किल्ला: आहे मनोहर तरी........

तर मराठीत सध्या ' वयात येता ' नाच्या गोष्टी सांगणार्‍या सिनेमांची लाट आली आहे. किशोरवयीन-कुमारवयीन मुलांचे भावविश्व कधी कलात्मकतेने तर कधी तद्द्न व्यावसायिक हेतूने मांडणारे अनेक चित्रपट मधल्या काळात येऊन गेले. उदा. विहीर , शाळा , बालक-पालक , टाईमपास , फॅण्ड्री इ.इ. याच माळेतला एक नवा मणी म्हणजे ' किल्ला '. सिनेमाची तपशीलवार कथा सांगून समीक्षेने रसिकांच्या रसभंगाचं पाप करू नये असं मला वाटतं. म्हणून सरधोपटपणे कथा सांगणं इथे टाळलं आहे .

वडिलांचा इतक्यातच मृत्यू झालेला. त्यातच आईच्या(अमृता सुभाष) झालेल्या बदलीमुळे सातव्या वर्गात शिकणार्‍या आपल्या नायकाला म्हणजे , चिन्मय काळेला (अर्चित देवधर) पुण्यासारख्या मोठ्या शहरातून गुहागरसारख्या ग्रामीण भागात यावं लागतं. तो तिथल्या नव्या निसर्गाशी , नव्या वातावरणाशी , नव्या मित्रांशी जुळवून घेऊ शकतो का ; त्याच्यात या काळात काय बदल होतात ; तो सभोवतालशी कसा ' रिअ‍ॅक्ट ' करतो अशी या चित्रपटाची साधारण कथा आहे.

हल्ली मराठी सिनेमात ' महोत्सवी चित्रपट ' म्हणून सिनेमाची एक नवी जात फोफावलेली आहे. ' किल्ला ' ही त्याच सदरात मोडणारा आहे. त्यात वावगं काहीही नाही पण त्यामुळे रूढ अर्थाच्या मनोरंजनाची अपेक्षा असल्या सिनेमाकडून करू नये. बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये वाखाणल्या गेल्यानंतरच ' एस्सेल व्हीजन ' सारख्या व्यावसायिक कंपनीने तो वितरणासाठी घेतला हे नमूद करायला हवं. जागतिक सिनेमात चलनात असलेले सर्व घटक जसे उत्तम छायालेखन , कल्पक प्रकाशयोजना , संवादांपेक्षा मुद्राभिनयावरील भर , जवळपास सर्वच कलावंतांचा चोख अभिनय , आवश्यक तेथे क्लोज अप , लॉंग शॉट्स , जिम्मी जिब इत्यादी आधुनिक तंत्राचा वापर , ऋतुरंगांचं नैसर्गिक चित्रिकरण , आपण सिनेमात बनवतोय या पदोपदी असणार्‍या जाणीवेतून आलेल्या दृष्यचौकटी इ.इ. घटक या सिनेमात आहेतच . त्यामुळे तो नक्कीच एकदातरी ' प्रेक्षणीय ' झाला आहे. आई- मुलाच्या संबंधातली तरलता व सखोलता , अडनिड्या वयातला मनोव्यापार , दुनियादारीची हळुहळू होणारी ओळख हे तसे फार कठीण विषय हाताळण्याचा प्रयत्न पहिल्याच आणि एकाच चित्रपटात करणं खरोखरच कौतुकाचं आहे. असा थोडासा जड विषय सुसह्य करण्यात बालकलाकार पार्थ भालेरावचा सहजसुंदर , नैसर्गिक अभिनय आणि इतर बालकलाकारांची जोरदार साथ यांचा मोठा वाटा आहे. सिनेमाच्या एकंदर विषयवस्तूवर , मांडणीवर आणि सादरीकरणावर जी.ए. कुलकर्णी , मोकाशी स्कूलचा प्रभाव वाटतो. सिनेमा बघताना मला क्रांती कानडेने दिग्दर्शित केलेल्या जीएंच्या कथेवर आधारित ' चैत्र ' या अप्रतिम लघुपटाची आठवण येत राहिली.

