गेला कुठे श्रीरंग? (भारांची शेवटची कथा)

गेला कुठे श्रीरंग?

- भा. रा. भागवत

.भारांनी लिहिलेली ही शेवटची कथा. 'विज्ञानयुग' या नियतकालिकाच्या १९९९ सालच्या दिवाळी अंकात ती प्रकाशित झाली होती. भारांनी आजारपणात घेतलेल्या काही अनुभवांवर ती आधारित आहे.

***

श्रीरंगाची अलीकडची अवस्था पाहून त्याच्या आईवडिलांना विलक्षण काळजी वाटत होती. तो कोणाशी काही बोलायचा नाही. एकटाच कुठेतरी बसून राहायचा. आपल्या अभ्यासाच्या खोलीत किंवा बागेत. खेळायलासुद्धा कधी जायचा नाही. मित्र बोलवायला आले तरी त्यांच्याकडे पाठ फिरवायचा. क्रिकेटची एवढी आवड असूनही, टीव्हीवर चाललेली मॅचदेखील बघायचा नाही. त्याला झालंय तरी काय? की 'सोळावं वरीस धोक्याचं' हे विद्यार्थिजीवनातही खरं आहे?

"श्रीरंग, बेटा, मला सांगणार नाहीस का तुला काय होतंय ते?" एक दिवस आईने कळवळून विचारले. पण त्याने "काही नाही आई." एवढेच उत्तर दिलं आणि मग आईचा खिन्न चेहरा पाहून त्याला राहवेना. "अगं आई! माझ्या मनात काहीतरी विचार येत असतात. ते काय असतात, हे माझं मलाही समजत नाही. सगळा गोंधळ उडालाय!"

आणि मग एक दिवस "मुंग्या डसताहेत… माझ्या मेंदूला मुंग्या डसताहेत, आई….!" असं श्रीरंग कळवळून ओरडला. आईने घाबर्‍या घाबर्‍या बाबांना बोलावले.

"हा बघा काय बडबडतोय ते! मुंग्या डसताहेत म्हणे मेंदूला."

बाबा चिंतातुर झाले. त्यांना आता अशी भीती वाटू लागली की या पोराला वेडबीड तर असणार नाहीय ना?…. याला सायकिअ‍ॅट्रिस्टकडे न्यावं की काय?

डॉ. कामत या कुटंबाचे फॅमिली डॉक्टर. त्यांना बोलावून त्यांनी त्यांचा सल्ला विचारला. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला काही प्रश्न विचारले. त्यांना मिळालेली उत्तरे तुटक होती. पण मुद्द्याला धरून, ते म्हणाले, "सध्या तरी एवढी सीरियस स्टेप घेऊ नका. एखादा आठवडा जाऊ द्या. मी सध्या त्याला मनःशांती देणार्‍या काही गोळ्या देतो. ट्रॅन्क्विलायझर. कदाचित त्याला तेवढ्याने बरं वाटेल. अतिहुशार मुलांचं या वयात असं होतं कधी कधी."

त्याप्रमाणे गोळ्या देऊन झाल्या. एक आठवडा का? चांगला तीन आठवडे श्रीरंगवर गोळ्यांचा मारा होत होता.

तो जरा सुधारल्यासारखा वाटत होता खरा. पण केवळ वर वर. कसं काय कोण जाणे, पण 'मनःशांती' हा शब्द त्याने आईच्या तोंडून ऐकला होता आणि तो स्वतःशी पुटपुटला होता, "मनःशांती म्हणे! कशी मिळणार मला मनःशांती? या जन्मी तरी ते शक्य नाही. यांना कळायचं नाही मला काय होतंय ते."

"माझा आतला आवाज काहीतरी गुणगुणतो आहे. पण.. पण… माझं जाऊ दे. आईबाबांना तरी बरं वाटावं म्हणून मला जपलंच पाहिजे….."

आणि एक दिवस बाबांनी त्याच्या मित्रांना हट्टाने बोलावून आणले.

