(पिच्चर पाहाणे - एक ना धड १७६० अनुभव)

(आम्ची प्रेरणा)

पिच्चर पाहाण्याच्या पद्धती व अनुषंगिक फायदे याची माहिती घेण्यापूर्वी थोडेसे अवांतर.
काही ढुढ्ढाचार्यांच्या काही लेखांतील काही मुद्द्यांचे मला उमगलेले निराकरण असे.

पहिला मुद्दा ढुढ्ढाचार्यांनी सांगितलेल्या पिच्चर पाहाण्याच्या दोन पद्धती. या तशा ठीक वाटतात. तथापि पिच्चर पाहाण्याच्या पद्धती या हेतूप्रमाणे ठरत असून त्यांचे आणखीही बरेच प्रकार आहेत. सर्वसधारणपणे वैद्यकीय सहाय्यासाठी फुल्टु टाईमपास दर्शन ही पद्धत जास्त उपयुक्त आहे, असा अनुभव आहे.

दुसरा मुद्दा - पिच्चर पाहाण्यामधून मनोविकार होतात का ? ...होऊ शकतात. आयटेम साॅन्ग वाढत्या वयात पाहिल्यामुळे काही जणांची काही इंद्रियांची संवेदनक्षमता वाढते असे सरकारी निरिक्षण आहे. अशा वयातले बरेच प्रेक्षक अनावरपणे चेकाळतात असे सरकारला आढळले आहे, ते यामुळेच. चुकीच्या मार्गाने पिच्चरदर्शन केले तर मानसिक विकार होऊ शकतात. म्हणून ते योग्य साथींच्या सोबत केल्यास चांगले.

तिसरा मुद्दा पिच्चर पाहाण्याचा हेतू. उद्दीपन किंवा साक्षात्कार हे पिच्चर पाहण्याचे हेतू असू शकतात. अर्थात ज्यांना तिथपर्यंत जायचे आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. मुळात पिच्चर पाहाणं हे कोणतेही व्यवहारिक उद्दिष्ट गाठण्याचे साधन नसून इंद्रियांद्वारे (म्हणजे कान, डोळे वगैरे बरं का!) जीवनाची ओळख करून घेण्याचे साधन आहे. पिच्चर पाहाणं हे बुद्ध्यांक, धैर्य अथवा इतर कोणतेही विशिष्ट स्पर्धात्मक गुण कोणत्याही व्यक्तीमध्ये रोपित किंवा विकसित करण्याचे हत्यार नसून व्यक्तीच्या स्वाभाविक प्रवृत्ती (किंवा विकृती) ओळखणे व विकसित करणे याचा एक मार्ग आहे. तूर्त तरी आरोग्यविषयक फायदे इतकाच या चर्चेचा हेतू आहे.

चौथा मुद्दा ताणतणाव. पिच्चर पाहाण्यामुळे ताण तणावापासून मुक्ती मिळते याचा इथे अर्थ, ताण तणाव टाळणे अथवा उपस्थितच न होणे असा नाही. तर दैनंदिन जीवनात अपरिहार्य असणाऱ्या ताण तणावाच्या प्रतिकूल परिणामांपासून शरीर व मनाचे रक्षण करणे हा आहे. रबर जसे ताणल्यानंतर पुन्हा पूर्वस्थितीला येते तसे ताणलेले मन व शरीर नंतर पुन्हा चटकन सहज स्थितीत यावे, हा पिच्चर पाहाण्याचा (विशेषत: फुल्टु टाईमपास दर्शनाचा) परिणाम आहे. तसेच पिच्चर पाहाण्यामुळे मनोधैर्य वाढते यापेक्षा मनाची लंपटता, आचरटपणा व इंद्रियांचा स्टॅमिना वाढतात असे म्हणणे योग्य ठरेल. हा कोणताही दावा नसून फक्त अनुभव आहे.

