पासष्टाव्या कलेच्या विळख्यात

पासष्टाव्या कलेच्या विळख्यात

लेखिका - उसंत सखू

खरं म्हणजे मला लहानपणापासूनच चौसष्ट कलांत निपुण व्हायचं होतं. व्यापक समाजहिताच्या दृष्टीनं चौसष्ट कलांनी माझ्याशी छत्तीसच्या आकड्यातून सख्य दाखवल्यानं, मला त्यातल्या काहींचा फक्त आस्वाद घ्यायची संधी साधावी लागली. बाकीच्या कला 'अकलेच्या' गुलदस्त्यात ठेवून फक्त सिनेमा उर्फ पासष्टाव्या कलेबद्दल लिहायचं आहे हे बरं झालं, नायतर एवढे कष्ट कोण करेल प्रभो!

बालपणी मुंबईला असताना सिनेमाची पहिली ओळख विनोदाच्या माध्यमातून 'लॉरेल-हार्डी' आणि 'टॉम अँड जेरी' अशा अविस्मरणीय जोड्यांसोबत मजेत झाली. मी पाहिलेला पहिला हिंदी सिनेमा 'बॉम्बे टू गोवा' होता. त्यातली हिरवीण एकच ध्यास घेतल्यागत सतत संकटात सापडलेली होती. त्यातला, हिरो अमिताभचा "देखा ना हाय रे सोचा ना हाय रे" असा बसवर तंगड्या उडवत केलेला उंट डान्स पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं होतं. ह्या सिनेनृत्याशी कोरिओग्राफीचा बादरायण संबंध नव्हता. भोकाड पसरून रडणारं मूल अगदी असंच लोळून हातपाय आपटतं. त्यामुळे नृत्यकला शिकायची मुळीच आवश्यकता नाही, ती उपजतच येते याचा बाळबोध पहिल्याच सिनेमात झाला.

मुंबईला ‘कारवाँ’ आणि ‘उपहार’ असे आणखी दोन हिंदी सिनेमे पाहून धन्य होताच वडिलांची बदली झाल्यानं आम्ही एकदम अकोल्याला जाऊन पडलो. ते लहानसं गाव असूनही तेव्हा तिथे सात सिनेमा थिएटर्स होती. त्या गावात प्रथमच लाउडस्पीकरवरून कव्वाल्यांचा रतीब आमच्या कर्णसंपुटात ओतला जाऊ लागला. 'झूम बराबर झूम शराबी' आणि 'चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा' ह्या कव्वाल्या अजूनही माझ्या स्मृतिमंजूषेत टाळ्या कुटत बसतात. नंतर फिल्मी कव्वाल्या पाहून मात्र मम आत्मा दमला हां! कसलंही लॉजिक नसलेले 'लोफर', 'रूप तेरा मस्ताना', 'गाय और गौरी' वगैरे तद्दन भिकार हिंदी सिनेमे आम्ही शालेय जीवनात अगदी आवडीनं बघितले. तेंव्हा पाहिलेल्या ‘शोले’ ह्या सिनेमाचं गारूड अनेक वर्षं उतरलं नाही. त्याच्या डायलॉगची एल.पी. रेकॉर्ड ऐकून ऐकून सगळे संवाद पाठ झाले होते. त्याच वेळी लागलेला ‘जय संतोषी माँ’ हा भयाण सिनेमा मी प्राण गेला तरी पाहणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती आणि अजूनही ती मोडण्याचं पातक मी केलं नाहीये. 'मैं तो आरती उतारू रें संतोषी माता की' या डिप्रेसिंग गाण्यानं आत्महत्येचे विचार मनात उसळू लागायचे. सर्दट उषा मंगेशकरचं शेंबुडलं स्वरयंत्र निकामी कसं करता येईल हा एकच विचार मेंदू कुरतडत असे. हा सिनेमा पृथ्वीवरून नाहीसा होईपर्यंत झोर्बा ग्रहावर राहायला निघून जावं असाही विचार मी तेव्हा केला होता. अवकाशयान उपलब्ध नसल्यानं जमलं नाही. अलीकडे वयानुसार अशा भीष्मप्रतिज्ञा न करण्याएवढा चतुरपणा आलेला आहे.

