मिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण
मिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण
.......(ज्यात कुठेही कमीतकमी शब्द वापरलेले नाहीत…)
आमचं लग्न तेव्हा थोडंसंच जुनं झालं होतं. म्हणजेच, एकमेकांवर चांगलं ‘इम्प’ मारून एकमेकांना प्रभावित करण्याचा काळ नुकताच संपून उलट एकमेकांच्या सवयींचा किंचित त्रास जाणवू लागला होता, तो काळ. आमच्या मित्रमंडळींनी घरं घ्यायला सुरुवात केली होती; काहींनी ‘गोड बातम्या’ दिल्या होत्या, तर काही त्या मार्गावर नि:शंकपणे निघालेले होते. बहुतेकांकडे दोन गाड्या तर होत्याच, शिवाय ‘बेबी झाल्यावर छोटी गाडी पुरणार नाही’ म्हणून नवीन सहासवारी गाड्याही घरी येत होत्या. ह्याच सुमारास आमची मात्र ‘कशात काय नि फाटक्यात पाय’ अशी गत!
कारण आमचं घर चारचौघांसारखं होण्याऐवजी किंवा आमच्या घरी बाळ होण्याऐवजी, नवऱ्याला ‘मिनिमॅलिझम’ (‘कमीतकमी’वाद) होऊ लागला होता. आधीच बाजारहाटाचा उल्लास, त्यात आमचा ‘धनी’ धनास जपणारा; म्हणून मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. म्हटलं, जाऊ दे. आपल्याला तर गाडी काढून हवी तशी फुटकळ खरेदी करता येतेय ना? मग झालं तर. पण हळूहळू नवऱ्यातले सूक्ष्म बदल मला टोचू लागले. मॉलमधे जाण्याच्या नावाने मळमळ वाढणं; ग्रोसरी वा हॉटेलातलं अरबट-चरबट खायची इच्छा न होता घरच्या वरण-भाताचेच डोहाळे लागणं; घरातल्या कुठल्याही सोफ्यावर, खुर्चीवर वा टेबलावर बसलं तरी ‘अवघडल्यासारखंच’ होतं, म्हणून मी लग्नानंतर नव्या नवलाईच्या दिवसांत घेतलेल्या एक एक ‘स्वस्त-नि-मस्त’ वस्तू ‘Craiglist’वर लावून कचऱ्याच्या भावाने विकून टाकणं इत्यादी इत्यादी. हे बदल लक्षात आले, तेव्हा मात्र लढा द्यायची वेळ आली असल्याचं मी समजून चुकले. कुठल्याही ‘वादा’ची कास धरल्यावर (उदा. स्त्रीवाद, मार्क्सवाद आणि अर्थात, ‘कमीतकमी’वाद), घरी असले वाद होतातच -
"अमेरिकेला भौतिक सुखांचा आणि वस्तूंचा अतिहव्यास आहे."
"हो. अमेरिकेला असेल, आपल्याला नाही."
"ह्या हव्यासापोटी मानसिक स्वास्थ्य नष्ट होतं."
"तुमच्यासारख्यांना समतोल साधता येणं कठीणच आहे, कारण तुम्ही कुठल्याही दिशेने वाहवतच जाता. एकीकडे हव्यास, दुसरीकडे विरक्ती."
"मला विरक्ती आलेली नाही."
"मग मॉलमधे ये, आणि २ नवीन शर्ट घे. शिवाय आपल्याला कपडे ठेवायला ड्रॉवर्स घ्यायलाच हवे आहेत. कपाटं कमी पडतायत."
"हेच ते. घोड्यासाठी नाल घेणं."
"नाही, नालीसाठी घोडा. पण भाड्याच्या घरात कपाटं कमीच असतात. स्वत:चं घर असतं तर गोष्ट वेगळी."
"तेच ते, आता ड्रॉवरसाठी घर घ्यायचं?"
