प्रयत्नें बांधिली मोळी!

प्रयत्नें बांधिली मोळी!

- लीलावती भागवत

'भाराभर गवत' हे भा. रा. भागवतांच्या निवडक लेखनाचं संकलन. त्याला प्रस्तावना लिहिताना लीलावती भागवत यांनी भारांच्या लेखनाचा आणि लेखनामागच्या सदाबहार वृत्तीचा नेमका आणि खुसखुशीत आढावा घेतला आहे. 'ऐसी अक्षरे'च्या या प्रकल्पाच्या निमित्ताने तो पुनर्प्रकाशित करतो आहोत.

***

श्री. भा. रा. भागवतांनी या संग्रहाला सुचवलेलं 'भाराभर गवत' हे शीर्षकच त्यांच्या विनोदी लेखनप्रवृत्तीची चुणूक दाखवतं. शाब्दिक कोट्यांची त्यांना जबरदस्त आवड आहे. त्यांच्या लेखांना, कथांना दिलेली शीर्षकं, त्यांच्या पात्रांची नावं, या सर्वांमधून त्यांची ही आवड प्रकट होते. ते नेहमी म्हणतात, "मला मोरोपंत आवडतात ते त्यांच्या शब्दांच्या कोलांट्यांमुळे; भले टीकाकार त्यांना कमी लेखोत, पण त्यामुळे त्यांच्या शब्दांच्या खेळाची लज्जत कमी होते थोडीच!"

स्वतःच्या नावावरसुद्धा ते विनोद करतात. मुलांना म्हणतात, "भागवत या नावाचा अर्थ ठाऊक आहे? भागवत म्हणजे भाड्याने गवत वाहणारं तट्टू!" - तर अशी ही वृत्ती त्यांच्या मनाच्या निकोप आणि निखळपणामुळेच त्यांना लाभली आहे.

एके काळी ते विनोदी कथालेखक म्हणूनच मराठी वाचकवर्गाला माहीत होते. मराठीतील उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहात श्री. राम कोलारकरांनी त्यांच्या जवळपास वीस कथा अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यांचा विनोद वाचकांना आवडतो, त्याचं कारण तो कुठल्याही व्यक्तीवर, व्यंगावर कटू प्रहार करत नाही; तर एखाद्या प्रवृत्तीला, पद्धतीला, समाजातल्या विक्षिप्त रीतीभातींना कोपरखळ्या मारून इतरांना खुसखुशीत हास्याचा आस्वाद घेऊ देतो.

तरीही त्यांच्यावर विनोदी लेखक म्हणून शिक्का बसलेला नाही; कारण त्यांनी लेखनाचा एकच एक प्रांत कधीच हाताळला नाही. त्यांनी आयुष्यभर लेखन केलं - भरपूर लेखन केलं, विविध प्रकारचं लेखन केलं. म्हणजेच भाराभर लिहिलं. पण ते लिखाण 'एक ना धड...' अशा स्वरूपाचं मात्र झालं नाही. त्यांनी हाताळलेला प्रत्येक लेखनप्रकार वाचकप्रिय ठरला. एके काळी ते विनोदी कथा, विडंबनकथा, विनोदी लेख इतक्या सहजपणे आणि निखळपणे लिहीत की तेच त्यांनी चालू ठेवलं असतं तर विनोदी लेखक म्हणून आजही ते ख्यातनाम ठरले असते. पण त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात बालसाहित्यात लहान मुलांच्याच उत्साहाने उडी घेतली आणि मराठी बालवाङ्मयाच्या आणि बालवाचकांच्या दृष्टीने ती आभाळउडी ठरली.