दै. लोकसत्तामध्ये आलेल्या दिग्दर्शक अविनाश अरूण ह्याच्या [बहुधा सदिच्छाभेट-वृत्तांतरूपी-प्रायोजित] मुलाखतीत त्यानेच सांगितल्याप्रमाणे सिनेमाची कथा ही त्याच्याच बालपणीच्या अनुभवांवर आधारित आहे. अशा काही अनुभवांचीच मोट बांधून चित्रपटीय कथा-पटकथा बांधण्याचा प्रयत्न सिनेमाकारांनी केलेला आहे. परंतु या कथेचं सिनेमात रूपांतर किंवा माध्यमांतर करताना मात्र काही दुवे निसटल्यासारखे वाटतात आणि त्यामुळे एक परिपूर्ण व एकसंध अनुभव देण्यात ' किल्ला ' कमी पडतो.

' किल्ला ' ला जागतिक सिनेमाचे परिमाण देत असताना पटकथेत मात्र सुसूत्रतेचा , सुस्पष्टतेचा अभाव जाणवतो. सिनेमाकर्त्याला नेमकं काय सांगायचं आहे याबाबत खुद्द सिनेमाकर्त्याच्या कल्पना स्पष्ट आहेत का अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण चित्रपट हे काही एखाद्या चित्रकाराने मूड असेल त्याप्रमाणे अ‍ॅबस्ट्रॅक्ट फटकारे मारून चित्र रंगवावं असा कलाप्रकार नाही , नेत्रसुखद , चित्ताकर्षक देखाव्यांचा पोर्टफोलिओ नाही तर सिनेमा हा अनेक कलांचा , तंत्रांचा एक बांधेसूद समुच्चय असतो. निदान व्यावसायिक सिनेमाबाबत तरी ही अपेक्षा असते. महोत्सवी आणि हौशी सिनेमाची गोष्ट वेगळी. ' किल्ला ' च्या बाबतीत नायकाच्या भावविश्वावर फोकस करायचं की प्रेक्षकांच्या ' नॉस्टाल्जिया ' ला चाळवायचं यामध्ये दिग्दर्शकाच्या मनात संभ्रम होता असं वाटतं. नसता तर सिनेमाच्या जाहिरातीत ' रिविजिट युअरसेल्फ ' असं आवाहन असतं ना. आता हे आवाहन मूळ संहितेतच होतं की नंतर व्यावसायिक वितरणावेळी कोणा ' बिजनेस हेड ' च्या हेडमधून निघालं हे समजण्यास वाव नाही. पण दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत . सध्या ह्या ' नॉस्टल्जिया ' ची फार चलती आहे , हे आपण वर उल्लेखलेल्या सिनेमांच्या यशावरून किंवा आपल्या व्हॉटस अ‍ॅप ग्रूपवर फिरणार्‍या मेसेजेसचा अभ्यास करून सहज सांगू शकतो. तशीही एकंदरीतच मराठी कलाविश्वात (नाट्य-सिनेमा-साहित्य सगळीकडेच) या नॉस्टल्जिया प्रकाराने उबग आणला आहे. मराठी अभिव्यक्तिचं यश आणि आवका सीमित राहण्यास या घटकाचा प्रादुर्भाव अधिक कारणीभूत आहे . हा एक स्वतंत्र विषय आहे.

