छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १८: प्लास्टिक
या वेळचा स्पर्धेचा विषय आहे 'प्लास्टिक'. सुमारे शतकापूर्वी जन्माला आलेल्या या पदार्थाने आज आपलं आसमंत व्यापलेलं आहे. बाटल्या, पिशव्या, खुर्च्या, कपडे, आवरणं, पॅकिंग मटेरियल अशा अनेक स्वरूपात आपल्याला ते जागोजागी दिसतं. त्याचे वेगवेगळे रंग, पोत, आकार, पारदर्शकता यामुळे फोटोग्राफीसाठी, विशेषतः अमूर्त फोटोग्राफीसाठी हा अत्यंत लवचिक (प्लास्टिक) विषय आहे. त्याचबरोबर त्याला एक बेगडीपणा, खोटेपणा, आणि पर्यावरणाच्या संदर्भात काहीसा भीतीदायकताही आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या अंगांनी छायाचित्रणाच्या शक्यता यातून उभ्या रहातात.
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात असं माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. जर पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा अशी मी स्पर्धकांना विनंती करतो.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट १८ मार्च रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. १९ मार्चला विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय कार्यमग्न, आणि विजेते छायाचित्र
स्पर्धा का इतर?
युके/आम्रिका कसे बर्यापैकी
युके/आम्रिका कसे बर्यापैकी बांधीव आहेत, तर भारत मात्र "अंडर कन्स्ट्रक्शन" आहे. त्यातही भारताचे ठोकळे इतके अस्ताव्यस्त आहेत की भारत बांधून काधायला सगळ्या ठोकळ्यांना जमवून घ्यावे लागेलच, शिवाय त्यांना एकत्र करणार्यालाही खूप कष्ट घ्ययचे आहेत अशा काहिशा चित्राची आथवण झाली.
अर्थाच छायाचित्र म्हणूनही आवडले
यावेळी स्पर्धेला तितकासा
यावेळी स्पर्धेला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून थोडा विरस झाला. प्लास्टिक सारखा थोडा वेगळा, अनोखा विषय देण्यामागे लोकांनी जुनी चित्रं शोधून टाकण्याऐवजी नवीन काहीतरी फोटो काढावेत अशी इच्छा होती. दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही. असो.
विजेते छायाचित्र - ३_१४_विक्षिप्त अदिती यांचं प्लास्टिकचं शहर. एकाच वेळी त्या शहराची मोड्युलर रचना, प्लास्टिकी कृत्रिमपणा, आणि 'अजून बांधकाम चालू आहे' ही भावना आणण्यात हे चित्र यशस्वी झालेलं आहे.
स्पर्धेबद्दलःमी सोडून अन्य
स्पर्धेबद्दलः
अन्य कोणी फोटो न टाकलेले पाहून माझीही निराशा झाली. इतरांनी काढलेले फोटो बघून वेगवेगळ्या कल्पना सुचतात, चांगली चित्रं बघायला मिळतात. प्लास्टीक ही तशी बदनाम गोष्ट असली तरी आता आपण प्लास्टीक हद्दपार करू शकत नाही. प्लास्टीकचे रंग, पारदर्शक असणं यातूनही वेगवेगळी चित्र दिसतील अशी आशा होती.
मी सोडून अन्य कोणीही फोटो न टाकल्यामुळे पुढचा विषयही राजेशनेच द्यावा अशी विनंती. तरीही काढलेला आहे म्हणून आणखी एक फोटो टाकून देते:
छायाचित्राबद्दलः
ऋता आणि राजेशला याच चित्रात वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या हे मला आवडलं. माझ्या डोक्यात याची कल्पना वेगळी होती. पण या कल्पना वाचल्यामुळे अशा प्रकारच्या ठोकळ्यांमधून वेगवेगळ्या गोष्टी मांडता येतील हे ही लक्षात आलं.
इयन, माझा माजी, ब्रिटीश बॉस भारतात पहिल्यांदा आला होता तेव्हा त्याचं भारताबद्दल काय मत झालं असं विचारलं. (हे मत फक्त पुण्यापुरतं, वरवरचं होतं हे ही त्याने नमूद केलं.) ते मत होतं, "India is a place under construction." २००८ साली पुण्यातले रस्ते, रस्त्याकडेच्या इमारती, तिथे उभ्या असणार्या क्रेन्स पहाता मला हे निरीक्षण फारच पटलं; मला ते आधी दिसलं नव्हतं.
या फोटोतले रंग ब्रिटीश आणि भारतीय झेंड्यांचे आहेत. मला आणि इयनला दिसलेले एकमेकांचे देश.
विषय आवडला
हा ही विषय आवडला. प्लास्टीक एवढंच गूगल-इमेज-सर्च केलं तरीही रोचक फोटो दिसले.
(आमच्या शहरात एक मार्चपासून पातळ प्लास्टिक (single use plastic bags) पिशव्या वापरण्यावर बंदी आणलेली आहे. त्याला काही अपवाद आहेत. ही बंदी येण्याची तयारी गेलं वर्ष-दीड वर्ष सुरू होती. आता या बंदीविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे अशीही बातमी अलिकडेच आली.
त्याशिवाय शहरात एक दुकानही उघडलं आहे तिथे प्लास्टिकच्या पिशव्याच मिळत नाहीत. धान्य, कडधान्य, वेगवेगळी पीठं नेण्यासाठीही स्वतः डबे न्यायचे किंवा अशा काही प्रकारची कल्पना आहे. बहुदा कागदाच्या पिशव्या मिळतात.
गेले काही महिने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या कमी व्हाव्या यासाठीही काही लोक प्रयत्नशील असावेत असं दिसत आहे. त्यांच्यावर पाण्याचे फिल्टर बनवणार्या कंपन्यांची कृपादृष्टी असल्याचे आरोपही बातम्यांमधे झाले होते.)