नागपुरात मी कॉलेजमध्ये असताना हॉलीवूडचे काही विनोदी सिनेमे बघितले. तेव्हाचे रोमँटिक हिंदी सिनेमे रटाळच वाटले. राज बब्बरला आम्ही 'जरड मुळा' म्हणत असू आणि अमिताभला उंट! 'अंकुर', 'निशांत' वगैरे समांतर सिनेमे आणि नसिरुद्दीन, स्मिता, शबाना हे कलावंत आवडत होते. फारुख शेख हा माझा अत्यंत आवडता कलाकार आहे. ‘जाने भी दो यारो’, ‘चश्मेबद्दूर’ हे अजूनही आवडते सिनेमे आहेत. श्रीदेवी आणि शर्मिला उर्फ हॉर्मिला अश्या नट्यांचा कृत्रिम लाडीकपणा पाहून ओकाऱ्या यायच्या. स्वतःच्या सौंदर्याचं आणि गोऱ्या रंगाचं पाल्हाळिक वर्णन करणाऱ्या नायिका पाहून मला नेहमीच नवल वाटायचं की, अशा स्त्रिया भूतलावर नक्की असतात तरी कुठे? कालांतरानं आमच्या ऑफिसात अश्या स्वयंघोषित सुंदऱ्या 'याचि डोळा' बघायला मिळाल्या. एकंदरीत कॉलेजजीवनात लोकप्रिय हिंदी सिनेमातला रस कमी झाला तरी सिनेमाची गाणी ऐकणं हे जीवनाचं अविभाज्य अंग होतं. दादा कोंडके ह्यांचे काही मराठी सिनेमे थिएटरमध्ये जाऊन मजेत बघितले होते. बाकीचे बहुदा तमाशापट होते, जे फुकटात टीव्हीवर दाखवले तरी बघवत नव्हते. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन ह्यांनी मराठी सिनेमाला जालीय शब्दात सांगायचे, तर कायमचे 'दुश्ली ढ' वर्गातच बसवले. लक्ष्याची ती बिडी पिणारी, हिडीस, गर्भवती स्त्री भूमिका पाहून मराठी फिल्मोद्योग रसातळाला जाणार ह्याबद्दल त्या वेळी खात्रीच पटली. तेव्हा मीसुद्धा हौसेनं माझ्या अल्सेशियन कुत्र्याचं - जॅकचं डोहाळजेवण केलं होतं. माझ्या जॅकुलीला बनियान-चड्डी घालून छान फुलांनी सजवलं होतं आणि तिला सायीचा दहीभात आणि भूभूची बिस्किटं प्रेमाने भरवली होती, पण जॅकुलीनं बिडीचे झुरके घ्यायला मात्र साफ नकार दिला. भविष्यात 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'वळू' असे काही अपवादात्मक चांगले मराठी सिनेमे बघायला मिळाले. तर ते असोच.

