पहिल्या 'मराठी बालकुमार साहित्य संमेलना'त भारांनी केलेले अध्यक्षीय भाषण (उत्तरार्ध)

.
(भाषणाचा पूर्वार्ध)
.
.

भा. रा. भागवत
(अधिवेशन पहिले : पुणे, १९७५)
-------
उत्तरार्ध
-------
-------

बालसाहित्यकाराकडून अपेक्षा

बालसाहित्यकाराला पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे थोडीशी मानसशास्त्रीय बैठक. आपण नेहमी म्हणतो, की मुलांच्या मनावर संस्कार होतात ते मुख्यतः घरी आणि शाळेत, म्हणजे पालक आणि शिक्षक यांच्याकडून. आपल्याला जर मुलांवर संस्कार करायचे असतील तर पालक आणि शिक्षक या दोन्ही भूमिका आपल्याला नीट वठवल्या पाहिजेत. ते आपण करतो का? मुलांचे मन आपण समजून घेतो, की त्यांच्यावर सत्ता गाजवतो; की त्यांच्यापुढे उगाच पड खात असतो? बरं, जे काही मुलांना आपण सांगतो, ते प्रेमाने सांगतो का? त्यांच्या मनात उचंबळणार्‍या आकांक्षा आपण लक्षात घेतो का? की पदोपदी "चूप रे! तुला नाही ते जमायचं!" असे म्हणून त्यांना गप्प बसवतो? मुलांच्या गुणांचे महत्त्व आपण पाहुण्यांसमोर प्रदर्शन करण्यापुरतेच मानतो का? का एरवीसुद्धा त्या गुणांचा परिपोष करीत असतो? कधीकधी एखादी मुलगी कुणी न सांगता आपण होऊन, दोन ओळींचा का होईना, लेख लिहिते. तो आपण वाचतो का? एखादा मुलगा उत्स्फूर्तपणे चित्र काढतो, ते आपण बघतो का? या ठिकाणी मला एकदम यशवंत चौधरींनी मागे मुलांकडून असे उत्स्फूर्त प्रयोग करवले होते, त्याची आठवण होते आहे. किती तर्‍हेतर्‍हेच्या कल्पना छोट्या मुलांनी लढवल्या होत्या!

रस्त्यात पडलेले सिगरेटचे रिकामे पाकीट मुलाने उचलले की रागावून "घाण आहे, टाक ते!" असे आपण म्हणतो का? त्याने सिगरेटची ढीगभर पाकिटे जमवली तरी ते निरर्थक समजू नका. जमविण्याचे तत्त्व त्यामागे आहे. हाच मुलगा पुढे कदाचित दुर्मीळ स्टँप जमवील. मुलांची भीती आपण घालवतो, की नकळत ती वाढवीत असतो? मुलांना अनेक भये भेडसावीत असतात. छोट्यांपुढे समस्या नसतात असे समजू नका. बेबीला वाटते - कायपण माझे कपडे हे! शेजारच्या छबीचे कपडे किती छान आहेत. तर बेबीला सांगितले पाहिजे की "तुझेही कपडे छान आहेत. रोज धुतल्यामुळे किती स्वच्छ असतात बघ. घातल्यावर अंगाला कसं बरं वाटतं!" बनीला वाटते - मनीचा नंबर दुसरा तिसरा असतो. माझा काय, विसावा! - "हो, पण बने, तुला गाणं, नाचणं येतं, ते मनीला येतंय का? खेळात तर तू नेहमी पुढं असतेस!"

मुलांमध्ये प्रेमाची भावना उपजत असते. प्राण्यांवर अन् माणसांवर ती सहजपणे प्रेम करतात. अर्थात स्वार्थ सगळ्यांनाच असतो. आपली वस्तू आपण कवटाळून बसणे ही माणसाची वृत्तीच असते. पण दुसर्‍याबद्दल माया वाटू लागली किंवा दुसरी मुले अडचणीत आहेत असे कळले तर मुले पुढे होतात आणि आपली वस्तू देऊन टाकतात. Twenty and Ten नावाची एक कादंबरी आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात शत्रूने व्यापलेला फ्रांस. वीस फ्रेंच मुले एका गुप्त गुहेत दडलेली असतात. त्यांना असे कळते की, दहा अनोळखी - नुसतीच अनोळखी नाहीत तर ज्यांच्यावर नाझींचा डोळा आहे अशा - ज्यू समाजातली मुले संकटात आहेत, आसरा शोधताहेत. ह्या विसांनी लगेच त्या दहांना आपल्या गुहेत आसरा दिला. आपण स्वतःला संकटात टाकतो आहोत हा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. ही सहानुभूती अन मानवता स्वाभाविक असते. आपल्या जाती-वर्ण-वंश विचारांनी आपण त्यांना पुढे बिघडवतो. 'आपण सारी एकाच देवाची लेकरे आहोत' अशी नुसती पोपटपंची आपण करतो. पण मुलांना खरोखरीच भेदभाव माहीत नसतो. गडी, मोलकरणी आणि कनिष्ठ समजल्या जाणार्‍या धंद्यातले लोक यांच्याशी आपण जी वागणूक करतो, त्यामुळे तो भेदभाव मुलांच्या मनात आपण निर्माण करतो. प्राणी, वनस्पती यांच्यावरही मुले प्रेम करतात. ते प्रेम, ती कोवळीक आपल्या कठोर वागण्याने आपण करपवून टाकतो. मुलांची कोवळीक, त्यांचे कुतूहल आपण कसे कुस्करतो याचा दाखला अमेरिकेसारख्या प्रगत देशातही मिळालेला आहे. पाच-सहा वर्षे वयाच्या मुलांची पाहणी करणार्‍या तज्ज्ञांनी सांगितले की दहा-अकरा वर्षे वयाच्या मुलांचे चेहेरे निराश, पडलेले दिसले. अर्थ हा की, मुलांची प्रफुल्लता, पर्युत्सुकता मधल्या चार-पाच वर्षांत मोठ्यांनी मारली. तिकडे ही स्थिती तर आपल्याकडे काय असेल?

याउलट मुलांना आपण बागेतून, पशुपक्ष्यांच्या उद्यानातून हिंडवून प्राण्यांशी नि वनस्पतींशी त्यांची गट्टी करून दिली तर? किंवा ते जमले नाही तर, नेहमी दिसणारी अंगणातली नि रस्त्यावरची झाडे, तिथे उडणारी पाखरे, वावरणारे किडे नि मुंग्या, त्यांची वारुळे यांच्याबद्दल त्यांना सारखी जिज्ञासा असते; ती तरी आपण पुरवतो का? प्रेमाच्या व्यक्तींबद्दल आस्था, कुतूहल वाटावे तशी त्या सृष्टीबद्दल मुलांना उत्सुकता असते, ती आपण पुरवतो का? की त्याने विचारल्यावर 'गप रे! ते तुला कळायचं नाही!' किंवा फार तर 'तसं नाही रे!' म्हणतो. पण तसे नाही, तर कसे? तुम्हाला माहीत नसेल तर त्याला दुसर्‍या कुणाला तरी विचारायला सांगा किंवा त्याची माहिती ज्यात असेल असे एखादे पुस्तक त्याला आणून द्या. तुमच्यातला पालक हे करणार नसेल, तर तुमच्यातल्या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकांचा उपयोग काय? तेव्हा आपण मुलांशी वागतो कसे यालाही लेखकाच्या निर्मितिक्षमतेत महत्त्वाचे स्थान आहे. मुलांशी चांगले वागणारा लिहायला बसेल तर चांगलेच लिहील. आणि मग आपल्याला जे काय सुचले ते मुलांना सांगितल्याशिवाय त्याला चैनच पडणार नाही.

