बालवाचक, पण सत्तरीतले!

बालवाचक, पण सत्तरीतले!

- मीना वैद्य

.
हा माझा अनुभव, म्हणजे इसवी सन १९५०-६० च्या दशकात एका लहान गावात शाळेत शिकणाऱ्या एका मुलीचा अनुभव. आता आठवणींच्या कप्प्यामधून बाहेर काढून कथन करते आहे.

पुस्तकं वाचणं हा त्या काळातील सर्वांत मोठा विरंगुळा असे - मोकळ्या वेळातला आणि मोठ्या सुट्ट्यांमधला. हा वाचनाचा छंद मनोरंजन आणि मनोविकासही साधणारा होता. दूरदर्शनचा तेव्हा पत्ताच नव्हता. रेडिओदेखील तुरळक घरांमध्येच असायचा - सर्वांना परवडणारा नव्हता. नाटक, सिनेमा वर्षाकाठी एखादाच बघायचा. पण याची खंतही नव्हती, पर्वाही नव्हती. मध्यमवर्गी सुशिक्षित कुटुंबामधली आम्ही मुलं वाचनात दंग असायचो. त्या वेळी आमच्या कल्पनाविश्वात रंग भरणाऱ्या मोजक्या मराठी लेखकांमध्ये भा. रा. भागवतांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे.

'बालमित्र' हे त्यांनी जवळजवळ सात वर्षे चालवलेलं पाक्षिक माझ्या प्राथमिक आणि माध्यमिक यत्तांना समकालीन होतं! आमच्या दृष्टीने ती बौद्धिक करमणुकीची मेजवानीच होती. अतिशय आतुरतेने आम्ही मुलं या अंकाची वाट बघत असू. 'अदृश्य माणूस' आणि चंद्रावर स्वारी' या अद्भुत कथा बालमित्रातून क्रमशः प्रसिद्ध होत. ते एक मोठं आकर्षण होतं. भागवतांच्या अनेक स्वतंत्र साहसकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा - अर्थात कादंबरीच्या स्वरूपात - त्या काळी मुलामुलींना अगदी गुंगवून टाकीत.

***

त्यांनी लिहिलेली अनुवादित पुस्तकंदेखील इंग्रजी आणि अमेरिकन साहित्यामधील दर्जेदार कादंबऱ्यांचा मराठी वाचकाला समर्थपणे आणि उत्कटतेने आस्वाद देतात. त्या त्या देशांतील तसेच कालखंडातील जीवनशैली आणि व्यक्तिरेखा यांचं परिणामकारक दर्शन त्यामध्ये घडतं. तेही आपल्या मराठी भाषेतून आणि तिकडचं मूळ वातावरण कायम ठेवून! या कादंबऱ्यांमधील व्यक्ती बहुधा मराठीतूनच बोलल्या असाव्यात, असं वाटण्याइतका खरेपणा या साहित्यिक कलाकृतींमध्ये आहे.

शेकडो वर्षांपूर्वी इंग्लिश राजवटीविरुद्ध, विशेषतः त्या राजवटीमधील भ्रष्ट, उद्दाम आणि अन्यायी सरदारांविरूद्ध बंड पुकारणाऱ्या, श्रीमंतांचं धन लुटून, नाडल्या गेलेल्या गरीबांना वाटून टाकणाऱ्या रॉबिन हुड या बहाद्दराची कथा इंग्रजी साहित्यात आख्यायिका (legend) बनून राहिली आहे. अनेक लोकगीत-पोवाड्यांचा विषय झाली आहे. अशा रॉबिन हुडला 'रॉबिन हुड आणि त्याचे रंगेल गडी' या पुस्तकाद्वारे मराठी वाचकांच्या - विशेषतः लहान मुलांच्या - भेटीला आणताना प्रस्तावनेतच लेखक जाहीर करतो -

शिंग वाजता। रॉबिनकरता॥
शरवूड जंगल भंगेल।
गडी लोटतील रंगेल॥

आणि कादंबरीच्या सुरुवातीला पुकारा होतो तो असा -

ऐका ऐका सज्जनहो
सैनिकहो स्वातंत्र्याचे
पोवाडे वनवीराचे
शरवुडच्या रॉबिन हुडचे॥

या भाषांतरातल्या काही गंमती विशेष पाहण्यासारख्या आहेत. 'मेरी मेन' मराठीत येतात, ते 'रंगेल गडी' होऊन. 'लिटिल जॉन'चे भाषांतर होते 'धाकला जॉन', तर 'वुईल्‌ स्कार्लेट'चे भाषांतर होते 'तांबडा वुईल'. 'फ्राय‍ऽर टक' होतो 'टक बुवा'. इथे 'बुवा'मधला मराठी संन्यासीपणा टकच्या गळ्यात अचूक जाऊन पडतो.

रॉबिनला पकडून आणण्यासाठी इंग्लंडच्या राजाने गिसबोर्नच्या 'गाय' नामक सरदाराला (Guy of Gisborne) पाचारण केलेले असते. त्याचे वर्णन करताना लेखक म्हणतो, "तो नावाने गाय असला तरी शक्तीने बैल होता!"

