैतिकता वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी झटकता येऊ लागली.
यात थोडीशी गल्लत झाली आहे काय? माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा वाल्या कोळी स्वतःच्या अनैतिक वागण्याचे समर्थन मागण्यासाठी बायकोकडे गेला तेव्हा तिने 'आमच्यासाठी असे वागा हे आम्ही सांगितलेलेच नाही' अशा स्वरुपाचे काहीतरी सांगितले असावे असे वाटते. म्हणजे तिने वाल्याच्या अनैतिक वागण्याला समर्थन देण्याचे नाकारले.
आता वरील उदाहरणात हॉटेलच्या गुंड मालकाची अनैतिकता जर आपण वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी झटकायचे म्हटले तर हॉटेलात न बसणे हे योग्य आहे. किंवा वाल्या कोळ्याच्या बायकोने अनैतिकतेकडे न केलेले दुर्लक्ष आपण करतो आहोत म्हणजे तिच्या उलट वागणे आहे असे वाटते. किंवा हॉटेलात न बसण्याची नैतिकता झटकता येऊ लागली असे काहीतरी म्हणावे लागेल असे वाटते.
काहीतरी लॉजिकमध्ये गडबड वाटते. कदाचित वाल्या जोपर्यंत अनैतिक वागण्याबद्दल प्रत्यक्ष विचारत नव्हता तोपर्यंत वाल्याच्या बायकोने त्याच्या अनैतिकतेकडे दुर्लक्ष केले होते मात्र एकदम अंगावर आल्यावर तिने ते नाकारले असे काही अभिप्रेत आहे का? मात्र निदान मी वाचलेल्या रामायणात तरी वाल्या कोळ्याने विचारेपर्यंत त्याच्या बिचाऱ्या बायकोला याबाबत काही माहीत नव्हते असे वाटते.
अत्यंत आवडला आहे.
पुणे ५२ हा चित्रपट मला अत्यंत आवडला आहे. मी त्याला ग्रेट म्हणणार नाही, पण तो चांगला आहे हे निश्चित.
निखिलचे रंगभान खूप निराळे आहे आणि ते तंत्रदृष्ट्या वापरण्यात देखील तो यशस्वी ठरला आहे. इथे रंग 'भूमिका' निभावतात. ते एखाद्या पात्राप्रमाणे अभिनय करतात. हे कसब मराठीत आजवर कुणालाही जमलेले नव्हते. प्रभावी रंग थोडे 'विहीर'मध्ये वापरले गेले, पण निखिलचे रंग ती मर्यादा ओलांडून कितीतरी पुढे जातात आणि मूड निर्माण करतात.
दुसरी किमया आहे ती प्रकाशाची. अनेक तऱ्हांनी त्याने प्रकाशाचा खेळ केला आहे. कॅमेरा वेगळ्या अनपेक्षित कोनांमधून वापरला आहे. यातील अनेक फ्रेम खूप काळ आठवत राहतील, अशा संस्मरणीय आहेत.
हे मी आधी मुद्दाम यासाठी सांगितले की कथानक, संवाद याविषयी आपल्याकडे साधारणपणे आधी बोलायची किंवा त्या विषयीच बोलायची पद्धत आहे. कारण मराठीत निर्माण होणारे बरेचसे सिनेमे हे 'चित्रपट' नसून 'बोलपट' असतात.
हा धोका भरपूर संवाद वापरून देखील कसा टाळता येऊ शकतो, हे निखिलने दाखवून दिले आहे. फक्त शब्दच बोलत राहिले तर चित्रपट दुबळा ठरतो. आणि हे शब्द देखील अनेकदा स्पूनफीडिंग करणारे असतात. प्रेक्षकाला मूर्ख आणि भाबडा समजणारे दिग्दर्शक ढिगाने आहेत, निखिल त्यात निश्चित वेगळा उठून दिसेल; कारण त्याने प्रेक्षकाची प्रगल्भता मान्य केली आहे. ही मराठीतील एक चांगली सुरुवात आहे.
