आइसलंडमध्ये तीन दिवस - भाग ३ अखेरचा.

भाग ३.

(भाग १, भाग २)

आमच्या मुक्कामाच्या तिसर्‍या दिवशी Golden Circle ह्या नावाने टूरिस्ट नकाशांवर दाखविल्या जाणार्‍या रस्त्यांनी गाडी घेऊन निघालो. ह्या वर्तुळाकृति मार्गावर बघण्यायोग्य अनेक भूशास्त्रीय कुतूहलाच्या जागा आहेत आणि म्हणून रेकयाविकपासून सुरू होऊन तेथेच परत आणणारा सुमारे ३०० किमीचा हा प्रवाशांसाठी एक चांगले आकर्षण आहे.

आइसलंडमध्ये गाडी चालवायला मजा येते. रेकयाविकच्या आत काय ती थोडीफार वाहतूक जाणवते. एकदा शहर सोडले की रस्ते जवळजवळ मोकळेच असतात. रस्त्यांची पुढील दोन चित्रे पहा.

गोल्डन सर्कलमधील प्रेक्षणीय गोष्टींपैकी पहिली म्हणजे ’केरिथ’ (Kerið) हे एका सुप्त ज्वालामुखीचे कढईच्या आकाराचे विवर. ग्रिम्सनेस नावाच्या ज्वालामुखींच्या गटातील सर्वात तरुण सदस्य. ह्याचा स्फोट सुमारे ३५०० वर्षांपूर्वी होऊन गेलेला असावा. जागेवरील माहितीफलकाच्या पुढील चित्रांवरून त्याची माहिती कळेल.


येथून पुढची महत्त्वाची जागा म्हणजे ’हैकादालुर’ (Haukadalur) नावाची जागा, जेथे सुमारे १ किमी लांबीरुंदीचे मैदान म्हणजे भूगर्भीय चमत्कृतींचा खजिनाच आहे. पुढील नकाशामध्ये ते तपशील दाखविण्यात आले आहेत. येथे गीझर्स (खूण - फवारा), जमिनीतून बाहेर पडणारा धूर (Fumarole, खूण - तांबडा चौरस ठिपका), उकळत्या चिखलाचे डबके (Mud Pot, खूण - तांबडा त्रिकोणी ठिपका) आणि उकळत्या पाण्याचे डबके (Hot Spring, खूण - तांबडा गोल ठिपका) असे अनेक प्रकार एकत्र पाहायला मिळतात. ’गीझर’ ह्या भूशास्त्रीय चमत्कृतीच्या नावाचा आणि आपल्या न्हाणीघरातल्या गीझरच्या नावाचा उगमहि येथे आहे. जमिनीमधून ठराविक वेळेनंतर उडणार्‍या पाण्याच्या फवार्‍याला आइसलंडमध्ये 'Geysir' ह्या नावाने ओळखत असत. असा पहिला फवारा लक्षात आला तो आइसलंडमध्ये. नंतर अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्कमधील Old Faithful पासून अन्य अनेक फवारेहि सापडले आणि त्या सर्वांना मूळच्या 'Geysir' वरून ’Geyser' असे नाव पडले. जगातील सर्व गीझरांचा बाप असा मूळचा Geyser येथेच आहे आणि तो खाली दाखवीत आहे.

पुढील चित्रांमध्ये जमिनीतून बाहेर पडणारा धूर (Fumerole) आणि गरम पाण्याचा झरा (Hot Spring) दिसत आहेत.


ह्यापुढील दोन चित्रे आहेत मूळचा Geysir आणि जवळचाच त्याचा धाकटा भाऊ Litli Geysir. गेसिर हा नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली तेव्हापासून नियमित वेळाने आकाशात भूगर्भातील गरम पाण्याचा फवारा उडवत आला आहे. मात्र त्याच्या दोन फवार्‍यातले अंतर ४-५ मिनिटांपासून २ तासापर्यंत असे वेगवेगळे नोंदवले गेले आहे. अगदी अलीकडेपर्यंत Geysir नियमितपणे आकाशात उडत असे पण २०१० च्या ऐयाफ्यथ्लायोकुथ्ल ज्वालामुखीच्या उद्रेकापासून त्याची प्रकृति बिघडल्यासारखी झाली असून आता तो दिवसामधून एकदोन वेळाच अनियमितपणे आपला फवारा उडवतो आणि उरलेला वेळ गरम वाफेचे आणि धुराचे उच्छ्वास टाकत बसलेला असतो. खालील चित्रामध्ये तेच दिसत आहे. त्याचा धाकटा भाऊ Litli Geysir हा गेली कित्येक वर्षे सुप्तावस्थेमध्ये असून त्याच्या विवरामधून सर्वकाळ धूर बाहेर पडतांना दिसतो.

