Skip to main content

जन्मजन्मांतरीचं नातं

फोन वाजला. आज गजर खूप लवकर वाजतोय का काय? स्नूझ होईना. चारूता? ही का फोन करत्ये? “चारूता, मी आणि शेरखान काल रात्री एकत्र डँन्स केला. तो मला फिरायला घेऊन जाणारे म्हणाला. कोकिळादिदीला आवडलेलं नाहीये आमचं नातं. पण तिला विचारतंय कोण! … काय? तू काहीच्या काही बोलत्येस. मी ठेवते फोन. झोप येत्ये खूप.”

---

कधीतरी अपरात्री मला जाग आली. तीन वाजून चौदा मिनीटं. नखं कडक पृष्ठभागावर घासण्याचा, फळ्यावर ओरखडल्यासारखा आवाज मधूनच येत होता. अंगावर काटा आला. मेंदू आणि पापण्यांची मारामारी सुरू झालेली होती. मेंदू म्हणत होता, डोळे उघडून पहा कसला आवाज आहे. गेले पाच तास पापण्या खालीवर करण्याचा व्यायाम न केल्यामुळे पापण्यांचं वजन वारेमाप वाढलं होतं. पुन्हा व्यायाम करण्याची बुद्धी पापण्यांना सुचेस्तोवर रात्री झोपताना काय वाचत होते याचा विचार सुरू केला. काही भुताचं वगैरे वाचत असेन किंवा तितपतच भयकारक म्हणजे शाळेबद्दल स्मरणरंजन असलं काही तर भीतीदायक स्वप्नं पडणं सहज शक्य होतं.

मला शाळेची अजूनही भीती वाटते. इंग्लिशच्या मराठे बाई गृहपाठ केला नाही तर वर्गात, सगळ्यांसमोर स्पेलिंग टेस्ट घ्यायच्या. मुद्दाम खराब खडू हातात देऊन फळ्यावर स्पेलिंग लिहायला लावायच्या. फळ्यावर पाच वेळा शब्द लिहायचा. चूक झाली तर आणखी निराळी शिक्षा नाही. पण खडू फळ्यावर घासल्याचा असा काही भयंकर आवाज यायचा की वर्गातल्या बाकीच्या सगळ्यांनाच त्याचा त्रास व्हायचा. त्यांना गृहपाठ तपासण्यासाठी मॉनिटर नेमावे लागले नाहीत. सगळेच स्वयंघोषित मॉनिटर. मराठे बाईंच्या दहशतीमुळे मला पापण्या उघडल्याशिवायच प्रोक्रॅस्टिनेशन शब्दाचं स्पेलिंग आपोआप आठवलं.

घाबरून मी गपकन डोळे बंद केले. हं, म्हणजे मगाशी डोळे उघडेच होते तर. तेवढ्यात पुन्हा तोच कर्कश आवाज आला. हा आवाज खरा आहे का खोटा? शाळा संपून वीस वर्षं झाली तरी मराठे बाई स्पेलिंग घालतात अशी स्वप्नं फ्रेंच शिकायला लागल्यापासून पडायला लागली आहेत. सोडून दिलं पाहिजे फ्रेंच. फ्रेंचचे कानडे किती का क्यूट असेनात. आता मी जागी आहे तरी ओरखडल्याचे आवाज का येेत आहेत?

थोड्या व्यायामानंतर पापण्यांचा आकार आणि वजन कमी झालं म्हणून उठले. दिवा लावला. स्वयंपाकघरातून कोकिळादिदीचा आवाज आला. ती मला हाक मारत होती. स्वतःची अशी समजूत करून घेऊन मी स्वतःला अवास्तव महत्त्व वाढवून घेते, असं समीर म्हणतो. स्वयंपाकघरात ताटल्यांच्या ड्रॉवरसमोर कोकिळादिदी जमीन बोचकारायचा प्रयत्न करत होती. बरं झालं, स्वयंपाकघरात शहाबादी लादी टाकली; महागाच्या फरशांची हिने वाटच लावली असती. मला बघून दिदीच्या गळ्यातून नवाच सूर निघाला. तिच्या मिशांच्या टोकांना बोटं लावून तिला उचकवलं की ती असा आवाज करते. आत्ता घरात कोण आहे हिला त्रास द्यायला!

मी ताटल्यांचा ड्रॉवर उघडला. दिदी ड्रॉवरच्या दारावर चढली आणि आत डोकावून बघायला लागली. तिची ताटली बाहेरच होती. तरीही बराच वेळ तिने ड्रॉवरचं परीक्षण-निरीक्षण केलं आणि मान हलवत खाली उतरली. पुन्हा एक लादी खरवडत एक चिरका आवाज काढला. आता मात्र हद्द झाली.