"नाही, आपल्यासाठी घर घ्यायचं!".
"मला शर्टांमधे, कपड्यांमधे रस नाहीय."
"म्हणजे तुझं स्वत:वर प्रेम नाही."
"काहीही!"
"हो. केस विरळ व्हायला लागल्यापासून तुला अशी विरक्ती यायला लागलीय."
"काहीही अर्थ काढू नकोस."
"तुम्ही पुरुष बायकांची किंमत रूपावरून करता, म्हणजे स्वत:चीही तशीच करत असणार. मला सगळं माहितीय."
"असं काही नाहीय. मी माझे बॅगभर शर्ट फेकतोय."
मी, आनंदाने - "हो, खरंच? फेक बरं! कॉलेजपासूनचा फाटका टीशर्ट अजून कित्ती दिवस घालणारेस? पण नवीन घे त्याऐवजी."
"मग काय उपयोग? मी आता फक्त पांढरे शर्ट नि खाकी पॅन्ट घालणार."
"त्यापेक्षा भगवे कपडे घालून हिमालयावर जाऊन राहा."
‘कमीतकमी’वादाचं तत्त्व त्याने न बोलून पाळलं असतं, तर मानलं असतं. पण इथे बोलणं सोडून बाकी सगळं कमी करायची त्याची तयारी दिसतेय म्हटल्यावर मी कर‘वाद’ले, "आता खूप उशीर झाला. लग्नच केलं नसतंस मुळात, तर हे व्याप वाढले नसते. रामदास स्वामींनी सावधान केलं, तरी तुम्ही बायको आणलीत ना घरी? मग भोगा आपल्या कर्माची फळं!" (खूप राग आला की मी त्याला ’तुम्ही’ म्हणून संबोधते आणि आदरार्थी शब्दाचा विपर्यास केल्याचं छद्मी हसू मला येत असतं. असो.) तशी मिनिमॅलिझमची व्याख्या बघता त्यात तत्त्वत: न पटण्यासारखं काहीच नव्हतं.
अमेरिकेत, किंवा एकूणच इतर प्रगत (आणि प्रगतिशील) देशांमधून, आता वस्तूंचा हव्यास वाढतोय. कुठला फोन / स्मार्टफोन घेतला याची सर्वत्र चर्चा. शिवाय टॅबलेट हवी. टीव्ही एक सोडून दोन हवेत. किंवा बेसमेंटमधे प्रोजेक्टर हवा. असा यंत्रांचा सोस एकीकडे, तर दुसरीकडे - हा पर्फ्यूम, ती गाडी, ‘गुची’ची पर्स किंवा आवडत्या मालिकांच्या नाहीतर चित्रपटांच्या डीव्हीडीज. मग हे सगळं ठेवायला मोठं घर. मोठ्या घराला थंड-गरम करायला लागणारी प्रचंड ऊर्जा. मोठ्या घराचे हप्ते भरायला हवी लठ्ठ पगाराची नोकरी. मग नोकरीतले ताण. ते ताण कमी करायला पुन्हा बाजारहाट हा एकमेव विरंगुळा. त्यातही चढाओढ… आणि हे चक्र एकदा सुरू झालं की त्यातून बाहेर पडता न येणं... असं सगळं हव्यासाचं विष आपल्या जीवनक्रमात हळूहळू पसरायला लागलंय. ते जर आपण निर्धाराने कमी केलं, तर केवढातरी मोकळा वेळ, मोकळा श्वास आपल्याला घेता येईल. मुळात गरजा कमी असणारा माणूस हा नेहमीच सुखी असतो वगैरे वगैरे.
