छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १३: निसर्गात मानवी जीवन/भावना बघणार्या साहित्याची आठवण करुन देणारी छायाचित्रे
नेहमीची ओळख असणार्या पाण्याशी पहिली विस्फारीत भेट घालून देणार्या पावसाचे दिवस आहेत. सृजनाचा ऋतू म्हणतात पावसाळ्याला. खरंतर उत्पती, स्थिती, लय या निसर्गचक्राचं एक आरं. किंवा शाळेतली माहिती. बाष्प, हवा, धुळ वैगेरेचे ढग होतात मग पाउस पडतो वैगेरे. पण सगळ्या ऋतूंमध्ये त्याला भलताच भाव आहे.
.
.
.
थांबा. मी पाउस हा विषय देत नाहीय.
.
.
.
हां तर मग पाउस हा लाडका ऋतू का आहे? आपण निसर्गालाही नकळत आपल्या भावनांची लेबलं चिकटवतो. मग जसं छोटं मूल आवडतं तसं छोटुले कोंब, गवताची नाजूक पाती आणि शेवाळही आपल्याला आवडतं मग यांना साद घालणारा पाउस का नाही आवडणार?
आपल्या भावनांचा चष्मा चढवूनच आपण निसर्गाकडे बघतो. निसर्गात आपल्या जगण्याचं, भावनांचं प्रतिबिंब शोधतो आणि हो तसंच प्रतिबिंब आपल्याला दिसतं साहित्यातही.
म्हणून तर पावसात भिजणारे माड कधीकधी
"उभारुन कर उभे माड हे शिरी वीरापरी झेलीत वृष्टी" याची आठवण करुन देतात तर सगळ्याच झाडांवर हारीने फणस लगडले असले तरी एखादंच झाड इंदीरा संतांच्या लेकुरवाळा फणसा सारखं दिसतं.
आता या दोन्ही प्रतिबिंबांची सांगड घालणारं छायाचित्र हवयं
म्हणजे
पाउस भरलं आभाळ नेहमीच छायाचित्रात बंदिस्त होतं पण त्या आभाळाला बाधा जडलीय आणि ते वाक-वाकून बघतय अश्या प्रकारचं एखादंच चित्र पुढील ओळींची आठवण करुन देतं.
बाधा जडली आभाळाला.
घुमू लागले
घुमवित घुमवित लाख घागरी;
बघू लागले वाकुन वाकुन
किंवा
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
या ओळींची आठवण करुन देणारा फोटो.
गद्यातही अशी वर्णने असतील. जीएंनी केलेलं हे एक
तापून झळाळणार्या समुद्राचा आत्मा वाळवंटात अतृप्तपणे हिंडत असणारा वारा उष्ण मंद लाटांनी अदृश्यपणे भरकटतो.
किंवा
गूढ आकर्षणाने आपल्याकडे ओढणारा तो निष्पर्ण विशाल खडक.
किंवा
भोवतालचे वाळवंट लहान उंचवट्याच्या सावल्यांचे पडदे हलवत त्यांच्याकडे गूढ नजरेने पहात असे.
किंवा स्वामी मधले अंकुराचे हे वर्णन
तू असाच वर जा.अंधाऱ्या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणाऱ्या ईर्षेने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सूर्यप्रकाशाला भेटू दे.
हो आणि थेट मानवी भावनांशी न जोडणारे पण हे वर्णन.
एका मूर्तीवर, मूठभर जाळ हातात घेऊन गोठवल्याप्रमाणे दिसणारे एक लालभडक द्राशाळाचे फूल होते.
अशी छायाचित्रे आणि त्या बरोबर साजेश्या गद्य किंवा पद्य ओळी.
तर थोडक्यात अशी छायाचित्रे जी निसर्गावर मानवी भावनांचं आरोपण करणार्या एखाद्य़ा कवितेचं किंवा उतार्याची आठवण (आठवा जीएंच्या स्वामी मधलं भिंतीतल्या कोंबाचं वर्णन ) करुन देतील. हो, आणि त्या बरोबर साजेश्या गद्य किंवा पद्य ओळी हव्यातच. (नाहीतर फोटो बाद ). निसर्ग म्हटलं तरी प्राण्यांचे फोटो नकोत.