बिपिन बुकलवार - त्यांनीच प्रथम इंग्रजीत बुकलव्हर म्हणून जन्माला घातला आणि 'बुकलवार' हे मराठी आडनाव त्याने धारण केले. हा त्यांचा तरुण नायक म्हणजे फूटपाथवर जुन्या पुस्तकांचा दुर्मीळ खजिना शोधत हिंडणाऱ्या स्वतःचीच त्यांनी रेखाटलेली साहित्यिक प्रतिकृती. हा स्वतः छोट्या मुलांना साहसकथा सांगतो आणि त्यांच्याकडून साहस करवूनही घेतो. नंदू नवाथे हा त्यांचा थापाड्या, पण चांगल्या मनाचा, एक मानसपुत्र; विनोदी ढंगाने वावरणारा. फास्टर फेणे हा त्यांचा मानसपुत्र तर गेली ३० वर्षं बालवाचकांच्या आग्रहाखातर वय वाढू न देता, आहे तेवढाच लहान राहिलेला आहे आणि मुलांचा जानी दोस्त बनला आहे. या त्यांच्या मानसपुत्रांच्या साहसकथा वाचताना त्यांचे वाचकपुत्र खुर्चीवर, पलंगावर, हातात पुस्तक असेल तिथे उड्या मारू लागले. विनोद आणि साहस या दोन्हींनी भरलेल्या आणि भारलेल्या त्यांच्या कथाविश्वात त्यांच्याबरोबर त्यांचे वाचकही भरकटू लागले, अंतराळात उडू लागले, समुद्राच्या पोटात डुबक्या मारू लागले. भा. रां. नी दिलेल्या पुस्तकातून खजिनेच्या खजिने लुटू लागले.

लेखक होण्याचं वेड मला वाटतं भागवत मंडळींच्या रक्तातच असावं. आमच्या मोठ्या मुलाने, रवीने वयाच्या बाराव्या वर्षी एक रहस्यकथा लिहिली आणि घरातल्या हलकडीला टांगून ठेवली. त्या कथेत दर पाच-सहा पानांगणिक एक, या हिशोबाने आठ-दहा खून होते. पण रहस्याचा शेवट सुचेना म्हणून कथेचं बाड टांगलेलं पाहिल्यावर 'रात्री तिथून हिंडताना आपल्या अंगावर रक्त तर सांडणार नाही?' अशी एक मजेशीर कल्पना माझ्या डोक्यात आली. ती मी रवीला सांगितली आणि तो हलकडीइतकाच उंच उडाला. त्याच्या रहस्यकथेला दाद दिली होती ना मी!

आमच्या धाकट्या मुलाने, चंदरनेही जवळजवळ याच वयात 'प्रकाशकिरणांचे रहस्य' म्हणून एक वैज्ञानिक कादंबरी लिहिली तीही रहस्यमयच. ती 'गंमतजंमत' या मुलांच्या मासिकात छापूनही आली.

आता हा रहस्यकथेचा किडा पोरांच्या डोक्यात वळवळायला कारण त्यांचे पिताजी भा. रा. भागवत आहेत, हे उघड गुपित आहे. भा. रां. नीही याच शाळकरी वयात एक रहस्यकथा लिहिली होती. मुलांनी पुढे हा नाद सोडला. पण वडिलांनी लेखनाचा धबधबा कोसळतच ठेवला. त्या धबधब्यातली ती पहिली धार म्हणजे त्यांनी लिहिलेलं 'निळे पाकीट' हे पुस्तक. ते त्याच वेळी छापूनही आलं. त्या पुस्तकाची जन्मकथा 'पहिलं वाहिलं' म्हणून तेच स्वतः या संग्रहाच्या सुरुवातीला सांगताहेत.

साहस, रहस्य आणि विनोद या गोष्टींची त्यांना लहानपणापासूनच आवड. त्यांनी बऱ्याच इंग्रजी रहस्यकथांची भाषांतरं केली. स्वतंत्र कथाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेल्या अशा कथांना त्यांनी वाचलेल्या रहस्यकथांमधून स्फूर्ती मिळालेली आहे. त्यांचे 'धाराधरशास्त्री' म्हणजे चेस्टरटनच्या फादर ब्राउनचा अस्सल मराठी अवतार - बाराबंदीतला.