२००९-१० मधे लीओ बबूटा, जोशुआ फील्डस मिलबर्न वगैरे मंडळींनी मूळ धरायला सुरुवात केली. त्यांचे ब्लॉग्स, ट्वीट्स वाचून माझ्या नवऱ्याप्रमाणेच इतर लाखो मंडळी प्रेरित झाली. मिनिमॅलिझम (‘कमी-गरज’वाद / ‘कमीतकमी’वाद) ह्या जीवनशैलीचा उदय झाला. ‘कमी’वादींकडे १०० पेक्षा कमी ’वस्तू’ असतात म्हणे. त्यातल्या अनेकांची लग्नं झालेली नाहीत, किंवा मुलंही नाहीत. त्यामुळे त्यांना पाठीवर एक गाठोडं घेऊन जग बघायला जायला ही तुटपुंजी मालमत्ता सोयीची पडते. पण म्हणून ’कमी’वादी काही बौद्ध भिक्षू झालेले नाहीत. ते अनुभवांपासून दूर पळण्याऐवजी कमीतकमी सामानामुळे विविध अनुभवांना जास्त सहज सामोरे जाऊ शकतात, असं काहीसं तर्कशास्त्र ‘कमी’वादी ब्लॉगर्स सांगतात.
त्यात न पटण्यासारखं काही नसलं, तरी मी स्वत:ला जराशी स्त्रीवादी म्हणवत असल्यामुळे साहजिकच ‘कमी’वादाकडेही त्याच चष्म्यातून बघू लागले. मुळात नागरतेच्या उदयापासून पुरुषांनीच आधी स्त्रियांना उपभोग्य ‘वस्तू’ समजायला सुरुवात केली. त्याचेच परिणाम आम्ही स्त्रिया शतकानुशतकं भोगत आलो. वारसाहक्क नाही, मताधिकार नाहीत. कारण स्वत:च एक ‘वस्तू’ असलेल्या स्त्रीनेच वस्तूंवर मालकी दाखवली, तर तिचं मानवीकरण व्हायचं! तिथपासून स्त्रीवाद्यांची जी हक्कांची लढाई सुरू झालीय, ती आजवर.
यंत्रयुग आलं, तसा पुरुषांचा वेळ जाईना, म्हणून का काय, महायुद्धं उकरून काढली! मग हे गेले तिकडे रणभूमीवर शौर्य गाजवायला आणि स्त्रीलाच जुंपलं घाण्याला कारखान्यांतून! पण त्यामुळे जागतिक महायुद्धांचा खरा फायदा जर कुणाला झाला असेलच, तर तो स्त्रियांना झाला. कारण आता घराबाहेर पडलेलं त्यांचं पाऊल पुन्हा घरात अडकून पडू देण्याइतक्या कोणीच बायका वेड्या नव्हत्या. माझ्या मते तर बायकांना आर्थिक स्वातंत्र्य आल्यावरच भांडवलशाहीचा आणि भरमसाठ उत्पादकतेचा उदय झाला असावा. अर्थव्यवस्थेत तेजी असो वा मंदी, बायकांनीच बाजारात ‘अर्थ’ टिकवून ठेवलाय, अशी आपली माझी सरधोपट अल्पमती!
मानसशास्त्रीय स्त्रीवाद
चोराच्या मनात असतं, तसं फ्रॉईडच्या मनातही चांदणं असावं. म्हणूनच त्याने जाहीर केलं, की बायकांची लैंगिकता अपूर्ण असते आणि म्हणून त्यांना पुरुषांचा हेवा वाटतो. त्यावर स्त्रीवाद्यांनी उलट युक्तिवाद केला, की सार्वत्रिक लैंगिकता अनुभवणार्या स्त्रीला पुरुषांप्रमाणे एकाच अवयवावर अवलंबून राहायची गरज नसते! बायकांना अनेक गोष्टींतून आनंद घेता येतो. उदा. कुणी केसांची बट कुरवाळली किंवा हातात हात घेतला; किंवा सेलमधे पडद्याचं कापड अर्ध्या किमतीला मिळालं; असे विविध आनंदघन आमच्यासाठी सदैव बरसत असतात. हेच मेलं पुरुषांना बघवत नसावं! तीच विचारधारा पुढे सरकवत फ्रेंच स्त्रीवाद्यांनी लेखी आणि बोली भाषेतले लिंगसापेक्ष भेद उकरून काढले. बायकांचं बोलणं अघळपघळ, न संपणारं, नागमोडी वळणं घेणारं, दहा विषय चघळणारं. त्यांच्या कथेची रचना ॲरिस्टॉटलच्या शास्त्रीय पद्धतीने सरळ एकाच नायकावर न बेतलेली; उलट एकच सरळ कथानक न मांडता, दोन-चार उपस्रोतांतून वाहणारी! ह्यातही ‘कमी’वाद कुठे नावाला सापडायचा नाही. जेन ऑस्टेनचंच बघा. एकाच कादंबरीत तीन-चारतरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमकथा समांतर हाताळत शेवटी दोनतरी लग्नं लावूनच सोडेल बया!
