'जोयानाचे रंग' आणि बालसाहित्य

कविता महाजन यांचे 'जोयानाचे रंग' हे पुस्तक माझे आणि माझ्या पुतणीचे (आता वय ५ वर्षे) अतिशय आवडते पुस्तक आहे. तिला कैक वेळा वाचून दाखविताना जोयाना आणि तिच्यातले साम्य पाहून तिच्यासकट आम्ही आचंबित होतो. जोयाना हे नांव तर खासच. पुतणीचे नांवही 'ख्रिश्चन' वाटणारे असल्याने दोघींतले साम्य अगदी नांवापासूनच आहे :). या पुस्तकाबद्दल तुमचे खूप खूप आभार.
तुम्हांला असे कधी सांगता येईल असे वाटले नव्हते. या प्रतिक्रियेच्या निमित्तने ते साधले, त्याबद्दल तुम्हांला 'ऐसी..'वर आमंत्रित करणार्‍यांनाही धन्यवाद.

===
संपादक: या प्रतिसादाच्या निमित्ताने बालसाहित्यावर रोचक उपचर्चा सुरू झाली होती. रुची यांच्या सुयोग्य सुचवणीनुसार बालसाहित्यावर अधिक विस्ताराने चर्चा करण्यासाठी वेगळा धागा सुरू करत आहोत. सदस्य या धाग्याचा लाभ घेऊन बालसाहित्यावर अधिक सम्यक चर्चा इथे करतील अशी खात्री वाटते.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

धन्यवाद.
मुलांचे खूप छान प्रतिसाद आले आहेत या पुस्तकावर.
खासकरून बहुतेकांना जोयानासारखं सूर्याआधी जागं होण्याची घाई होते आणि मांजरी तर आवडतातच.
मुलं 'कठोर परीक्षण'ही झकास स्पष्टपणे करतात. ( अगदी आईबापांचे चेहरे ओशाळे होतात त्यांच्या. Smile )
जोयानातले 'दोष' सांगताना एका मुलीने सांगितलं की, "पोहण्याची गोष्ट अर्धीच लिहिली आहे, ती पूर्ण कर. बाबा पोहायला शिकवायचं ठरवतो हे ठीक आहे; पण ती शिकते की नाही हे सांगितलं पाहिजे ना!"
आणि दुसर्‍या एकीने सांगितलेला दोष असा : "ती बाबाला अरेतुरे म्हणते हे संस्कृती-विघातक आहे. पुस्तकात असं लिहिल्याने चुकीचे संस्कार होतील." (इयत्ता सातवीचे ताशेरे )

अवांतर : पण अशी अजून पुस्तकं प्रकाशित करण्याची प्रकाशकांची तयारी नाहीये. कारण चित्रकारांमुळे बजेट वाढतं. आणि मुलांसाठीची पुस्तकं चित्रांशिवाय छापण्यात काही अर्थच नसतो. त्यामुळे लिहिलेल्या बाकी गोष्टी अर्धवट पडून आहेत. Sad

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

मराठीत लहान मुलांची चांगली पुस्तके फार येत नाहीत अशी खंत होती मात्र त्याच्यामागे असं व्यावसायिक कारण असेल असं माहीत नव्हतं, वाईट वाटलं. तुमची इतर पुस्तकेही चित्रांसह लवकर प्रकाशित व्हावी अशी शुभेच्छा. 'जोयानाचे रंग'बद्दल या धाग्यातूनच कळलं, आता मिळवायलाच हवं.

+१ असेच खंतावतो! Sad

बाकी मूळ लेखन -चिंतन- आवडले.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> मराठीत लहान मुलांची चांगली पुस्तके फार येत नाहीत अशी खंत होती <<

गेल्या काही वर्षांत मुलांसाठीच्या मराठी पुस्तकांची परिस्थिती सुधारते आहे. पुस्तकं पूर्वीहून अधिक देखणी आणि वैविध्यपूर्ण झाली आहेत. उदाहरणार्थ, ज्योत्स्ना प्रकाशन आणि प्रथम ह्यांचे कॅटलॉग पाहा. 'ज्योत्स्ना'नं काही वर्षांपूर्वी काही इराणी आणि इतर परदेशी पुस्तकांचेही अनुवाद प्रकाशित केले होते. दोन्ही प्रकाशनं इतर भारतीय भाषांमधलं चांगलं साहित्यसुद्धा अनुवादित करून मराठीत आणत असतात.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रथम आणि नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांची पुस्तकं सुरेख आहेत. असे अजूनही काही ट्रस्ट आहेत मुलांची पुस्तकं प्रकाशित करणारे. तथापि खासगी प्रकाशन कंपन्या ज्या तर्‍हेने मार्केटिंग करतात, तसे या लोकांचे होत नाही. म्हणून पुस्तकं चांगली असून पोहोचत नाहीत. साहित्य अकादेमीचेही असेच आहे. ज्योत्स्ना, उर्जा ही दोन प्रकाशनं सध्या मराठीतली मुलांसाठीची पुस्तकं प्रकाशित करणारी चांगली प्रकाशनं आहेत. उर्जाचं वितरण चांगलं नाही, ते त्यासाठी काहीसे ज्योत्स्नाच्या पाठबळावर अवलंबून आहेत आणि पुस्तकांमध्येही काही त्रुटी जाणवतात. ज्योत्स्नाने बर्‍याच काळात मुलांसाठीची स्वतंत्र पुस्तकं ( मूळ मराठी ) प्रकाशित केलेली नाहीत. अपवाद माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकांचा. ( आणि माधुरी पुरंदरे स्वतःच्या पुस्तकांची चित्रंही काढून देतात.) ते आता प्रामुख्याने अनुवादित पुस्तकांकडे वळले आहेत.
अनुवादित पुस्तकं आली पाहिजेत, त्यामुळे भाषा समृद्ध होते, यात काहीच वाद नाही; पण ती आहेत म्हणून आपल्या भाषेतल्या पुस्तकांची गरज नाही असे होणे योग्य नाही. इथले चित्रकार, लेखक इथल्या मातीतलं देतील, ते मुलांना आपलं वाटणारं असेल. चंद्रमोहन या चित्रकार मित्राकडे मुलांच्या पुस्तकांसाठीच्या असंख्य कल्पना आहेत; पण त्या राबवणार कोण? अनुवादासाठी पुस्तकांचे हक्क चित्रांसह मिळवले की काम सोपे होते. कमी शब्दांची पुस्तकं... अनुवाद चोख व शांतपणे केला तरी तासाभरात आटोपतो... आणि संपादन, चित्रं, आकार, कागद कशाचाही 'विचार' करत बसण्याची गरज नाही. इतकं आयतं मिळत असेल तर आपल्या भाषेतली पुस्तकं काढण्यासाठीची डोकेफोड कोण करेल? इतर काही प्रकाशकही अधूममधून तुरळक कामं करतात. उदा. मनोविकास प्रकाशनने इंद्रजित भालेराव यांच्या बालकवितांचा संग्रह पूर्ण रंगीत छापला आहे. चित्रं चंद्रमोहनची. ( काही नमुने चंद्रमोहनच्या फेसबुकपेजवर पाहण्यास मिळतील.)
ही अवस्था हिंदीचीही झाली आहे. अन्य भाषांमध्ये मी अजून चौकशी केली नाही.

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

>> अनुवादित पुस्तकं आली पाहिजेत, त्यामुळे भाषा समृद्ध होते, यात काहीच वाद नाही <<

लहान मुलांच्या पुस्तकांच्या बाबतीत सांगायचं झालं, तर त्यातल्या चित्रांसाठी अनुवादित पुस्तकं मराठीत आणखी यायला हवीत असं वाटतं. रेखाटनं, चित्रं ह्याचं जे वैविध्य अमराठी पुस्तकांमध्ये दिसतं ते उल्लेखनीय आहे. ह्यात फ्रान्स, जर्मनी, इटलीसारख्या प्रगत देशांतली पुस्तकं तर येतातच, पण इराणसारख्या देशातलीसुद्धा येतात. म्हणून मला 'ज्योत्स्ना'ची इराणी पुस्तकांची मालिका आवडली होती.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ज्योत्स्नाने प्रकाशित केलेल्या अनुवादित पुस्तकांपैकी 'माऊला हवा मित्र' हे माझं सगळ्यांत लाडकं पुस्तक आहे.
मजकूर आणि चित्रं दोन्हीही मस्तच!
चिमण्यांसोबत खेळू इच्छित असलेली, उडणारी मांजर आणि जे घडलंय ते स्वप्न की सत्य याचा त्या मांजरीच्या मनातला गोंधळ निव्वळ अफलातून.

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

ज्यांना ह्या पुस्तकाविषयी कुतुहल असेल त्यांना पुस्तकातली काही चित्रं आणि पुस्तकाविषयी माहिती इथे मिळेल. हेदेखील मूळ इराणी पुस्तक आहे.

'पालकनीती'मध्ये आलेला 'बालचित्रांची श्रीमंत भाषा' हा लेख ह्या निमित्तानं आठवला.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'फुलबाजी' यांनी काढलेल्या 'नो, डेव्हीड !' धाग्यात किंचित चर्चा आहे म्हणून इथे आठवण करून देत आहे.
तेथील प्रतिसादात उल्लेखलेले 'हरवलेल्या खेळण्यांचे राज्य' (१९७०, मौज प्रकाशन, चित्रे : पद्मा सहस्रबुद्धे) हे सई परांजपे यांनी लिहिलेले पुस्तक वाचकांनी आवर्जून मिळविण्याचा प्रयत्न करावा असे सुचवेन. माझ्याकडे जी दुसरी आवृत्ती आहे ती १९९२ सालची. त्यानंतर नवी आवृत्ती निघाली की नाही, कल्पना नाही.
तूर्तास एवढीच सुचवणी. वेळ मिळेल तसे मुख्य चर्चेत भर घालेन.