सिनेमाची चित्रभाषा , लोकेशन्स वगैरे आधी ठरवून त्याभोवती प्रसंगांची , दृष्यांची गुंफण केली आहे असं वाटतं. किल्ला किंवा लाईटहाउस इत्यादी दाखावायचेच म्हणून प्रसंग आणि त्या अनुरूप संवाद रचले आहेत असं वाटतं. मुळात या कथेचा जीव एखाद्या लघुपटाचा असून त्याला ओढूनताणून पूर्ण लांबीचं केलं आहे की काय अशी शंका येते. उदा. नायक आणि एक दारूडा मच्छीमार यांच्यातले प्रसंग आता काही वेगळे घडेल का अशी उगाच आपली उत्सुकता चाळवतात. त्यामध्ये काही नाट्यमय होईल याची अपेक्षा सिनेमाचा एकंदर बाज पाहता तशीही नसतेच तरी त्यांच्या एका दृष्यात आपल्याला ' द ओल्ड मॅन अ‍ॅंड द सी ' चं काही तत्वज्ञान ऐकायला मिळेल का अशी सुखद शंका येते पण नंतर विरते. असे काही प्रसंग डिसकनेक्टेड वाटतात. संवादलेखनात , विशेषत: चिन्मयच्या आईच्या ऑफिसच्या उपकथानकात थोड्या अधिक ऑथेंटिसिटीची , अभ्यासाची गरज होती. ती नसल्याने तो कथाभाग कन्व्हिंसिंग वाटत नाही तर एखाद्या फिलरसारखा किंवा क्लायमॅक्सची सोय केल्यासारखा , टेकू दिल्यासारखा ओळखू येतो. त्यातल्या सरकारी बाबूंची भाषा ऐकून मला उगाच मराठी मालिकांमधल्या शुद्ध , प्रमाण भाषेत बोलणार्‍या गुंडांची आणि पोलिसांची आठवण आली. अशा गोष्टी मुख्य कथाविषयाचा प्रभाव नाहकच कमी करण्यास कारण होतात. संकलकाने या गोष्टी जरा गंभीरपणे घ्यायला हव्या होत्या. पण त्यामुळे सिनेमा काही टाकाऊ होत नाही. जाताजाता , नायकाच्या गळ्यातलं जानवं सिनेमाभर उगाच हायलाईट केल्यासारखं का दाखवलंय अशी एक ' पुरोगामी ' शंकाही मध्येच येऊन गेली पण आम्ही तिची लगेच ' घरवापसी ' केली. असो.

पूर्वीच्या काळी , आपण एखाद्या पर्यटनस्थळी फिरून आलो की तिथे काढलेले फोटो प्रत्येक आल्यागेल्याला दाखवण्याची पद्धत होती. तशी ती आताही आहे. फक्त अल्बमची जागा फेसबुक , पिकासा , इन्स्टाग्राम वगैरेंनी घेतली आहे. पण त्यातल्या त्यात सोय म्हणजे UNFOLLOW चे सेटींग़ करून आपण आपल्या फोटोपोस्ट्या मित्रांचा समावेश आपल्या ' शत्रुपक्षां ' मध्ये होण्यापासून टाळू शकतो. आपल्या या नेटमित्रांनी पोस्ट केलेले फोटो अनेकदा खरंच छान असतात , आपल्याला मनस्वी आवडतात. आपण नकळत (आणि मित्राला राग येऊ नये म्हणून) त्या फोटोंना लाईक करत , एखादी कमेंट करत पुढे जात असतो. आपला मित्रही तिकडे आपल्या लाईक्सची आणि कमेंट्सची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण त्या प्रत्येक फोटोमागे त्याची स्वत:ची अशी एक कहाणी असते , प्रत्येक लाईकगणिक तो सुखावत असतो. आपण मात्र काही काळाने ते फोटो विसरूनही जातो. कारण त्या फोटोंची ती कहाणी आपल्याला माहीत नसते. क्वचित माहीत असली तरी आपण तिच्याशी ' रिलेट ' करू शकत नाही. आणि का कोण जाणे पण ' किल्ला ' बघताना माझंही असंच झालं. सिनेमागृहातून परतताना कोकणातली नयनरम्य दृष्यांची मनोहर ' पोस्टकार्ड्स ' तर लक्षात राहिली पण मायना हातात पूर्णपणे न लागल्याची हुरहूरही लागून राहिली.

