संत अन स्त्रीरुप
सर्वात आधी हे स्पष्ट करते की मी कोणत्याही धर्माचा , सखोल अभ्यास केलेला नाही. पण एक हौस्/छंद म्हणून शीख, ख्रिश्चन, हिंदू आदि धर्मांतील गोष्टी/श्लोक वाचल्या आहेत. बर्याच वेळा असे आढळले आहे की - संत हे स्वतःला स्त्री (वधू) मानून परमेश्वराची (पतीची) आराधना करतात. या संदर्भात एक असे विश्लेषण ऐकले होते की परमेश्वर हा धनभारीत (देणारा दाता) असून आपण नेहमीच ऋणभारीत (घेणारे/याचक) असतो अन तो दाता - याचक
संबंध या कथा दर्शवितात.
चैतन्यमहाप्रभू देखील स्वतःला राधा समजत. त्यांनी स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात पाहीले अन त्यांना राधारुप दिसले वगैरे आख्यायिका प्रचलित आहेत.
शीख धर्मातही ही संकल्पना आढळते. -
सा धन छुटी मुठी झूठि विधणीआ मिरतकड़ा अंङनड़े बारे ॥
शरीर-रुपी वधू असत्यास भुलून तिच्या पती पासून विलग झाली आहे, विधवा झालेली आहे.
सुरति मुई मरु माईए महल रुंनी दर बारे ॥
असे वैधव्य आलेली वधू बंद दाराआडून आक्रोश करते आहे की "माई! मी अंधारात बुडले. पतीवियोगात, त्याच्या निधनानंतर माझ्या मनातील प्रकाशच नाहीसा झाला आहे."
रोवहु कंत महेलीहो सचे के गुण सारे ॥५॥
परमेश्वराच्या आत्मारुपी विधवांनो, आक्रोश करा आणी सदैव त्या एका परमेश्वराचे गुणगान करा.
जानी विछुंनड़े मेरा मरणु भइआ ध्रिगु जीवणु संसारे ॥
अशी ही विधवा आक्रोश करते आहे की "माझ्या प्रियकरापासूनचा वियोग हा मला मृत्युसमान आहे. माझे आयुष्यच शापीत आणि वाया गेलेले आहे.
तुसी रोवहु रोवण आईहो झूठि मुठी संसारे ॥
तेव्हा रडा, शोक करा, आक्रोश करा कारण हे जग मिथ्या आहे.
हउ मुठड़ी धंधै धावणीआ पिरि छोडिअड़ी विधणकारे ॥
पतीच्या वियोगानंतरही, मी पापीण आसक्तीने, भौतिक सुखामागे धावते, पतीप्रेमापासून वंचित, पतीची वंचना करते, पापे करते.
घरि घरि कंतु महेलीआ रूड़ै हेति पिआरे ॥
प्रत्येक घराघरामध्ये, परमेश्वररुपी पतीच्या वधू आहेत , ज्या आपल्या पतीचे डोळे भरुन दर्शन घेतात
मै पिरु सचु सालाहणा हउ रहसिअड़ी नामि भतारे ॥७॥
माझ्या पतीचे, परमेश्वराचे मी नामस्मरण करते अन त्याच्याशी संलग्न होते, मीलन पावते.
गुरि मिलिऐ वेसु पलटिआ सा धन सचु सीगारो ॥
गुरु मिळताच आत्मारुपी वधूचे कपडे सत्याने, चमकू लागतात, आकर्षक दिसू लागतात.
आवहु मिलहु सहेलीहो सिमरहु सिरजणहारो ॥
परमेश्वराच्या वधूंनो या ,आपण त्याची प्रार्थना करु यात.
बईअरि नामि सोहागणी सचु सवारणहारो ॥
नामस्मरण हा परमेश्वर पतीची प्रिया बनण्याचा राजमार्ग आहे.