बालसाहित्याशी निगडीत किमान एका मुद्यावर चर्चा सुरू राहवी म्हणून आणि बालसाहित्य लिहिण्याचा आणि प्रकाशनातील अडथळ्यांचा अनुभव असल्याने कविता महाजन यांना एक विनंती आहे.
मला व्यक्तिशः अश्या प्रकारच्या पुस्तकांची निर्मितीप्रक्रिया जाणून घ्यायची आहे. म्हणजे समजा, माझ्याकडे एक १० पानी मराठी हस्तलिखित आहे. त्याचे मला १८-२० पानी नियतकालिकाच्या आकाराचे चित्रांसहित पुस्तक काढायचे आहे. माझ्याकडे चित्रकारही आहे, जो/जी माझ्या कल्पनेप्रमाणे चित्रे काढून देईल. थोडक्यात सगळा आराखडा माझ्याकडे कागदावर तयार आहे तर ते पुस्तक प्रकाशकाकडे नेण्यापासून पुढे कसे कसे टप्पे असतात ? त्यातल्या कुठल्या टप्प्यावर बहुतकरून सगळे बिनसू शकते ? मी स्वतःसाठी शून्य आर्थिक लाभ आणि शून्य आर्थिक नुकसान अपेक्षेत ठेवले तर प्रकाशकाला पुस्तक छापायला काय अडचणी येऊ शकतात ? निव्वळ वितरणाच्या दृष्टीने प्रकाशक मूळाच्या आराखड्यात बदल सुचवितात का ? अश्या प्रकारचे प्रश्न मनात आहेत. त्यांना उद्देशून तुम्ही काही माहिती / अनुभव देऊ शकलात तर एकूण बालसाहित्य बाजारात आणताना येणार्‍या अडचणींचा ढोबळ अंदाज बांधता येईल. तुम्ही तुमच्या एका प्रतिसादात याविषयी थोडे लिहिलेच आहेत; तरी अधिक नीट समजून घेता यावे यासाठी ही विनंती.

इतरही सदस्य ज्यांना प्रकाशनातील/वितरणातील अडचणींचा अनुभव आहे, अश्यांनी येथे लिहावे ही विनंती.

पुस्तक लिहून झाले आणि चित्रकार उपलब्ध असला म्हणजे नक्कीच पुरेसे नसते.
पुस्तकाचा 'विचार' संपादक आणि प्रकाशक करतात. लहान मुलांच्या पुस्तकांबाबत हा विचार इतर पुस्तकांहून निराळा असतो.
पुस्तकाचा आकार, कागद, फॉन्ट, रंगीत छपाई असे तांत्रिक मुद्दे असतातच. पण त्याआधी आशय, विषय, मुलांसाठीची भाषा, कोणते शब्द वापरावेत ( वा वापरू नयेत ) याबाबतचे संकेत व नियम, चित्रशैली इत्यादी मुद्दे विचारात घेतले जातात. हिंदीत वर्ज्य शब्दांची यादीही आहे, तशी अजून मराठीत झालेली नाही.
मराठीत मुलांचा वयोगट विचारात घेऊन त्यानुसार पुस्तकं प्रकाशित केली जात नाहीत. २ ते १५ सगळं बालसाहित्यच!
प्रकाशकाला मजकूर, चित्रं आणि छपाईचे पैसेही देणारे महाभाग आपल्याकडे आहेत; ज्यांनी या व्यवसायाचं वाट्टोळं करण्यात महत्त्वाचा सहभाग नोंदवला आहे. ही लेखकांची हौस अनेक जागी नडते. लेखकांना चित्रांमधलं कळतंच असं नाही; त्यामुळे 'ओळखी'चे चित्रकार पकडून आणून भयाण चित्रं काढलेली दिसतात. त्यामागे काही विचार असतो याची जाणीवच नसते.
आपण फायदा घेतला नाही म्हणजे झाले, असा युक्तिवाद चुकीचा आहे. त्यामुळे पूर्णवेळ लेखक करणार्‍यांचे अशा हौशी लोकांपायी नुकसान होते. अशी पुस्तकं ७०-८० % कमिशन देऊन प्रकाशक लायब्रर्‍यांमध्ये विकून टाकतात. एका आवृत्तीच्या अनुभवानंतर लेखकाचाही उत्साह मावळलेला असतो. वाचनालयांना दर्जा ( अ ब क असे दर्जे असतात; ज्यानुसार शासकीय अनुदान मिळते.) मिळवण्यासाठी पुस्तकसंख्या वाढवायची असते; ते अशी भरताड पुस्तकं एकगठ्ठा कमी पैशांनी विकत घेतात. अनेक वाचनालयांमध्ये त्यामुळे नवी, चांगली पुस्तकं मिळत नाहीत. ब / क दर्जाचीच पुस्तकं तिथं असतात. त्यामुळे ना नफा ना तोटा ही वृत्ती केवळ लेखकांचेच नव्हे, तर वाचकांचेही नुकसान करणारी ठरते अंतिमतः.

तिसरा मुद्दा आराखड्यात बदलाचा. तो संपादक सुचवतात. त्यात आधी आशय-विषय लक्षात घेतला जातो. त्या पद्धतीची पुस्तकं बाजारात आहेत का? असतील तर तसेच अजून एखादे पुस्तक आणायचे का? नसेल तर यात वेगळे व चांगले काय आहे, जे विक्रिसाठी पुरक ठरेल? असे अनेक मुद्दे विचारात घेतले जातात.
अनेक शासकीय ( राज्य व केंद्र ) योजना आहेत; त्यांत कोणत्या व कशा पुस्तकांची वर्णी लागते हे पाहूनही गणितं ठरतात.
प्रकाशन व्यवसाय आपल्याकडे अजून व्यावसायिक पद्धतीने केला जात नसल्याने अशा अडचणी आहेत. असो.

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

एक पर्याय उपलब्ध असू शकतो...
चांगले प्रकल्प प्रायोजित करणे!
जसे माधुरी पुरंदरे यांचाच 'लिहावे नेटके' या प्रकल्पासाठी टाटांच्या एका ट्रस्टने अर्थसहाय्य केले आहे.
किंवा कालच चंद्रमोहनने सांगितले की 'भाषा' नावाचा एक ट्रस्ट नव्याने स्थापन करण्यात आला आहे; त्या ट्रस्टच्या वतीने विविध उपक्रम होतात, त्यापैकी एक मुलांसाठीच्या पुस्तकांचा आहे. पहिली तीन पुस्तकं त्यांनी केलीत आणि वितरण ज्योत्स्ना प्रकाशनाकडे दिले आहे.
राजहंस प्रकाशनानेही काही कोश अशा प्रकारे काही संस्थांच्या सहकार्याने केले आहेत. ( उदा. वाक्यकोश).

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकांचा बालसाहित्यासंदर्भात वेळोवेळी सुयोचित उल्लेख केला जातो, त्यासंदर्भात माझाही अनुभव सांगावासा वाटतोय. भारताबाहेर वाढलेल्या मुलांना मराठी पुस्तकांत रस तयार करणे पालकांसाठी बरेच कठीण असते असे मला स्वानुभावाने वाटते. त्यातले विश्व या मुलांसाठी फार वेगळे असते आणि त्यांना कल्पना, प्रतिमा वगैरे समजायला त्यांना फार कठीण जातात याला माधुरी पुरंदरेंच्या 'यश' आणि 'राधा' यांच्या पुस्तकांचा मात्र अतिशय सुखद अपवाद आहे. आपल्याच वयाच्या भारतीय मुलांचे भावविश्व कसे आहे, त्यांचे नातेसंबंध कसे असतात याबद्द्ल माझ्या मुलीला वाटणारे कुतुहल या पुस्तकांच्या रुपाने पूर्ण झालेय. या पुस्तकातला यश, त्याचे आई-बाबा-बहीण-काका-आजी-आजोबा-शिक्षिका-मित्रमंडळी, त्यांची भारतीय नावे, त्याची शाळा वगैरे गोष्टी तिच्यासाठी फार मनोरंजक आहेत, बरेच वेगळेपण असूनही त्या व्यक्तीरेखांतली आणि तिच्यातली साम्यस्थळे शोधायलाही तिला फार आवडते आणि या पुस्तकांच्या निमित्ताने काही खास मराठी शब्द, संकल्पना तिच्या डोक्यात पक्क्या झाल्यात. 'यशसारखे' किंवा 'राधासारखे' असे उल्लेख आता आमच्या संभाषणात वारंवार येतात आणि तिच्यासाठी ते तिच्या भारतीय नातेवाईकांसारखेच झाले आहेत. मराठी मुलांसाठी ही पुस्तके उत्कृष्ट आहेतच पण अनिवासी मराठी कुटुंबातील मुलांसाठीही ती पुस्तके तेवढीच रंजक आहेत हे फार वैशिष्यपूर्ण आहे.

मुळात एकाच देशात इतके स्तर आहेत की 'आपला वाचक कोण?' हे ठरवणे फारच अवघड होऊन बसते.
जून-जुलैमध्ये मी २२-२५ दिवस उत्तराखंडमध्ये होते. तिथल्या काही स्वयंसेवी संस्थांना मुलांसाठी काही पुस्तकं लिहून घेता येतील का याचा विचार करायचा होता; त्यातल्या काही बैठकांना मी हजर होते.
कुमारवयीन मुलांना 'आयडॉल' म्हणून कोणती नावं सांगावीत, याची चर्चा सुरू होती. जी पुस्तकं उपलब्ध होती त्यातली झाशीची राणी, इंदिरा गांधी आणि किरण बेदी ही तीन नावं मुलांमध्ये लोकप्रिय होती; तरीही ती 'आपली' वाटत नव्हती. 'गावपातळीवरचे आयडॉल्स' अशी एक कल्पना मी तिथं मांडली. अगदी लहान-लहान गोष्टींसाठी त्यातून प्रेरणा मिळू शकतील आणि ही आपल्यातलीच माणसं, समकालिन लोकं हे करू शकतात तर आपणही करू शकू असा विश्वास खेड्यातील मुलामुलींना वाटू शकेल, असा त्यामागे विचार आहे. हा एक आर्थिक स्तर झाला.
आदिवासी मुलांना काय द्यायचं? ग्रामीण व शहरी व महानगरी भागातील मुलांना काय? परदेशातील मराठी वा भारतीय मुलांना काय? वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील मुलांना एकच पुस्तक 'आपलं' असं कसं वाटेल?... असे अनेक प्रश्न त्यातून माझ्या मनात निर्माण झाले.
अशी अनेक प्रकारची पुस्तकं, वेगवेगळे वाचक डोळ्यांपुढे ठेवून लिहिली जावीत हेच एक त्यावरचं उत्तर आहे.
आणि त्यातल्या अडचणी तर मांडून झालेल्या आहेतच.

