जीपीएस-माता
"आयुष्याला काही दिशा असली पाहिजे. आजचा दिवस नोकरी आणि कॅफेत गेला. कालचा दिवसही तसाच गेला, उद्याही तसाच असणार आहे. पण महिनोन्महिने हेच करायचं आणि साठ वर्षं झाल्यावर घरी बसून त्या दिवसांच्या आठवणींचे कढ काढत बसायचं. हे असं तुमचं आयुष्य आहे, आणि असेल. तुम्ही लोक तुमचं आयुष्य फुकट घालवता हे मला अजिबात बघवत नाही. तुमचा मित्र म्हणून माझीही काही जबाबदारी आहे…." रोहन बराच वेळ बोलत होता. आम्ही कॅफेत बसलो होतो. समीर नेहेमीप्रमाणे शून्यात नजर लावून बघत होता. रोहनच्या डोक्याच्या मागे, काचेआड मला पाय दिसत होता. अॅपल पाय. रोहन बौद्धिक आरोग्याबद्दल बोलायला लागला की त्याच्या शारीरिक आरोग्याचा विचार करून आम्ही लक्ष दुसरीकडे वळवतो.
कोणीतरी खचकन तो पाय ओढला आणि त्यावर सुरी फिरवली. मी पुन्हा एकदा जिभली चाटली. "अगं कोकिळादिदीसारख्या जिभल्या कसल्या चाटतेस? दिशेचा विचार कर. ही जीपीएस-माता जीपीएसेम वापरून पहा आणि मला फीडबॅक दे." रोहन काहीतरी म्हणत होता, मी हो-ला-हो केलं. मला फक्त पायचा तुकडा दिसत होता. निघतानिघता तो खोक्यात बांधून घेतला. "मधुरा, ही तुझ्या स्कूटरला जोडून देतो मी." रोहन बरा आहे ना? स्कूटरला पेट्रोल, इंजिनऑईल, झालंच तर हवा दिली ठीक आहे. "चूप. तो पाय मी माझ्यासाठी घेतलाय, स्कूटरला नको ..." समीर रोहनच्या मागे उभं राहून हातवारे करत होता. मी जीभ चावली. "... बरं काय करायचंय ते लवकर कर. मला आज बरीच कामं उरकायच्येत. डेंटिस्टकडे जायचंय, चारुताबरोबर खरेदी ..."
रोहन स्कूटरची किल्ली घेऊन काहीतरी खुडबूड करायला गेला. सम्या माझा हात ओढून मला थोडा लांब घेऊन गेला. "मधुरा, बरी आहेस ना तू? रोहनचं बोलणं ऐकून न घेता त्याला होकार कसा देतेस तू? पैशांचं वचन दिलं असतंस म्हणजे?" "समीर, तो बोलायला लागला की तू स्वतः शून्यात नजर लावून बसलेला असतोस ते माहित्ये. तू काय मला ढोस देतोस? असे कसे पैसे देईन मी त्याला, फक्त कबूल केलं म्हणून." आमचं भांडण कितीतरी काळ सुरू राहिलं असतं. पण रोहन स्कूटरची किल्ली घेऊन परत आला. "तुझ्या स्कूटरला जीपीएसमाता जोडल्ये. आता तू रस्ते चुकणार नाहीस. एवढंच नाही, स्कूटर चालवताना तुला वेगळ्या करमणूकीचीही गरज पडणार नाही. जीपीएसमाता तुझ्याशी गप्पा मारेल. लॉक करून जाशील तेव्हा वरचा खोका तेवढा काढून घे."
मला हे काही समजतच नव्हतं. जीपीएसमाता! रोहनच्या डोक्यातून अचाट कल्पना येतात. प्रत्येक वेळी वाटतं की हा त्यापेक्षा आणखी काही विक्षिप्त करणार नाही, आणि प्रत्येक वेळेस आम्ही चुकतो. तो पुढच्या वेळेस पुन्हा काहीतरी आचरट प्रॉडक्ट घेऊन येतो.