___________________________
ख्रिश्चन धर्मात पुढील पॅरॅबल आढळते-
५ कुमारीका आणि तेल-दिवा
तेल्-दिवे घेऊन, १० कुमारीका पतीस भेटण्यास सज्ज झाल्या. त्यातील ५ होत्या मूर्ख, ५ होत्या शहाण्या. मूर्ख कुमारीकांनी जास्तीचे तेल घेतले नाही, शहाण्यांनी घेतले. नवरदेवाच्या आगमनास उशीर झाल्याने दाही जणी पेंगळून झोपी गेल्या. शेवटी जेव्हा नवरदेवाचे आगमन झाले तेव्हा प्रत्येकीने दिवा प्रज्ज्वलित केला अन फक्त शहाण्या ५ जणींचे दिवे पेटले. मूर्ख ५ जणी तेल शोधत परत फिरु लागल्या व त्यांना यायला उशीर झाला. दार ठोठावले असता नवरदेव म्हणाला "मी तुम्हाला ओळखत नाही." (Matthew 25:1-13). 268
तात्पर्य - तेव्हा सदैव सतर्क रहा, सजग रहा, मालक (नवरदेव) केव्हा येईल ते सांगता येत नाही.
__________________________
इतक्या विविध धर्मातील संतांना ही एकच कल्पना कशी सुचली असेल हे एक कोडेच आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
याला मधुरा भक्ती म्हणतात...
या भक्तीला "मधुरा भक्ती" असे म्हणतात. आपल्या परंपरेत भक्तीचे ९ प्रकार सांगितले आहेत. त्याला एकत्रितरित्या "नवविधा भक्ती" असे म्हणतात. मधुरा भक्ती हा त्यातला एक प्रकार आहे. मधुरा भक्तीत इश्वराला प्रियकर किंवा पती मानून स्वत:ला त्याची प्रेयसी किंवा पत्नी मानले जाते. मधुरा भक्तीचे सवोत्तम उदाहरण म्हणजे संत मीराबाई. त्यांनी आपल्या लौकिक पतीला पती मानण्यास नकार दिला होता. भगवान श्रीकृष्ण हाच आपला पती आहे, असे त्या मानीत असत.
बहुतांश मराठी संतांनी स्वत:ला प्रेयसीच्या रुपात मानून इश्वराचे प्रेमाराधन करणारे काव्य लिहिले आहे. इतकेच काय काही संतांनी स्वत:ला "घरघुशी" आणि "व्याभिचारिणी" देखील संबोधले आहे. पुरुषाची इच्छा असो वा नसो, त्याच्या घरात जबरदस्तीने घुसून त्याच्याशी संसार करणार्या स्त्रीला "घरघुशी" म्हणतात. "घरघुशा" स्त्रीचे स्थान रखेलीपेक्षाही हीन प्रतीचे समजले जात असे. संत तुकोबाराय यांचा "हाचि नेम आता न फिरे माघारी । बैसले शेजारी गोविंदाचे ।।" हा अभंग याचे उत्तम उदाहरण आहे. या अभंगातील एक ओळ अशी आहे :
घररीघी जाले पट्टराणी बळे । वरिले सावळे परब्रह्म ।।
घररीघी म्हणजे घर घुसणारी स्त्री. मी केशवाचे घर घुसून पट्टराणी झाले आहे, असा या ओळीचा अर्थ आहे.
याही पुढे जाऊन संत इश्वराला प्रियकर मानून स्वत:ला व्याभिचारीणीही म्हणवून घेतात. तुकोबांच्याच एका अभंगातील एक ओळ पाहा :
आधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा । म्हणुनी व्याभिचारा पातलेसे ।।
आधीच्या पतीपासून माझी कामेच्छा पूर्ण होत नव्हती, त्यामुळे मी व्याभिचाराचा मार्ग पत्करला आहे, असा या ओळीचा अर्थ होय.
भारताचा गेल्या १०००-२०००
भारताचा गेल्या १०००-२००० वर्षांचा इतिहास पाहता इथे अध्यात्मात कामापेक्षा जास्त टॅलेंट वाया गेले नि भारताचा अर्थिक, प्रागतिक र्हास झाला. संताचा ईश्वराचा ओढा खूप जास्त होता, त्यामानाने त्यांचे समाज सुधारण्याकडे लक्ष खूप कमी होते. आर्थिक, तांत्रिक प्रगती व्हावी कि नाही हा विषय आज संदेहाच्या पलिकडे आहे, पण संतलोक होते तेव्हा प्रगतीच्या आवश्यकतेबद्दलच प्रश्नचिन्ह होते याचा संपूर्ण फायदा संतांना दिला तरी आजच्या भारतीय समाजाची मूल्ये पाहता भारतीत संतांना तितकासा आदर देववत नाही. संतांनी ज्या स्तराला जाऊन देवभक्ती केली ती अतिरेकी वाटते.