मुळात वस्तू-अवलंबित्वाचा ह्या ‘कमी’बुद्धीच्या लोकांनी विपर्यासच केलाय, असं माझं म्हणणं. जमवणे-जोपासणे हा स्त्रियांचा नुसता प्राथमिक हक्कच नाही, तर स्थायिभाव आहे. बरं, असं फक्त मीच नाही, तर ह्या सगळ्या स्त्रीवाद्यांनी दाखवून दिलंय! हां, कधीकधी त्यात अडकायला होतं, नाही असं नाही. पण कशात आणि किती अडकायचं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळवणं हीच माझ्या व्यक्तिगत स्त्रीवादाची व्याख्या आहे.
इतक्या वेगवेगळ्या बाजूंनी लढे देऊनही शेवटी स्वयंपाकघरातून सुटका मिळाली नाहीच. तर मग आम्ही का बरं चार भांडी जमवू नयेत? मजबूरीला मजबूरी म्हणून ‘द्राक्षं आंबट’ करण्यापेक्षा हौशीने जोखडाचं भान विसरलं जात असेल, तर काय वाईट? हा शहाणपणा शिकण्यासाठी बायकांना कोण्या सोसमावशीला गुरू करण्याची गरज नसते. अशा सोईस्कर विचारातूनच बायका ॲन्टीमिनिमॅलिस्ट झाल्या असाव्यात.
कारणं काहीही असोत. नवऱ्याचं एकच पालुपद - जगणं सोपं करायला आधी वस्तू कमी करायला पाहिजेत.
तसे आम्ही दोघं स्वत:ला फारच तत्त्वनिष्ठ समजतो. हा वाद निव्वळ तात्विक आहे, त्यात घरातली चढाओढ उर्फ पॉवर पॉलिटिक्स उर्फ सत्तेचं राजकारण नाहीय, हे तो मला पटवायच्या प्रयत्नात; तर कुठलीही नवीन गोंडस नावं दिली, तरी शेवटी सगळं सत्तेचंच राजकारण असतं, हे मी त्याला पटवायच्या प्रयत्नात.
मग मी माझं ब्रह्मास्त्र (नव्हे, दुर्गास्त्र!) काढलं. पुरुषांच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो हे आदिम सत्य जर कुठल्याही स्त्रीवाद्याने लक्षात घेतलं असतं, तर आजवर पृथ्वीवर नक्कीच सर्वत्र मातृसत्ताक जीवनशैली आली असती, असा निष्कर्ष मी नवऱ्याच्या ‘पोटात’ शिरून काढलेला होताच. म्हणून डाव त्याच्यावरच उलटवायला त्यालाच विचारलं, "तुमच्या मिनिमॅलिझममधे जेवायची काय सोय असते? तीन दिवस वरणभात झाला की चौथ्या दिवशी ‘कंटाळा आला’ म्हणून नूडल्स खाणारे आपण - आपल्याला ह्या बाबतीत ‘कमी’वाद झेपणार आहे का?" (वादाच्या प्रत्येक टप्प्यावर अधिकाधिक आदरार्थी संबोधनं वापरणं जरुरीचं असतं, ह्या अर्थाने ‘आपण’ वापरताना मला छद्मी हसू आलं, वगैरे वगैरे सांगायला नकोच!)