पिच्चर पाहाणं ही काहीशी आचरट साधना आहे. पिच्चर पाहाणं हा एक संपूर्ण व्यक्तिगत अनुभव आहे. त्याचे जनरलायझेशन करता येत नाही. समूहावरील परिमाणाचा अभ्यास करून फार तर निष्कर्ष काढता येतील पण कोणत्याही सामुहिक निष्कर्षावरून पिच्चर या साधनाचे मूल्यमापन करणे म्हणजे समुद्र त्याच्या सर्व साधनसंपत्तीसह ग्यालनमध्ये तोलण्यासारखे होईल. पिच्चर क्षेत्रातल्या डामडौल व प्रसिद्धीचे खऱ्या दर्शनोपासकाना वावडे आहे. पिच्चरचा तथाकथित ‘पुरस्कार’ करताना पिच्चरवाले आणि फुल्टु टाईमपासला चटावलेली आम जनता सोडता कोणी आढळत नाही. काहीही सिद्ध करणे हा फुल्टु टाईमपास दर्शनोपासकांचा हेतू नसून काहीतरी शेअर करणे हा आहे. इथेही उद्देश हाच आहे की इतरांनीही या मार्गाचा केवळ अनुभव घ्यावा.

उपरोल्लेखित ढुढ्ढाचार्य लेखकाने पुष्कळ प्रयोगांचे निष्कर्ष दिले आहेत. परंतु पिच्चरचा अनुभव घेतला आहे किंवा नाही, याचा लेखात कुठे उल्लेख आढळत नाही.

इंद्रियांची लंपटक्षमता हा एक मुद्दा. हा तर अत्यंत गैरलागू मुद्दा. कारण पिच्चर पाहाणे म्हणजे इंद्रीयांना शरण जाणे. त्यातून इंद्रियांची लंपटक्षमता कमी होण्याची अपेक्षा का करावी ? पिच्चर ‘उमजणे’ ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. आपल्याला जसा पिच्चर दिसतो तसा एखाद्या जंतूला दिसत असेलच असे नाही. पण म्हणून जंतूचा अनुभव खोटा अन आपला खरा असे नसून आपला अनुभव हा एका वेगळ्या मितीतला आहे, इतकेच फार तर म्हणता येईल.

पिच्चर पाहाण्याने एकाग्रता वाढते हे मात्र निर्विवादपणे सिद्द झाले आहे. एकाग्रता हा कोणत्याही एका इंद्रियाच्या लंपटपणाचा अविष्कार नसून ती सर्व इंद्रिये, मन व बुद्धी यांचे को-ऑर्डीनेटेड लंपटपण असते. पिच्चर पाहिल्यामुळे शरीर व मन यांचे तादात्म्य पूर्ण होते, जे की दैंनदिन जीवनात नेहमी अपूर्ण असते, किंवा अलाइन झालेले नसते. इंद्रियांच्या अनुभूती मनाला व मन शरीराला सतत कोणा एका व्यक्तीकडे (उदा : मधुबाला किंवा कत्रिना किंवा जाॅन अब्राहम) खेचत असतात. पिच्चर पाहाताना सर्व इंद्रिये आपल्या स्वाभाविक उद्दीपित स्थितीमध्ये स्थिर होतात. कागदाची विशिष्ट घडी घातली की त्यातून चोखंदळाला मधुबालाचेच उभार फक्त दिसावे तसे यांचे होते. सुटा कागद हवेत दिशा घेऊ शकत नाही, पण त्याचे उभार करून ते विविक्षित व्यक्तीकडे प्रक्षेपित करता येतात. तसे काहीसे लंपट मनाचे आहे. पण हा विषय पुन्हा विवेचनाचा नसून अनुभवाचा आहे.

परदेशात पिच्चर पाहाणे या गोष्टीचे स्तोम माजवले गेले आहे ही बाब मात्र नि:संशय खरी. आणि त्यात खरे काय नि खोटे किती हे कळणे कठीण. हाॅलिवूडची क्रेझ म्हणून पिच्चर पाहाणाऱ्यांची संख्याही कमी नसावी. पण जसे जाळीतून आलेला म्हणून सूर्यप्रकाश दूषित ठरवता येत नाही, तद्वत जिना लोलोब्रिजिडाचे फुल्टु टाईमपास दर्शन घेणाऱ्यांमुळे कत्रिनाचे पिच्चर पाहाणे वाईटच म्हणता येणार नाही.

