मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे...

मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे...

लेखक - परिकथेतील राजकुमार

सध्या बघावे तिकडे 'मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे' असा जयघोष ऐकायला मिळतो आहे. विविध माध्यमे, मग अगदी प्रिंट मिडिया असो अथवा सोशल नेटवर्क, सतत हेच बोंबलत आहेत की, मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे. आम्ही 'विनोद मोठा झाला आहे' हे ऐकले होते, पण ही नवीन 'प्रगल्भ'ची काय भानगड आहे ते काय उमजेना. मग आम्ही आधी 'प्रगल्भ' आणि 'मोठं होत जाणं' म्हणजे काय ह्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. कुठल्याही ठिकाणी ह्याची व्याख्या मिळेना. मग आम्ही आंतरजाल पालथे घातले. तिथे एके ठिकाणी शारीरिक, बौद्धिक इ. इ. विकास होणे, आवाका वाढणे म्हणजे प्रगल्भता असा काहीसा अर्थ सापडला. सारांश काय, तर विविध अंगाने विकास होणे म्हणजे प्रगल्भ होणे हे ज्ञान आम्हांला प्राप्त झाले. आता ज्ञानप्राप्ती झाल्याबरोबर आम्ही मराठी चित्रपटसृष्टीची प्रगल्भता तपासायला घेतली. अनेक संदर्भ, लेख, जाणकारांचे लेखन हे वाचलेच, पण विविधांगी चित्रपटदेखील पाहिले. ह्यांतून आम्हांला जे उमगले त्याचा लेखाजोखा तुमच्या पुढे मांडत आहे.

'भारतात एके काळी सोन्याचा धूर निघायचा, पण पुढे इंग्रज आले आणि भारताला अवकळा आली; भारतीय जणू मृतप्राय झाले. इंग्रजशाही संपुष्टात आल्यावर मग वाहन उद्योग, आयटी यांसारख्या इंडस्ट्रीजनी भारताचे नाव पुन्हा रोशन करून भारताला महासत्तेकडे नेण्यास सुरुवात केली आहे.' साधारण वाक्ये हीच, अर्थ हाच, हे आपण खूप वेळा वाचले आहे, नाही? आता हाच शब्दसमूह थोडा बदलला आणि 'मराठी चित्रपटसृष्टीतून एके काळी सोन्याचा धूर निघायचा, पण पुढे लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, अलका कुबल आले आणि मराठी चित्रपटसृष्टीला अवकळा आली, प्रेक्षक जणू मृतप्राय झाले. ह्यांसारख्या लोकांची सत्ता संपुष्टात आल्यावर मग सचिन, महेश कोठारे, रवी जाधव ह्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे नाव पुन्हा रोशन करून मराठी चित्रपटसृष्टीला प्रगल्भ बनवण्यास सुरुवात केली आहे.' असे वाचा. कसे छान छान, गारेगार वाटतेय ना?

मराठी चित्रपटांचा प्रगल्भतेकडे जाण्याचा प्रवास 'श्वास'पासून सुरू झाला म्हणे. (बहुधा 'बालक पालक' आणि 'टाइम प्लीज'पाशी तो श्वास गुदमरला असावा.) प्रगल्भतेची चर्चा करताना हटकून जी उदाहरणे दिली जातात किंवा ज्या चित्रपटांचा उल्लेख केला जातो, ते खरेच येवढे मोठे श्रेय द्यायच्या लायकीचे आहेत का? ‘चला, मराठी चित्रपटाला प्रगल्भ करू’ असा अभिषेक रोहिडेश्वराला करून आज कोण कोण निर्मिती, दिग्दर्शन करत आहेत? 'येड्यांची जत्रा'वाले उद्या जर मराठी चित्रपटाला वेगळे वळण देणारा चित्रपट आणि 'बालक पालक'वाले मराठी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारा चित्रपट अशी स्वत:च स्वत:ची ढोलकी वाजवणार असतील, तर आपण आदराने हात जोडलेलेच बरे. प्रगल्भतेच्या उदाहरणांमध्ये 'बालक पालक' आणि 'टाइम प्लीज'? वयस्कांनी अभिनय केलेले लहान मुलांचे चित्रपट मी आजवर पाहिले होते. पण लहानग्यांनी अभिनय केलेला आणि खरेतर वयस्कांसाठीच असायला हवा असा 'बालक पालक' पहिल्यांदाच पाहायला मिळाला. गंमत म्हणजे समाजाला प्रगल्भतेकडे नेण्यासाठी तयार झालेल्या ह्या चित्रपटाची जाहिरात करताना मात्र चित्रपटाचे नाव कटाक्षाने 'बीपी' असेच गाजत राहील ह्याची काळजी घेतली गेली. अरे वाह रे प्रगल्भता!

दुसरे उदाहरण 'टाइम प्लीज'चे. 'लव्हस्टोरी लग्नानंतरची', 'मराठीला नवे आयाम' अशी बिरुदे लावून आलेला हा चित्रपट. प्रत्यक्षात पाहायला काय मिळाले? 'ए भाड्या' अशी हाक मारणारी, मनातल्या मनात का होईना पण 'गच्चीवर झाड, झाडांचा पडला सडा... आणि हृषीकेशचे नाव घेते तुमच्या आयचा ****' असे म्हणणारी नायिका? नुसता मोबाईल सापडत नाही म्हणाल्यावर, तो कुणीतरी लपवलाय असे गृहीत धरून 'अच्चीवर गच्ची.. गच्चीत तळं...' अशी शिवी सुरू करणारा नायक? ह्याला प्रगल्भता म्हणतात? का 'माझी एक फॅन्टसी आहे, पहिल्या वाढदिवसाला ‘लाइट हाउस’मध्ये करायचं.' असे झकास संवाद म्हणजे प्रगल्भता? मग दादा कोंडके काय वाईट होते? खरेतर ते नव्हतेच, त्यांनी काय थोडीफार प्रगल्भता आणली असेल तर असेल. सध्या प्रचंड गाजत असलेले उदाहरण म्हणजे 'मराठीला करोडोंच्या लायनीत उभा करणारा चित्रपट', अर्थात ‘दुनियादारी’चे. करोडोंचा व्यवसाय? असेल असेल, तो काय आमचा प्रांत नाही. टॅक्स भराल तेव्हा खरे काय ते कळेलच. प्रश्न आहे तो हा की, ह्या चित्रपटाने प्रगल्भतेच्या प्रवासात काय योगदान दिले? शून्य + पूज्य असे हे योगदान. एका चांगल्या कथेची वाट कशी लावावी, प्रेक्षकांसाठी, सुशिप्रेमींसाठी चित्रपट काढतोय असे सांगून प्रत्यक्षात आवळा देऊन कोहळा कसा काढावा, यश मिळाल्यावर जमेल तेवढे मूळ कथेच्या लेखकाचे नाव प्रत्येक प्रसिद्धीत शक्यतो लांब कसे ठेवावे, हे प्रगल्भ शिक्षण देण्यात मात्र हा चित्रपट प्रचंड यशस्वी मानायला हवा. चित्रपटाच्या यशात सगळ्यांत मोठा वाटा हा संगीताचा आणि आपण केलेल्या बदलाचा कसा आहे हे सांगतानाची प्रगल्भता तर क्या केहने!