भारतीय संतांनी देवभक्तीसोबत
भारतीय संतांनी देवभक्तीसोबत समाजसुधारणांचं मोठं काम केलं. एरवी अतिशय अवघड ठरू शकेलसा विचार देवाच्या शर्करावगुंठित गोळीतून देण्याइतकी चलाख आणि परिणामकारक गोष्ट दुसरी नसेल. एकनाथ, रामदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर. बुद्धही या पंक्तीत बसावा.
मला देव-धर्म-अध्यात्म या गोष्टींबद्दल यत्किंचितही आदर नाही. पण सर्वसामान्य माणसाच्या दु:खाबद्दलचा कळवळा, सामाजिक सुधारणा आणि अभिव्यक्तीसाठी वापरलेली अस्सल भाषा या तीन कारणांमुळे संतांबद्दल मात्र कमालीचा आदर आणि आपलेपणा वाटतो.
संत
संत , तत्वज्ञ , उपदेशक ("लोकहो, चांगुलपणाने वागा. चांगले रहा" असा उपदेश करणारे) हे सगळे
एकमेकांना पर्यायी शब्द आहेत काय ?
असाच उपदेश समजा एखाद्या श्री झंप्यासिंग तेनगे ह्यांनी केला तर त्यांनाही संत म्हणणार का ?
जो उपदेश करतो तो संत की जो संत तो उपदेश करतो ?
की दोन्हीही असेलच असे नाही.
अगदी बरोबर....
त्यामानाने त्यांचे समाज सुधारण्याकडे लक्ष खूप कमी होते. आर्थिक, तांत्रिक प्रगती व्हावी कि नाही हा विषय आज संदेहाच्या पलिकडे आहे
समाजातील अज्ञान, दारिद्र्य आणि जात-पात ह्याचे कारण शोधणे, लोकांना संघटीत करणे आणि त्यासाठी समाज प्रबोधन करायचे सोडून, समाजातील प्रस्थापितांविरुद्ध लढा न देता त्यांनी अनेक आरोप स्वतःवर घेतले, स्वतः शिव्या आणि मार खाल्ला आणि वर त्यातून वाचल्यावर त्याचे क्रेडिट देवाला देऊन टाकले.
समाजाचं जाऊ दे, बरेच संत अगदी स्वतःचा संसार देखील सांभाळू शकले नाहीत.
त्यांचा सारा ओढा हा केवळ देव भक्ती होता.
त्त्यांनी इतरांना ज्ञान / शिकवण देणे म्हणजे जरा जास्तच होते.
भारताचा गेल्या १०००-२०००
भारताचा गेल्या १०००-२००० वर्षांचा इतिहास पाहता इथे अध्यात्मात कामापेक्षा जास्त टॅलेंट वाया गेले नि भारताचा अर्थिक, प्रागतिक र्हास झाला.
इ.स. १५०० च्या आधीचा भारताचा इतिहास पाहिला तर हे वाक्य घिसंपीटं आणि ढळढळीत चुकीचं आहे हे दिसूनच येतं. युरोपातही टनावारी संत झालेत. मात्र गेल्या चारपाचशे वर्षांत बाकीचे लोक फेमस झाल्याने असली मोनोलिथिक चित्रे डोळ्यांसमोर उभी राहतात. नैतर प्रत्येक बिगर-अध्यात्मिक अन बिगर-साहित्यिक फील्डमध्ये या ना त्या प्रकारचे भारतीय योगदान दिसून येत असताना अशी वाक्ये सुचली नसती. पण वेष्टर्न प्रोपोगंडा म्हणा नैतर सेल्फ-फ्लॅगेलेशनमध्ये आनंद मानणारी मनोवृत्ती म्हणा, त्यामुळे असे होतेच. चुकीची वाक्ये अढळपद मिळवतातच, त्यात लै वेगळे कै नै. पण तीच खरी अन डिफॉल्ट असे कोणी मानू लागले तर प्राब्ळम आहे जरूर.
मला दोन-तीन गोष्टी म्हणायच्या
मला दोन-तीन गोष्टी म्हणायच्या आहेत -
१. १५०० च्या मागे युरोपीय लोक भारताइतके सेटल झाले नव्हते. इथे प्रगती शक्य होती नि तिथे नव्हती.