अशा रॉबिनची कथा मराठी मुलांना आपलीशी वाटल्यावाचून कशी राहील? रॉबिन आणि त्याचे सवंगडी यांच्या रोमहर्षक साहसकथांमध्ये लहानथोर सर्वच रमतात.

***

तीच गोष्ट लॉरा इंगल्स वाईल्डर या पहिल्या पिढीतील (pioneer settler) अमेरिकन कुटुंबामधील मुलीच्या आत्मकथेची. या कुटुंबाचा खडतर, संघर्षमय जीवनप्रवास, त्यातूनही त्यांनी जपलेली संस्कृती, कलासक्त आणि उमदी वृत्ती, हे सगळं मराठी वाचकांच्या भेटीला लेखकाने आणलं, अत्यंत प्रभावीपणे; या चार पुस्तकांच्या रूपात -

मोठ्या रानातलं छोटं घर, एक होतं सरोवर, उमलती कळी आणि आनंदी आनंद गडे ही ती चार पुस्तकं.

इथेही तोच अनुभव. अमेरिकन जीवनशैलीचा मराठीतून आस्वाद! या पुस्तकांमध्ये जागजागी येणाऱ्या काव्यपंक्ती, वाक्प्रचार, अर्थात अमेरिकन-इंग्लिशमधील, यांचं समर्पक आणि रसाळ रूपांतर लेखक करतो. त्यांतलं हे एक उदाहरण पाहा -

लॉराच्या विवाहसोहळ्यासाठी तिची आई (मा) तिला तयार करते आहे, आर्थिक चणचणीच्या परिस्थितीमध्ये. वधूचा पेहराव कसा सजवावा याबाबत मा आपल्या लेकीला एक पारंपरिक वाक्प्रचार सांगते -

Something old
And something new
Something borrowed
Something blue!

मराठीमध्ये लेखक लिहितो -

थोडे जुने
थोडे नवे
थोडे उसने
मागून घ्यावे!

हे रूपांतर आहे हे जाणवूही नये अशी सहज मराठी भाषा! मूळच्या 'old-new-borrowed-blue'चे भाषांतर करताना 'निळा' रंग कुठेच येत नाही. भाषांतरात तो उपरा वाटेल हे जाणून, तो लुप्त होतो. त्याऐवजी 'जुने-नवे-उसने' असं यमक योजून लेखक त्यातलं परकेपण घालवून टाकतो.

या पुस्तकांमधली तेव्हाही विशेष आवडणारी बाब म्हणजे अमेरिकन खाद्यसंस्कृतीचे मोठ्या रसाळपणे केलेले वर्णन. निरनिराळ्या प्रकारची फळे पाकवण्याच्या पद्धती, चीज बनवण्यासाठी, टिकवण्यासाठी व सजवण्यासाठी करण्याच्या युक्त्या, मांसखंड तयार करण्याची प्रक्रिया, ते खारवून-वाळवून-साठवून ठेवण्यासाठी पडणारे श्रम या सगळ्याचं मोठं रोचक आणि चविष्ट वर्णन या पुस्तकांतून येतं. वानगीदाखल चीजबद्दलचा हा उतारा पाहा -

हिवाळ्यात मलईला उन्हाळ्यातलासारखा पिवळा रंग काही केल्या चढत नसे. लोण्याचे गोळे पांढरे निघत, तितकेसे सुरेख नसत. माला आपल्या मेजावर सर्व काही सुरेख असावे असे वाटे; म्हणून ती हिवाळ्याच्या दिवसांत लोण्याला रंग देत असे. सगळी साय गोळा करून चिनी मातीच्या बरणीत भरली अन्‌ शेगडीजवळ तापायला ठेवली, की मग मा काय करी- नारिंगी रंगाचे एखादे सुंदर लांबट गाजर घेऊन ती ते स्वच्छ धुवी, त्याची साल खरवडून काढी, मग किसणीच्या तळावर ते किसून काढी… शेवटी सगळा कीस काढून झाला, की ती किसणी वर उचली आणि खाली गाजराच्या किसाचा मऊ रसरशीत लगदा पडलेला असे. हा लगदा उचलून एका लहानशा पसरट दुधाच्या भांड्यात ती घाली. आणि भांडे शेगडीवर ठेवी. दूध चांगले गरम झाले, की दुधाचे नि गाजराचे ते मिश्रण ती एका कापडी पिशवीत ओती. मग ते चकचकीत पिवळे दूध बरणीत पिळून काढी. बरणीतल्या सायीला त्यामुळे रंग चढे. आता लोण्याला कसा पिवळाजर्द रंग येई...साय तयार झाली म्हणजे मा आपली ती लांबलचक लाकडी रवी घेऊन ती अगोदर उकळत्या पाण्यात बुडवी आणि मग बरणीत उभी करी. नंतर रवीच्या टोकावरून ते लाकडी झाकण सरकवून देई. लाकडी झाकणाला मध्यवर्ती एक लहानसे भोक होते. आणि या भोकातूनच मा रवी वरखाली आपटीत असे...पहिल्यापहिल्याने जी साय उडे, तिचे त्या लहानशा भोकाला लागून साचलेले थर जाडसर बुळबुळीत वाटत. मग मा जास्त सावकाश घुसळू लागे आणि रवीवर पिवळ्या लोण्याचे चिमुकले कण जमू लागलेले दिसत.माने बरणीचे झाकण काढले की आत पिवळाजर्द सोनेरी लोण्याचा गोळा ताकात बुडत असलेला दिसे. मग मा तो गोळा लाकडी कलथ्याने काढून एका लाकडी वाडग्यात ठेवी आणि थंड पाण्याने तो बर्‍याच वेळा धुवी. कलथ्याने तो सारखा खालीवर फिरवून त्यातले पाणी साफ निवळेपर्यंत ती असे करी. मग त्यात मीठ घाली.घुसळपट्टीच्या कार्यक्रमातला सर्वांत उत्तम भाग यापुढेच असे. मा लोण्याच्या वड्या पाडी. लोण्याचा लाकडी साचा असे. त्याच्या सरकत्या तळावर स्ट्रॉबेरी फळांचे नि दोन पानांचे चित्र कोरलेले असे. मा कलथ्याने लोणी उचलून साच्यात दाबून घट्ट भरी. पूर्ण भरले की, एका बशीवर तो साचा उघडा करी. आणि मग ती त्या सरकत्या तळाची मूठ पुढे रेटी. लगेच सोनेरी लोण्याचा छोटासा घट्ट गोळा तयार होई. त्या गोळ्यावर स्ट्रॉबेरीचे फळ नि पाने यांचे सुंदर चित्र उमटलेले असे.

