डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा !

डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा !

SPOILER ALERT: लेखातील काही वाक्यांमधून कथानकाचा उलगडा होऊ शकतो. त्यामुळे सावधान !

विद्वान लोक [म्हणजे अर्थातच आम्ही नव्हे] असं म्हणतात की मूळचे रामायण आणि महाभारत हे ग्रंथ अगदी छोटे होते. पण नंतर मात्र सांगणार्‍या प्रत्येकाने त्यात आपल्या ‘हात’चे लावले. अश्या बूंद बूंदने हे ज्ञानाचे सागर तयार झाले . याचप्रकारे सर आर्थर कॉनन डॉयलच्या मूळ शेरलॉक होम्सचं बंगालीकरण- भारतीयकरण करून शरदिंदु बंदोपाध्याय यांनी व्योमकेश बक्षी आणि अजित [म्हणजे आपला देशी डॉ. वॉटसन बरं का !] यांना जन्माला घातले. त्यात नंतर अनेक सिनेमा-नाट्य-टीव्हीकारांनी आपापल्या परीने तिखट मीठ लावून वेगवेगळी व्यंजने तयार केली. त्यातलंच एक ताजं व्यंजन म्हणजे दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी’. आता हे व्यंजन तिखट, तुरट की आंबट हे ज्याने त्याने सिनेमागृहात जाऊनच ठरवायचं आहे.(ही गोष्ट परंपरागत समीक्षक सर्वात शेवटी सांगतात, पण आम्ही प्रामाणिक आहोत. असो.)

मला तरी हा सिनेमा पाहून पुणेरी पाणचट पाणीपुरी खाल्ल्यासारखं वाटलं. म्हणजे तोंडाला जरावेळ बरं वाटतं पण खालच्या ओठाखालच्या जागेवर काही ‘झनझनाहट’ ‘महसूस’ होत नाही की पाणीपुरीच्या गाडीवरून घरी पोचेस्तोवर तिची चव जिभेवर रेंगाळत नाही. मूळ व्योमकेश बक्षीच्या पात्रावर शेरलॉक होम्सचा कितिही प्रभाव असला तरी त्याचा सिनेमा करताना त्याच्यावरही हॉलीवूडचा प्रभाव देण्यात काय कारण होतं, हे काही कळलं नाही. हिंदी सिनेमाचा मल्टीप्लेक्सी प्रेक्षक खूपच प्रगल्भ, ज्ञानवंत वगैरे आहे असा लेखक-दिग्दर्शकाचा गोड गैरसमज झाला असावा असे वाटते इतकी पटकथा किचकट लिहिलेली आहे.

सर्वसामान्य भारतीय प्रेक्षक जेव्हा हॉलीवूडचा ‘इंसेप्शन’, ‘किंग्स स्पीच’ किंवा गेलाबाजार ‘बॅटमॅन’ पाहायला जातो तेव्हा काहीतरी डोक्याला खुराक देणारं, क्वालिटी एंटरटेनमेंट देणारं बघायला मिळणार या अपेक्षेने मेंदू अगदी जागच्या जागी नसला तरी खालच्या खिशात का असेना परंतु आपल्या सोबत घेऊन जातो. पण तोच प्रेक्षक हिंदी सिनेमा पाहायला जाताना मात्र (समीक्षकांच्या सल्ल्याप्रमाणे आणि हिंदी सिनेमाच्या बदलौकीकाला जागून) मेंदू घरीच ठेवून जातो. आता अश्या बेसावध प्रेक्षकाला सिनेमागृहाच्या अंधार्‍या खिंडीत गाठून तुम्ही एकदम त्याला दुसर्‍या महायुद्धाची कारणे आणि परिणाम, चिनी आणि जपानी माणूस यांच्यातील फरक सांगा, ‘मेरे पिया गये रंगून’ हे गाणे वगळून भारत-रंगून ऐतिहासिक-सांस्कृतिक-राजनयिक (हा ‘मराठी’ वृत्तपत्रातील नवा शब्द ) संबंध स्पष्ट करा, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’वाले मुंगेर अखंड भारताच्या नकाशावर दाखवा, ‘अफीम’पासून हेरॉईन कसे बनते (शेणापासून गोबर गॅस कसा निर्माण होतो या चालीवर) याची रासायनिक प्रक्रिया सांगा, टपालपेटी ते विविक्षित ‘पानेवाला’ इथपर्यंत एका पत्राचा प्रवास कसा होतो हे सोदाहरण स्पष्ट करा इ.इ. भयानक प्रश्नांची ‘चंदेरी’ प्रश्नपत्रिका दिल्यावर त्याची अवस्था ‘नेट-सेट’ग्रस्तासारखी अवघडल्यासारखी न झाली तरंच नवल.

