सालं एक द्राक्ष

ऑफ स्पिनसारखा हात फिरवून घड्याळात पाहिलं. डाव्या हातावर बराच मोठा काळा फरांटा उठला होता. घड्याळावर बरेच छोटे ओरखडे आलेले दिसले. "च्यायला! या घड्याळावर ओरखडे उठण्याआधी माझ्या हाताला जखमा का झाल्या नाहीत. हे माझं सगळ्यात आवडतं घड्याळ आहे." मागचं घड्याळ गाडीत मारलं गेलं तेव्हाही मी हेच म्हटलं होतं; स्वतःशीच बोलताना काहीही म्हटलेलं चालतं. कोण बघायला येतंय आपण किती सुसंबद्ध बोलतोय ते! "अगं सुसंबद्धतेचं काय घेऊन बसल्येस, किती वाजले ते कोण पाहणार? तुझा काका?" मी स्वतःला जरा दटावलंच. अजून संध्याकाळच्या शोसाठी तासभर बाकी होता. कावळ्याची आंघोळ करून घराबाहेर पडायचं म्हटलं तरी अर्धा तासात शोधमोहीम आवरती घ्यायला लागणार होती. का फोन करून संध्याकाळचा बेत रद्द करायचा? फारतर समीर नावं ठेवेल. नेहेमी मी त्याला वेळेत न येण्याबद्दल बोलते, आता कधीतरी त्याला चिडवायची संधी मिळाली तर काय बिघडतं? नाही, असं कसं! एकदा वचन दिलं म्हणजे दिलं. अजून अर्धा तास आहे ठरवायला, तोपर्यंत शोधमोहीम पुढे सुरू ठेवूया. आता मी दोन-तीन हीरांच्या जुडीचं शस्त्र बनवून शोधायला पुन्हा नव्या दमाने सुरुवात केली.

तीन तास चौदा मिनीटांपूर्वी दुपारच्या उन्हातून घरी आले तर जेवण तयार होतं. कढईवरचं झाकण काढलं तर कसलातरी पाला पिवळ्या रंगाच्या काल्यात मिसळलेला दिसला. सकाळी घातलेल्या लसणीच्या फोडणीचा वासही अजून हवेत तरंगत होता. भूक लागली होती, पण एवढ्या उन्हात हे काहीच खाण्याची इच्छा नव्हती. मला सनिमातल्या हिरविणीसारखं दिवाणावर पडून, हवेत तंगड्या झाडत पुस्तक वाचत लोळायचं होतं. लघुकथांचं आणलेलं पुस्तक आता वाचलं नाही तर त्या कथांना मोड फुटून प्रत्येक कथेची कादंबरी होईल आणि मग चाराच्या जागी चारशे पानं वाचावी लागतील अशी भीती मला वाटायला लागली होती. पोळीत तो पाल्याचा काला गुंडाळला. काहीतरी गोड पाहिजे बुवा! फ्रिजमध्ये थोडं दूध, दही, दोन वर्षं जुना जॅम आणि काही द्राक्षं एवढाच ऐवज होता. जॅम नको. या उन्हात गोडमिट्ट काहीही नको. द्राक्षं ... ती जरा जास्तच ताजी आहेत. जऽरा कुस्करली, दोन महिने बाहेर ठेवली, एका बरणीतून दुसऱ्या बरणीत करत बसलं तर काय मस्त वाईन तयार होईल. असो. आत्ता गोडाची भूक लागल्ये

अर्धा तास आधीच समीरचा फोन आला. तो कदाचित वेळेच्या आधीच पोहोचण्याची शक्यता आहे, म्हणून घरीच येईल. अरे कर्मा! अर्र, अरे वा! त्यालाही शोधमोहीमेचा भाग बनवून घेता येईल. तसा त्याचा फायदा फार नाही, कदाचित तो थोडी करमणूकही करेल. पण त्याचे भिक्कारडे जोक्स सहन करण्यापेक्षा त्याला कामाला लावलेलंच बरं. असं कसं हरवलं, कुठे हरवलं, कधी हरवलं, का हरवलं, आता हरवलं तर हरवलं ... या सगळ्या संवादाला काय अर्थ आहे! तो काम करेल याची काही शाश्वती नाही. पण निदान पायात खोडा अडकवला नाही म्हणजे मिळवलं.