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

>> मराठी मुलांसाठी ही पुस्तके उत्कृष्ट आहेतच पण अनिवासी मराठी कुटुंबातील मुलांसाठीही ती पुस्तके तेवढीच रंजक आहेत हे फार वैशिष्यपूर्ण आहे. <<

तुमचा अनुभव रोचक आहे. असे अनुभव इतरांकडूनही ऐकले आहेत. उर्जा प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या माधुरी पुरंदऱ्यांच्या कुमारवयीन पुस्तकांबाबतदेखील पालक मित्रमैत्रिणींकडून काहीसा असा अनुभव आला होता. 'सिल्व्हर स्टार' ही कादंबरी जहाजावरच्या वातावरणामुळे वेगळी वाटली, अन् तरीही भारताबाहेर राहिलेल्या मुलाचा स्वतःचा मुळांसाठीचा शोध हा त्यामागचा धागा एका पालकाला रोचक वाटला होता. 'त्या एका दिवशी'मध्ये वर वर पाहता साहसकथा होती, तरीही कथानायकाच्या आई-वडिलांच्यातल्या वैवाहिक बेबनावाची पार्श्वभूमी त्याला होती. तर त्याच पुस्तकातल्या दुसऱ्या गोष्टीत शाळेतल्या गृहपाठाच्या निमित्तानं एक मुलगी मृत्यू ह्या संकल्पनेला कशी सामोरी जाते ह्याचं चित्रण होतं. लिखाण फार गंभीर न करता समकालीन वास्तवाची त्याला डूब देणं हे रोचक वाटलं होतं. एका मैत्रिणीची ह्यावरची प्रतिक्रिया बोलकी होती. मृत्यू आणि विवाह ह्याविषयी तिच्या मुलीकडून नेहमी येणाऱ्या प्रश्नांमुळे काहीशी वैतागलेली मैत्रीण आपल्या मुलीला पुस्तकातून आपसूक आणि फार बाऊ न करता ह्याबद्दल काही तरी वाचायला मिळतंय म्हणून खूश झाली होती.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारताबाहेर वाढलेल्या मुलांना मराठी पुस्तकांत रस तयार करणे पालकांसाठी बरेच कठीण असते असे मला स्वानुभावाने वाटते.

मुलांना आणि मुलींना वाचनाची गोडी लागावी, हा मुद्दा एकदम मान्य. पण ही मुले जर भारताबाहेर/(भारतातच पण दुसर्‍या राज्यात) वाढली आणि तिथेच राहाणार असतील, तर त्यांनी मराठी पुस्तके का वाचावीत? केवळ पालकांची आवड किंवा त्यांचा आग्रह म्हणून? मराठीत वाचन हा तर फार दूरचा पल्ला झाला, त्यांनी मराठीतून संभाषण करावे, इतपत अपेक्षासुद्धा कठीण असते, असे स्वानुभावाने पटले आहे.

For posterity's sake !

पण ही मुले जर भारताबाहेर/(भारतातच पण दुसर्‍या राज्यात) वाढली आणि तिथेच राहाणार असतील, तर त्यांनी मराठी पुस्तके का वाचावीत? केवळ पालकांची आवड किंवा त्यांचा आग्रह म्हणून? मराठीत वाचन हा तर फार दूरचा पल्ला झाला, त्यांनी मराठीतून संभाषण करावे, इतपत अपेक्षासुद्धा कठीण असते, असे स्वानुभावाने पटले आहे.

भारातातच वाढलेली आणि कायम रहाणारेही परदेशी भाषा, कधी सोय म्हणून, कधी संधी म्हणून तर कधी हौस म्हणून शिकतातच की! आपल्या पाल्याला काय द्यायचे याचा निर्णय प्रत्येक पालकाला स्वतःपुरता घ्यावा लागतो. माझ्यापुरते बोलायचे झाले तर पाल्याकडून मराठी वाचनाची अपेक्षा मुळीच नाही पण स्वतःच्या पालकांच्या मूळभूमीशी नाते असणे भविष्यात तिला महत्वाचे वाटणे सहाजिक आहे म्हणून पुस्तकांच्या रुपाने ते तिच्यासाठी सहज तयार करते आहे. गोष्टी ऐकायला मुलांना खूप आवडतातच आणि या गोष्टी जर त्यांच्या नेहमीच्या जगापासून वेगळ्या असल्या तर त्या गोष्टींतून होणारी संस्कृतींची ओळख अधिक सहज, अधिक स्वाभाविक होते. मराठी गोष्टी वाचताना त्यात तिच्या माहितीच्या झाडांपेक्षा वेगळ्या वडा-पिंपळाच्या झाडांचे उल्लेख येतात, वेगळ्या फळांचे उल्लेख येतात, निराळी मजेशीर नावे समजतात, रिक्षासारख्या निराळ्या वहानांचे उल्लेख येतात, आते-मामे-चुलत नात्यांची वर्णने येतात, लिंगभेदाचे, जातींचे राजकारण याचे अप्रत्यक्ष सूचक उल्लेख येतात, त्यातून प्रश्न विचारले जातात, चर्चा होते आणि हे सगळं उभयपक्षी मनोरंजक, उपयुक्त आणि आनंददायी असतं. तिला मराठी बोलता यावं असं वाटतं कारण भाषा हे एक उपयुक्त साधन आहे शिवाय त्यामुळे आजी-आजोबांशी संवाद सुकर व्हावा हा एक स्वार्थही आहे पण हे मारूनमुटकून करणे मान्य नाही. ज्या उत्साहाने मुले शाळेत नवीन भाषा शिकतात, तसे ठेऊन त्यांच्या कलाने घ्यावे असे वाटते. तिची प्रथमभाषा ही नेहमीच इंग्रजीच असणार आहे आणि तेच नैसर्गिकच आहे आणि ओळखही 'भारतीय' अशी कधीच असणार नाही याची पूर्ण जाणीव आहे पण माणसाची ओळख ही एक बहुआयामी कल्पना आहे आणि आई-वडिलांची भाषा आणि त्यांची पार्श्वभूमी हा त्याचा एक भाग आहे.
ही चर्चा मूळ धाग्याशी अवांतर आहे म्हणून क्षमस्व.

मार्मिक श्रेणी देऊन भागण्यातलं नव्हतं, म्हणून फक्त हे बूच.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मार्मिक

क्या बात है. उद्या महाराष्ट्रातल्यांनीही मराठी पुस्तके का वाचावीत हा प्रश्न विचारायला कमी करणार नाही तुम्ही. ज्याला वाचायचंय तो मंगळावर गेला तरी वाचेल, अन ज्याला नै वाचायचं तो महाराष्ट्रात राहूनही वाचणार नाही. त्यामुळे असा प्रश्न विचारण्याला वट्ट अर्थ नाही.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गणपती टू गणपती भेटणार्‍या एका भाच्याला (वय ६ वर्षे) भेट म्हणून कालच माधुरी पुरंदरेंची तीन पुस्तके आणली. "लालू बोक्याच्या गोष्टी", "किकीनाक" आणि "चित्रवाचन". तीनही पुस्तके तुफान आहेत! त्यातही लालु बोक्याच्या नावाच्या ज्ञ्माची गोष्ट लै म्हंजे लैच भारी आहे (ज्या जुळ्या बहिणी या बोक्याला पाळतात ती त्याचे नाव 'गृहपाठ', 'कचटतपय' आनि "कंप्युटर" असे सुचवतात, त्यामागची त्यांची कारणे इतकी भारी आहेत. माझा भाचा असेच 'अच्रत' काहितरी बोलत असतो याची आठवण झाली आणि हे पुस्तक त्याला आवडेल याची खात्री वाटतेय)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण धागा कसा वाचायचा राहून गेला माहित नाही! याचा दुवा दिल्याबद्दल अमुक चे आभार.

@रुची:

भारताबाहेर वाढलेल्या मुलांना मराठी पुस्तकांत रस तयार करणे पालकांसाठी बरेच कठीण असते असे मला स्वानुभावाने वाटते. त्यातले विश्व या मुलांसाठी फार वेगळे असते आणि त्यांना कल्पना, प्रतिमा वगैरे समजायला त्यांना फार कठीण जातात याला माधुरी पुरंदरेंच्या 'यश' आणि 'राधा' यांच्या पुस्तकांचा मात्र अतिशय सुखद अपवाद आहे. आपल्याच वयाच्या भारतीय मुलांचे भावविश्व कसे आहे, त्यांचे नातेसंबंध कसे असतात याबद्द्ल माझ्या मुलीला वाटणारे कुतुहल या पुस्तकांच्या रुपाने पूर्ण झालेय.

आमची समस्या थोडी वेगळी आहे. भारताबाहेर मोठ्या प्रमाणावर मित्रमंडळी असल्यामुळे आम्हाला चिक्कार पुस्तकं अमेरिकन संदर्भाची इंग्रजीत मिळाली. गुडनाइट मून, हंग्री कॅटरपिलर, हॅरोल्ड अँड द पर्पल क्रेयॉन, फैव लिटिल मंकीज, एबीसी आणि गाड्या आणि कुत्री-मांजरींची चिक्कार पुस्तकं, पण राधा आणि यश च्या पुस्तकांतलं जग कसं आपलं वाटतं, तसं या अमेरिकन पुस्तकांतलं वाटलं नाही. "काकूचं बाळ" पुस्तक धाकट्या मुलाचा जन्मा झाल्यावर मोठ्याला वाचून दाखवताना खूप जाणवलं - धुपटी, बाळंतिणीच्या डोक्याभवती स्कार्फ, बाळाची लंगोट, सगळंच अगदी परिचित होतं. अशी "आपल्याच" आजच्या भावविश्वातली पुस्तकं, इथल्याच मुलांसाठी खूप कमी आहेत. शेवटी किती नाही म्हटलं तरी मराठीतली ही पुस्तकं तुमच्या संदर्भात सप्लिमेंट सारखी आहेत, कारण तेथील दैनंदिन जगातली इंग्रजी पुस्तकं भरपूर आहेत. दुर्दैवाने इथे देखील मराठी पुस्तकं इंग्रजीच्या सावलीत सप्लिमेंट असल्यासारखीच आहेत. इथल्या मुलांना समोर ठेवून लिहीलेली अधिक पुस्तकं मराठीत पाहिजेत. मग अमेरिकन पुस्तकं सप्लिमेंट म्हणून हरकत नाही - नाहीतरी वाचताना प्रश्नोत्तराद्वारे कल्चरल ट्रान्स्लेशन चालूच असतं: हे रात्री का अंघोळ करतायत? गाडीत ती तसल्या खुर्चीत का बसलीये? तो खोलीत एकटा का झोपला? वगैरे वगैरे!

आजकाल हा दृष्य परिचितपणा प्रथम मधल्या अनेक पुस्तकांमधे दिसतो - त्यातील आया फॅबिंडियाछाप कुर्ते आणि ऑक्सिडाइज्ड दागिने घालतात, त्वचेचा रंग नॉर्मल, काळसर असतो, बेडशिटांवर कोयर्‍या असतात, वगैरे. पण पुरंदर्‍यांच्या पुस्तकांमधे भाषा पण जशी अस्सल वाटले (इथे प्रमाण भाषा अभिप्रेत *नाही*), तशी प्रथमच्या पुस्तकांतली भाषा परिचित आणि ओघवती वाटत नाही. काही पुस्तकं मनोमन मूळ इंग्रजीचा किंवा हिंदीचा अंदाज लावून वाचली की कळतं की अनुवादात भाषेकडे फारसे लक्ष दिलेले नाही.