माझं हे आणि इतर लिखाण वाचण्यासाठी:aawaghmare.blogspot.in

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

'किल्ला' पाहिलेला नाही. त्यामुळे त्याच्या बरेवाईटपणाविषयी सांगता येणार नाही, पण समीक्षण आवडले. विशेषतः नॉस्टाल्जिया वरच्या मतांशी सहमत. आताशी असे वाटू लागले आहे की नॉस्टाल्जिया हे रंजकतेचे एक मूल्य होऊन बसले आहे की काय. पंचविशीची पिढीसुद्धा पुढे न पाहाता मागच्या स्मरणरंजनात रमते तेव्हा सध्याचा वर्तमानकाळ आणि पुढचा भविष्यकाळ खरोखर इतका नीरस बनला आहे की काय, की विरंगुळ्यासाठी तरुण पिढीला मागे पाहावेसे वाटू लागावे, असा प्रश्न मनात येतो. (अर्थात कोणी कुठे मन गुंतवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न.)
एस्सेलविजनचा चित्रपट म्हणजे 'झी'वरून तडाखेबाज जाहिरातीची आणि त्यामुळे थोडीफार व्यावसायिक यशाचीही खात्रीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

चित्रपट पाहिलेला नाही. पण बघायचाय हे या परिक्षणाच्या आधीही ठरवले होतेच. आता तर नक्की
परिक्षण चांगले उतरले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

परीक्षणातले बहुतेक सर्व मुद्दे पटले. विशेषतः जानव्याबद्दलचा. नाटकाच्या तिसर्‍या अंकात पिस्तूल उडणार असेल तर पहिल्या अंकात ते भिंतीवर दिसायला हवं, असं म्हणतात. तसंच 'पहिल्या अंकात ते भिंतीवर दिसलं तर तिसर्‍या अंकात ते उडायला हवं' असं म्हणावंस वाटतं.
लोकेशन्स वगैरे आधी ठरवून त्याभोवती प्रसंगांची, दृष्यांची गुंफण केली आहे असं मलाही वाटलं.
चिन्मयच्या आईच्या ऑफिसच्या उपकथानकात काहीतरी खटकत होतं. काय ते नक्की समजत नव्हतं. ते तुमचं परीक्षण वाचून समजलं. आणि पटलंही.
जिम्मी जिब म्हणजे काय ते माहीत नाही पण चित्रभाषेबद्दल आपण जे म्हटलं आहे ते बरोबर आहे असं जाणवलं.
शेवटचा परिच्छेद केवळ अप्रतिम. आपलं परीक्षण 'ऐसी अक्षरे'वर नसणार्‍या मित्रांशी (अर्थातच आपल्या नावानिशी) शेअर करू का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

हा लेख शेअर करण्यास माझी काहीही हरकत नाही. तो वाचला जावा यासाठीच लिहिला आहे.
माझं खरं नाव (इथे इतरत्र दिसत नसल्यास)- अभिषेक अनिल वाघमारे,रा.नागपूर. या नावाने (इंग्रजीत) मी फेसबुकवर पण उपलब्ध आहे. माझी इतर चित्रपट परीक्षणं व स्फुट लेखन वर दिलेल्या ब्लॉगवर उपलब्ध आहे.

अवांतर: आपण तेच 'प्रसिद्ध विज्ञानलेखक' श्री.सुबोध जावडेकर आहात काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

>>अवांतर: आपण तेच 'प्रसिद्ध विज्ञानलेखक' श्री.सुबोध जावडेकर आहात काय ?<<
होय वाघमारे जी तेच ते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लिहिलंय चांगलं. पण काही गोष्टींबाबत असहमत.
१. विहीर , शाळा , बालक-पालक , टाईमपास , फॅण्ड्री इ.इ. याच माळेतला एक नवा मणी म्हणजे ' किल्ला ' <<
विहीर आणि फॅण्ड्री ठिके पण बालक-पालक आणि टाइमपास हे या यादीत असायची अजिबातच गरज नाही. असो.