तेवढ्यात पुन्हा कोकिळादिदी आली. तिचा शोधमोहीमेत काही फायदा नाही. एखादा उंदीर शोधायचा असेल तरीसुद्धा तिचा काहीही फायदा नाही. आपल्याला हवं ते शोधायला ती येईल याची काहीही खात्री नाही. ती तिला हवं तेच करणार. तशी स्वभावाने बरी आहे, पांढरेस्वच्छ कपडे घातलेले असले तरीही ती अंगावर चढून कपडे खराब करेल अशी भीती वाटत नाही. शिवाय अधूनमधून पोटरीला डोकं घासते तेव्हा छान वाटतं. पण आत्ता वेळ आल्ये तर ती समीरच्याच बाजूची निघणार. मी जमिनीवर झोपून फ्रीजच्या खाली बघायला लागले की ही माझ्या डोक्यावर चढणार, हात फ्रीजखाली घातला की माझ्याच हाताला डावली मारणार. फ्रीजच्या खालची गोष्ट कशी शोधायची? तो काय पेडर रोडचा नसलेला फ्लायओव्हर आहे का की वरून बघितलं लगेच दिसलं तिथे काय आहे ते! हाताला लागतंय काहीतरी गोलसर, गुळगुळीतही आहे. दिदी, जरा बाजूला हो गं. भलत्या वेळेला काय पंख्याखालची जागा मोनोपॉली असल्यासारखी अडवून बसतेस! मगाशी तू नक्की कसला फुटबॉल केला होतास गं बये? माझं द्राक्ष तर नव्हतं ना ते?

शोधताना

ते द्राक्ष मला शेवटचं दिसलं तेव्हा ते माझ्या पायावर पडलं, नंतर कोकिळादिदीच्या शेपटीचा फटकारा त्याला बसला, दिदी दचकली आणि द्राक्ष कुठेतरी गडगडत गेलं. कुठे ते डोळ्यांच्या कोपऱ्यातून नीट दिसलं नाही, दिदीची शेपटी आडवी आली. मी नमाजाला बसल्यासारखी दिदीच्या शेजारी जाऊन बसले आणि चारही बाजूंनी कपाटं आणि फ्रीजखाली बघायचा प्रयत्न केला. गाल जमिनीला लावून शोधायचं म्हटलं तर चष्मा आड यायला लागला. चष्मा काढला तर लांबचं काही दिसेना, त्यात तिथे अंधार. तरीही निमित्त साधून दिदीला जागचं हलवायचा प्रयत्न केला. ही भिकारडी नेहेमी मला हवी तीच खुर्ची बळकावयच्या प्रयत्नात असते. तिने फक्त शेपटी हलवली. आत्ता तिच्याशी इगो-फाईट करायला मला वेळ नव्हता. प्रश्न स्वप्रतिमेचा होता.

मी धुण्याची काठी शोधायला सुरुवात केली. खाली-वर करता येणाऱ्या कपड्यांच्या दोऱ्यांचे संच मिळायला लागल्यापासून ती अडगळीतच जाऊन पडली होती. ह्या निमित्ताने ती स्वच्छ झाली. काठी आणल्यावरही दिदी हलली नाही. मी तिला फटकावणार नाही एवढा विश्वास तिच्याकडे कुठून येतो? जाऊदे तिचं नंतर बघू. ती कुठे जाणार आहे मला सोडून! दिदीला वर्तुळाचा केंद्र मानून मी सगळ्या दिशेने काठी फिरवली तरीही द्राक्ष कुठूनही बाहेर आलं नाही. बऱ्याच ठिकाणी काठीच अडकली आणि शिवाय काठीच्या टोकाला लागून दोन वर्षांत जमा झालेले गुंतवळ, कापसासारखा कचरा, बरंच काही बाहेर आलं. आपण घर फार स्वच्छ ठेवतो या माझ्या विश्वासाला तडा गेला आणि स्वप्रतिमेला दुसरा तडा गेला. आता तर द्राक्ष शोधणं प्रतिमेसाठी फारच महत्त्वाचं झालं होतं. मी बॅटरी शोधायला लागले. फोनला लाईट असल्याची ट्यूब वेळेत पेटण्याचा आनंदमात्र मी स्वतःला मिळू दिला नाही.