पडद्यावर काय चाललं आहे हेच बिचार्‍या प्रेक्षकाला (माझ्यासकट) कळत नाही. परंतु हे मान्य करायलाच हवं की १९४२-४३ चा काळ उभा करण्यात सिनेमाकारांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे. पानाच्या तबकापासून ते मच्छरदाणीपर्यंत त्या काळच्या वस्तू दाखवण्यात खूप अभ्यास केला आहे,प्रचंड पैसा खर्च केला आहे. पण हे सगळं बघायला, पडद्यावरचं जुनं कलकत्ता एंजॉय करायला पटकथेने ,कॅमेराने प्रेक्षकाला थोडी फुरसत द्यायला हवी. सिनेमाची पटकथा संथ आहे पण कथा गुंतागुंतीची असल्यामुळे प्रेक्षकाची मानसिक शक्ती ती समजून घेण्यातच खर्च होते. मुळात अशा तपासकथा- रहस्यकथा पडद्यावर पाहताना प्रेक्षकाच्या बुद्धीवर प्रचंड ताण येत असतो, त्याला अनेक पात्र, घटना लक्षात ठेवाव्या लागतात. कुठल्या फ्रेममध्ये आपण काय पाहिलं, कोण काय बोललं, मध्येच झळकलेल्या वृत्तपत्रात काय हेडलाईन होती अशा अनेक गोष्टींवर नजर ठेवावी लागते. आजकालच्या आणि त्यातल्या त्यात कॅज्युअल प्रेक्षकाकडून ही हिचकॉकी अपेक्षा ठेवणं चूक आहे. शिवाय त्यामुळे सिनेमाचं इतर नेपथ्य- संगीत यांचा आनंद घेता येत नाही.

परिस्थिती अजून गंभीर बनत जाते जेव्हा मूळ कथा ही आपल्या सामान्य जीवनाशी कनेक्ट होणारी नसते किंवा लेखक-दिग्दर्शक ती तशी करण्यात अयशस्वी होतो. डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षीचं नेमकं हेच झालं आहे. उदाहरणार्थ नुकताच येऊन गेलेला ‘किंग्समेन सीक्रेट सर्विस’ हा गुप्तहेरपट घ्या. त्यातही जगावर ओढवलेलं संकट आहे. त्यातला खलनायक हा सुद्धा खतरनाक आहे, पण त्याने वापरलेलं ‘टूल’ काय आहे तर ते म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला मोबाईल फोन. सामान्य प्रेक्षकाशी पटकन कनेक्ट होणारी, त्याच्या असामान्य बुद्धीला पटणारी गोष्ट. हे आहे सर्जनशील लेखकाचं लक्षण. याउलट ‘बक्षी’ मध्ये- ज्यांच्यातला फरकही आपल्याला ओळखता येत नाही अशा कोण्या चिन्या – जपान्यांच्या गॅंगवारमध्ये ७० वर्षांपूर्वीच कलकत्ता हे ‘ड्रग कॅपिटल’ झालं काय आणि नाही झालं काय, आपल्याला काही फरक पडत असतो. तसंच इतर पात्रांचा व्यवस्थित न होणारा परिचय, त्यांचे रोजच्या ऐकण्यात नसलेली नावे विशेषत: चिनी,जपानी बंगाली नावे, त्यांच्यातले नातेसंबंध,इतर व्यावसायिक संबंध इत्यादी समजेपर्यंत गोष्ट फार पुढे निघून गेलेली असते.