"आज तर मोठा सामना आहे ना? तुमचा सचिन तेंडुलकर प्रकृती बरी होऊन आला आहे अन् मॅच खेळणार आहे. सार्‍या जगात
त्याचं नाव गाजतंय. श्रीरंगला ओढून बसवा टीव्हीपुढे, कदाचित तो पुन्हा माणसात येईल."

श्रीरंग बसला. सचिनने अन् सौरभने मारलेल्या फटक्यांच्या खेळावर खूश होऊन मित्र टाळ्या वाजवत होते अन् उड्या मारून आपला आनंद व्यक्त करत होते. पण श्रीरंग आपला गप्पच. तो हसल्यासारखे दाखवी. पण ते केवळ त्यांना बरं वाटावं म्हणून.

"काय रे! सचिनने एवढा पराक्रम केला त्याचं तुला काहीच वाटत नाही?" मधूच्या ह्या प्रश्नालाही त्याने उघड उत्तर दिले नाही. त्याने स्वतःशी केलेली पुटपुट कुणालाही ऐकू गेली नाही. तो स्वतःलाच सांगत होता, "मी तरी काय करू? सचिनने मारलेल्या प्रत्येक टोल्याने आकाश फाटल्यासारखं वाटतंय. बॉल अंतराळात कुठेतरी भरकटत गेला, तारांगणात पडला, त्याचा ग्रहगोल बनला. आपला तेंडुलकर पृथ्वीवरच नाही, तर सार्‍या विश्वात कीर्ती मिळवतोय आणि तरी तो मला मनःशांती देत नाही."

आता करावं तरी काय हे त्याच्या आईवडिलांना कळेना. कामतांची ट्रीटमेंट संपली. तरी श्रीरंग एकलकोंडाच राहिला. खिन्न, उदास, चिंतनमग्न. त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे न्यायला हवे हा बाबासाहेबांचा विचार पुन्हा बळावला. आणि मग एक विशेष काहीतरी घडले.

श्रीरंगची आई, जुन्या वळणाची असली तरी भगत, महंत वगैरेंचा सल्ला घेण्याइतकी ती अंधश्रद्ध नव्हती. देवावर मात्र तिचा विश्वास होता. 'माझ्या मुलाला तूच तार', असा ती देवाचा धावा करीत होती. एक दिवस तर तिने श्रीरंगला आपल्याबरोबर मुरलीधराच्या देवळात नेले. मोठ्या प्रयत्नपूर्वक. तिथे भगिनी मंडळाचे गीता पठण चालू होते. पण त्याला ते अर्थ न कळता केलेले पाठांतर आवडल्यासारखे वाटले नाही.

एक दिवस श्रीरंगने आपण होऊनच तक्रार केली. "बाबा, माझ्या छातीत दुखतंय… इथे… इथे टाचण्या टोचताहेत.॥
बाबांनी बघितले तर तो घामाने डबडबला होता आणि छातीतली बोच म्हणजे तर घाबरण्याचाच प्रकार होता. बाप रे! हृदयविकार तर नाही ना?

बाबासाहेबांनी हृद्रोग तज्ज्ञ डॉ. बेलसर्‍यांना फोन करून अपॉइंटमेंट घेतली. मोटारीतून त्याला क्लिनिकमध्ये नेलं. सर्व प्रकारच्या चिकित्सा करून झाल्या. शेवटी - छातीचा इ. सी. जी. घेण्यात आला. तो घेत असतानाच डॉक्टरांनी मान हलवली.
"काय झालं डॉक्टर?"

तपासणी पूर्ण झाली आणि पेशंटला विश्रांतिकक्षात नेऊन झोपवण्यात आले. तेव्हा बाबासाहेब विचारीत होते.

"आय एम सॉरी टू टेल यू – इट्स ए सीरियस केस." डॉक्टरांनी गंभीरपणे उत्तर दिले. ते ऐकून बाबासाहेबांना धक्काच बसला.

"सीरियस? पण डॉक्टर तुम्ही इ. सी. जी घेतलात तेव्हा मी जवळ होतो. इ. सी. जी. वर चांगली सरळ रेषा होती की ती!"