ह्याचा अर्थ मराठीत खरेच आशयघन, प्रगल्भ चित्रपट बनतच नाही आहेत का? नाही, असे बिलकुल नाही! वळू, जोगवा, गोष्ट छोटी डोंगराएवढी, पांगिरा, बदाम राणी गुलाम चोर, क्षणभर विश्रांती असे अनेक उत्तमोत्तम चित्रपट बनले आहेत आणि बनत आहेत. 'विहीर'सारखे चित्रपट अनेक पुरस्कार समारंभांत देश-विदेश हिंडून आले खरे, पण 'विहीर' नक्की किती लोकांनी बघितला, किती लोकांना आवडला आणि किती लोकांना कळला हे मुद्दे आहेतच. आनंदाचे झाड, एक डाव धोबी पछाड, क्षणभर विश्रांती, निशाणी डावा अंगठा असे वैविध्यदेखील बघायला मिळाले. पण विनाकारण ढोल बडवले जातात ते भलत्याच चित्रपटांचे. गल्ला भरायला चित्रपट काढायचे आणि प्रगल्भतेचे डोहाळे दाखवायचे कशाला? प्रेक्षकसंख्या वाढली, पैसा आला म्हणजे प्रगल्भता आली? 'फिल्मफेअर' आणि 'आयफा'ची झेरॉक्स वाटावी असे सोहळे मराठी चित्रपटांसाठी परदेशात व्हायला लागले म्हणजे प्रगल्भता आली? 'मै जिंदगीका साथ निभाता चला गया..' आणि 'सावन बरसे जोमात..' असले शब्द मराठी गाण्यांत यायला लागले म्हणजे प्रगल्भता आली? नक्की प्रगल्भता म्हणू तरी कशाला आम्ही?

आज अक्षय कुमार, अमिताभ यांसारखे धोरणी व्यावसायिक लोक मराठी चित्रपटात पैसा गुंतवत असतील, तर तो काय मराठी सिनेमा प्रगल्भ झालाय म्हणून? नाही, पैसा वसूल होण्याची आणि कीर्ती मिळण्याची खात्री आहे म्हणूनच. प्रगल्भता घेऊन काय चाटायची आहे त्यांना? ह्यांची गुंतवणूक म्हणजे प्रगल्भता असे मानणारे ह्यामुळेच मूर्ख वाटायला लागतात. हे परवडले असा कहर राज्य सरकारने मांडला आहे, अनुदानाच्या रूपाने. मराठी चित्रपटाचे अनुदान + गुंठामंत्री + भरत जाधव / मकरंद अनासपुरे = प्रगल्भता? ह्या घातक युतीचे परिणाम ह्याआधी आपण पाहिलेले नाहीत का? 'बायको हरवली स्टँडवर' आणि 'चिकट नवरा' यांसारखे भयाण अनुभव स्मृतीतून पुसले गेले आहेत का? आता तर काय म्हणे, आधी दोन चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव असेल, तरच मिळणारे सरकारी अनुदान, आता फक्त एका चित्रपटाच्या निर्मितीच्या अनुभवानंतर मिळू शकणार आहे. हे कमी का काय, म्हणून राज्य सरकार वर्षाला दोन चित्रपट बनवणार आहे. आता मला सांगा, जर मराठी चित्रपट प्रगल्भ होतो आहे, करोडोंची कमाई करतो आहे, तर सरकारला ही थेरं करायची गरजच काय आहे? नक्की मराठी चित्रपट प्रगल्भ होतोय, का डबघाईला येतोय?

चित्रपटाशी संबंधित अनेक क्षेत्रं आहेत - जसे की संगीत, दिग्दर्शन, नृत्य, अभिनय - हे मान्य आहेच. पण ह्या क्षेत्रांतदेखील फार काही प्रगल्भता दिसते आहे असे वाटत नाही. संगीत नक्की सुधारते आहे, शब्दांना महत्त्व येत चालले आहे हे मान्य करायलाच हवे. पण चित्रपट संपल्यावर बाहेर पडताना असे कितीसे शब्द नकळत ओठांवर येतात हे महत्त्वाचे. बाकी 'टिक टिक' वाजवून सतत जाहिराती, प्रोमो, रिंगटोन, प्रमोशनमधून केलेल्या मार्‍याबद्दल बोलायलाच नको. ‘जोगवा’ची गाणी कशी नकळत मनात घर करून गेली ते कळलेच नाही. अगदी 'आभास हा..'सारखी गाणीदेखील अप्रतिम. नृत्याबद्दल न बोलणेच बरे. 'राणी माझ्या मळ्यामंदी...' आणि 'नवरी नटली', 'रिक्षावाला..' बघून डोळ्याचे पारणे अगोदरच फिटलेले आहे. ‘नटरंग’च्या नृत्यांबद्दल चर्चा करणे म्हणजे अभिनयाबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी (लहानगी)चे उदाहरण देण्यासारखे आहे.

अभिनयात काही प्रगल्भता? प्रस्थापित बाजूला सारले, तर केतकी माटेगावकर, मनवा नाईक, हेमंत ढोमे, अंशुमन जोशी इ. खरेच आवडून गेले. सचिनची मुलगी आणि कोठारेंचा पुतळा मात्र कळसूत्री बाहुल्यांच्या तोडीचादेखील अभिनय करू शकत नाहीत हे पटले. दिग्दर्शनाविषयी बोलताना कै. राजीव पाटीलसाहेबांचे नाव आदराने घ्यायलाच हवे. अनासपुरे-सयाजी शिंदे-भोसले ही त्रयी मिळून सध्या मराठीत जे काही निर्माण करते आहे, त्यांतल्या प्रत्येक कलाकृतीला नक्कीच दाद द्यायला हवी. बाकी एकुणातच 'प्रगल्भतेच्या बुरख्याआड.. अनुदान झिंदाबाद' असेच चित्र दिसले.