त्यांची रहस्यकथा नंतर विनोदी अंगाने, म्हणजे रहस्यकथेच्या विडंबनाच्या स्वरूपातही, पुढे आली. रहस्यकथा लेखकांचे गुप्तहेर रहस्य सोडवतात, पण प्रत्येकाची रीत निराळी असते. अॅगाथा ख्रिस्तीचा हरक्यूल पॉयरॉ किंवा मिस मार्पल घरात बसून, थोडं हिंडून, तर्कबुद्धीचा जास्त आधार घेऊन रहस्याची उकल करतात; तर कॉनन डॉइलच्या शरलॉक होम्सचा फार मोठा भर बारीकसारीक पुरावा गोळा करण्यावर असतो. एखादा केस, एखादं तुटकं बटण, चोर किंवा खुनी गेला असेल त्या रस्त्यावरची एखादी मातीची चिमूट, सिगरेटची राख आणि हा पुरावा गोळा करण्यासाठी तो बदलत असलेले असंख्य वेष - या सर्वांचं विडंबन म्हणजे 'फूल आणि मूल' ही रहस्यकथा. त्याच्या वेषपरिवर्तनाची शेवटची भा. रां. ची कल्पना तर...! शरलॉक होम्सच्या रहस्यकथांचे बरेच अनुवाद - म्हणजे सरळसरळ अनुवाद हल्ली-हल्ली त्यांनी केले आहेत; पण त्याच्या रहस्यकथांचं विडंबन त्यांनी खूपच पूर्वी केलेलं होतं.

वृत्तपत्र व्यवसायतर प्रथमपासूनच जसा त्यांच्या अंगात भिनलेला. याची सुरुवात 'सकाळ'पासून झाली. त्यातली साहसं अनुभवायला त्यांना आवडत. काबालींच्या विमानातून त्यांनी प्रथम प्रवास केला तो वृत्तपत्रकार म्हणून 'प्रकाश' साप्ताहिकासाठी. पण विमानात चहा न मिळाल्याने.... अर्थात ही जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट! ही विमानसर्व्हिस म्हणजे औरच होती. उघड्या विमानातून पोस्टाच्या थैल्या नेल्या जात. एखाद्या लहान मुलाने आपल्या छोट्या गाडीतून मित्राला बसवून न्यावं तसे भारा त्या विमानात वैमानिकाबरोबर बसलेले. कारण त्या छोट्या विमानात फक्त दोघेच होते. वैमानिक आणि भागवत. आत्ताच्या विमानाच्या स्वरूपाचा तिथे मागमूसही नव्हता. पण सांगायची गंमत अशी की त्या प्रवासातल्या त्रासाने त्यांची जी फजिती उडाली, ती हसत हसत सर्वांना त्यांनीच सांगितली. त्यांना अशा काही अडचणी, फजिती उडवणारे प्रसंग आले की सगळ्यात गंमत वाटते. सहलीला गेलं आणि ती सुरळीत झाली की त्यांना भावत नाही. पण दहाबारा मंडळींबरोबर गाडीत बऱ्याच मुलांना कोंबून सहलीला गेलं आणि वाटेत घरच्या फोर्ड - फियाट गाड्यांची टायरं पंक्चर होऊन फट्ट झालं की यांची तबियत खूष. मग गोष्ट तयार 'फोर्ड - फियाट - फट्ट!'

वृत्तपत्रीय माणसांना, मला वाटतं, अशा गोष्टींची ओढच असते. हाच त्यांचा स्वभावविशेष 'प्रकाश' साप्ताहिकात काम करताना, त्यांनी लिहिलेल्या 'चक्करसंघाची साप्ताहिक सभा - लेखक घनचक्कर' या स्फुटलेखातून उमटलेला दिसतो. काही प्रत्यक्ष काम न करता प्रत्येक गोष्टीवर टीका-टिप्पणी करणारी बाताराम पंथाची मंडळी, या चक्कर संघाची सभासद. त्यांच्या त्या बैठकीमधून काही निष्पन्न होण्याची अपेक्षा नसल्याने बिघडत काहीच नाही म्हणा! समाजातल्या एका विशिष्ट प्रवृत्तीवर या स्फुटलेखमालेत चांगलेच टोले लगावलेले आहेत.