पिच्चर पाहाण्यातील अनियमितता ही मानसिक अनारोग्याचे लक्षण होय, हे मात्र १०० टक्के खरे आहे. मुळात पिच्चर पाहाण्याचे जे काही लाभ आहेत, ते नियमित व दीर्घकाळ फुल्टु टाईमपास दर्शन घेतल्यानंतरच मिळू शकतात. पिच्चर पाहाणे हा मनाचा व्यायाम आहे. कोणताही व्यायाम दीर्घकाळ केल्यानंतरच त्याचे परिणाम दृग्गोचर होतात. अन करण्याचे थांबवल्यावर परिणामही हळू हळू नाहीसे होतात. तसेच पिच्चर पाहाण्याचे आहे. सातत्य व नियामितपणा हे या दर्शनाचे दोन मूलभूत प्रक्षेपक आहेत.

एस्ट्रोजेन किंवा टेस्टोस्टेराॅनमध्ये वाढ हा आणखी एक मुद्दा. याबाबत, माझे लेखन हे स्वयंभू संदर्भावर आधारित आहे. तथापि मला वाट्टेल ते मी म्हटले नसून मला जेव्हा तसा अनुभव आला, तेव्हा त्यामागचे कारण शोधण्यासाठी मी अभ्यास केल्यावर हा साक्षात्कार मला झाला. लंपटांच्या एका मोठ्या समुदायाने पिच्चर पाहाण्याच्या आरोग्यविषयक लाभांना मान्यता दिली आहे. तथापि इथे पुन्हा हेच सांगावेसे वाटते, की मान्यवरांनी मान्यता दिली अथवा शिक्कामोर्तब केले म्हणून कुणीही फुल्टु टाईमपास दर्शनपद्धती आचरावी असे नसून स्वत:च्या निकषांवर ती चढवून अन फुलवून पहावी ही अपेक्षा आहे.

Deep Arousal state ही मेंदूच्या कोणत्याही एका भौतिक घटकाशी (Neuron) निगडीत नसून ती सर्व भौतिक घटकांची स्वाभाविक स्थिती आहे. ती अभौतिक आहे. तिचे भौतिक औषधात रुपांतर(?) करणे शक्य होईल असे वाटत नाही.
फुल्टु टाईमपासक जास्त सुखी असतात हे विधान पायारहित आहे. मुळात इंद्रियसुख हे सापेक्ष आहे. इंद्रियसुख हे अंतिम लक्ष्य नसून ती एक स्थिती आहे याची जाणीव जागृत राहण्याचे कार्य पिच्चर पाहाताना होते, इतकेच म्हणू शकेन.

पिच्चर पाहाणे हा स्वतंत्र उपचार नसून इतर कोणत्याही उपचार पद्धतीस तो सहाय्यभूत आहे असे म्हणता येईल. कोणत्याही उपचाराचा पूर्णत्वाने परिणाम सहजस्वाभाविक स्थितीतच त्वरित होणार. यात अनैसर्गिक ते काय ? कानशिलं तापायला जर स्थूल कृष्णवर्णी दाक्षिणात्य ललनाच लागत असेल, तर निर्वस्त्र झाली तरी कत्रिना किती परिणाम करील? पिच्चर पाहाणे शरीराची शिथिल अवस्था फक्त उद्दीपित करते. खरा सुखपरिणाम प्रत्यक्ष क्रियेनंच होतो; निव्वळ (फुल्टु टाईमपास असला तरी) दर्शनानं नव्हे.

असो. पुढील लेखात प्रत्यक्ष दर्शन पद्धतीवर चर्चा करुया.

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

दुसरा मुद्दा - पिच्चर पाहाण्यामधून मनोविकार होतात का ? ...होऊ शकतात. आयटेम साॅन्ग वाढत्या वयात पाहिल्यामुळे काही जणांची काही इंद्रियांची संवेदनक्षमता वाढते असे सरकारी निरिक्षण आहे. अशा वयातले बरेच प्रेक्षक अनावरपणे चेकाळतात असे सरकारला आढळले आहे, ते यामुळेच. चुकीच्या मार्गाने पिच्चरदर्शन केले तर मानसिक विकार होऊ शकतात. म्हणून ते योग्य साथींच्या सोबत केल्यास चांगले.

