नास्तिक आणि विकृती

संकल्पना:
नास्तिक म्हणजे कोण? तर मूलतः ईश्वर न मानणारे. म्हणजे हे जग निर्मिणारी, चालवणारी कोणी शक्ती नाही नि तिला अभिप्रेत असे कोणते संकेत जगात नाहीत असे मानणारे लोक. हे लोक बाकी काही मानोत न मानोत, इतके तत्त्वज्ञान तरी जरूर मानतात.
आता अस्तिक म्हणजे कोण? तर देव म्हणून कोण्या शक्तीने जग निर्माण केले, ती ते चालवत आहे, ते कसे चालावे याचे तिला अभिप्रेत असे संकेत आहेत असे मानणारे लोक. हा देव नक्की काय आहे, कसा आहे आणि हे संकेत कोणते आहेत याबद्दल अस्तिकांत प्रचंड घोळ आहेत, भांडणे देखिल आहेत. पण असे काही ना काही देव नावाचे प्रकरण आहे हे मात्र नि:संशय आहे.
दोन भिन्न प्रकारच्या अस्तिकांमधील भांडणांचे स्वरुप मुख्यतः माझा देव, धर्म जास्त चांगला कि तुझी जास्त अशा प्रकारचे असते. परंतु तरीही सर्वसाधारणपणे ईश्वर हा अनादि आहे, अनंत आहे, दयाळू आहे, त्याचे नियंत्रण असते, इ इ ते मानतात. प्रत्येक गोष्टीचा संदर्भ ते ईश्वरामधे देतात. असं का, तसं का तर देवाला अभिप्रेत आहे म्हणून. देवाचा स्रोत, त्याच्या गुणधर्मांचा स्रोत इत्यादिंबद्दल नास्तिकांनी विचारले असताना ते सार्‍या भौतिक संकल्पना ईश्वरास गैरलागू आहेत म्हणून त्यांची बोळवण करतात वा वर्तुलीय संदर्भ देतात. आजपावेतो जगात हमेशा बहुतांश लोक अस्तिक राहिले आहेत नि त्यांचे वर्तन संतोषजनक राहिले आहे काय याचे उत्तर प्रत्येकजण भिन्नपणे देऊ शकतो. ते एक असो.

मूल्यांचा स्रोतः
परंतु सांप्रत (चांगल्या) मानवी मूल्यांचा स्रोत काय असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर पटकन देणे थोडे कठीण वाटते. गुणसूत्रे? ईश्वर? गुणसूत्रे ही मानवी सन्मूल्यांचा आधार मानायला जावीत तर एक दोन समस्या येतात. पहिली म्हणजे मूल्ये जितकी धडाधड बदलत आहेत तितक्या वेगाने जीन्स बदलत नाहीत. गेल्या शतकात प्रचंड वेगाने मूल्ये बदलली आहेत. अगदी व्यक्तिची चांगली मूल्ये म्हणजे काय ते त्याचं चांगुलपण किती हे देखिल खूप बदललं आहे. पण गेल्या शतकात मानवाचे जैविक म्यूटेशन्स होऊन ही मूल्ये बदलली आहेत म्हणणे धाडसाचे ठरेल. दुसरे म्हणजे मानवाची गुणसूत्रे काही लाख वर्षांपासून तीच आहेत. त्यांत मूल्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समाविष्ट आहेत असे म्हणायचे झाले तर मग मानवाची बरीच मूल्ये ही सनातन आहेत हे मान्य करावे लागेल. ही मूल्ये कोणती हे शोधावे लागेल आणि आपण स्वतःत जो मूल्यबदल करवून घेत आहोत तो प्राकृतिक आहे वा नाही हा प्रश्न अभ्यासावा लागेल. कोणता एखादा मूल्यबदल प्राकृतिक नसल्यास तो इष्ट आहे वा नाही याबद्दल समाजात (जसे जी एम फूडबद्दल होते तशी) चर्चा व्हायला हवी. ईश्वराचे म्हणाल तर अस्तिकांचे हे सोपे उत्तर आहे. नास्तिकांसाठी मात्र तो पर्याय नाही.

