मागच्या महिन्यात माझ्या जुन्या शाळासोबत्यांबरोबर एक संध्याकाळ गप्पा गोष्टींमध्ये घालवण्याचा योग आला. आता हे सर्व शाळा सोबती वयाची सत्तरी ओलांडलेले असल्याने, या स्वरूपाच्या गप्पागोष्टींमध्ये आताशा होते तसेच त्या दिवशी झाले व गप्पांचा रोख आमच्या तब्येती व वयोमानानुसार येणार्या व्याधी यांकडे वळला. त्या वेळेस माझ्या सहजपणे हे लक्षात आले की तेथे जमलेल्या आम्हा 8/10 मित्रांपैकी बहुतेक जण आता चष्मा वापरत होते. काही जणांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली होती. निदान चौघांना तरी मधुमेह होता व त्यासाठी नियमित औषधपाणी करावे लागत होते. काही जणांना सांधेदुखीच्या समस्या होत्या तर काहींना हृद्रोगाची बाधा झालेली होती. एक दोघांनी अस्थमाच्या त्रासाबद्दलही सांगितले. अर्थात यापैकी कोणीच जण यापैकी कोणत्याच गंभीर आजाराने ग्रासलेले वगैरे नव्हते, चांगले मजेत दिसत होते. मला असे वाटते की चाळिशी नंतरच्या अशा स्त्री/पुरुषांच्या गटाचा विचार केला तरी त्यांच्या आरोग्याबद्दल सुद्धा हेच निरीक्षण बहुधा लागू पडेल. किंबहुना ज्येष्ठ नागरिकांच्या कोणत्याही गटात अशा प्रकारच्या व्याधी असलेल्या दिसणे हा नियमाला अपवाद वगैरे नसून सर्वसाधारण नियमच आहे असे म्हटले तरी चालेल.
या आमच्या गप्पागोष्टींत घालवलेल्या सांज वेळेनंतर अनेक वेळा माझ्या मनात हा विचार येतो की आम्हा सर्व शाळासोबत्यांचे आरोग्य एकंदरीत पहाता उत्तम वाटते आहे व सर्वजणांची तब्येत वयाचा विचार करता तर ठीकठाक वाटते आहे. बहुतेकांची बहुतांशी इंद्रिये अजून तरी समाधानकारक रित्या कार्यक्षम आहेत. सर्वांना चांगली भूक लागते आहे, या वयाला आवश्यक असा व्यायाम सर्वजण करू शकत आहेत आणि सर्वांना झोप सुद्धा व्यवस्थित लागते आहे. थोडक्यात म्हणजे सर्वांची शरीरे एखाद्या ऑइलपाणी व्यवस्थित केलेल्या मशिन सारखी अजूनही चालत आहेत. असे जर आहे तर फक्त डोळे, कानातील ऐकण्याची क्षमता, स्वादुपिंड किंवा हृदय यासारखी काहीच इंद्रिये, बाकी सर्व शरीर व्यवस्थित कार्यक्षमतेने चालू असताना, का कुरकुरताना आढळून येत आहेत.
माझ्या मनातील वरील विचार आणि त्याबाबत सध्या चालू असलेले संशोधन, हाच विषय असलेला एक अत्यंत रोचक लेख नुकताच माझ्या वाचनात आला. अमेरिकेतील लॉस अॅन्जेलिस येथे असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मध्ये संशोधन करणारे डॉ. स्टीव्ह होव्हार्थ हे करत असलेल्या मानवी शरीराच्या वृद्धत्वाकडील वाटचालीबद्दलच्या संशोधनाची माहिती देणारा हा लेख, ‘जेनोम बायॉलॉजी‘ या शास्त्रीय विषयक नियतकालिकात प्रसिद्ध झालेला आहे. या लेखातील माहितीप्रमाणे आपल्या शरीरातील भिन्न भिन्न इंद्रिये वृद्धत्वाकडे वाटचाल निरनिराळ्या गतीने करत असतात. काही इंद्रियांची ही वाटचाल तुलनात्मक दृष्टीने बघितल्यास जास्त गतीने होताना आढळते तर काही इंद्रिये हीच वाटचाल धिम्या गतीने करताना आढळतात. जास्त गतीने ही वाटचाल करणार्या इंद्रियांचे वय साहजिकपणे इतर इंद्रियांच्या मानाने जास्त असल्याचे आढळते. या संशोधनातील सर्वात महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे ज्या इंद्रियांना कोणता ना कोणता विकार झालेला आढळतो अशा इंद्रियांचे वय, शरीराच्या इतर भागांपेक्षा बर्याच जास्त वर्षांचे झालेले असल्याचे आढळून येते.