यात योग्य मार्गदर्शना शिवाय पिच्चर बघिल्यास मनोविकार होउ शकतात असा सूर आहे म्हणा वा भीती घातली आहे म्हणा. पिच्चरशिवाय देखील इंद्रियांची संवेदनक्षमता वाढू शकतेच की? एखाद्या ध्यान, मेडीटेशन, विपश्यना, कपालभाती वगैरे मधे तुम्ही तल्लीन होउन गेलात कि तुम्हा सहसंवेदनेचा अनुभव घेताच की? तेव्हाही तुम्हाला रडू येते, हसू येते. इंद्रियांची संवेदनक्षमता दाबून ठेवण्यापेक्षा त्या मो़कळ्या करण्यात एक वेगळाच अनुभव असतो. दाबून कोंडुन ठेवल्याने मनावर एक ताण येतो.

बाकी पिच्चर हे प्रकरण अनुभूतीचा प्रांत असल्याने त्यावर काय बोलणार? फार तर मला कंटाळा आला की पिच्चरची अनुभूती घेते असे म्हणते. SmileSmile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.


यात योग्य मार्गदर्शना शिवाय पिच्चर बघिल्यास मनोविकार होउ शकतात असा सूर आहे म्हणा वा भीती घातली आहे म्हणा.

मला हा विक्षिप्त अदिती यांचा शेरा रूचला नाही.

पिच्चर बघायला मार्गदर्शन लागते कारण पिच्चर बघताना जे अनुभव येतात त्यात भरकटलेपणा, गोंधळ, नैतिक कल्पनाना धक्का बसणे, खोल रुतलेल्या नकारात्मक भावना उफाळून बाहेर येणे असे अनेक प्रकार असतात (काही जण ओक्साबोक्षी रडतात पण). या अनुभवाना सामोरे जाण्यास प्रत्येकजण पूर्णपणे समर्थ असतोच नाही. हे अनुभव हाताळणे सोपे व्हावे म्हणुन मार्गदर्शकाची गरज असते.

प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ ग्लेन ओ. गॅब्बार्डने सिनेमा बघताना deep buried anxieties उफाळुन येऊ शकतात असे, निरीक्षण नोंदवले आहे.

या अनुभवांची कारणमीमांसा करताना तज्ज्ञ म्हणतात की सुप्त मनावरील जागृत मनाचे नियंत्रण दूर झाले की सुप्त मनातील भावनिक कचरा बाहेर पडायला लागतो. हे जेव्हा तीव्रतेने घडते तेव्हा कदाचित मनोविकारसदृश अवस्था निर्माण होत असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेनेल सर्फिंग करताना एका मराठी सिनेमात एक बाई
चक्क taxi ने घरी येते अन त्याच्यावर नोट भिरकावून कीप द
चेंज म्हणते . मराठी सिनेमात इतकी उधळ पट्टी ?? मी चकित
झाले . त्यातच पुढे एक पात्र म्हणते कि माणूस जितका जास्त
शिकतो तितकी जास्त यंत्रे लागतात त्याला . हे दिव्य ज्ञान प्राप्त
झाल्याने मी सदगदित झाले .अश्या भावनान्च्या उजळणिकरता पिच्च्रर
बघणे आवश्यक असते .
इंद्रियसुख हे अंतिम लक्ष्य नसून ती एक स्थिती आहे याची जाणीव जागृत राहण्याचे कार्य पिच्चर पाहाताना होते, इतकेच म्हणू शकेन>
BiggrinSmile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी खरच सिरीअसली वाचायला सुरुवात केली होती, पहिल्या २ परिच्छेदात कोण काय रीसर्च करेल, नेम नाही वगैरे वि४ डोक्यात आले...
असो झकास जमलंय!!!

आता आमचा पण एक प्रयत्न ..
पिच्चर ही कुणाच्याही गळी उतरवण्यास सुलभ गोष्ट आहे हे प्रथम मान्य करायला हवे,जगभरातील बहुतेक धर्मांनी सिनेपटांचा पुरस्कार केला आहे. धार्मिक मान्यतेमुळे हा एक चांगला संस्कार आहे असे वाटत आले आहे. अगदी 1-2 मिनिटाच्या शोर्ट फिल्म ते दिवसातील 16-18 तास वेळेची अपेक्षा करणाऱ्या दिर्घांकीका असे विविध दृक-श्राव्य प्रकार अस्तित्वात आहेत . परंतु अलिकडे सिनेमांना बाजारी स्वरूप आल्यामुळे काही तरी भव्य दिव्य यातून निर्माण होते असे सुशिक्षिताना वाटत आहे. परंतु सिनेधारणेमुळे खरोखरच काही ठाशीव फरक जाणवतो का? हा प्रश्न आता विचारावासा वाटतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी या प्रश्नाला अजून काही पदर आहेत, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सिनेमांच्या उपयुक्ततेबद्दलच्या विधानामध्ये काही तथ्य आहे का? याची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी करावी लागेल. तसेच सायन्स फिक्शनमध्ये वैज्ञानिक असे काही असू शकेल का? हाही प्रश्न विचारता येईल. वैद्यकीयदृष्ट्या त्याचे काही दुष्परिणाम होत असल्यास त्याची माहिती करून घ्यावी लागेल.