अडचणीतून, साहसातून विनोदाची झलक भागवतांना अलगद सापडते. दैनंदिन जीवनातल्या अडचणीतून मजा घेणं त्यांना सहज जमतं. ते मुंबईत राहत असताना, लग्नाबिग्नाच्या फंदात पडलेले नसतानाही एखाद्या 'संत्रस्त' (हे त्यांनी त्या वेळी घेतलेलं नाव) विवाहित गृहस्थाप्रमाणे मुंबईत येणाऱ्या कौटुंबिक अनुभवांवरून लिहिलेलं त्यांचं पुस्तक, नावाने जरी वैतागवनातील वाफारे सोडत असलं तरी वाचणाऱ्याला मात्र त्यातल्या विनोदाच्या झुळुकीने सुखावतं.

सध्याच्या भर वेगाने धावणाऱ्या वाहनांचीच ज्यांना ओळख आहे त्यांना ट्रॅम-बस-लोकल यांचं त्या काळचं स्वरूप वाचून, आपण कुठल्या जुन्या युगात वावरतो आहोत असं वाटेल, तर पाश्चात्त्य रीतीभातींचा लेप वागणुकीवर चढवणारे त्या काळातले सुशिक्षित लोक आणि त्यांचं वागणं म्हणजे उसन्या अतिरेकाने माणूस स्वतःचंच हसं करून घेण्याच्या भानगडीत अक्षरशः पडलेला पाहून हसू येईल, तर नवल नाही. त्यातल्या मुंग्या, उंदीर, झुरळांशी युद्ध किंवा उरूस, जत्रा अशा प्रसंगी मुलाबाळांमुळे उडालेली तारांबळ काहींनी प्रत्यक्ष अनुभवलेली असण्याची शक्यता आहे. पण भा. रां.नी मात्र कल्पनेत ते इतकं हुबेहूब वठवलं आहे की त्याविषयी वि. स. खांडेकर म्हणतात -

'श्री. भागवत यांच्या वैतागवनातील वाफाऱ्यांत सापडलेला वाचक हसतमुखाने बाहेर येईल यात शंका नाही. शाब्दिक कोट्यांपासून ते उपरोधापर्यंतचे विनोदाचे सर्व प्रकार श्री. भागवतांना अवगत असून मुंबईतील सामान्य मनुष्याच्या कोंडमाऱ्याचे वर्णन करताना आपल्या विनोदशक्तीचा त्यांनी कौशल्याने उपयोग केला आहे. स्त्रीदाक्षिण्य, वक्ते, श्रोते व व्याख्याने इत्यादी विषय निवडण्यात लेखकाची मार्मिकता दिसून येते. कॅ. लिमये व चिंतामणराव जोशी यांच्या लेखनाची परंपरा श्री. भागवत चांगल्या रीतीने चालवू शकतील.'

मला वाटतं, काही माणसं कल्पनेतल्या गोष्टींचा धसका घेतात तसा त्यांनी तो घेतला असावा. पण नंतर तो धसका विसरून प्रत्यक्ष गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर, मला या लेखनातल्या अनुभवांची फारशी प्रचीती आलेली दिसली नाही. कारण नंतर मुंबईतच संसारातली ही या प्राण्यांशी झालेली युद्धं नेहमी गमतीने घेतली गेली - त्यांच्या विनोदशोधक स्वभावानुसार!

ही अफाट कल्पनाशक्तीच त्यांना विनोदी प्रेमकथा लिहिण्यात आणि प्रेमकथांची विडंबनं करण्यात उपयोगी पडली असावी. स्वतः प्रेमात पडण्याच्या वयात त्यांनी दुसऱ्यांच्या प्रेमकथांची भंबेरी उडालेली कशी लिहिली, हे मला आयुष्यात कधीच न उलगडलेलं कोडं आहे. कारण प्रेमभंगाच्या विडंबनकथांना स्वानुभूतीचा आधार म्हटलं म्हणजे... शिवाय स्वतःच्या फजितीवर विनोद करण्याचा यांचा स्वभाव म्हणजे तर माझ्या दृष्टीने... मग मी एका समीक्षकाने लिहिलेलं वाक्य मनात घोळवते. हे समीक्षक म्हणतात - 'गंभीर साहित्यनिर्मिती करणारा लेखक प्रामुख्याने स्वानुभूतीचा आधार घेतो, पण विनोदी लेखक पुष्कळदा इतरांच्या आयुष्यातले किस्से पकडतो.'

असो. तर भा. रां.च्या प्रेमकथांची प्रत्येक विडंबनकथा प्रेमभंग झालेल्या प्रेमवीरांना आपली वाटावी इतकी दिलफोडक - हा लेखकाचा शब्द - झालेली आहे. वि. सी. गुर्जरांच्या प्रेमकथा यांना फार आवडत. पण त्यातल्या प्रेमवीरांच्या मिठ्ठास वर्णनाचं विडंबन त्यांनी इतक्या मिठ्ठासपणे केलेलं आहे की गुर्जरांसारख्या रोमॅंटिक-करुण-गंभीर लिहिणाऱ्या लेखकानेदेखील भा. रां.ची पाठ थोपटावी.

यांचं हे विडंबनवेड सर्वच कथाक्षेत्रात धुमाकूळ घालतं. प्रेमकथांप्रमाणेच स्वतः लिहिलेल्या वीरकथांचंही ते विडंबन करतात. त्यांची 'सूंबाल्या भागूबायकोव्हा' ही कथा याची साक्ष देते. अनुवादित असूनही 'सोव्हिएटच्या समरकथा' अत्यंत हृद्य आणि चटका लावणाऱ्या आहेत. पण या कथा लिहिल्यानंतरही 'सूंबाल्या...'सारखी विडंबनकथा लिहिल्याशिवाय त्यांना राहवलं नाही.

वुडहाऊस हा त्यांचा आवडता लेखक. त्याचा नायक मि. मलिनर जसा पडेल प्रेमवीरांच्या कथा सांगतो तसाच भा. रां.चा छगनही सांगतो. लेखनपद्धती तीच, पण नायक आणि प्रसंग संपूर्ण स्वतंत्र. छगन या फजितीच्या गोष्टी इतरांच्या सांगतो. तशाच स्वतःच्याही. त्याही अफाट. 'छगनचं सुपरसॉनिक प्रेम' ही अशीच एक कथा. या छगनच्या लक्षात आलं की खादी, सुती कापड यांना मागे ढकलत नवीन धागे आले आहेत नायलॉनचे. आणि याचे धागेदोरे छगनने थेट दत्ता दडेकरच्या 'मंगळसूत्रा'ला नेऊन बांधले आणि एका वात्रट कथेचा जन्म झाला.

खरं तर त्यांना विज्ञानाची आवड आहे; पण वृत्तपत्रीय पिंड त्यांना प्रासंगिक विनोदाच्या कट्ट्यावर नेऊन उभा करतो. उडत्या तबकड्यांचं युग होतं, त्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरत असत, तेव्हा त्यांनी 'उडती छबकडी' लोकांपुढे ठेवली. 'धिक्-कालयान' ही याच शास्त्रीय विडंबन-सूत्रातली एक गोष्ट.

दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहू लागले त्याबरोबर 'माझा विक्रम'मध्ये 'ह-ह-हु' आलं. हे थंडीने कुडकु़डणं नव्हे, त्या शीर्षकाचा अर्थ - 'हवाई हल्ला हुश्शारी' - अर्थात या प्रासंगिक विनोदाचा खरा आस्वाद त्या वातावरणातून गेलेल्या वाचकांना जास्त आपलेपणाने घेता येतो. विडंबनसाहित्य प्रकाराचा तो एक विशेषच म्हणावा लागेल. अत्रेच ज्यांनी बघितले नाही ते अत्र्यांची नक्कल पाहताना संपूर्ण रसास्वाद घेऊ शकत नाहीत; पण विनोदविषय सार्वत्रिक आणि सार्वकालिक असेल तर ही अडचण भासत नाही. भा. रां.च्या काही विडंबनकथा आणि विनोदी कथा अशाही आहेत.

शास्त्रीय कथांची त्यांना विलक्षणच आवड आहे. पण शास्त्रीय माहिती आत्मसात करण्यावरही त्यांचा कटाक्ष असतो. या बाबतीत ते आपल्या मुलाशीही वाद घालतील. या वादाचा एक लेख यात वाचायला मिळेल. अशा वादावादीतून ते बरं काही मनाशी टिपून घेतात. ही त्यांची टिपणवृत्ती त्यांना ज्यूल व्हर्नच्या डझनभर कादंबऱ्यांच्या अनुवादाकडे खेचून घेऊन गेली. रूपांतरित 'चंद्रावर स्वारी'मध्ये तर त्यांनी जुनी पंचांगं शोधून आकाशातील ग्रहताऱ्यांचं भारतीय गणित मांडलं. कारण कादंबरी असली तरी शास्त्रीय माहिती बिनचूक असलीच पाहिजे, असा त्यांचा रास्त आग्रह असतो.

तरीही त्यांची विनोदशोधक वृत्ती, विज्ञान आणि साहित्य यांच्या मिश्रणातून विनोदी शास्त्रीय कथा लिहिण्यावाचून त्यांना चैन पडू देईना. अशा या मिश्रणातून तयार झालेल्या त्यांच्या शास्त्रीय विडंबनकथा, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या विषयातील सार्वत्रिकपणामुळेच आजच्या वाचकालाही तितक्याच भावतात. त्याचप्रमाणे त्यांनी विनोदी ढंगाने लोकांसमोर पुन्हा मांडलेल्या, वाढवून, खुलवून लिहिलेल्या 'बाईलचोर' या पुस्तकातल्यासारख्या कित्येक लोककथा आवडीने वाचल्या जातात.

विनोदी वाङ्मयात फार्सचं मोठं स्थान आहे. एखादी अत्यंत गंभीर गोष्टही मर्यादा सोडून अतिशयोक्त झाली की तटस्थपणाने पाहणाऱ्याला ती फार्सिकल वाटू लागते. फ्रेंच लेखक मोलिएर याने तत्कालीन फ्रेंच समाजजीवनाची खिल्ली उडवणारे फार्स लिहिले. गंभीर नाट्यलेखकांइतकाच तोही त्या काळी फार्स लेखनामुळे गाजला. आपल्याकडे अत्र्यांनी त्याच्या एका फार्सवर आधारून 'कवडीचुंबक' लिहिलं. हरीभाऊ आपट्यांनीदेखील 'मारून मुटकून वैद्यबुवा' आणि इतर दोन अशी तीन प्रहसनं लिहिली.

भागवत विनोदी श्रुतिका आकाशवाणीसाठी लिहीतच असत. त्यांची 'मधुचंद्र मनमाडला' ही श्रुतिका याच अतिशयोक्त फार्सिकल ढंगाची - त्या वेळी खूप गाजली होती. भागवतांची आणि मोलिएरची पत्रिका त्यामुळेच जुळली आणि त्यांनी मोलिएरच्या नाटकाचं रूपांतर केलं- 'साट्यालोट्याचा फार्स!', आणि हे नाटक वाचताना आपल्याकडच्या एखाद्या मेलोड्रॅमॅटिक नाटकाचं विडंबन वाचतो आहोत, असं वाटायला लागतं.

या खट्याळ आणि प्रौढ विनोदाच्या खळखळाटाप्रमाणे बालविश्वातल्या नाजूक विनोदाची झुळझुळही त्यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेली आहे. 'जाईची नवलकहाणी' आणि 'आरसेनगरीत जाई' यांतले प्रसंग आणि काव्य यांतल्या विनोदाची प्रचीती शब्दाशब्दाला येते. मग ही जाई लुईस कॅरोलची अॅलिस न राहता -

"उंद्रोबा उंद्रोबा
भागलास का?,
चहाच्या किटलीत
लपलास का..."

म्हणणारी खरीखुरी भारतीय जाई वाटायला लागते. मराठी मुलांना ती हसत खेळत आपल्याबरोबर घेऊन जाते. 'जाई' आल्यानंतर 'पाचूनगरीत जाई' अवतरल्याशिवाय कशी राहील? या कादंबऱ्यांप्रमाणेच 'मायापूरचे रंगेल राक्षस' या कादंबरीने त्यांच्या सर्व शाब्दिक विनोदप्रकारांना सामावून घेतलेलं दिसतं.

त्यांचं बालसाहित्य विनोदी नाही. पण फा.फे. उर्फ फास्टर फेणेचा मिस्किलपणा, नंदू नवाथेचा थापेबाजपणा आणि बिपिन बुकलवारच्या साहसात त्याला अडचणीत टाकणारे विलक्षण चमत्कारिक प्रसंग या सगळ्याला खुसखुशीत विनोदाची खमंग फोडणी आहे. फास्टर फेणे त्यांचा लाडका मानसपुत्र. पण स्वतःच्या मुलांशीदेखील बोलायचा त्यांना कधी कधी संकोच वाटतो. मग या मानसपुत्राची ते पत्रकार बनून मुलाखत घ्यायला जातात. अर्थात ती बारगळते ते सोडा! त्याचप्रमाणे 'अँटोनिओची मेजवानी', 'चिन्याचा जमालगोटा', 'झनक झनक झुरळ' या लोककथांमधला विक्षिप्त विनोद त्यांनी 'मायापूरचे रंगेल राक्षस' मधल्या 'कोबीच्या गड्ड्या'प्रमाणे फुलवला आहे.

स्वतःच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग, आपल्याला भेटलेली माणसं, त्यांचे आलेले अनुभव फारसे गंभीरपणे मनावर न घेता त्यातलीही गंमत अनुभवायला लागणारं मिस्किल मन भा.रां.जवळ आहे. त्यामुळेच असे काही व्यक्तिचित्रणात्मक लेख, किंवा प्रसंगकथा म्हणावं वाटल्यास, त्यांनी लिहिल्या. त्या त्या व्यक्ती वाचकांच्या समोर उभ्या केल्या आणि 'जीवननाट्याची ऐशी तैशी' रंगवली. शाब्दिक कोट्या आणि विनोद करण्याचा, चुटके रचण्याचा आणि जमवण्याचा अजूनही त्यांना छंद आहे.

वास्तविक तुरुंगात इतर माणसं तुरुंगातल्या जीवनाच्या आठवणी लिहितात. घनगंभीर, वैचारिक, तात्त्विक असं लिहितात. पण १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात विसापूरच्या तुरुंगात जवळजवळ दोन वर्षं स्थानबद्ध असताना भा.रां.नी एक कादंबरी लिहायला घेतली. त्यांच्या वृत्तपत्रीय जीवनाच्या अनुभवांवर. शीर्षक - 'मुद्रणपिशाच्च!' खरं तर मुद्रणपिशाच्चाची करामत दाखवणारे 'उ.सं.डु.' किंवा 'मुद्राराक्षस' यांसारखे शब्द आपल्याला परिचित असतील. इंग्रजीत या मुद्रणातील चुकांना 'Printer's Devil' म्हणतात. या नावावरून कादंबरीला यांनी हे शीर्षक दिलं. पण मुद्रणदोषांना पिशाच्च न म्हणता वृत्तपत्रसृष्टीतली माणसं म्हणजेच विविध पात्रं, त्यांनी मुद्रणपिशाच्च म्हणून रंगवली.

या कादंबरीची शेवटची एकदोन प्रकरणं लिहून होण्यापूर्वीच सरकारने त्यांना तुरुंगातून सोडल्यामुळे त्यांचा नाइलाजच झाला. शेवटची प्रकरणं लिहिलीच गेली नाहीत - हा यांचा लेखनप्रक्रियेतला नेहमीचा खंड - एकदा खंड पडल्यावर पुन्हा न लिहिणं, यामुळे कादंबरीच्या संपूर्ण मेजवानीचा आस्वाद न घेता लिहिलेल्या प्रकरणातला एखादा 'सा. मो. सा.' खाऊनच पोट भरणं भाग पडेल.