नास्तिकांसमोरची समस्या:
अस्तिक लोकांसाठी मूल्यस्रोत ही समस्या तितकीशी कठिण नाही, कारण ईश्वर नि ईश्वरप्रणित मूल्ये सनातन नि शाश्वत आहेत असे ते मानतात. कोणत्याही का चे उत्तर ते प्रचंड गोलगोल देतात. सन्मूल्यांचा स्रोत निश्चित माहित असला तरी त्याचा अर्थ अस्तिकांना नेहमी नीट लावता येत नाही. पण त्याची आवध्यकता क्वचित पडते.
प्रश्न उरतो नास्तिकांचा, त्यांची मूल्ये काय असावीत आणि का? मानवी शरीराची आणि मनाची एक जैविक घडण आहे. त्यातून (तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे त्यापलिकडे) सुटका नाही. मग उरते ते उत्स्फूर्त वर्तन. ते कोणत्या दिशेने असावे? मास्लोच्या पिरॅमिडचा पाया जैविक गरजांचा आहे. त्या पूर्ण करताना कोणती सीमा बाळगायची? कोणती नाही? मास्लोचे वरचे मनोरे जैविक आहेत कि नाहीत? ते पूर्ण करायचे कि नाही? आणि त्यासाठी कोणत्या स्तराला जायचं? त्याच्या सीमा स्वतःच आखायच्या? कोणत्या सूत्रांनी? हे वर्तन अस्तिकांचे मते "अग्राह्य (and in extreme case pervert)" ठरले तर?

अपवादः
अगदी अस्तिकवाद्यांच्या कळपात, ते ज्या इतक्या दयाघन इश्वराला मानतात, तिथे ईश्वरप्रणित संकेताप्रमाणे वागण्याचा अतिरेकी अट्टाहास आणि चूकीचा अन्वयार्थ, भलत्याच विकृती घेऊन आला आहे. मग जेव्हा पृथ्वीवर मूळातच ज्या तत्त्वज्ञानाचा आधारच "निर्मूल्यावस्था" आहे, ते किती विकृती घेऊन यायची संभावना आहे? अस्तिकांमधे आपले राजकीय, आर्थिक स्वार्थ साधणारे नास्तिक लपून बसलेले असतात. त्यांचा स्वतःचा देवावर, पापपुण्यावर विश्वास नसतोच, पण ते देवाच्या नावाखाली लोकांना नाडतात. नास्तिकांतही बरेच नास्तिक खरे नास्तिक नसतात. देव नाही तर मग जग कसं आहे याच्यावर त्यांची ४-५ वाक्यांनंतर ततपप होऊ लागते. स्वतःस नास्तिक भासवणारे लोक स्वतःच्या वाणिज्यिक हितांसाठी समाजास नास्तिक बनवत असू शकतात. उदाहरणार्थ, मुसलमानाची धर्मातली श्रद्धा गेली तरी तो (बाजारातली) दारू प्यायची जास्त असते. या चर्चेत मला हे अपवाद चर्चिणे टाळायचे आहे. (कोणाला हीच चर्चा करायची असेल तर अशुद्ध अस्तिकता वि शुद्ध नास्तिकता अशी करू नये. व्यवहारातल्या अशुद्ध नास्तिकता आणि अशुद्ध अस्तिकता यांचीच तुलना करावी) बहुतांश लोक त्यांचे त्यांचे तत्त्वज्ञान सरल, लौकिक अर्थाने पाळतात. या पार्श्वभूमीवर "सामान्य नास्तिक" इतर सामान्य व्यक्तिपेक्षा (आता आजच्या मूल्यांच्या परिप्रेक्ष्यात म्हणावे लागेल)गैरवर्तन करण्याची अधिक संभावना आहे का असे विचारले तर उत्तर सत्कृतदर्शनी हो असे दिसते.