करा सुरुवात. ओळी आणि फोटो
नियम (मागचेच कॉपी केलेत)
नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट ३ ऑगस्ट २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता/विजेती घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दलचे मार्गदर्शन
*************************************************************************************
हं स्पर्धेची मुदत संपली तरी फारशी छायाचित्रं आलेली नाहीत. (दोनच आलीत असं लिहीणं अगदीच वाईट दिसतं ना. )
कदाचित छायाचित्र काढायचं आणि पूरक ओळीही आपणच शोधायच्या हे जरा अतीच झालं असावं, कारण कधी कधी ओळी आठ्वतात पण त्या तुटक आणि संदर्भाशिवाय. तेव्हा ही थोडीशी मदत.
ग्रेस, पाड्गावकर, बोरकर, इंदीरा यांच्या कवितेतील काही ओळी खाली दिल्या आहेत. त्याला समर्पक छायाचित्र या धाग्यावर प्रकाशित करा, अर्थातच तुम्ही काढलेले. ओळी मुळातच चित्रदर्शी आहेत तेव्हा जास्त छायाचित्रे स्पर्धेसाठी यावीत.
अर्थात मुळचं आव्हान कायम आहेच तुम्ही घेतलेले छायाचित्र आणि जणू त्याच साठी लिहील्यात असं वाटणारे कोणत्याही गद्य उतारा वा काव्य.
अर्थात छायाचित्राबरोबर त्या ओळीही असणं आवश्यक.
(१)शुभ्र बर्फ सर्वदूर गगन तेवढे मुके
पर्णहीन चांदण्यात वृक्ष दोन पोरके
पांढरी मधूर ओळ पापणी हळू मिटे
दरीस टाकूनी उभे नगण्य गाव एकटे.
(२)दूरवर पसरलेली झाडॆ,
महंमदाच्या प्रार्थनेसारखी लांब, प्रदीर्घ
मावळतीच्या रथात बसून सूर्य
सागरतीर्थाला निघाला म्हणजे, दिशांच्या
प्रवाहातून सावल्यांचे कळपच्या कळप
वाहत येतात.....
(३) कोवळ्या पाण्याचा लख्ख आरसा
त्यात डोकावे शुभ्र ढगाचा गुलजार ससा.
सळसळत हा पळस उभा
दूर न्याहळी देवालयाचा कळस नभा.
(४) उठती अलगद
पाण्यावरती तरंग
नुकता न्हाउन संथपणाने खडक वाळवी अंग.
(५) चिंब पाणथळ शिथिल माळ हा
मान टाकूनी पडला तापत
काळी पिवळी फुलपाखरे
ओल्या गवतावरती उडवित.
(६)नक्षत्रांनी बांधून कुंतल रात कोवळी निळी
तलावात मुखबिंब लोकिते पाय टाकूनी जळी
(७) केव्हा येणार मैत्रिण
वाट पाही सोनकेळ
मला बघून हासते
तिचे गोजिरेसे बाळ
स्पर्धेची मुदत वाढवण्यात येत आहे ५ सप्टेंबर २०१५ पर्यंत.
प्रतिक्रिया
चेतनगुणोक्ती! वॉव. वाट पाहत
चेतनगुणोक्ती! वॉव. वाट पाहत आहे. मस्त विषय.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
टाकणार होतो
फोटो टाकणार होतो पण भुस्कुटेतैंचा चेतनागुणोक्ती गुगली पाहून बेत रद्द केला. व्याकरणाची पुस्तकं हुडकून व्याख्येची खातरजमा (जर) झाली तर टाकतो!
-Nile
टाका हो. व्याख्या विषयाला
टाका हो. व्याख्या विषयाला पूर्णपणे लागू होणार नाही. कारण चैतन्यवृतीचे आरोपण केलेल्या अचेतन वस्तू नकोयत.
चला, तूच बोललीस हे बरं झालं!
चला, तूच बोललीस हे बरं झालं! हे म्हणजे च्यायला, कुठे काय सहज वाटेल ते बोलायला चोरी - असं करून ठेवलंय लोकांनी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
छान विषये. एकदम हटके!
छान विषये. एकदम हटके! एंट्र्यांची वाट पाहतोय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वा विषय आणि दिलेली माहिती
वा विषय आणि दिलेली माहिती वाचून लगेच संग्रहित फोटो हुडकावे वाटले... मस्त विषय आणि मांडणी.