कालांतरानं नोकरी आणि प्रपंचात गुंतून गेल्यानं थिएटरमध्ये सिनेमा पाहणं कमी झालं. केबल टीव्हीवर बदाबदा सिनेमे दाखवू लागल्यावर ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी गत झाली. काही वाहिन्यांवर हिंदीत डब केलेल्या भडक, दक्षिण भारतीय सिनेमांचा धुमाकूळ कायम सुरू असतो. चॅनल सर्फिंग करताना ठेच लागून थांबलात की अकस्मात अतर्क्य ज्ञानभांडार खुले होते. मानवाच्या मर्यादा, बुद्धी, उपलब्ध साधनसामग्री आणि विज्ञान ह्यांचा आणि दक्षिणी नायकांच्या अचाट कर्तृत्वाचा सुतराम संबंध नाही ह्याचा शोध लागतो आणि ऊर आनंदाने भरून येतो. हे मर्त्य नरपुंगव ह्याच भूतलावर कसे काय जन्माला आले ह्याचं नवल वाटू लागतं. तिथल्या नायिकांना गुटगुटीत शरीरसंपदेशिवाय अन्य गुणांची आवश्यकता नाही. कृषी विद्यापीठात मांसल ससेपालन किंवा मांसल कोंबडीपालन असे विषय असतात तद्वत मांसल हिरॉईनपालन, संवर्धन आणि यथेच्छ प्रदर्शन हा दक्षिणी सिनेमांचा अनिवार्य उपक्रम असतो. रजनीकांतसारख्या सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, महान किमयागाराचा अजून एकही सिनेमा पूर्ण पाहू शकले नाही ह्याची खंत मला नेहमीच राहील.

एचबीओ, स्टार मूव्हीज, वर्ल्ड मूव्हीज अश्या वाहिन्यांमुळे भरपूर इंग्रजी आणि इतर भाषिक सिनेमे घरबसल्या बघता आले. अर्थातच त्यामुळे हिंदी सिनेमातल्या मूळ प्रेरणांचं आकलन झालं. केबलवर बरेच सिनेमे पाठांतराला लावल्यासारखे कायम उपलब्ध असल्यानं तुकड्यातुकड्यांतून चिवट प्रेक्षकांत त्याचं विष झिरपत राहतं. गेली पाच वर्षं मी आमच्या इथल्या स्थानिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावते आहे. इथला 'सिने मोंटाज' हा फिल्म क्लब जॉईन केला आहे. जगातले अनेक अफलातून आणि अविस्मरणीय सिनेमे पाहून मी समृद्ध झाले आहे. असा हा कुबेराचा खजिना आता इंटरनेटकृपेने किती सहज हाताशी आला आहे हे अजूनही अविश्वसनीय वाटतं. अशा प्रकारच्या स्मरणीय सिनेमांच्या शोधात मी होते हे आकलन झाल्यानं, आता हे आगळेवेगळे सिनेमे मला चिकाटीनं जाणून घ्यायचे आहेत. मी इथे अॅबसर्डिटी, आभास, स्वप्न आणि वास्तव यांचा चकित करणारा खेळ पाहिला. आत्महत्या करायला निघालेले लव्हसिक गाढव, एका पिकून जर्दाळू झालेल्या गोड म्हाताऱ्यानं केलेलं उंटिणीचं बाळंतपण, स्वप्नातल्या स्वप्नात सांगितलेल्या इंद्रजाल कथा, तसंच हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या अद्भुत जलाशयात तरंगत्या मोनॅस्ट्रीमधे शिष्यासह राहणाऱ्या बौद्ध माँकची कथा अशा अनेक अलौकिक नजराण्यांमुळे मंत्रमुग्ध झाले.