इतिहासः
नास्तिकांचा, स्वतःस तसे म्हणवणार्‍या वा न म्हणवणार्‍या, इतिहास अस्तिकांपेक्षा खूप महान राहिला आहे. अगदी बौद्धिक, यशाच्या संबंधित बाबी वगळल्या तरी नास्तिक लोक इतिहासात केवळ वर्तनाच्या बाबतीत महान राहिले आहेत. बाबा आमटे यांचे उदाहरण घेता येईल. पण अशा नास्तिकांचे सृजन हे आजपावेतो अस्तिकांच्या व्यवस्थेतील अनर्थांना कंटाळून किंवा खास त्याला विरोध करण्यासाठी झाले आहे. पश्चिमेतही नास्तिकांनी केलेली लोकसेवा वाखाणण्यासारखी आहे. त्याला टेक्निकल अँगल कमी आणि सामाजिक अँगल जास्त राहिला आहे. नास्तिक राहिलेच आहेतच अत्यल्प. त्यामुळे नास्तिक म्हणजे "ईश्वर मानणारांच्या मांदियाळीतली लूट पाहून निषेध करणारा" इतकेच समजते. कधी कधी असे वाटते या लोकांना केवळ या लूटीविरोधात ओरडायचे होते, त्यात त्यांना ईश्वर आहे कि नाही या टेक्निकल आर्ग्युमेंट मधे काही रस नव्हता. पण समजा उद्या नास्तिकच जगात ९०-९५% झाले तर?

नाते:
अस्तिक लोक सारे काही(सजीव, निर्जीव) ईश्वरापासून आले आहे असे मानतात. साधारणतः त्यांना जगात सर्व गोष्टींत एक 'इंटेंडेड' कनेक्ट आहे असे म्हणायचे असते. अशा कनेक्टचे जे काही रुप आहे त्याचा त्यांना आदर असतो. नास्तिकाचे काय म्हणणे असते? एकूण जगच एक रँडम उद्भव आहे नि आपण त्यात एक रँडम घटक आहोत. आपण, आपले अस्तित्व, आपले गुणधर्म, मानवी देहामनाचे, जीवनांचे स्वरुप, हे सगळे रँडम ठरले आहे. हेच असंच सगळ्या आजूबाजूंच्या सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींचं आहे. निसर्गाचे काही कारणांनी काही नियम आहेत आणि त्यामुळे हे सगळं असं आहे. मग नास्तिकाचं अशा इतरांशी ममत्व कोणत्या स्वरुपाचं असेल? असेल का? आत्मोन्नती, अव्याहत आत्मोन्नती हीच मानवी प्रेरणा असेल तर तिच्या आपूर्तिसाठी काही करताना कुठे थांबावं हे कसं ठरवावं?

भविष्यः
समजा नास्तिक लोकच (९०-९५%) जगात सर्वत्र आहेत. (असं मानणं फार अग्राह्य नाही. आजच लोक देव, धर्म फार नॉमिनल लेवलवर मानतात. त्यांना फार जास्त विचार करायला वेळ नाही. केवळ लेगसी आहे म्हणून स्वतःस अस्तिक म्हणतात. पण अस्तिकत्वाचे/धर्माचे तत्त्वज्ञान, नियम, अटी, इ इ शी लोकांचे नाते तुटत चालले आहे. एक-दोन पिढींनंतर देव मानतो म्हणणाराची मते देखिल अगदी उथळ असतील. काळाप्रमाणे आपल्या वर्तनात ईश्वराला जर कोणी नेहमी बाजूला ठेवत असेल तर त्याला ठिकपणे अस्तिक म्हणता येणार नाही.) समजा अस्तिक फार कमी आहेत, नाहीत किंवा असले तरी भाष्य करावं असं काही गैर वागत नाहीत. मग नास्तिकांची पहिली प्रेरणा -अस्तिकांचे जे काही वाइट आहे त्याचा विरोध करत राहणे - ती नसेल. त्यानंतर दुसरी प्रेरणा म्हणजे समाज, त्याचे वर्तन, त्याचा इतिहास. आता ते देखिल अभ्यासाचा विषय झाले, प्रश्नांकित झाले, तर काय होणार? नास्तिकांना आपल्या स्वतःच्या अशा मूल्यांची गरज पडणार. त्यातले पहिले मूल्ये येते वैज्ञानिक सत्ये! पण वैज्ञानिक सत्ये प्रत्यक्ष जीवनात सारे मार्गदर्शन करण्यासाठी पुरेशी नसतात.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1.857145
Your rating: None Average: 1.9 (7 votes)

जाउंद्या हो शास्त्रापुरते नास्तिक व गरजेपुरते अस्तिक असावे. म्हंजे बर अस्तय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कृपया
संस्कृत जाणकार आस्तिक आणि नास्तिक ह्यां शब्दनिर्मिती आणि अर्था बद्दल सांगू शकतील काय?
नास्तिक = न + अस्तिक, आणि अस्ति म्हणजे (असणे-अस्तित्व) काय?