यावर डॉक्टर हसले. पण म्लानपणे म्हणाले, "मिस्टर फाटक, मला तुमचं नवल वाटतंय. तुमच्यासारख्या उच्चविद्याविभूषित रँग्लरला एवढंसुद्धा माहीत नाही की, इ. सी. जी.ची सरळ रेषा चांगलं सुचवत नसते. इन मॅथेमॅटिक्स इट्स दी शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स एवढंच जाणता तुम्ही! इन मेडिकल सायन्स, ए स्ट्रेट लाईन इज दी शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईफ अँड डेथ. हृदयाचे स्पंदन ठीक होत नाही अशी सरळ सरळ सूचना आहे ही!"

क्षणभर बाबासाहेब शरमल्यासारखे झाले. इ. सी. जी.च्या संदर्भात हे मौलिक सत्य आपल्याला माहीत नव्हतं असं नाही; आणि तरी आपण भलता प्रश्न कसा विचारला हे त्यांना समजेना.

मुलाबद्दलच्या दीर्घकालीन काळजीने त्या क्षणी आपल्याला बुद्धिभ्रंश तर झाला नव्हता? पण ते जाऊ दे. त्या 'डेथ' शब्दाने त्यांना आता भयग्रस्त केले. "इतक्या लहान वयात हार्ट अ‍ॅटॅक येतो असं तर ऐकलं नव्हतं."

"अशा गोष्टी घडल्या आहेत फाटक साहेब. कधी दहा वर्षांच्या मुलाला कॅन्सर होऊ शकतो. कधी शंभर वर्षं जगूनही एखादा माणूस उत्तम काम करू शकतो."

बाबासाहेबांनी कापर्‍या स्वरात विचारले, "काय करायला हवं, डॉक्टर?"

"ऑपरेशन! इमिजीएट ऑपरेशन… याच्या इतर चाचण्यांवरून माझी खात्री झाली आहे की इट वुइल हॅव टू बी अ‍ॅन ओपन-हार्ट सर्जरी."

तो दिवस श्रीरंगला अतिदक्षता विभागात घालवावा लागला. डॉक्टर पुन्हा पुन्हा येऊन त्याचे ब्लड प्रेशर पाहत होते. थर्मोमीटर लावत होते. या सर्व बाबतीत समाधान झाल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजता शस्त्रक्रिया करणार असं त्यांनी जाहीर केले.
श्रीरंगची आई पहाटे उठून इस्पितळात आली होती. तिला या वेळी काय वाटत असेल याची कल्पना ज्याला आई आहे अशा कोणत्याही मुलाला येऊ शकेल. पहिल्याने तर तिला रडूच फुटले होते. पण मग तिने स्वतःला आवरले. भारतीय स्त्री जितकी देवभोळी असते, तितकीच धैर्यवतीही असते, याची अनेक उदाहरणे आढळतात. स्वतःचे दुःख विसरून तिने सार्‍या कुटुंबाला धीर दिलेला आहे. श्रीरंगची आईदेखील याला अपवाद नव्हती. ती जरा वेळ श्रीरंगजवळ बसली. त्याच्या अंगावरून हात फिरवत तिने त्याला धीर दिला.

"भिऊ नकोस राजा, सारं काही ठीक होईल." असे जेव्हा त्याच्या कपाळाचा मुका घेत तिने म्हटले तेव्हा मात्र श्रीरंगच्या डोळ्यालाही पाणी आले.

"आई, मी मुळीच भीत नाही, तूच भितेस. देवावर विश्वास आहे ना तुझा? मग तो तुझी भीती दूर करील." असे म्हणत त्याने डोळे मिटले. कारण डॉक्टरांनी दिलेल्या 'सेडेटीव्ह'मुळे त्याला गुंगी येत होती.

आईला रात्री त्याच्याजवळ सोबत म्हणून राहण्याची इच्छा होती. पण डॉक्टरांनी तशी परवानगी दिली नाही आणि बाबासाहेबांबरोबर तिला घरी जावे लागले.

***

रात्री एकचा सुमार होता. श्रीरंग एकदम जागा झाला. त्याने पाहिले तर नर्सला डुलकी लागली होती. तो पटकन उठला. त्याने पांघरूण झुगारून दिले. दरवाजा उघडून तो झपाट्याने बाहेर पडला.