खंड पडल्यावर त्याच्यापुढे पुन्हा न लिहिण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते मुद्रणपिशाच्च वाचकांच्या मानगुटीस बसलं नाही; पण बसलं असतं तर त्याने आपला भूतपणा विसरून वाचकांना घाबरवण्याऐवजी हसवून गुदगुल्या केल्या असत्या हे नक्कीच!

इतर लेखनप्रकारांप्रमाणेच काव्याचाही प्रांत याच विडंबन-प्रवृत्तीने त्यांनी हाताळला आहे. पण या कविता बहुतांश मुलांसाठी किंवा मुलांसंबंधी आहेत. मोठी माणसं या कवितांना पोरकट म्हणतात; पण मुलं मात्र त्यांच्या विनोदवृत्तीशी नातं सांगणाऱ्या या कविता वाचताना रंगून जातात. कारण त्यातले शब्द आणि कल्पना पोरांना सुचतील किंवा त्यांच्या स्वभावधर्माशी, सवयीशी जुळतील अशाच असतात. भा.रां.च्या कवितांच्या आक्षेपावर ते एकदा म्हणाले होते - "अहो, हे पोरकट कसं होईल? यातून पोरं 'कट्' कुठे केली आहेत?

सगळीकडे विनोद शोधण्याच्या त्यांच्या या सहजसुलभ प्रवृत्तीमुळेच त्यांचं विनोदी लेखन विषयांच्या मर्यादा पाळीत नाही. नाटक, कथा, कादंबऱ्या, ललितलेख, बालगीतं, विडंबनकथा, विनोदी शास्त्रीय कथा वगैरे विनोदी साहित्याचे असे तऱ्हेवाईक विविधरंगी, विविधढंगी आविष्कार या संग्रहात आपल्याला आढळतील.

लेखन साहित्य, लिखित साहित्य आणि मुद्रित साहित्याची कात्रणं यांचा घरभर घातलेला पसारा नेहमी आवरण्याची आणि व्यवस्थित कागद लावून ठेवण्याची जन्मभर सवय असल्यामुळेच की काय, त्यांच्या लेखनाच्या सगळ्याभर विखुरलेल्या काड्या एकत्र करून त्यांची मोळी बांधण्याचं हे काम मी करू शकले असं वाटतं. आणि काहीतरी हरवलेलं - फार मोठं काही नाही - एखादा कपटादेखील शोधण्यासाठी ही व्यवस्थित बांधलेली मोळी भा.रां.नी विस्कटण्यापूर्वीच छापून वाचकांच्या पुढे ठेवण्याचं काम उत्कर्ष प्रकाशनाचे श्री. सुधाकर जोशी आणि श्रीमती सविता जोशी या दोघांनी अत्यंत दिलखुलासपणे केलं त्याबद्दल त्यांची, तसंच हे पुस्तक सुंदर मुखपृष्ठाने सजवल्याबद्दल चित्रकार राम वाईरकर यांची मी अत्यंत आभारी आहे.

लीलावती भागवत

***

चित्रस्रोतः भागवत कुटुंबीय

***
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

या लेखनातून पती-पत्नीमधील आदरयुक्त प्रेम आनि भारांच्या लेखनाचा प्रचंड आवाका दोन्हीची कल्पना येते.
चांगला धांडोळा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारांच्या स्वभावाचे किती पैलू उलगडून दाखवले आहेत.

हाच त्यांचा स्वभावविशेष 'प्रकाश' साप्ताहिकात काम करताना, त्यांनी लिहिलेल्या 'चक्करसंघाची साप्ताहिक सभा - लेखक घनचक्कर' या स्फुटलेखातून उमटलेला दिसतो. काही प्रत्यक्ष काम न करता प्रत्येक गोष्टीवर टीका-टिप्पणी करणारी बाताराम पंथाची मंडळी, या चक्कर संघाची सभासद. त्यांच्या त्या बैठकीमधून काही निष्पन्न होण्याची अपेक्षा नसल्याने बिघडत काहीच नाही म्हणा! समाजातल्या एका विशिष्ट प्रवृत्तीवर या स्फुटलेखमालेत चांगलेच टोले लगावलेले आहेत.

विशेषतः हा उतारा आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0