भावनांना हात घालणारे चित्रपट आजवर आले आहेत, हा विचारांना स्पर्श करणारा चित्रपट आहे. तो तुमच्या मेंदूचा भुगा करत नाही आणि तुम्हांला परिस्थितीने अगतिकही बनवत नाही. तो फक्त एक अस्वस्थता मनात पेरतो.
एक भारती आचरेकरचा अपवाद वगळता कास्टिंग उत्तम आहे.
सईसारखी निर्बुद्ध चेहऱ्याची अभिनेत्री एखाद्या मोठ्या भूमिकेत कशी वापरून घेता येऊ शकते आणि सोनालीसारख्या बुद्धिमान चेहऱ्यासमोर कशी तोडीस तोड उभी करता येऊ शकते, हे बघणे मजेचे होते.
चिमणीच्या घरट्यासारखे प्रतीक बाळबोध होण्याची शक्यता होती; पण तो धोका थोडक्यात टळला.
चिरेबंद पटकथा हे निखिलमधील लेखकाचे यश आहे.
काळ खूप वेगाने पुढे जातो आहे आणि त्याची बदलाची गती आता विलक्षण आहे. त्यामुळे काही संदर्भ झर्रकन जुने होतात आणि मूल्ये हास्यास्पद वाटू लागतात. जुना काळ घेतल्याने आजच्या प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया आपल्याला विषण्ण करणाऱ्या असू शकतात. पण त्याला इलाज नाही. पुढिल चित्रपटात समकालाची मांडणी करता आली, तर ते अधिक आव्हानास्पद असेल.
हे सारे मी काहीसे विस्कळित आणि निव्वळ मुदद्यांनी लिहिले आहे. तथापि त्याविषयी लवकरच सविस्तर लिहिण्याची इच्छा आहे.
सिनेमा हे काय माध्यम आहे हे कळले नाहीये
हे मी आधी मुद्दाम यासाठी सांगितले की कथानक, संवाद याविषयी आपल्याकडे साधारणपणे आधी बोलायची किंवा त्या विषयीच बोलायची पद्धत आहे. कारण मराठीत निर्माण होणारे बरेचसे सिनेमे हे 'चित्रपट' नसून 'बोलपट' असतात.>> क्या बात है कविता !! मराठीत काय हिंदीत सुद्धा सिनेमा हे काय माध्यम आहे हे कळले नाहीये तथाकथित दिग्दर्शकांना.
मराठी सिनेमा तर शुटींग केलेली नाटके असतात.
उलट पोहणे
मनोबांनी म्हटलंय त्यावर एकच म्हणायचं आहे.
कलमाडी (गडकरी किंवा इतर कोणी) भ्रष्ट आहे म्हणून त्याला चौकात फाशी द्यायला हवी असं उच्चरवाने म्हणणारे आम्ही नाईलाज म्हणून (धबधबा वगैरे) गैरकृत्ये करतो असं म्हणतात. मग कलमाडीसुद्धा असाच धबधब्यात उभा असलेला माणूस आहे असं का नाही मानायचं? त्यालाही नाही उलट पोहणं शक्य.....
Don't give yourself the right to decide how much corruption is OK.
सहमत पण
बरोबरय, निवड करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं, पण निवड करता येण्याजोगे पर्याय असणं आणि त्यांचा फक्त आभास असणं हा घटक तत्वाविरुद्ध वागायला भाग पाडतो, पुण्यामधे बसने सगळीकडे जाता येतं, पण आज तो पर्याय जगण्यासाठी निवडलेल्या इतर पर्यांयांना पूरक/कम्पॅटिबल नाही म्हणजे बस वेळेवर मिळेलच, बसायला जागा मिळेलच, स्त्रियांना सुरक्षित प्रवास करता येईलच असं ठाम म्हणता येणार नाही, मग पर्यावरणाच्या नाशाला हातभार लावणारं खाजगी वाहन वापरायच्या आगतिकतेची तुलना नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या आगतिकतेशी करणं गैर आहे. अर्थात मी मध्यमवर्गीय गैरकृत्य करत नाहीत असं अजिबात म्हणत नाही, फक्त काही निवडी ह्या लादल्या गेलेल्या असतात एवढंच.