तर कसलं काय! नवऱ्याने मला खरंच वाईट धक्का दिला. म्हणे, "मिनिमॅलिस्ट कुकिंग कर." म्हणजे फिशवर फक्त लिंबू-मीठ-मिरेपूड घालायची, भाताबरोबर वाफवलेल्या भाज्या द्यायच्या, नि प्रोटीन म्हणून ग्रिल्ड चिकन किंवा फिश द्यायचं. एवढंच डब्यात देत जा."
“अरे, तुझं सोड. चार लोक जेवायला आले, तर चार पदार्थ करायला लागतातच ना!”
तर म्हणे, "दोनच पदार्थ कर. पण ते उत्तम."
’घ्या! उत्तम! आता स्वयंपाकावर आपला इतका हात बसला असता, तर आपण हॉटेलच टाकलं असतं की राव!’ इति मी, मनातल्या मनात. उघड - "अरे बाबा, लोकांच्या आवडीनिवडी असतात. एक भाजी नाही आवडली, तर दुसरा पर्याय हवा ना त्यांना? की घरी जेवायला बोलावून उपाशी परत पाठवायचं? मग लोक मला नावं ठेवतील, ही दोन पदार्थांवर कटवते, म्हणून."
म्हणजे असं बघा, समग्र इतिहासात एकच गोष्ट अजूनही बदलेली नाही. घर या संस्थेची नि त्या अनुषंगाने येणाऱ्या बहुतांश बाबींची जबाबदारी तेव्हाही स्त्रियांवरच होती, आजही आहे. घरसजावट, आदरातिथ्य, नाती जपणं, त्यासाठी सासरी-माहेरी फोन करणं, इत्यादी सगळ्या सामाजिक अपेक्षांची ओझी तेव्हाही बायकांच्याच खांद्यावर होती; आजही आहेत.
म्हणून मग मी निकराने सांगितलं, “घरात काय लागतं, ते मी ठरवणार. कारण ‘करायचं’ मला आहे!”
नवर्याचं तत्पर उत्तर, “पण नंतर भांडी मी घासतो!”
तेव्हा कुठे माझी ट्यूब पेटली!
एकविसाव्या शतकातल्या सुशिक्षित, स्त्रीवादी नोकरदार बायकोचा - म्हणजे माझा - एकविसाव्या शतकातला सुशिक्षित, उदारमतवादी नवरा, मनातून कुठेतरी घरकामं ‘करण्याची’ जबाबदारी घ्यायच्या प्रयत्नात तर होता; पण पुरुषी बाण्याला अनुसरून या जबाबदारीला तो थोडासा घाबरलेलाही असणारच! मुळात दिवसभर कंप्यूटरसमोर बसण्याची आवड असणारी ही जमात. पण त्याला हेही कळत असणार - फर्निचर घेतलं, तर टिकवावं लागेल, पुसावं लागेल. व्हॅक्यूमक्लीनर लागेल. कपडे घेतले, तर लॉन्ड्री वाढेल. डाग पडतील, ते आपले आपल्यालाच घासावे लागतील. चारी ठाव स्वयंपाक जरी बायकोने केला, तरी नंतर भांडी घासावी लागतीलच!
एकविसाव्या शतकातल्या ह्या पुरुषाची आई मुलासाठी दाढीचं सामान काढून ठेवणाऱ्यांतली, पण बायको मात्र वीकेंडला लोळत “माझीपण कॉफी करतोस का प्लीज?” असं म्हणणारी. मग बिचारा मिनिमॅलिस्ट होईल नाही तर काय! ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी!
स्त्रीवाद विरुद्ध ‘कमी’वादाचं हे बखेडं हे असं आदिम काळापासूनच सुरू आहे!