पुढचे त्याला आठवेना. आपण टॅक्सी केली का? विमानतळ गाठला का? कसं केलं आपण हे? खिशात पैसे होते का? होते. ती पुरचुंडी आपण बिछान्याखाली लपवली होती, तीत असतील. ते काही असो. पुढचे त्याला आठवेना.

श्रीहरीकोटा गाठले, एवढे त्याला कळत होते. कदाचित असं असेल आपण सुपरमॅन किंवा शक्तिमान असू. ते इन्सॅट किती नंबर? ते उडण्याच्या तयारीत लाँचिंग पॅडवर उभे होते. डाऊन काउंट चालू असतानाच तो यानात जाऊन बसला. लपून!... थ्री-टू-वन…. आणि जेटचे भपकारे सोडीत यानाने अंतराळात झेप घेतली. वातावरण धूम्रमय होऊन गेले.

एका कोपर्‍यात चुपचाप बसून श्रीरंग यानातल्या कंट्रोल सिस्टीमकडे पाहत होता. तिथे कुणीच चालक नाही हे पाहून त्याला जितके आश्चर्य वाटले तितकाच आनंदही झाला. हे यान निर्मनुष्य आहे तर!

केवळ पृथ्वीवरच्या कंट्रोल रूममधून याचं नियंत्रण होत आहे तर! म्हणजे आपण बरंच काही साधू शकतो. तरी पण… जपूनच राहायला हवं. खालून संदेश येत असतील. येताहेत की! आणि काहीतरी सूं सूं सुस्कारे येत आहेत. अरेच्या! हां हां म्हणता आपण पृथ्वीची कक्षा गाठली.. आणि गुड गॉड! असं काय होतंय? बरोबर. गुरुत्वाकर्षण संपलं. आपण वजनरहित होऊन तरंगतो आहोत.
मोठ्या प्रयत्नाने त्याने बाजूची एक दांडी पकडली आणि तो स्थिर झाला. कारण असे फार काल तरंगत राहिल्याने त्याला भ्रमिष्टासारखे झाले असते.

पण बाप रे! हे काय झालं? पृथ्वीची कक्षा सोडून आपण पलीकडे गेलो की काय? यानाची गती वाढली असावी, पण ती किती गाठली गेली असेल याचा काहीच अंदाज श्रीरंगला येईना. त्याने बाहेर बघितले…. तिथे सर्वत्र अंधार होता. मधूनच तेजाचे बिंदू दिसत होते, झपाट्याने मागे पडत होते. स्वीच बोर्ड काहीच सांगत नव्हता. एकंदरीत नियंत्रण कक्षाचा यानावरचा ताबा सुटला असून ते भरकटत कुठे तरी चाललं असावं. पृथ्वी? ती केव्हाच अंतर्धान पावली. आता हा ग्रह कोणता असेल? 'का जे द्यौर्लोक आणि पाताळ। पृथिवी आणि अंतराळ। अथवा दशदिशा समाकुळ। दिशाचक्र॥' अगदी योग्य ओळी आठवल्या की आपल्याला! कारण यान भलतंच चकरा खातंय, ते कुठं चाललंय तेच मुळी कळत नाही. बाहेर जाऊनच पाहिलं पाहिजे.

आपण केव्हा स्पेस सूट चढवला ते श्रीरंगला आठवेना. पण आता तो मनाशी काहीतरी निर्धार करून एअर-कॉक उघडून बाहेर पडला. चक्क अंतराळात पोहू लागला आणि काय दिसलं त्याला?

शुक्र, बुध नि मंगळ हे सूर्याजवळचे ग्रह केव्हाच मागे पडले. इतकंच नाही तर आपण वाचलेली माहिती नक्की आठवत असेल तर आकाशगंगेचा काठ ओलांडून आपण बाह्य अवकाशात प्रवेश केला आहे - ''हें असो स्वर्ग पाताळ! की भूमी दिशा अंतराळ! हे विवक्षा ठेली सकळ! मूर्तिमय देखतसें''