ह्याशिवाय नैतिकता वगैरे बाजूला ठेवून, जर होणार्या भ्रष्टाचाराचा मला(माझ्या गटाला(उदा. मध्यमवर्ग))फायदा होत नसेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणं ठीकच आहे.
नैतिक तडजोडी आणि अनुकंपा
वाल्या कोळ्याची बायको -
माझा मुद्दा हा काहीसा असा होता : जरी मी स्वत: अनैतिक वागत नसेन, तरीही मी जर दुसऱ्याच्या अनैतिक वर्तनाचा लाभार्थी असेन, तर त्याच्या अनैतिकतेतला अंशत: वाटेकरी मी होतो का? ह्या तत्त्वचिंतनात्मक प्रश्नाच्या चौकटीतून मी जेव्हा अनधिकृत जागेवर धंदा करणारा हॉटेलमालक आणि त्याचा ग्राहक ह्या नात्याकडे पाहतो तेव्हा (रामायणातल्या आदर्शवादाचे निकष लावता) त्यातली नैतिक तडजोड दिसते.
मध्यमवर्गाच्या नैतिक तडजोडींविषयीची टिप्पणी अनेकांना संभ्रमात पाडते आहे, हेच मला मुळात पुणे-५२वरच्या चर्चेच्या संदर्भात फार रोचक वाटतंय. म्हणजे कसं? तर मुळात चित्रपट कोणत्यातरी नैतिक अधिष्ठानावरून मध्यमवर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत नाही आहे, तर त्याच्या निसरड्या प्रवासाकडे अनुकंपेनं पाहतो आहे. नक्की कोणत्या क्षणी आपण घसरलो, आणि कशाला 'नाही' म्हटलं असतं तर आपण वाचलो असतो, हे नायकाला कळत नाही. नेमकी हीच आलेल्या प्रतिक्रियांची गंमत आहे. म्हणजे काय? तर रामायणातल्या आदर्शवादी आणि कठोर साधनशुचितेच्या मूल्यांना कुरवाळत आपण आज बसू शकत नाही, हे बहुधा सर्वांना कळतं आहे. पण तत्त्वचिंतनासाठीचा एक प्रयोग म्हणून तसं तपासून पाहिलं तर आपण कसे अनैतिक ठरतो, हे ज्याला मी छोट्या पातळीवरची म्हणतो आहे ती उदाहरणं आणि त्याला वर आलेल्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट व्हावं. ही साधनशुचिता आपण पाळत नसलो तरीही आपल्याला काहीतरी कुरतडत राहतं आणि अस्वस्थ करत राहतं. का? कारण, मनोमनी आपल्याला कळत असतं की आपण नैतिक तडजोडी करत गेलो आहोत. त्या अपरिहार्य असतीलही कदाचित, पण मग किमान संवेदनशीलता असली तर मग त्यांच्यामुळे खंत वाटणं, मन कुरतडत राहणं हेही स्वाभाविकच नव्हे का? अमर आपटेचं हेच होतं. मग त्याच्याविषयी साधी अनुकंपा तरी वाटायला काय हरकत आहे?
सत्य
परीक्षण आणि चर्चेतून काही प्रश्न निर्माण झालेच.
मध्यमवर्गानं खुल्या आर्थिक धोरणांचे फायदे मिळवले आणि नैतिक तडजोडी केल्या
हे सांख्यिकीतून सिद्ध झाले आहे का? त्यातील अपवाद किती, सँपलचा आकार किती, रिग्रेशन वगैरे मारले आहे का? की हा केवळ सामाजिक सत्याकडे केलेला अंगुलीनिर्देश आहे? आणि असेल तर असे व्यक्तिसापेक्ष 'सत्य' स्वीकारणे हे धोकादायक मानता येते का? तसे मानण्यास पुरेशी आकडेवारी आणि आकडेमोड झालेली आहे का?