"उत्कर्षा मनिष" यांनी प्रथमची अनेक पुस्तकं मराठीत आणली आहेत. "हे माझे घर" हे एक उदाहरण घेऊया. चित्रं छान आहेत - ग्रामीण अथवा निमशहरी भागातलं घर: चटया, मोरीतले हंडे... हे माझे घर. मी माझ्या कुटुंबासहित इथे राहते. (पुढे तिचा नकळत "तो" होतो ).... "जेव्हा आमच्याकडे खास पाहुणे येतात तेव्हा आम्ही खुर्च्या बाहेर काढतो". यात नेमकं काय खटकतं यावर बोट ठेवता येत नाही, पण वाक्यरचना पण का कोण जाणे सगळी वाक्ये कशी रुक्ष आणि कृत्रिम वाटतात. "मी ही काही करू?" या पुस्तकात सगळ्या प्रश्नांना वाचून दाखवताना "करू का?" असे जोडावेसे वाटते. अशी खूप उदाहरणं आहेत, पण मुद्दा असा की सहज बोली भाषेचा फारसा विचार होताना दिसत नाही. असो. मनोज पब्लिकेशन्स नी सुरेख कागदावर छान छान चित्रांनी सजवलेली जुन्या पंचतंत्राच्या गोष्टींची पुस्तकं काढली आहेत, पण त्यात वाक्यरचना वगैरे लांबचे राहिले, शुद्धलेखनाच्या चुका देखील भरपूर आहेत!

@कविता महाजन :

मुळात एकाच देशात इतके स्तर आहेत की 'आपला वाचक कोण?' हे ठरवणे फारच अवघड होऊन बसते.....
आदिवासी मुलांना काय द्यायचं? ग्रामीण व शहरी व महानगरी भागातील मुलांना काय? परदेशातील मराठी वा भारतीय मुलांना काय? वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील मुलांना एकच पुस्तक 'आपलं' असं कसं वाटेल?... असे अनेक प्रश्न त्यातून माझ्या मनात निर्माण झाले.
अशी अनेक प्रकारची पुस्तकं, वेगवेगळे वाचक डोळ्यांपुढे ठेवून लिहिली जावीत हेच एक त्यावरचं उत्तर आहे.

सहमत. म्हणूनच प्रथमची पुस्तकं खूप नेटकी आणि एकूण प्रकल्प स्तुत्य असला तरी मला त्यांच्या कुकी कटर पद्धतीचा कंटाळा येतोय आजकाल. पण ही झाली प्रथम (पिवळ्या) स्तराच्या पुस्तकांची; पुढे परिस्थिती सुधारली असेल अशी आशा आहे.

प्रकाशनाच्या प्रक्रियेचा तपशील रोचक आहे.
बालसाहित्यातील चित्रांच्या बाबतीत थोडी असहमती नोंदवू इच्छिते. आधीच्या पुस्तकांमधे मूळ मजकूराबरोबर थोडीच चित्र असायची. कारण अगदी लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणात पुस्तकं तयार करण्याचा प्रघात इंग्रजीतही अलिकडचाच, म्हणजे ३-४ दशकांचाच असावा. पण बर्‍याच जुन्या गोष्टींमधे चित्रं नसताना देखील कल्पनाशक्तीला पुष्कळ वाव होता. गोष्टीची गंमत सांगण्यात होती, त्याच्या श्राव्य कंपोनंट वर अधिक भर असायचा. जुन्या गोष्टींना चित्रबद्धच नाही तर लहान मुलांना आवडतील अशा कवितांमधून, वाचून दाखवताना भाषेचा आनंद देता आला तरी त्यांना खूप आवडतं. बंगालीत सत्यजीत रायांचे वडील सुकुमार राय यांच्या सुप्रसिद्ध "आबोल ताबोल" कवितासंग्रहातल्या कविता अशाच आहेत.

आय रे भोला खेयाल खोला शॉपोन दोला नाचिये आय
आय रे पागोल आबोल ताबोल मॉत्तोमादोल बाजिये आय
आय जेखाने खॅपार गाने नायिको माने नायिको शूर
आय जेखाने उधाव हवाय मोन भेशेजाय कोन शुदूर

(याचा अर्थ नाही कळला तरी भाषेची लय आणि निराळ्या स्वरांची कल्पना येईल)

रायांनी स्वत: पुस्तकातली चित्रं काढली होती, पण ती अगदीच थोडी आहेत. या कवितांमधे अजब प्राणी, करामती, फॅंटसी सर्व काही आहे आणि माझा मुलगा डोळे विस्फारून ऐकतो, नंतर स्वतः कधी त्यांची चित्र काढतो.
थोडक्यातः चित्रांमुळे प्रकाशकाचा खर्च वाढत असेल तर आपल्याकडे "पारंपारिक" साठ्याला देखील अपडेटवायचे अनेक दृष्य-श्राव्य मार्ग असू शकतात असं वाटतं. पण आता मुलांचं पुस्तक म्हणजे चित्र पाहिजेच असा आग्रह धरणारे ग्राहकच आड आले तर मात्र कठीण आहे Smile

१. प्रथम व मनिषा उत्कर्ष यांबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल? (गूगल हे अंतिम उत्तर गृहीत धरले आहे, तरी काही लिंका मिळाल्यास आभारी राहीन.)
२. आबोल-ताबोल प्रमाणेच रवींद्रनाथांच्या 'सहजपाठा'चाही यात समावेश व्हावा असे वाटते.
३. आबोल-ताबोल साठी धन्यवाद. हे आता मिळवून वाचणे आले.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्कर्षा मनिषांबद्दल मला काहीच माहिती नाही. प्रथमबुक्स : http://prathambooks.org/.

धन्यवाद.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गूगलमावशीने उत्कर्षा मनीष यांच्या पुस्तकांबद्दल ही माहिती दिली. मुलांच्या दुनियेतले नवे रंग!

लिंक्डइनवर त्यांचं प्रोफाईलही दिसलं. हौस असल्यास शोधून पहावे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"अन्थोनी द सौन्त एक्झुपरी" या लेखकाने आपल्या आयुष्यात मुलांच्यासाठी केवळ एकच पुस्तक लिहिले : "द लिटल प्रिन्स". हे पुस्तक त्यामधील शाश्वत तत्त्वज्ञान आणि सोप्या भाषेमुळे बाल आणि प्रौढ वाचकांसाठी खूप अपिलिंग आहे. यातील साधी आणि विलक्षण रेखाचित्रे कल्पनेला मूर्त स्वरुप देतात. खरे तर सौन्त एक्झुपरीच्या मते "जे काही आवश्यक असते, ते नजरेच्या पल्याड असते " - पण अद्रुशाला दृश्यमान करण्यासाठी वापरलेली सर्जनशील रेखाट्नशक्ति त्याच्याच या संस्मरणीय वाक्याशी विरोधाभास निर्माण करते आणी मुलासाठी रेखाटने आणि चित्रे कशी व किती असावी यावर सटीक भाष्य करते !

मुले नैसर्गिकत: अंत: करणाच्या द्रुश्तिने पहातात. अनुभवतात. वाल्डोर्फ शिक्षणपद्धतीमध्ये गोष्टीमध्ये चित्रे नसावी आणि गोष्टी सांगितल्या जाव्यात अशी एक फिलोसौफी आहे.
मुलांसाठी चित्रे केवळ चित्रे नसतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मनाच्या कप्प्यात ( डोळ्यात नव्हे ) जपून ठेवलेल्या ह्या भावना, ही इमेजरी कोणत्या स्वरुपातुन पुनः डोकावतिल आणि नेमके काय सांगतिल हे भाकित करने कठिण आहे. पण नक्कीच ते शब्द आणि चित्र या पलीकडले काहीसे असेल.

वॉल्डोर्फ तत्त्वांबद्दल तेवढे माहित नाही, अजून जाणून घ्यायला आवडेल, संदर्भाबद्दल आभार! मला जनरली मुलं कशी असतात, किंवा त्यांना काय, कसं आवडतं, जमतं, याबद्दलची सरसकट, कालातीत विधाने थोडी गोंधळात टाकतात. कारण ठिकठिकाणी, वेगवेगळ्या काळांत अशीच कालातीत विधानं संपूर्ण विरोधी क्षमतांबद्दल केलेली आढळतात. लिखित-मौखिक, स्मरणशक्तीवर आधारित शिक्षणाच्या फिलॉसॉफी बदलतच आल्या आहेत. त्यामुळे मला बालसाहित्य केव्हाही, कुठेही *असेच* असावे असं ठासून सांगायचे नाही. चित्रांचा प्रभाव एक, तर श्राव्य माध्यमाचा निराळा. पती प्रँस चे उदाहरण चांगले आहे, प्रश्नच नाही.

माझा सीमित मुद्दा इतकाच, की आज अमेरिकेत किंवा अन्य कुठे चित्रांवर भर देणार्‍या पुस्तकांवर भर दिला जातो, म्हणून इथे तसे का नाही, असेच व्हायला पाहिजे, इथे आपण कमी पडतोय, हा कित्ता न गिरवता, आपल्या मौखिक, काव्यात्म परंपरेतूनच नव्याने श्राव्य माध्यमाचा सर्जनशील पुनर्वापर करता येईल का, हा प्रश्न इथे रंजक, नवीन बालसाहित्यावर चर्चा करणार्‍यांसाठी किमान रोचक ठरावा (यशस्वी ठरेल की नाही हे अर्थात माहित नाही).

या अंकात आणि अंकाच्या निमित्तानं झालेल्या चर्चांमुळे लहानपणी झालेल्या वाचनाचा थोडा धांडोळा घेतला. या धांडोळ्याला मला उपलब्ध झालेल्या पुस्तकांची मर्यादा आहे, तशीच माझ्या स्मरणशक्तीचीही मर्यादा आहे. थोडंसं धाडस करून असं म्हणता येईल की मराठीमध्ये बालवाङ्मय या लेबलाखाली जे जे उपलब्ध होतं त्यांपैकी सुमारे ८० टक्के गोष्टी माझ्या वाचनात आल्या होत्या. त्यांत भरपूर चित्रं असलेली आणि / किंवा चित्रांना शब्दांइतकंच महत्त्व असलेली किती नि कोणती पुस्तकं होती?