….आता किती वेळ ही भ्रमंती सहन होणार… ही इथे रांगोळी कसली घातली आहे? हा मध्येच चमकणारा चुरा कसला?
पण नाही! ही भ्रमंती खरोखरीच त्याला असह्य झाली होती. डोके गरगरत होते. परत यानात शिरावे तर ते दृष्टीआड झाले होते. कदाचित ते पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत जाऊन आपल्या मायभूमीकडे वळलेही असेल. अन् मातेची भेट होण्यापूर्वीच त्याला मरण आलं असेल, किंवा एक चिमुरडा खडा बनून ते मातेच्या कुशीत गेले असेल? अन् काय वाटत असेल भूमातेला आणि तिच्या त्या बुद्धिवंत कन्या-पुत्रांना? पण…पण… नक्षत्रांच्या अनेक गंगा-यमुना ओलांडून झाल्या आणि एका अनोळखी तारांगणात प्रवेश करतानाच श्रीरंगला गुंगी आली. भोवताली हवा नाही, प्रकाश नाही, ध्वनी नाही, अशा अवस्थेत तो निद्राधीन झाला. किती क्षण, किती मिनिटं, किती तास, किंबहुना किती वर्षं….

किती प्रकाशवर्षं.. ते आम्ही सांगू शकत नाही. पण जागा झाल्यावर त्याला पुन्हा काही तेजःपुंज तारे दिसू लागले. त्या तार्‍यांनी मानवरूप धारण केलं की काय तरी?.... ती पाहा एक ऋषितुल्य व्यक्ती! कोण असेल ती? ध्रुवबाळ नक्कीच नाही. आर्यभट्ट आहे की वराहमिहीर? हातात एक नळी धरणारा तो गॅलिलिओ तर नसेल? की केपलर?.. आणि हा? प्लेटो की अ‍ॅरिस्टॉटल? पाणिनी की पतंजली? आणि हा? बाप रे! न्यूटनपासून थेट आईन्स्टाईनपर्यंत पोचलो की आपण! 'वर्षत सकळ मंगळी। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतु भूतां!!' भूमंडळ आता राहिलंच नाही. भुतं बनून म्हणा किंवा तारे बनून म्हणा, आपणच त्यांना अंतराळात भेटतो आहो. तो ईश्वर म्हणतात, तो…. त्याच्या भवतीच त्यांनी फेर धरला आहे. 'नाहं वसामि वैकुंठे, योगिना हृदये रवौ… मद्भक्ता यत्र गायन्ति। तत्र तिष्ठामि नारद॥' पण तिथे तरी कुठे तो तिष्ठत उभा आहे? आणि तरी अंतराळ ध्वनिशून्य असूनही मला सूर ऐकू येत आहेत.

ते त्या भक्तांच्या गायनाचे तर नसतील? अजब आहे! आणि या सार्‍यातून अजब असं काही तरी समोर दिसतं आहे. कारण या भूतमात्रात सारेच काही ईश्वरनिष्ठ आहेत असं नाही. तो चार्वाक… तो उमरखय्याम… तो ओशो… त्यानं तर "गॉड हॅज फायनली डाईड" असं जाहीर करून टाकलं. छी! छी! यातून अर्थ तरी काय काढावा म्या पामराने? जाऊ द्या. त्या भानगडीत आपण पडूच नये, हेच चांगलं.

आपला स्पेस सूट शाबूत आहे की नाही हे पाहण्यासाठी श्रीरंगने अंग चाचपले. पण हाताला काहीच लागेना. सूट नाही, त्यात सामावलेले आपण स्वतः नाही. सारं संपलं की काय? होय. तसंच असावं… डोळ्यांना खूप ताण देऊन त्याने आसपास पाहिले. अंधार… सतत वाढत चाललेला अंधार…

त्याला जाणवले की आपण या अवाढव्य पोकळीच्या एका अज्ञात भागात आलो आहोत. खड्डा… पुढ्यात खड्डा दिसतो आहे. ब्लॅक होल! आता मागे फिरणे नाही. आता कसलीही आशा नाही वा कसलीही भीती नाही.

आणि श्रीरंग त्या ब्लॅक होलमध्ये पडला. त्याचे पुढे काय झाले ते जाणण्याचे सामर्थ्य लेखणीत कुठून असणार?
आम्ही आपले हीन-दीन-लीन होऊन पृथ्वीकडे वळलो.