दिव्यज्ञान होऊन मार्ग सापडला, तरी मोक्ष मिळावा म्हणून हिंदी सिनेमाचं ऋण फेडावं लागतं. यासाठी 'इट इज सो बॅड, दॅट इट्स गुड', असे वाह्यात सिनेमे पाहून जिवाची बाजी लावण्याशिवाय गत्यंतर नसतं. लोकहो, मनोजकुमार, राजकुमारचे सिनेमे पाहून देशाभिमान वगैरे जागवावा लागतो - सोपं नाहीये ते. नुकताच 'करण अर्जुन' नामक भीषण सिनेमा पाहून, हसून हसून कोमात गेले. त्यात चेटकिणीहून मनहूस दिसणाऱ्या ड्रग अॅडिक्टसम थेरड्या राखीला तिचे थेरडे दीर आणि त्याचे चमचे, एकच उद्योग असल्यागत 'प्रेझेंट कंटीन्युअस टेन्स'मध्ये छळत असतात. एक रँडम गावकरी टेकडीवरून आकाशवाणी प्रसवतो, "अर्जुनभैयाऽऽऽ, दुर्गाबेहेन पर अत्याचार हो रहे है।" तेव्हा आपल्यालाही ते कळतं. राखी वीस वर्षं रोज गावातल्या मंदिरात जाऊन पुजाऱ्याला बजावते, "मेरे करण-अर्जुन आयेंगे." पण तो एकदाही म्हणत नाही की, "अगं गर्दुल्ले, मला काही पडलेली नाहीये, चल नीघ इथून." एकदा या मनहूस बुढियाचा खेल खतम करायला, तिला जीपखाली चिरडून ठार करणारच असतात; तर आपल्या दुर्दैवाने तिथे एक रँडम गावकरी अकस्मात प्रकट होतो आणि तिला वाचवतो. खरं म्हणजे सिनेमा तिथेच संपला असता तर करण-अर्जुनला अवतार घ्यायची आवश्यकता पडली नसती आणि हा सिनेमा पाहूनही आपल्यावर अत्याचार झाले नसते. असो! आता लोकाग्रहास्तव 'पाताळभैरवी' सिनेमा पाहून आयुष्याचं तात्पुरतं सार्थक करावं म्हणते. हेल हिंदी सिनेमा!

तारकोव्हस्कीचे 'सॅक्रीफाइस'सारखे इंटेलिजंट सिनेमे माझ्या मेंदूला झेपले नाही की तो अधून मधून सुषुम्नावस्थेत जातो. तरीही मी चिकाटीने सिनेमा बघते. स्व. तारकोव्हस्की माझ्यासारख्या पामराला क्षमा करेल अशी आशा आहे. काही अनाकलनीय, रटाळ आणि अंतहीन सिनेमेपण बघितले. 'थ्री टाईम्स' हा दिग्दर्शक - हयाव ह्येन होऊ (किंवा तत्सम)चा एक रटाळ अंतहीन, तैवानी सिनेमा पाहिला होता. यात इसवी सन १९११, १९६६ आणि २००५ मध्ये प्रेम व्यक्त करण्याची माध्यमं दाखवून प्रेक्षकांना पिळून काढलं आहे. १९११ मधली गायिका बाराखडीतले फक्त अ ते अः स्वर नरड्याचे पीळ कधी आवळत तर कधी सैल सोडून, भयाण, नरकीय सूर आळवते. सिनेमा जणू काही स्लो मोशनमध्ये शूट केला आहे असं वाटतं. आरशासमोर बसून राहणं, हात धुवायला पाणी घालणं, नाहीतर नरडं मोकाट सोडून प्रेक्षकांना कोमात पाठवणं याशिवाय काऽऽऽऽही घडत नाही. १९६६ मधली नायिका, येत नसतानासुद्धा फक्त पूल गेम्स खेळते. नायक बोटीतून ये जा करतो आणि १-२ पत्रे लिहितो. इतक्या आत्यंतिक घडामोडींमुळे आपण कडेलोट दमतो. नंतर आपल्याला झोप लागू नये म्हणून २००५ मध्ये नायिका कहर गोंगाट करून उगीच शांततेचा भंग करते. एव्हाना समाधी अवस्थेला पोचलेले मोजकेच प्रेक्षक दचकून जागे होतात आणि... 'नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहेऽऽऽ' अशी करुण आळवणी करू लागतात. नासेर खेमरच्या 'वॉण्डरर्स ऑफ द डेझर्ट'मध्ये भगभगीत उजेडातल्या रुक्ष वाळवंटातले गाव, गूढ गावकरी, रहस्यमय शापाने मंतरलेले वातावरण आणि गावात आलेला नवीन शिक्षक यांची अनाकलनीय कथा आहे. गावातल्या मुलांची ब्राह्मणासारखी लांब शेंडी आणि शाओलीन टेंपलवाल्या मुलांसारखी वेशभूषा आणि गावात कुठेतरी सुरू असलेले हुबेहूब मंत्रोच्चारांसारखे कुराणातले(?) आयातपठण पाहून, "ये क्या हो रहा है नासेर भैया?? हमरी समझ में तो कुछ भी नही आया...", असे मनातल्या मनात पुटपुटले. तरी हिंमत न हारता मी असेही सिनेमे बघतेच आहे.