प्रेम, मानवता ह्या स्वाभाविक प्रवृत्ती जोपासणे हे जसे महत्त्वाचे आहे, तसेच मुलांना बुद्धिनिष्ठ, तर्कवादी बनवणे हेही आपले कर्तव्य आहे. जुन्या अंधश्रद्धा आता फेकून द्या आणि मुलांना सृष्टीच्या व्यवहारातले, सामाजिक जीवनातले कार्यकारणभाव समजावून द्या. मुलांना मार्गदर्शन करा, पण सांभाळून. स्वतः विचार करून शोधण्याची, मार्ग काढण्याची त्यांची उत्सुक वृत्ती घालवू नका. उलट ती वाढवा. नाही तर अडचणीच्या वेळी तुम्ही जवळ नसलात की ती बावरून जातील. एका चित्रपटात असे आहे की, अमेरिकेतल्या रुक्ष वाळवंटात विमान कोसळते. आठ-दहा वर्षांचा बेशुद्ध पडलेला मुलगा शुद्धीवर येतो. पाहतो तर काका ठार झालेले! विमान छोटे, आत हे दोघे नि एक कुत्रा. मुलगा घाबरला का? अर्थात! कोवळा जीव तो! भिणार नाही तर काय? पण भीतीने त्याचे हार्ट फेल होत नाही, तर तो सावरतो आणि कुत्र्याला घेऊन त्या अफाट वाळवंटातून वाट काढतो. हे कसे झाले? त्या बालकाचे मन तयार करणार्‍या पालक-शिक्षकांना त्याचे श्रेय दिले पाहिजे. 'असेल माझा हरी - किंवा असतील माझे आई-बाबा, तर देतील खाटल्यावरी' अशा वृत्तीचा तो असता तर खलास झाला असता.

ही आमची भारतीय संस्कृती

अंधभक्तीच्या कथा पुष्कळ झाल्या. नव्या प्रकाशकांनी पुन्हा तेच रटाळ भारूड छापण्याची आता जरुरी नाही. प्रल्हाद-चिलयांच्या गोष्टी नकोत. एका गोसाव्याच्या सांगण्यावरून आई उखळात मूल कांडते, चिरते, त्याची भाजी करते हे नको. उलट आईचे मस्तक कुर्‍हाडीने उडवणारा परशुरामही नको. का करतो तो असला अघोरीपणा? तर बाप सांगतो म्हणून. पण असे सांगणार्‍या बापाचे डोके फिरले असले पाहिजे, हा साधा विचार त्या परशुरामाला सुचला नाही. वाचक-मुलांच्या मनात हा विचार डोकावला असता, पण तुम्ही तो ठेचून टाकलात.

संस्कृतीच्या नावाखाली असले काहीतरी सांगू नका. ही आमची संस्कृती नाही. नचिकेत, एकलव्य, आस्तिक, कृष्ण, सुदामा, भगीरथ ही आमची संस्कृती. सुदाम्याची साधी गोष्ट मुलांना किती आवडते! आमच्या नातीचे 'सुदामा' पुस्तक एकदा फाटले, पुन्हा आणले. असे पाच-सहा वेळा करावे लागले.

ध्रुव-ज्ञानेश्वर हेही केवळ बालवयाचे म्हणून मुलांचे हिरो ठरत नाहीत. कारण ती अनन्यसाधारण उदाहरणे मुलांना पेलणारी नाहीत. मान्य की, ध्रुव हा एकाच विचाराने पेटलेला विजिगीषु मुलगा होता. पण कोणत्या विचाराने? तर देव भेटण्याच्या. आजच्या मुलांना हा आदर्श कसा पटावा किंवा आकलन तरी कसा व्हावा?

आमची पुरातन संस्कृती किती श्रेष्ठ होती हे मुलांना जरूर शिकवा. पण ते त्यांना समजेल अशा शब्दांत आणि उदाहरणे देऊन शिकवा. मोठमोठे तत्त्वज्ञान संस्कृतप्रचुर भाषेत आजच्या मुलांना न पेलणारे परिच्छेद देऊन हा खटाटोप करू जाल तर तो मुलांच्या डोक्यावरून जाईल.

