Skip to main content

शतशब्द कथा - दोन किनारे

एका दुसर्याच्या हातात-हात गुंफून हसत-खेळत, पाण्यात भिजत, दोन किनारे पाण्यासहित समुद्राला जाऊन सहज भेटले असते. पण दोन्ही किनारे श्रेष्ठत्वाच्या वाळवीने ग्रसित होते. डाव्या किनाऱ्याला वाटायचे, त्यालाच समुद्राकडे जाणारा रस्ता माहित आहे. उजव्या किनाऱ्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. उजव्याला वाटायचे, सोपा सरळ मार्ग त्यालाच माहित आहे. त्यांच्या आपसातला विवाद आणि कलह शिगेला पोहचला. एक किनारा पूर्वीकडे वळला तर दुसरा किनारा पश्चिमेकडे. पाणी मृगमरीचीकेत हरवले.

एखाद्या प्रेताप्रमाणे ते वेगवेगळ्या दिशेला अंतहीन वाळवंटात पाण्याच्या शोधात भटकू लागले. पाण्याअभावी ते तडफडू लागले. देवा! सुटका कर या मरण यातनेतून. पाणी....पाSणी... मिळेल का कुठे एक थेंब पाSSणी. त्यांचे करुण क्रंदन वाळवंटातच विरून गेले. दोन्ही किनारे अखेर अस्तित्वहीन झाले.

Node read time
1 minute

ललित लेखनाचा प्रकार

1 minute