निर्मात्या ब्रह्मदेवालाही एक सोडून तीन तोंडं असतात. त्यात कुठे आलाय ‘कमीतकमी’वाद? उलट संहार करणाऱ्या महादेवाचं रूप मात्र वैराग्याचं. म्हणजे हे युद्ध तिथपासूनच सुरू आहे म्हणायचं! गौरी बिचारी सती गेली, पण पार्वती अनुभवाने शहाणी झाली. ‘कमी-कमी’ करत जबाबदारी टाळणाऱ्या पुरुषाला धरून ठेवण्यासाठी सुज्ञ मार्ग काढून तिने मळाचा मुलगा बनवला नि त्यालाच शिवाच्या गळ्यात बांधला.
तेव्हापासून आमच्या शंभोने तिसरा डोळा उघडलेला नाही...
***
अरे बापरे
अरे बापरे :-D
अरे बापरे! अनेक धन्यवाद!
अरे बापरे! अनेक धन्यवाद!
लेख छान झाला आहे
हाहाहा सुरेख!!!
आमच्याकडे दोघही clutter collector आहोत. तो Electronics n Tools अन मी junk jewellery, कपडे.
अन मुलगीही आताशा माझी jewellery, कपडे सगळं ढापू लागली आहे. तेव्हा "women as gatherers" हा रोल मला दुप्पट जोमाने करावा लागत आहे.
________
ज्जे बात!!! कंय लिवलय कंय लिवलय :)
__________
=)) =)) खी: खी: अगदी अगदी!!!
_______
__/\__ खल्लास!!! चरण-कमल कुठे आहेत तुमचे? :)
एक नंबर मज्जा आली. काय काय
एक नंबर मज्जा आली. काय काय आवडलं याची जंत्री काढायची तर अर्धा लेख इथे चिकटवावा लागेल. (माझ्या मते) मी जंक गोळा करत नाही... पण आता सुरू करावं लागेलसं दिसतंय.
आई गं!
काय प्र चं ड मजा आली =)) , लेख म्हणजे अगदी कहर फ्रॉईडीयन अॅनालिसिस आहे!
धन्य आहात! :-)
हे माझं आवडतं वाक्य. खुसखुशीत लेखासाठी धन्यवाद!
काय हे!
सगऴ्या स्त्री-आयडींनी स्तुती केली आहे. पुरुष-आयडींना बहुतेक लेख झोंबला असावा किंवा भांडी घासण्यातून फुरसत मिळाली नसावी :ड
केली ना धुणी धुवायला सुरुवात!
केली ना धुणी धुवायला सुरुवात! :प
टाळ्या
अ-फ-ला-तू-न!!!!, =))
वाचताना खूप मजा ('ज' जहाजातला वाचावा) आला
इतकं चपखलं लिहिले आहे!! तोडनाही हो!!
टाळ्या वाजवणारा स्माईली>
ज्जे बात! दिवाळीची आतषबाजी
ज्जे बात!
दिवाळीची आतषबाजी सुरू! ;)
लेख बेहद्द आवडला! (नी पटलाही ;) :P )
आवडलं
आवडलं ब्वा, पण एवढ्या कमी शब्दात फार वळणं न घेता स्त्री-स्वभावा विषयी एखाद्या स्त्रीनेच बोलावं म्हणजे अपवादाने नियम सिद्ध होतो म्हणतात त्यातली बाब झाली असावी काय?
पण एवढ्या कमी शब्दात फार वळणं
अपवादाने नियम सिद्ध होणे हे स्त्रीस्वभावाबद्दल एखाद्या स्त्रीने बोलण्याविषयी आहे की कमी शब्दांत फार वळणं न घेता बोलण्याविषयी आहे?