इथे मला हेही स्पष्ट करायचे आहे, की मुलांना नुसते देवदेव करायला लावू नका. याचा अर्थ त्यांना नास्तिक बनवा असा नाही. ईश्वराचे अस्तित्व हे आपल्या समाजाने किंबहुना बहुतेक सार्‍या सुसंस्कृत जगाने स्वीकारलेले एक प्रस्थापित तत्त्व आहे. कदाचित आपल्यापैकी काहींनी ते झुगारून दिले असेल. अशी उदाहरणे थोडीच असली तरी - समजा, तुम्ही त्यातले एक आहा. तुमचा मुलगा शाळेतून येतो, शाळेत प्रार्थना कशी केली त्याचे वर्णन करतो, गणपतीच्या मूर्तीबद्दल प्रेमाने बोलतो, आणि तुम्ही एकदम हेटाळणीने म्हणता, "हॅट! देवबीव काही नसतो!" बिचारे मूल! त्याला धक्काच बसतो. त्याला हे कळत नाही, की ही काय भानगड आहे? तिकडे तसं सांगतात, इकडे असं सांगतात! त्याच्या मनाचा गोंधळ उडतो. तेव्हा तुमचे खास तत्त्वज्ञान हे तुम्ही तुमच्याजवळच ठेवा. मुलाला तूर्त ज्ञानेश्वरापासून आइनस्टाइनपर्यंत नव्याण्णव टक्के विचारवंतांनी मानलेल्या मार्गावरूनच जाऊ द्या. पुढे मोठा झाल्यावर तो ठरवील आपण आस्तिकच राहायचे की नास्तिक बनायचे ते!

मुख्य गोष्ट ही आहे, की देवाधर्मावर जास्ती भर देणे नको. साने गुरुजींच्या 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या मंत्रावर अधिक भर द्या. आणि मुलांना विज्ञानप्रवृत्त करा. ज्यूल व्हर्नने पन्नास वर्षांपूर्वी केले ते आपण आज करू शकत नाही का? त्याच्या लेखणीने पृथ्वी, आकाश, समुद्र, पाताळ, अंतराळ अशा पंचखंडात मुक्त संचार केला आणि तोही आपली चौकस शास्त्रीय दृष्टी उघडी ठेवून. आपल्या मुलांना असे तिन्ही लोकी संचार करणारे नारद बनवा. नारदासारखी सगळे पाहणारी दृष्टी त्यांना द्या. नारदासारखीच ती नजर मिश्कील असू द्या; पण वृत्ती भांडणं लावण्याची नको, भांडणं मिटवण्याची असू दे. अहो, त्रिखंड नि पंचखंडच का? आता संचारासाठी अनंत खंडं मोकळी होत आहेत. नक्षत्रलोक हे जसे एक प्रचंड जग आहे, तसेच अणूंचा अंतर्भाग हे एक सूक्ष्म जग आहे. मानवी प्रगती सांगताना 'मनुष्य चंद्रावर गेला तरी -' हा अलीकडे एक टाळीचा वाक्यार्ध बनला होता; तो आता मागे पडून 'आर्यभट फेर्‍या मारू लागला तरी -' असा नवा प्रयोग रूढ होत आहे. उपग्रहावरून नुसते चंद्रावरच नाही तर अन्य ग्रहांवरही आपल्याला उतरायचे आहे. तिथली सृष्टी कशी असेल, प्राणी कसे असतील, तिथे माणसे असतील का, ती कशी असतील, त्यांच्याशी आपल्या लढाया होतील का.... याच्या नव्या चित्तथरारक गोष्टी आपण सांगायला लागलो आहोत. अंतराळातले नवे सिंदबाद, गलिव्हर अवतीर्ण होत आहेत. त्यात काही कोलंबसही आहेत. कल्पनेला इथे भरपूर वाव असला, तरी यांतल्या पुष्कळशा कल्पना खर्‍याही होणार आहेत. परमेश्वराचे हे अफाट विश्व, लक्षावधी प्रकाशवर्ष प्रवास करीत राहिले तरी संपणारे नाही, हे तर आपल्याला कळून चुकले आहे ना? मग झाले तर? आपण काय पाहिलेय? अजून पुष्कळ पाहायचेय आपल्याला!

पण जाऊ द्या. आपल्या मर्यादा ओळखू या. विज्ञानासाठी ह्या चित्तचक्षुचमत्कारिक गोष्टीच हव्या आहेत असे नाही. साध्या नित्याच्या व्यवहारात आज विज्ञान भरले आहे. अगदी विजेच्या दिव्यापासून -- जो दिवा गरिबातला गरीब माणूससुद्धा बटन दाबून लावतो - अल्लाउद्दीनच्या दिव्यापेक्षा हा नवा दिवा मुलांना दाखवा. (नवा कसला? तोही आता जुना झाला, इतके आपण धावतो आहोत) - पण हा एडिसनचा दिवा प्रगतीचं प्रतीक आहे. तो मुलांना द्या. ही जादू मुलांना आवडेल असे करा. खेड्यापाड्यातल्या मुलांपर्यंत तुमच्या वाङ्मयाच्या द्वारा ही विज्ञानाची जादू पोचवा. त्यासाठी रेडिओ, टेलिव्हिजनखेरीज आणखीही एक साधन नुकते उपलब्ध झाले आहे. १ ऑगस्टपासून उपग्रहाच्या द्वारा २४०० खेड्यांमधून विद्येचा प्रचार करण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे.