उदय नागांवकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की प्रश्न काय आहे ?
"आस्तिक श्रद्धावान असल्याने विक्रृत असण्याचा संभव कमी तर नास्तिकांकडे श्रद्धा नसल्याने त्यांच्यामध्ये विकृती आढळण्याचा संभव जास्त " असं तुमचं म्हणणं आहे असं मानून मी पुढे लिहीतेय.
(१) मुळात विकृती हा शब्द मानवी समाजजीवनाशीच निगडीत आहे. निसर्गात विकृती असं काही नसतं, तर अपवाद असतात. मानव निसर्गाचा भाग असला तरी मानवी समाज , त्याचे नीतीनियम हा काही निसर्गाचा भाग नाही.
(२) आस्तिक हा कुठल्याही धर्माचा असो, तो ऐहिक जीवनापेक्षा पारलौकिक जीवनाची आस जास्त बाळगतो . मग ती हिंदूंमधील मोक्षप्राप्ती असो का मुस्लिमांतील जन्नतची चाह.
त्यामुळेच आस्तिक माणूस हा या मानवी समाजातले नियम पायदळी तुडवण्याची शक्यता जास्त कारण त्याला त्यापेक्षा पारलौकिक जीवनाचे नियम ( त्याच्या त्याच्या धर्माचरणाने सांगीतलेले ) जास्त महत्वाचे वाटतात आणि तो ते पाळतो.
नास्तिक हा श्रध्दावान नसतो पण मानवी समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी जे नियम आहेत ते तो मानतो कारण तो जगतोय तेच जीवन मानतो दुसर्‍या ( म्रृत्युनंतरच्या जीवनाशी त्याला देणं घेणं नसतं. त्यामुळे तो ते नियम पाळायचा संभव जास्त. त्याची कशावर श्रध्धा नसेल तरी मानवी जीवन सुरळीत चालण्यासाठीच्या रचनेवर त्याचा विश्वास असतो.

आता उदाहरणं . विकृती हा उगा मोठा शब्द झाला आपण दोषपुर्ण वागणूक म्हणूया.
(१) आतिथीनं खायला मागिअतलं म्हणून आपल्या बाळाचं मांस शिजवून त्याला खायला घालणारी चांगुणा - श्रीयाळ हे आता विकृत मानले जातील . पण पुराणात अतिथीधर्माचे पालन करण्याचे उदाहरण म्हणून ही गोष्ट आहे.
(२) गरोदर बायकोला कोणाच्यातरी संशयावरून वनात सोडणारा राम हा राजधर्म पाळत होता.
(३) बापाच्या सांगण्यावरून आईचा वध करणारा परशुराम .
ही तीनही दोषपुर्ण वागण्याची उदाहरणे.

मी ज्या गोष्टी ऐकल्यात त्या बद्द्लच मी बोलू शकते त्यामुळे जशी पुराणातील उदाहरणे दिली तशी कुराणाशी वा बायबलशी संबधीत उअदाहरणे मला नाही देता येणार पण आज जगभरातले मुस्लीम अतिरेकी आस्तिकच आहेत .

मुळात १००% अस्तिक किंवा नास्तिक असं कोणी नसतंच . बरेचसे लोक कुंपणावरचेच असतात. कुणी संस्कार म्हणून, सवय म्हणून अस्तिक असतात. त्यांनाही कधीकधी नास्तीक व्हावसं वाटतं; तर नास्तिकांनाही कधी का होईना सर्व आधार सुटल्यावर ( मनातल्या मनात का होईना ) आस्तिक होता येतं. ईथेही ९९% लोकं हे असेच कुंपणावरलेच असतील त्यामुळे मुळातच ही चर्चाच चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे. .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विवेचन आवडले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||