तीन आठवणी
('उपक्रम'मध्ये पूर्वप्रकाशित.)
आपणा सर्वांना आपल्या लहानपणापासूनच्या खूप आठवणी असतात पण त्यापैकी काही त्या लहान अजाणत्या वयातहि मनावर खोल ठसा उमटवतात कारण त्यामागचे प्रसंग काही स्वतःचे वैशिष्टय असलेले आहेत ह्याची कोठेतरी जाणीव असते. असेच माझ्या स्मृतीतील हे तीन प्रसंग.
१५ ऑगस्ट १९४७.
पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मी पावणेपाच वर्षांचा होतो. सातार्यात मनुताई अभ्यंकर ह्यांनी नुकतीच गावातील पहिली माँटेसोरी शाळा सुरू केली होती आणि तिचा मी पहिल्या दिवसापासूनचा विद्यार्थी होतो. इंग्रजी राज्य, स्वातन्त्र्य असा कशाचाच अर्थ मला माहीत नव्हता. (नाही म्हणायला माझ्या आतेभावाने केव्हातरी वापरलेला 'टॉमीज' हा शब्द मी ऐकलेला होता आणि माझ्या आठवणीतहि राहिलेला होता. सातारच्या हजेरीमाळावर एक जळून काळेठिक्कर पडलेले एक विमान बघण्यास आम्ही गेलो होतो असेहि मला आठवते. ते जर्मन विमान आहे अशी सातार्यातल्या रिकामटेकडया पब्लिकची खात्री झाली होती!)
आमची शाळा सातारच्या कन्याशाळेच्याच आवारात अगदी मागे एका लांब खोलीत भरत असे. १५ ऑगस्टला आम्हा सर्वांना शाळेत आणून खोलीबाहेरच्या मोकळया मैदानात १०-१२ फूट उंच बांबूवर झेंडा फडकविण्यात आला. नंतर आम्ही सर्वजण खोलीत इकडेतिकडे खेळत असतांना एका खोक्यावरून उडी मारताना मला एक खिळा लागून गुढघ्यातून रक्त येऊ लागले आणि मी भोकाड पसरले. माझी आत्या तेव्हा कन्याशाळेतच शिकत होती. तिला बोलावून माझी घरी रवानगी करण्यात आली. गोड शिरा प्रसाद म्हणून केला होता तो मी जाण्यापूर्वी खाल्ला आणि तिरंगी झेंडयाचा रुपयाच्या आकाराचा बिल्ला घेऊन घरी गेलो अशी मला ह्या दिवसाची स्पष्ट आठवण आहे.
गांधीहत्या आणि जळित.
त्यानंतर ५ महिन्यातलाच हा पुढचा प्रसंग.
आमचे शंभर वर्षांचे जुने घर सातार्याच्या शुक्रवार पेठेत होते. हा भाग जवळजवळ पूर्णपणे ब्राह्मणेतर जातीतील घरांचा होता. आम्ही आणि अजून तीनच ब्राह्मण घरे पेठेत होती. आमचे पेठेत सर्वांशी उत्तम घरोब्याचे संबंध होते. आमचे सर्व खेळगडी आसपासच्या घरातील होते. माझ्या आजोबांना एक जुने वृद्ध गृहस्थ म्हणून पेठेत मान होता, आमचे शेजारी अनेक बाबीत त्यांना सल्ला विचारीत असत आणि आसपासची त्यांच्या वयाची जुनी मंडळी पुष्कळ वेळा शिळोप्य़ाच्या गप्पा करण्यासाठी आमच्या ओसरीवर बसत असत. आमचा हिंदुमहासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे राजकारण ह्यांच्याशी काही संबंध नव्हता. माझे आजोबा हे महादेव गोविंद रानडे ह्यांचे समजूतदार आणि समावेशक विचार मानणारे होते.
३० जानेवारी ह्या दिवशी महात्मा गांधींवर नथुरामने गोळया झाडल्या आणि एकदोन दिवसातच महाराष्ट्रात ऐतिहासिक काळापासून खदखदत असलेला ब्राह्मण-अब्राह्मण वाद अनपेक्षित रीत्या वर उफाळून आला. ह्या हत्येबाबत सर्व ब्राह्मण समाजाला उत्तरदायी मानून त्यांची घरे जाळण्यासाठी ही उत्तम सबब आहे आहे काही समाजकंटकांनी ठरविले.