या लेखनातील मध्यमवर्गात केवळ लाच देणारा येतो की घेणाराही येतो? घेणाराही येत असेल तर, तरीही १९९० च्या आधीच्या काळात या स्वरूपाचे उद्योग करणारा मध्यम वर्गात मोडत नव्हता, असे म्हणण्याइतकी सांख्यिकी आहे का? ही देवघेव केवळ सरकारी व्यवस्थांमधील आहे, की खासगी क्षेत्रातीलही?
सर्वांत महत्त्वाचे, नैतीक म्हणजे काय? म्हणजे, या शब्दाची काय व्याख्या गृहीत धरली आहे? आणि किती प्रमाणात तिचे पालन-उल्लंघन म्हणजे तडजोड हे ठरवले आहे? नैतीकता नामक काही फ्लॅट गोष्ट असते काय?
तर, या प्रश्नांची उत्तरे मिळाली असल्याने या अस्वस्थ वर्तमानावरील टोकदार भाष्य पाहून कशाला आपल्या चिरेबंदी स्थितीला भोकं पाडून घ्यायची म्हणतो मी... ;-)
की हा केवळ सामाजिक सत्याकडे
की हा केवळ सामाजिक सत्याकडे केलेला अंगुलीनिर्देश आहे?
हा अंगुलीनिर्देश आहे. वेगवेगळे कलाकार याबाबतीत वाकबगार असतात. जर कोणाला यावर समाजशास्त्रीय अभ्यास करायचा असेल, आणि नैतिकतेशी होणारी तडजोड कमी करण्यासाठी पॉलिसी वगैरे बनवायची असेल तर मात्र तुम्ही म्हणता तसा सांख्यिकीचे नियम पाळून केलेला अभ्यास आवश्यक ठरेल. सरकारपुढे ठेवलेल्या रिपोर्टात पुणे ५२ ची चित्रफीत आणि त्यावरचं चिंतातुर जंतूंचं भाष्य पुरेसं ठरणार नाही. तिथे पद्धतशीर अभ्यास करून सादर केलेला अहवाल हवा.
कलाकृतीतल्या विश्वातली 'सत्यं' ही किती खरी आहेत, यापेक्षा प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याची त्यांच्यात किती क्षमता आहे, यावरून कलाकृती यशस्वी आहे की नाही हे ठरतं. 'नाग पुंगीच्या आवाजाने मंत्रमुग्ध होऊन डोलतो' हे सत्य गृहित धरून त्यावर आधारित कथा लिहायला काहीच हरकत नसते. मग नागाला खरंच ऐकू येतं का हा प्रश्न उद्भवत नाही.
तर, या प्रश्नांची उत्तरे मिळाली असल्याने या अस्वस्थ वर्तमानावरील टोकदार भाष्य पाहून कशाला आपल्या चिरेबंदी स्थितीला भोकं पाडून घ्यायची म्हणतो मी...
असत्यरूपी हल्लेखोरांना अडवण्यासाठी चिरेबंदी किल्ले बांधले तरी कल्पनाविलासरूपी नर्तकींना आत येऊ देण्यासाठी दार ठेवावं असं मी म्हणेन. :)
हं...
असत्यरूपी हल्लेखोरांना अडवण्यासाठी चिरेबंदी किल्ले बांधले तरी कल्पनाविलासरूपी नर्तकींना आत येऊ देण्यासाठी दार ठेवावं असं मी म्हणेन.
हे थेओरेटिकली पटतंय. पण अडचण अशी की, हे साले हल्लेखोर असे असतात की, नर्तकींना (कल्पनाविलासरुपी असल्या तरी) त्या दारावरून जोरजबरदस्तीने बाजूला सारून स्वतःच आत घुसतात. दंडेली करतात हो. कल्पनाविलासरुपी नर्तकींच्या संदर्भात ते असं वागतात, तर सत्य/वास्तविक/तथ्यात्मक नर्तकींच्यासंदर्भात काय करतील याच्या विचारानेच धस्स होतं राव. आता तसं होऊ नये म्हणून 'पोलीस' नेमला तरी तो शेवटी मध्यमवर्गीयच. तो नेमकी नैतीक तडजोड करतो, आणि त्या हल्लेखोरांशीच हातमिळवणी करतो, वर त्या नर्तकींना छळतो ते वेगळंच. मग तर त्या हल्लेखोरांच्या दंडेलीला पारच रहात नाही.
