ग्रंथोपजीविये लोकी इये

ग्रंथोपजीविये लोकी इये

लेखक - शशिकांत सावंत

१९९१ पासून भारतात आर्थिक सुधारणा झाली. याचा मोठा परिणाम केवळ आर्थिकच नाही, तर राजकीय व सामाजिक गोष्टींवरही झाला. लोकांचे पगार आणि उत्पन्न वाढले तसे मॉल्स, दोन-आठशे रुपयांचे तिकीट काढून चित्रपट पाहणे, हे आपसूक घडू लागले. आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे बऱ्यापैकी पैसा साठवून लोकांनी पूर्णवेळ लेखनाला वाहून घेतले. पुस्तके विकत घेऊन वाचण्याची सवय वाढली. ब्रिटिश आणि अमेरिकन पुस्तके चटकन आपल्याकडे उपलब्ध होऊ लागली. मागू ते पुस्तक घरपोच हजर करणाऱ्या फ्लिपकार्टसारख्या कंपन्याही इथे आल्या. क्रीडाक्षेत्र, चित्रपट, नाटक, बँकिंग, शिक्षण, जीवनाचे प्रत्येक क्षेत्र गेल्या काही वर्षात आमूलाग्र बदलले आहे. म्हणूनच १९९१-२०१४ या काळातील पुस्तक निर्मिती आणि वाचन याचा थोडासा आढावा घ्यायला हवा.

भविष्य सांगणारा ज्योतिषी भूतकाळात जास्त डोकावतो. तसेच थोडेसे इथेही करायला हवे. विसावे शतक हे खऱ्या अर्थाने वाचन, शिक्षण आणि संस्कृतीप्रसाराचे क्षेत्र होते. याच्या पहिल्या अर्ध्या दशकात ब्रिटिश साम्राज्य अनेक देशात पसरले होते. याचा परिणाम त्या त्या देशात इंग्रजी पोहोचण्यातच नव्हे, तर इंग्रजी भाषा आणि साहित्य पोहोचण्यातही झाला. अमेरिकेची भाषा इंग्रजी असल्याने इंग्रजी भाषा आणि साहित्य हेदेखील जगभर पोहोचले. त्यामागे अमेरिकेने जाणीवपूर्वक केलेले प्रयत्नही होते. शेरलॉक होम्सपासून पी.जी.वुडहाऊसपर्यंत आणि मार्क ट्वेन, हेमिंग्वेपासून जॉन अपडाइक (John Updike), जोसेफ हेलरपर्यंत (Joseph Heller) अनेक लेखक विसाव्या शतकात जगभर पोहोचले. ग्युंटर् ग्राससारखा (Günter Grass) जर्मन लेखक असो, मिलान कून्देरासारखा (Milan Kundera) फ्रेंचमधून लिहिणारा चेक् लेखक असो, गाब्रिएल् गार्सिआ मार्केस् (Gabriel García Márquez) किंवा पाब्लो नेरुदा (Pablo Neruda) असे लॅटिन लेखक असोत. इंग्रजी भाषेतून ते जगभर पोहोचत होते आणि आपल्याकडेही येत होते. भारतीय इंग्रजी लेखन थोडेफार इंग्लंड-अमेरिकेपर्यंत पोचले होते. अरुण कोलटकरसारख्या लेखकाला १९७७ सालीच कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला होता. डॉन मोराइस, आदिल जस्सावाला, ए. के. रामानुजन यांसारखे कवी इंग्रजीत लिहीत होते. तरीही जागतिक साहित्याच्या क्षितिजावर भारतीय इंग्रजी लेखनाचा चंद्र उगवायचा होता. ते काम केले सलमान रश्दी, अरुंधती रॉय, अमिताव घोष इत्यादींनी. रश्दींची ‘मिडनाइट्स् चिल्ड्रन’ ८० सालीच प्रसिद्ध झाली पण त्याच्याकडे जगाचे लक्ष गेले ते ८९ सालच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’मुळे. ९१-९२ च्या काळात विक्रम सेठ यांना कोटीच्या आसपास रक्कम अॅडव्हान्स म्हणून देण्यात आली. हा खरा भारतीय कादंबरीचा लोकप्रिय वर्तुळातला प्रवेश होता. यानंतर मोठ्या प्रमाणावर भारतीय लेखक इंग्रजीत लिहू लागले आणि मोठ्या प्रमाणावर पुस्तकेही प्रसिद्ध होऊ लागली. ९० च्या दशकातील स्थिती ही साधारण अशी सांगता येईल.

९० च्या दशकात अनेक जर्मन, फ्रेंच, युरोपियन व लॅटिन अमेरिकन लेखक कार्यरत होतेव त्यांची पुस्तकेही इंग्रजीत उपलब्ध होती. पण भारतीय वाचकाची पसंती इतर ग्लोबल वाचकाप्रमाणे मोठी नावे किंवा पुरस्कारप्राप्त पुस्तके वा लेखक यांना होती. एखादा लेखक मोठ्या समुदायापर्यंत का पोहोचतो, याची अनेक कारणे आहेत:
१. एखाद्या पुस्तकाबद्दल टाइम्स लिटररी सप्लिमेंट, न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स, लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स , न्यूयॉर्कर, स्पेक्टेटर, पॅरिस, रिव्ह्यू, न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन यांनी चांगले लिहिल्यास किंवा त्याची स्तुती केल्यास त्या पुस्तकाला वाचकाची पसंती मिळते.
२. एखाद्या मोठ्या लेखकाने प्रस्तावना लिहिल्याने किंवा मुलाखतीत किंवा इतर माध्यमातून पुस्तकाचे कौतुक केल्यास ते पुस्तक लोकप्रिय होते. उदाहरणार्थ, मराठीत ‘बलुतं’ या आत्मचरित्राबद्दल पु.लं. नी लिहिले आणि ते पुस्तक गाजले.
३. पुस्तकाबद्दल वादविवाद घडल्यास किंवा आक्षेप घेण्यात आल्यास तेही पुस्तक लोकप्रिय होते. उदाहरणार्थ- ‘मिशेल वेल्बेक्’चे (Michel Houellebecq) ‘प्लॅटफॉर्म’ किंवा सलमान रश्दींचे ‘सॅटनिक व्हर्सेस’ याची उदाहरणे सांगता येतील.
४. एखादे पुस्तक अनपेक्षितपणे वाचकांना आवडते आणि ते खपतच राहते. उदाहरणार्थ ‘ट्च्यूजडेज् विथ मॉरी’ किंवा ‘श्युअरली यू आर जोकिंग मिस्टर फाइनमन’ किंवा अगदी अलीकडचे ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’, ‘फाईव्ह पॉइंट समवन’ ही याचीच उदाहरणे.
५. काही पुस्तकांचे विषयच खपावू असतात. उदाहरणार्थ डाएटवरची पुस्तके, सेल्फ-हेल्प, गर्भारपण, बाल संगोपन, व्यक्तिमत्व विकास, व्यवस्थापन यांवरची पुस्तके. उदाहरणार्थ, ‘स्टीव्हन कव्ही’ने (stephen covey) प्रकाशित केलेल्या कादंबऱ्या या यामध्ये मोडतात.
७. मार्केटिंग करून खपवलेली पुस्तके – चाइल्ड क्राफ्ट किंवा डीके प्रकाशनाची पुस्तके सेल्समन्स् किंवा सेल्सगर्ल्स् ठेवून विकली जातात. अलीकडे आपल्याकडेही डीकेची व्हिज्युअल डिक्शनरी घेऊन विकणारी मुले दिसतात. मार्केटिंगचा हा एक प्रकार झाला तर दुसरा प्रकार म्हणजे एखाद्या पुस्तकाकडे प्रकाशकाने लक्ष देऊन ते खपवणे. पूर्वी अमेरिकेत लेखकांचे दौरे, मुलाखती या माध्यमातून पुस्तके संपवायचा प्रयत्न होई. आता सर्वत्रच हा प्रयत्न दिसतो. त्याच बरोबर एखादे प्रकाशन महत्त्वाकांक्षी पुस्तक हाती घेते आणि त्याचे पद्धतशीर मार्केटिंग करण्यात येते. स्टीव्हन हॉकिंगचे ‘ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’सारखे पुस्तक बॅन्टम प्रकाशनाने पद्धतशीर प्रयत्न केले नसते, तर लाखोंच्या संख्येत खपले नसते. विश्वरचना आणि विश्वभौतिकीसारख्या जड विषयावरचे हे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर यादीत तीन-चार वर्ष होते.


छायाचित्रः योहानस यान्सोन (johannes jansson) - नामनिर्देशानंतर प्रताधिकारमुक्त छायाचित्र

एकूणच पुस्तकवाचन हा, विरंगुळा आणि भरीव मार्गांनी वेळ घालवणे, या दोन्ही मार्गांच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम आहे. चित्रपट, नाटकाइतके पॅसिव्ह मनोरंजन पुस्तकाने होत नाही. पुस्तक कष्टाने वाचावे लागते. प्रसंगी इंग्रजी पुस्तकांचे अर्थ शब्दकोशात पाहावे लागतात. काही वेळा एक पुस्तक वाचून चालत नाही. टी. एस्. इलियटच्या (T. S. Eliot) कविता वाचायच्या असतील तर जाडजूड डिक्शनरी सोबत हवी. शिवाय ‘गोल्डन बो’ (Golden Bough) सारखे फ्रेजरचे (J. G. Frazer) पुस्तक, मिथ्यकथांचा संग्रह, शब्दांचा उगम दाखवणारी एटिमोलॉजिकल डिक्शनरी, त्याचे चरित्र किंवा पत्रांच्या संग्रहाची पुस्तकं आणि निबंध हे सारे तुमच्याकडे असेल तरच इलियट नीट समजावून घेता येतो. एकावेळी एक पुस्तक लक्ष केंद्रित करून वाचणे ही आदर्श स्थिती असली तरी ‘सोफिज वर्ल्ड’सारखी कादंबरी वाचताना किंवा ‘इंडियन क्लार्क’सारखी गणिती - रामानुजनच्या जीवनावरची कादंबरी वाचताना इतर चरित्रात्मक पुस्तके पाहावीच लागतात. ‘सोफिज वर्ल्ड’ ही नॉर्वेजियन कादंबरी आहे. सोफी या मुलीला वेगवेगळी पत्रे येतात. घोडा आणि बिस्किटे यात फरक काय? चांगुलपणा म्हणजे काय? सत्य-असत्य याची चर्चा कशी करावी? नीतिमत्ताविषयक प्रश्न कसे विचारावे? अशा प्रश्नांची चर्चा यात फिक्शन रूपाने येते. प्रत्यक्षात तत्त्वज्ञानाचा इतिहास थोडक्यात मांडणारी ही कादंबरी आहे. साहजिकच सॉक्रेटीस (Sócrates), अॅरिस्टॉटल (Aristotle), डेकार्त (Descartes) यांच्याविषयीचा तपशील गोळा करतच ही कादंबरी वाचावी लागते. किंवा ‘अ‍ॅसेन्ट ऑफ मनी’सारखे २००८ साली प्रसिद्ध झालेले पुस्तक घ्या. हे पुस्तक बाराव्या शतकापासून सुरू होणारा बँकिंगचा इतिहास किंवा त्यापलीकडे जाऊन इन्का(Inca) संस्कृतीपासून आजपर्यंत घडलेला पैशाचा इतिहास सांगते. बाँडमार्केट म्हणजे काय? केन्सचा अर्थशास्त्रीय विचार कोणता? ‘एन्रॉन’ का कोसळले, अशा विषयांना लेखक हात घालतो पण याविषयीची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला इतर पुस्तकांची मदत घेणे भाग पडते. थोडक्यात, चांगली पुस्तके तुम्हाला इतर अनेक पुस्तकांकडे वळवतात.

इंग्रजी भाषेतील प्रकाशन परंपरेचे वैशिष्ट्य हे, की ते एकच पुस्तक तुम्हाला सचित्र कॉमिक्ससारख्या पुस्तकापासून त्याच विषयावरील ग्रंथमालेपर्यंत विविध स्वरूपात माहिती देते. वाचकाच्या आवाक्यानुसार तो विषय समजून घेऊ शकतो. ‘मार्क्स’वर असे सचित्र कॉमिक आहे, निवडक लेखांचा ‘पोर्टेबल मार्क्स’सारखा संग्रह आहे किंवा त्याचेच त्रिखंडीय ‘दास कापिताल’ आहे आणि इतर अक्षरशः हजारो ग्रंथ आहेत. उत्क्रांती, बुद्धीज़म्, रसेलचे तत्त्वज्ञान, इन्फीनिटी अशा अनेक विषयावर - अॅन इंट्रोडक्शन टू : पोस्ट्मॉडर्निज़म्, स्ट्रक्चरलीजम्, इ. अनेक विषयावरचे ग्रंथ ग्राफिक स्वरूपात ९० नंतर प्रसिद्ध होऊ लागले. कारण मीडियाचा प्रभाव जगभर वाढत होता. सीएन्एनसारखी बातम्या दाखवणारी चॅनेल प्रथम अमेरिकेत आणि मग जगभर वाढू लागली. आपल्याकडेही चॅनेल्सची संख्या बऱ्यापैकी वाढली. परिणामी वाचनाचा अवकाश कमी होत गेला.

यानंतर आले इंटरनेट. आधी फक्त ईमेल्स, चॅटिंग यात वेळ जायचा. नंतर ऑर्कुटसारख्या ‘सोशल मिडिया कम्युनिटीज्’ सुरू झाल्या. त्यात अधिक वेळ जाऊ लागला. फेसबुक अजून दूर होते. इंटरनेटमुळे कुठलेही पुस्तक जगभरात उपलब्ध करून द्यायची सोय झाली. कधी मोफत तर कधी पैसे देऊन. २००० मध्ये ‘स्टीफन किंग’ याने आपली ‘रायडींग द बुलेट’ ही कथा इंटरनेटवर विकली. लाखोंनी ती डाऊनलोड केली. किंगला त्यामुळे पैसा, प्रसिद्धी मिळाली. पण तो म्हणतो, “कथा कशी आहे, याबद्दल कोणीच बोलत नव्हते. मीही, ती किती जणांनी वाचली, हे विचारले नाही. कारण माझी निराशाच होईल याची खात्री होती.”

पण तरीही, गुट्येनबर्गमध्ये छपाईयंत्राचा शोध लागल्यानंतरचा हा महत्त्वाचा शोध होता. अर्थातच याने मोठा बदल घडवून आणला. पुस्तके क्षणभरात सर्वत्र उपलब्ध होऊ लागली. अभ्यासकांची यामुळे मोठी सोय झाली पण जुन्या पिढीला अजूनही कागदावरची छपाई आणि पुठ्ठाबांधणी याचेच आकर्षण होते आणि आहे. एखादे पुस्तक, उदाहरणार्थ जॉन अपडाइकचे ‘ड्यू कन्सीडरेशन’ घ्या. पांढऱ्याशुभ्र मऊ कागदावर ‘जॉन्सन्’ या टाईपमध्ये छापलेले, उत्तम मुखपृष्ठ असलेले आणि हॅन्डकट (पुस्तकाची दोन तीन पाने एकाचवेळी हातात येऊ नये म्हणून यंत्राचा वापर न करता त्याची पान उलटायची बाजू, एकेक फॉर्मच्या रूपात हाताने कापली जाते.) असे पुस्तक वाचणे आणि तेच स्वस्त कागदावर पॉकेटबुक स्वरूपात बारीक टाईपमध्ये वाचणे यातील फरक पुस्तकप्रेमीच सांगू शकतील. काही असले तरी आज पंधरा वर्षांनी आज पुस्तकाचा खप काही कमी झालेला नाही. किंवा प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांची संख्या कमी झालेली नाही; ती वाढतेच आहे. प्रसिद्ध इटालियन लेखक, विचारवंत उम्बेर्तो एको (Umberto Eco) आणि फ्रेंच लेखक/पटकथाकार ज्याँ-क्लॉद चारिएख़ (Jean-Claude Carrière) यांनी वाचनसंस्कृतीवर केलेल्या गप्पांचे पुस्तक गतवर्षी प्रसिद्ध झाले. हे दोघे एकमेकांना प्रश्न विचारताना काही मुद्दे तपशिलाने मांडतात. पहिल्याच प्रश्नात चारिएख़ म्हणतात, “२००८ मध्ये दावोसमध्ये एका भविष्यवेत्त्याने म्हटले, की पुढील ५० वर्षांत चार गोष्टींनी मानवतेवर मोठा परिणाम होईल - १. पेट्रोलचा भाव ५०० डॉलर प्रति बॅरल होईल. २. पाणी हे तेलाप्रमाणेच व्यावसायिक उत्पादन बनेल. ३. आफ्रिका आर्थिक सत्ता बनेल आणि 4. पुस्तके नष्ट होतील! पुस्तके नष्ट झाल्याने इतर तीन गोष्टींसारखाच मानवतेवर परिणाम होईल का?”. त्यावर एको सांगतात, ''मला अनेकदा हा प्रश्न विचारला जातो, 'इंटरनेटच्या परिणामामुळे पुस्तके नष्ट होतील काय?’. लोकांना, विशेषत: पत्रकारांना, पुस्तके नाहीशी होतील या कल्पनेने घेरलेले असते. म्हणून ते हा प्रश्न विचारतात. इंटरनेटने आपल्याला बाराखडीपर्यंत नेलेले आहे. आपली संस्कृती जर दृश्यात्मक मानली तर प्रत्येकाला वाचावेच लागेल आणि त्यासाठी माध्यमाची गरज आहे. हे माध्यम केवळ संगणकाचा पडदा असू शकत नाही. दोन तास कादंबरी संगणकावर वाचा. डोळ्यांचा टेनिस बॉल होतो.'' पुढे ते सांगतात, ''दोहोंतली एक गोष्ट होईल. एक म्हणजे पुस्तके वाचनाचे माध्यम राहील किंवा त्याचे स्वरूप बदलेल. छपाईचा शोध लागण्यापूर्वी त्याला जसे स्वरूप होते तसे स्वरूप त्याला येईल. गेल्या ५०० वर्षांत पुस्तकासारख्या वस्तू रूपांतरित झाल्याने त्याचे कार्य किंवा व्याकरण बदलले नाही. पुस्तक हे चमचा, कात्री, हातोडी किंवा चाक यांच्यासारखेच आहे. अशा गोष्टींचा शोध लागल्यावर त्यात फार बदल करता येत नाही. तुम्ही चमच्यात बदल करून अधिक चांगला चमचा बनवू शकत नाही.'' यानंतर चर्चा ई-बुकपर्यंत येते आणि एको म्हणतात, “एक वकील २५००० कागदपत्रे ई-बुकवर साठवून सहज घरी नेऊ शकतो, पण खरंच 'वॉर अँड पीस' ई-बुकवर वाचता येईल का याबाबत मला शंका आहे.”

हजारो पुस्तके आजही प्रकाशित होत आहेत. चरित्रे, आत्मचरित्रांचा किंवा पल्प-फिक्शनचा खप वाढतो आहे. नवनवे लेखक येत आहेत. हे दशक संपताना ‘गर्ल विथ ड्रॅगन टॅटू’ कादंबरी गाजते आहे. स्टीग लार्शन (Stieg Larsson) या स्वीडिश पत्रकारानेही तीन पुस्तकांची रहस्यमालिका लिहून ठेवली. केवळ वेळ घालविण्यासाठी तो ती लिहीत होता. वयाच्या ५०व्या वर्षी तो मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर ही पुस्तके प्रसिद्ध झाली. आता ती सर्वोच्च खपाच्या यादीत अग्रक्रमी आहेत. वाचनाची आवड कमी होतेय म्हणता म्हणता, हॅरी पॉटर मालिका, ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स्’ ही महाकाव्यात्मक कादंबरी सध्या विक्रीच्या बाबतीत अग्रक्रमी आहे. ही कादंबरी कॉलेज तरुणांच्या हातात कधी दिसेल असे वाटले नव्हते. काही वर्षांपूर्वी ‘अक्षर’ दिवाळी अंकात रमेश सरकार यांनी तिचे वाङ्मयीन महत्त्व सांगणारा लेख लिहिला होता.

वाचन हा ज्यांचा कच्चा माल आहे, असाही एक मोठा वर्ग आहे. त्याला आपल्या कामासाठी वाचावेच लागते. उदाहरणार्थ, पत्रकार, प्राध्यापक, लेखक, चित्रपटाची पटकथा लिहिणारे, बुद्धिबळपटू, डॉक्टर्स अशी मोठी यादी सांगता येईल. ज्याला चित्रपट लिहायचा आहे किंवा समजून घ्यायचा आहे त्याने ‘स्टोरी’ हे रॉबर्ट मक्-कीचे (Robert McKee) पुस्तक वाचणे आवश्यक आहे. तसेच सिद् फील्डची (Syd Field) पुस्तकेही किंवा झालंच तर ‘अॅडव्हेन्चर इन सिनेट्रेनिंग’सारखे पटकथा लेखक विल्यम गोल्डमनचे (William Goldman) पुस्तक.

सिनेमा ग्रेट कशामुळे बनतो? याबद्दल गोल्डमन सांगतो, की वेगवेगळ्या उत्तम आणि हेलावणार्‍या क्षणांमुळे सिनेमा ग्रेट बनतो. जसं दिग्दर्शकाला स्टारची मर्जी सांभाळावी लागते, तशी लेखकालाही. आपल्याला उत्कृष्ट संवाद यावेत, असं प्रत्येक स्टारला वाटत असतं. गोल्डमन केवळ स्वत:ला आलेलेच अनुभव सांगत नाही, तर सिनेक्षेत्रात घडलेल्या इतर चित्रपटांच्या कथा, घटना, आख्यायिकाही सांगतो. त्याने लिहिलेल्या ‘ऑल द प्रेसिडेन्ट्स् मेन’सारख्या चित्रपटाला समीक्षकांनी गौरवलं. पण स्पर्धेत असलेल्या ‘रॉकी’सारख्या गल्लाभरू चित्रपटाने ‘ऑस्कर’ पटकावलं. याचं कारण सांगताना तो म्हणतो, की ‘रॉकी’ हॉलिवूडचं एक स्वप्न साकार करतो. हे पुस्तक तुम्हाला चित्रपटाविषयी नेहमी पाहता आणि अनुभवातनं येणारे, असे काहीतरी सांगते आणि तुमची जाणीव समृद्ध करते.

हेच रिचर्ड फाइनमनच्या ‘श्युअरली यू आर जोकिंग मिस्टर फाइनमन’सारख्या पुस्तकाबद्दल म्हणता येईल. ज्याला कुणाला संशोधन करायचे आहे, त्याने ते वाचायलाच हवे. रिचर्ड फाइनमन हा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ. लहानपणापासून त्याला विज्ञानात रस. सतत भोवतालच्या गोष्टींमधलं गूढ उकलायची सवय. ज्या काळात रेडिओ आला, त्या काळात त्याने रेडिओचं ज्ञान अगदी लहान वयातच मिळवलं. अनेकदा शेजारपाजारची मंडळी त्याला रेडिओ दुरूस्त करायला बोलवत. तो रेडिओ उघडून येरझाऱ्या घालत बसे. मग ज्याने बोलावलंय, तो म्हणे, “रेडिओ दुरूस्त कर, फेऱ्या कसल्या मारतोस”. रिचर्ड म्हणे, “मी विचार करतोय.” त्यामुळे लहान वयातच त्याची कीर्ती ‘केवळ विचाराने रेडिओ दुरुस्ती करणारा’, अशी झाली. पुढे तो मोठा होत गेला, तसे त्याला अनेक प्रश्न पडू लागले. उदाहरणार्थ, आपल्याला झोप येते, म्हणजे काय होतं? मग त्याचे स्वत:वर प्रयोग सुरू झाले. पडदे वगैरे लावून, झोप येण्याच्या क्षणाचं निरीक्षण करायचं. किंवा प्राण्यांप्रमाणेच माणसाला माग काढता येतो का? मग त्याने माणसांचा वास घेऊन ओळखण्याचे प्रयोग केले. कोडवर्ड असलेली कुलुपं कशी उघडायची? माणसं पासवर्ड कसा निवडतात, याचा विचार करत त्याने कुलुपं उघडायला सुरुवात केली. पुढे त्याने ‘लॉस अ‍ॅलमॉस’ प्रयोगशाळेत काम केलं. त्याआगोदर विविध रासायनिक प्रयोग केले. त्यांचा वापर करून तो मित्रमंडळींचं मनोरंजन करत असे. उदा. हातावर स्पिरिट टाकून हात पेटवणं, लॉस अ‍ॅलमॉस इथे अणुबॉम्बवर संशोधन सुरू होतं. अमेरिकेतले महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ तिथे होते. त्यांच्यात राहून फाइनमनने काम केलं. एक दिवस तिथे संशोधनाची गुप्त कागदपत्रं ठेवलेली तिजोरी त्याने किल्लीशिवाय उघडली आणि आतमध्ये कागद टाकला, “गेस हू ?” (ओळखा पाहू कोण?)

पण अशा गमतीजमती त्याला आवडत असल्या, तरी तो एक गंभीर प्रवृत्तीचा शास्त्रज्ञ होता. मुलांना त्यांचं शिकवणं आवडे. एक दिवस तो व्याख्यान देत असताना त्याने समोर पाहिलं, तर खुद्द आईन्स्टाईन समोर बसला होता. त्याने लिहिलं आहे, ‘क्षणभर मी बावरलो, पण मग मी विचार केला, भौतिकशास्त्र हा माझा विषय आहे आणि त्यावरच मला बोलायचंय; मग समोर कुणीही असो.’

पुस्तकाच्या शेवटी त्याने विज्ञान म्हणजे काय, एखादा प्रयोग यशस्वी होतो म्हणजे काय, तो किती प्रकारे असू शकतो, याबद्दल लिहिलं आहे. ‘कार्गो कल्ट सायन्स’ नावाचं हे प्रकरण प्रत्येक विज्ञानाच्या विद्यार्थ्याने वाचायलाच हवं. कुठलंही प्रकरण कधीही काढून वाचावं, असं हे पुस्तक असल्याने ते खूप लोकप्रिय झालं. ‘प्रिन्स्टन’सारख्या विख्यात संस्थेपासून ते कॉर्नेल विद्यापीठात शिकवण्यापर्यंतच्या खुसखुशीत अनुभवांचं दर्शन यात येतं. म्हणूनच गेली २५ वर्षे हे पुस्तक लोकप्रिय आहे आणि त्याला ‘कल्ट बुक’चा दर्जा प्राप्त होतो आहे. कल्ट बुक म्हणजे ज्यांनी तीन चार दशके किंवा त्याहूनही अधिक काळ वाचकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. असे पुस्तक वाचकांच्या दोन-तीन पिढ्या वाचत राहते. माझ्या आधीच्या पिढीचे पुस्तक होते ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ हे रिचर्ड बाखचे (Richard Bach) पुस्तक आणि ‘झेन अँड द आर्ट ऑफ मोटारसायकल मेंटेनन्स’ हे रॉबर्ट पर्सिगचे (Robert Pirsig) पुस्तक. ‘कॅचर इन द राय’ हे जे. डी. सॅलिन्जरचे पुस्तक हे तीन पिढ्यांचे आवडते पुस्तक आहे आणि त्याचा खप अडीच कोटींच्या वर झाला आहे. सॅलिन्जरच्या या पुस्तकाची तुलना भालचंद्र नेमाडेंच्या कोसलाशी करण्यात येते. ‘कॅचर इन द राय’ ही पौगंडावस्थेच्या सीमेवर असणाऱ्या तरुणाची कथा. शाळा, कॉलेज, पालक, सरकार, ज्येष्ठ कुटुंबीय या साऱ्यांच्या सततच्या दादागिरीने या वयात मन बंड करून उठतेच, पण या बंडाला मिळालेले निखळ आणि नितळ शल्यरूप म्हणजे ‘कॅचर इन द राय’ - खप दरवर्षी अडीच लाख. म्हणजे एकूण साडेसहा कोटी रुपये!

या कादंबरीची सुरुवात अशी आहे - ‘तुम्हाला सारे ऐकायचेच असेल तर सुरुवातीला तुम्हाला मी कुठे जन्मलो आणि माझं भिक्कार बालपण कसं गेलं आणि मला जन्म द्यायच्या आधी माझे आई-वडील काय करीत, असलं ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ टाइप कादंबऱ्यांत असतं, तसं दळिद्री वर्णन तुम्हाला ऐकायचं असणार. पण मला असल्या गोष्टींनी बोअर होतं. शिवाय दुसरं म्हणजे जर मी माझ्या आई-वडिलांविषयी काही खरंखुरं सांगितलंच तर त्यांना मेंदूचा दोनदा रक्तस्राव होईल, वगैरे..’. नायक होल्डन कॉलिफिल्ड हा ‘पेन्सिल्वेनिया’मधील ‘पेन्सी प्रेप’ या शाळेत आहे. तो ख्रिसमसपूर्वी शाळा सोडतो आणि न्यूयॉर्कमध्ये राहायला जातो. त्या अगोदर तो आपल्या शिक्षकांना भेटतो.. आणि थेट त्याच्या आपल्याशी गप्पा सुरू होतात.

त्याच्या बोलण्यात सातत्याने येणारी गोष्ट म्हणजे प्रौढांचा ढोंगीपणा, खोटेपणा. उदा. तो म्हणतो, ‘आमच्या शाळेची जाहिरात तुम्ही पाहिली असेल. घोड्यावर बसलेला कुंपणावरून उडी घेणारा एक तरुण त्यात दाखवलाय आणि दावा केलाय, की आम्ही इथे १८८८ पासून सर्वांना असे तयार करतो, त्यांचं रूपांतर सुंदर, स्पष्ट विचार करू शकणाऱ्या तरुणात करायला मदत करतो.’ हे सांगून कॉलिफिल्ड म्हणतो, मी कधी शाळेच्या जवळपासही घोडा पाहिलेला नाही. हा नायक अर्थात अभ्यास, खेळ, काहीच गांभीर्यानं घेत नाही. वर्ग बुडवितो, सहज खोटं बोलतो, अगदी साधा रस्ता विचारणाऱ्या माणसालाही तो खोटं सांगून भलत्याच रस्त्याला लावतो. (या बाबतीत त्याचं ‘टॉम सॉयर’ आणि ‘हकलबरी फिन’ या पूर्वसुरींशी साम्य आहे. मार्क ट्वेनच्या या नायकांना गांभीर्य सहन होत नाही. प्रार्थनेला दोन मिनिटं उभ राहतानाही हकलबरी फिनच्या पायाला खाज येते.) तरीही आपण हे पुस्तक वाचत राहतो, कारण अनेक गोष्टीतला नायकाचा तिरकस दृष्टिकोन हा विचार करायला लावणारा असतो आणि ‘कोसला’ आणि ‘कॅचर’मध्ये हेच तर साम्य आहे.

एके काळी समुद्ध अशा नियतकालिकांची परंपरा होती, जिच्यामुळे नवे लेखक निर्माण होत असत. लघुकथा छापणारी अनेक नियतकालिकं होती. अगदी विज्ञानकथांसाठी वाहिलेले कॅम्पबेलचे (John Campbell) ‘अ‍ॅस्टाउन्डिन्ग् सायन्स फिक्शन’सारखे मासिक होते. ७०-८० च्या दशकापर्यंत यातून मोठ्या प्रमाणावर नवे लेखक प्रकाशात येत असत. ‘आयझॅक असिमोव्ह’सारखा (Isaac Asimov) लेखक कॅम्पबेल यांनी संपादित केलेल्या विज्ञानकथांच्या मासिकांचा आपल्याला फायदा झाला, हे अनेकदा सांगतात. अगदी अलीकडचे उदाहरण झुंपा लाहिरीचे. द न्यू यॉर्कर साप्ताहिकात त्यांच्या तीन कथा गेल्या एका वर्षात प्रसिद्ध झाल्या. त्यातल्या ‘सेक्सी’ या कथेकडे जाणकारांचे लक्ष गेले. हळूहळू कथालेखिका म्हणून तिला नांव मिळाले. ‘इंटरप्रिटर ऑफ मेलडी़ज़’ या तिच्या पहिल्या कथासंग्रहाला प्रतिष्ठेचे पुलित्झर पारितोषिक मिळाले. त्यानंतर आलेल्या तिच्या ‘नेमसेक’ या कादंबरीला वाचकाची पसंती लाभली. त्यावर चित्रपटही बनला. यथावकाश ती लेखिका म्हणून स्थिरावली. अलीकडेच तिची प्रसिद्ध झालेली ‘लोलँड’ ही कादंबरी विशेष लक्षणीय आहे. या कादंबरीत तिने काळाचा मोठा पट स्वीकारला आहे. ‘अर्नेस्ट हेमिंग्वे’सारखे जुने लेखक किंवा झुंपा लाहिरी, हिकारू मुराकामीसारखे (Hikaru Murakami) आताचे लेखक यांत मोठा फरक आहे, तो अनुभवाचा. अमिताव घोष, झुंपा, मुराकामी यांसारखे लेखक अनुभवाइतकेच संशोधनालाही प्राधान्य देतात. झुंपा अगदी ३ वर्षाची असताना अमेरिकेला गेली. त्यामुळे भारतामध्ये तिचा संबंध कधीतरी येण्याजाण्यापुरता होता. परंतु ‘लोलँड’ या कादंबरीमध्ये ६० च्या दशकातील नक्षलवादाच्या उदयापासून ते आताच्या भारतापर्यंत ४०-५० वर्षांचे भारताचे चित्रण केले आहे. आणि हे करताना तिने वर्तमानपत्र, पुस्तकं तसेच अनेकांना प्रत्यक्ष भेटून माहिती मिळवली आहे. अमिताव घोष यांनी ‘सी ऑफ पॉपीज़’सारखी कादंबरी लिहिताना १९ व्या शतकातील चीन आणि तिथे होणारी अफूची निर्यात यांची माहिती प्रचंड कष्टाने मिळवली आहे.

विक्रम सेठ यांच्याबद्दलही सांगता येईल. कवी असलेल्या विक्रम सेठ यांना ‘अ सूटेबल बॉय’सारखी कादंबरी लिहिताना भारतातील विविध प्रदेश, माणसं, चालीरीती याबद्दल बराच अभ्यास करावा लागलेला आहे. गंगोपाध्याय यांची ‘फर्स्ट लाइट’सारखी कादंबरी मुळात बंगाली असूनही तिचे इंग्रजीत चांगले स्वागत झाले. याचे कारण १७८० ते १९१० या ३० वर्षाच्या काळातील बंगालमधील प्रबोधनपर्वाचे ती चित्रण करते. आजचा बंगाल घडायला कारणीभूत ठरलेले रवींद्रनाथ टागोर, रामकृष्ण, विवेकानंद, जगदीशचंद्र बोस यांसारखी कितीतरी व्यक्तिमत्वं या पुस्तकात पूर्ण तपशिलानिशी दर्शवली आहेत. जवळजवळ १७५० पानांची ही कादंबरी आहे. मराठीतील तिचा अनुवाद ‘पहिली जाग’ असा झाला आहे आणि मराठीतही तिची पहिली आवृत्ती संपली आहे. देशी कादंबरीच्या इंग्रजी आवृत्तीचे स्वागत असे क्वचितच होते. मराठीत किरण नगरकरांना हा मान लाभला आहे. अर्थात, विलास सारंग यांच्यासारखा लेखक समीक्षकांनी गौरवलेला आहे. पण ज्या काळात सारंग लिहीत होते त्या भारतीय इंग्रजी साहित्याला तसा उठाव नव्हता.

इंग्रजी पुस्तक खपायला आणि त्याला वाचकमान्यता मिळायला अनेक घटक कारणीभूत ठरतात. यात अर्थातच, चांगल्या प्रकाशनाकडे तुमचे पुस्तक प्रकाशित व्हायला हवे. त्याबाबतीत ‘पेंग्विन’ प्रकाशन नेहमीच आघाडीवर राहिले आहे. नियतकालकं बंद पडल्यावर ‘पेंग्विन’सारख्या प्रकाशनाचे संपादक कायम नव्या लेखकांच्या शोधात राहिले. यातूनच भारतीय लेखकांची एक नवी पिढी जगासमोर आली. या लेखकांनी दोन संस्कृतींचा अनुभव घेतलेला आहे. त्यांच्या लेखनात एक सुप्त सांस्कृतिक संघर्ष आढळतो. असे लेखन अधिक वाचनीय बनते. मुराकामी, ओरहान् पमुक् (Orhan Pamuk) यांच्यासारखे लेखक यामुळे यशस्वी ठरले. या लेखकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरिद्री, कलंदर, कंगाल अशा लेखकांच्या प्रतिमेला ते पूर्ण छेद देतात. त्यांचे लेखन सुस्थितीतल्या लेखकांचे लेखन आहे.