या सिनेमाचा दुसरा सगळ्यात मोठा ‘वीक पॉइंट’ आहे तो म्हणजे खुद गब्बर ! खुद्द व्योमकेश बक्षी! खुद्द सुशांतसिंग राजपूत ! तो कुठल्याही अ‍ॅंगलने व्योमकेश बक्षी वाटत नाही,किंबहुना गुप्तहेर वाटत नाही. त्याच्या चेहर्‍यावर ते तेज नाही. रिफ्लेक्टर लावून ते आणता येत नाही. अशा पात्रांसाठी आवश्यक असलेला स्टायलिशनेस त्याच्यात नाहीत. एकूणच राजपूतला हे पात्र झेपलेलं नाही असं माझं मत आहे. सिनेमा बराच वेळा अंधार्‍या,अपुर्‍या प्रकाशात असल्यामुळे बॉडी लॅंग्वेज, लकबी यांचा वापर करण्यास वाव होता. पण ते राजपूत आणि बॅनर्जी दोघांनाही जमलं नाही. कदाचित आम्ही रजत कपूरचा छोट्या पडद्यावरचा बक्षी आधी पाहिल्या असल्याने आमच्या अभिनयाबद्दलच्या अपेक्षा अवास्तव असाव्यात. इतका खर्च करूनही या लो बजेट टीव्ही मालिकेच्या उंचीला बक्षी सिनेमा पोहोचू शकला नाही असं माझं स्पष्ट मत आहे.

अनेकदा खुद्द बक्षीचे संवाद समजत नाहीत. हा हॉलीवूडच्या धर्तीवर हिंदी सिनेमात प्रबळ होत चाललेल्या तोंडातल्या तोंडात बोलण्याचा, अ‍ॅक्सेंट मारण्याचा, बोलणारी व्यक्ती फ्रेममध्ये न दाखवण्याचा इ.इ. ट्रेण्ड कितीही वास्तववादी, असला तरी भारतीय वातावरणाला शोभत नाही. आम्हाला लिप मूव्हमेंट पाहिल्याशिवाय डायलॉग समजत नाही. सवयीचा परिणाम दुसरं काय ? उदा. अनुष्का शर्माच्या ‘एन-एच-१०’ (हे एक पोस्ट मॉर्टेम पेंडिंगच आहे) मध्ये सुरूवातीचे व्हॉईस ओवर प्रकारचे डायलॉग कळत नाहीत. सुरूवातीच्या पाच- दहा मिनिटात प्रेक्षक अजून हॉलमध्ये येतच असतात, पंख्याखालची जागा शोधत असतात, नुकत्याच आलेल्या आपल्या दोस्तमित्रांना मोबाईलची स्क्रीन चमकवत जागा दाखवत असतात इ.इ. वास्तव सिनेमावाले हल्ली विसरत चालले आहेत. या सगळ्या गोंधळात अनुष्का शर्माचे आणि कोण तो त्याचे अ‍ॅक्सेंटमारू इंग्लिशप्रदूषित संवाद ऐकूही येत नाहीत आणि समजतही नाहीत. म्हणून पूर्वी सिनेमात आधी टायटल्स आणि मग पटकन एक गाणं दाखवायची चांगली पद्धत होती. लोकांना सेटल व्हायला वेळ मिळत होता. जाउ द्या, विषयांतर झालं.