'चंपक', 'ठकठक' आणि 'चांदोबा'मध्ये भरपूर चित्रं आणि रंग असत ('ठकठक'मध्ये रंग नसत. नुसतीच चित्रं.). 'किशोर'मध्ये बरीच चित्रं असत. बाकी कुठल्याच नियतकालिकांमध्ये चित्र नसत. नियतकालिकं म्हणजे वार्षिकंच म्हणायला हवीत. कारण 'आनंद', 'कुमार', 'गंमत जंमत', 'मुलांचे मासिक', 'टॉनिक' ही मला दिवाळी अंकाच्या रूपातच बघायला मिळालेली आहेत. एरवी ती कुठे असत देव जाणे. पण त्यांत चित्रांचा विशेष सहभाग असल्याची आठवण नाही. 'अबब हत्ती' नामक प्रकार दुर्दैवानं पालकांपर्यंत पोचलेला नसल्यामुळे मला पाहायला मिळाला नाही. या सगळ्यांमधली कुठली चित्रं आजमितीस पक्की आठवतात? 'चांदोबा'मधली चित्रं ठोकळेबाज असत. 'ऐश्वर्या राय कशी दिसते? - 'चांदोबा'तल्या सुंदरीसारखी.' या संदर्भाखेरीज त्या चित्रांना काहीच स्मरणमूल्य नाही. 'ठकठक'मधली 'दिपू दी ग्रेट' ही मालिका आठवते, पण दीपू ओ की ठो आठवत नाही. नाही म्हणायला 'किशोर'मधली काही जलरंगातली चित्रं अजून लख्ख आठवतात, आवडतात. बस.

गोष्टीच्या पुस्तकांपैकी चित्रं असलेली पुस्तकं मोजकी होती. 'खडकावरला अंकुर' हे एक. त्यांतली चित्रं काळ्यापांढर्‍या रंगात असली तरीही अगदी पक्की आठवतात. त्या त्या प्रसंगांचे त्या चित्रांशी घट्ट लागेबांधे होते. फाफेमधली चित्रं हे दुसरं उदाहरण. 'राजा शिवछत्रपती'मधली काळीपांढरी रेखाटनंही बोलकी आणि देखणी होती. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातली चित्रं वाहून गेली, तरी ती मात्र अजून लक्षात आहेत. 'देनिसच्या गोष्टी' आणि इतर रशियन पुस्तकांत बरीच आणि देखणी चित्रं असत. पण पुन्हा एकदा - ठसा असा आहे, तो 'देनिस'चाच. बाकी काही स्मरणात नाही. इसाप, सिंहासन बत्तिशी, पंचतंत्र, बिरबल, ठकसेन, जादूचा गालिचा आणि तत्सम पुस्तकं... या खंडीभर पुस्तकांचा आणि चित्रांचा काही संबंध नव्हता. जोंधळे नामक कुणाचं तरी एक पुस्तक वाचलं होतं - ना पुस्तकाचं नाव लक्षात आहे, ना लेखकाचं, माफी - त्यात जलरंगातली विलक्षण सुंदर चित्रं होतीसं आठवतं. खेड्यातलं गाव, चंद्र, उडदाची भाकर आणि दूध... अशी त्यासोबतची वर्णनंही अर्धवट, पण पक्की आठवतात. पुढे नारळीकरांच्या वि़ज्ञानकथा, 'चौघीजणी'सारखी भाषांतरित पुस्तकं... ही वाचली. त्यांत चित्रांचा काहीच संबंध नव्हता.

अशी अनेक पुस्तकांच्या नावांची भर इथे घालता येईल. पण इथे मी तपासून पाहते आहे, की चित्रं नसलेल्या वा फार महत्त्वाची चित्रं नसलेल्या पुस्तकांतल्या गोष्टी मला आठवतात का? तर - होय. लख्ख आठवतात. चित्रं असल्यामुळे स्मरण पक्कं वा अधिक रंगतदार असल्याचं प्रतिपादन निदान माझ्या बाबतीत तरी मला करता येणार नाही. चित्रं आठवतात. पण तशा मला कितीतरी श्लोक, वाक्यं, (तेव्हा नवीन भासलेले) शब्दप्रयोग आणि वाक्प्रचार, गाणी यांच्याही पक्क्या आठवणी आहेतच.

लोकांचा काय अनुभव आहे?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> 'आनंद', 'कुमार', [...] ही मला दिवाळी अंकाच्या रूपातच बघायला मिळालेली आहेत.<<

'आनंद' आणि 'कुमार' पूर्वी मासिकं असत. तुझ्या लहानपणचं मला माहीत नाही. शिवाय, 'बिरबल', 'टारझन', 'फुलबाग' अशीही काही मासिकं आठवतात. 'बालवाडी' म्हणून दिवाळी अंकही असे.

किशोर : 'किशोर'ला सरकारी अनुदान असल्यामुळे त्याची छपाई अधिक बरी असे आणि त्यात चित्रंही अधिक आणि रंगीत असत.
रशियन पुस्तकं : जगभरात कम्युनिस्ट विचार फैलावा हा मुख्य उद्देश असल्यामुळे रशियन सरकार ही पुस्तकं उत्तम निर्मितीमूल्यांसह प्रकाशित करत असे आणि स्वस्तात उपलब्ध करून देत असे.

>> पण इथे मी तपासून पाहते आहे, की चित्रं नसलेल्या वा फार महत्त्वाची चित्रं नसलेल्या पुस्तकांतल्या गोष्टी मला आठवतात का? तर - होय. लख्ख आठवतात. चित्रं असल्यामुळे स्मरण पक्कं वा अधिक रंगतदार असल्याचं प्रतिपादन निदान माझ्या बाबतीत तरी मला करता येणार नाही. चित्रं आठवतात. पण तशा मला कितीतरी श्लोक, वाक्यं, (तेव्हा नवीन भासलेले) शब्दप्रयोग आणि वाक्प्रचार, गाणी यांच्याही पक्क्या आठवणी आहेतच. <<

मुळात इथे काही वेगवेगळे मुद्दे संभवतात.

पुस्तकांच्या छपाईचा खर्च आणि पालकांची क्रयशक्ती पाहता फार चित्रं छापणं प्रकाशकाला परवडतही नसे.

मराठी मध्यमवर्गीय घरांत दृश्यघटकांपेक्षा शब्दबंबाळ साहित्यावर अधिक भर पूर्वी असे. त्यामागची कारणं अनेक होती, पण 'लिहिणं-वाचणं' चांगलं, आणि चित्रपटादि दृश्यव्यवहार मात्र छचोर असा एकंदर मामला होता. त्यामुळे रामरक्षेची किंवा गीतेतल्या अध्यायांची पाठांतरं करून घेणं वगैरे प्रकार खूप चालत, पण साधी रविवर्म्याची चित्रंसुद्धा (जी अनेक घरी किमान देवांच्या तसबिरी म्हणून तरी असत) किती नीट पाहिली जात ह्याविषयी शंका आहे. फार तर रांगोळ्या काढणं किंवा दिवाळीचा कंदील करणं वगैरे गोष्टींतच लहान मुलाची दृश्यात्मक भूक भागवली जात असे. एकंदरीत मुलाच्या परिसरात मनुष्यनिर्मित प्रतिमांचा आजच्यासारखा सुळसुळाट नव्हता, आणि पालकांचे मुलांबाबतचे प्राधान्यक्रम मुख्यतः शब्दाधिष्ठित होते. ह्याउलट आता आपण वावरतो ते जग प्रतिमासंपृक्त आहे, आणि उलट शब्दांचा वापर मात्र सैल / ढिसाळ झाला आहे.

त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर तेव्हाच्या अनुभवावरून आताच्या जगाविषयी काही म्हणता येईल का, ह्याविषयी शंका आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तेव्हाच्या अनुभवावरून आताच्या जगाविषयी काही म्हणता येईल का, ह्याविषयी शंका आहे.

नाही, मला असं काहीच म्हणायचं नाही. चित्रं असल्यामुळे काही प्रकारची पुस्तकं जास्त लक्षात राहिली आणि जास्त परिणामकारक ठरली, असं घडलं का, याचा मी विचार करते आहे. बाकी माझ्यावर चित्रांचा संस्कारच झालेला नसणं ही एक निराळी शक्यता आहे आणि तिचे फायदेतोटे आहेतच.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मागे ऐसीवरच लिहिल्याप्रमाणे माझ्या लहानपणाच्या वाचनात आजोबांचा खूप मोठा वाटा होता. ते स्वतः उत्तम चित्रं काढत, पण त्यांचं पुस्तकांतल्या चित्रांबद्दल जरा चमत्कारिकच मत होतं. त्यांचा लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं असायला चक्क विरोध होता! त्यांच्यामते पुस्तकांत चित्रं असणं वाचकाच्या व्हिज्युअलायझेशनला आळशी बनवतं. लेखकाच्या शब्दांमधून वाचकाने आपल्या मनात चित्र उमटवलं पाहिजे.

यामुळे त्यांचा चांदोबा, ठकठक वगैरेला चक्क विरोध होता. कॉमिक्स वगैरे तर लांबच. (चांदोबा बाबाकरवी आणि चाचा चौधरी एका मावस-मामाकरवी स्मगल करावी लागत.) पण भा रा भागवतांची पुस्तकं, लोकवाङ्मय गृहाची पुस्तकं वगैरे मात्र आजोबा आवर्जून आणून देत.

[अवांतरः आजोबा नखशिखान्त समाजवादी असूनही साने गुरुजींची पुस्तकंही आजोबांना आवडत नसत. एकदा कोणीतरी मला "मनूबाबा" भेट दिलं तर ते त्यांनी चक्क जप्त केलं!]

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आजोबा नखशिखान्त समाजवादी असूनही साने गुरुजींची पुस्तकंही आजोबांना आवडत नसत. एकदा कोणीतरी मला "मनूबाबा" भेट दिलं तर ते त्यांनी चक्क जप्त केलं!

ROFL

गोड गोष्टी मलाही नाही आवडत अजिबात. कसल्या सोशीक आणि मुळुमुळु आहेत त्यातल्या बायका. आशा काळे बरी, असले एकेक अवतार. काही बर्‍या गोष्टी आहेत त्यांत. पण 'चित्रा आणि चारू'मधली ती सासूचा छळ सोसून तिला माफ करणारी बया म्हणजे तर कहर आहे. तेव्हाच मी ते पुस्तक वाचून तिच्यावर भयानक उखडले होते. अजून छळा हिला, अशी क्रूर प्रतिक्रिया झाली होती. हुशार होते तुझे आजोबा!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> पण त्यांचं पुस्तकांतल्या चित्रांबद्दल जरा चमत्कारिकच मत होतं. त्यांचा लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं असायला चक्क विरोध होता! त्यांच्यामते पुस्तकांत चित्रं असणं वाचकाच्या व्हिज्युअलायझेशनला आळशी बनवतं. लेखकाच्या शब्दांमधून वाचकाने आपल्या मनात चित्र उमटवलं पाहिजे.

यामुळे त्यांचा चांदोबा, ठकठक वगैरेला चक्क विरोध होता. कॉमिक्स वगैरे तर लांबच. <<

आजोबा काहीसे अधिक दुराग्रही असू शकतीलही, पण 'हव्येत कशाला चित्रं न् फित्रं?' हाच अ‍ॅटिट्यूड तेव्हा कमीअधिक प्रमाणात होता. (मी फक्त मराठी मध्यमवर्गाबद्दल बोलतोय.)

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण त्यांचं पुस्तकांतल्या चित्रांबद्दल जरा चमत्कारिकच मत होतं. त्यांचा लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं असायला चक्क विरोध होता! त्यांच्यामते पुस्तकांत चित्रं असणं वाचकाच्या व्हिज्युअलायझेशनला आळशी बनवतं. लेखकाच्या शब्दांमधून वाचकाने आपल्या मनात चित्र उमटवलं पाहिजे.

प्रवासवर्णन लिहिताना याच भुमिकेतून मी छायाचित्रे देणे टाळतो, तेव्हा आजोबांप्रमाणे मलाही दुराग्रही ठरवले जात असेल Wink
--
जोक्स अपार्ट, पण चित्र नसल्याने खरोखरच काही वेळा मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळेल मात्र नव्या गोष्टी चित्रातून दाखवणे सोपे जाते.

उदा. एकदा हत्ती बघितला असेल तर मुले इमॅजिन करू शकतात पण पहिल्यांदा हत्ती इमॅजिन करू देण्यापेक्षा चित्रात दाखवणे सोपे जाते.
एकाच प्रकारची चित्रे असु नयेत असे मला अजूनही वाटते. वेगवेगळ्या शैलीतील हत्ती मुलं सतत बघत असतील तर आपल्या शैलीतला वेगळा हत्ती मुले इमॅजिन करतात

==
अति अवांतरः आजच सकाळच्या घाईत असताना बॅकग्राउंडला "चाफा बोलेना" वाजत होतं. मुलीने (३ वर्षे) अचानक धावत येऊन अतिशय चिंताग्रस्त वगैरे चेहरा करून 'चाफा का बोलत नैये? त्याला काय झालं?' वगैरे प्रश्न विचारले. त्या प्रश्नाला तिला नीटशी समजतील अशी उत्तरे मला देता आली नाहीत.तिला हे कळले. "मी मोठी झाली की कळेल?" असे तिनेच विचारले. मग हसून हो म्हटले नी विषय संपला. परत एका मिनिटात "खंत" म्हणजे विचारले? मग तिला खंत समजावायला तिच्याच पुस्तकातील एका खंतावलेल्या मुलीचे चित्रच उपयोगी पडले!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लहानपणी वाचलेल्या पुस्तकांमध्ये चाइल्डक्राफ्ट संचामुळे बरीच नवीन माहिती कळाली. त्यातही भरपूर चित्रे होती, ज्यामुळे इंग्रजी शाट्ट्ं कळत नसलं (हो, आम्ही मराठी शाळेतले ना) तरी काय लिहिलंय ते साधारण समजवून घेता यायचं. बाकी पुस्तकातल्या चित्रांबद्दल म्हणाल तर 'चिंटू'साठी आम्ही जीव टाकायचो. नवीन पुस्तकांचा संच आला की लगेच आईबाबांकडे तो विकत घेण्यासाठी लकडा लावायचो. पण बाकी जी काही मराठी पुस्तकं वाचली त्यातही चित्र नावालाच होती. पण एक आहे, वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे व्हिज्युअलायझेशन मस्त करता यायला लागलं. इतकं की पुढे त्यातल्या काही पुस्तकांवर सिनेमा/मालिका आल्या तेव्हा 'ह्यॅ:! सिनेमावाल्यांना हे क्यार्‍याक्टर काही जमलं नाही' असंच वाटायचं.

लहानपणी एका काकांनी ते जर्मनीस जाऊन आल्यावरती अ‍ॅलिस इन वंडरलँडची छोटी ६ पुस्तके भेट म्हणून दिली होती. जर्मन तर सोडाच, तेव्हा इंग्लिशही फक्त एबीसिडी वाचण्यापुरतेच होते. तरी त्यातली चित्रे मात्र विलक्षण सुंदर होती. तासन्तास बघत रहावीशी वाटत.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथली पुस्तकं कुठं उपलब्ध होतात माहीत नाही, पण ही लिंक निव्वळ चाळली तरी सध्या सुख आहे..भरपूर इमेजेस आणि वैविध्य, जवळ जवळ २७ टॅब्जमध्ये भर्पूर पोस्टस आहेत..

वा!! खासच दिसतो आहे.

कविता महजनांचा "जंगल गोष्टी" हा पाच पुस्तकांचा संच अलीकडेच मागवला. माझ्या (५ वर्षाच्या) मुलाला धमाल आवडली आहेत. प्रत्येक पुस्तकात खटपटपूर गावानजिकच्या जंगलात राहणार्‍या प्राण्यांवर आधारित ठिकठिकाणच्या लोककथा, मग माहिती, आणि मुखवटा, ओरिगॅमी वगैरे करायच्या सूचना आहेत.
आम्ही "सामसूम" वाघाची गोष्ट वाचल्यावर त्याचा मुखवटा तयार केला, मग माधुरी पुरंदर्‍यांच्या यश मालिकेतल्या "मुखवटे" पुस्तकातल्या वाघाच्या मुखवट्याचा सीन करून खोखो हसलो. ओरिगामीचा वाघ शर्टाला चिटकवून एकदा शाळेत गेला, आणि आता मातीचा बेडूक बनवायचा विचार चालू आहे. त्याला खटपटपूर नाव खूप आवडलं.

मध्यंतरी राजीव तांब्यांचं "मोरू आणि इतर कथा" ही अनेकदा वाचलं. थोडी "प्रवचनी" आहेत, पण भाषा जोरात वाचन करण्यासाठी एकदम फिट्ट आहे. मुलांना नकळत अनेक शब्दांची ओळख करून द्यायची शैली छान जमलीय. आमच्या घरात मुंग्यांना आता "मंगू-मुंगू" म्हणूनच संबोधलं जातं, आणि चुकून मारलं तर पोरं खूप रागावतात.

मोरू सोबत धुबडू, डुकरू वगैरेही कथांची सिरीज आहे. अशी तीन पुस्तके आहेत बहुधा.
कथा बर्‍यापैकी 'प्रवचनी' आहेत याच्याशी सहमत. मुगू आणि त्यात धाडधाड पाय आपटत येणारी पोरगी मुलीला एकदम आवडते Wink
त्य गोष्टीनंतर मी ना जरा सांडतेय म्हणजे मग मंगू-मुंगूला खायला मिळेल असे सांगण्यात येऊ लागले आहे Tongue

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile
डुकरू याच पुस्तकात आहे. घुबडू नाही वाचलं.

नावे भारी आहेत. आमच्या मित्रांना डुकरू (सर्वानुमते कुरूप), किळसू (आंघोळ करणारा परंतु अंतर्वस्त्रे व टॉवेल धुवायचे वावडे असलेला) वगैरे नावे दिलेली होती ते आठवले.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्य गोष्टीनंतर मी ना जरा सांडतेय म्हणजे मग मंगू-मुंगूला खायला मिळेल असे सांगण्यात येऊ लागले आहे (जीभ दाखवत)

Smile मस्त!

मी ना जरा सांडतेय म्हणजे मग मंगू-मुंगूला खायला मिळेल

Biggrin

मी मांजराला ठेवलेली बहुतेकशी नावं ऊकारान्त आहेत. रोचना आणि ऋच्या प्रतिसादांवरून माझं वय किती, ह्याचा अंदाज मला आला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऊकारान्त नावे गोंडुली वाटतात हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे Wink

ऊकारान्त नावे गोंडुली वाटतात हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे (इतक्यात वय कमी (होत)असल्याचा कांगावा करू नका!)(डोळा मारत)

कांगावा क्यों. मानसिक वय कमीच आहे. Wink कोई शक?

मी सोळा वर्षावरून थेट साठीच गाठणार आहे. म्हणजे दुसरं बालपण सुरू करता येईल. मध्यमवयाच्या अडचणी टाळलेल्याच बऱ्या.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाय!कंबख्त तूने पी ही नही|

अरेवा, धन्यवाद ह्या रोचक माहिती बद्दल. लवकरच 'जंगल गोष्टी' घेण्यात येईल.
अवांतर - माधूरी पुरंदरे 'यशच्या गोष्टी पुस्तक संच'
माझा मुलगा (वय साडे चार वर्ष) 'यश'चा अगदी घट्ट मित्र वगैरे झाला आहे. माधुरी पुरंदरेंच्या यशच्या सगळ्या गोष्टी रोज ऐकतो तरी अजीबात कंटाळा येत नाही त्याला (आणि अम्हालाही वाचताना :)). एक पुस्तक संपलं की उत्साहाने लगेच दुसरं पुढे करतो वाचण्यासाठी. ह्या गोष्टी त्यालाही अगदी पाठ झाल्या आहेत. प्रत्येक पानावर नेमकं काय आहे ते व्यवस्थित सांगतो. काही शब्द्/वाक्य अगदी मस्त कॅरेक्टर मधे घुसून म्हणतो अता, जसे'तं-बो-रा', 'सायली बाहेर काय आहे?' , 'लाडोबा-वेडोबा-नागडोबा', 'मी रोज रोज तुझे कपडे धुणार नाही-समजलं' आणि तितक्याच प्रेमाने निकिताताईला म्हणतो 'तुला आवडला ना डबा?' Smile
ह्या संचातल्या 'पाहूणी' ह्या बालकथेसाठी माधूरी पुरंदरेंचे विशेष आभार. आधी मुलगा त्याच्या वस्तू/खेळण्या घरात आलेल्या त्याच्या वयाच्या मुलांशी अजिबात शेअर करत नसे, पण यश ज्या पदधतीने आधी राग-राग करतो पण नंतर मुक्ता बरोबर त्याच्या खेळण्या/वस्तू शेअर करतो ते पाहून माझा मुलगाही शेअर करायला लागला आहे हळुहळू Smile
ऋ चे आभार हा संच सुचवल्याबद्दल.

आता विषय निघालाच आहे तर ज्योत्सा प्रकाशनानेच काही कथांची भाषांतरे प्रकाशित केली आहेत. त्यातील्स सगळ्याच पुस्तकांची चित्रे सुरेखच आहेत.
गोष्टी थोड्या मोठ्या आहेत. पण मजा येते.