चेतनगुणोक्ती चे उदाहरणच आधी आठवले..
आला खुशीत समिंदर, त्याला नाही धीर,
होडीला देईना गं ठरू..
सजणे होडीला बघतोय धरू!!
तांबडं फुटलं आभाळांतरी,
रक्तावाणी चमक पाण्यावरी
तुझ्या गालावर तसं कांही तरी..
झाला खुळा समिंदर, नाजुक होडीवर
लाटांचा धिंगा सुरु
सजणे, होडीला बघतोय धरु!! (अनंत काणेकर)
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
एक कळलं नाही, १८ जुलैला सुरू
एक कळलं नाही, १८ जुलैला सुरू झालेल्या स्पर्धेचा शेवट ३ जुलैला कसा होणार???
धन्यवाद. चूक सुधारली आहे.
धन्यवाद. चूक सुधारली आहे.
फोटो लावणारे बरेच लोक या
फोटो लावणारे बरेच लोक या धाग्यांवर येतात म्हणून इथे अपडेट -
फोटो लावताना विड्थ, हाईट यांच्यापैकी एकच किंवा दोन्ही खोके रिकामे ठेवले तर रिकामा टॅग येऊन काही ब्राऊजर्सवर फोटो दिसत नव्हते. आता अशा रिकाम्या ठेवलेल्या खोक्यांचा HTML code छापला जाणार नाही आणि सगळ्या ब्राऊजर्सवर फोटो व्यवस्थित दिसतील.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जालें काहीचिया बाही
पुलंच्या काही (च्या काही) कवितांपैकी एकः
निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो.
आणि हे त्याचं क्लिशेड् चित्रः
छान. त्या ओळी तर मार्मिक आणि
छान. त्या ओळी तर मार्मिक आणि मस्तच
प्रकाटाआ
प्रकाटाआ
स्पर्धेची मुदत वाढवलीय ५
स्पर्धेची मुदत वाढवलीय ५ सप्टेंबर २०१५ पर्यंत.
अरेरे...
मला वाटलं आता चेतनगुणोक्ती वर दुसरं कोणीच नाही तर आपला नंबर येणार हमखास! पहिला किंवा दुसरा (दुसर्याची शक्यता जास्त! अपना नसीब-'अकेला दौडा तो भी सेकंड आयेगा' टाईप है)
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
(दुसर्याची शक्यता जास्त!
कसली हसते आहे.
उत्खनन
किंचित उत्खनन.
अवांतर - आव्हानाचा विषय हा सरळ एखाद-दोन शब्दांत देण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्याबद्दल काय मत आहे? हा थीमचा प्रयोग अनोखा असला तरी प्रतिसादांच्या दृष्टीने अनाथ/अनॅथमा ठरतो आहे, असं वाटतं. मुळात फोटोंच्या ढिगार्यातून फोटो शोधा, त्यांच्यावर संस्करण करा, ते फ्लिकरवर/अन्यत्र चढवून त्यांचा दुवा येथे द्या - या सार्या सव्यात हे द्राविडी अपसव्य१ अधिक त्रासदायक होत असावे. ('प्रतिसादों से स्पर्धा है, स्पर्धा से प्रतिसाद नहीं' इ. इ.)
१. मिश्र-रूपक?
हं जड अंत:करणाने अनुमोदन!
हं
जड अंत:करणाने अनुमोदन!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
किंचित अवांतर
मी मागे म्हटल्याप्रमाणे मुळात साधा-सोपा विषय का देऊ नये?
शिवाय शब्दबंबाळ भाषेत हा विषय दिल्यामुळे असे झाले आहे का? याचा विचार करावा. एकंदरीत ऐसीवर बर्याचदा क्लिष्ट भाषेत लिहिले जाते, असा अनुभव आहे. त्याऐवजी आपण घरी जसे बोलतो, तसे लिहिले तर ते समजण्यास सोपे जाईल असे वाटते. (माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित मत.)
याच संदर्भात नुकताच वाचलेला विनोदः
मुझे भी आज हिंदी बोलने का शौक हुआ,
घर से निकला और एक ऑटो वाले से पूछा,
"त्री चक्रीय चालक पूरे सुभाष नगर के परिभ्रमण में कितनी मुद्रायें व्यय होंगी ?"