रोहनच्या झोपेच्या गोळ्यांतली एक दिदीला घालावी आणि तिचा आवाज बंद करावा अशी अनावर इच्छा मला झाली. दरवेळी रोहन घरी येऊन जातो तेव्हा औषधांचा डबा विसरतो. काल नेमका नेला होता. स्वतःसाठी कपभर हळद-दूध आणि दिदीसाठी नुस्तंच दूध घेण्यासाठी मी फ्रीज उघडला. दिदी अचानक फ्रीजकडे धावली. तिचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. पण हाय! या वेळेस ती माझ्या पोटऱ्यांना डोकं घासण्याजागी ती दुडकतच फ्रीजच्या मागच्या बाजूला शिरली.

मी नक्कीच स्वप्नात आहे. दिदी माझ्यापेक्षा इतर कुण्णाकश्शालाही जास्त भाव देणं शक्यच नाही. माझ्याशिवाय तिचे आणखी कोणी चाहतेच नाहीत. ती माझ्याकडेच दुर्लक्ष करायला लागली तर तिला कोणी उरणारच नाही. तिला चाहायला नाही आणि मुख्य पोटापाण्याचं काय! यूट्यूबवर मांजरांचे व्हीडीओ फार उत्साहाने बघितले जातात, त्याला लक्षावधी लाईक्स मिळतात हे सगळं खरंच. पण या नव्या इंटरनेटच्या जगात काय चाललंय याची तिला कुठली जाणीव असायला. ती अजूनही तिच्या आंतरजालपूर्व काळातल्या मागास जाणीवांचं आकलन पुरेसं करून घेऊ शकत नाही. आता पुन्हा तोच खरवडण्याचा आवाज. फ्रीजच्या मागे. दिदीला काल रात्री काय खायला घातलं होतं? का टीव्हीवर काल काहीतरी फॅमिली ड्रामा बघून आता त्याचं फ्रस्ट्रेशन ही माझ्यावर काढणार का. दिदीचा टीव्ही बंद केलाच पाहिजे.

हिला माझ्या डोक्यातले विचार कळतात काय? टीव्ही बंद होणार म्हणून घाबरली का काय? आली ना बरोबर पायाशी माझ्या. समजली ना आता भारतीय संस्कृती. बहुतेक ती माझ्या पायाशी भारतीय संस्कृतीचं उत्खनन करण्यासाठी खरवडत बसल्ये. आता निदान तेवढंतरी शहाणपणा आलंय. नाहीतर आत्तापर्यंत माझी, तिच्यावर विनाअट प्रेम करणाऱ्या चाहतीची, माझ्या प्रेमाची हिला काहीही पर्वा नव्हती. दिदी, तू अशी सुधारणार असलीस तर मी तुझ्यासाठी केसरीकुमार बोक्याच्या मालकाकडे शब्द टाकेन गो!

माझं ऊर भरून आलं, डोळे पाणावले. डोळे पुसायचे तर चष्मा काढला पाहिजे. च्यायला! झोपेतून उठताना चष्मा लावलाच नव्हता का! "आलेचं गं मी दिदी. तू भारतीय संस्कृती विसरू नकोस आणि माझ्या विरहासाठी अश्रूही ढाळू नकोस. आलेच मी अर्ध्या मिनीटात!" मी दाराच्या दिशेने गेल्यावर ती उलट दिशेने गेल्याचं मला दिसलंच नाही.

परत आले तर स्वयंपाकघराच्या दुसऱ्या टोकाला एक झुरळ असहाय्य पालथं पडलं होतं. दिदी दुडकी बसून, एक पाय हवेतच ठेवून त्याच्याकडे शांतपणे बघत बसली होती. मी झाडू घेऊन तिथे गेल्यावर ती माझ्यावर डाफरली. "ते माझं खेळणं आहे. माझ्या खेळण्याला हात लावशील तर खबरदार!"

घरात झुरळासारखा पशू मोकाट सुटलेला असताना मला झोप लागणं शक्य नव्हतं. दुधाचा कप घेऊन मी दिदीकडे बघत बसले, दिदी झुरळाकडे. दिदीचा टीव्ही याच्यामुळे सुटेल का? “शेरखान, तू मला मदत करशील ना? माझ्यासारख्या एकट्या, असहाय्य सिंडरेलाच्या मदतीसाठी धावून आलेला राजकुमारच तू. तू बेडूक असतास तर मी तुझं चुंबन घेतलं असतं आणि तू राजकुमार झाला असतास. शेरखान, माझ्या शेरू, तू बेडूक असण्याजागी झुरळ का झालास?”

--

सकाळी कधीतरी चारुता बेल जोरजोरात वाजवत होती, एकीकडे फोनवरही तिचं नाव झळकत होतं. बेल वाजली की माझं डोकं जोरजोरात निषेध करत होतं. धत्, तिच्याबरोबर सकाळी बूटांच्या खरेदीला जायचं होतं. "आपल्या मागे कोणी गुंड लागला तर पळत सुटायची प्रॅक्टीस नको का आपल्याला?" असं म्हणत आम्ही सेल कधी लागतो याकडे नजर ठेवूनच होतो. आदिदासमध्ये बुटांवर सेल लागल्यावर दोघींनाही लगेच रनिंग शूज हवे झाले होते. बेलचा टणटणाट बंद करण्यासाठी मी माझे नाजूक पाय असेच जमिनीवर टाकून पळत दरवाजा उघडला.