तर हा सिनेमा दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे वगैरे प्रचार ठीक आहे. पण प्रेक्षकाला त्याबद्द्ल किती माहिती आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. पहिल्या महायुद्धाची शताब्दी गेल्यावर्षी आली आणि गेली ,आम्हाला माहितही झालं नाही. आता यावर्षी २०१५ मध्ये दुसरं महायुद्ध संपून ७० वर्षं होतील. पण आज आमच्यासारखे तिशीतलेच काय सत्तरीतल्या सामान्य माणसाला विचारलं तरी ही जागतिक मारामारी कोणत्या दोन पार्ट्यांमध्ये झाली, आपण कुठल्या पार्टीत होतो हे सांगता येईल का एक शंकाच आहे. अशा अज्ञानाच्या खोल सागरात पोहत असणार्‍या प्रेक्षकाला ‘दुष्मन का दुष्मन दोस्त होता है’ असे घिसेपिटे डायलॉग मारून उपयोग नाही. दोस्त कोण, दुश्मन कोण हे कोणाला माहीत? सिनेमात वारंवार हवाई हल्ल्याचे भोंगे वाजतात तेव्हा कधीतरी एकदा जपानी विमानं दाखवायची,एखादा मिचमिच्या डोळ्यांचा ‘सायोनारा,सायोनारा’ करणारा पायलट दाखवायचा म्हणजे निदान माझ्यासमोर बसलेल्या कॉलेजकुमार सहप्रेक्षकाला हे भोंगे कशाचे हा प्रश्न तरी पडला नसता.

जुन्या सिनेमांचे रिमेक, जुन्या नाटकांचं पुनरूज्जीवन , जुन्या गाण्यांचं रिमिक्स, जुन्या कथा-कादंबरी पात्रांचे पुन्हा-पुन्हा सिनेमाकरण-नाटकीकरण आपण कुठवर करणार आहोत,हा सुद्धा एक वेगळा विषय ‘बक्षी’च्या निमित्ताने चर्चिला जाणे आवश्यक आहे.

युरोप-अमेरिकेत युद्धपटांची, युद्धाच्या पार्श्वभूमीवरच्या सामान्य माणसाच्या कहाण्या सांगण्यार्‍या सिनेमाची परंपरा असेलही पण असल्या विषयातली आमची ‘बेबी’ आता कुठे थोडी थोडी रांगायला लागली आहे नाहीतर या विषयातील आमची ‘बॉर्डर’ रामानंद सागर कृत ‘आंखे’शी चालू होऊन ‘डॉ. डॅंग़’ च्या चरणापर्यंतच. सन्माननीय अपवाद- मद्रास कॅफे.

बक्षीचे ट्रेलर जेव्हा पहिल्यांदा मी फेसबुकवर पाहिलं तेव्हा सुद्धा मला ते ट्रेलर पाहून या सिनेमाबद्द्ल फारशी अपेक्षा नव्हती आणि आता सिनेमाच्या शेवटी इशारा केलेल्या त्याच्या सीक्वेलकडूनही.

ता:क: सिनेमातील खलनायकाबद्दल मी मुद्दमच लिहिणं टाळलंय. ती पडद्यावरच बघण्याची चीज आहे, किंबहुना सिनेमात सगळ्यात प्रेक्षणीय तीच गोष्ट आहे !

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पिक्चर (परीक्षेच्या पेपरसारखा) खूपच कठीण होता, तो सोप्पा करा .. हे बेश्ट वाटलं! Biggrin

दुसर्‍या महायुद्धाची माहीती नसणं, व्हॉईसओव्हर, बंगाली-चिनी किचकट नावं आणि ७०वर्षांपूर्वीच्या बंगालचं आपल्याला काय करायचंय ..
ही समीक्षेतील वाक्यं उपहासाने लिहिली आहेत की कळकळीने?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समीक्षण फार्फार आवडले. लेखकाने खर्‍याखुर्‍या आयडीने लिहिले असते तरी चालले असते असे वाटले. एकूण जरा अपेक्षा ठेवाव्या असे काही आले की त्यावर असे प्रोबायोटिक विरजण पडते यामुळे, शशी भागवतांच्या भाषेत लिहायचे तर 'क्लैब्य' आले. पण वाघमारेसाहेब, एन.एच.१० वर लिहाच. हाय काय आन नाय काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मुळात अशा तपासकथा- रहस्यकथा पडद्यावर पाहताना प्रेक्षकाच्या बुद्धीवर प्रचंड ताण येत असतो, त्याला अनेक पात्र, घटना लक्षात ठेवाव्या लागतात. कुठल्या फ्रेममध्ये आपण काय पाहिलं, कोण काय बोललं, मध्येच झळकलेल्या वृत्तपत्रात काय हेडलाईन होती अशा अनेक गोष्टींवर नजर ठेवावी लागते. आजकालच्या आणि त्यातल्या त्यात कॅज्युअल प्रेक्षकाकडून ही हिचकॉकी अपेक्षा ठेवणं चूक आहे.