त्यामुळं काही वेळेस दारंखिडक्या नकोच असं वाटतं. म्हणतात ना, 'साधूसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा', तसाच हा प्रकार. :-)
असो. पाहू, यावर काही मार्ग काढता येतो का ते...
पुणे ५२ वरचा अजून एक
पुणे ५२ वरचा अजून एक लेख:
http://www.maayboli.com/node/40592
खूप जणांकडून हा चित्रपट खूप भारी आहे असा ऐकल. मला हा चित्रपट पहायची प्रचंड इच्छा आहे. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा काही कारणामुळे जाऊ नाही शकले. याची DVD कधी येणार माहित आहे का? टोरेंट वर देखील शोधून पहिला. तिथेही नाही. अरभाटच्या लोकांना विचारले तर त्यांच उत्तर कै च्या कै!!
सिनेमा पहिल्यांदा पाहीला तर
सिनेमा पहिल्यांदा पाहीला तर प्रचंड चिडचिड झालेली, झेपला नाही. नंतर झेपल्यावर सुद्धा विशेष असं काही वाटलं नाही, रोज वर्तमानात हे सगळं दिसतच त्यामुळे Obvious ईतुकच.
मग थोर सादरीकरण/दिग्दर्शन हा जर मुद्दा म्हन्ट्ला तर जागतिकीकरणामुळे कधी-कधी काही नैतीक मुल्ये रसातळाला चाललीये त्यामुळे डोकेदुखी वाढलीये असं काहीसं सुचवायच असल्यास, सिनेमा बघतांना खरचं डोक्याला त्रास होतो.
सिनेमा नाही आवडला. असो.
लोकांना काय हवं?
>> याची DVD कधी येणार माहित आहे का? टोरेंट वर देखील शोधून पहिला. तिथेही नाही. अरभाटच्या लोकांना विचारले तर त्यांच उत्तर कै च्या कै!!
चित्रपट टी.व्ही.वर येण्यासाठी किंवा डीव्हीडीवर उपलब्ध होण्यासाठी एखाद्या चॅनल किंवा वितरकानं तो विकत घ्यावा लागतो. त्यासाठी त्यांना जाहिराती वगैरे मिळण्याची किंवा खपाची हमी लागते. ती बी.पी. वगैरेंसारख्या चित्रपटाला मिळते, पण 'पुणे-५२'ला प्रेक्षकांचा मिळालेला एकंदर थंड प्रतिसाद पाहता हे झालंच नसावं. 'अरभाट'कडून काय उत्तर आलं?
पुणे ५२ ही इंडिअन माजिक आय
पुणे ५२ ही इंडिअन माजिक आय आणि अरभाट यांची निर्मिती आहे. अरभाटच्या लोकांना विचारलं तर DVD वितरणातले हक्क वगैरे ची गोम आहे. सध्या तरी अरभाट काही करू शकत नाही. आणि नंतर एकदम एक मोठ्ठा पाज घेऊन ती मुलगी म्हणाली,"But...You know where to find it??" झाली ना मग गोची.. matrix मधल्या सारख "Follow the white rabbit" सारखी situation झाली. म्हटलं ताई torrent वर नाही हो काही. तर नुसती हसली..आता काय घ्या??
माझी खूप इच्छा आहे एक special स्क्रीनिंग व्हावं!!! काय मज्जा!!!
मी ही अजूनही हा चित्रपट
मी ही अजूनही हा चित्रपट बघितला नाहीये नी बघायची खूप इच्छाय.
बाकी, प्रतिक्रीयांवरून हा चित्रपट प्रत्येकाला जाणवेल असे नाही. त्यासाठी कोथरूडसारख्या उच्चमध्यमवर्गीयांतील दांभिकांच्या मांदीयाळीत/बुजबुजाटात काही काळ तरी रहावे लागेल. ;) त्या दृष्टीने पुणे-५२ हे नाव मार्मिक आहे!