चहूबाजूंनी, कपाटांच्या, ड्रॉवरांच्या खालून फोनचा दिवा फिरवला. काहीही दिसलं नाही. आता मात्र तंत्रज्ञानच वापरलं पाहिजे. मी माझा चांगला डिजीटल एसेलार कॅमेरा बाहेर काढला. व्हिडीओ बनवावा का चहूबाजूंच्या कपाटांच्या खालचे फोटो काढावेत? व्हिडीओ बनवणं सोपं होतं, पण कष्टाशिवाय 'फळ' नाही. म्हणून मी फोटोच काढायचं ठरवलं. चहूबाजूंच्या कपाटांच्या पायांच्या अधूनमधून सगळीकडून फोटो काढले. तरीही काही नाही. शेवटी दमून किती वाजले ते बघण्यासाठी ऑफस्पिनसारखा हात वळवला. डाव्या हातावर काळा फरांटा आला होता.

आता पुन्हा मेकॅनिकल पद्धत पाहिजे. खराट्यातून दोन हीर काढून आणले. कबाबसारखं द्राक्ष हीराला लागेलही कदाचित. बेल वाजली. समीर. नेहेमी सगळीकडे उशीर करणारा हा इसम आजच अर्धा तास आधी का यावा? त्यालाही स्वप्रतिमा सुधारायची असणार. “आजकाल काय ‘हीरं’दाज बनण्याची फॅशन आहे का? की ही नवीन प्रकारची ‘हीर’विणगिरी आहे?” चेकाळलाय हा इसम फार. आख्खी दुपार मी न जेवता, अविरतपणे द्राक्ष शोधत होते. पाणी प्यायलासुद्धा वेळ झाला नव्हता. आणि हा इथे येऊन माझी टिंगल करतोय. आता इगो गेला चुलीत, मी त्यालाही मदत करायला सांगितलं.

हीर घेऊन मी स्वयंपाकघरात आले. माझ्या मागोमाग हा ही आला. पुन्हा एकदा नमाज पोझ घेऊन मी कपाटांखाली हीर घातले.

"काय गं, एका द्राक्षासाठी? द्राक्षं कोणत्या प्रकारची आहेत, लाल का हिरवी?"

"भिकारड्या, तुला मी मदत करायला सांगत्ये. आणि तुला काय वाट्टेल ते प्रश्न कसले सुचताहेत?"

"दोन महिन्यांनी तुझी बुगडी सांडेल तेव्हा मनुका मिळेल का बेदाणा याचा विचार करतोय."

आत्तापर्यंत घड्याळच खरचटलेलं होतं, आता इगोसुद्धा त्या लायनीत जाऊन बसला. सालं एक द्राक्ष मधुरा का कचरा कर देता है. निमूटपणे मी आंघोळीला गेले. आवरून बाहेर येईस्तोवर द्राक्षांची परडी रिकामी झाली होती.

(पूर्वप्रकाशित - मीमराठीलाईव्ह

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एवढासा प्रसंग मस्त फुलवला आहे. पुढे काय-पुढे काय वाचावसं वाटलं.
____
एका क्षुल्लक गोष्टीसाठी किती तो आटापिटा ROFL
अन एवढं करुन तिथे तो समीर बसलायच द्राक्षांवर डल्ला मारुन, माधुरीला "पेनी वाइज, पाऊंड फूलिश" ठरवायला Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाः हाः ! मजेदार लेख !
..बाकी मी असते तर बाकीची आधी खाऊन घेतली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0