या आणि अशा गोष्टींमुळेच मला हा चित्रपट आवडला

प्रेक्षकांना डोके आहे, ते विचार करू शकतात यावर विश्वास ठेऊन त्या विचारांना पुर्ण २ तास खाद्य पुरवणारा हा चित्रपट आहे. मला उलट प्रेक्षकांना निर्बुद्ध समजणार्‍या मूर्ख दिग्दर्शकांचा (नी 'तसल्या' चित्रपटांना डोक्यावर घेणार्‍यांचाही) वीट आलेला आहे.

हे मान्य करायलाच हवं की १९४२-४३ चा काळ उभा करण्यात सिनेमाकारांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे.

माझ्या मते यावर अजून काम करायला वाव होता

हिंदी सिनेमाचा मल्टीप्लेक्सी प्रेक्षक खूपच प्रगल्भ, ज्ञानवंत वगैरे आहे असा लेखक-दिग्दर्शकाचा गोड गैरसमज झाला असावा असे वाटते इतकी पटकथा किचकट लिहिलेली आहे.

मला पटकथा अतिशय आवडली. मला हा आक्षेपच हास्यास्पद वाटतोय. असो.

जाऊ दे तुमचे नी माझे १८० अंशात विरुद्ध मत दिसतेय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुंदर आणि वस्तुनिष्ठ परीक्षण. उगाच प्रमोशन आणि मिडीयातल्या घडवून आणलेल्या कौतुकाला न भुलुन खरे खुरे परीक्षण लिहील्याबद्दल धन्यवाद. वाक्यावाक्याशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुशांत राजपूतबद्दल मलाही शंका आहे राव जरा. आणि ट्रेलर पाहून ती आणखीच बळावली आहे.

बाकी सिनेमा पाहने के बाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सर्वप्रथम कथा किचकट वगैरे अजिबात नाही. (रहस्यकथा वाचणार्‍यांना तर अजिबात नाही) अपेक्षित रोचकता गाठली गेली नाही इतकेच. चित्रपट कितीही संत (स्लो) चित्रीत केला तरीही प्रेक्षकाला त्यात गुंगवुन ठेवायचे एक तंत्र असते ते फसले की विस्कळीतपणा येतो ज्यातुन चित्रपट पुर्णपणे हुकतो. तेच झाले आहे. त्यात मधुनच पार्श्वसंगीतात रॅप व रॉक चा अंतर्भाव करुन चित्रपट नक्कि कोणत्या काळातला आहे याचा प्रेक्षकाच्या मनात गोंधळ निर्माण व्हावा याची व्यवस्थीत दक्षता घेतली आहे. ( मला वाटत नाही १९४७ पुर्वी भारतीय लोक्स रॅप्/ऱो़क म्युसीक वापरत होते) .

सेट छान आहेत. अभिनय ठीकठाक आहे. आणी खलनायक प्रसंगात बाजी मारुन जातो. बाकी पारंपारीक बंगाली सौदर्य ते काय वर्णावे ? आहाहा...! पण तेथेही निराशा(समजुन घ्या जाणकारांनो). अंगुरी देवी चे ड्बींग विद्या बालनने केले होते की काय अशीही शंका आली होती. (उसासे टाकत बोलायची लकब व अवाजातील साधर्म्य).

अजुन एक गोष्ट शरलॉक घ्या अथवा आता ब्योमकेश बक्षी मोठ्या पडद्द्यावर यांना आणताना "युध्द" हवेच काय ? एक अतिशय किचकट गुन्हा उकलणे ही कथा यांच्या चित्रपटाला का पुरेशी नाही ? इतर अनेक चांगले चित्रपट अशा थिमवर बनलेले असताना उगा युध्द हवेच का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

सिनेमा पाहिला आहे. तुमच्या परीक्षणाशी विशेष सहमत नाही पण सुशांत सिंग्/सिंह राजपूत बद्दल जे काही लिहीलं आहे त्याच्याशी संपूर्ण सहमत आहे. त्यात सिक्वल येणार ह्याची जाता-जाता जी झलक दिली आहे त्याचा एकीकडे आनंद झाला तर दुसरीकडे पुन्हा सुशांत हा विचार करून चिडचिडही झाली. तो अगदीच नको वाटतो सिनेमात आणि दुर्देवाने तोच हिरो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच चित्रपट पाहिला आणि मगच लेख वाचला. लेखातले बहुतेक आक्षेप पटले नाहीत.
शेरलॉक होम्स किंवा रजत कपूर पाहायच्या अपेक्षेने जायचे असेल तर जाऊ नये, त्यापेक्षा शेरलॉक होम्स वा रजत कपूरच पाहावेत. मला सुशांत राजपूतचा बक्शी प्रामाणिक वाटला (विशेषतः रॉबर्ट डाऊनी ज्यु. सारखा स्टाईलभाईपणा टाळला आहे ते आवडले).
पार्श्वसंगीत भन्नाट आहे. ४२ सालची गोष्ट आहे म्हणून पार्श्वसंगीत पण तेव्हाचेच हवे असे मला वाटले नाही.
अर्थात चित्रपट पर्फेक्ट वाटला नाही म्हणा.
प्रेक्षकांना समजावे म्हणून प्रत्येक क्लू नीट कव्हर करण्याच्या नादात वेग मंदावला आहे. रहस्य गडद होण्याचा व उलगडण्याचा वेग अधिक हवा होता. मुख्य पात्रांच्या इंटरॲक्शनपेक्षा रहस्यभेदावर लक्ष केंद्रीत असल्याने बक्षीचं वैफल्य किंवा सत्यवतीची घालमेल वगैरे परिणामकारक झालेले नाही त्यामुळे मग शेवटातला काही भाग बळंच टाकल्यासारखा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपला प्रतिसाद अतिशय पटतो... जर चित्रपटाचे नावात व्योमकेश बक्षी अक्षरे नसती तर...

स्टाइलभाइपणा टाळला वगैरे आपल्या मनाचे खेळ असावेत... म्हणजे असे की जुनीर डावनीला मॉक केले असावे हा समज आपल्या मनाने आपल्याच मनात उभा केला व तसं ते चित्रपटात नाही म्हणून आपल्याच मनाला बरे वाटते आहे.. खरेतर ब्योमकेश स्टाइलभाइ दाखवला असता तर ते सुशांतला सुट झाले असतेच व चित्रपटही अधिक रोचक झाला असता. एकुणच चित्रपटाला वेगळी ट्रीटमेंट मिळाले असती जस्टीफायही झाली असती अन खिचडी टाळता आली असती. बाकी पार्श्वसंगीत पण तेव्हाचेच हवे असे आपणास वाटले नाही म्हणता योयो हनीसिंग्चे रॅपही इथे आपण खपवुन घ्याल हो..पण... जाउदे. माझे आपल्या मताला वैयक्तीक आक्षेप असल्याने आपणाला आपला आनंद घ्यायला कोणी मना करु शकत नाही इतकेच नमुदवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पार्श्वसंगीत अती भारी आहे. खूप आवडलं. स्नेहा खानवलकरनी (गँग्स ऑफ वासेपुरवाली!) धमाल उडवली आहे. पण बाकी सगळ्या गोष्टींमध्ये मूळ प्लॉट लैच वीक राहिला आहे. थ्रिल असं काही जाणवलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चित्रपट पाहिला नाही पण समिक्षा लिहीण्याची पद्धत आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेक्षकांचे प्रश्न आणि दिबाकरची उत्तरं.
एक इंट्रेष्टिंग भाग म्हणजे, प्रेक्षकांकडून ह्या लेखाच्या बरोबर उलट अशी तक्रार आहे- की सगळं काही फार सोपं करून सांगितलंय!
तर उत्तरादाखल ब्यानर्जी म्हणतात की मला ब्यालन्स साधायचाय.
शिवाय स्वतःच्या चुका कबूल करणारे दिग्दर्शक फार कमीच. मस्त वाटलं हे सेशन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0