२. फिल्म फेस्टिव्हल्स मधे लागणार्‍या फिल्म्सबद्दल एक निगेटिव्ह सूर लावून बोलायची फॅशन आलेली आहे. हा सूर लिखाणात स्पष्ट जाणवतो. जे काही तंत्रातले चांगले वगैरे आहे ते सगळे चलाखी म्हणून केलेले आहे असे म्हणणे जाणवले. आणि म्हणून ते खटकले.

३. चिन्मयच्या आईच्या ऑफिसचा कथाभाग हा उगाच तपशीलवार केला नाहीये. त्यात येऊ शकेल असा मेलोड्रामा टाळलाय हे मला तरी अतिशय योग्य वाटले. कथा चिन्मयची आहे. त्याच्या आईच्या नोकरीची नाही. नोकरीमुळे बदल्या होतात हा कथा घडण्यासाठी महत्वाचा असला तरी एक तपशील आहे. बाकी काही नाही. तिथे अजून कशाला रेंगाळायचे?

जिम्मी जिबबद्दल - http://www.jimmyjib.com/ येथे बघा.
हे प्रकरण भारतीय चित्रीकरणांमधे येऊन जुने झाले आता. रूळले कधीच इथे. अनेक गोष्टी सुकर होतात याने. काही अप्रतिम अँगल्स जे एरवी कदाचित शक्य झाले नसते ते शक्य होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

आपण उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत-

१<किशोरवयीन-कुमारवयीन मुलांचे भावविश्व कधी कलात्मकतेने तर कधी तद्द्न व्यावसायिक हेतूने मांडणारे अनेक चित्रपट मधल्या काळात येऊन गेले> हे आपल्या नजरेतून सुटलं वाटतं.

२.निगेटीव्ह सूर लावणाच्या माझा हेतू नव्हता. आपल्याला तसं का वाटलं कळलं नाही. महोत्सवी सिनेमा हे एक फक्त वर्गीकरण आहे. मराठीतल्या इतर प्रवाह उदा. अशोक-लक्ष्यापट, अलका कुबल रडपट, 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'छाप भक्तीपट, तमाशापट इ.इ. प्रमाणे महोत्सवी सिनेमा हासुद्धा त्याचा एक हुकमी प्रेक्षकवर्ग असलेला प्रवाह आहे. त्यामध्ये डावंउजवं करायचा माझा हेतू नाही. प्रत्येक सिनेमाकार आपापल्या वकुबाप्रमाणे सिनेमा बनवत असतो आणि प्रेक्षकही त्याच्या वकुबाप्रमाणे, उपलब्धतेप्रमाणे ते सिनेमे बघत असतो. प्रेक्षक महानगरातला सुशिक्षित मल्टिप्लेक्सी असो वा जत्रेतला असो तो तेवढाच आदरणीय आहे. पण कालपरत्वे या विविध प्रकारच्या सिनेमांना मिळणारा प्रतिसाद हा समाजाच्या एकूणच अभिरूचीबद्दलाचा एक समाजशास्त्रीय आरसा आहे असं माझं मत आहे. असो.

३.याबद्दल मी काही अधिक टिप्पणी करू शकत नाही.माझं मत मी आधीच मांडलंय.

४.चित्रिकरणात आधुनिक तंत्र वापरलंय हे मी कौतुकानेच म्हटलंय. मराठीबाबतीत हा उल्लेख अजूनही विशेषत्त्वाने करावा लागतो हे बाकीचे पायलीला पसाभर येणारे मराठी सिनेमे पाहिल्यास लक्षात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

२. माझ्या अल्पबुद्धीला तो निगेटिव्ह सूर जाणवतो. विशेषतः काही गोष्टी फॉर्म्युलासारख्या वापरल्या गेल्या आहेत अश्या प्रकारची टिप्पणी येते तेव्हा. असो.

४. मराठीबाबतीत हा उल्लेख अजूनही विशेषत्त्वाने करावा लागतो हे बाकीचे पायलीला पसाभर येणारे मराठी सिनेमे पाहिल्यास लक्षात येईल. << मला मराठी चित्रपटसृष्टीची अत्यल्प माहिती आहे. परंतु तेवढ्यावरून हे नक्की माहितीये की मराठी चित्रपटांमधेही जिब सारखे तंत्रज्ञान रुळून बरीच वर्षे झाली. कदाचित अजून माहिती करून घ्यावी लागेल असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

बालक-पालक आणि टाइमपास हे या यादीत असायची अजिबातच गरज नाही.

का ओ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

परीक्षणाशी बर्‍याच अंशी सहमत आहे. माला तर अभिनय आणि काही प्रसंग सोडून अजिबात आवडलेला नाही. आणि कथेचा खरा जीव फार तर 10 मिनिटंच आहे.त्यासाठी 2 तास उगाच लांबवलेला आहे.

जस फेस्टिवल मधल्या चित्रपटांबद्दल वाईट बोलले जाते बर्‍याच वेळा मान्य आहे. पण त्याहीपेक्षा अशा चित्रपटांबद्दल आवडो न आवडो पण चांगलेच बोलण्याची फॅशन पडून गेली आहे. तुम्ही विरोधी सुर काढलात तर तुम्हाला तो कळलाच नाही असा अर्थ काढला जातो.
'किल्ला' मध्ये जसे जीवनावश्यक भाष्य केले आहे तसे वेगळे पैलू धरून अनेक चित्रपटांमध्ये आहे. अगदी झोया अख्तरचा 'जिंदगी.....' मध्ये सुद्धा जीवननुभव , भाष्य , आणि छायाचित्रण याच्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे. पण तो पडला कथित मनोरंजक चित्रपट.
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परीक्षण आवडले. बहुतेक मुद्द्यांशी सहमत.
बेटर हाफला असले महोत्सवी चित्रपट आवडत असल्याने सहन करावा लागला. वर त्याबद्दल चर्चाही गहन करावी लागली.
असले नयनरम्य संयत x क्ष इ इ चित्रपट पोत्यांनी पाहिले गेल्याने दोघेही अंतिमतः बोर झालो. नाॅस्टॅलजिया खपवणे बंद व्हावं या कामनेसह.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

कालच यु-ट्युब वर 'किल्ला' पाहिला. परिक्षणातले बरेचसे मुद्दे जागोजागी ठळक पणे दिसले.
उबग वगैरे आला नाही पण अशी खास नोंद घ्यावी असंही वाटलं नाही.
प्लस पॉईंट्स-
छान लोकेशन निवड,
उत्तम छायाचित्रीकरण,
उगाच अंगावर येणारं संगीत नाही,
मुलांचा अभिनय बराच संयत
आईच्या नोकरीचे सीन्स बरेच प्रमाणात ठेवले आहेत, नाहीतर तेच खुप ओव्हरपॉव्हर (मराठी??)झाले असते.

मायनस (उणे)पॉईंटस-
फारसा दम नसलेला विषय, कथा मनाचा ठाव वगैरे घेतच नाही...फोर दॅट मॅटर- लक्षातही राहात नाही.
वडिल नसलेला कथानायक, कष्ट करुन एकटीने संसाराचा गाडा हाकणारी आई - एलिझाबेथ एकादशी ची आठवण आलीच
अभ्यासात हुशार असलेला कथानायक (शिष्यवृत्ती मिळवणारा)- प्रत्येक सिनेमात तीच टेप लावल्या सारखी झालिये..
त्याचे टगे मित्र-पुन्हा तेच
टिनेज वयानुसार मुलींविषयी वाटणारं आर्कषण- (एकच नशिब त्याचं जास्त पाल्हाळ लावलं नाही)

हे माझे दोन पैसे...

-मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बघायचा व्याप वाचवल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!