***

डॉ. बेलसरे बरोबर ६ वाजता इस्पितळात येऊन दाखल झाले. त्यांनी पेशंटचा चार्ट पाहिला. शेजारी उभ्या असलेल्या डॉक्टरांकडे पाहून त्यांनी विचारले, "ओके?"

"येस् सर, ओ. के." त्यांना उत्तर मिळाले. तो आवाज अपेक्षित नव्हता, म्हणून त्यांनी वळून डॉक्टरांकडे पाहिले.

"डॉक्टर मोझेस – तुम्ही? डॉ. चिंतामणी येणार होते ना माझ्याबरोबर?"

यावर डॉ. मोझेसनी काहीतरी पुटपुट केली. डॉ. चिंतामणींबद्दल ते काहीतरी सबब सांगतील असे वाटून ते म्हणाले, "इट्स ऑल राईट. यू नो दि केस… गेट रेडी प्लीज."

पेशंटला 'ऑपरेशन थिएटर'मध्ये नेण्यात आले. डॉ. मोझेस आणि त्यांच्याबरोबर आणखी दोन डॉक्टर असा तांडाही पांढर्‍या पोशाखात थिएटरात शिरला. तीन परिचारिकाही अगोदरच तिथे हजर होत्या. त्यांनी संपूर्ण तयारी केली होती.

सर्व डॉक्टरांनी बेसिनजवळ उभे राहून स्क्रबिंग केले. स्वच्छ जंतुरहित टॉवेलला हात पुशीत ते टेबलापाशी आले. पेशंटला भूल देणारे अ‍ॅनास्थेटिस्ट डॉक्टर जवळच उभे होते. त्यांच्याकडे डॉ. बेलसरे यांनी पाहिले. त्यांनी मान डोलावून अनुमती दर्शवली. कारण त्यांचे काम त्यांनी केव्हाच उरकले होते. रोगी पूर्णपणे निष्क्रियावस्थेत होता.

एका नर्सने पेशंटच्या छातीवरचा कपडा बाजूला सारला. डॉ. बेलसर्‍यांनी पुन्हा एकदा त्याची नीट पाहणी केली व सर्व ठीक असल्याची खात्री होताच कामाला सुरुवात केली.

"स्काल्पेल – ट्विझर्स् – सिझर्स् -"

भराभर मागण्या झाल्या. त्याप्रमाणे डॉक्टरसाहेबांना शस्त्रे पुरवण्यात आली. शस्त्रक्रिया पूर्ण होऊन टाके घालण्यात आले.१०
पेशंटला त्याच्या खोलीकडे नेऊन निजवण्यात आले. सर्व काही यथासांग यशस्वीपणे पार पडले होते. उर्वरित उष्टेखरकटे काढण्याचे काम परिचारिकांवर सोपवून डॉक्टर मंडळी हात धुवून स्वच्छ झाली. आपला बुरखा नि झगा प्रत्येकाने उतरवून ठेवला. हे चालू असतानाच डॉ. बेलसरे पुटपुटले, "मला एका गोष्टीचं नवल वाटतं, डॉक्टर."

"ते काय?" डॉ. मोझेसनी चमकून त्यांच्याकडे पाहिले.

"या यूथफुल पेशंटला मिसरुडं होती असं मला आठवत नाही. रातोरात फुटली की काय? हो?"

"सर," डॉ. मोझेस म्हणाले, "मला आपल्याला काहीतरी सांगायचंय."

आता चमकण्याची पाळी डॉ. बेलसर्‍यांची होती.

"सांगा ना काय ते. असे भिता काय?"

"चार्टबरहुकूम पेशंटला पाहून आपण ऑपरेशन केलं आणि ते यशस्वी झालं हे खरं असलं, तरी तो पेशंट तुम्ही समजता तो नव्हता."

"म्हणजे काय?"

"म्हणजे असं की श्रीरंग फाटकला आय. सी. यू. नं. दोनमध्ये ठेवलं होतं आणि आपण केलं ते ऑपरेशन नं. तीनमधल्या पेशंटच होतं."