"मधुरा, तुला उशीर? बरी आहेस ना तू?" चारुताच्या चेहेऱ्यावर चिंता दिसत होती. तिला काल रात्रीची सगळी गोष्ट सांगितली. "अगं पण झुरळ ..."
"ओय, त्याला झुरळ म्हणू नकोस. तो माझा शेरखान आहे. मी त्याच्यासाठी शेरखान असं लिहिलेलं अंथरूणही आणणारे."
"तू दिदीचा टीव्ही सोडवण्यासाठी शेरखान आणशील. मग शेरखानला नवी वाईट सवय लागली तर काय करशील?"
"चारुता, तुला मुख्य मुद्दा समजत नाहीये. कोणालातरी शिस्त लावली पाहिजे ही बहुतेक स्त्रियांची अंतःप्रेरणा असते. त्याशिवाय का त्या लग्न करतात किंवा पुरुषांशी कायमस्वरूपी नातं बनवतात? या पुरुषांना काही शिस्त नसते. समीर, सतत उशीरा येणार आणि सडके जोक करणार. रोहनच्या यडछापपणाबद्दल मी काही बोलतच नाही. त्याचं प्सायकॉलॉजी काय, प्सायटेक काय आणि काय काय. आणि प्रसाद ... ई, नाही नकोच त्याचा विषय. जगबुडी येऊन जगात दोनच माणसं जरी उरली ना, मी आणि प्रसाद, तर मी माणसांचं 'ज्युरासिक पार्क' बनू देईन पण त्याचा विचार नाही करू शकणार."
"तू बायकांसारखं का बोलत्येस? आणि शिस्तच लावायची असेल तर कुत्रा पाळ, मांजर पाळ, झालंच तर श्रावण पाळ. पण झुर... शेरखान?"
"हो ... मुझे रातों कि जगानेवाले तुला शिस्त लावल्याशिवाय मी सोडणार नाही." हिला माझं म्हणणं समजतंय का नाही?
"आणि एकदा शिस्त लागल्यावर काय करायचं?"
"शिस्त लावणं वसूल करायचं का पुरुषातली नवी चूक काढायची का नवाच पुरुष शोधायचं हे आपापलं ठरवायचं. मी काय पेप्रातून गोलमटोल सल्ला देणारी मावशी आहे का काय?"
"मधुरा, तू बस जरा. मी कॉफी बनवते. काल रात्री किती वेळ जागी होतीस?" चारुताने मला ओढतच सोफ्यावर बसलं. तेवढ्यात पायाखाली काहीतरी चेचलं गेलं. माझा चष्मा डोळ्यांवर नव्हता. "मी साफ करते मधुरा. तुझा शेर ..." चारुता बोलता बोलता थांबली. "कॉफी होईस्तोवर आंघोळ करतेस का तू?" वा, वा! चारुताला माझ्या एफिशियन्सीचं तंत्र जमायला लागलंय.

कॉफी प्यायल्यावर डोक्याला थोडं बरं वाटलं. "काय गं, शेरखानला काय सवयी लावणार होतीस तू?" कोण शेरखान? मी कशाला कोणाला सवयी लावायला जाऊ? चारुता बरी आहे ना, कित्येक वर्षांच्या मैत्रीत हिला हे समजलं नाही का? "काय बोलत्येस तू नक्की?"

जिना उतरताना चारूताने आठवण करून दिल्यावर मला थोडं थोडं काहीतरी आठवत होतं. "मरतानाही शेरखान मला नवीन जीवन देऊन गेला. जीवन किती क्षणभंगुर आहे हे त्याच्याशिवाय मला समजलंच नसतं." चारुतालाही स्फुरण चढलं, "तुमचं नातं लग्नाचं नसलं तरीही अगदी पवित्र होतं ..." आमच्या भावनाबंबाळपणामुळे अवघडलेला प्रसादचा चेहेरा दिसला. हे नवं हत्यार आम्हाला मिळालंय याचा आनंद काही औरच होता.

Node read time
6 minutes

ललित लेखनाचा प्रकार

6 minutes

.शुचि. Tue, 29/09/2015 - 04:04

एकदम झकास. मस्त आहे. कोकीळादीदी माऊ आहे हे मिशीचा संदर्भ आला तेव्हा कळलं :)
केसरीकुमार बोका =))

कोणालातरी शिस्त लावली पाहिजे ही बहुतेक स्त्रियांची अंतःप्रेरणा असते.

हाहाहा

गेले पाच तास पापण्या खालीवर करण्याचा व्यायाम न केल्यामुळे पापण्यांचं वजन वारेमाप वाढलं होतं.

हे वाक्य तर खूपच आवडलं.

"तुमचं नातं लग्नाचं नसलं तरीही अगदी पवित्र होतं ..."

खी: खी: