Skip to main content

छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ६ : मर्त्य असण्याबद्दल

वर्षाचा अंत जवळ येत आहे, माझ्या आजूबाजूची झाडे पाने गळून सांगाडे झाली आहेत, आणि कडाक्याच्या थंडीत निसर्ग निपचित पडल्यासारखा झाला आहे. अशा या वातावरणात मी अतुल गावंडे (अमेरिकेत उच्चार "गवांडे") या शल्यचिकित्सक लेखकाचे "Being Mortal" हे पुस्तक वाचले. वैद्यकशास्त्राने अनेक आजारांवर उपचार मिळवले आहेत, वेदना आणि दु:ख कमी केले आहे, आयुष्यमान लांबवले आहे, हे खरे. परंतु यामुळे वृद्धापकाळात, आयुष्याच्या सरतेशेवटाला मात्र पुष्कळदा आपली दृष्टी गढूळ होते. महिना-दोन महिन्यांचे जीवन वाढवण्याकरिता जेव्हा आपण नळ्या, शरीर थकवणारी, मन बधीर करणारी औषधे, अंथरुणाला खिळवणार्‍या शल्यचिकित्सा वगैरे कवटाळतो, तेव्हा उठाबसायचे शारिरिक स्वातंत्र्य, कुटुंबाबरोबर शुद्धीत-जाणीवपूर्ण व्यवहार, या सगळ्या गोष्टींना मुकतो. या जटिल सामाजिक-वैयक्तिक प्रश्नांबाबत हे पुस्तक आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या सुरुवातीची काही उद्धरणे आणि प्रस्तावनेची पहिली काही वाक्ये या आव्हानाकरिता देत आहे. (भाषांतर माझे)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

जगत्यनित्ये सततं प्रधावति
प्रचिन्तयन्नस्थिरमद्य लक्षये
-- कर्ण (द्रोणपर्व २.११)

अनित्य जग हे, सतत धावते
चिंतता लक्षिले, अस्थायी मी
-----------------
They come to rest at any kerb:
All streets in time are visited.
-- Philip Larkin, “Ambulances”

थांबतात कोणत्याही दारापाशी येऊन त्या :
फिरतात गल्लीन् गल्ली - आज नाही तर उद्या.
-----------------
प्रस्तावना :
मेडिकल कॉलेजमध्ये मी पुष्कळ गोष्टी शिकलो, पण आपण मर्त्य असण्याबद्दल त्यात काहीही नव्हते. पहिल्या वर्षी मला एक सुकल्या चामडीचा मृतदेह विच्छेदनासाठी दिला होता खरा, पण तो फक्त शरिराची रचना शिकण्यासाठी होता. आमच्या पाठ्यपुस्तकांत म्हातारे होणे, जर्जर होणे आणि मरणे यांच्याबद्दल जवळजवळ काहीच नव्हते. ही प्रक्रिया कशी असते, जीवनाचा अंत होण्याचा लोकांचा अनुभव कसा असतो, आजूबाजूच्यांवर त्याचा काय परिणाम होतो, याच्याशी आमचे काही देणेघेणे नव्हते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

वरील परिच्छेद/अंश वाचुन जे सुचेल/वाटेल ते छायाचित्रात बंदीस्त करायचे हे आव्हान आहे. बघुया कितीजण आणि कसे हे आव्हान पेलतात.

नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १ जानेवारी २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

व्यवस्थापकः सदर धाग्यावर छायाचित्राव्यतिरिक्त इतर विषयांवर फारशी चर्चा करू नये. समांतर चर्चेसाठी वेगळा धागा काढावा वा मनातले प्रश्न/विचार यातील ताज्या धाग्यावरही विचार मांडता येतील.

स्पर्धा का इतर?

धनंजय Fri, 12/12/2014 - 10:17

भज्या/अमोघ यांचे चित्र दिसत नाही. बहुधा त्यांन गूगल खात्यावर हे चढवलेले आहे, परंतु अन्य लोकांना संकेताक्षराशिवाय बघण्याकरिता मुक्त केलेले नाही.

ऋषिकेश Sun, 30/11/2014 - 16:20

माझ्या दोन धनगरांपैकी खालील छायाचित्रातील डावीकडिल वारुगडावरील रंगेल म्हातारा, तर उजवीकडील माझे सख्खे काका - फोटो काढला तेव्हा पासष्टी ओलांडलेले माझ्या ग्रुपबरोबर ट्रेकिंगलाही येणारे, अख्खा भारत हिंडलेले.
आता दोघेही नाहीत. अन दोघेही रसरसून जगलेले! (चित्रासोबत लेखही वाचा)
पुर्वी हे छायाचित्र मला नेहमीच माणसाने फक्त किती रसरसून जगावं हे दाखवायचं आणि आता बघितल्यावर माणूस मर्त्य असतो, त्यामुळे असं भरभरून जगणं किती महत्त्वाचं आहे त्याची आठवण करून देते:

मिसळपाव Wed, 03/12/2014 - 07:02

In reply to by ऋषिकेश

पहिल्या धनगरावरचा लेख वाचून चटकन जाणवलं की "अरे, हा तर गोनिदांचा 'पवनाकाठचा धोंडी' ". वाचलं नसलंस तर पहिलं जाउन घेउन ये मॅजेस्टिकातनं. सुरेख आहे.