चित्रपट उपलब्ध
मराठी चित्रपटांच्या वितरणव्यवस्थेत अशा चित्रपटांना फारशी जागा नसल्यामुळे अनेकांना 'पुणे ५२' पाहायची इच्छा असूनही ते जमलं नव्हतं. आता खुद्द निर्मात्यांनीच यूट्यूबवर अख्खा चित्रपट उपलब्ध करून दिला आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
ही माहिती दिल्याबद्दल
ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. या चित्रपटाची अनेक परस्परविरोधी परिक्षणे वाचल्यामुळे चित्रपट बघण्याची उत्सुकता होती परंतु भारतात नसल्यामुळे जमले नव्हते. आता बघता येइल. युट्युबवर चित्रपट टाकून पैसे कमवता येऊ शकतात याची मराठी चित्रपटनिर्मात्यांना कल्पना आहे का? चित्रपटादरम्यान जाहिराती दाखवून किंवा सरळसरळ २-४$ ला एक वेळा बघण्याचे हक्क विकून. जर मला हा चित्रपट पैसे देउन घ्ररबसल्या बघण्याचा पर्याय उपलब्ध असता तर मी नक्कीच बघितला असता. इथे बरेच चित्रपट आहेत.
https://www.youtube.com/user/movies
यूट्युब -- तिथेच पाहिला
आणि मग तुमचं परिक्षण वाचलं
अज्याबात आवडला नाही.
काही गोष्टी -
/*** वाचून्का फाटक सुरु *** /
१. ९० आणि ग्लोबलायझेशनचे संदर्भ लागत होते. पण ते अजीबात परिणामकारक वाटले नाहीत. अमर आपटे, हा या बदलत्या जगाच्या व्यावहारिक मागण्यांनी बदलला जातोय, हे काही मनाला पटलं नाही- त्या व्यक्तीरेखेने ते वारंवार अधोरेखित करुनही. उलट अमर गोंधळलेला, त्रासिक वाटला.
२. चित्रपटाचा ट्रेलर पाहून एक थ्रिलर किंवा डिटेक्टिवपट आहे असंच वाटलं होतं, त्यामु़ळे अपेक्षाभंग झाला. त्या बदल्यात जे काही या चित्रपटाकडून मिळाले, ते थोडे कमी रंजक होते.
३. निव्वळ सिनेमा म्हटला, तर बरेचदा त्याचा वेग संथ होता. पण तो गुंतवणारा न वाटता थोडा रटाळ वाटला.
थोडक्यात, मुद्दा क्रमांक १ (जी सिनेमाची जान आहे) नीटसा न उलगडल्याने मजा आली नाही
/*** वाचून्का फाटक बंद *** /
रोचक!
रोचक! चित्रपट थेटरात न जमल्यास डाऊनलोडवून नक्की पाहिन
अन्यत्र एका लेखाच्या फसव्या शीर्षकामुळे ती कथा आहे असे समजून आधीच वाचल्यावर तो चित्रपट परिचय आहे हे शेवटी कळल्याने कथेचा अंदाज आधीच होता. त्यामुळे ही समिक्षा पूर्ण वाचली :)
समांतरः बाकी चित्रपट संपल्यावर आला तसा समाजाची प्रगती-वाढ आणि सूज समजावणारा असा अनुभव अनेक ठिकाणी येतो. सवाई गंधर्वमधील प्रेक्षकांवर, एक वात्रटिका/ एकपात्री स्वगत लिहायचा विचार होता - सुरवातही केली होती- पण म्हटलं जाऊ दे! ;) त्या पार्श्वभूमीवर "आपल्याचविषयी काहीतरी सखोल आणि गंभीर म्हटलं आहे, आणि आपल्याला अंतर्मुख करणं हा चित्रपटाचा हेतू आहे हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे" हे निरिक्षण मार्मिक आहे!