जाता जाता आठवले, काय हो, ‘मराठीतील आघाडीची नायिका वेश्याव्यवसायाखाली अटकेत’, ‘मराठीतल्या आघाडीच्या तारकेला अल्पवस्त्रात भर मध्यरात्री दारू ढोसून दंगा करताना अटक’, किंवा ‘ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला कास्टिंग काऊचसाठी अटक’, ‘आघाडीचा मराठी नायक गोव्यात वेश्याव्यवसाय करणार्‍या मसाज सेंटरमध्ये सापडला' ह्या पोलिसी नोंदींना आणि पेपरातल्या बातम्यांना प्रगल्भता म्हणता येईल काय हो?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

परा,
जे कधीचे मनात खदखदत होते, परंतु शब्दांकित करता येत नव्हते ते तुम्ही व्यवस्थित मांडले आहेत. प्रगल्भता ह्या शब्दाचा अर्थ जाहिरातबाजीच्या गदारोळात साफ हरवला आहे, किंबहुना त्याचा विपर्यास केला जात आहे. लुईस कॅरोलच्या शब्दांत,
"When I use a word,' Humpty Dumpty said in rather a scornful tone, 'it means just what I choose it to mean — neither more nor less."
तसे झाले आहे. जो तो आपापल्या सोयीचे अर्थ काढतो. आपल्या हाती उरते ते फक्त पु.लं.च्या भाबड्या बाल पात्राच्या वाक्यातील एक शब्द बदलून विचारणे:
"प्रगल्भता म्हणजे रे काय, भाऊ?"

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

आप्ले बी म्हंण्णे शेम टू शेम हाये! लेख आवडला! ह्याप्पी दिवाळी पराभौ!

फकस्त क्षणभर विश्रांती चे नाव उत्तम चित्रपटाच्या यादीत बघुन दचकलो.. Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख झकास. ही तूर्तास पोच. शेवटच्या तीन ओळी सोडल्या तर आवडला. पण....
शून्यापेक्षा काहीही मोठच असतं ही फ्याक्ट आहे.
.
लेखात मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, कायद्याचं बोला इथपासून ते झेंडा, मुंबई पुणे मुंबई, हरिश्चंद्राची फॅक्टरी, शाळा , वळू, देऊळ आणि रिंगा रिंगा, पुणे ५२(हे साले शेवटचे दोन पहायचे राहून गेले. आता सिड्याही मिळत नाहित दुकानांत.) ह्या अलिकडच्या काळातल्या चित्रपटांचा उल्लेख राहून गेला वाट्टं.
चांगले , वाईट हे कसेही असू देत पण लेखात ज्या धाटणीच्या मेन स्ट्रीम मधल्या मिडियाचर्चित पिच्चरांचा उल्लेख आहे; किंवा ज्यांनी काहीएक किमान गल्ला जमवलाय,
किंवा निदान पुरस्कार पटकावलेत ह्या सगळ्यात हे पिच्चर येतात. निदान प्रतिसादातून तरी ह्यावर परास्टाइल टिप्पणी असली तर बरं.
.
पिंक क्र १
जाता जाता आठवले, काय हो, ‘मराठीतील आघाडीची नायिका वेश्याव्यवसायाखाली अटकेत’, ‘मराठीतल्या आघाडीच्या तारकेला अल्पवस्त्रात भर मध्यरात्री दारू ढोसून दंगा करताना अटक’, किंवा ‘ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला कास्टिंग काऊचसाठी अटक’, ‘आघाडीचा मराठी नायक गोव्यात वेश्याव्यवसाय करणार्‍या मसाज सेंटरमध्ये सापडला' ह्या पोलिसी नोंदींना आणि पेपरातल्या बातम्यांना प्रगल्भता म्हणता येईल काय हो?

ह्या बातम्या बॉलीवूड, हॉलीवूड किंवा लेखन क्षेत्रातल्या लोकांबद्दल नसतात का? सनी लिओन इकडे बॉलीवूडला येते. हा त्याउल्ट प्रवास म्हणायचा का?
खुद्द महाप्राचीन सिनेकाळ असताना सैगल, सआदत हसन मंटो ह्यांच्या काळातल्या बातम्या काय असत? आजच्या हिरोइनवर वेश्या व्यवसायाचा आरोप आहे.
बादवे,१९३०च्या दशकात काही वेश्याच हिरोइन्स बनत. "सती अनसूया" चित्रपटातील लीड रोल वेश्येनच केला होता. त्यासाठी भारतीय सिनेसृष्टीतला दुर्मिळ असा पूर्ण नग्न सीनही दिला होता.
मुळात शरीरविक्रय सुद्धा खराब, वाईट नाहिच वगैरे लिबरलांनी सुरु केलं तर चर्चा भरकटेल म्हणून मी गरिब सामान्य तिकडचं वळण देत नाही चर्चेला.
एका अति थोर शास्त्रीय गायकाबद्दल दोन दोन लग्ने आणि नंतर चमत्कारिक वागणूक ऐकल्यावर राग येइल इतपत माहिती उपलब्ध असतानाही त्याला आपण थोर्थोर, त्या क्षेत्रातल्या कामगिरीमुळे ऋषीतुल्य वगैरे समजतोच ना. क्षेत्रातली कामगिरी आणि वैयक्तिक शुद्ध आचरण ह्यांची सांगड असेलच असे नाही. माणूस आहे; मातीचे पाय आहेत. चालायचच.
.
निळू फुले -श्रीराम लागू ह्यांचा मास्टरपीस म्हणजे सामना. त्यानंतर सिंहासन सुद्धा ग्रेटच.
पिंजरासुद्धा मला प्रचंड आवडतो. त्याच्याही बद्दल उलट सुलट बोललं जातच. पण मला आवडलं ते हे की व्याव्सायिक धंद्याची गणितं तर सांभाळायची आहेत, पण
मूल्य, व्यवस्था ह्याबद्दल काही एक विधानही आहे; चूक असेल, बरोबर असेल पण एक विचारही मांडण्यात आलाय. एकाहून एक क्लास लावण्याही आहेत. चित्रपटाचा शेवटही त्यांना नीट जमला नसेल पण तरीही इतर लावणीपटांपेक्षा तो फार फार उच्च आहे. चित्रपटात कुठेच कथा थांबवली अणि आता गाणं सुरु झालं असं होत नाही.
.
श्रीराम लागूंचा "झाकोळ"सुद्धा भारिच आहे. कित्येकांना तर तो माहितही नसतो. काहिंना कुमार गंधर्वांच्या "आज अचानक गाठ पडेल"मुळे तेवढ्यापुरता माहित असतो.
.
तर सांगायचं म्हणजे हे सगळं होत होतं तेव्हा मराठी पिच्चर कुठे होते? ते सुवर्णयुग वगैरे होतं का? तेव्हा हरेक पिच्चर मास्टरपीस होता का? अजाबात नाय.
टक्केवारीत मलमली रेशमाची उपलब्धी ही पॉलिस्टर कीम्वा टेरिलिन ह्या स्वस्त कापडाच्या तुलनेत अल्प- अत्यल्पच राहणार ही फ्याक्ट आहे.
अत्युत्कृष्ट गोलंदाज असला तरी दहा चेंडूत दहा विकेटांची अपेक्षा करणं जरा अन्यायकारक वाटतं. त्यानं नियमित दहा षटकांत तीन्-चार निर्णायक बळी मिळवले तरी तो चांगलाच गोलंदाज
असतो की.
"चक दे इंडिया"ते नक्की काय चांगलं आहे हे एकानं विचारलयवर "शाहरुख असल्यावर (आणि भरीला आख्खी महिला टीम!! प्रेम त्रिकोण चौकोन, बहुकोनांना चान्सच चान्स!!) जे असायला
पाहिजे ते त्यात नाही ; हेच खूप छान आहे" हा निश्वास टाकल्याचं मला आठवतय.
लक्ष्याला इंडस्ट्रीनं नीट सादर केला नाही तसच अरुण सरनाइकांनासुद्धा वाया घालवला. तेसुद्धा बरच काही करु शकले असते.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रगल्भता व्याख्या करायच्या फंदात पडणे सगळ्यांसाठीच अवघड असावे. पण बुद्धिजीवी कलासक्त मराठी कलावंतांनी प्रगल्भतेच्या व्याख्या त्यांच्यापुरतीच ठरवली आहे असे वाटते.