आपल्या शरीराच्या वयाचे मापन करण्यासाठी शरीरात कोठेतरी एक घड्याळ लपलेले असले पाहिजे ही कल्पना काही नवीन म्हणता येणार नाही. याच्या आधी लाळापिंडातून तयार होणारी लाळ, किंवा hormones and telomeres ( आपल्या शरीरात असलेल्या प्रत्येक पेशीमधील रंगपेशींच्या टोकाजवळ असलेला भाग) यांचा शरीरातील घड्याळाशी संबंध जुळतो का? हे अभ्यासण्याचे प्रयत्न केले गेले होते. मात्र डॉ. होव्हार्थ यांच्या संशोधनामुळे असे एक छुपे घड्याळ प्रत्येक रंगपेशीमध्ये असलेल्या डीएनए साखळ्यांमध्ये लपलेले असल्याची शक्यता दिसते आहे. या घड्याळांमुळे शरीरामध्ये असलेली विविध इंद्रिये, पेशी आणि टिशू या प्रत्येकाच्या वयाचे मापन करता येते. ही छुपी घड्याळे शोधून काढण्यासाठी डॉ. होव्हार्थ यांनी methylation या नावाने ओळखल्या जाणार्या आणि रंगपेशीमधील डीएनए मध्ये रासायनिक बदल घडवून आणणार्या एक नैसर्गिक प्रक्रियेचा वापर केला. या प्रयोगाच्या आधीच्या कालात, संशोधकांनी, निरोगी आणि कर्करोग पिडीत अशा दोन्ही प्रकारच्या मानवी टिशूंमध्ये methylation प्रक्रिया केल्यावर झालेल्या परिणामांबद्दलचा जो डेटा तयार केलेला आहे त्या डेटामधील तब्बल 21 संचांचा डॉ. होव्हार्थ यांनी सखोल अभ्यास केला. शरीराच्या विविध भागामधून घेतलेल्या 51 प्रकारच्या अंदाजे 8000 पेक्षा जास्त नमुन्यांचे विश्लेषण त्यांनी केले. गर्भावस्था ते वयाची 101 वर्षे पूर्ण झालेले शरीर अशा मोठ्या कालावधीमध्ये शरीरांतील टिशू आणि पेशी यावर वयाचा कसा परिणाम होत जातो याचा अभ्यास डॉ. होव्हार्थ यांनी methylation प्रक्रियेच्या द्वारे करण्यात यश मिळवले.
या अभ्यासानंतर डॉ.होव्हर्थ यांना सापडलेल्या आणि शरीरातील सर्व पेशींमध्ये असलेल्या, 353 मार्कर्सवर (markers) आपले लक्ष केंद्रित केले. हे मार्कर शरीरातील त्या जागी असलेल्या टिशूच्या वयाप्रमाणे बदलत असल्याचे त्यांना आढळून आले. डॉ. होव्हार्थ असे मानतात की आपल्या शरीरातील छुपी जैविक घड्याळे या 353 मार्करची मिळून बनलेली असतात. ही घड्याळे खरोखरच प्रभावीपणे कार्य करतात का हे अभ्यासण्यासाठी त्यांनी त्या त्या जागेवरील टिशूचे जैविक वय आणि शरीराचे काल मापन केलेले वय यांची तुलना करण्यासाठी अनेक चाचण्या केल्यावर केल्यावर ही छुपी घड्याळे अचूकपणे कार्य करत असल्याचे आढळून आले. डॉ. होव्हार्थ म्हणतात: ” संपूर्ण मानवी शरीराचे जैविक वय मापन करणार्या आणि बिनचूक चालणार्या अशा घड्याळांची शक्यता प्रत्यक्षात उतरणे हे मोठे आश्चर्यजनक वाटते. मानवी मेंदू, हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड आणि कार्टिलेज यांची अशी तुलना करण्याचे माझे प्रयत्न खरे तर संत्री आणि सफरचंदे यांची तुलना करण्यासारखेच होते.”