स्कूटर सुरू केली. "बाळ, तुला आता कुठे जायचंय?" बाप रे! हा जीपीएस फारच गळेपडू निघाला. 'शामची आई' बघता बघता याने जीपीएसचं प्रोग्रॅमिंग केलं का काय? डेंटिस्टचा पत्ता टाकण्यासाठी मी त्या जीपीएसची बटणं शोधायला लागले. कुठेच, काहीच बटण नाही, टचस्क्रीनही नाही. वैतागून मी स्वतःशीच बडबडले, "आता पत्ता कसा टाकायचा यात!" आणि एकदम जीपीएस बोलला, "बाळ योग्य ठिकाणी पोहोचण्याची काळजी घेतेस तशी उपकरणांची मॅन्युअल्स वाचण्याचीही घे हो!" हे जरा अतीच व्हायला लागलंय. "आईशप्पथ, हा जीपीएस माझं डोकं फिरवणारे. मला ही शामची आई नको, मला माझी आई पुरेशी आहे."
त्या जीपीएसकडे दुर्लक्षच केलं पाहिजे. तो येडा रोहन काहीतरी बनवतो, आणि त्याबरोबर आमच्याही डोक्याची आई-बहिण करतो, आता तर शब्दशः. कॅफेच्या गल्लीतून मोठ्या रस्त्यावर आले तर लगेच पुन्हा आवाज आला. "तुला शामची आई नको तर मग ही घे. कोणती आई आहे हे, 'जाने तू या जाने ना'." मला आता थोडी गंमत वाटायला लागली. अमकी आई नको म्हटल्यावर लगेच दुकानात जायचीही गरज नाही. थोडी किरकिर केली की लगेच आईसुद्धा बदलून मिळते. आमच्या लहानपणी नव्हती बुवा असली काही गंमत.
एकदाची मी डेंटिस्टकडे निघाले. रस्त्यात ट्रॅफिक लागला. सगळी ऑफिसं सुटायची वेळ. "या वेळेला कशाला निघालीस डेंटिस्टकडे. आत्ता चल मस्त मॉलमध्ये. कपडे बघायचे, शूज बघायचे, दिसले तर तिथले हँडसम पुरुष बघायचे. ही काय खुर्चीत आ वासून बसायची वेळ आहे का?" जीपीएसमाता भलतीच चंट झाली. "अगं बाई, मी अपॉईंटमेंट घेतली होती. तो ऑर्थोडोंटिस्ट आठवड्यातून दोनच दिवस भेटतो. माझं काम करून घ्यायचं असेल तर मला एकतर ऑफिसला दांडी मारावी लागेल किंवा ट्रॅफिकमध्ये जावं लागेल. दांडी कशाला मारायची तेवढ्यासाठी?" तरी जीपीएसएमचं समाधान झालं नव्हतं. “दिसायला कसा होता डेंटिस्ट?” असं म्हणत डिस्प्लेवर समोर डोळा मारणारी स्मायली आली.
डेंटिस्टच्या दुकानाजवळ पोहोचलो, आता पार्किंग शोधायला सुरुवात केली पाहिजे असा विचार मी करत्ये तोवर "ते बघ, ते बघ. तिथे बघ थोडी जागा आहे. तुला स्कूटरसकट तिथे घुसता येईल." तिथे माझी जाडी अॅक्टीव्हा घुसवल्यावर 'हर थायनेस' म्हणजे दस्तुरखुद्द मी बाहेर निघायला जागा का ही जीपीएसेम करून देणार होती का? "अगं शेजारच्या स्कूटरला थोडा धक्का देऊन बाहेर पडता येईल की तुला!" मला पुन्हा 'शामची आई' हवीशी झाली. नक्की कोणती आई हवी आहे याचा निर्णय करता येईना, पण सध्या पार्किंगची जागा महत्त्वाची होती. सुदैवाने पुढची सूचना मिळायच्या आत पार्किंगला पुरेशी जागा मिळाली आणि मी हुश्श केलं. (पण आजचा भाग अजून संपलेला नाहीये.)
डेंटिस्टकडून निघाले ते थेट चारुताच्या ऑफिसच्या दिशेला. तिचं ऑफिस शहराच्या दुसऱ्या टोकाला आहे. पुन्हा स्कूटरला किल्ली लावली तर "बाळ मधुरा, डोक्याला स्कार्फ गुंडाळून त्वचेची काळजी घेतेस तशीच हेल्मेट घालून डोक्याचीही काळजी घे गं," असा आवाज आला. ही जीपीएसएम मनसुद्धा वाचते का काय? आता मला थोडी भीतीच वाटायला लागली. रोहनला आम्ही नेहेमी येड्यांत काढतो पण तो खरोखरच अतिहुशार असेल तर? त्याला खरंच मनातले विचार वाचण्याचं तंत्र समजलं असेल तर? च्यायला, चूकच केली का काय त्याला भांडवल न पुरवून. नाहीतरी एवढे पैसे बुडाखाली दाबून काय करणारे मी ... हेल्मेटच्या आत विचारांचं वेगळंच चक्र सुरू झालं. तेवढ्यात वनमाला बाईंचा आवाज जाऊन तिथे पुन्हा रत्ना पाठकचा आवाज आला, "तो बघ, तो बघ, तो बघ ... शेजारचा बाईकवाला कसला हँडसम आहे! पाठलाग कर त्याचा किंवा फोन नंबर माग त्याच्याकडे. निदान नावतरी सांग स्वतःचं. आणि आधी हेल्मेट काढ, त्याला तुझा चेहेरा नीट दाखव." इकडे सिग्नल सुटला तरी ही बाई बोलतच सुटली होती. "बाई गं, तू मला रस्ता दाखवणार आहेस, पोरं कसली दाखवतेस. आणि रस्त्यात दिसलेल्या कोणत्याही इसमाला, हार्ली डेव्हिडसन चालवत असला तरीही, मी माझं नाव-गाव सांगणार नाहीये. मला एवढंही डेस्परेशन आलेलं नाहीये." तो बाईकवाला माझ्या शेजारून गाडी चालवतोय अशी शंका मला यायला लागली. "तुला कोणी लगेच लग्न कर म्हणत नाहीये. निदान आहे कसा ते तरी पहा नीट. स्प्लेंडर नाही चांगली एनफील्ड चालवतोय तो. काहीतरी विचार कर गं तू." जीपीएसेमचा आवाज पुरेसा मोठा होता, एनफील्डवाला ढुर्रढुर्र आवाज करत जोरात निघून गेला.
फीगर बरी होती त्याची. एनफील्ड चालवत असला तरी हेल्मेट होतं, वळताना शिस्तीत इंडिकेटर दिला होता त्याने. म्हणजे डोक्यानीही बरा असावा. या जीपीएसेमच्या आगाऊपणामुळेच तो पळून गेला याबद्दल मला काहीही शंका नव्हती. मला तिचा थोडा रागच यायला लागला. "बाळ मधुरा, दिवेलागणीची वेळ. स्कूटरचेही दिवे लाव बघू. पुढच्या सिग्नलला थांबलीस की शुभंकरोति म्हणून घे." म्हणजे या जीपीएसेमला माझं मन वाचता येत नाही अशीही एक शक्यता आहे का? का मला राग आला म्हणून सात्त्विक बडबड सुरू केल्ये या यंत्राने; एवढ्या प्रेमाने कोणी गळ्यात पडलं की आरडाओरडासुद्धा करता येत नाही. माझा निर्णय काही होईना. "समोरच्या गाडीनेही दिवे लावले, बाळ तू ही दिवा लाव. संध्याकाळी ..." त्या यंत्राला वैतागून का होईना, मी स्कूटरचा दिवा लावला. समोरच मामा उभा होता. मगाचच्या एनफील्डला त्याने पकडलं होतं. माझ्या मनात रोहनबद्दल असलेला गोंधळ आणखीनच वाढला.
तेवढ्यात माझा फोन वाजला. मी रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली. आईचा फोन होता. "आत्ता कुठे थांबतेस? चारुता वाट बघत बसेल, खरेदी महत्त्वाची. आईशी नंतर बोल." पुन्हा 'जाने तू या जाने ना' झालं. आईला फक्त मेसेज टाकला, नंतर फोन करेन. आणि तो जीपीएसेचा वरचा खोका काढून सीटखाली टाकला. आता कितीही आवाज केला तरी ऐकू येणार नाही. चारुताबरोबर खरेदी वगैरे झाली आणि तिला घरी सोडलं. "मधुरा, तुझ्या स्कूटरमध्ये काहीतरी वाजतंय. तुझा फोन व्हायब्रेटवर टाकून तो नाही ना सीटखाली लपवलेला?" बाप रे, म्हणजे ही बळजबरी आई सीटखालूनही बोलत होती तर. तिला बंद कसं करायचं आणि स्कूटरमध्ये तरी कसं सोडायचं? वर घेऊन आले आणि चपलांच्या खणावरच सोडलं.
रात्री आईला फोन केला. आमचं फोनवर बोलणं सुरू असताना मी पिंजऱ्यातल्या वाघासारख्या अस्वस्थ फेऱ्या मारत होते. पार्श्वभूमीवर अधूनमधून "बाळ, दमली असशील काम करून" आणि "आत्ता आईशी काय गप्पा मारतेस? एखादा बॉयफ्रेंडतरी शोध गं" असं आलटून पालटून ऐकू येत होतं. रोहनला माझं मन वाचता येतं का याचा निर्णय अजूनही होत नव्हता. माझं बोलण्याकडे धड लक्ष नाही, शिवाय मागून काहीतरी आवाज येतोय, हे आईला समजल्याशिवाय थोडीच राहणार होतं. तिला हा सगळा प्रकार सांगितला.
"आई, मला थोडी भीतीच वाटत्ये, रोहनला लोकांच्या मनात काय सुरू आहे ते समजत असेल तर? किंवा ते वाचणारं यंत्र त्याने बनवलं असेल तर! त्याला भांडवल द्यायला पाहिजे होतं का? निदान आतातरी चूक सुधारता येईल. आर्थिकदृष्ट्या हा निर्णय चुकला का? पण समज त्याला काही घंटा.... अजिबात समजत नसेल हे काय सुरू आहे तर पैसे बुडतील. शिवाय तो देणेकरी झाला की मैत्री धड राहणार नाही म्हणून आम्ही पैसे देत नाही गं त्याला. थोडे पैसे गेले तर ठीक. त्याला फुकटचं खायलाप्यायला घालायला ना नाही. पण मैत्रीत असे पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न येतो."
"मग नको देऊस पैसे. त्याला खरंच काही नवीन समजलं असेल तर ते त्याला नीट सिद्ध करूदेत." हुश्श, आई स्वतःसारखीच बोलायला लागल्यावर किती बरं वाटलं.
"पण ह्या यांत्रिक आईचा फार उपद्रव होतोय गं, काय करू?"
"मधुरा, तुला माणसांचा त्रास होतो आणि तू त्यांना टाळून पुढे जातेस. यंत्राची तक्रार कसली करतेस? 'अॅई हे यंत्र मला त्रॅस देतंय.' वय काय तुझं? नको असेल तर परत दे ते यंत्र रोहनला. त्यानी परत नाही घेतलं तर बॅटरी काढ त्याची. आणि ते ही नाही करता आलं तर सरळ सहाव्या मजल्यावरून खाली टाकून दे ते."
"आऽऽऽ, माझ्या छातीत कळ आली, मला खूप घाम येतोय. मला हार्ट अटॅक येतोय." अर्धं वाक्य वनमाला बाईंसारखं, अर्धं रत्ना पाठकच्या आवाजात असं दिसत होतं. जीपीएसेमची बॅटरी संपली होती का आईचं बोलणं तिने ऐकलं माहित नाही. मी ते खोक्यात टाकलं. त्यावर गिफ्टरॅपचा रंगीबेरंगी कागद गुंडाळला. मेलोड्रामांमध्ये अविवाहित माता आपलं पोर चर्चच्या पायऱ्यांशी सोडून देते तसा तो खोका रोहनच्या दाराशी सोडला आणि बेल वाजवून तिथून पळून गेले.
प्रतिक्रिया
अपॉईंटमेंट
ऑर्थोडेंटिस्टची अपॉईंटमेंट तीन वाजून चौदा मिनिटांनी होती, हे लिहायचे राहिले का?
नावावरून काही अर्थबोध झाला
नावावरून काही अर्थबोध झाला नव्हता.मजेदार.
मस्त!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मस्तच.
वारले