२. युरोपात टनावारी संत झाले असतील तर फार इफेक्टीव काम केले आहे. आजही युरोपीय लोकांची मूल्ये भारतीयांपेक्षा सरस आहेत यात दुमत नसावे.
३. १२० कोटी लोकसंख्या असलेले युरोपीय देश एकत्र करा. एकून नोबेल विजेते मोजा. भारतीय मोजा. काय येईल रेशो?
नोबेल विजेते?
नोबेल विजेते हा एक महत्त्वपूर्ण निकष आहे काय? नोबेल विजेते युरोपीय देशच ठरवतात. निव्वळ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या एकाच निकषावर बराक ओबामा नोबेल शांतता पुरस्कार विजेते झाले आहेत.
मोदी पंतप्रधान झाल्यावर आपण नोबेलच्या धर्तीवर गोबेल पुरस्कार सुरु करु की. ;)
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/List_of_inventors
ही लिस्ट वाचा. लाज वाटावी इतके कमी भारतीय आहेत या यादीत. शिवाय खरेतर ज्यांनी "भारतात" शोध लावला तेवढेच पकडले पाहिजेत, पी आय ओ ला काही अर्थ नाही. ते ओबामापेक्षा वाईट मोजणे.
प्रगती दोन्हीकडे शक्य होती.
प्रगती दोन्हीकडे शक्य होती. युरोपियन लोक १५०० च्या आधी फक्त भटकेबिटके नव्हते.
युरोपियन देश सध्या भारताच्या कोसो पुढे आहेत हे नाकारण्याचे काहीच कारण नाही, मात्र त्याकरिता गेल्या १०००-२००० वर्षांना वेठीस धरणेही तितकेच चुकीचे आहे.आपण मागे पडलो, पण कधीपासून ते पाहिले पाहिजे. जे मागे पडलो त्यात फक्त आणि फक्त आपलाच भाग होता का, युरोपियन लोक भारतात येऊन योगा शिकवत होते किंवा कसे, इ. प्रश्नांची उत्तरे पाहिल्यास जो "आपण सर्व गंडके" छाप आरोप आहे त्याची तीव्रता पुष्कळ अंशी कमी होईल.
एकनाथ, रामदास, ज्ञानेश्वर,
एकनाथ, रामदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर आणि बुद्ध यांच्याबद्दल मलाही आदर आहे. पण यांनी सामाजिक सुधारणा, दु:खाचा कळवळा, इ इ चे शर्करावगुंठण करून अध्यात्म विकले हे सत्य आहे. मग उरल्या त्यांच्या अध्यात्माच्या बथ्थड संकल्पना नि समाजसुधार तिकडेच गेला.
रामदासांचे मनाचे श्लोक हे मनाबद्दल किती बोलतात नि रामाबद्दल किती नि भक्ती किती याबद्दल किती यात काहीही संतुलन नाही. तेच बुद्धाचे. नको तितके कडक नियम. तिथेही अनुकंपा उडत गेली नि उरल्या शुष्क चालीरिती. ज्ञानेश्वरांनी कोणते समाजकार्य केले असे स्वतःस विचारताना मला एक ओळही आठवत नाही. हे सारे लोक गहन अध्यात्मवादी होते, त्या नादात त्यांनी मानवी भावनांचा मूल्यांचा मागोवा घेतला नि आपल्या साहित्यात बद्ध केला, पण त्याने तत्कालिन वा सांप्रतकालीन लोकांची मूल्ये खरोखरच बदलली असे मला तरी जाणवत नाही.
मनोबा, मला विचाराअंती असे
मनोबा,
मला विचाराअंती असे वाटते कि आपल्या देशात संत झालेच नसते तर देशाचे कल्याण झाले असते. युरोपात "अन्यायी धर्मसंस्था विरुद्ध बुद्धीप्रामाण्यवाद" असा एक लढा झाला. त्यात धर्मसंस्था हरली. युरोपियन लोक प्रगत झाले. भारतात असा लढा होऊच शकला नाही कारण संतांनी एक बफर निर्माण केला. धर्मसंस्थेची जी मूल्ये होती नि संतांची जी मूल्ये होती, त्यात ९०% मूल्ये (अजो शैलीतला आकडा) तीच होती. मग ज्यांना सामाजिक कळवळा , इ आहे; निसर्गाची चिकित्सा करायची इच्छा आहे ते आपला वेगळा गट उभा करू शकले नाहीत. संत चांगलेच म्हणून अशी 'ज्यांच्यात सुधार शक्य आहे' अशी मंडळी त्यांनाच चिटकून राहिली.