व्यावहारिक बाजू

आता थोडी व्यावहारिक बाजू. मुलांची पुस्तके घेतोय कोण? खपतच नाहीत. पुष्कळसे दुकानदार तर बालवाङ्मय ठेवीतच नाहीत. म्हणजे शालेय पुस्तके ठेवतात. अर्थात पुस्तकांच्या किंमती कुणा कुणाला परवडत नाहीत. पण मी म्हणतो - बाकीचं परवडतं वाटतं? महागाईचा राक्षस सगळ्यांनाच भेडसावतो आहे, हे खरं असलं तरी एक ग्राहक म्हणून मी विचार करतो तेव्हा मनात येतं - सगळंच महाग असलं तरी आम्ही घेतो आहोत ना? खादीवरून, सुतीवरून आम्ही टेरिलिनचा स्वर्ग गाठला. पण टेरिलिन म्हणजेच का सारं काही? अर्थात टेरिलिन ही प्रगती आहे हे मान्य; पण आम्ही जेव्हा असा युक्तिवाद करतो, की टेरिलिन जास्ती टिकतं आणि म्हणून अखेरीस तेच स्वस्त पडतं, तेव्हा तो चुकीचा युक्तिवाद असतो. चारी पँटी टेरिलिनच्या शिवण्याऐवजी दोन टेरिलिनच्या आणि दोन कॉटनच्या शिवल्यात तर! शंभर-एक रुपये तरी वाचतील आणि त्यातून पन्नास-एक पुस्तके आम्ही मुलांसाठी घेऊ शकू! हे एक आपले उदाहरण दिले. खरेदीत अत्यावश्यक काय याचा जरा सुबुद्धपणे विचार करू या आणि आपले बजेट आखू या. एखाद्या तरी बालमासिकाची वर्गणी तुम्ही भरता का? निदान दिवाळी अंक विकत घेता किंवा फिरत्या वाचनालयातून आणता, तेव्हा त्यात बालमासिकाचा एक तरी अंक असतो का? नाही. मग तुम्ही आणलेल्या मोठ्यांच्या मासिकांतलेच एखादे उचलून मुले ते वाचीत असतात. आणि मग तक्रार ही की 'अंक लवकर बदलायला मिळाला नाही. बाब्याच बसला होता वाचीत.' खरं म्हणजे त्याला काय हो इंटरेस्ट ह्या प्रेमकथा वाचण्यात?

'वैयक्तिक ग्राहक कमी झाले आहेत, लायब्रर्‍या तेवढ्या पुस्तके घेतात.' असे असेल तर मी म्हणेन, लायब्रर्‍यांनी इतर पुस्तकांबरोबर मुलांचीही पुस्तके ठेवावीत, आणि एखाद्या-दुसर्‍याऐवजी दहा-दहा प्रती ठेवाव्यात. आमच्यासारख्या बालसाहित्यवाल्यांना तेवढीच मदत होईल. आणि जास्त मुले ती वाचतील.

काही इंग्रजी पुस्तके - गोष्टींची काय किंवा माहितीची काय - किती भव्य असतात! रंगीत, उद्बोधक चित्रांनी ती भरलेली असतात. आपण तशी देऊ शकत नाही, खरे आहे. मग आपण रंगीतऐवजी साधी चित्रे देऊ. त्याचाच प्रचार करू. प्रचाराचा एक मार्ग मला सुचतो आहे. टोलेजंग, रंगदार, सर्वांगसुंदर इंग्रजी पुस्तकांसारखी आम्ही काढू शकत नसलो, तरी ती पाहाण्याच्या आनंदापासून मुलांना वंचित ठेवणे बरोबर नाही असे मला वाटते. आपला प्रचारक जेव्हा पुस्तके घेऊन तालुक्यातून-जिल्ह्यातून हिंडतो, तेव्हा मघा सांगितली तशी मोठाली इंग्रजी पुस्तकेही त्याने बरोबर ठेवावीत. शिक्षकांकडून एखादा तास मागावा. ते चित्रमय पुस्तक त्याने मुलांना दाखवावे. चित्रांमुळे मुले खूश होतील. मग तितकीच नसली तरी काही साधी चित्रे आमच्याही पुस्तकात आहेत असे सांगून, मुलांची वाचनजिज्ञासा जागृत करावी. शाळेला तशी पुस्तके नित्य घ्यायला लावावीत. अर्थात हे करायला प्रचारकही सुबुद्ध आणि कल्पक हवा. विचारपूर्वक गोष्टी करणे हा सगळ्यांचा आधार आहे.

शासन, पालक-शिक्षक संस्था, लेखक-प्रकाशक ह्या सर्वांनी सामग्र्याने बाल-साहित्याचा विचार करायला हवा. नुसती बालसाहित्यिकांची शिबिरे भरवून हे सारे होणार नाही. आणि यातली सर्वांना जाचक वाटणारी आर्थिक समस्याही सोडवायला हवी. शक्य ते सारे प्रयत्न करून. तेवढ्यासाठी मुलांचा आनंद कुंठित करणे बरोबर नाही.

सर्वांनी लक्ष देण्याचा विषय

मजकूर आणि चित्र ह्या दोन्हींची निवड चांगली व्हावी यासाठी बालसाहित्य संमेलनाने एखादी समिती नेमली तर? म्हणजे अमुकच छापा किंवा विका अशी काही आमची कुणावर सक्ती नाही. पण निदान आम्ही वाचलेल्यांपैकी हे विशेष चांगले वाटले असा सल्ला प्रकाशनपूर्व किंवा प्रकाशनोत्तर देखील, अशी जाणकारांची समिती देऊ शकेल. Agmark सारखा एखादा शिक्का त्या पुस्तकावर मारता येईल. म्हणजे हा शिक्का नसलेले बाकीचे वाईट असे नाही. पण हे आम्ही पाहिले आणि हे निश्चितपणे चांगले वाटले, ग्राहकांनी निर्धास्तपणे घ्यावे असे तरी सांगता येईल.

बालसाहित्य खूप खपवायला हवे आणि बालकांच्या दृष्टीसमोर ते सारखे नाचवायला हवे. प्रदर्शन भरवून याबाबतीत 'बालसाहित्य जत्रे'च्या लैलाबाई भटकळ आणि कुमठा यांनी खूप काम केले आहे. आजचे हे संमेलन ज्यांच्या हौसेचे व परिश्रमाचे फळ आहे, ते अमरेंद्र गाडगीळही पुस्तकप्रचारासाठी 'लक्ष बालवाचक'सारख्या योजना नित्य आखीत असतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तळवलकर, रानडे हे दोन ज्येष्ठ-श्रेष्ठ नाना आपल्या जवळपास आहेत. सनाथ बनलेल्या विद्यार्थ्यांचे गुरुजी, डॉ. ग. श्री. खैर आहेत. भाऊ धर्माधिकारी आहेत. सर्वश्री भवानीशंकर पंडित, विठ्ठलराव घाटे, गंधे यांच्यासारख्या बालसाहित्याला आधारभूत झालेल्या ज्ञानवृद्ध व्यक्ती बालवाङ्मय लेखकांना अजूनही स्फूर्ती देत आहेत. गुजरातीतले 'कुमार' हे एक साक्षेपी चोखंदळ बालमासिक आहे. त्याचे आदरणीय वृद्ध संपादक श्री. बचूभाई रावत मुद्दाम इथे आले आहेत; ज्या सर्वांचे आशीर्वाद मागत आहोत.

ह्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान देऊन मराठी बालसाहित्याचे सिंहावलोकन करण्याची संधी मला दिल्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो.

***
रेखाचित्रः भरत जगताप

***
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप छान. हा भाग पटला. भारांचा दृष्टीकोन आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0