जर्मनविंग्ज 4U 9525.. लॉक्ड इन ?!
जर्मनविंग्ज फ्लाईट नंबर फोर-यू-नाईनर फाय टू फाय या उड्डाणाच्या आल्प्समधे झालेल्या क्रॅशला फॉलो करण्यासाठी ही जागा आहे. अपडेट्स वेगाने येताहेत. काही ऑब्सोलीट होताहेत आणि काही वेगळ्याच दिशेला नेताहेत. संकलनाचा हेतू आहे.
लुफ्तांझा कंपनीची चाईल्ड कंपनी असलेली जर्मनविंग्ज १९९७ मधे सुरु झाली होती. आजरोजी कंपनीकडे जवळजवळ ऐंशी विमानं आहेत. त्यापैकी निम्मी एअरबस ए ३१९-१०० सीरीजची आहेत. उर्वरितांमधे निम्मी एअरबस ३२०-२०० सीरीज आणि निम्मी बंबार्डियर जातीची विमानं आहेत.
अपघातग्रस्त विमानाची जात: एअरबस ३२०-२११. रजिस्ट्रेशन नंबर D- A I P X (डेल्टा - अल्फा इंडिया पापा एक्सरे)
क्षमता: १७४-१७५ लोक
इंजिन टाईप: टर्बोफॅन
विमानाचं वयः चोवीस वर्षे पूर्ण, साडेअठ्ठावन्नहजार तास उड्डाण.
मार्गः बार्सेलोना ते डुसलडॉर्फ
टाईमलाईनः
तारीखः २४ मार्च २०१५
टेकऑफची ठरलेली वेळ: स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ पस्तीस. (दुपारी दोन वाजून पाच मिनिटे भारतीय वेळेप्रमाणे)
प्रत्यक्ष टेकऑफः सकाळी दहा वाजून एक मिनिट (अर्धा तास उशिराने)
ठरवून दिलेली उंची: फ्लाईट लेव्हल ३८० (अडतीस हजार फूट)
क्रूझिंग स्पीडः आठशे किलोमीटर्स पर अवर (०.६५ माक, आवाजाच्या वेगाच्या ०.६५ पट)
विमान दहा वाजून एक मिनिटाने स्पेनमधल्या बार्सेलोना एअरपोर्टच्या रनवे ०७ वरुन(सत्तर डिग्री= उत्तरपूर्व दिशेत तोंड असलेल्या) उडलं.
दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी त्याने आपली ठरलेली क्रूझिंग फ्लाईट लेव्हल ३८० गाठली. त्याचा वेग ८०० किलोमीटर प्रतितास होता.
दहा वाजून तीस मिनिटांनी शेवटचा प्रतिसाद विमानाच्या रेडिओवरुन आला. तो नॉर्मल होता. त्याचवेळी विमानाचा वेग वाढायला लागला आणि साडेनऊशे किलोमीटर प्रतितास झाला.
दहा वाजून एकतीस मिनिटांनी विमानाने फ्रेंच बॉर्डर ओलांडली आणि लगेचच आपली क्रूझ लेव्हल सोडून झपाझप खाली उतरायला सुरुवात केली. सेकंडरी रडारयंत्रणा उपलब्ध असल्याने जमिनीवरच्या कंट्रोल सेंटरला विमानाचा वेग, उंची, खाली येण्याचा रेट हे सर्व आकडेरुपात दिसत होतं.
विमान सरळ रेषेत झपाट्याने खाली उतरत होतं. ३५०० (पस्तीसशे) फूट प्रतिमिनिट असा हा खाली येण्याचा धडकी भरवणारा रेट होता. अर्थात हा फ्री फॉल नव्हता हे नोंद घेण्यासारखं आहे. हा अतिशय फास्ट पण कंट्रोल्ड उतरणीचा प्रकार होता. हे पाहून एअर ट्रॅफिक कंट्रोलने भयग्रस्त होऊन पुन्हापुन्हा रेडिओवर या विमानाला पुकारायला सुरुवात केली. विमानाकडून काहीही उत्तर आलं नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने कोणताही डिस्ट्रेस सिग्नल किंवा प्रत्युत्तर आलंच नाही.
हेलिओस सारखा प्रकार असेल असं समजून फ्रेंच एअरफोर्सचं फायटर जेट लगेच उडवण्यात आलं. या विमानाच्या शेजारी उडून थेट नजरेने काही दिसतंय का ते पाहण्यासाठी. पण ते पोहोचण्याआधीच जर्मनविंग्ज ९५२५ जमिनीपर्यंत पोहोचलं होतं. आल्प्स पर्वतांमधे पाच हजार फूट उंचीवर ते जमिनीवर कोसळलं.
सर्व दीडशे लोक ठार झाले. विमानाचा चुरा झाला. सर्वात मोठा तुकडा छोट्या कारइतक्या आकाराचा आहे असं सांगण्यात आलं. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सापडला आहे आणि काही आवाज नोंदवले गेले आहेत. रडारनोंदी आहेतच.
यामधे खालील काही नोंदी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या बदलत राहतील. पण सध्यातरी वेगवेगळ्या शक्यता दिसतात.
१. विमानाचा डाईव्ह करण्याचा वेग नियंत्रित होता. विमानाचे इंजिन सुखरुप राहील इतकीच या वेगाची रेंज होती. आपणहोऊन कोसळणारं विमान गुरुत्वाकर्षणाने एखाद्या दगडासारखं खाली येतं आणि त्याचा वेग इतका जास्त असतो की ते हवेतच डिसइंटिग्रेट होतं.
२. विमानाचा खाली येण्याचा रेट (डिसेंट रेट) कोसळण्यापूर्वी शेवटच्या क्षणांत कमी झाला.
३. कॉकपिटमधल्या रेकॉर्ड झालेल्या आवाजांवरुन उड्डाणानंतर पायलट आणि कोपायलटमधे अत्यंत सरळ आणि साधं संभाषण चाललेलं होतं. त्यानंतर ऐकू येणार्या ऑडिओनुसार एक पायलट कॉकपिट सोडून बाहेर (बहुधा बाथरुममधे) गेला. तो परत आला तेव्हा कॉकपिटचं दार आतून बंद आणि लॉक झालेलं होतं.
४. बाहेर गेलेला पायलट बाहेरुन दार ठोकत राहिला पण आतून कोणतंही उत्तर आलं नाही.
५. बाहेरुन दरवाजा बडवण्याचा आवाज वाढत राहिला आणि शेवटी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न आवाजातून ऐकू आला. पण विमान कोसळेपर्यंत आतून कोणतंही उत्तर किंवा दरवाजा उघडणं झालं नाही. आपोआप कोसळणार्या विमानाचा वेग सतत वाढतच राहतो, अगदी जमिनीवर आदळेपर्यंत.
याचा अर्थः
हेलिओसप्रमाणे अचानक केबिन डी-प्रेशराईज होऊन सर्वजण बेशुद्ध होणं असा प्रकार वाटत नाही.
बाहेरुन दरवाजा सतत वाजवला जात होता, म्हणजे बाहेरचा पायलट शुद्धीवर होता. अर्थात ऑक्सिजन अचानक नाहीसा होण्याची थियरी पटत नाही.
विमान कोसळण्याच्या क्षणी एक पायलट आत लॉक्ड आणि एक पायलट कॉकपिटबाहेर पॅसेंजर साईडला लॉक्ड अशी स्थिती होती.
पूर्वी एका केसमधे अस्वस्थ, नाराज कोपायलटने जाणूनबुजून मुख्य पायलट स्वच्छतागृहात गेलेला असताना ईश्वराचं नाव घेत विमान डाईव्हमधे टाकून क्रॅश केलं होतं. त्यावेळी पायलट शेवटी कॉकपिटमधे घुसलाही होता पण कोपायलटने सर्व शक्तीनिशी कंट्रोल खाली दाबून ठेवला होता आणि क्रॅश होईस्तो सोडला नाही. कोपायलट ईश्वरस्मरणाखेरीज कोणताही रिस्पॉन्स देत नव्हता.
इथे नेमकं काय झालं असावं हे सांगणं याक्षणी खूप कठीण आहे.
हायजॅक करण्याचे आणि पायलट्सना गनपॉईंटवर घेण्याचे प्रकार वाढले तेव्हा त्यातून धडा म्हणून कॉकपिट डोअर लॉक करणे अन फक्त पायलट्सनाच दरवाजा आतून उघडण्याचे हक्क अशी पद्धत केली गेली. इथे त्याचाच फटका उलटा पडलेला दिसतो.
जशीजशी माहिती येईल तसंतसं चित्र स्पष्ट होईल. प्रत्येक अपघात हा पुढचे त्या प्रकारचे अपघात कमी करतो. याही बाबतीत ही प्रचंड किंमत देऊन काहीतरी मौल्यवान धडा मिळावा.
एअरबस ३२०-२०० सीरीज विमानः Wikimedia कडून साभार.