या उतार्‍यात वापरलेले मेज, बरणी, कलथा, साचा, घुसळपट्टी यांसारखे मराठी स्वैपाकघरातील शब्द; भारतीय नजरेला परकं असणारं लोण्याच्या वड्या पाडण्याच्या साच्याचं तंत्र आणि सरतेशेवट त्या देखण्या लोण्याचं रसभरित वर्णन, यांतून एक पूर्ण खाद्यचित्र डोळ्यांसमोर उभं राहतं, तेदेखील अस्सल मराठी भाषेत.

अशा अनेक पाककृतींसोबत येतो तो तत्कालीन अमेरिकन गृहिणींचा दिनक्रम. शिवणकाम, भरतकाम, स्वयंपाक, संगीत ही कौशल्ये; शिक्षिका म्हणून त्यांना उपलब्ध झालेली महत्त्वाची अर्थार्जनाची संधी यांचं चित्र डोळ्यासमोर नेमकेपणानं उभं राहतं. अमेरिकन प्रथा आणि रीतीभाती, शिष्टाचार, आर्थिक आणि सामाजिक फरकांमुळे होणार्‍या अडचणी आणि गंमती कथानकामधून डोकावत राहतात.

हा मूळ पुस्तकांचा गुण आहे खराच. पण परदेशी साहित्य-संस्कृतीमधील भाव, त्यांची पार्श्वभूमी कायम ठे‌वून मराठीमधून रंगवतांना लेखकाची संवेदनशीलता आणि ताकद, यांचा आपल्याला प्रत्यय येतो; तसाच रूपांतरासाठी वापरलेली काहीशी जुन्या वळणाची मराठी भाषा वाचताना मराठी भाषेच्या ताकदीचा आणि समृद्धीचादेखील!

या लेखकाने आपल्या भाषांतरामधून अनेक नवीन विश्वांची दारं आम्हां मराठी मुलांसाठी उघडून दिली. शतकापूर्वी जन्मलेल्या या श्रेष्ठ प्रतिभावान लेखकानं आमचं बालपण अगदी 'भा.रा.'वून टाकलं होतं!

***

चित्रे: जालावरून साभार

***

इतर संदर्भ:
लॉरा इंगाल्स वाइल्डरची मूळ पुस्तके
या पुस्तकांवर निघालेली 'लिटिल हाउस ऑन दी प्रायरी' ही टीव्ही मालिका

***
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मागे आपला साहित्यातल्या खाण्यापिण्यावरचा धागा निघाला होता, तेव्हा या पुस्तकांची जाम आठवण झाली होती. आता पुन्हा वाचली पाहिजेत. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

यातले रॉबिनहुड सोडल्यात इतर बहुतांश पुस्तके वाचलेली नाहीत. आता वाचायला हवीत!
आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारांच्या अनुवादात मूळ पुस्तकातल्या काव्यपंक्ती आणि वाक्प्रचार यांचे उत्तम मराठीकरण केलेले असते, हा आपला मुद्दा एकदम पटला. मूळच्या 'old-new-borrowed-blue'चे भाषांतर करताना 'निळा' रंग कुठेच येत नाही. भाषांतरात तो उपरा वाटेल हे जाणून, तो लुप्त होतो हे निरीक्षण तर फारच मार्मिक आहे.
पुलंनी बेंगरुळ भाषांतरची खिल्ली उडवून (आठवा, निमकर भटजींच्या उपहारगृहातील डुकराच्या मांसाची भजी!) पन्नास वर्षं झाली तरीही अजूनही बेंगरुळ अनुवादांचे कारखाने चालूच आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0