घटनेनंतर एकदोन दिवसातच ब्राह्मणांची घरे जाळण्याची लाट महाराष्ट्रात - विशेषत: दक्षिणेकडील जिल्ह्यात - सुरू झाली. आमचे घरहि त्या लाटेत सापडले. ३० जानेवारीनंतर एकदोन दिवसात दुपारी एकच्या सुमारास माझ्या आ़ईने जेवणाची पाने घेतली होती. माझ्या आजोबांचे धाकटे भाऊ चिंतामणराव कोल्हटकर त्या समयी आमचे घरी आले होते. तेव्हा ते पुण्यास राहात असत. माझे वडील व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी गेले होते. जेवायला बसणार एव्हढयात ४०-५० जणांचा एक जथा आमच्या घरात शिरला आणि घारातील सर्वांनी बाहेर पडावे कारण घर जाळण्यात येणार आहे असे त्यांनी आजोबांना सांगितले. विरोध करण्याता काहीच अर्थ नव्हता. कोणास मारहाण, दुखापत वा शारीरिक इजा होऊ नये होऊ नये म्हणून आजोबांनी सर्वांना बाहेर काढले आणि आमच्या घरासमोरच्या पवारांच्या घराच्या पायरीवर ते स्वतः जाऊन बसले. मी थोडा मागे रेंगाळलो होतो. झुंडीपैकी एका माणसाने खर्या मायेच्या शब्दात 'बाळ, बाहेर जा, नाहीतर तुला लागेल' असे मला सांगितले असे स्पष्ट आठवते. त्यावेळेस तो त्याच्याबरोबरच्या अन्य गुंडांबरोबर आमच्या फर्निचरची मोडतोड करण्याच्या कार्यात मग्न होता.
आमच्या घराच्याच निम्म्या भागात आमचा जुना छापखान्याचा चालू व्यवसाय होता. तेथे भरपूर कागद आणि कटिंग मशीनचे कचरण पडलेले होते. जमावाने त्याचे बोळे केले आणि त्यांवर रॉकेल टाकून ते बोळे घराच्या लाकडी आढयात टाकले. त्यामुळे घराचा लाकडी सांगाडा पेटू लागला. छपाईची यन्त्रे तोडणे वा त्यांची नासधूस करणे, छापखान्यातील टाईप जमिनीवर ओतून टाकून त्याची पै करणे, असेहि विध्वंसक प्रकार जमावाने सुरू केले. (एकमेकात मिसळलेल्या आणि त्यामुळे निरुपयोगी ठरलेल्या टाइपाला 'पै' म्हणतात.)
२०-२५ मिनिटे हा धुमाकूळ चालू असता अचानक पोलिस आल्याची आवई उठली. ती वस्तुत: खोटी होती. आमच्या शेजार्यांपैकी कोणीतरी ती वावडी उडवली होती पण तिला घाबरून जमाव जसा आला तसाच दोन मिनिटात तेथून नाहीसा झाला.
आमचे शेजारी त्वरित जमा झाले आणि साखळी करून त्यांनी जवळच्या ओढयातून पाणी आणून लागलेली आग हळूहळू विझवली. मुख्य प्रसंग संपला. आम्हाला कसलीच शारीरिक इजा झाली नाही पण आर्थिक नुकसान खूप झाले. एक-दोन दिवसांनंतर तेव्हाचे एक मंत्री गणपतराव तपासे आमच्याकडे पाहणीसाठी आले होते. सरकारातून यथाकाल कही रक्कम मदत म्हणून आणि काही कर्ज म्हणून मिळाली. वडील हप्त्याहप्त्याने कर्ज फेडीत असतांनाच द्वैभाषिक आले आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. माझ्या तेव्हाच्या आठवणीनुसार नव्या सरकारने जे अगदी पहिलेपहिले काही निर्णय घेतले त्यांमध्ये जळित कर्जाची बाकी माफ करण्याचा निर्णय होता. यशवंतरावांचे बेरजेचे राजकारण असे होते.