एकेकाळी मध्यमवर्गीय असणं आणि सुस्थितीत असणं हे लेखनाला बाधकच मानले जाई. सीरिल कॉनली (Cyril Connolly) या लेखक समीक्षकाने ‘एनिमीज़ ऑफ प्रॉमिस’ आणि ‘कल्चर ऑफ कम्प्लेंट’ असे ग्रंथ लिहिले आहेत. ‘होरायझन’ या मासिकाचा तो संपादक होता. त्याने म्हटले आहे की, सर्वसाधारण ब्रिटिश लेखातला माणूस मध्यमवर्गात जगतो. याचा नायक सकाळीच ऑफिसात जातो, संध्याकाळी घरी येतो नंतर क्लबात जातो, रात्री घरी येऊन झोपतो. त्याच्या आयुष्यात वैशिष्ट्यपूर्ण काहीच घडत नाही. या वर्गाला त्याने ‘मँड्रीयन क्लास’ म्हटले होते. त्यामुळे अशा वर्गाचे जगणे नेहमीच मिळमिळीत असते. आपल्याकडेही ‘सदाशिव पेठी साहित्य’ असा शब्दप्रयोग प्रचलित होताच. पण मुराकामी, झुंपा यांसारखे लेखक याच वर्गातून आले असले, तरी त्यांचे लेखन संपादकांच्या संस्कारातून घडले आहे. संपादकांची अशी मोठी परंपरा इंग्रजीत आणि अनेक भाषांमध्ये आहे. मॅक्सवेल पर्किन्ससारख्या (Maxwell Perkins) लेखकांनी फिट्झगेराल्ड (F. Scott Fitzgerald), अर्नेस्ट हेमिंग्वे (Ernest Hemingway) यांसारखे लेखक घडवले. विल्यम मॅक्सवेलसारख्या (William Maxwell) संपादकाने जे. डी. सॅलिंजर, जॉन अपडाइकसारख्या (John Updike), डोना टार्ट्सारख्या (Donna Tartt) लेखकांची एक पिढीच घडवली. ‘कथेमध्ये काहीतरी अशा अनुभवाचे वर्णन हवे, ज्या अनुभवानंतर तो घेणारी व्यक्ती पूर्वीसारखी राहत नाही. ती बदलून जाते’,’ असे कथालेखनाच्या प्रवृत्तीचे वर्णन विल्यम मॅक्सवेल यांच्याबद्दलच्या पुस्तकात येते.

रॉजर एंजेलसारख्या संपादकाने मुराकामी आणि झुंपा लहीरी यांच्यातल्या कथालेखकाला वेळेत मार्गदर्शन केले. या संपादकांचे काम केवळ मजकूर दुरुस्त करणे एवढेच नसते, तर पात्रनिर्मिती अचूक कशी होईल, कुठले प्रसंग वाढवता किंवा कमी करता येतील, दोन प्रसंगातला अवकाश कसा नीट करता येईल, पात्रांच्या चित्रणातील किंवा कथा-कादंबरीच्या ओघातील प्रवाहीपणात सातत्य आहे की नाही, कुठे त्रोटकपणा जाणवतो आहे, भाषा अधिक प्रभावी कशी करता येईल, अशा विविध गोष्टींबाबत संपादकांचे मार्गदर्शन होते. असा संपादक अनेकदा सर्जनशील लेखकच असतो. उदा. विल्यम मॅक्सवेल उत्तम कादंबरीकार आणि कथालेखक होता, तर रॉजर कथालेखक आहे. सर्व भाषांमध्ये ते संपादक असतात. लॅटिन अमेरिकन साहित्य आपल्यासमोर येण्यात ग्रॉसमन (Edith Grossman) सारखी अनुवादक कारणीभूत आहे.

रंजन करणारे, विरंगुळा करणारे साहित्य सर्वच काळात लोकप्रिय ठरते. गेल्या २०-२५ वर्षात आयुष्य जसे संघर्षशील होत गेले, हाती वेळ जसा कमी येऊ लागला, तसे पलायनवादी साहित्य अधिक लोकप्रिय होऊ लागले. गेल्या काही वर्षात सर्वच प्रकारचे फॅन्टसी असलेले लेखन, मग त्यात ‘हॅरी पॉटर’, ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स्’सारखी चमत्कृती असो किंवा ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’सारखी सेक्शुअल फॅन्टसी असो, अशा फॅन्टसीज् नेहमीच लोकप्रिय होत आलेल्या आहेत. ‘फिफ्टी शेडस..’ आधी इंटरनेटवरून प्रसिद्ध झाले आणि मग लोकप्रिय झाल्यावर तीन भागांमध्ये ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. इंटरनेटची पुस्तकांना असलेली स्पर्धा फिजूल असलेले लक्षात येईल. उलट, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर आणि अर्थातच चित्रपट या माध्यमांतून पुस्तकांच्या खपाला नेहमीच उठाव मिळत आलेला आहे. अनेकदा कितीतरी उत्तम लेख फेसबुकमुळे आणि ट्विटरमुळे लोकांपर्यंत पोहचतात; तर अनेक पुस्तके चित्रपटामुळे जगभर जातात.

‘गॉन विथ द विंड’, ‘डॉ. झिवागो’पासून ते पॅट्रीक स्यूस्किन्ड्च्या (Patrick Süskind) ‘पर्फ्यूम’ पर्यंत अनेक पुस्तकांवर चित्रपट बनल्यामुळे ती पुस्तके अधिक वाचली जातात. इंग्रजीमध्ये एक उलटा प्रवाहही आहे. ‘२००१ स्पेस ओडिसी’सारखी कादंबरी चित्रपटावरून करण्यात आली. त्यानंतर पुढे तिचे कितीतरी भाग निघाले. आर्थर सी. क्लार्कने स्वतःच्या ‘सेंटीनेल’ कथेवर आधारित पटकथा बनवली. त्यानंतर पुढे ‘३००१ फायनल् ओडिसी’पर्यंत अनेक भागांची कादंबरी तयार झाली. या प्रकारच्या विज्ञान-कादंबर्यांना आजही मोठा खप आहे. नवनव्या लेखकांनी आपल्या प्रतिभेने ते दालन समृद्ध केले आहे.

भयकथा, रहस्यकथा, साहसकथा या सर्व काळात लोकप्रिय ठरतात. पुस्तकांच्या कुठल्याही दुकानात गेल्यास हे सगळ्यात खपाऊ क्षेत्र असल्याचे आढळते. स्टीफन किंग, टॉम क्लान्सी, रॉबर्ट लुडलुम, फ्रेडरीक फोरसैथ, जेफ्री आर्चर, जोनाथन केलरमन, रूथ रँडॉल, पि. डी. जेम्स, ली चाईल्ड, आयन रान्कीन यांसारखे अनेक नवे-जुने लेखक पुस्तकांच्या या दालनात दाटीवाटीने बसलेले असतात. स्टीफन किंग हा त्यातील सर्वात खपणारा लेखक आहे. त्यानेच ‘आर्ट ऑफ रायटींग’सारखे लेखनावरचे सुंदर पुस्तक लिहिलेले आहे. तो म्हणतो, “माझ्या अनेक कथा, ‘व्हॉट इफ’ - म्हणजे असे घडले तर काय? या प्रश्नातून निर्माण होतात.” ‘शायनिंग’, ‘कॅरी’, ‘ग्रीन माईल’, ‘इन्सोमिया’ यांसारख्या त्याच्या अनेक कादंबऱ्या, ‘स्केलेटन क्रो’सारखे कथासंग्रह लोकप्रिय तर ठरल्याच पण त्यांवरचे चित्रपटही गाजले. ‘कॅरी’वर दोन चित्रपट निघाले. ‘ऑन रायटींग’ या पुस्तकात तो लिहितो, “लेखकाचा स्वत:चा असा एक टूलबॉक्स असतो. सुतार जसा घरबांधणीसाठी विविध साधनं वापरतो, तसंच लेखकाला शब्द, भाषा क्रियापदं वापरावी लागतात. ‘त्याने दार जोरात बंद केलं.’ सारखं वाक्य लिहिताना लेखकाने विचार करायला हवा की ‘जोरात’ची इथे गरज आहे का? त्याने दार बंद केलं आणि दार आपटून बंद केलं, यामध्ये जो काही अंशाचा फरक असतो, तो लेखकाने लक्षात घ्यायला हवा.”
साधारणपणे हे शिकवणारे अनेक कोर्सेस अमेरिकन विद्यापीठात चालतात. स्टोरीवाले मक्-की आणि सिद् फील्ड हेही अशा कार्यशाळा घेतात. लेखक जन्मावा लागतो, असे ही मंडळी मानत नाहीत. त्यामुळेच एरवी ज्या मंडळींनी लेखन केले नसते, अशा अनेक लेखकांनी पत्रकार किंवा चांगल्या लेखकाला हाताशी धरून आपली आत्मचरित्रे शब्दांकित केली आहेत. प्रामुख्याने ‘बराक ओबामा’ किंवा ‘इम्रान खान’सारखे सेलिब्रिटी लेखक यात येतात. ‘थ्री कप्स ऑफ टी’, ‘नॉट विदाऊट माय डॉटर’, ‘रीडिंग लोलिता इन तेहरान’, यांसारख्या पुस्तकांनी मध्य-पूर्व आणि पाकिस्तानचे वास्तव-अतिवास्तव चित्र रंगवले. हीदेखील पुस्तके गाजली. ‘काइट-रनर’सारखे पुस्तक हे थ्रिलर्स आणि साहसकथा यांना मिळालेली मध्य-पूर्वेची नवी भूमी दाखवते.