महागाई वाढलेल्या काळात आपल्या म्हातारपणासाठी, बायकापोरांसाठी पैसा महत्वाचा आहे ओळखुन पैशासाठी कलात्मक तडजोडी करुन सिनेमा, मालीका, स्टेज शोज इ. व निव्वळ कलेकरता चांगल्या भुमीका स्वस्तात. एखादे नाटक , अजुन कुठले प्रकल्प यात प्रगल्भता सापडत असावी.

तमाशा, मग कौटुंबीक मग विनोदी लाटेत वहाणारा मराठी सिनेमा आता अनेक वैविध्यपूर्ण विषयावर तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळे प्रयोग करत आहे हे सकारात्मक आहे म्हणायचे.

तमाशा, मग कौटुंबीक मग विनोदी लाटेत वहाणारा मराठी सिनेमा आता अनेक वैविध्यपूर्ण विषयावर तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळे प्रयोग करत आहे हे सकारात्मक आहे म्हणायचे.

हे पर्फेक्ट बोल्लात.
पण ह्यावर पराचीच चेपुवरची पोस्ट वाचून धास्ती बसलीये, तीही मार्मिकच होती.(च्यामारी हल्ली "मार्मिक", "रोचक" हे शब्द फारच तोंडात रुळलेत.)
"मराठी पिच्चर लावणीतून सुटला नि लग्नात अडकला" . त्याची भीती अनाठायी नाही; वाटचाल तिकडे सुरु आहे.
सवडिनं अधिक पिंका टाकतो.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आवडला....

>>मराठी चित्रपटसृष्टीतून एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा पण पुढे लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, अलका कुबल आले आणि मराठी चित्रपटसृष्टीला अवकळा आली, प्रेक्षक जणू मृतप्राय झाले. ह्यांसारख्या लोकांची सत्ता संपुष्टात आल्यावर मग सचिन, महेश कोठारे, रवी जाधव ह्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे नाव पुन्हा रोशन करून

यातला पहिला गट आणि दुसरा गट हा प्रत्यक्षात एकच गट होता (अवकळा आणणारा) असे वाटते.
रवी जाधव यांच्याविषयी ठाऊक नाही.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यातला पहिला गट आणि दुसरा गट हा प्रत्यक्षात एकच गट होता (अवकळा आणणारा) असे वाटते.
रवी जाधव यांच्याविषयी ठाऊक नाही.
+१
त्यांच्या त्याच त्या पणानं बट्ट्याबोळ केला हे खरेच.
.
डिस्पाइट ऑफ ऑल धिस, लक्ष्याचं "धनंजय माने इथेच राहतात का" ह्या लिजंडारी डायलॉग मधलं टायमिंग, "धूमधडाका " मधलं अशोक सराफांचं हिट्ट "व्याक्ख्या विक्क्ख्खीं विख्ख्खेयुम " करुन खोकणं जबरदस्त आवडलं. अशोक सराफनं तो आख्खा पिच्चर खाउन टाकल्यासारखं वाटलं. नंतर अशोक सराफ कधीच महेश कोटहरेंसमवेत दिसले नाहित.( थिल्लर "आयडीयाची कल्पना " हे कलाकार अशोक सराफ आणि कलाकार महेश कोटहरे ह्यांनी केलेले नसून त्यांच्या मृतात्म्यांनी केलेले आहेत. तो अपवाद सोडून.)
महेशचा आवडलेला "धूमधडाका" होता तसाच "झपाटलेला" सुद्धा जबरदस्त इम्पॅक्टिंग होता. तात्या विंचू ला कोण, कसं विसरेल.(मूळ child's play पेक्षा सुद्धा मला हाच मराठी अवतार भावला.)
.
सचिन पिळगावकरांचं म्हणाल तर वर लिहिलेलं "धनंजय माने इथेच राहतात का" हे भन्नाट. त्याचप्रमाणं अस्सल महाराष्ट्रियन मातीचा सुगंध असलेलं, विविध लोककलांनी एकेक कडवं चपखल सादर केलेलं "अष्टविनायक" मधलं "अष्टविनायका तुझा महिमा कसा" हे इतकं सुंदर आहे की ते आवडण्यासाठी तुम्ही आस्तिक नि भाविक असायची गरजच नाही. त्या एका गाण्यानी त्यांची आयुष्यात इतर काही पापं असलीच(आयडीयाची कल्पना वगैरे) तर नक्कीच धुतली जावीत.
.
लक्ष्या भंपक नव्हता. उथळ नव्हता. साला ती वेळ वाईट चालली होती मराठी पिच्चरांची. "माणूस" कुणी पाहिलाय लक्ष्याचा ? "एक होता विदूषक" हा चित्रपट पु लं चा असूनही बकवास वाटला.संहिताच गंडलेली वाटली. तरीही त्यातलं लक्ष्याचं काम आवडलं.
अमिताभनंसुद्धा तूफान, महान्,जादूगर हे चित्रपट शेवटच्या कालात केलेच की. म्हणून तो फडतूस ठरत नाही. त्याचे बहुसंख्य पिच्चर बकवास असले तरी तो एक ग्रेट कलाकारच ठरतो.
.
शोभना समर्थ ह्यांनी मुळूमुळू रडणार्या सात्त्विक सात्विक नायिकांच्या भूमिका केल्या म्हणतात. पण ते सीन्स झाल्यावर त्या शांतपणे सिगारेटचा झुरका घेत पडून रहात.
म्हणणे इतकेच की चित्रसृष्टीचा भिकार किंवा चांगला टाइम सुरु असताना फोकस समोर दिसलेल्या माणसावर, कलाकारावर असतो. खापर किंवा श्रेय नको तितकं त्याच्या वाट्याला येतं.
(हाटेलात मेन्यू कितीही आवडला किंवा खराब निघाला तरी किचनमध्ये जाउन शेफला कूनी काही म्हणत नाहित. शिव्या, कौतुकास पात्र टह्रतो तो वेटर. कारण तो "समोर" असतो ना.)
.
साला इथे वेळ कमी पडतोय. अजून लिहायचय.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सचिन, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे हे तिघे लोक अवकळा आणणारे होते याच्याशी त्रिवार असहमत. मान्य कि यांच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये साचेबद्ध पात्रे, अनावश्यक आणि भिकार वाटावित अशी गाणी, विचित्र नाच असला (आजच्या दृष्टीने) कचरा भरपूर होता. पण लोकांना ते खूप आवडले होते. आता कोणी म्हणेल कि तेव्हा बा़की पर्याय नव्हते म्हणून लक्ष्या, सचिन, महेश कोठारे यांचे चित्रपट चालले. पण आजही इतर 'प्रगल्भ' सिनेमांचे पर्याय असताना हे चित्रपट लोकप्रियता राखून आहेत. टीव्हीवर ते अजून पण दाखवले जातात आणि आवडीने बघितलेही जातात. बनवा-बनवी सारख्या चित्रपटांमधली वाक्ये अजून पण मित्रांच्यात गप्पा मारताना एकमे़कांवर फेकली जातात.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सर्वप्रथम तुम्ही अनेक दिवसांनंतर दर्शन दिलेत याचा आनंद झाला. आमचे पराभाऊ कुठे परागंदा झाले आहेत असे वाटू लागले होते.
लेखातील मतांशी सहमत.'नारबाची वाडी' या चित्रपटावर आपले काय मत आहे ते वाचण्याची उत्सुकता होती.

लेखातल सॉल्लिड तिरका सूर आवडला. पण मनोबांशी बर्‍याच प्रमाणात सहमत.

- एकतर नायिका दारू पितात का अजून काही विकतात याचा नि सिनेमाच्या थोरपणाचा संबंध काय? सिनेमात धड काम करा, मग काय हवं ते करा.
- झैरातीतली बोंबाबोंब आहे जरा जास्त. नसेल मराठी सिनेमा थोरबिर तितका. पण मराठी सिनेमा तर आहे? साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी बोंबलायला मराठी सिनेमा - रीलिज होणारा मराठी सिनेमा - नावाचा प्रकारच बाजारात नव्हता. आता पन्नास फडतूस, पाचेक बोंबाबोंब करणारे चकचकीत, एखाददोन गुलजारी सुवर्णमध्यम, एखादं'विहीर'सारखं आडवाटेचं रत्न... असा निवडीचा मामला आहे. चांगलं आहे की. एकदम अवतरायची कुठून थोर्थोर सिनेमांची गंगा?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शेवटी मराठी चित्रपट चालतात कशामुळे? मराठी लोकांकडे 'फुकट गेले तरी ठीक आहे' इतपत पैसे आले आहेत इतकंच. Smile

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे ..."
१९९०-२००० आणि २०००-२०१० मधे येउन गेलेल्या चित्रपटाचा विचार केला तर नक्किच प्रग्ल्भता आहे. शेवटी सगळेच चित्रपट कसे काय उत्तम असतील?
एका ठराविक कालावधीत आलेल्या चित्रपटांचा मसवि काढला तर नक्कीच सुधारणा आहे.
उदा. - "दोघी" सारखा चित्रपट १९९५ मध्ये इतर चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा होता, सर्वसाधारण मराठी चित्रपटांच्या आलेखात न येणारा.
पण आज असा चित्रपट आपण वेगळा म्हणत नाही, त्यालाही साधा-सुधा मराठी सिनेमाच म्हटलं जातंय. हेही कमी नाही का ?
"विहीर" सारखा चित्रपट mainstreem समजला जातोय.
उमेश कुलकर्णी आणि इतरांना असे प्रयोग करून पाहता येणं आणि त्यात कमी अधिक प्रमाणात यशस्वी होणं हादेखील प्रगल्भतेचाच हिस्सा आहे.
चांगले किंवा प्रायोगिक चित्रपट (जे काहीतरी नवीन आणि creative करू इच्छितात)
/ एकूण चित्रपट ( कौटुंबिक, धम्म्म्म्माल विनोदी , कुबलपट, इतर कचरा )
हे गुणोत्तर जर वाढत असेल, तर एकंदरीत परिस्थिती सुधारते आहे.

माझे २ पैसे.

सध्या फार वेळ नाहीये. पण पराला पोच देणं क्रमप्राप्त आहे.

परा उच्चभ्रू झालाच शेवटी!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरुण खोपकर यांच्यावरील लेख आणि हा लेख असे दोन्ही वाचले आणि चित्रपटासंदर्भात आपल्या मनात असणारे अनेक प्रश्न, निरीक्षणे , समस्या वगैरे इतर अनेक लोकांच्या मनात आहेत हे समजून बरे वाटले.
काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो :

१- चित्रपट कला ही खरोखरीच भारतीय कला आहे का ? यामध्ये दृश्य कलांचा आपला इतिहास हा फार वेगळा आहे आणि दृश्य कलांना आपल्या दैनंदिन जीवनात दुर्दैवाने फारसे स्थान नाही. याउलट युरोपिअन मनुष्य त्याच्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान आणि दृश्य कला ( visual elements ) या अर्थाने पुरेपूर वापरीत असतो. नकाशाचा सुयोग्य आणि मुक्त वापर हे त्याचे एक साधे उदाहरण ठरावे. चित्रामधून व्यक्त होण्याची एक फार बहुपेडी आणि दीर्घ परंपरा आणि आजही एक प्रकारची जिवंतता पश्चिमी वातावरणात आहे, जी आपल्याकडे दिसत नाही. या तुलनेमध्ये कुठे कमी-जास्त , उच्च नीच अशी तुलना अपेक्षित नसून दृश्यामधून आपण हे जग पाहतो का आणि व्यक्त करतो का याचा शोध घ्यावा असे वाटते. आपल्याकडे आपण कानावर खूप काम केले आहे आणि नाद , संगीत, काव्य , नृत्ये यातून आपण फार सकस आणि सच्च्या रीतीने व्यक्त होतो असे माझे निरीक्षण आहे. आपल्याकडे एखादा मुलगा गाणी गात असेल , तबला वाजवत असेल तर त्याला मिळणारे प्रोत्साहन (आजकाल तर tv /radio सारख्या माध्यमात देखील) आणि सामाजिक स्थान , आणि चित्रकार मुलाला मिळणारे प्रोत्साहन यात नक्कीच फरक आहे. लहान मुलांचे खेळ पाहता , आपण "visual thinking " करणारे खेळ कुठे शोधून काढले आहेत ? Lego सारखा खेळ आणि युरोपिअन मुलांमध्ये त्यामुळे विकसित झालेली दृश्यामधून विचार करण्याची क्षमता ही अकल्पनीय आहे. गेल्या वर्षी आमचा एक रुशिअन मित्र त्याच्या १२ वर्षाच्या मुलाला घेऊन आला होता. आम्ही गप्पा मारत होतो, आणि तो बोअर होत होता. त्याला सहज म्हणून मी माझ्या मुलांचा तुटलेला -train set - दाखवला आणि घरातील काही अडगळीतलं सामान (जुना drawing board वगैरे)दिले, तेवढ्या सामानातून त्याने अर्ध्या तासात एक स्वतंत्र जग निर्माण केले आणि त्यात प्रत्येक गोष्टीला काही एक अर्थ होता, मुद्दा : या मुलाच्या मनात जी कल्पना होती त्याचे दृश्य/चित्र स्पष्ट होते आणि हा पश्चिमी लोकांचा स्वभावगुण आहे असे दिसते. दृश्यामधून विचार करणे हा आपला स्वभावगुण आहे का ? हे आपल्यासाठी नैसर्गिक आहे का ? एकूणात आपला कान फार तयार आहे असे एक माझे निरीक्षण आहे.

चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे असे आपण नेहमीच म्हणतो. आपल्याकडचे अनेक दिग्दर्शक परदेशी दिग्दर्शकांचे चित्रपट पाहून वाढतात आणि त्याप्रमाणे इकडे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतात (ऐया पाहून माझ्या एका मित्राला त्यात अमेली ची झाक लगेच दिसून आली). दिग्दर्शकाच्या दृष्टीने हा एक शिकण्याचा टप्पा निश्चितच असू शकेल आणि त्याची प्रेरणा त्याने ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांकडून घ्यावी हे उचितच, परंतु अभिनेते, लेखक यांचे काय ? चित्रपटामध्ये जे अनेक इतर कलाप्रकार गुंतलेले आहेत त्यांचे काय ? त्यामुळे एकूण चित्रपट अनुभव हा एकसंध होताना दिसत नाही. संगीताचा ( शास्त्रीय संगीताचा) विचार केला तर , कुमार गंधर्व, मन्सूर , भीमसेन जोशी आणि इतर अनेक दिग्गज ही इथलीच आपल्या मातीतली प्रेरणास्थाने आहेत , आणि ती आपल्याला पुढचे अनेक जन्म पुरतील असे दिसते. सोहोनी गाण्यासाठी, झपताल वाजवण्यासाठी कोणी बीथोवेन ऐकतो आहे पर्यायाने पश्चिमी संगीतकारांकडून प्रेरणा घेतो आहे असे दिसत नाही. गायक , वादक श्रोते असा हा सर्व संच एका ठिकाणी (मग विविध घराण्यांचा विचार केला तरी) बांधला गेला आहे आणि त्यातून काही एक एकसंध अशी निर्मिती होते , आणि ती इथल्याच मातीतली असते असा अनुभव येतो. याउलट चित्रपट हिट व्हावा म्हणून ज्या अनेक उचापती केल्या जातात , त्यात गाणी चोरणे , पूर्वीच्या हिट गाण्यांमधले/चित्रपटातील शोट्स जसेच्या तसे लावणे असे अनेक प्रकार (क्वचित प्रसंगी जाने माने दिग्दर्शक देखील) दिसतात. याचा अर्थ एक तर मी (एक कलाकार , दिग्दर्शक etc ) म्हणून स्वतः विचार करू शकत नाही (कारण तशी सामाजिक स्थिती च मला मिळाली नाही) , आणि जरी तसा करू शकत असलो तरी मी मांडत असलेली नवी दृश्य भाषा प्रेक्षकाला समजणार नाही (पुन्हा संदर्भ दृश्य कलांचे दैनंदिन जीवनातील स्थान) म्हणून या प्रचंड आर्थिक giant wheel मध्ये कुठलीही रिस्क न घेता उपस्थित दृश्य भाषेचाच वापर करून storytelling चालू ठेवतो.

प्रस्तुत लेखात अनेक चित्रपटांची उदाहरणे आहेत. अर्थातच प्रत्येक चित्रपटावर स्वतंत्रपणे चर्चा करता येईल आणि अर्थातच एकाच चित्रपटाबद्दल प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते . म्हणजे विहीर हा मला प्रगल्भ वाटतो, तर वळू एक फारच बोरिंग चित्रपट वाटतो, त्यामधे प्रगल्भतेची वगैरे झाक देखील मला दिसत नाही.
नुकताच "Time Please" हा चित्रपट पाहिला. मराठी चित्रपटासाठी किंचित नवीन असा विषय, आजच्या परिप्रेक्ष्यात मांडणी करण्यासाठीची चांगली पार्श्वभूमी आणि सोय असलेला, कथानाक्ची बर्यापैकी मूळ कल्पना असलेला हा चित्रपट त्याची एकंदर पात्र रचना, शब्द बंबाळ पणा आणि अभिनयाच्या त्याच त्याच ठोकळ कल्पना याने साफ आपटतो, किंवा काही ठिकाणी -अरे आता ही कथा छान चालली आहे आणि आता काहीतरी नवीन पाहायला मिळेल -असा क्षण आला कि हमखास anticipated असे वळण घेतो. हा चित्रपट जर नुसता श्रुतिका म्हणून ऐकला तरी फारसा फरक पडेल असे वाटत नाही. मग यात दृश्य नक्की कुठे आहे ? दृश्यातून काही सांगायचे आहे कि नाही ? की काही एक निराळ्या वळणाची कथा आमच्याकडे आहे आणि ती ऐकवताना आम्ही काही चित्रे दाखवू असा हा मामला आहे.

पुन्हा एकदा बालपणात जाउन हे पुराण संपवतो. पश्चिमी देशातील लहान मुलांसाठीची पुस्तके पहिली, लहान मुलांसाठी ची नाटके , puppet theaters पाहिली तर इथल्या storytelling मध्ये visual चे काय स्थान आहे हे समजेल. हे स्थान फार जबरदस्त आहे. याउलट आपल्याकडच्या ( सो called का होईना) मौखिक परंपरेमध्ये ऐकण्याचे जे स्थान आहे ते इकडे दिसत नाही. आणि भारतीय मुलाला ताल, ठेका, नृत्य याची जी एक अंतर्भूत गहरी जाण आहे ती मला पश्चिमी मुलांमध्ये दिसत नाही. निश्चितच आपल्याकडे बदल होत आहेत. परंतु कला निर्मिती करताना आपल्या मूळ प्रेरणांशी प्रामाणिक राहून, त्यांना खोलवर समजून घेऊन कला निर्मिती केली तर ती अधिक सच्ची होईल.

वरील निरीक्षणे ही अर्थातच वैयक्तिक पातळीवर आहेत, इतरेजनांनी जरूर या मुद्द्यांचा समाचार घ्यावा.

Observer is the observed

श्री अस्वल :
"विहीर" सारखा चित्रपट mainstreem समजला जातोय.
उमेश कुलकर्णी आणि इतरांना असे प्रयोग करून पाहता येणं आणि त्यात कमी अधिक प्रमाणात यशस्वी होणं हादेखील प्रगल्भतेचाच हिस्सा आहे.
चांगले किंवा प्रायोगिक चित्रपट (जे काहीतरी नवीन आणि creative करू इच्छितात)
/ एकूण चित्रपट ( कौटुंबिक, धम्म्म्म्माल विनोदी , कुबलपट, इतर कचरा )
हे गुणोत्तर जर वाढत असेल, तर एकंदरीत परिस्थिती सुधारते आहे.

एक्दम मान्य Smile

Observer is the observed

लेख आवडला. लिहीण्याची रोखठोक शैली, स्पष्टता आंणि मुद्देसूदपणा आवडले.

मुद्यांबाबत : ब-याचशा मुद्यांशी सहमत.

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

तुम्ही संगीतात कुमार, मन्सूर आणि भीमसेन जोशी अशी नावं घेता. मग सिनेमाविषयी बोलताना धंदेवाईक गणितांविषयी का बोलता? सत्यजित राय, ऋत्विक घटक, अदूर गोपालकृष्णन् आणि मणी कौल ह्यांच्या सिनेमाविषयी बोललात तर ती तुलना रास्त ठरेल.

>> दृश्य कलांना आपल्या दैनंदिन जीवनात दुर्दैवाने फारसे स्थान नाही. याउलट युरोपिअन मनुष्य त्याच्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान आणि दृश्य कला ( visual elements ) या अर्थाने पुरेपूर वापरीत असतो. <<

गंमत अशी आहे की दृश्य घटकांना ब्रिटिशपूर्व भारतातल्या दैनंदिन जीवनात मोठं स्थान होतं. आदिवासी पाड्यात किंवा ओडिशासारख्या राज्यातल्या खेड्यांत (म्हणजे जे तुलनेनं मागास मानले जातात असे भारतीय भाग) आजही घरं, भिंती, वापरातल्या वस्तू ह्यांत हे दिसतं. तुम्ही पश्चिमी देशांतल्या व्हिज्युअल स्टोरीटेलिंगबद्दल बोलता. ते आज आपल्याकडे नाही हे खरंच आहे. पण कथकली आणि यक्षगान हे व्हिज्युअल स्टोरीटेलिंग नव्हतं का? आणि महाराष्ट्रातली चित्रकथी?

मग अडचण कुठे आली? तर माझ्या मते ब्रिटिश हे युरोपातले दृश्य कलांत सर्वाधिक दळभद्री लोक आपल्यावर राज्य करून गेले. त्यांच्याकडे शब्दप्रभू शेक्सपिअर होता, पण दा व्हिन्ची किंवा मायकेलँजेलो नव्हते. त्यांचं सगळं मोठं समजण्यात आपण वाहावत गेलो आणि त्यांच्यासारखे शब्दविभ्रमांत अडकलो. तिथे आपला दृश्यमाध्यमाशी संपर्क (आणि अनुबंध) तुटला.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सुरुवातीला नमूद करतो , कि भारतीय /मराठी कलाकार , दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे. एक तर आपण आधी मराठी चित्रपटाची आजची अवस्था याबद्दल बोलतो आहोत. स्वाभाविक पणे एकूण भारतीय विचार केला तर दिग्गज कलाकार , दिग्दर्शक, तंत्रग्य यांची कमतरता नाही. ऋत्विक घटक , अदूर गोपालकृष्णन , सत्यजित रे, व्ही शांताराम असे अनेक लोक निर्विवाद पणे चित्रपटासाठी महत्वाचे आहेतच. परंतु जो मराठी सिनेमा ७५ -७६ साली जैत रे जैत सारखी साहित्यकृती पडद्यावर आणतो आणि एक एकसंध चित्रपटाचा अनुभव (अभिनय, संगीत, काव्य, संवाद अशा सर्व पातळींवर-सिंहासन बद्दल हि तसेच बोलता येईल ) देतो तो आज ३० वर्षानंतर तांत्रिक प्रगती वगैरे झालेली असतानाही दुनियादारी (हे उदाहरण घेतले कारण साहित्य कृती वर आधारित चित्रपट आहे म्हणून) चित्रित करताना कोणतीही नवी चित्र भाषा देऊ शकत नाही.

- गंमत अशी आहे की दृश्य घटकांना ब्रिटिशपूर्व भारतातल्या दैनंदिन जीवनात मोठं स्थान होतं. आदिवासी पाड्यात किंवा ओडिशासारख्या राज्यातल्या खेड्यांत (म्हणजे जे तुलनेनं मागास मानले जातात असे भारतीय भाग) आजही घरं, भिंती, वापरातल्या वस्तू ह्यांत हे दिसतं. तुम्ही पश्चिमी देशांतल्या व्हिज्युअल स्टोरीटेलिंगबद्दल बोलता. ते आज आपल्याकडे नाही हे खरंच आहे. पण कथकली आणि यक्षगान हे व्हिज्युअल स्टोरीटेलिंग नव्हतं का? आणि महाराष्ट्रातली चित्रकथी?-

आणि मुद्दा इथेच आहे कि आपण आपली खरी खुरी Visual Storytelling ची पाळेमुळे कशी शोधायची ? गावांमध्ये आजही घरे रंगवतात , हे सर्व योग्यच आहे (वानगीदाखल वारली चित्रकला) परंतु त्याचा उपयोग एक तर नवशिक्या कमर्शिअल आर्तीस्तांनी केलेला दिसतो , प्रत्यक्ष ती कला जगणारे आदिवासी लोक आपल्या पासून कोसो दूर असतात.

आपल्या एकंदर चित्रपटाची आजवरची वाटचाल मी नाकारत नाही. माझे प्रश्नचिन्ह आहे ते त्याच्या मूळ प्रेरणांवर आणि त्याच्या शोधांवर. !

Observer is the observed

दुनियादारी (हे उदाहरण घेतले कारण साहित्य कृती वर आधारित चित्रपट आहे म्हणून)

शिरवळकरांच्या पुस्तकाला साहित्यकृती म्हणणे हे एड्गर वॉलेस, निक कार्टर प्रभृतिंच्या पुस्तकांना क्लासिक लिटरेचर म्हणण्यासारखे झाले. बाकी चालू द्या.

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

तुह्या धर्म कोंचा आणि गाभ्रीचा पाऊस या दोन चित्रपटांचा उल्लेख राहून गेला.

Observer is the observed

लेखातला सॉल्लिड तिरका सूर आवडला. >> +१
प्रतिसाद/चर्चादेखील आवडतेय.

लेख मात्र मस्त आहे. पराकडून विनोदी लिखाणाची सवय असल्याने हा धक्काच होता. पण पचवला.
http://www.maayboli.com/node/37260 इथं एक लेख याच विषयावरचा असल्याने रिक्षा फिरवतोय.

एकदा सह्याद्री वरच्या चर्चेत एका मराठी निर्मात्याने तावातावाने आपलं म्हणणं मांडलं होतं कि आम्ही पैसे घालून मराठी सिनेमे बनवतो , प्रेक्षकांचं कर्तव्य नाही का पहायचं ? काळीज चिरत जाणारा हा प्रश्न आजही रात्रीची झोप लागू देत नाही.

....

लेख वाचला. खूप माहितीपूर्ण आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तो माबोवरील लेख आवडला.
अवांतरः-
तुम्ही(म्हणजे kiran) किती सायटीम्वर अस्तित्वात आहात?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी पण तसं ऐकलय. खर खोट काय माहित नाही.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

फर्मास आणि खन्ग्रि लिखाण : )

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

बेर्डे, चव्हाण, सचिन, महेश हे एकाच काळात सक्रीय नव्हते का?
'मराठी चित्रपटसृष्टीतून एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा पण पुढे लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, सचिन, महेश कोठारे आले आणि मराठी चित्रपटसृष्टीला अवकळा आली, प्रेक्षक जणू मृतप्राय झाले. ह्यांसारख्या लोकांची सत्ता संपुष्टात आल्यावर मग उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी, नागेश भोसले ह्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे नाव पुन्हा रोशन करून मराठी चित्रपटसृष्टीला प्रगल्भ बनवण्यास सुरुवात केली आहे.”
- असं काहीसं चालू शकेल.

परा कुठाय?
धागा टाकून गायबलाय असं त्यानं केल्याचं कधी पाहण्यात आलं नाही.
ह्याच वेळी काय झालं?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ज्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली असे म्हणता येऊ शकेल अशा चित्रपटांमध्ये या चित्रपटांचा उल्लेख नसल्याने आश्चर्य वाटले.

१. पोरका (अजिंक्य देव, पद्मा चव्हाण, कुलदीप पवार, अविनाश खर्शीकर आणि विक्रम गोखले)
२. कळत नकळत (अशोक सराफ, सविता प्रभुणे आणि विक्रम गोखले)
३. कदाचित (तुषार दळवी, अश्विनी भावे आणि सचिन खेडेकर)
४. आजचा दिवस माझा (महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री, लीना भागवत, सुहास परांजपे, अश्विनी भावे आणि सचिन खेडेकर)

आणि,

५. सरकारनामा (यशवंत दत्त, आशुतोष गोवारीकर, सुकन्या कुलकर्णी, नंदु माधव, मकरंद अनासपुरे, दिलीप प्रभावळकर, प्रतीक्षा लोणकर आणि अजिंक्य देव)

एखाद्या चित्रपटाने किती गल्ला जमविला यावर चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे असे म्हणता येणार नाही फारतर खर्‍या अर्थाने व्यावसायिक झाली आहे असे म्हणता येईल.

श्वास, देऊळ, वास्तुपुरूष, वळू, हरिश्चंद्राची फ्याक्टरी, विहीर, सुंबरान, सावरखेड एक गाव असे कितीतरी अति कौतूक झालेले चकचकीत चित्रपट निदान मला तरी आवडले नाहीत.

या बहूचर्चित चित्रपटांपेक्षा आनंदाचे झाड, मातीच्या चूली, झपाटलेला (पहिला फक्त), धांगडधिंगा, खतरनाक, एक डाव धोबीपछाड असे चित्रपट मनाला जास्त आनंद देऊन गेले.

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

हरिशचंद्राच्या फ्याक्टरीला 'चकचकीत' असे लागलेले विशेषण ही त्या चित्रपटाची सर्वात क्रूर समीक्षा म्हणावी काय?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काय राव, आम्ही इतकं हौसेनं त्याचा लेख दिसतोय म्हणून आवर्जून पहातो आणि त्याचा काय रिप्लाय नाय राव.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

व्यावसास्यिक आघाडीवरचं चित्र काय आहे?
दुनियादारीनं २५कोतिंचा गल्ला जमवला म्हणून कौतुक होइस्तोवर आता महिनाभरातच " टाइमपास "नं ३० कोटिंची मजल मारली आहे.
अर्थात हे फक्त रक्कम जमवण्याचे आकडे आहेत, गुणात्मक फरक, दर्जा, कालसापेक्ष तुलनात्मक उंची वगैरे चर्चा होत राहतीलच, होणं आवश्यक आहेच.
त्या चर्चा इथे http://www.aisiakshare.com/node/623 ह्या धाग्यावर दिसतील.
माझ्या वाचनखुणेत आहे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars