जोड्याची ताटातूट
मधुराच्या घराची बेल दाबायची म्हणजे का कोण जाणे नेहेमी माझा हात क्षणभर अडखळतो. तसा आजही तो अडखळला. तिच्या घरात शिरलं की माझी चेष्टा, मानहानी करणं असले प्रकार ती करते. त्यामुळे मी बेल वाजवली की आज ती काय म्हणणार असा प्रश्न पडलाच होता. त्याचं उत्तर लवकरच मिळालं.
त्याचं असं झालं की मधुरा आणि चारुता नुकत्याच वेगवेगळ्या दुकानांत दौलतजादा करायला गेल्या होत्या. असला बाहेरख्यालीपणा केल्यावर त्या धुंदीतच ती परत आली होती. तिच्या दोनतीन प्रकारच्या पायताणांचं प्रदर्शन मांडून झाल्यावर अर्थातच तिची नजर माझ्या बुटांवर गेली. एरवी तिची नजर अशी चटकन झुकत नाही, पण ती उचलल्यावर जो तुच्छतेचा भाव दिसला तो अवर्णनीय होता.
"अरे सम्या तुझे हे शूज आहेत की लक्तरं?" बेल दाबताना मनात आलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर हेच. तिच्या बोलण्याने मी काहीसा दुखावलो गेलो. माझे बूट मला खूप आवडतात. पण माझ्या चेहेऱ्यावरच्या वेदनेची बिलकुल कदर न करता ती म्हणाली,
"किती वर्षं वापरतोयस तू हे?" माझ्या बुटांकडे तिने असं युटिलेटरियन दृष्टिकोनातून पाहिल्याचा मला राग आला.
"वापरतोय! किती वर्षं या बुटांनी माझी साथ दिली हे विचार."
"साथ दिली? बंर. किती दिवस साथ दिली म्हणे?" मी यडपटासारखा बोलतोय असं तिला सुचवायचं असतं तेव्हा ती "बंर"चा असा काहीतरी विचित्र उच्चार करते.
"तीन वर्षं चौदा महिने पंधरा दिवस."
"अच्छा? दिवस मोजतात वाटतं तुमच्यात! फारच गहिरं नातं दिसतंय तुमचं."
"आहेच मुळी. मला तो दिवस अजून आठवतोय. मी काही कामासाठी बंगलोरला गेलो होतो. सहज रस्त्यावरून जात होतो, तेव्हा शोरूमच्या खिडकीत यांतला उजवा शू दिसला. मी कसल्यातरी अज्ञात बळाने खेचला गेलो. मला वाटतं असा प्रथमदर्शनी प्रेमाचा तो माझा पहिलाच अनुभव. आत्तापर्यंत मी केवळ गरज, पद्धत म्हणून वाट्टेल ते शूज घालायचो हे त्या क्षणी एकदम जाणवलं."
"मग?" तिच्या चेहेऱ्यावर एक चेष्टायुक्त कृत्रिम उत्सुकता होती.
"मग काय, मी तिरीमिरीत त्या दुकानात शिरलो. ते शूज पायात घातल्यावर मला अक्षरशः मला आत्मा-परमात्म्याचं मीलन झाल्यासारखं वाटलं. प्रकृती आणि पुरुषच म्हण की. जणू काही माझ्या पायाच्या आत्म्याला नवीन शरीर सापडलं."
"सम्या, जरा जमिनीवर ये. निदान या तीन वेगवेगळ्या मीलनांपैकी एकच उपमा वापर." मधुराला माझ्या बोलण्यातला भाव समजून घेण्यापेक्षा त्याची चेष्टा करण्यातच गंमत वाटते. मी तिला तसं सांगितल्यावर ती म्हणाली,
"अरे, पण ते शरीर मर्त्य आहे. त्याचं छिंदंती, दहती वगैर सगळं झालेलं आहे. तुझ्या पायाचा आत्मा अमर आहे. त्याला आता नवीन शरीर देण्याची वेळ आलेली आहे."
"छे छे, हे चांगले शूज आहेत. मी ते वर्षानुवर्षं वापरले आहेत, आणि अजून अनेक वर्षं आमची जोडी टिकून राहाणार आहे."
पण पुढच्यावेळी आम्ही पाच जण कॅफे क्रस्टीजमध्ये भेटलो तेव्हा हा विषय तिने मुद्दाम उकरून काढला. आणि सगळ्यांना रंगवून रंगवून हा किस्सा सांगितला.
"सम्याला वाटतंय मी त्याला म्हणते तुझी बायको टाकून नवीन कर... आणि तो म्हणतोय 'नाही, नाही, ती तितकी वाईट नाही, मी तिला सुधरण्याचा प्रयत्न करेन'" तिने हे म्हटल्यावर सगळेजण फिदीफिदी हसले त्याचा मला रागच आला. त्यात सगळ्यांनी टेबलाखाली वाकवाकून माझ्या बुटांकडे पाहायला सुरूवात केली.
"खरंच रे सम्या, फारच भीषण अवस्था झाली आहे. नवीन घेऊन टाक" प्रसादसारख्या कंजुषानेही असं म्हणावं?
"हेच बूट वापरत राहिलास तर तुझे पाय बूट फाडून बाहेर येतील. क्रिकेटमध्ये बॉलर्स नाही का, त्यांच्या उजव्या बुटाचा पुढचा भाग फाडतात तसेच." इति रोहन.
"सिनेमात नाही का, काहीतरी प्यायल्यावर सुपरहीरोची बॉडी बनते आणि बनियन फाडून बॉडी बाहेर येते तसे याचे पाय बाहेर येणारेत" - मधुरोक्ती.
"किंवा ऊर भरून येऊन बुटांची चोळी तटतट तुटेल." प्रसादची कल्पनाशक्ती नेहमीच चोळ्यांभोवती घोटाळते.
"चोळी तटाटणार? याचे बूट इतके म्हातारे झाल्येत की त्यांच्या कवळ्या तिसऱ्यांदा बदलाव्या लागत आहेत." चारुताही पचकली.
"बुटांचं कोलेस्टेरॉल आणि बीपी किती आहे?"
"अधूनमधून त्यांच्या नाड्या तपासून बघत जा!"
"त्यांचं फेसलिफ्ट तरी करून घे रे" चारुताचा सौंदर्यसल्ला.
ही सगळी खिदळाखिदळी चालू होती आणि मी मात्र संतापाने अस्वस्थ होत होतो. रागाने लालबुंद होत मी म्हणालो
"माझे इतके सुंदर शूज मरायला टेकले आहेत आणि तुम्हाला चेष्टा सुचते आहे!" मी तणतणलो.
"आहा, मला माहित्येय काय चाललंय ते. तू डिनायल ओलांडून अँगरमध्ये शिरला आहेस" रोहन म्हणाला.
"म्हणजे?" सगळ्यांच्या वतीने मीच तो प्रश्न विचारला. रोहन सायकॉलॉजी शिकलेला असल्यामुळे काहीतरी तांत्रिक शब्द फेकायला त्याला आवडतात.
"सांगतो. कुठचीही दुर्घटना झाली - जवळच्याचा मृत्यू, एखादं नातं तुटणं वगैरे - की माणूस दुःखातून बाहेर येताना वेगवेगळ्या टप्प्यांतून जातो. पहिला डिनायल - म्हणजे हे असं झालंच नाही, काही बिघडलंच नाही असं म्हणत राहाणं. दुसरी पायरी अँगर - म्हणजे आपल्या बाबतीत असं काहीतरी झाल्याबद्दलचा राग. परवा मधुराच्या घरी तू डिनायलमध्ये होतास, प्रॉब्लेम नाकारत होतास. आता ती पायरी ओलांडून तू रागात शिरला आहेस."
मलाच काय, पण इतरांनाही हे फारसं पटलं नाही. पण निव्वळ मला बोलून घेता येतं म्हटल्यावर त्यांनी अर्धवट होकारार्थी मान डोलावली.
आम्ही कॅफेमधून बाहेर पडलो ते तडक आमच्या 'सांगवीकर छत्री-चप्पल डेपो' वाल्या सांगवीकरकडे गेलो. त्याला बूट दाखवल्यावर त्याने ते एखाद्या समीक्षकाने कविता वरून खालून मागून पुढून तपासून पाहावी तशी पाहिली.
"साहेब तुमच्या बुटांची अवस्था मराठी साहित्यासारखी झाल्ये. कोणी विचारत नाही त्याला. जीर्णशीर्ण, घिस्यापिट्या कल्पनांप्रमाणे सोल घासला गेला आहे, आम्ही समीक्षक एखाद्या कलाकृतीत जशी भोकं पाडतो, तशी वरून भोकं पडलीत. साहेब, साठोत्तरीत जे नवीन होतं ते नव्वदोत्तरीत चालत नाही, दृष्टिकोन बदलतो तशी फॅशन बदलते. भुवया कोरलेली फडक्यांची इंदुमती तेव्हा सुंदर होती, आता साठ वर्षांनी ती सुंदर राहील का, तुम्हीच सांगा!"
"पण दुरुस्त होईल का?"