‘अभिजात पुस्तके’ हा कायमच संथ आणि शांतपणे खपणारा पुस्तकांचा गट. ‘पेंग्विन क्लासिक्स’, ‘वर्डस्वर्थ क्लासिक्स’, ‘बॅन्टम क्लासिक्स’ या मालिकांमधून ही पुस्तकं एका विशिष्ट रकमेला विकत मिळतात. उदाहरणार्थ, ‘बॅन्टम क्लासिक्स’मध्ये शेक्सपिअरची सुटी नाटके पाच डॉलरना मिळतात. त्याच किमतीत जेन ऑस्टिन कादंबऱ्या, चेकॉव्हचा कथासंग्रह, डार्विनचे ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज़़्’, डेफोचे ‘रॉबिन्सन क्रुसो’, डिकन्सच्या कादंबऱ्या, दोस्तोव्ह्स्कीच्या कादंबऱ्या, फ्लोबेरची ‘मादाम बोवरी’ वा ‘डायरी ऑफ अॅन फ्रँक’, अशी जवळपास १९० पुस्तके प्रत्येकी पाच डॉलरला पडतात. मग त्याची पृष्ठसंख्या कितीही असो. ‘पेंग्विन’ आणि ‘वर्डस्वर्थ’ मालिकेतही हीच पुस्तके आहेत. यातील अनेक पुस्तकं शाळा कॉलेजात अभ्यासाला आहेत.

सातत्याने खपणाऱ्या आणखी एक पुस्तकांचा गट म्हणजे ‘संदर्भ ग्रंथ’. ‘ऑक्सफर्ड’ आणि ‘वेब्स्टर’ यांच्या डिक्शनऱ्यांबरोबरच छोटेमोठे कोश, संदर्भग्रंथ, मुलांसाठी ‘टेल मी व्हाय’सारखी मालिका, ‘नो इट ऑल’, व्हिज्युअल डिक्शनरी, अवकाश, विज्ञान, इतिहास, या विषयांवरची रंगीत सचित्र पुस्तकेही कायम खपणाऱ्या पुस्तकात येतात. अर्थात धार्मिक पुस्तकांपासून ते पाकक्रियेवरील पुस्तकांपर्यंत अनेक प्रकारची पुस्तके ही ‘कायम खपाऊ’ या गटात मोडतील. जगभरातील अनेक विद्यापीठांच्या स्वतःच्या प्रकाशन संस्था आहेत. सौंदर्यशास्त्र, काव्य, समीक्षा, लेखकांवरचे कोश, जुन्या अभिजात ग्रंथांच्या संपादित प्रती, तत्त्वज्ञान, संगीत, नाट्यशास्त्र, अगदी चित्रपटदेखील; अशा विषयांवरची गंभीर पुस्तके ही विद्यापीठे प्रसिद्ध करतात. ‘ऑक्सफर्ड’बरोबरच ‘केम्ब्रिज’, ‘शिकागो’, ‘प्रिन्स्टन’ यांसारख्या विद्यापीठांबरोबरच ‘रुटलीज’सारखी प्रकाशनसंस्था अशी पुस्तके प्रकाशित करते. प्रिन्स्टन विद्यापीठाने ‘सोरेन किर्कगार्द’सारख्या (Søren Kierkegaard) तत्त्वज्ञाची सर्व पुस्तके एका मालिकेत छापली आहेत, तर ‘रुटलीज’ने देरीदा (Jacques Derrida), गाडमीर, दुलूज़ (Gilles Deleuze), अडोर्नो (Theodor Adorno), बोदलेअर (Charles Baudelaire) सारख्या अनेक विचारवंतांचे साहित्य छापले आहे. केम्ब्रिज विद्यापीठाने ‘कान्ट’सारख्या (Immanuel Kant) तत्त्वज्ञाचा कोश छापला आहे. ही पुस्तके काही वेळा शैक्षणिक वर्तुळाबाहेरही वाचली आणि अभ्यासली जातात. उदाहरणार्थ, अडोर्नोचे ‘अॅस्थेटिक थेअरी’ हे पुस्तक कलासमीक्षा करणाऱ्यांना वाचावेच लागते.

फुको (Michel Foucault), लीवाय् स्टाऊस्(Claude Levi Strauss), पॉपर (Carl Popper), साईद् (Edward Said) हे तत्त्वज्ञ विसाव्या शतकात मरण पावले. मात्र त्यांच्या अप्रकाशित लेखनाची पुस्तके आजही येत आहेत. ‘ऑल लाइफ इज प्रॉब्लेम सॉल्विंग’सारखी कार्ल पॉपर यांची भाषणे आणि लेखांच्या संग्रहातील ‘हाऊ आय बिकम ए फिलॉसॉफर विदाऊट ट्राइंग’सारखा लेख वाचला तरी विचारवंत कसा असतो, याचे दर्शन होते. लहानपणापासून आपल्याला ‘अनंत म्हणजे काय?’ यासारखे प्रश्न पडत होते. ‘हे प्रश्न म्हणजेच तत्वज्ञानातील प्रश्न’, असे सांगून पॉपर पुढे ‘समाजविज्ञान आणि खरे विज्ञान’ यांतील फरकाची समस्या सोडविण्यापर्यंत आपण कसे आलो, ते सांगतात. स्टीफन मॅकगव्हर्न यांचे ‘ऑन बिकमिंग अ फिलॉसॉफर’, ब्रायन मॅगी यांची तत्त्वज्ञांशी संवादाची पुस्तके ही आपल्याला तत्त्वज्ञानाच्या परीघावरून मध्यापर्यंत न्यायचा प्रयत्न करतात. जर्गन हेबरमास, गाईल्स डिल्युझ, देरीदा, ल्योटोर, नोआम् चॉम्स्की, बॉब्रीलार्ड अशा विचारवंतांची पुस्तके आजही नियमितपणे प्रसिद्ध होतात. राजकारण, कला, प्रसारमाध्यमे या विषयांवर सातत्याने केलेल्या चिंतनाचा परिपाक त्यात दिसतो. या मांदियाळीत अमर्त्य सेन, होमी के. भाभा ही दोन ठशठशीत भारतीय नावे आहेत.