हा धनगर नव्वदित होता फोटो काढला तेव्हा? नक्की?? तू लिहिलयंस की "या वयात .... नाचू नक्कीच शकणार नाही".... वेल, आधी सत्तरी-पंचाहत्तरीपर्यंत हिंडते-फिरते असलो तरी खूप झालं !

ऋषिकेश Wed, 03/12/2014 - 08:57

In reply to by मिसळपाव

अरे, नव्वदी नक्की ते कसं सांगणार?
त्या म्हातारबुवांनीच तसा दावा केला होता नी तो चॅलेंज करायची अजिबातच इच्छा नव्हती :)

बाकी पवनाकाठचा धोंडी वाचलय खूप पूर्वी. नै आठवते फारसं. पुन्हा वाचुन बघेन दिसलं की

मिसळपाव Wed, 03/12/2014 - 15:08

In reply to by ऋषिकेश

माझा उद्देश "नक्की नव्वदी का? जन्मदाखला पाहिलात तुम्ही?" असं विचारायचा नव्हताच मुळी. तर "आयला, हा पिकला म्हातारा डोंगर चढतो / उतरतो रोज? पावण्याला गवळण नाचत गाउन दाखवतो आणि शेलके कीस्से सांगण्याएव्हढा मनाचा ताजेपणाही आहे." असा होता! आणि मला आत्ताच सकाळी उठल्यावर गुडघे चोळत बदकासारखं चालावं लागतं !

नंदन Wed, 03/12/2014 - 15:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'एखादी भयाण गझल/कविता वाचून हाराकिरीच्या तयारीत असलेला मिर्झा गालिब' म्हणून दुसरे चित्र खपून जाईल काय? :)

वामा१००-वाचनमा… Mon, 08/12/2014 - 19:30

In reply to by अमोघ

धूप दिसतो. सुंदर = स्पर्धेकरता च-प-ख-ल आहे. किंवा उदबत्तीही असेल.
"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे,
अकस्मात तोही पुढे जात आहे "

नंदन Thu, 08/01/2015 - 13:08

कॉप्टिक ख्रिसमसच्या मुहुर्तावर ह्या मर्त्य धाग्याचे किंचित रिसरेक्शन :)

धनंजय Thu, 08/01/2015 - 21:09

खूपच चांगली चित्र आली. मग काहीतरी क्रम लावायचा म्हणून प्रत्येकात खुसपटे काढावी लागली.
--------------
चक्रनेमिक्रमेण : नंदन : सावलीचे वैशिष्ट्य आहे. कथानकही चांगले सांगितलेले आहे.
मृत वास्तू : ऋता : शेवाळे, ढासळता क्रूस, हे विषयाचे चांगले चित्रण करतात. मागे टॉवरचा खांब थोडा खटकतो आहे, मात्र.
ओसाडवाडीचा राजा : मुळापासून : सीपिया रंगछटा जुनाट पुस्तकातल्यासारखी. हिम/रखरखीतपणा यांच्यात विरोधाभास जाणवतो आजे.
कदंबतरुंना बांधुन दोऱ्या उंच : राजेश घासकडवी : गुबगुबीत गादी. मर्त्यपणातही हसरेपणा हवा, हे पटवणारे चित्र. परंतु येथे मर्त्यपणापेक्षा स्वतंत्र कथानक जास्त जाणवते आहे.
माझ्या दोन धनगरांपैकी खालील : ऋषिकेश : सोबतच्या लेखामुळे अतिशय आवडलेले
कालचक्र : ३_१४ विक्षिप्त अदिती : शोधक नजर आहे!
मर्त्य असण्याबद्दल : स्पा : उत्तम पत्रकारितेकडे झुकलेले. तथ्यात्मक पण भावूक
कॅमेरा : सॅमसंग एस ४ : इरसाल म्हमईकर : चित्र खूप आवडले. माझ्याकरिता झाड आणि कथानकाकरिता तितकाच महत्त्वाचा उजव्या बाजूचा घोळका होता. डाव्या बाजूच्या रिकाम्या भागाने माझ्यावर फारसा परिणाम केला नाही - भकासपणा, ओकेबोकेपणा, कसाही परिणाम नाही. त्यामुळे चित्राची मांडणी-कातरणी पूर्णपणे समजली नाही.
आमचा सुपिरिअर लेक : अपुली-गपुली : एक थिजलेला औद्योगिक सूर्योदय (सूर्योदयच भासतो आहे, सूर्यास्त नाही) अशा कथानकाकरिता धूसरपणा पटण्यासारखा आहे. परंतु धूसर+त्यात गजबज असल्यामुळे कथानकाचे सूत्र हरवते आहे.
अमोघ : "मर्त्यपणा" कथानकाकरिता फार चांगले. कातरणी थोडी वेगळी असती (डावीकडचा रिकामा भाग कमी, उजवीकडचा - राख कलंडण्याच्या दिशेचा - भाग अधिक) तर अधिक परिणाम साधला असता, असे वाटते.
---------------
निर्णय : विजेते चित्र आहे -
मर्त्य असण्याबद्दल : स्पा
स्पा यांनी पुढील विषय द्यावा, ही विनंती