परंतु शरीरातील कोणत्याही एखाद्या जागेवरील टिशूचे जैविक वय आणि काल मापन केलेले वय यांची तुलना करण्याच्या या प्रयत्नातून डॉ. होव्हर्थ काही विस्मयकारक निष्कर्षांप्रत पोचू शकले आहेत. उदाहरणार्थ त्यांना असे आढळून आले आहे स्त्रीच्या शरीरातील इतर इंद्रियांपेक्षा तिच्या वक्षस्थलामधील टिशूंचे वय जास्त वेगाने वाढत राहते. ते या बाबत म्हणतात: ” निरोगी वक्षस्थल टिशू हा शरीरातील इतर टिशूंच्या मानाने 2 ते 3 वर्षे जास्त वयोमानाचा असतो. ज्या स्त्रीला वक्षस्थल कर्करोग झालेला असतो त्या स्त्रीच्या वक्षस्थलात असलेल्या ट्यूमरच्या भोवती असलेल्या टिशूंचे वयोमान सरासरीने शरीरातील इतर टिशूंच्या मानाने 12 वर्षे तरी अधिक असते.” डॉ. होव्हर्थ यांच्या या टिप्पणीवरून स्त्रियांना होणार्या कर्करोगाच्या विकारात वक्षस्थलाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वात अधिक का असते? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता वाटते.
डॉ. होव्हर्थ यांच्या जैविक घड्याळाने केलेल्या कालमापनाप्रमाणे, कर्करोगींच्या शरीरातील ट्यूमरमधील टिशूंचे जैविक वय हे इतर निरोगी टिशूंपेक्षा साधारण 36 वर्षांनी तरी अधिक असते. त्यामुळेच स्त्री-पुरुष अशा कोणत्याही व्यक्तीचे काल मापन केलेले वय हेच त्या व्यक्तीला कर्करोग हा विकार होण्याच्या दृष्टीने असलेला सर्वात मोठा धोका का असतो? याचा खुलासा होऊ शकतो. डॉ. होव्हर्थ यांनी लावलेला आणखी एक मोठा शोध हा शरीरातील मूल पेशी किंवा स्टेम सेल्स संबंधित आहे. या पेशी मुख्यत्वे आईच्या पोटात असलेल्या गर्भामध्ये असतात आणि त्यांचा अभ्यास करून त्या पेशीतून पुढे कोणते इंद्रिय बनणार आहे हे सांगणे मोठे कठीण असते किंवा असेही म्हणता येते की या मूल पेशींचे विभाजन होऊन तयार होणार्या पेशी, पुढे भिन्न भिन्न प्रकारच्या होत जातात व त्यांच्यातून शरीरातील निरनिराळी इंद्रिये बनवली जातात. या पेशींना pluripotent stem cells या नावाने ओळखले जाते. पूर्णपणे विकसित झालेल्या मानवी शरीरात सुद्धा काही प्रमाणात अशा मूल पेशी आढळून येतात. या पेशी गर्भातील मूल पेशीं प्रमाणेच असतात व त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पेशी प्रकारात बदलण्याची व नंतर विभाजनातून त्या प्रकारच्या असंख्य पेशी निर्मितीची क्षमता असते. या पेशींबद्दलच्या आपल्या विस्मयकारी निरिक्षणाबद्दल डो. होव्हर्थ म्हणतात: ” माझ्या संशोधनावरून असे दिसते आहे की कोणतेही वय असलेल्या मानवी शरीरातील मूल पेशींचे जैविक वयमान हे गर्भातील मूल पेशीं एवढेच असते. किंवा शरीरातील कोणत्याही पेशीचे रूपांतर जर मूल पेशीत केले तर त्या पेशीतील जैविक घड्याळाने मापन केलेला काल परत शून्यावर नेऊन ठेवला जाईल.”
डॉ. होव्हार्थ यांचे हे जैविक घड्याळ व्यक्तीच्या शरीराच्या वयानुसार आपला कालमापनाचा वेग कमी जास्त करते. नुकत्याच जन्मलेल्या बालकाच्या शरीरातील घड्याळाचा कालमापनाचा वेग सर्वात जास्त असतो व तो तसाच ते बालक तारुण्यात प्रवेश करेपर्यंत राहतो. साधारण 20 वर्षे वय झाल्यावर हा कालमापनाचा वेग कमी होतो किंवा घड्याळ हळू चालू लागते आणि नंतर उर्वरित आयुष्यासाठी घड्याळाची गती तशीच राहते.
मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की डॉ. होव्हर्थ यांनी फक्त या घड्याळांच्या अस्तित्वाचा शोध लावला आहे. ही घड्याळे चालतात कशी? याबद्दलची माहिती अजून तरी कोणालाच समजलेली नाही. जर आपल्याला ही घड्याळे चालतात तरी कशी याचा शोध घेता आला तर सैद्धांतिक रित्या विचार करता असे म्हणता येईल की या घड्याळांची गती कमी करणे सुद्धा शक्य होऊ शकेल व त्या बरोबरच त्या शरीराचे वय वाढण्याची गती सुद्धा कमी करता येईल. आपल्या शरीरामधील जैविक-रासायनिक प्रक्रिया वयाशी कशी संबंधित आहे हे समजावून घेण्याच्या दृष्टीने डॉ. होव्हर्थ यांचे संशोधन महत्त्वाचे आहे कारण एकदा डॉ. होव्हर्थ यांनी शोधून काढलेले घड्याळ कसे चालते हे समजले की शरीराचे वय कसे वाढत जाते हे समजण्याची गुरूकिल्ली हातात आल्यासारखे होईल आणि ते वय वाढण्याची गती कमी किंवा ते घड्याळ बंद करण्याचा मार्ग सुद्धा दिसू शकेल.
जर शरीरातील सर्व इंद्रियांचे वय एकाच गतीने वाढत जाईल अशी काही उपाययोजना करता आली तर शारिरिक स्वास्थ्याचा दृष्टीने ती अतिशय फायदेशीर ठरेल असे वाटते. समजा एखाद्या व्यक्तीचे डोळे, ऐकण्याची क्षमता, हृदय, स्वादूपिंड या सर्वांचे वय एकाच गतीने वाढत गेले तर 20 वर्षांनंतर, वयोमानानुसार, जेंव्हा त्या व्यक्तीचे शरीर कितीतरी जास्त क्षीण झालेले असणार आहे तेंव्हा, त्यापैकी एखाद्या इंद्रियाला होऊ शकणारा विकार त्या व्यक्तीला आजच होण्याची शक्यताच उरणार नाही. किंबहुना इतर सर्व दृष्टीने निरोगी असलेल्या व्यक्तीच्या एकाच इंद्रियाला केवळ तेथील टिशूचे वय वाढल्याने कोणताही विकार होण्याची भीतीच उरणार नाही.
10 नोव्हेंबर 2013
काही पेशी वजा जाता सर्व पेशी
काही पेशी वजा जाता सर्व पेशी दर तीन महिन्याला रिप्लेस केल्या जातात. राज्यसभेच्या खासदारांप्रमाणे पेशी बदलत असतात आणि सभा कायम असते. तेव्हा जास्त कमी वयाचे अवयव ही वाक्यरचना चूक आहे.
मेंदू
मेंदू मधील पेशी जन्मतः जितक्या घेउन आलेलो असतो; त्या तशाच असतात. त्या रेप्लिकेट ह्त नाहित, रिप्लेसही होत नाहित.
फक्त त्यातील काही काही मरत राहतात कालपरत्वे. अधिकचे मद्यपान ही मेंदुतील पुन्हा जन्मू न शकणार्या पेशी मरण्याची क्रिया वेगवान करते.
सुरेख लेख
चंद्रशेखर यांचा नेहेमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.
जर ही जैविक घड्याळे कशी चालतात हे उमगले आणि त्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवता आले तर, मनुष्य अमरत्वाकडे वाटचाल करू शकेल काय?
नुकत्याच निधन पावलेल्या ब्रूक ग्रीनबर्ग ह्या युवतीची कहाणीदेखिल रोचक ठरावी!
रोचक लेख. आवडला. एक प्रश्न
रोचक लेख. आवडला.
एक प्रश्न आहे.
हे समजलं नाही. एका वेळेला एकच अवयव मोडला तर बाकीचे ठीक असताना मोडलेला अवयव पूर्ववत करणं सोपं पडतं. सगळेच अवयव एकदम काम करेनासे झाले, multiple organ failure, तर ते कसं सांधणार?
इंद्रियांचे वय
या संशोधनाप्रमाणे ज्या एखाद्या इंद्रियाला विकार होतो ( उदा. स्वादूपिंडाचे कार्य सुरळीत न चालल्याने झालेला मधुमेह) तेंव्हा त्या इंद्रियातील टिशूंचे वय इतर शरीराच्या मानाने जास्त झाल्याचे आढळते. यामुळे जर समजा स्वादूपिंडातील टिशूंचे वय वाढण्याची गती कमी करता आली तर तेथील टिशूंचे वय शरीरातील इतर टिशूंच्या बरोबरीने वाढत राहील व अकाली होणारा मधुमेह टाळता येईल. सर्व शरीरातील टिशूंची वये समगतीने वाढली तर अकाली होणारे विकार टाळता येतील.