आमच्या घरापैकी छापखान्याची बाजू पुष्कळच जळली होती आणि ती बरीचशी नव्याने बांधावी लागली. निम्मी घराची बाजू त्यामानाने ठीक होती. तरीहि ह्या प्रसंगाची आठवण म्हणून आगीची धग लागलेल्या तुळया अखेरपर्यंत तेथे होत्या.
ह्या गंभीर प्रसंगाला असलेली एक विनोदी झालरहि आठवते. युद्धानंतरचे ते दिवस रेशनिंगचे होते आणि आम्हाला रेशनमध्ये 'मिलो' -ज्याला लोक विनोदाने 'मेलो मेलो' म्हणत - नावाचा तांबडा जोंधळा मिळत असे आणि त्याच्या बेचव भाकर्या हे आमचे मुख्य खाणे असे. ते मला बिलकुल आवडत नसे. मला आवडायच्या त्या गव्हाच्या पोळया, ज्या आमच्या वाटयाला कधीमधीच यायच्या.
घर जळल्यानंतर आम्हां मुलांना काही दिवस दुसरीकडे ठेवण्याचे ठरले. आमच्याच पेठेत आगटे नावाचे कुटुंब होते. त्यांच्याकडे जमावाची दृष्टि वळली नव्हती. जळिताच्या दिवशी त्यांच्याकडे आमची पाठवणी करण्याचे ठरले. ह्या बातमीमुळे मला मनातून बर्यापैकी आनंद झाला कारण आगटयांकडे नेहमी पोळया असतात अशी माझी बालबुद्धीची समज होती आणि त्यामुळे आज आपण जेवायला पोळया खाणार ही समजूत माझ्या उल्हसित मनोवृत्तीचे कारण होती. ह्यातली irony मला तेव्हाच जाणवली असली पाहिजे कारण तीमुळेच माझा हा बालिश आनंद माझ्या स्मृतीत टिकून राहिला आहे.
मादाम माँटेसोरी.
ह्या जगविख्यात बाईंशी प्रत्यक्ष बोलण्याची संधि मला मिळाली आहे अशी माझी समजूत आहे. प्रसंग असा.
अशी मला एक आठवण आहे की माँटेसोरी शाळेत एक दिवशी आमच्या बाई मनुताई ह्या एका उंच, गोर्या आणि मेमसाहेबासारख्या वेषातल्या बाईंना घेऊन आल्या होत्या. आम्ही सर्व मुले भिंतीपाशी रांगेने बसलो होतो. आमच्या शिस्तीनुसार वर्गात शिरण्यापूर्वी चपला-बूट बाहेर काढायची पद्धत होती. गोर्या बाई बुटासकट आत आल्याचे पाहून मी त्यांना मराठीत सांगितले, 'बूट बाहेर काढून या, नाहीतर मनुताई रागावतील.' मुलगा काय म्हणतो आहे असे बाईनी विचारले आणि जेव्हा त्यांना हे इंग्लिशमध्ये सांगण्यात आले तेव्हा त्या हसून बाहेर गेल्या आणि बूट उतरवून आत आल्या. हा प्रसंग एखाद्या चित्रासारखा माझ्या आठवणीत टिकून राहिला आहे.
ह्या बाई कोण हे सांगणारे मात्र नंतर कोणीच मला भेटलेले नाही. 
अलीकडेच कर्मधर्मसंयोगाने मला ह्या कोडयाच्या उत्तराचा धागा सापडला तो असा. इंटरनेटवर चाळताचाळता केवळ अपघातानेच मला एके ठिकाणी मादाम मोंटेसोरींची थोडी माहिती दिसली. आपल्या माँटेसोरी चळवळीच्या प्रसारासाठी १९३९ साली थिऑसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून त्या हिंदुस्तानात आल्या होत्या. तेव्हाच दुसरे महायुद्ध सुरू झाले. माँटेसोरी ह्या नागरिकत्वाने इटालियन. त्यांचे मुसोलिनी सरकारशी पटत नव्हते म्हणून त्या हॉलंडमध्ये राहात असत. तरीहि त्या इटालियन असल्याने ब्रिटिश सरकारने त्यांना परतीच्या प्रवासाची परवानगी नाकारली. तदनंतर युद्धाची सर्व वर्षे त्यांनी कोडाईकनाल येथे काढली. त्यांना अन्य कोणताच त्रास झाला नाही. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्थान लक्षात घेऊन स्वत: वॉइसरॉय त्यांची ख्यालीखुशाली मधूनमधून विचारीत असे. कोडाईकनालमध्ये असतांना बाईंनी अनेक हिंदुस्तानी तरुणींना आपल्या माँटेसोरी पद्धतीचे शिक्षण दिले होते. आमच्या मनुताई त्यांपैकीच एक होत्या आणि ते शिक्षण घेऊन आल्यावर सातार्यात त्यांनी स्वतःची माँटेसोरी शाळा सुरू केली होती.
युद्धानंतर माँटेसोरीबाई युरोपात परतल्या पण ४६-४७ साली त्या पुनः हिंदुस्तानात आल्या होत्या. एव्हढे समजल्यावर मी येथील लायब्ररीमधून त्यांचे एक चरित्र आणले आणि त्यात मला असा उल्लेख सापडला की भारतातील ह्या दुसर्या मुक्कामात त्यांनी पुण्यास भेट दिली होती.
आता चित्र मला स्पष्ट झाले. सातारा-पुणे अंतर केवळ ६९ मैल आहे आणि खाजगी गाडीने दोन-अडीच तासात सहज पार करता येत असे. (त्याच सुमारास एस.टी. नव्यानेच सुरू झाली आणि एस.टी. गाडया सर्व थांबे घेऊनहि हे अंतर ३ तासात करीत असत हे मला चांगले आठवते.) आपल्याच एका विद्यार्थिनीने (म्हणजे मनुताई) सुरू केलेली माँटेसोरी शाळा पाहण्यासाठी माँटेसोरीबाई एका दिवसाच्या धावत्या दौर्यावर सातार्याला आल्या असणार आणि त्यामुळे वर्गात येण्यापूर्वी बूट बाहेर ठेवावे हा अमूल्य सल्ला त्यांना माझ्यापासून मिळाला असणार!
आता माझा नातू असाच एका माँटेसोरी शाळेमध्ये जातो. एकदा त्याच्या शाळेत त्याला आणायला मी गेलो असता हॉलमध्ये बाईंचा फोटो पाहिला. प्रिन्सिपॉलना मी माझी ही गोष्ट सांगितली. ती ऐकून ते इतके आनंदित झाले की त्यांनी तो मजकडून लिहवून घेतली आणि माँटेसोरी चळवळीच्या एका मासिकात छापवून आणली!
ललित लेखनाचा प्रकार
जळीत प्रकारणाविषयी मला नेहमीच
जळीत प्रकारणाविषयी मला नेहमीच कुतूहल वाटतं. बऱ्याच आठवणींमध्ये समान धागे असतात:
१. जमावाने जीवितहानी केली नाही
२. जळीताचा तेवढयापुरता उद्रेक सोडला तर ब्राह्मण कुटुंबांना मदतच केली
३. घरं जाळणं वगळता इतर काही जमावसुलभ कृत्यं केली नाहीत (उदा० एकट्यादुकट्याला गाठून हल्ला)
४. बिघडलेली परिस्थिती झपाट्याने सुधारली
एखाद्या समाजावर डूख ठेवून केलेल्या हल्ल्यांपेक्षा (उदा० इंदिराहत्या-दिल्ली-शीख किंवा गोधरा-गुजरात-मुस्लिम) हे वेगळं आहे. असं का? हे काय गौडबंगाल आहे?
जळित झाले कारण ते
जळित झाले कारण ते निमित्तमात्र होते- पण शतकानुशतकांच्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे कारण हेही निमित्तच. खरे कारण इतकेच की ज्यांची या ना त्या कारणामुळे ब्राह्मणांशी खुन्नस होती त्यांनी या निमित्ताने उट्टे काढले. सांगली-मिरजेत अशी अनेक उदा. आहेत. जे सावकार लोक इ. होते आणि ज्यांच्याकडून त्रास झाला किंवा ज्यांच्याशी पटत नसे अशांवर तेव्हा हात साफ करण्यात आले. आणि या जमावात काँग्रेसचे म्हणावेत असे लोकही तसे कमीच होते, मिस्लेनियस गर्दीच जास्त.
दोन्ही भागांतले टेन्शन जितके जास्त तितकी जळिताची तीव्रताही जास्त. दक्षिण भागात यांमध्ये रावडीगिरीही बर्यापैकी होत असे त्याचा हा परिणाम असावा असा एक तर्क आहे.
अ केस इन पॉइंट - मिरजेतील ऑलमोस्ट सगळ्या जुन्या तालमी ब्राह्मणांनी सुरू केलेल्या आहेत.
आमचे मिरजेतील जुने घर जाळण्यात आले नाही कारण पणजोबा काँग्रेसी होते आणि दुसरे म्हणजे घरही जुम्मा मशिदीला ऑलमोस्ट लागूनच होते/आहे. हाही एक रोचक प्रकार- ब्राह्मणपुरी अशा नावाने ओळखल्या जाणार्या भागाच्या मधोमध मशीद. (याचे कारण इतकेच की इस्लामी नगररचनाशास्त्राप्रमाणे मशीद शहराच्या केंद्रभागी असते. पण मशीद बांधल्यानंतर शहराचे 'केंद्र' तिथून हलले आणि मुसलमानांनी आपली वस्ती तिथून दुसरीकडे हलवली आणि त्या ठिकाणी हिंदू येऊन राहू लागले, इथवर की त्याला नावही ब्राह्मणपुरी असे ठेवण्यात आले.)
शक्य आहे.
बरेचदा जमावाला विरोध करता येत नाही म्हणूनसुद्धा अनेकांनी अमानुष  कृत्यात भाग घेतला आहे. व्यक्तिगत पातळीवर माणुसकी जपणे जितके शक्य असेल तितके लोक करतात, असे निरिक्षण आहे.
काही वेळा मात्र जमाव खुनशी बनतो. माझ्या माहितीत महाराष्ट्र-कर्नाटक वादात एका कापड दुकानदाराला जमावाने दुकानाला बाहेरून कडी घालून दुकानासहित जिवंत जाळले होते.
कारण तितकी कटुता मुळात
कारण तितकी कटुता मुळात नव्हतीच असे वाटते.
हे जास्त पटणेबल आहे.
आमच्या आजोबांचे घर + दुकान सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात होते. दोन्ही जाळून भस्म केले गेले. प्रत्येकी दहा पोती धान्य (तांदूळ वगैरे), डाळीची पोती, सुकामेवा, मसाल्यांचे डबे हे सगळे भस्मसात झाले. दुसर्या दिवशी घालायला कपडे, खायला अन्न नव्हते कुटुंबियांकडे. पण व्यक्तिगत इजा कोणासही केली नाही. बाबा त्यावेळी ५ - ७ वर्षांचे असावेत. नंतर शेजारची एक ब्राह्मणेतर स्त्री नित्यनेमाने आमच्या घरी (बाबांना व त्यांच्या सर्व भावंडांना) जेवण आणून देत होती. किमान महिना दोन महीने. १९९४ मधे मी तिला भेटलो सुद्धा होतो. त्यावेळी ती वृद्ध झालेली होती अर्थात.
कटुता कमी होती त्याचे एक कारण म्हंजे (माझ्या मते) काही स्वातंत्र्यसैनिक भूमिगत झाल्यावर आमच्या शेतात रहायला येत असत असे माझ्या कै. आजीने सांगितल्याचे आठवते. दुसरे म्हंजे आमचे एक नातेवाईक खूप पूर्वी त्यांनी अध्यात्मिक जीवन स्वीकारून समाधी का काहीतरी घेतलेली होती. (जिवंतपणी समाधी घेतली की कसे ते माहीती नाही.) आजही ती समाधी तिथे आहे. ग्रामदेवतेच्या मंदिराशेजारी. त्यामुळे हे कुटुंब आध्यात्मिक, सत्प्रवृत्त आहे असा समज असावा लोकांचा. (अशा या सत्प्रवृत्त कुटुंबात पुढे गब्बर सारखा खलपुरुष जन्मास आला.).
वि रा करकरे हे आमचे दूरचे नातेवाईक होते. पण याची कल्पना गावात किती जणांना होती ते माहीती नाही. कल्पना असती तर परिणाम जास्त सिव्हिअर झाला असता कदाचित.
मादाम माँटेसोरी. एखाद्या
मादाम माँटेसोरी.
एखाद्या कार्यात उत्कट आस्था असणार्या महान व्यक्तिशी थेट संबंध येणं भाग्याचं आहे.
"गोर्या बाई बुटासकट आत आल्याचे पाहून मी त्यांना मराठीत सांगितले, 'बूट बाहेर काढून या, नाहीतर मनुताई रागावतील.' मुलगा काय म्हणतो आहे असे बाईनी विचारले आणि जेव्हा त्यांना हे इंग्लिशमध्ये सांगण्यात आले तेव्हा त्या हसून बाहेर गेल्या आणि बूट उतरवून आत आल्या."
या वाक्यासोबत बालपणीचे कोल्हटकर कल्पायला मजा आली.
--------------------------------------
तिन्ही स्टोर्या छान आहेत. आपल्याकडे अशा चिकार स्टोर्यांचा खजाना असणार आहे. इथे लिहाव्या वाटतील अशा अजून काही इंटेरेस्टिंग कथा सुचल्या तर मजा येणार आहे.
मला पण खूप आवडल्या आठवणी .
मला पण खूप आवडल्या आठवणी . माझ्या आज्जीकडे अशा खूप आठवणी असायच्या/ आहेत . आणि लहानपणी इतर गोष्टी ऐकण्यापेक्षा त्या ऐकण्यातच जास्त रस असायचा (अजूनही असतो ) .
तिच्या आजोबांचं घर पण गांधीहत्येनंतर जाळलं होतं आणि लाकडी तुळयांत वगैरे ठेवलेलं (लपवून कि कसं ते माहिती नाही ) सोनं वितळून बाहेर आलं . लोक ते घ्यायला गेले तर अर्थात त्यांचे हात भाजले. नंतर हात भाजलेले लोक परत त्यांच्याकडेच उपचाराला आले होते ( आज्जीचे आजोबा वैद्य होते ).
फाळणी नंतर सिंधी ( आज्जी त्यांना निर्वासित म्हणते पण ते बरोबर नाही ) आले  त्या पण गोष्टी आहेत तिच्याकडे .
तुमच्याकडे फाळणीच्या काही आठवणी असतील तर लिहा ना .  मला  ज्यांना फाळणीमुळे कायमचं स्थलांतर करावं लागलं त्यांच्याबद्दल खूपच वाईट वाटत आलेलं आहे . 
आठवणी आवडल्या .
माझ्या आजोबांचे धाकटे भाऊ चिंतामणराव कोल्हटकर त्या समयी आमचे घरी आले होते
चिंतामण रावांच्या आठवणी लिहा ही विनंती.
घरे जाळली पण स्त्रियांवर अत्याचार , मनुष्यहानी आणि लुटमार ही तुलनेने कमी झाली हा विरोधामास माणसाचे मन विचित्र आहे हेच सिद्ध  करणारा आहे. अश्या प्रसंगी 'अत्याचाराला ' जशी सुरवात होते तीच पद्धत पुढे रेटली जाते असेही निरीक्षण आहे. उदा -
१.मुंबई दंगली मध्ये दुकाने फोडण्याचा patern होता.
२.दिल्ली दंगलीमध्ये जिवंत जाळणे हे मुख्य दुष्कृत्य होते.
३.हिंदू मुस्लीम दंगली मध्ये पोलीस ठाण्यावर प्रथम हल्ला होतो.
४.कोलकत्यात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते ( बस जाळणे ! )
ह्याला काय कारण असावे ?
 
         
मजेशीर आहेत आठवणी. आवडल्या. (
मजेशीर आहेत आठवणी. आवडल्या. ( ऑफ्कोर्स, घर जाळणं वगैरे सोडून.)