आजही भारतात अध्यात्मामुळे जबरदस्त टॅलेंट वेस्ट होते. "हवेचे रासायनिक स्वरुप कसे असावे" यापेक्षा कोणालाही "हे जग कसे निर्माण झाले" याचेच जास्त कौतुहल असते. हे नैसर्गिक आहे. इथे भारताचा प्रॉब्लेम होतो. नायजेरिया मधे असा प्रश्न पडला तर फार खुराक मिळत नाही पण भारतात आयुष्य कमी पडेल इतका खुराक आहे. भारतातला माहौल नेहमीच असा राहिला कि प्रत्येक नव्या जन्मलेल्या मुलाला हे जे सर्वोच्च कुतुहल असते त्याला हवा मिळते. (अगदी फिरंगी पण या भारतीय थापांना फसून इकडे येतात.) अध्यात्मिक अजेंडा नसलेला माणूस इथे विरळा!
म्हणून उच्चशिक्षित लोकांच्या संख्येचा युरोपातला नि भारतातला रेशो काढला तर इथे उत्तम शास्त्रज्ञ, प्रशासक फार कमी मिळतात. जे कोणी भ्रष्टाचारी नाहीत त्यांची खूप उर्जा "आपल्याला काहीतरी मिळेल" म्हणून अध्यात्मात केलेल्या खननाला जाते. असो.
बुद्धीप्रामाण्यवाद नायजेरियात निर्माण झाला नाही
युरोपात "अन्यायी धर्मसंस्था विरुद्ध बुद्धीप्रामाण्यवाद" असा एक लढा झाला. त्यात धर्मसंस्था हरली. भारतात असा लढा होऊच शकला नाही....
"हवेचे रासायनिक स्वरुप कसे असावे" यापेक्षा कोणालाही "हे जग कसे निर्माण झाले" याचेच जास्त कौतुहल असते. इथे भारताचा प्रॉब्लेम होतो. नायजेरिया मधे असा प्रश्न पडला तर फार खुराक मिळत नाही पण भारतात आयुष्य कमी पडेल इतका खुराक आहे...
जरा विसन्गत होतोय युक्तिवाद. "हे जग कसे निर्माण झाले" या प्रश्नासाठी नायजेरियात कोणताच खुराक नाही, हे खरे आहे. पण तरीही नायजेरियात बुद्धीप्रामाण्यवाद निर्माण झाला नाही. बुद्धीप्रामाण्यवाद युरोपात निर्माण झाला. युरोपात तुम्ही म्हणता तसा खुराक नाही का? नाही असे जर आपले मत असेल तर ते अज्ञान ठरेल. युरोपाची मायथॉलॉजी भारतीय मायथॉलॉजीला लाजविणारी आहे.
"हे जग कसे निर्माण झाले" या कुतुहलापोटी माण्साने संतच व्हायला पहिजे असे नव्हे. "हे जग कसे निर्माण झाले" या कुतुहलातच भौतिक शास्त्राचे मूळ आहे. याच कुतुहलातून आइन्स्टाइनचा "सापेक्षतेचा सिद्धांत" निर्माण झाला.
ते असणारच. कारण त्यांची
ते असणारच. कारण त्यांची मायथॉलॉजी एकच आहे. इस्लाममध्येही मोझेस(मूसा) आणि जिसस (इसा) हे प्रेषित म्हणूनच गणले जातात. महंमद शेवटचा प्रेषित मानला जातो. त्याची शिकवण सगळ्यात अपडेटेड. म्हणून तो भारी.
कन्वर्ट होताना जे म्हणतात ला-ईलाही इल्लल्लाह, महंमद उल काहीतरी काहीतरी त्याचा अर्थ एकच देव आहे आणि महंमद त्याचा शेवटचा रसूल म्हणजेच प्रेषित आहे असा होतो.
फक्त मायथॉलॉजी नव्हे.
यहुदी आणि अरब हे वंश, संस्कृती, भाषा, पद्धती वगैरे सगळ्याच बाबतीत एका गटातले, जवळच्या नात्यातले आहेत. त्यामुळे अरबीमुसलमानी (अॅज़ ऑपोज़्ड टू फारसीमुसलमानी) आणि यहुदीख्रिस्ती नावांत साम्य आढळल्यास आश्चर्य वाटावयास नको.
(डुक्कर न खाणे, सुंता करणे, उजवीकडून डावीकडे लिहिणे, अरबी 'अस्सलाम आलैकुम' विरुद्ध हिब्रू/यिडिश 'शलोम अलीकिम' (उच्चाराची चूभूद्याघ्या), कित्ती कित्ती म्हणून साम्ये सांगावीत?)
नोहाची ष्टोरी यहुदी-ख्रिस्ती-मुसलमानांत कॉमन आहे. ते ठीकच आहे. पण मनूची तत्सम ष्टोरी 'आपल्यात'सुद्धा असावी, ही मात्र नवलाची गोष्ट आहे खरी.
अधिक माहिती सोप्य भाषेत , मराठीत
अधिक माहिती मराठीत, सोप्या पद्धतीने लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे.
खालील धागे पहावेत. बरीच इंटरेस्टिंग/रोचक माहिती मिळेल.
http://www.misalpav.com/node/17293
http://www.misalpav.com/node/17324
http://www.misalpav.com/node/17365
http://www.misalpav.com/node/17500
ह्याच शीर्षकाचे धागे उपक्रमावरही लिहिलेत.
उपक्रम, मिपा दोन्हीकडे लेखासारखीच माहिती कित्येक प्रतिसादकांनीही दिली आहे.
ज्यू , ख्रिश्चन, इस्लाम ह्या तिन्हींना एकत्रि अब्राहमिक religions असे म्हटले जाते.
गंगा नदीचे पात्र प्रचंड विस्तारत मुखापाशी समुद्राला मिळताना त्यास फाटे फुटत अनेक लहान नद्या बनतात.
ह्या तीन पंथांचे तसेच म्हणता यावे.
धर्म आणि संत एक नव्हेत...
एक गोष्ट येथे लक्षात ठेवली पाहिजे की, ज्याला आपण धर्म म्हणतो तो धर्म आणि संत पंरपरा या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. आपल्या धर्माने ठरविलेल्या निकषांचा आधार घेऊन मूल्यमापन केले तर सगळे संत धर्मद्रोही ठरतात. म्हणून सगळ्या संतांना धर्ममार्तंडांच्या विरोधाचा सामना करावा लागला.
आणखी एक असे की, संतांची चळवळ धार्मिक नव्हती. ती सामाजिक चळवळ होती. संत नामदेवांनी पंढरपूरच्या वाळवंटात महार कुळात जन्मलेल्या चोखामेळ्याच्या छातीशी छाती भिडवली. संत एकनाथांनी आपल्या पितरांच्या श्राद्धाला दलितांना जेवायला बोलावले. संत तुकोबांनी संतू तेल्याला लेखनकामाठीला लावले आणि "भेदाभेद भ्रम अमंगळ" या महावाक्याची घोषणा केली.
संतांनी कोणतेही सामाजिक काम केले नाही, असे ज्यांना वाटते, त्यांनी क्षणभर अशी कल्पना करावी की, आपल्या पितरांच्या श्राद्धाचे तर्पण चोखामेळा यांच्या जातीतील कोणी व्यक्ती करीत आहे.
सर्वच नाही.
सर्व संतांची भक्ति मधुरा रूपात होती असे नव्हे. प्रियकर-प्रेयसी किंवा कांत-कांता भावाने परमेश्वराकडे पहाणे हा एक वेगळा मार्ग आहे. वल्लभाचार्यांनी मधुराष्टके रचली ती या भावाने. 'अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनम मधुरं हसितं मधुरम् | हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते: अखिलं मधुरम् | असे अतिकोमल भाव तितक्याच कोमल आणि मधुर भाषेत वर्तवणारे हे आठ श्लोक वल्लभ संप्रदायात आणि एकूणच वैष्णवांत प्रसिद्ध आणि पवित्र आहेत. यावरून या रूपातल्या भक्तीला मधुरा नाव पडले. 'मन्द समीरे, यमुनातीरे, वसति वने वनमाली' हा असाच मृदुतर भाषेतला आणखी एक श्लोक.