रिचर्ड डॉकिन्स हे डार्विनवादी लेखक, स्टीफन जे. गूल्ड हे जीवाश्मशास्त्रज्ञ, कार्ल सेगन, पॉल डेव्हिस या विज्ञानविषयक लेखकांना त्यांचा असा वाचकवर्ग आहे. या दशकात त्यांची प्रत्येकी पाच-सहा पुस्तके आलेली दिसतात. रिचर्ड डॉकिन्स यांचे ‘गॉड डिल्युजन’, ख्रिस्तोफर हिचेन्स संपादित ‘गॉड इज नॉट ग्रेट’, कॅरेन आर्मस्ट्राँग यांचे देवाच्या अस्तित्वावरचे पुस्तक, ही तिन्ही पुस्तकं गेल्या वर्ष- दोन वर्षांत चर्चेत होती. पण देवाच्या अस्तित्वाबद्दल वाचकांना फारशी शंका नसावी. पुस्तकांच्या दुकानात धर्मावर आधारलेली पुस्तके भरपूर खपताना आढळतात. कृष्णमूर्ती, गुर्जीफ, कास्टानेडा, ओशो, रामकृष्ण, विवेकानंद, श्री. रवीशंकर, योगानंद असे ज्याच्या-त्याच्या ब्रॅण्डच्या श्रद्धेला दिशा देणारे लेखक सतत खपत असतात. झेन बुद्धिझम, ताओइझम्, इस्लाम, ख्रिश्चॅनिटी या साऱ्यांवर नवनवी पुस्तके येत असतात.

९/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवाद, मंदीनंतरचे अर्थकारण आणि चीनची प्रगती हे या दशकात नव्याने पुस्तकाला चालना देणारे विषय ठरले आहेत. दहशतवादावरचे ‘तालीबान’, आर्थिक मंदीवर स्टीगलिझ यांचे ‘फ्री फॉल’, चीनवरची जॉन के, मार्गारेट मॅक्मिलन, राजकुमार यांची पुस्तके खपली. थॉमस फ्रीडमनसारख्या पॉप विचारवंताचाही उदय ‘लेक्सस अँड ऑलिव्ह ट्री’,‘वर्ल्ड इज फ्लॅट’मुळे झाला. पहिले दशक संपताना पेंग्विनने ३७ पुस्तकांचा एक संच प्रत्येकी केवळ १९९ रुपये दराने उपलब्ध केला आहे. ‘लोलिता’, ‘सेन्स अँड सेन्सिबिलिटी’ अशा फिक्शनबरोबरच त्यात ‘हाऊ लँग्वेज वर्क्‍स’- डेव्हिड क्रिस्टल, ‘लँग्वेज इंस्टीन्क्ट’- स्टीव्हन पिंकर, ‘एम्पायर’ - नियाल फर्ग्युसन अशा पुस्तकांचा समावेश आहे. याचबरोबर जयपूर महोत्सवात त्यांनी भारतीय पुस्तकांची मालिकाही २५० रुपये प्रत्येकी दराने प्रसिद्ध केली, ज्यात ‘शोभा डे’ ते ‘अमर्त्य सेन’ यांपर्यंतचे अनेक लेखक आहेत.

तर पुस्तकांचे जग धडधाकट आहे. आजही नवनवे लेखक येत आहेत. डॅन ब्राउन, 'डायरी ऑफ ए विम्पी किड' मालिका लिहिणारा जेफ किनी, जॉन ग्रीन, खालिद होसैनी, रिक होर्देन , जे.के.रोलिंग, जेम्स पॅटर्सन, वेरोनिका रोथ, ‘हंगर’ मालिका लिहिणारी सुझान कॉलिन्स, सिल्विया डे, हिलरी मंटेल, निकोलस डेविड, मार्टिन जॉर्ज, हर्लेन कोबेन, होकान नेस्सर (Håkan Nesser), जो नेस्बो, स्टीफनी मेयर, मार्क होदेन, अॅलीस सेबोल्ड, आयन माकइवान, बिल ब्रायसन, अलेक्झान्दर मेकॉल स्मिथ असे अनेक नवे लेखक गेल्या काही वर्षात उदयाला आले आणि तडाखेबंद खपाची पुस्तके त्यांनी दिली. ग्राफिक बुक सारख्या सचित्र नव्या पुस्तकांनी तरुण वाचक मिळवला आहे. पुस्तकांचे जग हे एक अफाट जग आहे आणि ते विस्तारत आहे. एकाच लेखात साऱ्याचा आढावा घेणे शक्य नाही पण गेल्या पंचवीस वर्षातील पुस्तके आणि वाचन याची स्थिती पाहता भवितव्य अधिक आशादायक आहे एवढे नक्की.

field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

प्रतिक्रिया

छान आढावा. लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

परीश्रमपूर्वक, खूपच छान घेतला आहे आढावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख माहितीपूर्ण आहे.

मात्र निव्वळ पुस्तकांच्या नावांची नी लेखकांच्या नावांची जंत्री वाटली आणि त्यावरचे भाष्य मात्र त्रोटक वाटले.
अर्थात विविध प्रांतातील चांगल्या पुस्तकांची, लेखकांची नावे कळतात त्यामुळे लेखाचे संदर्भमूल्य नाकारत नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

याच आशयाचा लेख मी लोकसत्तेच्या पुरवणीत दोनेक वर्षांपूर्वी वाचल्याचं आठवतं आहे. संदर्भ म्हणून उत्तमच आहे. पण नवीन काही मिळाल्यासारखं मात्र नाही वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मलाही आवडणार्‍या पुस्तकांच्या जगातला एक छोटासा प्रवास करून आणल्याबद्दल लेखकाला धन्यवाद.

पुस्तकांच्या जगात हिंडणे फिरणे म्हणजे नेमके काय असते याबद्दलची रेबेक्का सोल्निट या लेखिकेची खालील विधानं याला पुष्टी देतील.

Like many others who turned into writers, I disappeared into books when I was very young, disappeared into them like someone running into the woods. What surprised and still surprises me is that there was another side to the forest of stories and the solitude, that I came out that other side and met people there. Writers are solitaries by vocation and necessity. I sometimes think the test is not so much talent, which is not as rare as people think, but purpose or vocation, which manifests in part as the ability to endure a lot of solitude and keep working. Before writers are writers they are readers, living in books, through books, in the lives of others that are also the heads of others, in that act that is so intimate and yet so alone.

The object we call a book is not the real book, but its potential, like a musical score or seed. It exists fully only in the act of being read; and its real home is inside the head of the reader, where the symphony resounds, the seed germinates. A book is a heart that only beats in the chest of another. The child I once was read constantly and hardly spoke, because she was ambivalent about the merits of communication, about the risks of being mocked or punished or exposed. The idea of being understood and encouraged, of recognizing herself in another, of affirmation, had hardly occurred to her and neither had the idea that she had something to give others. So she read, taking in words in huge quantities, a children’s and then an adult’s novel a day for many years, seven books a week or so, gorging on books, fasting on speech, carrying piles of books home from the library.

Rebecca Solnit, in The Faraway Nearby

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहा...सुरेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या वरून काही पुस्तकं आठवली:

अरुण टिकेकर: अक्षरनिष्ठांची मांदियाळी
सतीश काळसेकर: वाचणार्याची रोजनिशी

वाल्तर बेन्जामिन ह्या एका अतिशय ग्रेट लेखकाचा एक जुना लहानसा निबंध आहे पुस्तकांबद्दल अगदी आवर्जून वाचवा असा. अनपकिंग माय लायब्ररी नावाचा. इल्युमिनेशन्स नावाच्या बेन्जामिन च्या पुस्तकात त्याचे अनेकच अविस्मरणीय लेख सापडतात, त्यात हा हि लेख आहे. पूर्ण पुस्तकाची पीडीएफ इथे सापडेल:

traumawien.at/stuff/texts/Benjamin,-Walter-–-Illuminations.pdf

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

मराठीमध्ये, दिवाळी या मराठमोळ्या सणाच्या निमित्याने, फक्त "मराठी भाषेतच" दिवाळी अंक ही प्रथा असलेल्या या भाषेतील किमान चवीपुरता तरी मराठी पुस्तकांचा उल्लेख करायचा होता राव Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)