त्यातील 'वाघाला व्हायचं होतं मांजर' हे पुस्तक (लेखनः जमशीद सेपाही. अनुवादक: अजित पेंडसे; चित्रकार: अमीर अमीर सुलेमानी.) माझी मुलगी व तिच्या मैत्रीणींमध्ये विशेष प्रिय आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विनंती केलेले पान सापडत नाही असा एरर येतो लिंक वर!

ही लिंक पहा: https://jyotsnaprakashan.com/books/marathi/item/jp228
या मालिकेतलं "नदीकाठी ससुला" मजेदार आहे.
अनेक प्रकाशक मूळ कथेच्या भाषेचा उल्लेख का नाही करत हे मला नेहमी पडणारं कोडं आहे.
पण भन्नाट लोकप्रिय बाङ्ला पुस्तक चाँदेर पहाड़ ला मराठीत आणल्याबद्दल ज्योत्स्ना प्रकाशनचे आभार! आता हे वाचणे आले. साहित्य अकादमी ने "गोसांई बागानेर भूत" चं "गोसावी बागेतील भूत" म्हणून चांगला अनुवाद केला होता.

Awww cho chweet!!
वाघाला व्हायचे होते मांजर - कसली भारी कल्पना आहे Smile
आणि तो वाघोबा किती गोड काढलाय त्याला सुमारच नाही.
.
https://jyotsnaprakashan.com/media/zoo/images/vaghala%20L_19ab730543f0e15ffbced3c2c2c8fd9c.jpg

आम्हालाही यश आवडतो! "हात मोडला" वाचल्यावर पोरं ओल्या बाथरूममध्ये जरा जपून चालतात, उड्या मारत नाहीत. "पाहुणी" वाचलं नाही - मुखवटा, हात मोडला, मामाच्या गावाला जाऊया, आणि कंटाळा आहे.

आम्ही राधाच्या घरच्यांचेही जबरदस्त फॅन आहोत, खासकरून साखरनानांचे. त्यांचे वाक्य "अरे पोरांनो, ते डोक्यावरचं छप्पर पडेल की रे आता!" दिवसातनं दहा वेळा तरी म्हटलं जातं, आणि शिदूकाकासारखी केशरचना करण्याचे प्रयत्न झाले आहेत. राधेनं गौतमला म्हटलेलं "हं, वाट बघ!" वाक्यही इथे फेव्रिट आहे.

मला राधाचं घर संच कृष्णधवल अवस्थेत जास्त आवडलं. वाचून वाचून मोठ्याने त्याच्या चिंध्या केल्या म्हणून मी नवीन सेट आणवला, आणि तो अगदी चकाचक रंगीबेरंगी आहे. म्हणजे छानच आहे, पण राधाच्या घरच्यांची चाळीतून ब्लॉक मध्ये बदली झाल्यासारखं वाटलं.

मुलांना वाचून दाखवण्यासाठी योग्य पुस्तक शोधण्याच्या निमित्ताने पुन्हा मुलांच्या साहित्यामध्ये रमणे चालूच आहे.

माधुरी तळवलकरांचं "तळ्याचे गुपित" आणि माधुरी पुरंदर्‍यांचं "त्या एका दिवशी" ही पुस्तकं वाचली. 'तळ्याचे गुपित' दीर्घकथा आहे, आणि 'त्या एका दिवशी'त दोन कथा आहेत. मला दोन्ही कथा आवडल्या, पण दुसरी, "मला क्रियापद भेटले तेव्हा" मस्त आहे. दोन्ही कथांचा आशय अगदी नाजुकपणे हाताळला आहे. पहिल्या कथेत वयात येणार्‍या मुलाला आपल्या वाढत्या वयाची, आणि त्या लागोलाग आपल्या आई-वडिलांच्या संबंधातील तणावाची जाणीव होते, आणि दुसरीत एका शाळकरी मुलीला 'मरण' या संकल्पनेची जाणीव होते. आशयापेक्षा कथांचे एक्झिक्यूशन मला जास्त आवडले - विविध शब्दांची विचारपूर्वक निवड, हलका विनोद, पात्रांची ठराविक नावं.... दुसरी कथा भाषेवर, भाषाशिक्षणावर, अलगदपणे भाष्य करते. कथा 'बोधप्रद' किंवा 'प्रवचनी' होता होता वाचतात.

तळ्याचे गुपित मधली भाषाही सरस आहे, आणि निरनिराळ्या, शहरी- गावठी वातावरणाला साजेशी. एकूण या नवीन पुस्तकांमध्ये कृत्रिम, संस्कृताळलेले मराठी टाळून जाणीवपूर्वक बोलीभाषेचा वापर आहे. मुंबईतला सुखवस्तू कुटुंबातला रौनक अचानक दोन महिने कराडजवळच्या दहिगावात राहायला जातो, आणि तिथे दोन मित्रांबरोबर नवीन ग्रामीण परिसरात, भाषेत आणि राहणीमानात रमतो. कथेचा आशय थोडा "पहा हे गावकरी किती सुखी आहेत, निसर्गाच्या अगदी जवळ आहेत, नाहीतर तुम्ही! सारखं विडियोगेम आणि गाडीत फिरणं!" च्या गोग्गोड धाटणीवर गेला असला तरी पुन्हा एक्झिक्यूशन चांगले आहे. ही कथा नक्कीच बोधप्रद आहे, पण प्रवचनी नक्कीच नाही.

मात्र मला हे "कुमार साहित्य" वाचून नेमक्या वाचक वयोगटाची कल्पना येत नाही. पात्रं सातवीतली, नववीतली मुलं-मुली आहेत, आणि त्या वयोगटाचे भावविश्वही टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतो पण त्या मानाने कथानक आणि भाषा खूपच सोपी वाटतात. एकीकडे ९-१३ वयातल्या मुलांनी सहज वाचण्यासारखी ही पुस्तकं आहेत, पण दुसरीकडे मोठ्या मुलांना ती थोडी 'लाइट' वाटू शकते. याच वयोगटासाठी (१२-१४वर्षं ) लिहीलेली इंग्रजी पुस्तकं (आणि मला काही प्रमाणात माहिती असलेली बाङ्ला पुस्तकं) तुलनेने खूपच गंभीर, गुंतागुंतीचे आहेत.

नेक्स्टः बिभूतीभूषण बंद्योपाध्याय, चंद्रपहाड (चांदेर पहाड़ चा अनुवाद), विद्यादर हेगडे, "तुफान", आणि सुनिती नामजोशी, "अदितीची साहसी सफर".

मात्र मला हे "कुमार साहित्य" वाचून नेमक्या वाचक वयोगटाची कल्पना येत नाही. पात्रं सातवीतली, नववीतली मुलं-मुली आहेत, आणि त्या वयोगटाचे भावविश्वही टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतो पण त्या मानाने कथानक आणि भाषा खूपच सोपी वाटतात. एकीकडे ९-१३ वयातल्या मुलांनी सहज वाचण्यासारखी ही पुस्तकं आहेत, पण दुसरीकडे मोठ्या मुलांना ती थोडी 'लाइट' वाटू शकते.

या निरिक्षणासाठी अनेक आभार, माझ्या मुलीसाठी ही पुस्तके मागवायला हवीत. एकीकडे यश आणि राधाच्या पुस्तकातली सोपी भाषा तिच्यासारख्या, मराठीची अगदी प्राथमिक ओळख असणार्या मुलीला खूप आवडते पण दुसरीकडे त्यातले भावविश्व अगदी लहान वयोगटातल्या मुलांचे असल्याने आता तिला ती वाचण्यात फार रस नसतो.

मग तिला ही पुस्तकं नक्कीच आवडतील. तळ्याचे गुपित मधले, मुंबईतले पहिले प्रकरण इंग्रजी-मिश्रित मराठी बोलीतलं आहे, आणि सुरुवातीला थोडं कृत्रिम वाटत होतं, पण खरोखरच या वर्गातली भाषा तशी मिश्रित झाली आहे. त्याला प्रांजळपणे टिपले आहे.
पात्रांच्या नावांतून, बोलींच्या, शब्दांच्या विविधतेतून (म्हणजे उगीच नोकराच्या तोंडी गावठी स्पेलिंगमधले वाइच आणि व्हतं वगैरे शब्द घालणे नव्हे, तर बोलीचा विस्तृत वापर) भाषाद्वारे कसला समाज मुलांसमोर नकळत उभा राहतो याचा विचार समाधानकारका आहे. तळ्यातले गुपितमध्ये नदीमचाचा, रूबीआंटी आहेत, दंगली, त्यामुळे उध्वस्त झालेल्या गरिबांच्या वस्तींचा उल्लेख आहे. "मला क्रियापद भेटले तेव्हा" मध्ये मराठीच्या सरांचे नाव बागवान आहे.

आभार! .. मोलाची माहिती!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> याच वयोगटासाठी (१२-१४वर्षं ) लिहीलेली इंग्रजी पुस्तकं (आणि मला काही प्रमाणात माहिती असलेली बाङ्ला पुस्तकं) तुलनेने खूपच गंभीर, गुंतागुंतीचे आहेत. <<

या वयोगटासाठी इंग्रजी पुस्तकं सुचवा प्लीज.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

- Code Name Verity (हे एक फारच मस्त पुस्तक आहे.)
- द हंगर गेम्स ट्रिलॉजी (सिनेमे बघू नयेत.)
- मायकेल करलँडची प्रोफेसर मोरिआर्टी पुस्तकं

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

http://kenliu.name/

याची पुस्तकं. याच्या साईटवरून उचलतो -->

The Grace of Kings — a silkpunk epic fantasy of revolution, Nebula nominee (2015)
The Paper Menagerie and Other Stories — my debut collection (March 2016)
The Wall of Storms — the first sequel to The Grace of Kings (October 2016)
Invisible Planets — an anthology of contemporary Chinese SF in translation (November 2016)

नवीन, की क्लासिकही चालतील? म्हणजे हॅरी पॉटर, रोअ‍ॅल्ड डाह्ल, हारून अँड द सी ऑफ स्टोरीज, नॅन्सी ड्रू, थ्री इन्वेस्टिगेटर्स, वगैरे वाचलेल्या मुलांसाठी, की थोडं उशीरा का होईना वाचन आवडतं हे जाणवल्यावर झपाटल्यासारखे वाचायला निघालेल्या मुलांसाठी?

>> नवीन, की क्लासिकही चालतील? म्हणजे हॅरी पॉटर, रोअ‍ॅल्ड डाह्ल, हारून अँड द सी ऑफ स्टोरीज, नॅन्सी ड्रू, थ्री इन्वेस्टिगेटर्स, वगैरे वाचलेल्या मुलांसाठी, की थोडं उशीरा का होईना वाचन आवडतं हे जाणवल्यावर झपाटल्यासारखे वाचायला निघालेल्या मुलांसाठी? <<

ह्या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे, कारण मला स्वतःलाच कुतूहल आहे. Smile टोल्किन, हॅरी पॉटर, रोअ‍ॅल्ड डाह्ल, हारून अँड द सी ऑफ स्टोरीज, नॅन्सी ड्रू, थ्री इन्वेस्टिगेटर्स, वगैरे मी वाचली आहेत. शिवाय वर उल्लेख केलेलं हंगर गेम्स, किंवा डायरी ऑफ अ विंपी किड, क्युरियस इन्सिडंट ऑफ द डॉग वगैरेही वाचली आहेत. त्यामुळे शक्यतो समकालीन किंवा क्लासिक्समध्ये थोडी अपरिचित किंवा दुर्लक्षित चालतील. "तुलनेने खूपच गंभीर, गुंतागुंतीची" हे शब्द कळीचे आहेत.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

क्लासिकः (मी शाळेत असताना वाचलेली, सातवी आठवी नववीत आमच्या "लायब्ररी पिरेड" ला आठवड्यासाठी घ्यायला ही बाहेर ठेवलेली असत, )
टु किल अ मॉकिंगबर्ड
अ‍ॅन ऑफ ग्रीन गेबल्स
टॉम ब्राउन्स स्कूल डेज
लिटल विमेन मालिका
टॉम सॉयर, हकल्बरी फिन
ट्रेजर आयलंड (जेकिल अँड हाइड सुद्धा, पण ते मी थोडं नंतर वाचलं होतं)
मेरी एडवेंचर्स ऑफ रॉबिन हुड
कॅचर इन द राय
द विंड इन द विलोज
काउंट ऑफ मोन्टे क्रिस्टो
थ्री मस्केटियर्स
मोबी डिक
द ग्रेट गॅट्स्बी
किम (रडियार्ड किपलिंग)

अलिकडची (यातली मी सगळी वाचली नाहीत, पण १३ वर्षाच्या भाचीकडून ऐकून असलेली)
फिलिप पुलमनची "हिज डार्क मटीरियल्स" मालिका (ही वाचली आहे, पॉटर नंतर काय? या प्रश्नाला सहसा उत्तर म्हणून दिलेली, ख्रिस्ती धर्माचा पाया असलेली, पण बर्‍यापैकी गुंतागुंतीची)
आर्टेमिस फाउल मालिका (चांगली आहे, भाषा मजेदार)
सिस्टर्स ग्रिम्म मालिका
नील गेयमन, द ग्रेवयार्ड बुक
टेरी प्रॅचेट, ब्रोमेलियेड मालिका
रिक रिओर्डनची पर्सी जॅक्सन मालिका

अजून खूप आहेत....

आभार. क्लासिक्स परिचित आहेत आणि गॅट्सबीसारखा अपवाद वगळता वाचलेली आहेत. समकालीनांपैकी पुलमन, गेमन, आर्टेमिस फाउल आणि रिओर्डन ऐकून माहीत आहेत. आणखी येऊ द्या.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आधी पुलमन आणि गेयमन वाचून काढ. मग पुन्हा यादीत भर घालते!

Smile व्हय म्हाराजा

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्या मुलीसाठी आणलेली आणि तिला आवडलेली काही पुस्तके खालीलप्रमाणे,

मॅडलिन लेंगलची 'रिंकल इन टाईम' आणि 'विंड इन डोर' - ही शास्त्रीय संकल्पनांवर आधारीत पुस्तके
आर.जे. पलाशिओची - 'वंडर' ही चेहर्याची डिफॉर्मिटी असलेल्या मुलाविषयीची रोचक कादंबरी
नॉर्टन जुस्टरची - 'फँटम टोलबूथ' ही शास्त्रीय संकल्पनांवर आधारित कादंबरी (थोड्या लहान ८-९ वर्षांच्या मुलांसाठी)
अ‍ॅडम गिडविट्सचे - 'इन्क्विझिटर्स टेल' ही तीन जादुई मुले ज्युईश पुस्तके जाळली जाण्यापासून वाचवतात त्याबद्दलची कादंबरी

वरच्या पुस्तकांपैंकी माझ्या मुलीने रिक रिओर्डन बद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे पण तिला आर्टिमिस फाउल बराच आवडला. मुलगी कनेडियन टायर्सचा हार्डवेअर कॅटलॉग ते हरारीचं 'सेपियन्स' असं काहीही आवडीने वाचणारी सर्वभक्षी आहे त्यामुळे तिची मते त्या वयोगटासाठी प्रातिनिधिक असतील असे मुळीच नाही.

आभार. फॅन्टम टोलबूथ माहीत आहे पण बाकीची नावं नवीन आहेत.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

यंग अ‍ॅडल्ट जॉनरमध्ये याविषयी चांगलं ऐकतो आहे:

13 1/2 Lives of Captain Blue Bear

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रोचना, खुप धन्यवाद!
मी मागच्या महिन्यात बुकगंगा वरुन लहान मुलांसाठीची काही पुस्तकं मागवली. जी.ए. कुलकर्णींचं 'बखर बिम्मची' हे पुस्तक हाती गवसलं. कमाल आहे हे पुस्तक. मला त्यातलं बिम्मच्या आईचं पात्र जाम आवडलं. तिची जी विनोद-बुद्धी आहे ती क-मा-ल आहे. एकुणात, हे पुस्तक म्हणजे सहज भाषा, कथा आणि पात्र ह्याचं गोड मिश्रण आहे, उगाच तात्पर्य,शिकवणूक वगैरेचे गुंते नाहीत. नारायण संताच्या लंपनच्या कथा वाचताना मनाला जो एक आनंद मिळतो तसाच बखर बिम्मची हे पुस्तक वाचताना जाणवला. अश्या प्रकारची अजून पुस्तकं सुचवता येतील का?

राजीव तांब्याचा 'गंमत शाळा' हा संच देखील आवडला (मी अजून संचातली सगळी पुस्तकं वाचली नाहित, काही गोष्टीच वाचल्या आहेत). ह्यातल्या गोष्टींमधले आजी-अजोबांचे चिमटे आपली करमणुक करातातच पण सोप्प्या भाषेतून घरगूती विज्ञान प्रयोगांवर माहितीही देतात. १२-१४ वयोगटातल्या मुलांसाठी योग्य आहे, त्यात एखाद्याला विज्ञान प्र्योगांबद्दल उत्सुकता/कुतूहल असेल तर फारच उपयोगी आणि विज्ञानाबद्दल नक्कीच अजून आवड निर्माण करणारं असं म्हणणं वावगं ठरू नये.

बाकी मंगेश पाडगवकरांचे बालकविता संच वे-ड आहेत - 'फुलपाखरू निळं निळं', 'वेडं कोकरू', 'वाढदिवसाची भेट', 'सुट्टी एके सुट्टी.' - ह्या बालकविता सुचविल्याबद्दल (नकळतपणे) ऋचे आभार! _/\_

अरे हो, बखर बिम्मची बद्दल मी विसरूनच गेले होते. पुण्यात आमच्या घरी आहे कुठेतरी, पुढच्यावेळेस आणायला हवं.
"गंमत शाळा" संचाबद्दल माहित नव्हते - थँक्स!

वर उल्लेखलेली सुनीती नामजोशींची "अदितीची साहसी सफर" कादंबरी माझ्या (६ वर्षाच्या) मुलाला खूप आवडतेय. त्याला स्वतः अजून सलग वाचण्यासारखी नाहीये, पण कथा मस्त आहे. Aditi and the One-Eyed Monkey या १९८९ साली प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी पुस्तकाचा संगीता बर्वे यांनी केलेले मराठी रूपांतर आहे, हे पुस्तक मागवून उघडल्यावर कळलं. मुखपृष्ठावर ही माहिती, आणि अनुवादकाचं नाव ज्योत्स्ना प्रकाशनाने का दिलं नाही कोणास ठाऊक. अनुवाद ठीक आहे, ठिकठिकाणी थोडा बोजड वाटतो. पण कथा वाचून दाखवण्यात चालवून घेतेय.

'ज्योत्स्ना प्रकाशन'तर्फे कुमार-वयोगटातील मुलांसाठी दहा कादंबऱ्या संक्षिप्त रूपात प्रकाशित.

संच १, मूळ किंमत - ५५० रु, सवलतीत - ४०० रु.
‘टारफुला’ - शंकर पाटील : संक्षिप्तीकरण - कीर्ती मुळीक. पृ. १०९, रु. १००/-
‘वीरधवल’ - नाथमाधव : संक्षिप्तीकरण - कल्याणी हर्डीकर. पृ. १३४, रु. १२५/-
‘आनंदी गोपाळ’ - श्री. ज. जोशी : संक्षिप्तीकरण - आसावरी काकडे. पृ. १४४ , रु. १२५/-
‘इंधन’ - हमीद दलवाई : संक्षिप्तीकरण - नंदा सुर्वे. पृ. ७९, रु. १००/-
‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ - शुभदा गोगटे : संक्षिप्तीकरण - चंचल काळे. पृ. ८७, रु. १००/-

संच २, मूळ किंमत - ५६० रु, सवलतीत - ४०० रु.
‘पाणकळा’ - र. वा. दिघे : संक्षिप्तीकरण - माधुरी तळवलकर. पृ.९२, रु. १००/-
‘देवांसि जिवें मारिले’ - लक्ष्मण लोंढे, चिंतामणी देशमुख : संक्षिप्तीकरण - अंजली कुलकर्णी. पृ. १०४, रु. १००/-
‘हत्या’ - श्री. ना. पेंडसे : संक्षिप्तीकरण - ज्योत्स्ना आफळे. पृ. ८०, रु. १००/-
‘सूर्यमंडळ भेदिले’ - य. बा. जोशी : संक्षिप्तीकरण - आरती देवगावकर. पृ. १०१, रु. १००/-
‘आम्ही भगीरथाचे पुत्र’ - गो. नी. दांडेकर : संक्षिप्तीकरण - वीणा देव. पृ. १६०, रु. १६०/-

ह्या धाग्यावर बालसाहित्यासंबंधी काही चर्चा, माहिती, दुवे आहेत म्हणून संबंधित बातमी इथे डकवतो आहे.
कुमारांसाठी कथासंक्षेप!
लोकसत्ता (९ फेब्रुवारी २०१९) - लोकरंग पुरवणी, पान ४.