या भक्तीमध्ये परमेश्वराशी असे सायुज्य येते की देहभाव, लिंगभाव गळून पडतो. भक्त कधी स्वतःला स्त्रीरूपात आणि परमेश्वराला पुरुषरूपात पहातो तर कधी परमेश्वर प्रेयसी बनून भक्ताच्या मनात स्त्रीरूपात वावरतो. परमेश्वराचा विरह भक्ताला सहन होत नाही. 'कान्हो वनमाळी वेगी भेटवा का' अशी आळवणी सुरू होते. या भेटीसाठी जीव आसुसतो, तडफडतो. अत्युत्कट शब्दकळा पाझरू लागते. 'गगनमंडली शेज पियाची, आम्हांला धरणी, मी तर प्रेम दिवाणी|' किंवा ' अता तूच भय-लाज हरी रे, धीर देउनी ने नवरी रे, भरोत, भरतील नेत्र जरी रे, कळ पळभर मात्र, खरे घर ते' किंवा 'इंतज़ार की बलाएं बेसहारियोंसे पुच्छो, सैयो माही विछड गया मेरा' किंवा 'हिज्र की रात, और इतनी रौशन, कोई कह दे गुलशन गुलशन' अशा मोत्यांच्या लडी उलगडतात. ही हिज्र आणि वस्ल ची कल्पना अनेक सूफी भजने आणि कव्वाल्यांतून दिसते.
आपल्या विदर्भ-मराठवाड्यात संत गुलाबदास महाराज या नावाचे मोठे मधुराभक्त होऊन गेले, ते अंध होते.
cuckold कादंबरी आठवली
किरण नगरकर ह्यांची cuckold (प्रतिस्पर्धी) ही कादंबरी आठवली. त्यात त्यांनी ह्यावर टिप्पणी केली आहे.
"सहज अशा शारिरीक जवळीकीला किंवा प्रेमाला एखादं आध्यात्मिक रूपडं चढवायची मखलाशी" असं त्यातील राजपुत्राचं मीरेच्या कृष्णभक्तीबद्द्लचं मत.
नगरकरदेखील प्रस्तावनेत असंच काहीसं मत मांडतात. भावनिक कुचंबणा झालेल्या स्त्रिया, समाजाने वाळीत टाकलेल्या विधवा किंवा ज्यांची शारिरीक सुखाची आस अपूर्ण आहे अशांना ह्या परमेश्वर रूपी प्रेमिकाची मदतच झाली आहे.
शास्त्रात पाठभेद खूप आहेत...
@ राही,
आपल्या शास्त्रात पाठभेद खूप आहेत. उदा. पाच महासती कोणत्या मानायच्या यात एकवाक्यता नाही. याच संस्थळावर पाच महासतीवरील माझ्या लेखात याविषयीची चर्चा आपणास येथे पाहता येईल. भक्तीचेही तसेच आहे. भक्ती ही नवविधा आहे की पंचविधा इथपासून वाद आहेत. नवविधा भक्तीतील नऊ प्रकार किंवा मार्ग कोणते याबाबतही मतभेद आहेत. सख्य भक्तीच्या जागी मधुरा भक्ती मानण्याचाही प्रघात आहे. नवविधा भक्तीतील शेवटची आत्मनिवेदन ही स्थिती म्हणजेच मधुरा भक्ती असेही काही जण मानतात. आत्मनिवेदन या संज्ञेत संपूर्ण समर्पण अपेक्षित आहे. असे समर्पण केवळ मधुराभक्तीत शक्य असते, म्हणून आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच मधुरा भक्ती होय असे काही विद्वान मानतात.
पंचविधा भक्तीत शांत, सख्य, दास्य, वात्सल्य आणि मधुरा असे पाच प्रकार सांगितले आहेत. नारद भक्ती सूत्राच्या काही संहितांत याचे विवेचन येते.
महत्त्वाचे
वल्लभाचार्यांच्या मधुराष्टकाचा आणि मधुराभक्तीचा काही संबंध नाही. वल्लभाचार्य हे फार अलिकडचे म्हणजेच १५ व्या शतकातील विद्वान आहेत. मधुराभक्ती हा प्रकार फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. या अष्टकाच्या नावात मधूर हा शब्द आहे, म्हणून आपली गफलत झालेली दिसते.
(माझ्या माहितीसाठी) या पाठभेदाकरिता पूर्ण संदर्भ?
दशावतार कुठले त्याबाबत भेद आहेत, वगैरे ठाऊक आहे. त्यांचे संदर्भसुद्धा सापडतात.