"व्हॉट दि ब्लडी हेल!" डॉ. बेलसरे थरथर कापत ओरडले.

"सर, यू नीड नॉट बी सो अ‍ॅन्क्शस. मी थोडक्यात सारं सांगतो. आज ही दोन ऑपरेशन्स करायची असं शेड्यूल ठरलेलंच होतं. लागोपाठ. पण…"

"पण काय?"

"आय. सी. यू. नंबर दोनमधल्या पेशंटला आम्ही आणू शकलो नाही…"

"व्हाय? डॉ. चिंतामणी….."

"डॉ. चिंतामणी चिंतेत आहेत. ते भ्याले आहेत. तुम्हांला फेस करायची छाती त्यांना झाली नाही… आणि त्या खोलीतली नर्स – ती तर बेशुद्ध पडली आहे."

"व्हाय? व्हॉट हॅपन्ड?"

"पेशंट श्रीरंग फाटक इज डेड… ही डाईड इन् कोमा. डॉ. चिंतामणी सेज ही मस्ट हॅव पास्ड अवे अ‍ॅट अबाऊट मिडनाईट!"
डॉ. बेलसरे आ वासून पाहतच राहिले.

कॉरिडॉरमधून जाताना तिथे बाकावर हुंदके देत बसलेल्या फाटक कुटुंबीयांकडे नुसती नजर टाकण्याचे धैर्यही त्यांना झाले नाही. पांढर्‍या चादरीखाली झाकलेला श्रीरंगचा मृतदेह घेऊन एक स्ट्रेचर नुकताच अतिदक्षता विभागातून बाहेर आला होता. त्याकडे ते डोळे फाडून पाहत होते!

भा. रा. भागवत

***

(पूर्वप्रकाशन: विज्ञानयुग - दीपावली, १९९९, पृष्ठ क्रमांक ११३ - १२०)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

संपादकीय टिपण:

ही कथा भारांनी त्यांच्या अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये लिहिली. त्यामुळे कथेतील वैद्यकीय व तांत्रिक तपशिलांची खातरजमा करणे राहून गेले असावे. त्या तपशिलांमध्ये दुरुस्त्या केल्या आहेत. कथेत येणारी 'ज्ञानेश्वरी' व ’दासबोधा'तील काही उद्धृतेही मूळच्या मजकुराहून थोडी निराळी होती. ती नायकाच्या - श्रीरंगाच्या - स्मरणाला अनुसरून मुद्दाम तशी लिहिली आहेत की त्या वेळच्या संपादकांकडून त्याबाबत पुनर्शोधन करणे राहून गेले, ते आता तपासणे शक्य नाही. म्हणून संदर्भ पाहून ती उद्धृते व त्यानुसार काही ठिकाणचा मजकूर दुरुस्त केला आहे. कथेतील उद्धृते व मूळ मजकूर खालीलप्रमाणे:

क्ष किरणांनी छातीचा इ. सी. जी. फोटो घेण्यात आला..
एक्स-रे घेतलात तेव्हा मी जवळ होतो. इ. सी. जी. वर चांगली सरळ रेषा होती की ती!
एक्स-रेची सरळ रेषा चांगलं सुचवत नसते.
हृदयाच्या क्ष किरणाच्या संदर्भात
का जे द्यौर्लोक आणि पाताळ! पृथ्वी आणि अंतराळ! अथवा दशदिशा समाकुळ! दिशाचक्र!
हे असो स्वर्ग पाताळ! की दिशा अंतराळ!
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूतळी, भेटो तया भूतळी| भूतळ आता राहिलाच नाही.
नाही वसामि वैकुंठे, योगिनां हृदये… मद्भक्ताः यत्र गायन्ति तत्र…
ट्रीझर्स
१० रक्तबंबाळ हार्ट बाहेर काढण्यात आले. त्यावरची शस्त्रक्रिया पूर्ण होऊन टाके घालण्यात आले. काळीज पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले.

***
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रोचक कथा आहे पण खिन्न करणारी. स्वतःच्या आजारपणाबद्दल ऐसीवरच्या पटाईतजींनी लिहीलेला त्यांचा स्वतःचा अनुभव आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0