फ्रॉइड चं लॉजिक
फ्रॉइड शेवटी पुरूषच असल्यामुळे, त्याची विचारधारा बर्यापैकी सरळसोटच आहे की! त्यावर स्त्रीवाद्यांनी किती अघळपघळ (वेगवेगळे मुद्दे धरून, वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या दिशांनी) टीका आणि टिप्पणी केलिये हा एक वेगळाच विषय आहे. अपवादाने नियम सिद्ध होतो हे खरे, पण मुळात बाकीचा लेखही बराच अघळपघळच आहे ना? ;)
फ्रॉइड शेवटी पुरूषच
हाउ फ्रॉइडियन ;) =))
काहीच्या काही मार्मिक आणि
काहीच्या काही मार्मिक आणि विकेटघेऊ लेख आहे!
पण या निमित्तानं सहज मनाशी चाळा केला, तर असं लक्षात आलं की संग्रहाची तथाकथित 'बायकी' हौस (आणि जाण, रस, धीर, चिकाटी) असलेले बरेच बाप्ये माझ्या दोस्ती खात्यावर जमा आहेत. आता त्यात त्यांचं अपवादपण किती आणि त्यांच्या अर्धांगाची कामगिरी किती, हाही ताळेबंद मांडून पाहिला पाहिजे!
बाकी "कशात आणि किती अडकायचं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळवणं हीच माझ्या व्यक्तिगत स्त्रीवादाची व्याख्या आहे"करता पेश्शल टाळ्या!
पात्रं?
हो खरंय. वस्तूप्रेम स्त्री-पुरूष दोघांतही असतं, फक्त प्रत्येक जोडप्यात एक पसरणारा असेल तर दुसर्याला आवरायलाच लागतं. रोल्स ठरलेले, फक्त पात्रं बदलतात?
धन्यवाद!
ऐसी वर लिहितांना जरा धाकधुक होती. इतकं कौतुक झालं, की बरंच मास चढलंंय. आता कोणत्याही जुन्या ड्रेसमधे मावू शकणार नसल्यामुळे............दिवाळी शॉपिंग जिंदाबाद!!!! :love: :love: :love:
आणि ते जुने कपडे तसेच ठेवून
आणि ते जुने कपडे तसेच ठेवून दे. चुकून बारीक झालीस तर वापरता येतील पुन्हा.
बरोब्बर, तुला कळलंय मला काय म्हणायचंय ते!
=)) =))
लेख
लेख मजेशीर आहे. छोट्या छोट्या संदर्भांनी, कोपरखळ्यांनी अधिक मजा आली.
असेच अधिक वाचायला आवडेल.
खुसखुशीत लेख! वाचताना मज्जा
खुसखुशीत लेख! वाचताना मज्जा आली. :D
मजा आली
लेख आवडला. मिनिमॅलिझमचे आणि आमचे संबंध हे फक्त प्रवासाच्या बांधाबांधीच्या संदर्भात येतात. हे लागंलं तर आणि ते लागलं तर असे म्हणणारी बायको आणि आमचे मिमिंएलिझम हे(ही) एक कुटुंबकलहाचे कारण बनते.
मस्त लेख मिनिमॅलिझम बद्दल
मस्त लेख :)
मिनिमॅलिझम बद्दल काहीच माहिती नव्हती, ह्या लेखाच्या निमित्ताने बरीच माहिती समजली, धन्यवाद त्यासाठी:)
मस्त लेख
लेख मस्त आहे. आवडला. घरीही वाचून दाखवला. 'मिनिमॅलिझम' मला तर पटला! :)
हा हा
स्वानुभव असल्याने गप्पच बसतो.
तरल विनोदाचा उत्कृष्ट
तरल विनोदाचा उत्कृष्ट नमुना.
अहाहा.
मिनिमॅलिझमच्या बाजूने लिहिण्याचा विचार मनात फोफावतो आहे. पण सध्या तरी तत्वाशी एकनिष्ठ राहण्यासाठी त्याचा बोनसाय करून ठेवलेला आहे.