पंचकन्यांबाबत तुम्ही नेमके पाठभेदही सांगितलेले आहेत (कुंती/सीता).
परंतु मधुरा भक्तीची नवविधांमध्ये गणना केलेला पूर्ण संदर्भ माझ्या माहितीकरिता द्याल का? (पंचविधा भक्तीमध्ये गणना केल्याचा संदर्भ तुम्ही दिलेला आहे. तो शोधून बघता येईल, धन्यवाद.)
टीप : या बाबतीत केवळ सांस्कृतिक संदर्भ म्हणून कुतूहल आहे. माझी कुठलीही धर्मशास्त्रीय (थियोलॉजिकल) भूमिका नाही. त्यामुळे "स्वतःच्या अनुभवातून बघा, तुम्ही आत्मनिवेदन-भक्ती करता, तेव्हा मधुरा भक्तीच नाही का करत?" असा युक्तिवाद केल्यास तो माझ्या आवाक्याबाहेरचा आहे. कारण "सख्य आणि मधुरा म्हणजे स्वानुभवातून एकच नाही का?" असा युक्तिवाद कोणी केला तर मी तसेच "बरे बुवा, ठीक आहे" म्हणेन. परंतु असे युक्तिवाद पूर्वीपासून झाले असतील, तर ती सांस्कृतिक माहिती म्हणून माझ्या कुतूहलाची आहे.
आत्मनिवेदन या संज्ञेत संपूर्ण
आत्मनिवेदन या संज्ञेत संपूर्ण समर्पण अपेक्षित आहे. असे समर्पण केवळ मधुराभक्तीत शक्य असते, म्हणून आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच मधुरा भक्ती होय असे काही विद्वान मानतात.
प्रियकर-प्रेयसी नात्यापेक्षाही आत्मनिवेदन हे सखा/मित्र या नात्यात सोपे व्हावे. ज्ञानेश्वरीत एक श्लोक असाही येऊन जातो की जे गुपित श्रीकृष्णाने प्रत्यक्ष लक्ष्मी देवीस सांगितले नाही ते अर्जुनास विषद केले. शोधून संदर्भ देते. (प्रयत्न करते)
तेव्हा आत्मनिवेदन इज इक्विव्हॅलंट टू मधुरा भक्ती या मुद्द्याशी मी असहमती दर्शविते.
मैत्रीत समर्पण अपेक्षित नसते...
सारिका,
आत्मनिवेदनामध्ये समर्पण अपेक्षित आहे. मैत्रीत समर्पण अपेक्षित नसते. कोणतेही दोन मित्र हे एकमेकांशी बरोबरीच्या नात्याने वागत असतात. आपल्या परंपरेत प्रेयसी किंवा पत्नी हे समर्पणाचे सर्वोच्च प्रतिक समजले जाते.
भक्तीतील समर्पण हे भक्ताच्या बाजूने गृहीत धरले आहे. इश्वराच्या बाजूने नव्हे. श्रीकृष्णाने आपल्या पत्नीला न सांगितलेले गुपित अर्जुनाला सांगितले तरी त्यातून अर्जुनाचे समर्पण सिद्ध होत नाही. श्रीकृष्णाचे अर्जुनाविषयी प्रेम व्यक्त होते. हा आत्मनिवेदन भक्तीच्या उलटा व्यवहार झाला. आत्मनिवेदन भक्तीत अर्जुनाकडून समर्पण अपेक्षित आहे. समर्पण करणारी व्यक्ती आपला "स्व" संपूर्णत: विसरून जाते. तिला इश्वराशिवाय आणखी कशाचीही अपेक्षा नसते. अगदी श्रीकृष्णाच्या तुम्ही म्हणता तशा गुपिताचीही नाही.
संत एकनाथांनी एका समर्पित गोपीचे वर्णन असे केले आहे :
कोणी एकी भुलली नारी । विकिता गोरस घ्या म्हणे हरी ।।
एकनाथांच्या गौळणीतील ही गोपी बाजारात गेल्यानंतर "दही-दूध घ्या" असे म्हणण्याऐवजी "हरी घ्या" असे म्हणते.
मी खूप प्रयत्न केला पण इमेज
मी खूप प्रयत्न केला पण इमेज दिसत नाही. कोणी मदत करु शकेल काय? फोटोची लिंक = https://plus.google.com/108149673835580608180/posts/9wQbswsFwSQ