कुरोसावा, इंगमार बर्गमन आणि तारकोव्हस्की, असे अनेक बुद्धिमान दिग्दर्शक समजून घेणे अवघड आहे, पण प्रयत्न सुरू आहे. जाफर पनाही, किस्लोवस्की, केस्तुरिका, माजिदी आणि कोरियन दिग्दर्शक किम की डूक याच्यासह काही जपानी, चिनी दिग्दर्शकांचे विस्मयचकित करणारे सिनेमे बघितले आणि आजन्म त्यांच्या ऋणात बांधली गेले. या अथांग सिनेसागरातून माझ्या ओंजळीत जे काही आले ते अनमोल आहे. असीम शांती, इंद्रधनुष्यी स्वप्ने, स्वर्गीय संगीत, अलौकिक प्रतिभा, अद्भुत कथा आणि अनुपम अभिनय यांच्या गारुडाने मला या रोमांचक पासष्टाव्या कलेच्या विळख्यात बंदिस्त केले आहे.

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

मांसल हिरॉईनपालन काय, पाठांतराला लावलेले चित्रपट काय, पिळून निघालेले समाधीवस्थेस पोचलेले प्रेक्षक काय.. अरारारारा!
बाजार उठवलाय नी तरी तुमच्या भल्यामोठ्ठ्या चित्रपट-व्यासंगाचे चांगले संकलन/दर्शन करून दिलेत.

पासष्टावी कला आहेच अशी कितीही नखरे केले तरी निघून जा आयुक्शातून असे म्हणवत नाही.!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्तच. आवडलं ब्वा. त्यातही आवडलेला भाग. अगदि मझ्या मनातलं लिहिलत असं वाटावं असा:-
नुकताच 'करण अर्जुन' नामक भीषण सिनेमा पाहून, हसून हसून कोमात गेले. त्यात चेटकीणीहून मनहूस दिसणाऱ्या ड्रग एडीक्टसम थेरड्या राखीला तिचे थेरडे दीर आणि त्याचे चमचे, एकच उद्योग असल्यागत 'प्रेझेंट कंटीन्युअस टेन्स'मध्ये छळत असतात. एक रँडम गावकरी टेकडीवरून आकाशवाणी प्रसवतो, "अर्जुनभैयाऽऽऽ, दुर्गाबेहेन पर अत्याचार हो रहे है।" तेव्हा आपल्यालाही ते कळतं. राखी वीस वर्षे रोज गावातल्या मंदिरात जाऊन पुजाऱ्याला बजावते की "मेरे करण-अर्जुन आयेंगे", पण तो एकदाही म्हणत नाही की, "अगं गर्दुल्ले, मला काही पडलेली नाहीये, चल निघ इथून". एकदा या मनहूस बुढीयाचा खेल खतम करायला, तिला जीपखाली चिरडून ठार करणारच असतात तर आपल्या दुर्दैवाने तिथे एक रँडम गावकरी अकस्मात प्रकट होतो आणि तिला वाचवतो.
.
'प्रेझेंट कंटीन्युअस टेन्स'मध्ये छळत असतात हे हायक्लास वर्णन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख वाचताना 'प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधे' हंसलो.
कारवाँ सिनेमातली गाणी बघताना, अरुणा ईराणीने हिरोला आपल्या वक्षांनीच धक्के देताना
बघितले तेंव्हा त्याच्या पाठीला विवरे कशी पडली नाहीत, याचे तेंव्हा आश्चर्य वाटले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमिताभच्या बाँबे टू गोवा च्या नाचाबद्दल खुद्द मेहमूदच्या तोंडून किस्सा इथे

बाकी पासष्टावी कला जाहीरात की काय असे वाचले होते, माझी गल्लत होती आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"पान सापडले नाही" असे लिहून येत आहे सदर दुवा क्लिकल्यावर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सहजराव , जी चौसष्ठ कलांच्या नंतर येते त्या कुठल्याही कलेला पासष्टावी कला म्हटल्यास काय हरकत आहे ? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कहर! समाधीअवस्था, पाठांतर, प्रे.कं.टे., गर्दुल्ले, चिरडून ठार..... लोळणफुगडी घालून हसले!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लोळणफुगडी
मस्त शब्द.
राघांनी मागे "जांगडगुत्ता" ह्या शब्दाशी अशीच ओळख करुन दिली होतीत.
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सगळा लेख फक्कड, पण

कृषी विद्यापीठात मांसल ससेपालन किंवा मांसल कोंबडीपालन असे विषय असतात तद्वत मांसल हिरोईनपालन, संवर्धन आणि यथेच्छ प्रदर्शन हा दक्षिणी सिनेमांचा अनिवार्य उपक्रम असतो.

हे काळजाला भिडलं. या यथेच्छ प्रदर्शनात आघाडीवर असलेला एक दिग्दर्शक म्हणजे राघवेंद्र राव. त्याच्या पिच्चरमध्ये नाभीप्रदर्शनाचा विशिष्ट फॉरमॅट ठरलेला असतो असे एका तेलुगु मित्राने सप्रमाण दाखवल्यावर कळायचं बंद झालं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असे अफलातुन विषय ऑफिसच्या कामात कानावर आदळत असतात .

बॅटमॅन,यावर प्रकाश टाकून आमच्या ज्ञानात भर टाकावी , उत्सुकतेने मांजर मरू लागलय .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याच्या पिच्चरमधल्या गाण्यात हिरॉईनच्या बेंबीवर फळ मारल्याचा किमान एक शीन असतो. तेलुगु मित्राला विचारून तूनळी दुवा टाकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हंजे सन्नी देवल - सुनील शिट्टी ह्यांच्या पिच्चर मधी येकतरी हापसा उपटण्याचा, एका हातात स्टेनगन अन् मशिनगन घेतल्याचा शीन अस्तो तसं काय?
.
किंवा इम्रान हाश्मी च्या पिच्चरमधी एकतरी आसुसल्या सारखा दीर्घ चुंबन घेण्याचा शीन अस्तो तसं काय?
किंवा:-
हल्लीच्या हिरोइनच्या पिच्चरमधी एकतरी शीन त्यांनी कप्डे घातलेला , न-उन्मादक र्‍हातो, तसं काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Smile Smile Smile
त्या धरमेंढर ला रक्त द्यायची कधी वेळच येत नाही कारण तो एकच ध्यास घेतल्यागत
कमिन्या कुत्त्याचं खून पिऊन कुठेतरी जात असतो Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्दट उषा मंगेशकरचं शेंबुडलं स्वरयंत्र निकामी कसं करता येईल हा एकच विचार मेंदू कुरतडत असे. हा सिनेमा पृथ्वीवरून नाहीसा होईपर्यंत झोर्बा ग्रहावर रहायला निघून जावं असाही विचार मी तेव्हा केला होता. >>> सॉल्लीड !! Biggrin

जरड मुळा >>>> अशक्य शब्द आहे हा. ठार झालो. सर्वत्र अशा चपखल उपमांची रेलचैल आहे. एरव्ही खूप गंभीर होऊ शकणारा लेख खुसखुशीत शैलीत वेगळ्या धाटण्याच्या सिनेमांचा थोडक्यात धांडोळा घेऊन गेला.

बाकि सगळ्या लेखासाठी
__/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

....

हा हा मस्त ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लाईट!!! छानच. "डोक्याला नो कल्हई" लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0