"आता तसं म्हटलं तर काहीही दुरुस्त होतं साहेब. पण त्यासाठी किंमत किती मोजायची?"
"कितीही खर्च आला तरी चालेल. मला हेच शूज हवे आहेत."
"हेच शूज? साहेब, तुम्हाला 'शिप ऑफ थिसियस' ही कल्पना माहिती आहे का? त्यात एका जहाजाचे सगळे पार्ट्स काढून दुसऱ्या जहाजाला लावतात, आणि दुसऱ्या जहाजाचे सगळे पार्ट बदलत पहिल्याला लावतात. आता पहिलं जहाज कोणतं आणि दुसरं जहाज कोणतं? तसंच तुमच्या बुटाचं होणार. सोल बदलायचा, आतला सोल बदलायचा - म्हणजे आत्माच टाकून द्यायचा, बुटाचं कातडं बदलायचं म्हणजे बुटाचं शरीर बदलायचं. मग तोच बूट कसा राहाणार साहेब?"
"पण नाड्या तरी त्याच राहातील ना!"
"पण नाड्या म्हणजे फक्त कपडे साहेब. हे म्हणजे नेमाड्यांच्या कव्हरात वपुंचा कथासंग्रह घालण्यासारखं आहे."
सांगवीकरांसारख्या कलाकाराचा नकार ऐकल्यावर मी खट्टू झालो. माझ्या घरी आम्ही कॉफी घ्यायला जमलो तेव्हा माझ्या उदासपणाचं वातावरण सर्वांवरच पसरलं होतं. कॉफी पिताना मात्र रोहन म्हणाला,
"आत्ता तू चांभाराबरोबर जी बोलणी केलीस ती तुझ्या दुःखाची पुढची पायरी. त्याला म्हणतात बार्गेनिंग - किंवा घासाघीस. ते दुःख करावं लागू नये म्हणून काहीतरी तडजोड स्वतःशीच करण्याचा प्रयत्न."
आता मात्र सगळ्यांचा रोहनच्या भंकस काहीतरी बोलण्यावर विश्वास बसायला लागला होता. मधुराने आपल्या फोनवर विकीपिडियाचं पान नाचवत म्हटलं
"आयला खरंच आहे हे." तिने ते पान इतरांनाही दाखवलं. मग सगळेजण माझ्याकडे मी सुतकात असल्याप्रमाणे बघायला लागले.
"बोल." रोहनने माझ्या खांद्यावर हात ठेवून सद्गदितपणे म्हटलं. आणि कसा कोण जाणे, माझाही बांध फुटला.
"मला पण गेलं वर्षभर जाणवतंय की आमच्या नात्यात सगळं काही ठीक नाही. बूट फाटले आहेत, त्यातून पावसाचं पाणी जाऊन पाय ओले होतात, पण मी ते तसंच सहन करतोय.. पण कोणाला सांगू आणि कसं सांगू?" मी डोळे पुसले.
‘अरे इतका त्रास होतोय तर मग टाकून का नाही देत?’
‘ते तितकं सोपं नाही. एकदा असं नातं तयार झालं की ते असं टाकून देणं सोपं नसतं.’
'जगात सोपं काहीच नसतं. पण आपण जुनं विसरून पुढे जायला हवं.'
'कसं विसरायचं सगळं? हे बघ फोटो बघ' मी आल्बम काढून दाखवला 'आम्ही हरिश्चंद्रगडाच्या हाइकला गेलो होतो तेव्हाचा हा फोटो. नंतर हा आम्ही म्यूझियममध्ये गेलो होतो तेव्हाचा. फार गोड आठवणी आहेत आमच्या नात्याच्या. त्यांनी माझ्यासाठी इतकं केलं… पावसाळ्यात ते चिखलात माखायचे. मी त्यांच्यावर वॉटर रिपेलंट स्प्रेदेखील कधी मारला नाही. मी त्यांना फार गृहित धरलं काय गं?'
'चल हट! तू तुझ्या बुटांची काळजी घेतोस तितकं कोणीच घेत नाही. उगीच नाही तीन वर्षं चौदा महिने टिकले ते. मी असते तर केव्हाच फेकून दिलं असतं.' मधुरा
"तुमचं बायकांचं बरं असतं. अशा शूजमध्ये जीव जडत नाही. आम्हा पुरुषांकडे एकच जोड असतो. याउलट तुम्हा बायकांचा याबाबतीत उच्छृंखलपणा असतो. तुम्ही एका वेळी चारचार वेगवेगळे जोड ठेवता. हे समाजमान्यच नाही, तर अपेक्षितही असतं. आणि फॅशन संपली की टाकून देता, त्यांच्या भावनांची काही कदर न करता. पडल्या थोड्या सुरकुत्या की तुम्हाला लगेच नवेकोरे तरणेताठे शूज हवे असतात." मला दुःखाचे उमाळे आवरत नव्हते.
"उत्तम " रोहन अचानक उभं राहून
"उत्तम काय, त्याला एवढं दुःख होतंय आणि तू उत्तम म्हणतोयस?" प्रसाद म्हणाला.
"दुःखातून बाहेर पडण्याच्या पुढच्या पायऱ्या आहेत त्या म्हणजे डिप्रेशन आणि शेवटी स्वीकार. या डिप्रेशनमधून हा लवकरच बाहेर पडेल तेव्हाच त्याला त्या दुःखाचा स्वीकार करून पुढे जाता येईल."
"पण नवे बूट टोचतील त्याचं काय?" मी शूज खरेदी करायला निघालो तेव्हा मधुराला म्हणालो.
"ते आहेच. पण कुठचीही मीनिंगफुल रिलेशनशिप तयार करायची झाली तर सुरूवातीला असे कष्ट सहन करावेच लागतात. अरे त्यात गोडीच असते."
"पण यावेळी पहिल्याच भेटीत मी प्रेमात पडेन असे शूज सापडले नाहीत तर?"
"त्या तसल्या रोमॅंटिक गोष्टी जरा जास्तच डोक्यावर चढवलेल्या आहेत"
मला ते पटलं, आणि आम्ही दुकानात शिरलो.
प्रतिक्रिया
वा! खूप मस्त जमलाय. भट्टी
वा! खूप मस्त जमलाय. भट्टी एकदम जमलीये. ५/५
___
जोड्याचा श्लेष तर कमालच
छान लिहीलंय. अवांतर -
छान लिहीलंय.
अवांतर - "उच्छृंखलपणा" हा अवघड शब्द लोकं खरंच वापरतात का बोलतांना..
छान आहे. पण एवढं बोलणारा
छान आहे. पण एवढं बोलणारा छत्री चप्पल डेपोवाला या भूतलावर असतो काय? हा तर फावल्या वेळात एमेला शिकवत असावा, किंवा विनाअनुदानीत कॉलेजात मराठी शिकवून झाल्यावर या धंद्यावर पोट भरत असावा.
करुण... करुण आहे हा लेख. मी
करुण... करुण आहे हा लेख. मी सम्याच्या दु:खात सामील आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
छान जमली आहे
छान जमली आहे
छान आहे!
छान जमलीय भट्टी पण बिचारा समीर आणि बिचारा त्याचा जोडा!
कधीकधी असं होतं खरं... शूज हा
कधीकधी असं होतं खरं...

शूज हा काही माझ्या फारसा प्रेमाचा विषय नाही. पण मागे एकदा मिलानला फिरतांना एका दुकानाच्या शोकेसमध्ये ते शूज दिसले.
काय डोक्यात त्यावेळेस किडा आला की, आत जाऊन माझ्या मापाचा जोड घालून पाहिला
आणि हाय, त्याच्या प्रेमातच पडलो!!!!
दिसायला सुंदर तर होतेच पण फीलिंगला अगदी सॉफ्ट आणि मस्त!
(पावणेतीनशे युरो देऊन विकत घेतले; आता अगदी जपून जपून वापरतोय!!!)
बहुतेक माणसाच्या बूटांवरुन
बहुतेक माणसाच्या बूटांवरुन त्याच्याबद्दल बरेच काही कळते असे नीरीक्षण खरे असावे, मला शूज यकदम प्रॅक्टिकल, राकट अज्जिबात नाजूक-साजूकपणा नसलेले लागतात. एकदम युटिलिटेरिअन!!!
बहुतेक माणसाच्या बूटांवरुन
हे खरं वाटत नाही.
कारण बूट असणार्या माणसाकडे फक्त ते एकच पायताण नसतं, इतर चपला, स्लिपर्स वगैरे ही असतात.
बायकांच्या बाबतीत तर, अरे देवा!, वॉकिंग क्लॉजेट्स भरलेली असतात!!
मग एकाच जोडावरून त्या माणसाच्याबद्दल अंदाज कसा मांडणार?
जोड्यांची कथा आवडली .
जोड्यांची कथा आवडली .
प्रत्येकाकडे ( कमीत कमी एक तरी) चांगला जोडा असणे जरूरी आहे .
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
उत्तम वगैरे आहेच, पण
उत्तम वगैरे आहेच, पण त्यातही
यात साधलेल्या गंमतीला स्टँडिग ओव्हेशन!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!