जसजशी कुशलता वाढत जाते तसतसे आपल्याला 'अनुभव' येऊ लागतात. अतीव आनंद, देहाच्या हलकेपणाचा अनुभव, हवेत तरंगल्यासारखे वाटणे, आहे त्या परिस्थितीला जुळवून घेण्याची मानसिकता, त्रयस्थपणे जगाच्या घडामोडीकडे बघण्याची वृत्ती वगैरे प्रकारचे अनुभव विकसित होऊ लागतात, असे सलमानच्या खानच्या पुरस्कर्त्यांचे म्हणणे आहे. या अनुभवांचे वर्णन (म्हणजे नेमके काय कुणास ठाऊक!) शब्दात पकडता येत नाही असे त्यांचे म्हणणे असते. हे सर्व जण मर्त्य जगातील न्यूटन, आणि डायनामीक्सचे नियम धाब्यावर बसवून सिनेमे बनवतात.
रजनीकांत समर्थकांच्यामते हाही एक नैसर्गिक वाढीचाच प्रकार असून त्याबद्दल जास्त न बोलण्याची गरज नाही. बाजारीकरणामुळे अशा अनुभवांना प्रसिद्धी मिळत राहते. त्याची जाहिरात केली जाते... दुसरीकडे चेनांच्या जॅकी करत असलेल्या पद्धतीसारख्या प्रकारात सिनेमा म्हणजे केवळ स्वस्थ न बसणे एवढ्या पुरतेच मर्यादित अर्थाने बघितले जाते...

उद्देश साफल्यासाठी निश्चित असा एकच मार्ग असावा लागतो. उदाहरणार्थ, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी हजारो मार्ग असू शकतील. परंतु सर्वात कमी अंतराचा मार्ग एकच असतो. कुठल्याही मार्गाने जा कुठलेही ठिकाण येईल त्याच ठिकाणी तुला जायचे होते असे कुणी म्हणू लागल्यास त्यात नक्कीच तार्किक विसंगती आहे असे म्हणता येईल
विनोद, अ‍ॅक्शन, प्रेम, ड्रामा इत्यादी वेगवेगळ्या मार्गातून हायपरटेन्शन, दमाविकार, दाढदुखी, व्यसनाधीनता, निद्रानाश, मधुमेह, इत्यादी विकारावर काही फरक पडत नाही हेच दिसून येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख, प्रतिसाद आवडले Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त.

"सुटा कागद हवेत दिशा घेऊ शकत नाही, पण त्याचे उभार करून ते विविक्षित व्यक्तीकडे प्रक्षेपित करता येतात. तसे काहीसे लंपट मनाचे आहे."

"कानशिलं तापायला जर स्थूल कृष्णवर्णी दाक्षिणात्य ललनाच लागत असेल, तर निर्वस्त्र झाली तरी कत्रिना किती परिणाम करील? "

अशी वाक्यं वाचून पिच्चर पहाण्याची आणि फुल्टू टाइमपासनेची महती कळली. पण फुल्टू टाइमपाससाठी पिच्चर पहाण्याचीच गरज आहे असं नाही, हा लेख वाचून तो भरपूर मिळालाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निव्वळ टैमपास असणार्‍या गोष्टींचे अ‍ॅज़ बोरिंग अ‍ॅज़ इट गेट्स असे स्पष्टीकरण/विवेचन आवडले.

तिकीटासाठी झगडा भारी| अवतरला खिडकीवरी||
प्रेक्षकहा अति निर्धारी| पाहणारच मी पा||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा: हा:.. जमलंय खरं विडंबन..!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाची मांडणी शाळकरी वाटली. सैद्धांतिक मांडणी केल्याशिवाय या लेखाल फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!