ऑटो वाले ने कहा, "अबे हिंदी में बोल रे.."
मैंने कहा, "श्रीमान मै हिंदी में ही वार्तालाप कर रहा हूँ।"
ऑटो वाले ने कहा, "चलो बैठो, कहाँ चलोगे ?"
मैंने कहा, "परिसदन चलो"
ऑटो वाला फिर चकराया ! "अब ये परिसदन क्या है ?
बगल वाले श्रीमान ने कहा, "अरे सर्किट हाउस जाएगा"
ऑटो वाले ने सर खुजाया बोला, "बैठिये प्रभु"
रास्ते में मैंने पूछा, "इस नगर में कितने छवि गृह हैं ??"
ऑटो वाले ने कहा, "छवि गृह मतलब ??"
मैंने कहा, "चलचित्र मंदिर"
उसने कहा, "यहाँ बहुत मंदिर हैं ...राम मंदिर, हनुमान मंदिर, जगन्नाथ मंदिर, शिव मंदिर"
मैंने कहा, "भाई, में तो चलचित्र मंदिर की बात कर रहा हूँ जिसमें नायक तथा नायिका प्रेमालाप करते हैं ..."
ऑटो वाला फिर चकराया,
"ये चलचित्र मंदिर क्या होता है ??"
यही सोचते सोचते उसने सामने वाली गाडी में टक्कर मार दी
ऑटो का अगला चक्का टेढ़ा हो गया और हवा निकल गई।
मैंने कहा, "त्री चक्रीय चालक तुम्हारा अग्र चक्र तो वक्र हो गया ..."
ऑटो वाले ने मुझे घूर कर देखा और कहा, "उतर जल्दी उतर !
आगे पंचर की दुकान थी हम ने दुकान वाले से कहा....
हे त्रिचक्र वाहिनी सुधारक महोदय कृप्या अपने वायु ठूंसक यंत्र से मेरे त्रिचक्र वाहिनी के द्वितीय चक्र में वायु ठूंस दीजिये धन्यबाद
दूकानदार बोला कमीने सुबह से बोनी नहीं हुई और तू शलोक सुना रहा है।
हॅ विनोद छानेय पण एवढ्या
हॅ विनोद छानेय पण एवढ्या क्लिष्ट भाषेत मी लिहीते असं वाटत नाही.
विषय साधा, सोपा आणि अगदी भरपूर स्वातंत्र्य देणारा आहे. पण बरेचदा "जा काय हवं ते कर" असं म्हटल्यावर म्हटल्यावर काय करावं ते कळत नाही तसं असावं .किंवा मी जास्त स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जो नीट जमला नाही.
तरी जास्त एन्ट्रीज नसल्याने विषय बदलण्यात येईल.
'निक्काल?'
५ सप्टेंबरही गेला..आता गणपूर्ती अभावी
सभाचस्पर्धाच तहकूब झाली की काय?कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
स्पर्धेचा निकाल
छायाचित्र स्पर्धेचा निकालाचा दिवस उलटून गेला तरीही स्पर्धेसाठी पुरेशी छायाचित्रे आलेली नाहीत. बरं स्पर्धेत ठराविक संख्येने प्रवेशिका यायलाच हव्यात असा काही नियम नाही. तेव्हा जी काही दोन छायाचित्रे आली त्यातच स्पर्धा लावणे क्रमप्राप्त आहे.
माझ्या समजानुसार फोटो हा चौकटीशिवायही पूर्ण वाटला पाहिजे. त्यात काहीतरी राहिलयं असं वाटता कामा नये. त्या कसोटीवर नंदन यांचे छायाचित्र उतरत आहे. शिवाय ओळींना न्याय देणारा क्किंवा त्याच फोटोला बघून लिहील्यासारख्या भासणार्६य कवितेच्या ओळी.
तेव्हा नंदन हे या स्पर्धेचे विजेते म्हणून घोषित करण्यात येत आहे.
नंदन यांचे अभिनंदन आणि अर्थात पुढील स्पर्धेचे आव्हान नंदन यांनी द्यावे.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
पर्व तिसरे सुरू करून
पर्व तिसरे सुरू करून पूर्वीप्रमाणे (पहिल्या पर्वाप्रमाणे) सरळ व थेट विषय द्यावा अशी श्री नंदन यांना विनंती
आणि अभिनंदन
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!