सध्या तेथीलच स्त्रोक्कुर (Strokkur) नावाचा गीझर हा नियमितपणे दर ५ मिनिटांनी गरम पाण्याचे कारंजे हवेत ५० ते ६० फूट उंच उडवत असतो. त्याचे एकदा पाणी उडवून झाले की त्याच्या मुखामध्ये जमिनीतून परत पाणी भरायला सुरुवात होते, पाण्याची पातळी वरवर चढत जाते आणि तीनचार मिनिटातच तो पुन: उसळी घेतो. त्याच्या उसळीच्या पूर्ण उंचीला तो पोहोचल्या क्षणाचे हे चित्र पहा.

येथील रेस्टॉरंटमध्ये रुचकर गोट सूपचा आस्वाद घेऊन निघालो तो गलफॉस (Golden Falls) नावाच्या प्रसिद्ध धबधब्यापाशी थांबलो. पहिल्या भागामध्ये बार्नाफॉस धबधबा ज्या नदीवर असल्याचा उल्लेख केला आहे त्याच ख्वीता (Hvita) नदीवर हा टूरिस्टांचे प्रमुख आकर्षण असलेला धबधबा आहे. नदीचे पाणी दोन पातळ्यांवर उडी घेत अखेर पात्राशी काटकोन करणार्‍या खोल दरीत कसे गुप्त झाल्यासारखे दिसते हे चित्र अतिशय प्रेक्षणीय वाटते.


येथून आम्ही परतीचा रस्ता धरतो. वाटेमध्ये पहिल्या भागात वर्णन केलेली भूपृष्ठावरची प्रचंड भेग आणि तेथील ९३० साली भरलेल्या पहिल्यावहिल्या ’पार्लमेंट’ची जागा हे लागतात. तेथील एक अजून गोष्ट आता दाखवितो.

ह्या वार्षिक ’पार्लमेंट’च्याच वेळी नवे कायदे जमलेल्यांच्या पुढे वाचून दाखवत असत हे पूर्वी सांगितलेच आहे. ह्याच प्रसंगाने खून करणे, चेटूक करणे असे आरोप असलेल्या स्त्रीपुरुषांचे खटलेहि येथे चालत. दोषी पुरुषांना फासावर लटकावत आणि दोषी स्त्रियांना पोत्यामध्ये बांधून ओखारा नदीवरील खोल डोहामध्ये बुडवून टाकत. द्रेक्किंगारहुय्ल्यूर (Drekkingarhuylur) नावाच्या त्या डोहाची दोन चित्रे पहा. पहिल्यामध्ये हा डोह वरून कसा शान्त दिसत आहे. ह्या देखाव्याखाली दडलेली खोली दुसर्‍या चित्रामध्ये कळते. (चित्र जालावरून.)

आइसलंडमधील लेखक हालदोर लाक्सनेस (Halldór Laxness) (१९०२-१९९८) ह्यांना १९५५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. ह्या छोटया देशाला मिळालेले ते एकुलते एक नोबेल. ते जेथे राहात असत ते घर वाटेतच आहे असे आम्हास कळले होते. परतीच्या वाटेवर थोडी चौकशी केल्यावर रेकयाविकपासून जवळच असलेल्या Mosfellsbær नावाच्या गावात ते घर असल्याचे कळले आणि ते सापडले. घरामध्ये आता लेखकाच्या नावाने एक म्यूझिअम चालले आहे पण आम्ही तेथे पोहोचेपर्यंत ते बंद झालेले होते.

आमचा आइसलंडचा मुक्काम आता संपला. पुढच्या दिवशी सकाळी आमच्या विमानाने रेकयाविकचा केफ्लाविक विमानतळ सोडला. हवा उत्तम होती. थोडयाच वेळात आमचे विमान ग्रीनलंडवर पोहोचले, ग्रीनलंडची विमानामधून घेतलेली ही दोन छायाचित्रे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

लेखमालेचे तीनही भाग आत्ताच वाचले. फारच सुंदर वर्णन आणि फोटो.

हा भाग बघायच्या यादीत समाविष्ट आहेच. आता त्याच्याबद्दलच्या कुतुहलात अजूनच भर पडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला मूळ Geysir बघायला मिळाला का छोट्यावरच समाधान मानावं लागलं? त्या भागातही सल्फरचा वास येतो का, यलोस्टोनच्या गरम भागात येत असतो तसा?

ह्याच प्रसंगाने खून करणे, चेटूक करणे असे आरोप असलेल्या स्त्रीपुरुषांचे खटलेहि येथे चालत. दोषी पुरुषांना फासावर लटकावत आणि दोषी स्त्रियांना पोत्यामध्ये बांधून ओखारा नदीवरील खोल डोहामध्ये बुडवून टाकत.

मानवजात म्हणून आपण किती प्रगती केली आहे हे अशा वर्णनांवरून वारंवार जाणवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मूळचा गेसिर आता दिवसामधून एकदा-दोनदाच अनियमितपणे उडतो. शेजारच्या स्त्रोक्कुरने आता त्याची जागा घेतली आहे कारण तो दर चारपाच मिनिटांनी १५-२० मीटर उंच पाणी फेकतो. सर्व वातावरणात गंधकाचा वास भरून असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0