आता समजलं. माझ्या डोक्यात उलट
आता समजलं. माझ्या डोक्यात उलट दिशेने विचार सुरू होता.
अवांतर....
टिश्यूंचे वय वाढते ते अधिक प्रमाणात ऑक्सिडेशन झाल्यामुळे असे ऐकले आहे.
योगासनांमुळे काही प्रमाणात ते नियंत्रित राहते.
शिवाय काही अॅण्टिऑक्सिडण्ट्स ह्या संदर्भात मदत करु शकतात.
अजून एक म्हणजे चयापचय, मेट्याबॉलिझ्म जितका र्हिदमिक व वेगात तितके वय तरुण असते.
सर्वच ऐकिव माहिती.
एकच प्रश्न.
हे वेधक संशोधन आमच्या ध्यानात आणून दिल्याबद्दल चन्द्रशेखर ह्यांना धन्यवाद.
ह्यावर काही अधिक बोलावे असा काहीच अधिकार अथवा अभ्यास मजजवळ नाही. पुढील प्रश्न मात्र सुचतो.
जर शरीरातील सर्व इंद्रियांचे वय एकाच गतीने वाढत जाईल अशी काही उपाययोजना करता आली तर शारिरिक स्वास्थ्याचा दृष्टीने ती अतिशय फायदेशीर ठरेल असे वाटते.> असे करता आलेच तर होणारा परिणाम फायदेशीर ठरेल काय ह्याविषयी साशंक आहे. समजा सर्वच इंद्रिये सारख्याच वेगाने वाढत राहिली - सारख्याच गतीने वार्धक्याकडे जात राहिली - तर काय होईल? सर्वच अवयव क्षीण होऊ लागतील पण कोठलाच अवयव त्याच्या एकटयाने आयुष्य संपवण्याइतका क्षीण नसेल. हाडे आणि स्नायु क्षीण झाल्यामुळे उठणेबसणे अशक्य होईल, मेंदूची समजहि कमी झालेली असेल पण तरीहि तो मनुष्य जिवंत असल्याने अन्नपाण्याची आवश्यकता टिकून असेल, मलमूत्रविसर्जन चालूच राहील - यद्यपि कमी ताकतीने. असेच अनेक अन्य परिणाम दिसू लागतील. असल्या जगण्यात काय फायदेशीर आहे? केवळ इतरांना भार अशी स्थिति होईल. आजही असे काही लोक दिसतात की त्यांचे शरीर नावापुरते जिवंत आहे आणि इतरांना भारभूत झालेले आहे. पण अशा लोकांची संख्या कमी आहे. प्रत्येक माणूसच आज ना उद्या त्या स्थितीत जाऊन पडावा अशी उपाययोजना म्हणजे 'रोगापेक्षा उपाय भयानक' असे नाही का होणार?
वार्धक्य
कोल्हटकरांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्यच आहे. मला वाटते की आयुष्याचे एक विशिष्ट वय उलटून गेले (समजा ७५) तर त्यापुढे इंद्रियांचे वय वाढण्याच्या गतीमध्ये फेरफार करण्यात काहीच अर्थ दिसत नाही. त्यानंतर निसर्गक्रमाने काय होईल ते होऊ द्यावे. हे संशोधन मुख्यत्वे तरूण वयात होणारे मधुमेहासारखे वृद्ध्त्वकालीन विकार कसे टाळता येतील याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
नक्की काय
संशोधन रोचक आहे. वरवर बातमी वाचली होती. तुमचा लेख वाचून इतर काही लेख वाचले. ही बायलॉजिकल वेळ म्हणजे नक्की काय हे मात्र अजून कळले नाही. हे वय (age) जर त्या पेशीच्या कार्यावर अवलंबून असेल तर सर्व अवयवांच्या घड्याळांना एकाच गतीने चालवता येणे शक्य वाटत नाही.
इथून
यात उल्लेखलेली प्रक्रिया म्हणजे बहुधा पेशींना भूतकाळात नेणे. (थोडक्यात, पेशी ज्या मुल पेशींपासून निर्माण झाल्या, त्याकडे नेणे, तिथून त्या पेशींपासून इतर कोणतीही पेशी बनवता येते.) अशा प्रकारे पेशींना मागे नेऊन पुन्हा त्यांपासून नविन (आणि वेगळ्या प्रकारच्या) पेशी बनवण्यात काहींना यश आले आहे. (उदा. Donata Vercelli ) इच्छूकांनी याविषयी त्यांचे यावर दिलेले लेक्चर इथे पहावे.
हे लिहण्याचा उद्देश, एजिंग स्लो करण्यापेक्षा, एपिजेनेटिक्सने कृत्रिम (पण मानवी, बहुतेक त्याच व्यक्तींच्या पेशींपासून) अवयव बनवून जुने अवयव बदलणे जास्त प्रॅक्टिकल आहे असे वाटते.
अर्थात, या विषयी माझा अभ्यास नाही. किरकोळ माहितीवर आधारीत मत व्यक्त केले आहे.
ही बायलॉजिकल वेळ म्हणजे नक्की
सेम हेअर
जैविक वेळ
माझ्या समजूतीप्रमाणे शरीरातील प्रत्येक टिशूचे (त्यातील पेशी सतत बदलल्या जात असल्या तरी) तो टिशू निर्माण झाल्यापासूनच्या क्षणापासून ते सध्याच्या कालापर्यंत, यामधील काल हे त्या टिशूचे जैविक वय.
अरे हां
सध्या बाळाच्या जन्माच्या वेळीच त्याच्या काही पेशी (बहुतेक नाळेशी संबंधित) जतन सुरु करुन ठेवने ऑलरेडी सुरु झाले आहे असे ऐकतो.
उद्या त्या बाळास काही अपाय होउ लागला तर ह्या पेशींचा उअपयोग करुन अवयव सुद्धा बनविता येतो असे कायसे ऐकले आहे.
वैद्यक जाणकार कुणी आहेत का इकडे?
निराशा (अवांतर / अशीच ट्रोलगिरी)
शीर्षक वाचून, हे जुन्या काळातील चोरट्या घड्याळांची छुपी आयात करणार्या एखाद्या घड्याळस्मगलराचे चरित्र१, निवेदन२, इतिवृत्त, मनोगत अथवा कथा वगैरेंपैकी काहीतरी असावे, अशा समजुतीने मोठ्या अपेक्षेने लेख उघडला, तर आत भलतेच काहीतरी दडलेले निघाल्याने घोर निराशा झाली. माय ब्याड!
असो. लेख तूर्तास वाचलेला नाही. पुढेमागे सवडीने कधीतरी मूड झाल्यास नीट वाचेन, आणि यदाकदाचित समजल्यास एखादी प्रामाणिक प्रतिक्रिया३सुद्धा इच्छा झाल्यास नि जमल्यास देईन. तूर्तास ही केवळ पोच.
=====================================================================================================================================================================
१, २ 'आत्मचरित्र' अथवा 'आत्मनिवेदन' म्हटलेले नाही, याची कृपया दखल घ्यावी. धन्यवाद.
३ म्हणजे, प्रस्तुत प्रतिक्रिया अप्रामाणिक आहे, असा दावा नाही. (किंबहुना, इतकी प्रामाणिक प्रतिक्रिया त्रिभुवनात शोधूनदेखील सापडणार नाही, अशी ग्वाही आत्मप्रौढीचा प्रमाद पत्करूनसुद्धा देऊ इच्छितो.) म्हणण्याचा उद्देश एवढाच, की लेख (मुळात वाचला, हे गृहीत धरून) न समजतासुद्धा, कदाचित त्यातील समजल्यासारखे वाटलेले एखादे वाक्य धरून वगैरे४, लेखातील सग्गळेसग्गळे समजल्याचा आव आणत नि याही विषयात आपल्याला बर्यापैकी गती असल्याच्या थाटात काहीबाही प्रतिक्रिया जर समजा ठोकून दिली, तर अशी प्रतिक्रिया प्रामाणिक राहणार नाही, नाही का?
४ ट्रिक्स ऑफ द ट्रेड (ऑफ गिविंग प्रतिसादाज़्), यू नो! (आफ्टर ऑल, आय याम अॅन ओल्ड ह्याण्ड अॅट धिस गेम. आय शुड नो. बीन देअर, डन द्याट.)
चंद्रशेखर यांचा
चंद्रशेखर यांचा नेहेमीप्रमाणेच इंटरेस्टिँग, माहितीपूर्ण लेख.
निळे यांचा प्रतिसाद देखील आवडला, पटला.