ऐसीकरांची ओळख

ऐसी अक्षरे वरील सदस्यांची ओळख करून देण्यासाठी हा धागा काढलेला आहे. खालील यादी अपुरी आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे. पण सर्वच जर आम्ही लिहिले तर अन्य सदस्यांना वाव कसा मिळणार अशा विचाराने आम्ही थोड्क्याच माननीयांचा उल्लेख करून थांबलो आहोत. तरी संधीचा फायदा घेऊन ऐसीकरांनी यात भर घालावी ही विनंती.

अरविंद कोल्हटकर -
हे ऐसीचे पितामह. अत्यंत संतुलित, सुसंस्कृत आणि माहितीपूर्ण प्रतिसाद देणे हे यांचे वैशिष्ट्य आहे. ह्यांनी प्रतिसाद लिहिला आणि ५ मार्मिक अगर माहितीपूर्ण श्रेणी मिळाल्या नाहीत असे सहसा होत नाही. किंबहुना 'कोल्हटकर' अशी आणखीन एक श्रेणी निर्माण करावी अशी मागणी वारंवार ऐसीच्या सदस्यांकडून प्रशासनाकडे केली जाते. यांच्या व्यासंगाने दिपून जाऊन अनेकदा आमच्या मनी येते की 'आप पूज्य हैं! आप धन्य हैं! बल्कि आप पुरुष ही नही हैं, आप महापुरुष हैं!' असे म्हणत आमचे डोसके यांच्या चरणी आपटावे. मात्र काही मौजमजेच्या धाग्यांवरती आम्हा तरुणांच्या (होय होय. आम्ही तरुणच आहोत. कोण बरे संशय घेतोय? ह्म्म? ) बरोबरीने टैम्पास करताना बघून हा म्हापुरुष थोर असला तरी माणसातलाच आहे याची खात्री पटते. (जाणकारांनी मनुकांचा उल्लेख आठवावा.)

चिंतातुर जंतू -
दृश्यकला माध्यमांचे खंदे रसिक. ह्यांचे वेगळेपण म्हणजे रसिकतेच्या जोडीला जबरदस्त जाण देखील आहे. ह्यांची कलासमीक्षणे, रसग्रहणे आणि जाणकारीचा दबदबा एवढा की भलेभले ऐसीकर ह्यांचा नामोल्लेख करतेवेळी प्रथम कानाला स्पर्श करतात असे ऐकिवात आहे. (तसा आमचाही उल्लेख कानाला हात लावल्याशिवाय होत नाही, पण ते खत्रुड लोक त्याला कानाला खडा लावणे म्हणतात. असो. उपेक्षा मोठमोठ्यांच्या वाट्याला आलेली आहे.)
अनेक अनवट चित्र-नाटकांमधल्य खुब्या, बारकावे किंवा ज्यांना मराठीत न्यूआन्सेस असे म्हणता येईल, सर्वसामान्यांना कंटाळा येणार नाही अशा रसाळपणे उलगडून दाखवत असल्यामुळे त्यांनी कला-समीक्षक या पदाला काळिमा फासला आहे.

धनंजय -
ऐसीवरील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. गणित, भाषा, विज्ञान, कविता वगैरे अनेक क्षेत्रांत त्यांचा लीलया अधिकारपूर्ण संचार असतो. त्यांच्या प्रतिसादांचे वैशिष्ट्य हे की कुठे खुसपट काढता येऊ नये अशी चिरेेबंदी बांधणी. जणू काही एखाद्या मान्यवर जर्नलमधील पेपर, रीसर्चचे प्रपोझल, किंवा पीअर रीव्ह्यू रिस्पॉन्सच लिहीत असावेत. कोणीही कितीही चुकीचे, उचकवणारे विधान केले असले तरी हे फक्त थंड डोक्याने, मुद्देसूद विश्लेषण करतात. क्वचित वेळ पडल्यास खण्णकन एकच 'लुहार की' ठेवून देतात, पण तीही शालजोडीत घालून. इतके कष्ट घेत असल्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा कोणी विपर्यास करताना दिसले की मात्र त्यांना अत्यंत क्लेश होतात. तरीदेखील मूळच्या सज्जनपणामुळे अशा परिस्थितीतही आपली उच्च पातळी ते सोडत नाहीत.
कोणे एके काळी ह्यांनी अत्यंत संस्मरणीय ललितलेखन केले आहे. दुर्दैवाने सध्या फारसे काहीच लिहीत नाहीत.

जयदीप चिपलकट्टी -
गणित, विज्ञान आणि भाषा या सर्व क्षेत्रांत असाधारण गती असलेल्या मूठभर ऐसीकरांपैकी हे एक आहेत. प्राज्ञ पण अतिशय ओघवत्या भाषेचे धनी. वर्षानुवर्षे अमराठी मुलुखात वास्तव्य करूनही ह्यांनी मातृभाषेची शुचिता जपली आहे. वाइनला वारुणी म्हणणारे आमच्या माहितीतले हे एकच. प्राध्यापक गणिताचे असले तरी संशोधन मराठीच्या अक्षरांवर करत असतात. त्यांची रीसर्च ग्रँट आमच्या खिशांतून जात नसल्यामुळे आम्हाला त्याचेही कौतुकच आहे.
हेदेखील ऐसीवरचे एक सभ्य व्यक्तिमत्व, पण आजकाल विक्षिप्तबाई आणि घासुगुर्जी यांच्या संगतीत असतात.

अरुण जोशी -
ऐसीच्या क्षितिजावर या अरुणाचा उदय तसा अलिकडचाच, पण अल्पकाळातच त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप उमटवलेली आहे. मूळ लेखापेक्षाही मोठा प्रतिसाद देणे या बाबतीत ते ऐसीवरचे ज्येष्ठ सदस्य 'न'वी बाजू यांना कांपिटिशन देऊन आहेत असे म्हणतात. इतर सदस्यांचे ठाउक नाही, पण दुर्दैवाने (आमच्या) त्यांचे बरेचसे लांबलचक प्रतिसाद आमच्या डोक्यावरून जातात. पण यांच्या खुसखुशीत नर्मविनोदी प्रतिसादांचे आम्ही चाहते आहोत. मात्र तिरकसपणा, खवचटपणा इ कौशल्यांच्या बाबतीत ते अगदीच मागासलेले आहेत. शिवाय, स्वतःच्या एखाद्या प्रतिसादातली चूक लक्षात आली तर सरळ ती कबूल करून मोकळे होतात. त्यामुळे साहजिकच जालिय जगतात वजन कमी आहे.
बाकी गृहस्थ अतिशय सद्वर्तनी हो! अहो, सर्व मनोरंजन (आपल्याच) बायको आणि मुलाबरोबर करतात.

संजोप राव -
ज्या विषयांत अरुणजोशी प्राथमिक यत्तेत आहेत त्यात रावसाहेबांनी पीयच्डी केली आहे. अर्थात, ऐसीच्या जन्माच्याही आधीपसून बारा संस्थळांचे पाणी प्यालेल्या आणि पचवलेल्या ह्या ज्येष्ठ सदस्यांस हे क्वालिफिकेशन शोभूनही दिसते. जीएक्कुस्वामींप्रती आदरभाव हा त्यांच्या- आमच्यातला अत्मियतेचा दुवा. ह्यांच्या खुसखुशीत शैलीतील टपल्या - टिप्पणी अनेकांना भावतात. प्रस्तुत लेखाची प्रेरणा त्यांच्या ढिपांग टिपांग वरून मिळाली हे आम्ही कृतज्ञतेने ( हेही एक म्हणावे लागते ) नमूद करू इच्छितो.

'न'वी बाजू -
ऐसीवरचे विरोधी पक्षनेते. ह्यांचा विरोध व्यक्तीला नसून विचाराला असतो. डावे- उजवे न करता एकंदरीत सगळ्यालाच कडवा विरोध असल्यामुळे हे कुठल्याही पक्षात नसतात. 'वन मॅन आर्मी' प्रमाणे ह्यांचा स्वतःचा 'न'वा पक्ष आहे. ह्यांचा आवडता छंद म्हणजे कुठल्याही विषयाची न (दि)सलेली बाजू ((खरे तर खुस्पट) दाखवणे. त्यापायी त्यांच्या लेखणीची धार कधीकधी फारच तीक्ष्ण होत असली तरी प्रतिसाद मार्मिक आणि माहितीपूर्ण असल्यामुळे वाईट श्रेणी देववत नाही. मात्र मुद्देसूदपणा, सौजन्य आणि व्यक्तिगत पातळीवर न उतरण्याची मुलखावेगळी तऱ्हा असल्या गुणांमुळे विरोधी पक्षनेते या पदाला ते बट्टा लावतात.

बॅटमॅन -
बटाट्याच्या चाळीतल्या बाबा बर्व्यांना चोवीस भाषांत मौन पाळता येत असे. ह्या वाघूळबाबांना चोवीस वेगवेगळ्या भाषांमध्ये वाद घालता येतात. विदूषकांचा संहार करण्यासाठी उत्पन्न झालेला हा वाल्गुदेय. एखाद्या वटवाघळाने अंधाऱ्या रात्री निबिड झाडाझुडपांमधून फिरावे त्याप्रमाणे हे स्तोत्र, आर्या, दिंडी वगैरे अनेक वृत्तांमधून लीलया फिरत असतात. स्वतःवरतीच कितीतरी कविता रचलेल्या असल्यामुळे त्यांना स्वस्तुतीची हौस आहे असे कोणी म्हणेल. पण तशी ती कोणाला नसते? 'स्वतःस मोठे शहाणे समजणे' हा सद्गुण बाळगून असणाऱ्या ऐसीवरच्या (आमच्यासकट) इतर अनेकांप्रमाणेच हे असल्यामुळे हे इथले एक लाडके व्यक्तिमत्व झालेले आहे.

सतीश वाघमारे -
ऐसीवरती तसे नव्यानेच आगमन झाले असले तरी आपल्या प्रत्ययकारी आणि सणसणीत शैलीने यांनी आपला ठसा जोरदारपणे उमटवलेला आहे. महाविद्यालयीन वातावरण आणि आपल्या वस्तीचं वास्तव या दोहोंची त्यांच्या समर्थ लेखनाला पार्श्वभूमी असते. या दोन्ही ठिकाणी दिसणाऱ्या विसंगती ते अत्यंत नेमकेपणे टिपतात. आर्त शब्द्चित्रे रेखाटतानाही ती, शब्द्बंबाळ किंवा दयनीयतेचे भांडवल केल्यासारखी होऊ न देणे हे ह्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. (मात्र एकदा लेख टाकून झाला की एखाद- दुसर्‍या प्रतिसादापलिकडे तिकडे फिरकत नाहीत. आणि अलिकडे तर लेखही नाहीत. )
कौतुकाची गोष्ट म्हणजे मराठी विषयात उच्चशिक्षण आणि सध्या मराठीचेच महाविद्यालयीन अध्यापन असल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही त्यांनी अंतरीची प्रतिभा शाबूत राखली आहे.

कविता महाजन

कविताबाई ऐसीवर येण्याच्या आधीपासूनच मराठीत चार बुके लिहून प्रसिद्धी पावलेल्या आहेत. आमच्या मर्यादित वाचनानुसार ती प्रसिद्धी यथायोग्यही आहे. ह्यांचे लेखन बर्‍याचदा स्त्रीवादी गणले जात असले तरी समाजातल्या एकूणच शोषित, पीडित, पिळित वर्गाबद्दल ह्यांना आत्मीयता आहे. सामाजिक संशोधनकार्यात त्यांचा ह्या वर्गाशी प्रत्यक्ष संबंधही आलेला आहे. अनुभवाची धार असल्यामुळे, शोषण आणि अन्यायाबद्दल लिहीताना संताप संताप होऊन ह्यांच्या लेखणीला समशेरीचा आवेश चढतो. ऐसीवरील बहुतांशी तर्ककठोर चर्चांमध्ये भावनिक बाजू लढवणार्‍या सदस्या.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (10 votes)

प्रतिक्रिया

आदूबाळ ह्यांचाही ह्या यादीत समावेश हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा तूच का नाही एक लेख काढत मग ओळखीचा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१ सहमत .
मनोबा तूच आता आमच्यासारख्यांचा वाली, सुग्रीव अन जांबवंत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉलिड्ड्ड्ड!!!=))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाने